एस्केप फ्रॉम डाऊन अंडर - ५ (अंतिम)

Submitted by स्पार्टाकस on 20 January, 2014 - 20:43

 
एस्केप फ्रॉम डाऊन अंडर ही लेखमाला आज संपली. ही लेखमाला प्रकाशीत करु दिल्याबद्दल मायबोली प्रशासनाचा मी मनापासून आभारी आहे.

दुस-या महायुध्दात अनेक साहसगाथा गाजल्या. त्यापैकीच एक असलेली ही यूएस्एस् टँगची कहाणी आपल्याला कशी वाटली हे जरुर कळवा.

****************************************************************************************************************************

टँगमधून वाचलेले नऊजण आता जपान्यांच्या कैदेत पडले होते.

पी-३४ च्या डेकवर पाच दिवस त्यांना रोज मारहाणीला सामोरं जावं लागत होतं. त्यांच्या पाणबुडीची माहीती काढून घेण्यासाठी त्यांचे अनन्वीत हाल करण्यात येत होते. रिचर्ड ओ'केनच्या सूचनेवरुन त्यांनी फक्तं पाणबुडीचं नाव जपानी अधीका-यांना सांगीतलं, परंतु पाणबुडीवरील शस्त्रास्त्रं, कोड संदेश आणि पाणबुडी बुडालेली नेमकी जागा जपान्यांना सांगण्यास त्यांनी साफ नकार दिला.

पाच दिवसांनी पी-३४ तैवान बंदरात पोहोचली. बंदरात उतरल्यावर सर्वांना एका ट्रकवर चढवण्यात आलं आणि सर्व शहरातून त्यांची धिंड काढण्यात आली. आजूबाजूचे जपानी सैनीक आणि नागरिक त्यांना उद्देशून कुत्सीत भाषेत ओरडा-आरडा करत होते. मधूनच एकादा सैनीक त्यांना ठोसे लगावत होता.

दिवसभर शहरातून धिंड काढल्यावर रात्री त्यांना एका तुरुंगात नेण्यात आलं. तिथल्या जपानी अधिका-यांनी त्यांची उलटतपासणी घेण्यास सुरवात केली. विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही की लाथांचा प्रसाद ठरलेलाच होता. अधून-मधून एक जपानी अधिकारी आपली तलवार उपसून त्यांना शिरच्छेद करण्याची धमकी देत होता. रात्रभर त्यांची चौकशी आणि मारहाण सुरू होती.

सकाळ होताच त्यांना एका ट्रकमध्ये भरुन रेल्वे स्टेशनवर नेण्यात आलं आणि रेल्वेने फार्मोसा बेटाच्या पार दुस-या टोकाला असलेल्या किरुन बंदरात नेण्यात आलं. संध्याकाळी उशीरा तिथे असलेल्या जुन्या पोर्तुगीज तुरूंगात त्यांची रवानगी करण्यात आली.

काही दिवस त्या तुरूंगात काढल्यावर त्यांची रवानगी जपानच्या मुख्य भूमीवर करण्यात आली. तिथे अ‍ॅडमिरल दर्जाच्या एका अधिका-याने त्यांची चौकशी केली, परंतु त्यांना अत्यावश्यक असलेले कोरडे कपडे आणि बूट देण्याची विनंती त्याने धुडकावून लावली. त्यानंतर जपानमधील प्रमुख औद्योगीक शहर असलेल्या योकोहामाच्या दिशेने पुन्हा रेल्वेचा प्रवास सुरु झाला.

योकोहामाला पोहोचल्यावर एका धुळीने माखलेल्या रस्त्यावरुन एका बसने त्यांची रवानगी एका खास तुरूंगात करण्यात आली.

ऑफूना !

टॉर्चर फार्म !

जपानी मिलीटरी इंटेलीजन्सचा हा खास तुरूंग होता. जिनेव्हा करारातील सर्व तरतुदी धाब्यावर बसवून जपान्यांनी या तुरुंगाची निर्मीती केलेली होती. युध्दकैद्यांना मिळणा-या कोणत्याही सवलती या तुरूंगातील कैद्यांना देण्यात येत नव्हत्या.

जपानी अधिका-यांच्या मतानुसार जपानी नौदलातील ९०% सैनीक हे सामान्य नागरीक होते, त्यामुळे त्यांच्याविरुध्द लढताना पकडलेल्या अमेरिकनांना जपानी युध्दकैदी मानतच नव्हते ! त्यांच्यादृष्टीने पकडलेले सैनीक हे घातकी गुन्हेगार होते. त्यातच टँगवरील वाचलेल्या नौसेनीकांचा जीव अधिकच धोक्यात होता. जपानी अधीकारी त्यांना उघडपणे सांगत,

" समुद्रात बुडालेल्या पाणबुडीतून कोणीच कधी वाचत नाही. आम्ही तुम्हांला खलास करून फेकून देऊ ! कोणाला पत्ताही लागणार नाही !"

