रिक्त

Submitted by मोहना on 22 January, 2014 - 18:40

आकाशाकडे झेपावणार्‍या झाडाची फांदी प्रणवने रेखाटली आणि पेन्सिल खाली ठेवली. चित्राला जुनं, विटकट रुप आणण्याचा तो कसोशीने प्रयत्न करत होता. १८६० च्या काळातल्या शेताचं, खोपटेवजा झोपडीचं आणि त्या झाडाचं त्याने वेगवेगळया बाजूने खूपवेळ निरीक्षण केलं. हिरवागार मळा, कडे कडेला नजर खिळवून टाकणारी फुलझाडं, इकडे तिकडे बागडणारी मुलं. सुंदर चित्र होतं. पण मनात घर करुन राहिलेलं त्या शेतात राबणार्‍या गुलामांचं वर्णन चित्रात काही केल्या जिवंत होत नव्हतं. तो तसाच स्तब्ध उभा राहिला. शेजारच्या खोलीतून येणारे गाण्याचे स्वर आत्ता कुठे त्याच्या मनात झिरपले. अमिता एरोबिक्स करत असावी. एक सुरेल लकेर कानाने टिपली आणि त्या तालावर झाडावर निसटसा हात त्याने फिरवला. कलती मान करत प्रणवने चित्र पुन्हा पुन्हा पाहिलं आणि धावत जाऊन अमिताच्या खोलीचं दार ढकललं.
"अमू तुझ्या त्या गाण्याच्या लकेरीने माझं चित्र बघ कसलं मस्त आलंय."
"अमिता म्हण रे" नाईलाज झाल्यागत पाय ओढत ती प्रणवच्या खोलीत शिरली. पुढचे शब्द तिच्या तोंडून बाहेर पडलेच नाहीत. ती नुसतीच त्या चित्राकडे पाहत राहिली.
"ओ गॉड, कालच पाहिलं आपण हे शेत. तिथेच आहोत असं वाटतंय. फक्त त्या काळातल्या माणसांची कमी होती तिथे. चेहर्‍यावर सुरकत्या पडलेला माणूस केवढा खरा वाटतोय. वॉव! आणि ती बाजूला धुळीने माखलेली चिमुरडी. कूल ड्यूड! आईला दाखव हं." तिने दोनतीन वेळा जवळ जाऊन ते चित्र नीट निरखलं. तो विलक्षण खुशीत तिच्याकडे पाहत होता.
"आता मध्येच ओढून आणू नकोस मला." ती पुन्हा आपल्या खोलीत गेली. प्रणव ते चित्र घेऊन धावतच वरती गेला. पोटमाळ्यावर बाबांच्या समोर त्याने अतीव आनंदाने चित्र नाचवलं. आकाशभाईंनी त्या चित्राकडे एक नजर टाकली आणि पुन्हा कागदात डोकं खुपसलं.
"कसं आहे?" त्याला तरीही राहवलं नाही.
"किती वेळ लागला हे चित्र काढायला?" उत्तर न देता बाबांकडे खाऊ का गिळू अशा नजरेने तो पाहत राहिला. संतापाने त्याने ते चित्र उचललं आणि कोपर्‍यात शांतपणे काम करत बसलेल्या आईच्या हातात दिलं.
"किती सुंदर रेखाटलंयस रे." नवर्‍याला त्या चित्रातल्या खुब्या समजावून दाव्यात, मुलाला प्रोत्साहन द्यायला सांगावं असं वाटूनही उषाबेन गप्प राहिल्या. मुलाने डॉक्टरच व्हायला पाहिजे हा धोशा लावलेल्या माणसाला काय सांगायचं आणि कशासाठी?

"चहा झालाय का गं माझा?" जिन्याच्या पायरीवरुन पावलांचा आवाज आला. उषाताईंनी चहा आणि नाश्ताही पटकन टेबलावर ठेवला.
"काल दोन तीन नवीन लोकांशी बोलणं झालं आहे. पन्नास हजार पर्यंत तरी गुंतवतील. जेवायलाच बोलवूया शनिवारी सगळ्यांना."
"फोन करुन अंदाज घ्यायला हवा कितीजणांना रस आहे पैसे गुंतवण्यात. नंतर जेवायचं बघता येईल." या जेवणावळीत उषाबेनना अजिबात रस नव्हता. पन्नाशी जवळ आली होती. मुलं मोठी होत चालली होती. त्यांचे वेगळे प्रश्न समोर येत होते.
"... या देशात राहायचं म्हणजे सोपं काम नाही. पैसा कमावायचा तर डॉक्टरच व्हायला हवं प्रणवने. चित्राबित्राचा नाद सोडा म्हणावं आता." काहीतरी आठवल्यासारखं आकाशभाई म्हणाले. उषाबेन काहीच बोलल्या नाहीत. आकाशभाई पुन्हा कामाला लागले.
उषाबेनच्या कपाळावरच्या आठ्या गडद झाल्या. विरळ झालेल्या केसाच्या एक दोन बटा कपाळावर रुळत होत्या त्या ओढल्यासारख्या करत त्यांनी मागे ढकलल्या. शरीर, मन दोन्ही उभारी नाकारत असलं तरी घरातलं आटपून कामाला लागणं भाग होतं. कागदाच्या चळतीत बुडालेले आकाशभाई आणि त्यांच्या इच्छा बराचवेळ त्यांचा पाठलाग करत राहिल्या.

"मला जायचं नाही आज त्या संस्कारवर्गाला." पॅनकेकचे तुकडे काट्याने तोंडात टाकत अमिता कुरकुरली.
"रविवारची सकाळ फुकट घालवू नकोस. आपली संस्कृती, तिचा अभिमान सुरु होईल बाबांचं." फाफडयाचा तुकडा तोंडात टाकत प्रणवने तिला थांबवलं.
"काय रे काय कुचुकुचू चाललंय? माझ्याबद्दल की बाबांबद्दल? उषाबेननी विचारलं.
"बाबांबद्दल." अमिताने सांगून टाकलं. प्रणव वैतागला.
"मूर्ख कुठची. आता बस ऐकत बाबापुराण."
"शांत हो प्रणव. जायचं नाही का आज संस्कारवर्गाला?"
"अमिताची इच्छा नाही."
"तुझं काय?"
"मला नाही माहीत मला काय वाटतं ते, तुम्ही जा म्हणालात तर जातो, नाही तर नाही...पण आम्ही काही आता लहान नाही."
"खरं आहे रे. बघ अजून एक दोन वर्षच. एकदा कॉलेजला गेलास की बंदच होईल आपोआप."
"दर रविवारी संस्कृतीवर भाषणं, भारतीय खेळ, रामायण, महाभारत, योगासनं आणि श्लोक. जबरदस्ती का करता तुम्ही? आम्ही सांगितलेलं का तुम्हाला इथे यायला? सारखं कशाकरता तरी मागे लागलेले असता. हिंदी गाणी वाजव पियानोवर, गुजराथी गरब्यात भाग घे, देवळात जायचं आहे, गुजराथी पुस्तकं वाच.... संपतच नाही काही. घरात आलो की ह्या गोष्टी करायच्या. बाहेर पडलं की जग आमचा रंग विसरु देत नाही. देवळंबिवळं बंद करुन पुढच्यावेळेस मी चर्चमध्येच जाणार आहे...." आपण काय बोलून गेलो ते प्रणवच्या लक्षात आलं आणि तो एकदम गप्प झाला. आईकडे बघण्याचं धाडस होईना त्याचं. समोरच्या फुलपात्रावर नजर खिळवून तो तिथेच बसून राहिला. उषाबेननाही पटकन काही सुचेना. अमिता तिच्या खोलीत निघून गेली. त्या दिशेने त्या पाहत राहिल्या. इतका कडवटपणा साचलेला असेल मुलांच्या मनात या गोष्टींचा याची कल्पनाच नव्हती त्यांना. त्यात प्रणव वर्णभेदावर का घसरला तेही लक्षात येईना. दार वाजल्याचा आवाज झाला तसं त्यांना एकदम मोकळं वाटलं. प्रणवचा मित्र आला होता. सलीलला पाहिल्यावर प्रणव सगळं विसरला.

"तू काय रे सांगत होतास लाराबद्दल? कोण ही नवीन मुलगी? आणि काल वर्णाबद्दल काहीतरी भडकून बोलत होतास." सकाळी चहाचे घुटके घेत आकाशभाईंनी अचानक प्रश्न टाकला. मागे कधीतरी पुसटसा उल्लेख केला होता त्याने लाराचा, तो या दोघांच्या लक्षात आहे याचंच त्याला आश्चर्य वाटलं.
"ती चिडवते मला. स्मेली आणि ब्राऊन बॉय म्हणून."
"कधी ऐकलं नाही लाराचं नाव. गुजराथी आहे?"
"लारा आणि गुजराथी? अमेरिकन आहे. आपल्या शेजारीच राहते. तीन घरं सोडून कोपर्‍यावर. पण या गोष्टीलाही खूप महिने झाले आहेत."
"तीच का? तिच्या अंगणात खेळू नको सांगणारी?" आईच्या तो प्रसंग लक्षात आहे हे पाहून तो सुखावला. पण त्या सुखावलेपणाची जाणीव होण्याआधीच आकाशभाई बोलले,
"जाऊ दे रे, दुर्लक्ष करायला शीक. आहोत आपण त्यांच्यापुढे सावळे. काय करणार?"
"दुर्लक्ष कर कसं सांगता? मी काही लहान नाही आता. दोन लगावून देऊ शकतो मी तिला.".
"नको रे बाबा असलं काही करुस." आईने त्याला थोपवलं. बाबा अशा गोष्टी जाऊ दे करुन सोडून देतात ह्याचा त्याला भयंकर राग यायचा. त्यात आईचं हे काहीतरी. सतत कसलीतरी काळजी नाहीतर धास्ती. आजचं नव्हतं हे. पुन्हा असं काही झालं तर घरात सांगायचं नाही हेही त्याने ठरवलं. वर्ष उलटल्यावर काहीतरी विचारतात अचानक.

त्याच्या खोलीत शिरल्यावर हलकेच प्रणवने दार लावून घेतलं. त्याला एकटेपणा हवा होता. लाराबद्दलची चीड व्यक्त करायला दोघांनीही त्याला संधी दिली नव्हती. विषय निघाल्यावर बरेच दिवस दाबून ठेवलेल्या भावनांवर त्याला काबू ठेवता येईना. खसकन कोरे कागद ओढून त्याने चित्र काढायला सुरुवात केली. समोर उठणार्‍या एकेका रेषेने त्याचं मन शांत होत होतं. हळूच त्याने गादीखाली जपून ठेवलेली सगळी चित्र काढली. प्रत्येक चित्राखाली त्याबद्दलच्या भावना व्यक्त करणारे शब्द. पण आज काढलेलं चित्र... चित्रातली लाराची झडलेली जीभ. तो अस्वस्थ झाला. लारामुळेच होतंय हे. काळ्याखडूने लाराचं तोंड तो बरबटत राहिला. विक्षिप्त हसू त्याच्या चेहर्‍यावर उमटलं. काल शाळेतून परत येताना लाराने त्याला नको नको त्या शिव्या घातल्या होत्या. मध्यंतरी हे थांबलं होतं. आणि अचानक काय झालं पुन्हा हिला? त्याच्या सावळ्या रंगावरुन ती काहीतरी बोललीच तेव्हा त्याचा राग अनावर झाला. त्यानेही तिचा हात रागाने पिरगळला. ती बिचकली पण क्षणात स्वत:ला सावरुन काहीच न झाल्यासारखा पळ काढला तिने. त्याचा मात्र भडका उडाला. आता काढलेल्या त्या चित्राकडे पाहताना स्वतःच्या मनातल्या विचाराची त्याला आतून आतून शरम वाटली पण अंतर्मनावर वर्तमानाने मात केली. अनामिक आनंदाने सगळा पसारा प्रणवने पलंगाखाली सरकवला. पलंगाला पाठ टेकत तो विसावला तेवढ्यात अमिता धाडकन दार उघडून खोलीत आली. त्याच्या छातीचे ठोके वाढले.
"माझ्या खोलीत का आलीस. बाहेर हो, आधी हो बाहेर." अमिता समोरच्या कागदाला हात लावणार हे दिसताच प्रणवने तिला जवळजवळ ढकललंच. ती दाणदाण पाय आपटत खाली निघून गेली तेव्हाच आता आई वर येणार याचा त्याने अंदाज बांधला. भराभर त्याने खोलीची अवस्था नीटनेटकी केली. अमिताच्या अंगावर ओरडायला नको होतं हे मान्य करत तो आईला बोलण्यात गुंतवत राहिला. त्यालाही मित्रांच्या नादात अमिताला सारखं आपण कटवत राहतो, बर्‍यांचदा एकदम तोडून टाकतो ते थांबवायला हवं असं वाटायला लागलं. उद्या तिच्या खेळाच्या तासाला जमलं तर जायचं हे प्रणवने मनाशी नक्की केलं.

