एकांत (बालविक्रिडीत वृत्त)

Submitted by संतोष वाटपाडे on 20 January, 2014 - 09:57

काढत बसते जुनाट कपडे कपाटातले,
गोंडस झबले विजार इवली जरी फ़ाटले...
लाजत पहिला खट्याळ गजरा हळू पाहते,
रेशम लुगडी कधी पसरते घड्या घालते....

गोल वळकटी निखार भरल्या तरी खोलते,
पत्रविवरणे मला खरडली पुन्हा मोजते....
पान निसटले कुठून जरका तिथे खोचते,
खंगत पडल्या उदास कविता कधी वाचते,

आठव सगळे जमून मजला उगा टोचती,
थेंब निथळते भकास नयनी सदा वाहती...
रोज गवसते जरी कवडसा भुयारात मी
खोदत हसते मनात दडली जुनी खाण मी....

भग्न तसविरी विराण पुसते दिसाया जरा,
हार बदलते कृत्रिम पिवळा जसा की खरा .....
बांधव नवरा मुले विलगली अनायास का,
आत तडपण्या उरात उरले अता श्वास का.....

क्षोभ पसरला अचानकच जीवनी एवढा
सुखात मरण्या अजून अवधी उरे केवढा..
तेवत पणती घरात असते बिछान्यावरी,
रोज शिकवते कसे तळपणे शहाण्यापरी

जोवर भरले कपाळ असते बरे वाटते,
सोबत सरता मनात भलती भिती दाटते....
पाय उचलता पुढे सरकण्या कसा थांबतो,
घे मज धरणी कुशीत तुझिया तीला सांगतो.....

-- संतोष वाटपाडे (नाशिक)

Group content visibility: 
Public - accessible to all site users


मस्त .

मस्त कविता. कविताभर व्यापून राहिलेला भकासपणा मनाला हलवून जातो! प्रसंग उभा राहिला डोळ्यांसमोर...

आवडली कविता.
"रोज गवसते जरी कवडसा भुयारात मी" इथे रोज उमगते असे वाचून पाहिले.
तुझिया तीला सांगतो.....: टायपो.

जोवर भरले कपाळ असते बरे वाटते,
सोबत सरता मनात भलती भिती दाटते....
पाय उचलता पुढे सरकण्या कसा थांबतो,
घे मज धरणी कुशीत तुझिया तीला सांगतो. >> मस्तच..आवडली कविता.

कविता चांगली आहे.

पण
>> बांधव नवरा मुले विलगली अनायास का
हे खटकलं. 'अनायास'चा अर्थ विनासायास असा असतो ना?