टँगमधून वाचलेल्यांनी पाणबुडीविषयी बेधडक थापा मारण्याचं सत्रं आरंभलं होतं. परंतु त्यांची थापेबाजी एकदा त्यांच्या अंगाशी आली.

रिचर्ड ओ'केनची चौकशी सुरू होती. ओ'केन पाणबुडीचा कमांडर असल्याने त्याला पाणबुडीच्या एकंदर संरचनेची आणि शस्त्रास्त्रांची संपूर्ण माहीती असणार याची जपानी अधिका-यांना पक्की खात्री होती.

" तू किती वेळा पाणबुडी घेऊन मोहीमेवर गेला होतास ?" चौकशी अधिका-याने ओ'केनला विचारलं.
" पाच वेळा !" ओ'केन उत्तरला.
" किती जपानी बोटी बुडवल्यास ?"
" पाच मोहीमांत मिळून एकूण पाच !" ओ'केनने दडपून सांगीतलं.
" अस्सं ?" जपानी अधिकारी कुत्सीतपणे हसला, " कमांडर ओ'केन फक्त पाच बोटी बुडवल्यावर अमेरिकन अध्यक्षांचं खास पदक ( प्रेसीडेन्शीयल युनिट साईटेशन ) मिळतं वाटतं ?"

जपान्यांचं सर्वात जास्तं नुकसान करणारी पाणबुडी म्हणून टँगला अमेरिकन अध्यक्षांचं खास पदक ( प्रेसीडेन्शीयल युनिट साईटेशन ) जाहीर झालं होतं. जपान्यांना त्याचा नेमका पत्ता लागला होता.

रिचर्ड ओ'केनला बेशुध्द पडेपर्यंत मारहाण करण्यात आली !

अमेरिकन नौदलाने टँग युध्दात गमावल्याचं १९४४ च्या नोव्हेंबर महिन्यात जाहीर केलं.

टँगमधील नौसेनीकांच्या कुटुंबियांवर दु:खाची कु-हाड कोसळली !

टँगच्या पहिल्या चार मोहीमांत एक्झीक्युटीव्ह ऑफीसर असलेल्या मरे फ्रेजीला टँग बुडाल्याची बातमी मिळाली तेव्हा तो हवाईत पर्ल हार्बर इथे कार्यरत होता. जपानी संदेशांची फोड करणा-या एका गुप्तहेराकडून टँग सागरतळाला गेल्याची खात्रीलायक बातमी त्याला मिळाली होती. त्याचवेळी टँगवरील रिचर्ड ओ'केनसह नऊ नौसेनीक वाचल्याचं आणि जपान्यांचे युध्दकैदी असल्याचंही त्याला खात्रीपूर्वक कळलं होतं !

फ्रेजीने ओ'केनच्या पत्नीला ही बातमी द्यावी असा विचार केला, परंतु पूर्ण विचाराअंती अखेर त्याने युध्द संपेपर्यंत वाट पाहण्याचा निर्णय घेतला. टँगवरील वाचलेल्या नौसेनीकांची बातमी अमेरिकेत पोहोचल्याचं जपान्यांना समजल्यास ते आपले गुप्त संदेश देणारे कोड बदलण्याची शक्यत होती. युध्दाच्या अंतिम टप्प्यात तसं होऊ देणं हे अमेरिकेला परवडणारं नव्हतं. त्यामुळे मनावर ताबा ठेवून फ्रेजीने आपलं तोंड बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.

टँगमधील वाचलेल्या नऊजणांना आपल्या कुटुंबियांच्या काळजीने ग्रासलं होतं. वाचलेल्या नऊपैकी सात जण विवाहीत होते. पीट नेरॉवन्स्कीचा घटस्फोट झाला होता. त्याला चार वर्षांची मुलगी होती.

६ ऑगस्ट १९४५ ला जपानला हादरवणारा पहिला अणुबाँब हिरोशीमावर पडला ! पाठोपाठ ९ ऑगस्टला दुस-या अणुबाँबने नागासाकीची राखरांगोळी केली.

दोन अणुबाँबने झालेल्या मनुष्यहानीमुळे हादरलेल्या जपानने अखेर शरणागती पत्करली.