"आज तुझा आणि माझा खेळाचा तास साधारण एकाचवेळेस आहे. जमलं तर मी येईन तुझा खेळ बघायला."
"दादल्या का रे मस्काबाजी? काम असेल तर सांगून टाक. का माझी मैत्रीण आवडली आहे एखादी? खेळ बघायला नाही आलास तरी देईन ओळख करुन." तिचे केस विस्कटत तो नुसताच हसला. केस विस्कटले म्हणून चिडलेली अमिता तरातरा निघूनही गेली. जाता जाता सलील आल्याचं तिने ओरडून सांगितलं.
सलील अस्वस्थ हालचाली करत खाली उभा होता. घाईघाईने बॅकपॅक पाठीवर अडकवीत प्रणव बाहेर पडला. रस्ताभर सलील इकडचं तिकडचंच बोलत राहिला. तो अस्वस्थ आहे हे प्रणवच्या लक्षात आलं होतं. दोघंही निमूटपणे चालत राहिले. शाळेपाशी पोचल्यावर मात्र सलीलने तास चुकवायची गळ घातली. मैदानावर ते दोघं बोलत राहिले.
"बहुधा आम्ही इथून कायमचं जातोय."
"कुठे?"
"कॅनडा."
"काय? अचानक ठरलं का?" प्रणवला एकदम धक्काच बसला.
सलील बोटांच्या अस्वस्थ हालचाली करीत तिथल्या तिथे फेर्‍या मारायला लागला. प्रणव नुसताच त्याच्याकडे पाहत उभा राहिला.
"आईला नाही राहायचं इथे. तिला कॅनडालाच जायचं आहे परत. बाबांच्या मागे लागली आहे ती. तिच्या वडिलांच्या व्यवसायात भागीदार व्हा म्हणून. बरेच दिवस चालले होते वाद. आता मला घेऊन जाणार म्हणते."
"असं कसं चालेल करून?"
"ते तिला नको समजायला? मला नाही जायचं कॅनडात."
"पण कॅनडा का?"
"तुला माहीत आहे ना, माझ्या आईने आणलंय बाबांना इथे?"
प्रणवने अशा गोष्टी घरात बर्‍याचदा ऐकल्या होत्या. इथेच वाढलेल्या मुलींसाठी त्यांच्या आईवडीलांना नवरे मात्र भारतातले हवे असतात. मग अमेरिकेत यायला आतुर झालेली मुलं नागरिकत्व मिळणार म्हटल्यावर अशा लग्नांना तयार होतात. सलीलचे बाबा त्यातलेच. पण त्यांनी इथे उत्तम जम बसवला होता. आता हे काहीतरी नवीनच.
"पण तू राहा ना इथे तुझ्या बाबांबरोबर."
"मला कोण विचारतंय रे? बाबादेखील मूग गिळून गप्प. मला इथलं घर, मित्र, मैत्रिणी सोडून नाही रे जायचं कॅनडाला. आणि खरं सांगू का बाबांनी नाही ऐकलं आईचं तर घटस्फोट घेतील ती दोघं असं वाटायला लागलंय मला."
दोघंही एकमेकांकडे काही न बोलता नुसतेच बघत राहिले. अस्वस्थ होत सलीलने बॅकपॅकमधली पाण्याची बाटली काढली. पाण्याच्या बाटलीबरोबर काहीतरी पडलं. प्रणव ते उचलायला खाली वाकला पण त्याचा हात बाजूला ढकलत सलीलने पटकन खाली पडलेली ती छोटीशी पुडी उचलली.
"काय आहे ते? बघू ना मला." घाईघाईत सलीलने काय उचललं ते त्याला समजेना. सलीलचा चेहरा इतका का पडला तेही त्याला समजत नव्हतं. त्याच्या आढ्यावेढ्यांना न जुमानता प्रणवने सलीलच्या हातातून पुडी ओढली. मान खाली घालून सलील पुटपुटला.
"तुला आठवतंय का रे, मागे एकदा काही मुलं मारोवाना घेण्यासाठी आपल्या मागे लागली होती?"
"तू घ्यायला सुरुवात केली आहेस?" प्रणवने त्याचा हात एकदम पिरगळला. हात दुखला, पण भरुन आलेल्या डोळ्यातून पाणी बाहेर येऊ न देता सलील नकारार्थी मान हालवीत राहिला.
"नीट सांग ना रे."
"नाही अजून. सगळं विसरायला होतं ना थोडीशी पावडर हुंगली की, म्हणून घेतली पावडर विकत. घरात एवढी भांडणं चालू असतात त्याची भिती वाटते रे. मला माझे आई, बाबा दोघंही हवे आहेत."
"तू घेतोस का ते सांग आधी?"
"नाही. धाडस नाही झालं."
"पण मिळाली कुठे तुला?"
"शाळेच्या मुतारीत मुलं एकदा मागे लागली होती आपल्या. आठवतंय?"
प्रणवला सगळं आठवत होतं. तो काही न बोलता चुळबुळत उभा राहिला. अस्वस्थ, सैरभैर. न भंगणार्‍या शांततेला तडा गेला तो दुसर्‍या तासाच्या घंटेने. दोघंही न बोलता वर्गात गेले. तासावर लक्ष केंद्रित करणं प्रणवला जमेना. सलीलची त्याला चिंता वाटायला लागली होती. हा तास संपला की त्याला अमिताचा खेळ बघायला जायचं होतं. पण इथून उठूच नये असं त्याला वाटत राहिलं.

प्रणव मैदानाच्या कडेला राहून खेळ पाहत होता. जोरजोरात आरडाओरडा करून अमिताला प्रोत्साहन देत होता. अमिता चेंडू घ्यायला खाली वाकली आणि साराचा आवाज घुमला,
"कमी खात जा अमिता. पाव वाढले आहेत." प्रणवचे कान एकदम लाल झाले. अमिता आता काय करेल ते त्याला समजेना.
अमिताने रागाने साराला ढकललं आणि काहीच न झाल्यासारखं तिने बॉल दुसर्‍या मुलीकडे फेकला. खेळात गर्क झालेल्या मुलींच्या अमिताने साराला ढकललेलं लक्षात आलं नाही. पण दात ओठ चावत सारा अमिताच्या अंगावर धावली. जोरात धक्का मारत तिने अमिताला पाडलं. ताडकन उठून अमितानेही साराचे केस ओढले. सगळ्या मुली खेळ सोडून त्यांच्या दिशेने धावल्या. त्या दोघींभोवती कडं करत मुलींचा गोंधळ चालू झाला. टाळ्या वाजवीत एकदा अमिताच्या नावाने तर एकदा साराच्या नावाने सगळ्या ओरडत होत्या. वर्गशिक्षिका दोघींच्या दिशेने धावली. मुली आजूबाजूला पांगल्या, वर्गात जाण्यासाठी रांग करुन उभ्या राहिल्या. अमिता, सारा आपापली बाजू कळकळीने मांडत होत्या. अमिता आता मात्र घाबरली. मान खाली घालून रांगेत उभी राहिली. प्रणव तिच्याकडे धावला पण त्याला तिने ढकलूनच दिलं. त्यानंतर घडलेलं अनपेक्षित होतं. लेखी कबुलीजबाब, शिक्षा, पालकांसाठी चिठ्ठी. अमिताला तिथून धावत सुटावं, तोंड लपवावं असं वाटायला लागलं. घरी जायच्या कल्पनेने तिचे हातपाय गळले. शिक्षकांना तिच्याबाबतीत घरी चिठ्ठी द्यावी लागेल याची अमिताने स्वप्नातही कल्पना केली नव्हती. पुढच्या तासावरून तिचं लक्ष उडालं. कसं दाखवायचं तोंड घरी? तिचं डोकं एकदम भणभणून गेलं. उलटसुलट विचारांच्या चक्रात जीव थकून गेला.

आईच्या हातात चिठ्ठी ठेवली आणि हमसून हमसून अमिताला रडायलाच आलं.
"मला बारीक व्हायचं आहे आई." हुंदक्यांनी तिचं अंग गदगदत होतं.
"अगं मला आधी वाचू दे. आणि नुसतं रडत राहून काही साधणार आहे का?" ती थोडीशी शांत झाली.
"तू वाच, मी खोलीत जाते माझ्या." उषाबेननी नुसतीच मान हलवली.
अमिताने जोरात पलंगावर अंग टाकलं आणि एकदम ती दचकली. आपल्या वजनाने हा पलंग मोडला की काय अशी शंका तिला चाटून गेली. पुन्हा उठून तिने खात्री करुन घेतली. पलंगावरच भिंतीला टेकून ती तशीच बसून राहिली. पाव वाढले आहेत, हे काय बोलणं झालं? आणि हे असे बदल तर होणारच ना? मुलीच मुलींना का चिडवतात माहीत असूनही? पाळी सुरु झाल्यानंतर शरीरात बदल होणारच. एक अख्खा तास झाला की याच विषयावर दोन वर्षापूर्वी. कुणी आहे तसंच राहिलं आहे, तर कुणी खूप जाड, काहीजणी खूप बारीक. मनातल्या प्रश्नांबरोबर तिचे हात देहाच्या रेषा चाचपडत राहिले. झटकन उठत ती आरशासमोर उभी राहिली. दहावेळा तिने तिचा आखूड शर्ट खाली ओढला. केस सारखे केले. वेगवेगळ्या कोनातून स्वतःला निरखत राहिली पण समाधान होत नव्हतं. शर्ट वर करीत तिने पोटाचा भाग ओढून पाहिला आणि निराशेने तिला ग्रासलं. तिचे डोळे एकदम भरुन आले. हातात मावणारी छोटीशी वळी ती दाबत राहिली. जोडीला साराचे शब्द मनात घुमत होतेच. उषाताई खोलीत येताना दिसल्या तसं तिला परत रडायला यायला लागलं.
"त्या मुलींकडे कसलं लक्ष देतेस? आणि चांगली बारीक आहेस तू." उषाबेननी अमिताच्या पाठीवर थोपटलं पण अंग आक्रसत अमिता बाजूला झाली. तिची अशी प्रतिक्रिया त्यांना अनपेक्षित होती. त्या संकोचल्या. लांबून लांबूनच तिच्याशी जवळीक साधायचा प्रयत्न करत, मनाचा अंदाज घेत राहिल्या. एक न बुजणारी दरी दोघींमध्ये उभी राहिल्यासारखं वाटून गेलं त्यांना. कितीतरी बोलायचं होतं त्या चिमुकल्या जीवाशी. मुलींचं चिडवणं इतकं मनावर घेऊन कसं चालेल. कुठल्या शब्दात सांगावं, कशी समजूत घालावी तेच समजेना. त्या तशाच बसून राहिल्या.

"किती वेळ त्या आरशासमोर?"
"तू का माझ्यावर लक्ष ठेवून असतेस?"
"बराचवेळ तिथेच उभी होतीस म्हणून म्हटलं गं." सकाळच्या गडबडीत उगाच वादाला तोंड फुटायला नको म्हणून उषाबेननी पडतं घेतलं .
"मी जाड झालेय खूप." उषाताई नुसत्याच हसल्या.
"हे बघ अमिता, एकमेकांना शाळेत चिडवणं हे प्रकार होतच असतात गं. जेवढं तू मनावर घेशील तितका अधिक त्रास देतील त्या मुली तुला."
"नाही मलाही वाटायला लागलं आहे बारीक व्हायला हवं म्हणून."
"काहीतरीच काय गं. चांगली बारीक आहेस तू. अशानं सुकून जाशील."
"तुझी समजूत घालायची हीच व्याख्या आहे का? बारीक आहेस म्हटलं की झालं?"
"अगं खरं तेच सांगतेय मी."
"कळलं. जाऊ दे मला शाळेत." अमिता एकदम चिडली.
"ही उडवाउडवीची आणि आगाऊपणाची उत्तर बंद कर. मी इथे जीव तोडून समजावून सांगायचा प्रयत्न करते आहे तर उपकार केल्यासारखं ऐकायचं."
"जाऊ दे ना गं मला. बस निघून जाईल शाळेची." त्यांच्या चढ्या आवाजाकडे दुर्लक्ष करत अमिता बाहेर पडली.
ती गेलेल्या दिशेने उषाबेन बघत राहिल्या. बारीक व्हायचं एवढं वेड तेही कुणी एका मुलीने चिडवलं म्हणून. कशी समजूत घालायची? कसं परावृत्त करायचं या मुलीला या वेडापासून? एवढा वेळ शांतपणे नाश्ता खात बसलेल्या प्रणवला एकदम तोंड फुटलं.
"शाळेत चिडवत असतील तिला."
"काय?" प्रणवचं अस्तित्व त्या विसरल्याच होत्या.
"चिडवत असतील तिला. सकाळी सकाळी चिडचिड, रागारागाने निघून जाणं अशीच असतात लक्षणं अश्या वेळेस." पुस्तकं उचलत प्रणव म्हणाला.
"जाड म्हणून चिडवतात तिला. काल मारामारी झाली तिची शाळेत." उषाबेनच्या आवाजात कमालीचा थकलेपण आलं.
" बघितली मी ती मजा. मांजरीसारख्या फिसफिसत होत्या एकमेकांवर."
"प्रणऽऽव"
"चुकलं माझं. आणि मी गेलो होतो अमिताला समजावायला. पण ढकलून गेली ती मला वर्गात." प्रणव पडेल आवाजात म्हणाला.
"तू बघ ना जरा तिचं काय बिनसतंय शाळेत."
"शाळेत ओळख नाही दाखवत आम्ही एकमेकांना. मी फक्त माझ्या अनुभवावरून सांगतोय ती का असं वागत असेल ती."
"तुझा अनुभव? तुला पण चिडवतात? सांगत नाहीस तू काही."
"कधी ऐकतच नाही तुम्ही तर काय सांगणार?"
"असं तोडून नको बोलूस. सांग बघू आत्ता आम्ही काय ऐकत नाही ते."
"आत्ता नाही. मलाही शाळेत वेळेवर पोचायचं आहे." प्रणवने दप्तराचं धोपटं काखोटीला मारलं आणि तो निघालाच. उषाबेनना काय करावं तेच सुचेना. एकाचवेळेस दोन मोठी प्रश्नचिन्ह सोबतीला ठेवून पोरं पसार झाली होती. आता कुठेही लक्ष लागणार नाही हे त्यांचं त्यांनाच जाणवलं. त्या उगाचच इकडे तिकडे करत राहिल्या. काय चुकत होतं तेच कळत नव्हतं. पण प्रणव सारखा तोडून बोलतोच, आता अमिताचंही वागणं बदलतंय. खूप जास्त लक्ष घालतो म्हणून की त्यांच्या अडचणी समजत नाहीत म्हणून चिडचिड करतात ही मुलं? आकाशभाईंना सांगायला लागलं की त्याचं एकच, सकाळी ध्यान धरा आणि संस्कारवर्गात जाऊन श्लोक म्हणा. पंधरा, सोळा वर्षाच्या मुलांना हे धडे रोज उठून देणं हेच त्यांना हास्यास्पद वाटायचं. पण बोलणार कोण? उषाबेननी सवयीने भांडी घासायचं, कपडे धुवायचं अशी दोन्ही यंत्र हातासरशी चालू केली. त्या यंत्रांची घरघर शांत घरात घुमत राहिली.

आकाशभाई भराभर कागदावर कसलीतरी आकडेमोड करत तयार झाले. गाडीची किल्ली बोटावर गोल फिरवत ते गराजमध्ये आले. आरशातून मागे पाहत त्यांनी गाडी रस्त्यावर आणली. आता अर्धा तास नाकासमोर गाडी चालवायची होती. हिशोबाचे आकडे त्याच्यांसमोर नाचायला लागले. प्रणवला वैद्यकीय शाखेत घालायचं तर भरपूर पैसा हाताशी लागणार, अमितापण हुशार होतीच. दोन्ही मुलं उशीरा झालेली. एकदम त्यांना पहिला गेलेला मुलगा आठवला. बर्‍याच वर्षांनी दिवस गेले होते उषाबेनना. काही धोका नको म्हणून शस्त्रक्रिया करायची हेही ठरलेलं. सगळं व्यवस्थित ठरवूनही फसवलं त्या छोटा जीवाने. जगात आला तो फक्त तुम्ही आईबाप होवू शकता हा दिलासा द्यायला. त्यानंतर झालं त्यात कुणाची चूक होती की आपलं नशीब हा प्रश्न त्यांना अजूनही सोडवता आला नव्हता. वीस वर्षापूर्वीची ही गोष्ट दरवेळेस त्या त्या क्षणी अनुभवल्यासारखी अवस्था होई. आत्ताही ते सवयीने गाडी चालवत होते, पण आतून आतून अस्वस्थपणा शरीराचा ताबा घेतोय हेही त्यांना समजत होतं. समोरचे दिवे अंगावर धावून आल्यासारखे पिवळे झाले आणि त्यांनी गाडी करकरत थांबवली. विचारांची साखळीही त्याबरोबर तुटली.

आकाशभाईंनी अर्जावर स्वाक्षर्‍या घेतल्या. पैसे गुंतवायचे म्हटलं की सगळं कसब पणाला लावून वेगवेगळ्या योजना समोरच्याला पटवून द्याव्या लागत, लॅपटॉपवर प्रात्यक्षिक दाखवावं लागे. पुन्हा त्याचवेळेस व्यवहार होईलच याची शाश्वती नसे. आजची पाचवी खेप झाली आणि सत्तर हजार डॉलर्सचा चेक आणि एक नवीन व्यवहार हातात आला. मगाशी आलेला त्यांचा अस्वस्थपणा, हुरहुर अलगद दूर पळाली. तो दिवस मजेत घालवायचा ठरवलं त्यांनी. उषाबेनना फोन करून ‘ऑलिव्ह गार्डन’ रेस्टॉरंट मध्येच भेटायचं ठरलं. त्या दिसल्यावर किती बोलू न काय बोलू असं होवून गेलं आकाशभाईंना. पण उषाताई गप्प गप्प होत्या.
"काय झालं तुझं लक्ष नाही दिसत."
"अमिताला शाळेत चिडवतात." आकाशभाईंनी विचारण्याचीच वाट बघत असल्यासारखं त्या म्हणाल्या. ते नुसतेच हसले. इतक्या छोट्या छोट्या गोष्टींना ती स्वतःचा ताबा घेऊ देते याचाच त्यांना आश्चर्य वाटलं.
"आपल्याला नाही का कुणी कधी चिडवलेलं? तेवढ्यापुरतं असतं गं ते." फार खोलात शिरायची इच्छा नव्हती त्यांची.
"अमिता स्वतःला जाड समजायला लागली आहे. बारीक राहावं म्हणून धडपड चालली आहे तिची. अशाने अंगावर मांस उरणार नाही तिच्या." बरेच दिवस केलेलं निरीक्षण त्या बोलून दाखवीत होत्या. कळवळून सांगत होत्या.
"भलतीसलती नाटकं तू तरी कशाला करू देतेस तिला?"
"जी काय शिस्त आहे मुलांना ती माझ्यामुळे आहे हे विसरू नका."
"तिच्या खाण्यापिण्याच्या वेळेतच आपणही बसू तिच्याबरोबर म्हणजे आपोआप लक्ष राहील." शिस्तीचा विषय आकाशभाईंना अजिबात आवडत नसे. मुलांसमोर नियमांवर बोट ते मनापासून ठेवायचे, पण अजूनपर्यंत त्याबद्दल ठाम राहणं त्यांना कधी जमलं नव्हतं.
"आपल्यासमोर खाते व्यवस्थित ती. पण नंतर ओकून टाकते, नाहीतर दिवसभर दोरी उड्या, पोटाचे व्यायाम. हसाखेळायचं वय हे, आणि ही मुलगी कायम कसल्यातरी चिंतेत वाटते मला."
"शाळेत प्रणवला लक्ष ठेवायला सांग. दोघांचे वर्ग जवळजवळच आहेत ना?"
"शाळेत ही मुलं एकमेकांना ओळखही दाखवीत नाहीत. लक्ष कुठला ठेवतोय तो. पण चिडवत असणार मुली तिला. त्यालाही चिडवतात म्हणे."
"तू बघ बाबा काय ते. नाहीतर असं करु दोघांशी एकदम बोलू." त्यांनी आपलं लक्ष खाण्यावर केंद्रित केलं. आत्ता त्यांना मिळालेल्या सत्तर हजाराच्या व्यवहाराचा आनंद मनापासून साजरा करायचा होता. त्यात हे मुलांचे प्रश्न आणू नयेत एवढंही उषाबेनना समजू नये ह्याचंच दुःख झालं त्यांना. मुलांकडे त्याचं लक्ष नाही असं अजिबात नव्हतं पण प्रसंगाचं भान हे राहिलं पाहिजे या मताचे होते आकाशभाई. उषाताईही न बोलता समोरच्या पदार्थांवर काटे मारत राहिल्या. समोरासमोर बसलेल्या त्या दोघांना एकमेकांच्या विचारांचा थांगपत्ताही नव्हता.