२ सप्टेंबर १९४५ रोजी टोकीयो बे मध्ये यूएस्एस् मिसूरी या बोटीच्या डेकवर दोस्त सैन्याचा पॅसिफीकमधील सर्वोच्च सेनापती जनरल डग्लस मॅकआर्थरने जपान सरकारची शरणागती स्वीकारली.

टँगमधील वाचलेल्या नऊजणांची लवकरच अमेरिकेला रवानगी करण्यात आली. पर्ल हार्बरमध्ये अ‍ॅडमिरल निमीट्झ आणि वाईस अ‍ॅडमिरल लॉकवूड स्वतः त्यांच्या स्वागताला हजर होते !

कमांडर रिचर्ड ओ'केन आपल्या कुटुंबात परतला. त्याच्या पत्नीने आणि कुटुंबियांनी संपूर्ण युध्दात त्याच्या परतण्याची आशा सोडली नव्हती !

पीट नेरॉवन्स्की आपल्या घरी परतला ! त्याच्या आईवडिलांना आणि चार वर्षांच्या मुलीला त्याला पाहून काय बोलावं तेच सुचेना !

फ्लॉईड कॅव्हर्ली सॅन फ्रान्सिस्कोला परतला. काही दिवसांतच त्याची आपली पत्नी लिऑन आणि मुलीशी गाठ पडली ! घरी परतल्यावर तीन दिवसांनी त्याला त्याच्या इन्शुरन्स कंपनीकडून हजार डॉलर्सचा चेक आला ! कॅव्हर्लीने चेक परत पाठवला आणि लिहीलं,

" आणखीन काही वर्षांनी प्रयत्न करा ! सध्या तरी मी जिवंत आहे !"

बिल लेबॉल्डची पत्नी ग्रेस लॉस अँजलीसमध्ये नोकरी करत होती. बिल परतल्याची बातमी तिला कळल्यावर तिचा प्रथम विश्वासच बसेना ! स्वतः बिलशी फोनवर बोलणं झाल्यावर तिची खात्री पटली ! एक दिवस संध्याकाळी ती कामावरुन घरी परत आली तेव्हा घराच्या पाय-यांवर वाट पाहत असलेला बिल तिला भेटला !

जेम्स डी'सिल्वाच्या पत्नीचं तीन वर्षांपूर्वी निधन झालं होतं. त्याची दोन्ही मुलं पाणबुडीवर कामाला होती ! जेसी डी'सिल्वा नाहीसा झाल्याची बातमी आल्यावर जेम्सवर दु:खाचा डोंगर कोसळला होता. जेसीच्या भावाची - जिमचीही त्यांना सतत काळजी वाटत होती. एका सकाळी जेसी सुखरुप परतल्याची बातमी फोनवर कळल्यावर जेम्सचा प्रथम विश्वास बसेना ! जेसीला प्रत्यक्ष समोर पाहील्यावर त्यांना खात्री पटली !

क्लेटन डेक्करची आपली पत्नी ल्युसी आणि मुलगा हॅरीशी झालेली भेट मात्र तणावपूर्ण होती. क्ले युध्दात मरण पावला या कल्पनेने ल्युसीने पुन्हा लग्नं केलं होतं ! हे ऐकल्यावर डेक्कर विलक्षण निराश झाला. काही दिवसांनी स्वतःला सावरत त्याने मुलाचा ताबा मिळवला आणि त्याने कोलोरॅडो गाठलं. पुढच्या वर्षी डेक्करची अ‍ॅन नावाच्या तरूणीशी गाठ पडली. लवकरच त्यांनी लग्न केलं.

लॅरी सॅव्ह्डकीनच्या पत्नीनेही दुसरा संसार मांडला होता. सॅव्ह्डकीनने तिच्याशी घटस्फोट घेऊन दुसरं लग्नं केलं. नौदलातील नोकरी मात्रं त्याने सोडली नाही.

हँक फ्लॅगननने अमेरिकेत परतल्यावर आपल्या पत्नीपासून घटस्फोट घेतला. जपानी कारावासात असताना त्याला सर्वात वाईट वागणूक मिळाली होती. बंडखोर वृत्तीमुळे जपान्यांनी त्याचे सर्वात जास्त हाल केले होते.

हेस ट्रकच्या गर्लफ्रेंडने तो जपानी बंदीवासात असताना लग्नं केलं होतं. परतल्यावर काही महिन्यांनी ट्रक एका अपघातग्रस्त विमानातून पायलटला बाहेर पडण्यास मदत करत असताना त्याच्या वरिष्ठ अधिका-याशी त्याचा वाद झाला. त्याने नौदलातून बाहेर पडून लॉस अँजलीस पोलीस खात्यात नोकरी पत्करली.

२७ मार्च १९४६ रोजी वॉशींग्टनमध्ये एका खास समारंभात अध्यक्ष हॅरी ट्रूमन यांनी टँगवरील नौसेनीकांना शौर्यपदकं बहाल केली.

रिचर्ड ओ'केनला सैनीकाला देण्यात येणारा सर्वोच्च सन्मान - मेडल ऑफ ऑनर देण्यात आला.
लॅरी सॅव्ह्डकीनला नेव्ही क्रॉस देण्यात आला. फ्रँक स्प्रिंगरही मरणोत्तर नेव्ही क्रॉसचा मानकरी ठरला.
फ्लॉईड कॅव्हर्ली, जेसी डी'सिल्वा, हेस ट्रक, हँक फ्लॅगनन, पीट नेरॉवन्स्की, क्लेटन डेक्कर आणि बिल लेबॉल्डला सिल्वर स्टार्सनी गौरवण्यात आलं.

टँगमधील मरण पावलेल्या इतर तेरा नौसेनीकांनाही मरणोत्तर शौर्यपदकं जाहीर करण्यात आली. यात मेल एनॉस, जॉन ह्यूबेक, जॉर्ज झॉफ्कीन आणि पॉल लार्सनचा समावेश होता. त्याखेरीज टँगला दुस-यांदा अध्यक्षांचं विशेष पदक ( प्रेसीडेन्शीयल युनिट साईटेशन ) बहाल करण्यात आलं !

टँगमधून वाचलेल्यांपैकी हॅंक फ्लॅगनन सर्वप्रथम १९५७ मध्ये मरण पावला. जपानी तुरूंगात झालेला त्याचा अपरिमीत छळ त्याला कारणीभूत होता.

लॉस अँजलीस पोलीसखात्यात नोकरी करणा-या हेस ट्रकचंही युध्दानंतर आयुष्य दु:खातच गेलं. नौदलातून बाहेर पडल्यावर त्याने लग्नं केलं, परंतु आपल्या पाच वर्षांच्या मुलाला गमावण्याची त्याच्यावर पाळी आली. दारुच्या आहारी गेलेल्या ट्रकचा १९८१ मध्ये मृत्यू झाला.

रिचर्ड ओ'केन अ‍ॅडमिरल पदावरुन निवृत्त झाला. निवृत्तीनंतर काही वर्ष त्याने आरामात आपल्या रँचवर घालवली. १९९४ मध्ये न्युमोनियाने त्याचं निधन झालं.

ज्या दिवशी ओ'केन मरण पावला त्याच रात्री पीट नेरॉवन्स्कीने झोपेतच जगाचा निरोप घेतला ! क्ले डेक्कर म्हणतो,

" पीटची ती नेहमीची सवय होती ! कमांडरच्या सावलीसारखा तो त्याच्यापाठी जात असे !"

जेसी डि'सिल्वाला कॅन्सरने गाठलं. १९९८ मध्ये त्याचा मृत्यू झाला.

२००० साली रशियन अणुपाणबुडी कर्स्क बेरेंट समुद्रात बुडाली. जगभरातील वार्ताहरांनी टँगमधील वाचलेल्या नौसेनीकांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला. क्ले डेक्कर म्हणतो,

" त्या पाणबुडीतील लोकांच्या मनात काय येत असेल याची मी कल्पना करू शकतो !"

कर्स्कमधील ११६ नौसेनीकांपैकी एकही वाचला नाही.

क्ले डेक्करचं २००३ मध्ये निधन झालं.

लॅरी सॅव्हडकीन १९७२ साली नौदलातून निवृत्त झाला. मृत्यूपूर्वी काही वर्षे त्याल स्मृतीभ्रंशाचा ( अल्मायझर ) विकार जडला होता. २००७ मध्ये तो मरण पावला.

फ्लॉईड कॅव्हर्ली जपानहून परतल्यावर नौदलातच होता. निवृत्त झाल्यावर कॅव्हर्ली आपल्या कुटुंबासह ओरेगॉन राज्यातील लहानशा गावी राहू लागला. २०११ मध्ये त्याचं निधन झालं.

टँगमधून वाचलेल्या नऊ जणांपैकी बिल लेबॉल्ड हा एकमेव नौसेनीक अद्यापही हयात आहे !