"अमिताऽऽऽ" उषाबेननी जोरात दोन तीन वेळा हाका मारल्या. इंटरकॉमचं बटण दाबलं पण इतकी खरखर येत होती की नेहमीप्रमाणे त्या वैतागल्या. इतकी मोठी घरं कशाला असतात कोण जाणे इकडे. वरखाली करावं लागू नये म्हणून अशा सोयी, पण त्याचा उपयोग तरी करता यायला हवा नं आमच्यासारख्यांना. त्या जिन्यापाशी जाऊन उभ्या राहिल्या. बारा पायर्‍या चढून वर जायचं अगदी जीवावर आलं. खालूनच जोरजोरात हाकांचा सपाटा त्यांनी चालू ठेवला. काही प्रतिसाद नाही म्हटल्यावर मान वर करुन दाराकडे नजर टाकली.
’खोलीचं दार बंद करायचं नाही, हजार वेळा सांगितलंय.’ तिरमिरीत वर जाऊन त्यांनी बंद दार जोरजोरात वाजवलं.
अमिताने रागारागाने दार उघडलं.
"काय आहे गं? एरोबिक्स करत होते मी."
"दार बंद कशाला करायचं त्यासाठी?"
"तो मूर्ख येतो ना चिडवायला."
"काय भांडत असता दोघं तुम्ही." त्या तिथेच बसल्या तसं अमिताने एरोबिक्स करणं थांबवलं. नाईलाजाने ती गप्पा मारत राहिली. लाराबद्दलही उषाबेननी तिलाच विचारुन घेतलं. हळूहळू अमिता आईशी गप्पा मारण्यात रमली. तिच्या मैत्रिणींबद्दल काही ना काही सांगत राहिली. हा क्षण मुठीत पकडावा, आईला आपल्या मनातली खळबळ सांगून टाकावी, असं खूप वाटलं अमिताला. पण मनात भितीही दाटून आली. आईला सांगितलं तर ती मागे लागणार, ती बारीक कशी आहे हेच पटवत राहणार, विश्लेषण, चर्चा, उपदेश नकोच ते.... मनात असूनही ती बोलू शकली नाही. पुन्हा उठून ती दोरी उड्या मारायला लागली.
"अगं, एरोबिक्स करत होतीस ना.?"
"हो, आता दोरीउड्या माराव्या असं वाटतंय."
"कुठल्याही गोष्टीचा अतिरेक चांगला नाही. मला तर तुझी काळजी वाटायला लागली आहे अमू"
"तू मला अमू म्हणणं थांबव आधी. आणि मारतेय उड्या तर मारु दे की नीट." अमिता एकदम चिडलीच.
"अगं पण बाहेर मैत्रिणींबरोबर खेळायचं वय तुझं. घरात कोंडून घेतेस स्वत:ला असं ते बरं नाही वाटत."
उत्तर न देता दाणदाण पावलं आपटत अमिता खोलीबाहेर पडली. मनातलं काही सांगितलं नाही ते बरंच केलं असं तिला वाटलं. काही झालं तरी सर्वांना हे बारीक राहायचं वेडच वाटत असेल तर कशाला सांगायचं काही. आईने मागे येऊन समजूत घालावी असं अगदी आतून आतून तिला वाटून गेलं. पण आई विचार करत पलंगावर बसून राहणार हे पक्कं ठाऊक होतं तिला. धाडधाड जिने उतरत ती खाली आली. फ्रीज उघडून तिने आइसक्रीमचा डबा उघडला. गारगार आइसक्रीमने हाताला झिणझिण्या आल्या तसं चमच्याने भराभर ती आइसक्रीम खात सुटली. उष्टा चमचा पुन्हा आइसक्रीममध्ये घातलेला घरात समजलं तर कुणी त्याला हात लावणार नाही ह्याची कल्पना असूनही तिने ते विचार दडपून टाकले. बाजूलाच पडलेल्या खोबर्‍याच्या वड्यांवर तिने ताव मारला. आता यापुढे एक घासही खाऊ शकणार नाही हे जाणवलं तेव्हाच ती थांबली. रिकाम्या झालेल्या आइसक्रीमच्या डब्याकडे, उरलेल्या वड्यांच्या तुकड्यांकडे पुन्हा लक्ष जाताच ती शून्य, पराजित नजरेने पाहत राहिली. पोटात ढवळलं तिच्या. आपोआप हात पोटाकडे वळले. तिने पोट घट्ट दाबलं. हाताच्या चिमटीत पोटाचा भाग आला नाही तरी एकदोन दिवसात आइसक्रीम, वड्यांचे परिणाम तिथे उमटणार ह्या जाणिवेने तिचे हातपाय गळले. बाथरूमच्या दिशेने धावलीच ती. दोन्ही बोटं घशात घालून खाल्लेलं सगळं बाहेर काढायचं होतं. भडभडा ओकल्यावर अमिताला एकदम शांत झाल्यासारखं वाटलं. प्रणवने येऊन पाठीवर हात फिरवला तशी ती त्याच्या कुशीतच शिरली. तो तिला थोपटत राहिला.
"शाळेतच जायचं नाही मला आता. वर्गात मुलींमध्ये मी बुटकी आणि जाड आहे."
"बुटकोबा आहेसच तू इथल्या मुलींसमोर. पण जाड काय समजतेस तू स्वत:ला? एक जादू सांगू? तू एखाद्या थोराड मुलीशी मैत्री कर म्हणजे तिच्यासमोर एकदम चवळीची शेंग असशील तू."
"तेच करावं लागणार असं दिसतंय." चवळीची शेंग दिसण्याच्या कल्पनेने तिला हसायला आलं.
"चल, आई वरती एकटीच बसली आहे काळोखात." दोघंही वरती आले.
पलंगावर पाठ टेकून बसलेल्या आईच्या थकलेल्या चेहर्‍याकडे पाहून दोघांना काय करावं ते सुचेना. उषाबेनच्या कानावर अमिताने सोडलेल्या जोरदार नळाच्या आवाजातूनही ओकण्याचे आवाज घुमत राहिले होते. अमिता लहान होती तेव्हा भरवायचो तसे घास भरवावे, पाठीवर हात फिरवून ढेकर काढावा अशी तीव्र इच्छा त्यांना झाली. पण काहीही न करता त्या नुसत्या बसून राहिल्या. प्रणव धावत खाली गेलेला त्यांच्या कानांनी टिपलं होतं. सगळे आवाज शांत झाल्यावरही खोलीतल्या काळोखाची संगत सोडावी असं मात्र वाटत नव्हतं. प्रणवने दिवा लावला तसं कसनुसं हसत त्या उठल्या. काही न बोलता त्या सावकाश खाली आल्या. आई खाली गेल्याची खात्री झाल्यावर अमिता दोरी उड्या मारायला लागली. विचारांचा तीव्रपणा जेवढा वाढत होता तेवढा तिचा वेग वाढत होता. तिच्याच पलंगावर पडून प्रणव शांतपणे टी.व्ही. बघत होता. अमितासाठी काय केलं तर तिचा हा वेडेपणा जाईल तेच त्याला कळत नव्हतं. गेल्या सात आठ महिन्यात तिच्या या वेडाने टोक गाठलं होतं. अमिताही अधून मधून प्रणवकडे पाहत होती. घरात कुणालाच तिचं मन कळत नव्हतं. प्रत्येकाला हा तिचा वेडेपणाच वाटत होता. वेगवेगळ्या मार्गाने अमिता तिला तिच्या जाडीबद्दल वाटणारी चिंता व्यक्त करत होती. घरातलं कुणीतरी उपाय सुचवेल, त्यांच्याशी बोलून मन मोकळं होईल, धीर मिळेल या तिच्या अपेक्षा फोल ठरल्यासारखं तिला वाटत होतं. गालाची हाडं बाहेर यायला लागली होती. पण घरातली माणसं व्यवस्थित सर्व पदार्थावर ताव मारत. ते बघितलं की अमिताला खावंसं वाटे. खाल्लं की आता वजन वाढणार ही काळजी, मग ओकून टाकायचं. ओकारीचे आवाज, वास घरात येऊ, पसरु नयेत यासाठी तारेवरची कसरत होतीच. फरसाण, चीजचे पदार्थ, तळकट खाणं नियंत्रणात येईल असं काहीतरी व्हायला हवं होतं. आईला हे समजत कसं नाही हेच तिला कळत नव्हतं. सगळेजण तिच्या नादिष्टपणाला, वेडेपणाला हसत होते. दोनशे दोन, दोनशे तीन, दोनशे चार.....पाचशे उड्या मारल्याशिवाय ती थांबणार नव्हती.
संध्याकाळी उषाताई निवांत टी.व्ही. वर कुठलातरी कार्यक्रम बघत होत्या. थोड्यावेळाने सर्वांनी एकत्र चक्कर मारायला बाहेर पडायचं होतं.
"अमिताला बोलाव ना खाली" त्यांच्या बाजूला बसलेल्या प्रणवला त्या म्हणाल्या.
"ती हुलाहु" खेळतेय.
"हुलाहु?" आकाशभाईंच्या चेहर्‍यावर आश्चर्य पसरलं.
"हा कुठला खेळ?"
"बारीक होण्याचा. दोरी उड्या, स्टेपर, एरोबिक्स... हेच चालू असतं दिवसभर तिचं. डॉक्टरांकडे घेऊन जा तुम्ही तिला. एवढी बारीक झाली आहे तरी स्वतःला जाड समजते. मला तर वाटतं तिला काहीतरी आजार आहे. " प्रणवचा चेहरा बहिणीच्या चिंतेने गंभीर झाला.
"काहीतरी खूळ घेतलं असेल डोक्यात. जाईल हळूहळू. चला, निघूया आता." आकाशभाईंनी दुर्लक्ष केलं.
"काय सारखं खूळ असेल, जाईल हळूहळू म्हणता? हाडं दिसायला लागली आहेत तिची. खायचं, ओकायचं आणि सारखा व्यायाम. उरलेला वेळ अभ्यास. तरुण मुलगी ही पण एकही मैत्रीण नाही हिला. आपल्या डोळ्यादेखत हा प्रकार. अजून एक दोन वर्षात कॉलेजला जायला लागेल तेव्हा कसं लक्ष ठेवणार आपण. आणि आत्ताच काहीतरी करणं भाग आहे नाहीतर हातातून जाईल अमिता." उषाबेनचे डोळे भरुन आले. आकाशभाईही गप्प झाले. कुणीच काही बोलेना. प्रणवनेच राग आवरुन फिरायला जायचं ठरवलं आहे त्याची आठवण करुन दिली.

घरातल्या प्रत्येकाचा तळ्याकाठचा तो रस्ता आवडीचा होता. दाट झाडीतून पायवाटा धुंडाळत ती सगळी खूप आतवर पोचली. मध्येच धावत गेलेलं हरीण, झाडाच्या बुडाशी बसलेला ससा बघत अमिता, प्रणव गप्पांमध्ये रमले. आकाशभाई थकून लहानशा ओढ्याकाठच्या दगडावर बसले. अमिताची त्यांनाही हळूहळू काळजी वाटायला लागली होती. पण हा तिढा कसा सोडवायचा ते मात्र समजत नव्हतं. उषाबेन संथपणे चालत होत्या पण त्यांच्या मनात विचारांचं आवर्तन चालू होतं. अमिताला खरंच न्यायला हवं का डॉक्टरांकडे? का एकदा शाळेत जाऊन तिच्या शिक्षिकेशी बोलून घ्यावं. हे चक्र वेळीच थांबायला हवं. प्रणव म्हणाला तसा हा काहीतरी विकार तर नसेल ना? त्यांना काही केल्या ते नाव आठवेना.
एकदम कुणीतरी पाठीमागून त्यांच्या पाठीवर मारलं. त्या प्रचंड दचकल्या. अमिता, प्रणव दोघही कशी केली मजा अशा थाटात उभे होते.
"बाई! ठोके थांबले असते हृदयाचे. केवढ्याने धडकता अंगावर."
दोघंही त्यांना लगटून, हातात हात घालून परत फिरले.
आकाशभाई बसले होते तिथे जवळच सगळी बसली. निवांतपणे ती सगळी तळ्यातल्या बदकांना, त्यांच्या पिलांना निरखीत राहिली. किती वेळ झाला होता कोण जाणे.
परत फिरताना अमिताचा अस्वस्थपणा वाढत चालला होता. म्हटलं तर किती जवळीक होती एकमेकांमध्ये, प्रणवसारखा भाऊ होता, आईही दोघांच्या मनातलं जाणून घेऊन तसं वागायचा प्रयत्न करत होती, बाबांनी कधी दर्शवलं नाही तरी जीव होताच की त्यांचा. असं असूनही अमिताला फार एकटं वाटत होतं. आजचा हा दिवस इथेच थांबावा असं तिला मनापासून वाटत होतं. आई, बाबा आणि प्रणवबरोबरचे हे आनंदाचे क्षण संपतील या भितीने तिचा जीव दडपत होता. त्यात उद्या सहामाही परीक्षेचा निकाल. परीक्षा देताना तिला इतर मुलं चिडवतायत असंच वाटत राहिलं होतं. बसल्यावर पोटाच्या वळ्या दिसतात म्हणून अगदी ताठ बसून लिहिण्याच्या कसरतीत तिची पाठ दुखायला लागली होती. चारवेळा ती ओकारी होतेय या भावनेनं उठली होती. तिची शिक्षिका परत परत घरी कळवू का विचारत होती. पण तिने ते नाकारत परीक्षा पूर्ण केली होती. आतादेखील निकाल लागल्यावर घरात काय प्रतिक्रिया होणार या चिंतेने तिचा चेहरा झाकोळला.

प्रगती पुस्तक हातात घेतलं तसा अमिताचा चेहरा उजळला. आईच्या प्रश्नांना उत्तरं द्यावी लागणार नव्हती. तिने जाडाभरडा कोट अंगावर चढवला. आतमधलं शरीर जाड आहे की बारीक हे समजण्याची आता शक्यताच नाही. कडाक्याची थंडी पूर्वी तिला नकोशी वाटे, पण हल्ली हल्ली सतत गारठवून टाकणारी थंडी पडावी असं तिला मनोमन वाटायला लागलं होतं. ती घरी आली पण घर शांत होतं. प्रणव परत आलेला नव्हता अजून. बहुधा आज त्याला थांबावं लागलं असणार शाळेत. स्पेलिंग बी, वादविवाद, भाषणं काही ना काही सतत चालू. या वेळेला तो विद्यार्थी अध्यक्षपदासाठी उभा राहणार होता. कधी करणार या गोष्टी आपणही, का आयुष्य सगळं बारीक राहायच्या नादातच संपणार? अजून दोन वर्ष. मग कॉलेज. कदाचित तेव्हा हे चित्र बदलेल. तिथे या शाळेतली मुलं नसतील. कुणी चिडवणार नाही.

पास्तासाठी उकळत ठेवलेल्या पाण्याकडे ती ओट्याला टेकून एकटक नजरेने पाहत राहिली. उकळणार्‍या पाण्यासारखेच तिच्या मनातले विचार बुडबुड्यासारखे उडी मारत होते. विद्यार्थी आणि स्वप्रतिबिंब या विषयावरचं शाळेत नुकतंच ऐकलेलं भाषण तिला आठवत राहिलं. लक्षणं आणि त्यानुसार त्या त्या विकाराची नावं तेव्हाच समजली. या सर्व लक्षणांना रोग म्हणत नाहीत, विकार म्हणतात हेही त्या गृहस्थानी बजावून सांगितलं. काहीवेळेला अशी मुलं भरपूर खातात तर काहीवेळेला उपाशी राहतात किंवा नंतर सगळं ओकून टाकतात. आहाराच्या अशा सवयीबद्दल ते गृहस्थ बोलायला लागले तशी नकळत अमिता अस्वस्थ व्हायला लागली. ऐकता ऐकता अमिताला आपण या सर्वच विकाराचे बळी आहोत असंच वाटत राहिलं. बाजूला बसलेल्या तिच्या मैत्रिणीचा हात तिने घट्ट पकडला. नीनाने तिच्याकडे चमकून पाहिलं तसा तिने आपला हात हळूच सोडला. तुमच्यापैकी कुणाला स्वतःमध्ये किंवा आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये अशी लक्षणं दिसत असतील तर वेळीच सावध व्हा असा इशारा त्या गृहस्थानी दिल्यावर वर्गात क्षणभर शांतता पसरली, अमिता अस्वस्थ झाली. प्रत्येकजण आपल्याकडेच बघतोय या भावनेने ती त्रस्त झाली. तिच्या बोटांच्या अस्वस्थ हालचाली व्हायला लागल्या. पाय थरथर कापायला लागले. त्या गृहस्थांबरोबर आलेल्या त्या नाजूक, भुरकट केसांच्या मुलीने, सुझीने जेव्हा तिला एनोरेक्सिया नर्वोसा हा विकार कसा जडला ते सांगितलं तेव्हा मात्र अमिताच्या डोळ्यातून घळघळा अश्रू वाहायला लागले. नीनाने चमकून तिच्याकडे पाहिलं. अमिताने मान खाली घालत डोकं लपवलं तसं नीनाने डोकं खाली वाकवलं.
"अमिता?" प्रश्नार्थक नजरेने नीना अमिताकडे पाहतं राहिली. तिला काय विचारायचं आहे हे अमिताला कळलं.
"हळू, हळू बोल. सगळे बघायला लागलेयत. नाहीतर असं करू, आपण नंतर बोलू." नीनाने मानेने होकार दर्शवला तसं अमिताला हायसं वाटलं. पण नंतर नीनाला टाळूनच ती घरी परतली. गूगल करुन तिने सगळी माहिती मिळवली.
’बापरे, असं असेल तर आपण लवकरच मरणार की काय?’
समोरचं पातेलं चर्र चर्र वाजायला लागलं तशी ती भानावर आली. पास्तासाठी उकळत ठेवलेलं पाणी संपत आलं होतं. तिने भांडं तसंच बाजूला ठेवलं. पोटात प्रचंड भूक होती, पण आता पुन्हा पाणी उकळायला ठेवावं लागणार. ती तशीच टेबलावर बसून राहिली. जिन्यावरून उषाबेनच्या पावलांचा आवाज तिने ऐकला, पण आत्ता तिला अगदी कुणी म्हणजे कुणी नको होतं आसपास. अंगाभोवतीचं जॅकेट आवळत तिने कोशात शिरण्याचा प्रयत्न केला.
"अगं घरात सुद्धा कसले ते जाडेभरडे कपडे चढवतेस? आणि आलीस कधी तू? हाक तरी मारायचीस."
"आत्ताच आले. खायला कर ना काहीतरी."
"वा, भाग्यं उजळलं आमचं, खायचं सुचतंय म्हणजे." उषाबेनना मनापासून आनंद झाला.
"राहू दे. भूकच मेली माझी एकदम."
"अगं, मजेत बोलले मी. काय करू सांग. गोड शिरा की बटाटे पोहे तुझ्या आवडीचे?"
"नको म्हटलं ना."
"अमिता हे जास्त होतंय." उषाबेन वैतागल्याच. काही बोलायची खोटी, मुलं कसा अर्थ काढतील तेच सांगता येत नव्हतं. पण अमिताच्या तारवटलेल्या डोळ्यांकडे त्यांचं लक्ष गेलं आणि त्या स्तब्ध झाल्या. पुढे होवून अमिताला जवळ घ्यायचा मोह त्यांनी टाळला. ‘बाजूला ढकललं तर...’
"अमू काय झालं बेटा? का रडतेयस?"
"अमिता, अमिता म्हण. स्टॉप दॅट ‘बेटा’ थिंग."
"चुकलं माझं, पण सांगतेस का आता का रडतेयस ते." खरं तर चुकलं म्हणायची आवश्यकता नव्हती असंही तितक्यात वाटलं त्यांना. अमिता गप्प बसून राहिली. ती काही बोलत नाही हे बघून न बोलता त्यांनी पोहे केले. तिच्यासमोर बशी ठेवली. कोथिंबीर, खोबरं, लिंबाची फोड...अमिताची भूक चाळवली. ती न बोलता खात राहिली. उषाताई मग तिथून निघूनच गेल्या.
आई गेलेली पाहिल्यावर अमिता झटक्यात उठली. आत्ताच खाल्लेल्या पोह्यांनी ती अस्वस्थ झाली होती. स्वयंपाकघरालगतच्या बाथरुममध्ये शिरत घाईघाईत तिने नळ जोरात सोडला. पाण्याच्या आवाजात ओकारीचे आवाज विरुन जातील याची तिला खात्री होती. घशात अगदी आतपर्यंत तिने बोटं खुपसली आणि खाल्लेलं सगळं बाहेर टाकल्यावर तिचा जीव शांत झाला. बाहेर येऊन पटकन ती तिच्या खोलीत गेली. गादीच्या खाली लपवलेली पिशवी तिने बाहेर काढली. पुदिन्याची गोळी खाल्ल्यानंतर सुवासिक वासाने तिचं तिला बरं वाटलं.

आकाशभाई घरी परतले तेव्हा सगळं घर शांत होतं. मुलांचा आरडाओरडा, गोंधळ नाही म्हटल्यावर एकदम चुकल्यासारखं झालं त्यांना. उषाबेनचीही चाहूल लागली नाही तसे ते थोडेसे चिडलेच. तेवढ्यात प्रणव धावत खाली आला.
"सोडताय ना मला?"
"मी? मी कुठे सोडणार तुला? आई कुठे आहे? मी आत्ता येतोय घरात"
"कालच ठरलं होतं की आज खेळाच्या सरावासाठी तुम्ही सोडणार."
"काय उपयोग आहे का या खेळांचा. पैसा मिळणार आहे का खेळून?".
"कॉलेजमध्ये प्रवेश मिळवताना उपयोग होतो. नुसत्या अभ्यासावर प्रवेश मिळत नाही म्हणून तुम्हीच खेळायला सुरुवात कर म्हणून सांगितलं होतं. आठवतंय.?"
"बरं चल, च्यायला काय कटकट आहे." ते स्वतःशीच पुटपुटले.
"काय म्हणालात?"
"काही नाही. अमिता येतेय का आपल्याबरोबर?"
"नाही. ती खोलीत आहे तिच्या. मला गाडीत बोलायचं आहे तिच्याबद्दल."
"भांडण झालं?"
"नाही. पण तिचं लक्षण चांगलं नाही वाटत मला."
"काय?"
"गाडीत सांगतो."
गाडीत बसल्या बसल्या प्रणवने अमिताबद्दल बोलून टाकलं.
"बहुधा एनोरेक्सिया किंवा बुलेमिया झालाय तिला."
"म्हणजे?" हे शब्द देखील कधी ऐकले नव्हते आकाशभाईंनी.
प्रणवने शाळेत यासंर्दभात ऐकलेल्या भाषणाचा तपशील सांगितला. त्याने गूगल करून एकत्र केलेली माहिती दिली.
"बारीक होण्यासाठीचे सहजसाध्य उपाय म्हणून सुरू झालेल्या गोष्टीचा अतिरेक झाला की माणूस या विकाराला बळी पडतो असं म्हणतात. अमिताचं वागणं मला तरी तसं वाटतं."
"आईशी बोललास तू?"
"नाही. तिला बारीक व्हायचं वेड लागलंय असंच समजतोय आपण बरेच दिवस. पण शाळेतलं ते भाषण ऐकल्यापासून मी लक्ष ठेवून आहे तिच्यावर. तिला आपण लगेच डॉक्टरकडे न्यायला हवं."
"छे, काहीतरीच काय बारीक राहायची धडपड म्हणून घाबरायचं कशाला?"
"माणूस मरू पण शकतो असं सांगितलं भाषणात."
"हो पण अमिताने एवढं टोक गाठलेलं आहे असं नाही वाटत मला."
"तिचं वजन किती कमी झालंय ते पहा तुम्ही. मी आईला पण सांगणार आहे." पुढे बोलायला काही नसल्यासारखे दोघही गप्प झाले. आकाशभाईही मुकाट गाडी हाकत राहिले. प्रणव म्हणतो तसं खरंच असलं तर...?

आकाश आणि उषाबेननी प्रणवच्या मदतीने अमिताला समजावलं. डॉक्टरांकडे अमिताला नेल्यावर तिचे रक्त निघणारे ओठ, हिरड्या पाहून उषाताई आतल्या आत आवंढे गिळत राहिल्या. अमिताचे सुजलेले गाल लक्षात आले नाहीत म्हणून स्वतःला दोष देत राहिल्या. कामाच्या रगाडात मुलांकडे निरखून बघणंही होत नाही? अनेकदा अमिताने वेगवेगळ्या मार्गाने व्यक्त केलेली चिंता गंभीरपणे का घेतली नाही या विचाराने त्या मनातल्या मनात खजील झाल्या. अमिताला रुग्णायलात महिनाभर तरी राहावं लागणार होतं. तिघांचा जीव तीळ तीळ तुटत राहिला तिच्या काळजीने.