****************************************************************************************************************************

Tang 02.jpg
१९४३ च्या डिसेंबरमध्ये मेर आयलंड नेव्हल यार्डमध्ये यूएस्एस् टँग

Tang001.jpg
आपल्या दुस-या मोहीमेवरुन परत येताना टँग

O'Kane.jpg
कमांडर रिचर्ड 'डिक' ओ'केन

 
समाप्त

 
एस्केप फ्रॉम डाऊन अंडर - ४

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्पार्टाकस,
ह्या साहसकथेबद्दल अभिनंदन !
"प्रत्यक्षाहुनी प्रतिमा उत्कट !"
खूप कष्ट घेतले असावेत असे दिसते, आभार !
त्यामुळे कमी वेळात एक मोठे पुस्तक वाचण्याचा आनंद मिळाला.
भविष्यकाळात आपले नाव पाहताच क्लिक करण्याचा मोह होईल.

एक वाचनीय अनुभव मिळाला
स्पार्टाकस निव्वळ माहिती न देता रोचक शब्दात मांडलात
त्यामुळे वाचायला मजा आली

कमी वेळात एक मोठे पुस्तक
वाचण्याचा आनंद मिळाला.
भविष्यकाळात आपले नाव पाहताच क्लिक
करण्याचा मोह होईल.>>>>>+1111

पुलेशु

अप्रतिम थरारक साहसकथा.. सुरवातीला अनुवाद आहे की काय असं वाटलं होतं. तुमची लिखाणाची शैली छान आहे. वाचतांना पुढे काय होईल याची सतत उत्कंठा होती.

लेखन खरच छान आहे.
सर्व तांत्रिक बाजू व्यवस्थितपणे मांडल्या गेल्या आहेत.
लेख अमेरिकन बाजूने(च) लिहिलेला आहे.
अ‍ॅज इफ टँग ने जो उत्पात केला तो समर्थनियच होता.
आणि तो करायलाच हवा होता अशी काहीशी मांडणी आहे.
आणि त्यामुळेच हे लेखन आहे की रुपांतरण असा प्रश्न निर्माण झाला आहे.
(की सरळ सरळ भाषांतर आहे? भाषांतर केले नसावे अशी भाबडी आशा आहे.)

त्यामुळे मूळ इष्टोरीचा आणि लेखकाचाही काही संदर्भ वैग्रे?

जॉभा,
या लेखमालेचा मूळ हेतू टँगने दुस-या महायुध्दात केलेला जपानी बोटींचा संहार नसून बुडालेल्या पाणबुडीतून निसटण्याची कथा मांडणं हा आहे. टँगने आपल्या पहिल्या चार मोहीमांत केलेला जपानी बोटींचा संहार याच हेतूने टाळला आहे. जपानी नौसेनीकांना खलनायक म्हणून रंगवण्याचा जाणिवपूर्वक प्रयत्न केलेला नाही. याच हेतूने पुढे ओ'केन आणि लॅरी सॅव्ह्डकीनने जपानी अधिका-यांविरुध्द खटल्यात दिलेल्या साक्षीचा उल्लेख टाळला आहे. हे भाषांतर नाही. अन्यथा स्पष्ट उल्लेख केला असता.

स्पार्टाकस हे तुम्ही कशावरही बेतलेले नसेल तर निश्चितच ग्रेट लिखाण म्हणेन.
(पण का कुणास ठाऊक हे स्वलेखन वाटत नाहीये. परत वाचल्यावरही लिखाण कशावर तरी आधारीत असल्याचा भास तसाच आहे. तसे नसेल तर मात्र तुमच्या लेखनाला मानले.)

खरोखर सिद्धहस्त लेखक आहात स्पार्टाकस तुम्ही ......... ग्रेट, ग्रेट आणि केवळ ग्रेट लिखाण ....

मनापासून धन्यवाद आणि अनेकानेक शुभेच्छा .......

सर्वांचे मनापासून आभार..!
इन्ना,
पुढे नक्की काय लिहीन याची आता मला स्वत:लाही कल्पना नाही. wink.gif

आवडलाच अनुवाद.

स्पार्टाकस, गेल्या तीन कथांमधून तुम्ही benchmark फारच वर सेट केला आहेत. पुढील गोष्टीच्या प्रतिक्षेत. लवकर पोस्टा..

लेखक - स्पार्टाकस म्हणताहेत कि हा अनुवाद/भाषांतर नाही. तरीही, जॉभा म्हणताहेत तसे लिखाण कशावर तरी आधारीत असल्याचा भास तसाच आहे.
असो. केवळ अप्रतिम लेखमालिका. त्यानिमीत्ताने काही नविन वाचायला मिळाले, हे ही नसे थोडके.

कमी वेळात एक मोठे पुस्तक
वाचण्याचा आनंद मिळाला.
भविष्यकाळात आपले नाव पाहताच क्लिक
करण्याचा मोह होईल.