रुग्णालयातून दिलेली माहिती आकाशभाई, उषाताई दोघंही परत परत वाचत होते. दर दोन चार वाक्यानंतर त्यात लिहिलेली लक्षणं आणि अमिताच्या बाबतीत घडत गेलेल्या घटना आठवून आपल्याला कशी संगती लावता आली नाही याचा काथ्याकूट चालला होता. मुलांना वाढवण्यात आपण कमी पडलो ही भावना उषाबेनच्या मनात मूळ धरत होती. आकाशभाईंसमोर आपलं मन मोकळं करावंसं वाटूनही त्यांच्या तोंडातून शब्द फुटेनात. त्या हरवल्या नजरेने माहिती वाचण्यात गढलेल्या आकाशभाईंकडे पाहत राहिल्या. आकाशभाईंनी उषाबेनकडे पाहिलं. त्याचं मनही आतल्या आत जाब विचारत होतं. दोन मुलांची जबाबदारी पार पाडता येत नाही तेही घरातच कार्यालय असून. मुलं समोर दिसतच नाहीत असं नव्हतं आणि तरीही समोर घडणार्‍या गोष्टी दिसल्या का नाहीत? त्यांनी स्वत:लाच विचारलेला प्रश्न उषाबेनना नेमका समजला.
"दोनच मुलं असूनही ही वेळ यावी ना आपल्यावर? आणि म्हटलं तर आपण सतत घरातच असतो की." त्यांच्या डबडबलेल्या डोळ्यांकडे ते नुसतेच पाहत राहिले. त्या गदगदून रडायला लागल्या. आकाशभाईंनी त्यांच्या हातावर थोपटल्यासारखं केलं आणि ते झटक्यासारखे उठले. तिथून निघूनच गेले. माहितीचं पुस्तक डोळ्यावर आडवं टाकत उषाबेननी डोकं खुर्चीवर मागे टाकलं. किती वेळ गेला कुणास ठाऊक पण दणकट, मायेचा स्पर्श त्यांच्या माथ्यावर जाणवला. प्रणवचा हात धरत त्यांनी डोळे उघडले. कर्त्यापुरुषासारखा तो आईला सावरत होता.
"तुला लॅपटॉपवर काहीतरी दाखवायचंय."
अनिच्छेनेच त्यांनी तो काय दाखवतोय ते बघण्याची तयारी दर्शविली.
कधीही न ऐकलेल्या त्या विकाराची इतकी विस्तृत माहिती त्या प्रथमच बघत होत्या. अमिता आणि त्यांच्या कुटुंबासारखी अनेकजण यातून गेलेली पाहून आपण एकटेच नाही हा दिलासा मिळत होता. पण तरीही ‘देसी’ लोकं यातून जात असतील का, ही शंका पोखरत होती. कुणाला विचारणार हा प्रश्न होताच, पण हळूहळू मुलीचा विकार, उपाय, इतरांचे अनुभव अशा माहितीच्या विश्वात त्यांच्या मनातल्या शंका अंधुक झाल्या.
अमिताला रुग्णालयात भेटून आलं की त्यांचा वेळ संगणकावर या विकाराची माहिती वाचण्यात जात होता. आकाशभाईंनी स्वत:ला कामाभोवती वेढून घेतलं होतं. अमिताच्या उपचारावर पाण्यासारखा पैसा चालला होता. त्यात एकदा नर्सने अमिताचं वजन वाढतंय असं दिसावं म्हणून अमिता कपड्यांच्या आत काहींना काही कोंबून वजनाला उभी राहते हे सांगितलं. आशा निराशेचा लपंडाव चालू होता. अमिताला यातून बाहेर काढायचं तर ती घरी परतल्यावर मानसोपचार तज्ज्ञाकडे खेपा घालणं भाग होतं. प्रणव आई वडिलांच्या धडपडीत त्यांना हात देण्याचा प्रयत्न करत होता. एकदा उषाबेननी त्याला जवळ घेऊन मनातली भिती व्यक्त केली होती.
"प्रणव आम्ही पोळलोय अमिताच्या बाबतीत. असं नको व्हायला की तिला सावरता सावरता तू निसटून गेलास हातातून."
"नाही गं, तसं नाही होणार." तो हसून म्हणाला.
"खरं सांग बाबा काय ते. नंतर मनाला चुटपूट नको."
"बरं तू विषय काढलाच आहेस तर, तुला राग येणार नसेल तर मला काहीतरी बोलायचं होतं."
त्या लहान मुलीसारख्या अकाली पोक्त झालेल्या त्यांच्या तरुण मुलासमोर बसल्या.
"अमिता घरी आली की आपण तिला काही विचारायचं नाही."
"तेवढं कळतं रे आम्हाला." उषाताई दुखावल्या सारख्या पुटपुटल्या.
"तेवढंच नाही. तुम्ही आधी पासून आम्ही काय सांगतो ते ऐकलं असतं तर समजलं असतं गं तुम्हाला किती काय काय प्रसंगातून जावं लागतं बाहेर आम्हाला."
"का? वेळोवेळी विचारत नव्हतो आम्ही?"
"विचारत होता, पण ऐकत नव्हता आम्ही काय सांगतोय ते. कितीतरी वेळा अमिता आणि मी बोललोय याबद्दल."
"आता तूच शिकवायचा राहिला आहेस."
"तू शांतपणे ऐक. चिडू नकोस."
त्या गप्प राहिल्या. आपल्याला बोलायला ही संमती आहे हे गृहीत धरून प्रणवने मुद्दा सोडला नाही.
"मला एवढंच सांगायचंय, जे अमिताच्या बाबतीत झालं ते माझ्या बाबतीतही झालंय. प्रसंग वेगळे फक्त."
त्या न समजल्यासारखं उजवा हात डाव्या हातात घेऊन पालथ्या पंज्यावर बोटं फिरवत राहिल्या.
"एकदा दोनदा मुलांनी मला मारोवाना घ्यायला जवळजवळ भाग पाडलं होतं. बर्‍यांचदा समलिंगी म्हणूनही चिडवलंय. लारानेही बराच त्रास दिला होता."
"लाराबद्द्ल तू बोलला होतास, पण मारोवाना? म्हणजे ते गर्द वगैरे म्हणतात ते? धुंदीत नेतं ते? बापरे! घेतलं होतस की काय तू ते?"
"नाही गं. मला तेच सांगायचं होतं. तुम्ही दोघं एकमेकांना सारखे आपण कसे कमी पडलो मुलांच्या बाबतीत ते सांगताना ऐकलंय मी अमिता आजारी पडल्यावर. पण तुम्ही तुमच्या परीने खूप केलंय. कदाचित तुमचे मार्ग वेगळे असतील आम्हाला समजून घेण्याचे. मी मारोवाना घेतलं नाही ते त्यामुळेच ना? लारा किती त्रास द्यायची. दोन लगावून द्याव्या असं वाटूनही कधी हात उगारला गेला नाही ते तुमच्यामुळेच. अमिताचीही तीच इच्छा असावी की तुम्ही तिला मदत कराल. पण तिने मलाही कधी विश्वासात नाही घेतलं. त्याचं काय कारण असावं ते मीही समजावून घेण्याचा प्रयत्न करतोय. कधी कधी वाटतं आम्ही तुम्हाला काही सांगितलं की जाऊ दे, दुर्लक्ष कर, तुझंच चुकलं असेल असं म्हणायचात ना, नाही तर सारखा उपदेश; म्हणून तर झालं नसेल हे? आम्हाला दोघांनाही त्याचं फार वाईट वाटायचं गं. मग वाटायचं आमचं दुःख तुम्हाला समजतच नाही. उगाच भानगडी नकोत परक्या देशात राहून हे घोषवाक्यं भिनलंय तुमच्या मनात, त्याचे नकारार्थी परिणाम होत असतील हे कधी लक्षातच घेतलं नाही तुम्हा दोघांनी."
"असेल. मला तर काही कळेनासं झालंय. यातून अमिता बाहेर पडली की झालं."
"पडेल. मी रुग्णालयात बसतो ना तिच्याबरोबर तर आम्ही लहानपणापासूनच्या सगळ्या आठवणी काढतो. अमिता तर मागे लागलीय लिहून काढ, संगणकावर टाक. आणि आई, आमच्या बोलण्यात आपण पूर्वी किती मजा करायचो ते पण येतं सारखं."
"मला तर आत्तापर्यंत तुम्ही मुलं मला सगळं सांगता असा विश्वास होता."
"हळूहळू सगळं बदलत गेलं ते."
"खरंच लक्षातच आलं नाही आमच्या. काय काय आणि किती वेगवेगळे प्रश्न येतात मुलं मोठी व्हायला लागल्यावर. मुलींच्या बाबतीत वयात येणं आणि मुलाच्या बाबतीत व्यसनं याबाबत किती सावध राहायला हवं एवढंच माहीत होतं. आमच्या परीने आम्ही याबाबत बोललो होतो. पण हे असलं आजारपण, कल्पनाही नव्हती. अमिता पडेल ना यातून बाहेर? तिला एकदा बरी होवू दे. मग तुम्ही दोघं शिकवा आम्हाला कसं वागायचं ते तुमच्याबरोबर." त्या एकदम बोलायच्या थांबल्या. प्रणवचा हात हातात घेऊन नुसत्याच त्याच्याकडे पाहतं राहिल्या. तोही निःशब्दपणे त्यांच्या हातावर थोपटत राहिला. त्याचा थोपटणारा हात हातात घेऊन उषाबेननी घट्ट दाबून धरला. अचानक त्यांना धाय मोकलून रडावंसं वाटायला लागलं. बेभानपणे रडणार्‍या आईला प्रणवने घट्ट मिठीत ओढलं. कर्त्यापुरुषासारखा तो त्यांना थोपटत राहिला. समजावीत राहिला. त्या शांत झाल्या तसं न राहवून त्याने सलीलबद्दल सांगितलं. त्याच्याबद्दल प्रणवला वाटणार्‍या चिंतेने उषाबेनचा जीव गलबलला.

महिनाभराने अमिता घरी आली. दोघंही जास्तीत जास्त वेळ मुलांबरोबर घालवत होते. त्यांचे प्रश्न समजावून घ्यायचा प्रयत्न करत होते. अमिता माणसात आल्यासारखी वाटायला लागली तरी घरातल्या प्रत्येकाचं तिच्यावर बारीक लक्ष होतं. कधीतरी ती या मार्गाकडे का वळली ते सांगेल या आशेवर उषाताई होत्या.
प्रणवचा आणि अमिताचा जास्तीतजास्त वेळ हल्ली संगणकावर जात होता. बालपणाची स्मरणयात्रा संकेतस्थळावर लिहिण्यात दोघं गर्क होते. अमिताला कधी एकदा प्रणव शाळेतून येतो असं होवून जाई. तिची शाळा बंद होती. घरी अभ्यास करुन ती परीक्षा देणार होती. त्यातूनही आई, बाबांचा मिळणारा सहवास तिला सुखावत होता. सारख्या पैशाच्याच गोष्टी करणारे बाबा तिचा शब्द झेलायला एका पायावर तयार असलेले बघून तर हल्ली हल्ली तिला बरं होवूच नये असं वाटायला लागलं होतं.
"आईचं प्रेम ती बोलून दाखवते म्हणून समजतं, पण बाबांचापण किती जीव आहे ते मी आजारी पडल्यावरच समजलं." न राहवून तिने प्रणवपाशी हे बोलून दाखवलं.
"हे पण लिहायला हवं आपल्या त्या स्मरणयात्रेत. तुझ्या किंवा माझ्या वाढदिवसाला आपण आई, बाबांना दाखवू हे."
"हो, आई सारखी येरझार्‍या घालते आपण लिहीत असलो की."
"आता प्रत्येक गोष्ट माहीत पाहिजे आपल्या आयुष्यातली असा निर्धार आहे तिचा. धन्यवाद तुला त्याबद्दल." प्रणवने चेष्टा केली, पण आपल्या शब्दांनी ती दुखावली तर नाही ना असंही त्याला वाटून गेलं. अमिता नुसतीच हसली.
"खरं आहे रे तिचं. तुझ्या लक्षात नाही आलं?" काही न कळल्यासारखा तो पाहत राहिला.
"आपल्याकडे जेवायला येणारे पाहुणे कमी झाले आहेत."
"अगं तू आत्ता तर बरी होते आहेस."
"नाही, आई तिच्या मैत्रिणी बरोबरही जात नाही बाहेर."
"तुझ्या सरबराईत आहोत ना आम्ही." तो हसून म्हणाला पण अमिता गंभीर होती.
"खरं कारण आहे लोकांच्या प्रश्नांना उत्तरं देणं जमत नाही तिला. फार प्रश्न विचारतात आणि प्रत्येकाच्या नजरेत मुलांकडे इतकं कसं दुर्लक्ष केलं असा भाव दिसतो तिला."
"हे तुला आईने सांगितलं?"
"छे, बाबा तिच्याशी बोलत होते. आता पुन्हा लोकांना बोलावलं पाहिजे घरी तरच व्यवसाय वाढेल असं त्यांना वाटतं. पण आईने लोकांना घरी बोलवायचं नाही जेवायला असं सांगितलं."
"मग वादावादी का दोघांची?"
"नाही. शांतपणे ऐकून घेतलं बाबांनी. माझ्या आजारपणाने बाबांमध्ये बराच बदल झालाय. मी मेले ना या आजारामुळे, तर तेवढंच समाधान असेल मला. आईला आणि सर्वांनाच समजून घेतात आता बाबा."
"पण तू का मरणाच्या गोष्टी करतेस?"
"मला पुन्हा नव्यानं सगळं सुरु करायची भिती वाटायला लागली आहे."
"असं म्हणून नाही चालणार अमिता. कॉलेजला जाशील आता तू लवकरच. किती सदिच्छा पत्रं येतायत तुला सर्वांची. तुला उगाचच चिडवणार्‍यांनी क्षमा मागितलेली पत्रं आई नाही का वाचून दाखवत. सगळी जणं कधी एकदा तू परत येतेयस म्हणून वाट बघतायत. या शाळेतलं अजून एक वर्ष." अमिता प्रणवचं बोलणं मन लावून ऐकत होती. तिला स्वत:लाच तिने हे टोक का गाठलं या प्रश्नाचं उत्तर सापडत नव्हतं. कॉलेजचं कुणी पाहिलं आहे, तिथे आणखी काहीतरी निघायचं... आईची हाक ऐकू आली तसं दोघांचं बोलणं थांबलं. अमिता संथपणे जिना उतरुन खाली आली.

सप्टेंबरपासून प्रणवचं कॉलेज सुरु झालं. अमितानेही परत शाळेत जायला सुरुवात केली. पण मन रमत नव्हतं. तिला चिडवणार्‍या मुली आता तिच्या वाटेला जात नव्हत्या. कुणी ना कुणी सतत तिच्या आजूबाजूला राहत होतं. पण तिला त्याचाच त्रास व्हायला लागला. सगळेजण आपल्याकडे सहानुभूतीने बघतात, कीव करतात हेच तिच्या मनाने घेतलं. ती खंगत चालली. एक महिना, दोन महिने.... अजून सात आठ महिने, नंतर कॉलेज. पण हे चार महिने काढता काढता नकोसं झालं होतं. त्या दिवशी उतरलेल्या चेहर्‍याने ती घरात आली आणि उषाबेनचा तोल सुटला.
"हे काय गं सारखं चेहरा पाडून वावरणं. स्वत:ला सुख लागू द्यायचं नाही आणि आमचीही फरफट तुझ्याबरोबर. अगं, काय करायचं तरी काय आम्ही तुझ्यासाठी बाई? डॉक्टर झाले, मानसोपचारतज्ज्ञ झाले, समजून घ्यायचं, समजून घ्यायचं म्हणजे किती? आणि तुला नाही आमची तगमग समजत? काय अवदसा आठवली आहे तुला भरल्या घरात ही. तुझ्या भावाला तुझ्या काळजीने झोप लागत नाही रात्र रात्र. त्याचंही हेच वय आहे ना मित्रमंडळीत रमायचं? पण सगळं सोडून तो तुझ्या काळजीत. बाबांच्या जीवाला घोर आहेच, पुन्हा त्यांना तुझ्या उपचाराच्या खर्चासाठी रात्रीचा दिवस करावा लागतोय. आणि का हे सगळं, तर कुणी एक मुलगी काहीतरी चिडवते, आणि तुझ्यासारखी मूर्ख ते मनावर घेते. इतकं की तिला स्वत:च्या जीवाची पर्वा वाटत नाही. अगं पण आमचं काय? का हा असा छळ चालवला आहेस तू तुझाही आणि आमचाही?" घरात आल्याआल्या आपल्यावर आई इतकी चिडेल याची अमिताला पुसटशीही कल्पना नव्हती. ती सुन्न होवून आईकडे पाहत राहिली. पाठीवरची बॅकपॅक खाली टाकून अमिता डायनिंग टेबलवर डोकं टेकून हुंदके द्यायला लागली. उषाबेनच्या मनातला संताप खदखदायला लागला. पुढे होवून त्या वेड्यासारख्या तिच्या पाठीवर गुद्दे मारायला लागल्या. आईला थांबवायचं त्राण त्या जीवात राहिलं नव्हतं. मारता मारता केव्हातरी अमिताचं स्तब्ध पडून राहणं उषाबेनच्या लक्षात आलं. थकून उषाताई तिच्या बाजूला बसून मान खाली घालून रडत राहिल्या. माय लेकी एकमेकींच्या बाजूला बसूनही शेकडो कोस दूर होत्या.

अमिताला प्रणवच्याच कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. शाळा, वातावरण, मित्रमैत्रिणी सर्वच नवंकोरं. नवीन वातावरणाशी जुळवून घ्यायला प्रणव होता. अमिताची खास मैत्रीण नीनाही होती. को‍‌‍‌र्‍या पाटीवरची सुरुवात सुलभ होईल याची खात्री होती उषाबेन आणि आकाशभाईंना. अपेक्षेप्रमाणे बस्तान बसतंय असं वाटत होतं. वसतिगृहात स्वतंत्र राहण्याऐवजी प्रणव आणि अमिता खोली भाड्याने घेऊन एकत्र राहत होते. आकाशभाई आणि उषाताई दर आठवड्याला भेटायला जात नाहीतर दोघं भावडं कपड्याचं गाठोडं धुवायला घेऊन शुक्रवारी घरी येत. दोन चार महिने बरे गेले. अमिता रुळतेय असं वाटायला लागलं. त्यातूनही अमिताच्या खाण्याबद्दल विचारलं नाही की दिवस चांगले जात. ती दोघंही प्रणवकडेच तिची खुशाली विचारत. पण या सुरळीतपणाला खीळ बसल्यासारखं वाटायला लागलं. वाटलं होतं तशी सुधारणा उषाबेनना अमिता मध्ये वाटत नव्हती. अलीकडे तर ती फार असंबद्ध बोलायला लागली होती. एक दोन महिने अमिता नाहीतर प्रणवकडूनच काही समजेल ह्या अपेक्षेत गेले. पण आणखी थांबून चालणार नव्हतं. उषाबेननी नीनाला, अमिताच्या मैत्रिणीला गाठलं. दोघी एका खोलीत राहत असल्या तरी प्रणव आणि अमिता तासनतास लॅपटॉपसमोर असतात एवढंच सांगू शकली ती.
"पार्ट्या, हल्लागुल्ला अशा प्रकारात रस नाही तिला आंटी. फार अभ्यासू मुलगी आहे तुमची. आणि भावाची लाडकी."
"खाते ना गं ती व्यवस्थित? तू मैत्रीण आहेस तिची. एकदा कशी तिला परत मिळवली आहे ते माहीत आहेच नं तुला?" नीनाने मान डोलवली. अगदी पहिल्यांदा तिलाच तर शंका आली होती. शाळेतल्या त्या भाषणानंतर नीनाला टाळायचं म्हणून पळच काढला होता अमिताने. तेव्हाच एक नकोसा दुरावा निर्माण झाला दोघींच्या मैत्रीत. त्या वेळेस सांगावंसं वाटूनही ना अमिता बोलली, ना नीनाने तिला काही खोदून खोदून विचारलं, ना मदतीचा हात पुढे केला. अमिता टाळते या रागात ही महत्त्वाची बाब दुर्लक्षित केली होती तिने. पण मैत्रिणीच्या आजारपणात मात्र ती सावलीसारखी मागे होती.
"खायच्या गोष्टींमध्ये रसच नाही तिला. एकेक घास बराचवेळ चिवडत बसते. बाथरुममध्येही असते खूपवेळ. पण तुम्ही काळजी करु नका. हळूहळू लागेल मार्गाला."
"तुझा कसा चाललाय अभ्यास?" काहीतरी विचारायचं म्हणून उषाबेननी विचारलं.
"चांगला चाललाय. पहिलंच वर्ष आहे ना तर जरा मजा पण करतेय. अमितालाही न्यायचा प्रयत्न करते मी जिथे जाईन तिथे." अमिताला कसं जपतेय ते नीना सांगत राहिली. खरं तर इतक्या नवीन मैत्रिणी, मित्र मिळाले होते तिला की अमिताच्या आशा निराशेच्या लपंडावांच्या मागे लागणं तिने कधीच सोडून दिलं होतं. जीवाभावाची मैत्रीण असली तरी तिचंही वय नवीन नवीन अनुभव उपभोगायचं होतं.

उषाबेननी त्यांची चिंता मानसोपचारतज्ज्ञाकडे व्यक्त केली. पण असे चढउतार होतच राहतात आणि जोपर्यंत ती नियमितपणे घरी येतेय तोपर्यंत काळजीचं कारण नाही हाच दिलासा मिळाला. आता यापलीकडे काय केलं की शांती मिळेल जिवाला हे त्यांना समजेना. कॉलेजच्या जवळ घर घेणं हा पर्याय दोन्ही मुलं स्वीकारणं निव्वळ अशक्य होतं. असं घरी राहून कुणी शिकतं का इथे हाच प्रश्न आला असता दोघांकडून. प्रणवच्या भरवशाशिवाय पर्याय नव्हता.

नेहमीसारखाच तोही शुक्रवार. कपड्यांचा ढीग धुवायला टाकला आणि कधी नव्हे ते अमिता सोफ्यावर आई, बाबांच्या मध्ये येऊन बसली. आश्चर्य लपवीत उषाबेननी तिच्या गळ्याभोवती हात टाकला. तीही लहान मुलीसारखी त्यांच्या मांडीवर डोकं टेकून पडून राहिली. त्या तिला थोपटत बराचवेळ दूरदर्शनवरचा कार्यक्रम पाहत राहिल्या. आकाशाभाईही मायेने तिच्या डोक्यावर हात फिरवत राहिले. अमिताचा डोळा कधी लागला ते उषाबेनच्या लक्षातही आलं नाही. आकाशभाईंनी पटकन जाऊन चादर आणली. हळुवार हाताने अंगावर पांघरूण घालून दोघं तिच्याकडे एकटक नजरेने पाहत राहिले. तिला उठवून वर झोपायला लावणंही त्यांच्या जीवावर आलं. अमिता गाढ झोपल्यावर अलगद तिचं डोकं मांडीवरुन उचलून त्या तिथून उठल्या.

सकाळी तिला जाग आली ती आकाशभाईंच्या घाबरलेल्या हाकेने.
"अमिता कसंतरी करतेय. बहुधा झोपेच्या जास्त गोळ्या घेतल्या." प्रणव जीवाच्या आकांताने शाळेत शिकवलेल्या प्रथमोपचाराने तिचा श्वास चालू करण्याचा प्रयत्न करत होता. धावत खाली आलेल्या उषाबेन ते दृश्यं पाहून कपाळावर हात मारुन मटकन खाली बसल्या. आकाशभाईंनी हात पुढे केला.
"हातपाय गाळायची ही वेळ नाही उषा." आधार देण्यासाठी पुढे केलेला त्यांचा हात थरथर कापत होता.

रुग्णालयातल्या पलंगावर पडलेल्या अमिताच्या देहाकडे तिघंही व्याकुळ नजरेने पाहत राहिले. ती शुद्धीवर कधी येणार या काळजीने सर्वांचाच जीव दडपून जात होता. आईचा श्वास कोंडताना बघून प्रणवने बाबांना तिला मोकळ्या हवेत न्यायला लावलं. डॉक्टरांनी त्यालाही बाहेर जायला सांगितल्यावर नाईलाजाने प्रणवही बाहेर येऊन बसला. तिघंही वाट पाहतं राहिले.
"हार्टएटॅक!"
"हार्टएटॅक? ती फक्त एकोणीस वर्षाची आहे डॉक्टर."
"हो, पण एनोरेक्सिक आहे पेशंट. झोपेच्या गोळ्या घेतल्यामुळे एकेक यंत्रणा निकामी झाली आहे शरीराची.
"पण तिच्या डॉक्टरांनीच दिल्या होत्या झोपेच्या गोळ्या." गडबडून आकाशभाईंनी उत्तर दिलं.
"शक्य आहे. पण त्या सतत घेतल्यामुळे किडनी खराब झाली आहे. मेंदूलाही रक्त पुरवठा होत नाही असं वाटतंय. दोन दिवस वाट पाहून ठरवावं लागेल."
"काय ठरवावं लागेल?"
"तिला इथे आणल्यापासून ती कृत्रिम श्वसनावरच आहे. शरीराकडून प्रतिसाद नाही."
"आम्ही हात फिरवतो तेव्हा तो स्पर्श तिला कळतो."
"हो पण त्याला पूर्णार्थाने प्रतिसाद म्हणता येत नाही...." डॉक्टर काय सांगतायत ते आपापल्या परीने प्रत्येकजण समजून घेण्याचा प्रयत्न करत होता.
"किती दिवस कृत्रिम श्वसनावर पेशंटला ठेवायचं ते तुम्हीच ठरवायचं आहे. निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल. यातून ती वाचली तरी त्या वाचण्याला काही अर्थ नाही." निर्णय घेणं सोपं नव्हतं. अमिताच्या बारीक होण्याच्या नादाने हे टोक गाठलं जाईल असं क्वचित वाटलं तरी ते तेवढ्यापुरतं होतं, तिला सांगण्यापुरतं, तिनं त्यातून बाहेर पडावं म्हणून. खरंच असं काही होईल असं कुणालाच वाटलं नव्हतं. एक अंधुक आशा मनात तेवत होती. आज ना उद्या ती शुद्धीवर आली तर? असा कसा निर्णय घ्यायचा? डॉक्टर म्हणतायत म्हणून ठरवून टाकायचं...छे, इतकं सोपं आहे का हे? प्रश्न चिन्हांच्या जाळ्यात तिघंही अडकले. पण अमिताने फारसा वेळ दिलाच नाही, निर्णय घेण्याची वेळच आणू दिली नाही. त्याच रात्री तिने या जगाचा निरोप घेतला.

आकाशभाई आणि उषाताई कपाळाला हात लावून बसले. ‘हे काय आलं आपल्या नशिबात, का?’ विचाराचं थैमान चालू होतं. ‘कळलं होतं का भविष्य मुलीला? काल रात्री दोघांच्या मध्ये येऊन बसली लहान मुलीसारखी ते आधारासाठीच असेल का? लहानपणी बोट धरून राहायची, घाबरली की कुशीत शिरायची, तसंच वाटत असेल का तिला?’ भंडावून गेलं डोकं आकाशभाई आणि उषाबेनचं. प्रणव आई, बाबांजवळ बसून हमसाहमशी रडला. दोघंही त्याला समजावत राहिले, कोरड्या चेहर्‍याने, अस्वस्थ मनाने. पुढच्या तयारीला लागायला हवं...

कॉफीनमध्ये ठेवलेल्या अमिताला हलवावं, तिथून बाहेर पडायला लावावं असं उषाबेनना वाटत होतं. चालता बोलता देह असा एकदम निष्प्राण, थंड, निर्जीव. सुन्न मनाने ते तिघं चर्चमध्ये येणार्‍यांना भेटत होते. केवढी ही गर्दी. भरल्या डोळ्यांनी उषाबेन त्यांच्या सांत्वनासाठी रांग लावून उभ्या असणार्‍या मुलांकडे, मुलींकडे पाहत होत्या.
‘यातलं कोण चिडवत होतं तिला? कुणामुळे सुरु झाला हा जीवघेणा खेळ?’ एखाद्या मुलीकडे बघून वाटत होतं, ‘हीच, हीच असेल ती मुलगी. हिच्यामुळेच गमावलं मी माझ्या लेकीला’. दुसरा चेहरा बघितल्यावर ती मुलगी त्यांना उगाचच अमिताची जवळची मैत्रीण असेल असं वाटून जात होतं.
‘तुझ्याच मैत्रिणी ना या? त्यांना नाही वाटतं कुणी काही चिडवलं? आणि त्या का नाही गं भांडल्या तुझ्यासाठी, का नाही तुला चिडवणार्‍यांना प्रतिकार केला? का नाही गेल्या तक्रार घेऊन शिक्षकांकडे? निदान आम्हाला तरी सांगायचं.’ आता हे निरर्थक आहे हे समजत होतं पण हेच प्रश्न तेव्हा का पडले नाहीत या विचाराने व्याकुळ व्हायला होत होतं. तिच्या शाळेतले शिक्षक, महाविद्यालयातले मित्र, मैत्रिणी तिच्याविषयी एक दोन वाक्य बोलत होते ते ऐकताना वाटत राहिलं.
‘का वाटलं असेल अमिताला या माणसांच्या गर्दीत एकटं? केवळ आपण जाड आहोत ही भावना पार मृत्यूपर्यंत नेऊ शकते ही सुद्धा या देशाचीच देणगी म्हणायची का? इतके मित्र मैत्रिणी असूनही नाही ना कुणी वाचवू शकलं माझ्या मुलीला. आम्हीतरी काय असून नसल्यासारखेच. पण हिच्या भावाने काय केला होता गुन्हा. त्याला का दिलं तिने हे अपयश.’ प्रणवने खांद्यावर टेकलेल्या आईला कुशीत ओढलं आणि दुसर्‍या हाताने आकाशभाईंच्या खांद्यावर आधाराचा हात टेकवला.

एकमेकांच्या सोबतीने पुन्हा ते घर सावरु पाहतं होतं. महिनाभराने आज प्रणव निघणार होता. सकाळपासून उषाबेनचे डोळे भरुन येत होते. आकाशभाईंनाही तो आता आपल्याबरोबरच राहिला तर बरं असं वाटत होतं. पण असं करुन कसं चालणार होतं? निघण्याच्या आधी तो लॅपटॉप घेऊन आला. दोघांना त्याने समोर बसवलं.
"मला काहीतरी दाखवायचं होतं तुम्हाला दोघांना."
ती दोघं नुसतीच पाहतं राहिली.
"अमिताच्या नावाचं संकेतस्थळ केलं आहे आम्ही दोघांनी. मी गेल्यानंतर बघा तुम्ही म्हणजे अमिता जवळ असल्यासारखं वाटेल. मी उद्या बोलीनच तुमच्याशी."

मागे वळून पाहत पाहत तो गाडीत बसला. आई, बाबा दारात त्याला निरोप द्यायला उभे होते. त्यांच्या हालचालींना वेढलेल्या पराभूतपणाने प्रणवचे डोळे ओलावले. हात हालवत, दूर जाणार्‍या गाडीकडे ठिपका होईपर्यंत पाहत ती दोघं त्याला नजरेत साठवत राहिली.
आत आल्या आल्या घाईघाईत दोघांनी ते संकेतस्थळ उघडलं.
पहिल्याच पानावर अमिताचा हसरा चेहरा पाहून उषाताई हरखल्या. अमिताच्या शब्दातलं तिचं लहानपण, प्रणवबरोबरचे फोटो, आई, बाबांच्या आठवणी काय नव्हतं त्या पानांमध्ये. कितीतरी प्रसंग, अमिताचे नाच, गाणी, खेळ, सहली. सगळं जिवंत झालं होतं. दोघा भावंडांनी फार छान लिहिलं होतं. प्रसंग खुलवले होते. भावना सुंदर ओळींनी गुंफल्या होत्या. शेवटच्या पानावर ते कधी आले ते कळलंच नाही दोघांना. पण अमिताच्या फोटो ऐवजी तिथे होती फक्त रिक्त चौकट. उषाबेनच्या थरथरणार्‍या हातावर अलगद हात ठेवला आकाशभाईंनी.
"मी वाचून दाखवतो."
‘आश्चर्य वाटलं ना अमिताच्या फोटोऐवजी रिकामी चौकट म्हणून? आत्तापर्यंतचे फोटो तिच्या जायच्या आधीच्या काही महिन्यांपर्यंतचे होते. शेवटी शेवटी आमची अमू, रागावेल अमिता अमू म्हणतोय म्हणून, पण मला फार आवडायचं तिला असं चिडवायला. फार थकली होती. अगदी बाजूला, हाताच्या अंतरावर असूनही फार दूर गेली, परकीच झाली ती अखेरीला. बरी होतेय, बरी होतेय या भ्रमात तिने ठेवलं सर्वांनाच. अप्रतिम अभिनय करुन चक्क फसवलं तिने आम्हाला. का? याचं उत्तर आता कधीच मिळणार नाही. तुम्ही तिच्या, माझ्या बरोबरीने या संकेतस्थळावर प्रवास केलात पण आता तिला तुमचा निरोप घ्यायचा आहे. तिच्या शेवटच्या दिवसातली छबी नाही ठेवायची मला तुमच्यासमोर. माझी इच्छा आहे की शेवटी तुम्ही तिचा निरोप घ्यावा ते आधीच्या सुंदर फोटो आणि स्मृतीतून; म्हणूनच ती चौकट कोरी आहे, रिक्त! ती चौकट तुम्ही तुमच्या आठवणीतल्या अमिताने पूर्ण करा. अमू, आमच्या कुणाच्याच आयुष्यातला एकही क्षण असा नसेल की तुझी आठवण झाली नाही. तूही ठेवशीलच आमची आठवण कुठे असशील तिथे. पुढचा जन्म असेलच तर, मला पुन्हा एकदा तुझा भाऊ व्हायला आवडेल गं. मला ठाऊक आहे आई, बाबाही पुढच्या जन्मात तूच पोटी यावीस असं म्हणत असतील. तेव्हा तरी असं फसवून निघून जाऊ नकोस अचानक. अमूच्या स्मृतीला हे संकेतस्थळ वाहतोय. हा वेदनेचा प्रवास, तिचा आणि आमचाही... तिच्या भावाचा, आई, बाबांचा... वाचून कुणाला परावृत्त होता आलं, करता आलं, तर आमची अमूच परत मिळाल्या सारखं वाटेल आम्हाला. असं झालं तर कळवायला विसरु नका मला. माझ्या आधाराची आवश्यकता असेल, मदत पाहिजे असेल तर जिथे असेन तिथून येईन मी ---- प्रणव’
आकाशभाई, उषाताई दोघंही डोकं हातात धरुन तसेच बसून राहिले बराचवेळ. आतल्या आत घुसमटत. भावनावेग आवरत. किती वेळ, किती तास, किती दिवस गेले...

त्या दिवशी उषाबेननी आकाशभाईंसाठी कॉफी करुन आणली. हातपाय गळून गेलेल्या उषाबेनच्या डोळ्यातली चमक आकाशभाई पाहत राहिले.
"मला वाटत होतं आता अमिता गेल्यावर जगणं म्हणजे यंत्रवत. पण प्रणवच्या या संकेतस्थळाने मला मार्ग दाखवलाय. गेले कितीतरी दिवस मी विचार करतेय. मला माहीत नाही सगळं सांभाळून तुम्हाला किती जमेल पण मला फक्त पाठिंबा हवाय."
"तू काय करायचा विचार करते आहेस ते सांग ना आधी. नंतरच ठरवता येईल ना मला."
"मी शाळा, महाविद्यालयात जाऊन प्रणवबरोबर या विकाराबद्दलची माहिती द्यायचा विचार करतेय. आपल्याला काय जमलं नाही, अमिता कुठे कमी पडली, आपण काय करु शकलो नाही, खूप काही आहे सांगता येईल असं. मुलांनाही कळेल त्यांच्या मध्ये हे न्यूनत्व कसं येत जातं, त्यामुळे घरात नातेसंबंधावर कसा परिणाम होतो आणि मुख्य म्हणजे वेळीच मदत घेतली तर हे कसं टाळता येतं. बरंच काही करता येईल, कदाचित कितीतरी मुलांना वेळीच सावध करता येईल आपले अनुभव सांगितले तर..."
त्या बराचवेळ बोलत होत्या. आकाशभाई मन लावून ऐकत होते.
"करता येईल. मी ही मदत करेनच जमेल तशी. आपली अमिता नाही वाचवू शकलो आपण. पण कुठल्या तरी आई-बाबांचे जीवलग त्या वाटेवरुन परत येणार असतील तर हरकत नाही हे करुन बघायला. प्रणवच्या मदतीने तुला स्वरुप ठरवता येईल. पुन्हा नव्याने संसाराला सुरुवात करतो तसं एक नवीन आयुष्य जगायचा प्रयत्न करु आपण."

आकाशभाईंच्या साथीने नव्या उमेदीने जगायला हवं असं इतक्या वर्षाच्या सहप्रवासात त्यांना पहिल्यांदाच आतून आतून वाटून गेलं. प्रणवला फोन लावायला आकाशभाई उठले तेव्हा त्याच्यांकडे पंख फुटलेल्या परीसारख्या त्या पाहत राहिल्या.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

:(...

जबरदस्त लिहिलियस मोहना!
ह्यावर एखादी अत्त्युत्त्म फिल्म होउ शकेल.

ह्या विषयावर इतकं लिहिलेलं पहिल्यांदाच बघितलंय!

अतिशय सुरेख जमलीये कथा, मोहना. डिटेल्स, त्या आजारातून अमिता आणि तिच्या फर्स्ट जनरेशन मायग्रेशन चे प्रॉब्लेम्स... छानच.
अप्रतिम

मोहना,

खूप छान तपशीलवार मांडली आहे कथा. सगळे प्रसंग झरझर डोळ्यासमोर उभे राहिले..
अ‍ॅनोरेक्सिया नेर्वोस चे चढ-उतार , त्याचे रुग्ण आणि नातेवाईकांवर होणारे परिणाम एकदम छान रेखाटले आहेत..
शिर्षक पण समर्पक..

धन्यवाद सर्वांना. मी नताशा - खरं आहे पण ज्यांच्या बाबतीत असं घडतं ते कोणत्या परिस्थितीतून जात असतील त्याची कल्पनाही करवत नाही. ही गोष्ट सत्यघटनेवर आधारीत आहे.

परवा लेक सांगत होती की तिचे आणि मैत्रीणीचे भांडण झाले कारण लेक तिला चिडवत होती. (मैत्रीण तब्बेतीने चांगली आहे. फार नाही पण थोडी जाड आहे) मला लगेच ही कथा आठवली. लेकीला लगेच सांगीतली. असे चिडवण्याचा कीती गंभीर परीणाम होऊ शकतो तेही समजावून सांगीतले.

लेकीलाही हे पटले. तिने मैत्रीणीलाही हे गोष्ट सांगीतली, तिची माफी मागीतली. शाळेतही सगळ्यांना सांगीतली. अपेक्षा आहे की एखादी नवीन "अमिता" ह्यांच्यामुळे निर्माण होणार नाही.

मी नताशा- <<<लेकीलाही हे पटले. तिने मैत्रीणीलाही हे गोष्ट सांगीतली, तिची माफी मागीतली. शाळेतही सगळ्यांना सांगीतली. अपेक्षा आहे की एखादी नवीन "अमिता" ह्यांच्यामुळे निर्माण होणार नाही.>>>वाचून एकदम डोळ्यात पाणीच आलं. तुझ्या मुलीला शाबासकी दे माझ्या वतीने माफी मागितल्याबद्दल. आपली चुक कबूल करणं फार कठीण असतं.

तसंही वयाने वाढलेली म्हणून मोठी झालेली माणसंही एखाद्याला ’जाड’ म्हणून चिडवतात, काहीतरी खोचक बोलतात (त्यांच्यादृष्टीने ’विनोद’ म्हणून.) तेव्हा त्या व्यक्तिच्या मनाचा विचार का करत नाहीत हा प्रश्न पडतो नेहमी मला.

अप्रतीम लिखाण, एकदम परिणामकारक, वातावरणाशी जवळून ओळख नसताना देखिल मनाला भिडले.
'काळ्या ढगाची सोनेरी किनार'वाला शेवटही आवडला

मोहना,
हे घटना खरंच दु:खदायक आहे.
पण मला ईथे बुलिंग पेक्षाही लो सेल्फ-एस्टीमचा प्रश्न मोठा वाटतो. पालकांच्या कायम सबमिसिव भुमिकेमुळे (ज्याला संस्कृती, संस्कार, ईमिग्रेशन अश्या बर्‍याच गोष्टी कारणीभूत आहेत) कळत्या/नकळत्या वयात अमिताचा सेल्फ एस्टीम दुविधेत सापडला. घरात तो efferent होतोय तर बाहेर afferent. पालकांना हे जाणवायला हवे होते आणि त्यांनी त्यासाठी पावलं ऊचलायला हवी होती हेही खरे आहे.

Pages