सॅव्हेज माऊंटन - ६

Submitted by स्पार्टाकस on 5 January, 2014 - 21:46

१ ऑगस्ट

कँप ४ वरील गिर्यारोहकांची अंतिम चढाईच्या दृष्टीने तयारी सुरू होती. ऑक्सीजन सिलेंडर्स, रेग्युलेटर, पाणी, आवश्यक ते खाणं, कॅमेरे आणि सॅटेलाईट फोन यांची जुळवाजुळव करण्यात प्रत्येक मोहीमेतील गिर्यारोहक व्यस्त होते. बेस कँपमध्ये ठरलेल्या बेतानुसार पहिली तुकडी मध्यरात्रीनंतर १.३० च्या सुमाराला चढाईसाठी निघणार होती. मात्र चढाईला सुरवात करण्यापूर्वीच सर्बीयन मोहीमेतील अनुभवी आणि २००४ मध्ये शिखरावर चढाई केलेला पोर्टर शाहीन बेगला बेस कँपवर परतावं लागलं. बेगला रक्ताची उलटी झाली होती !

शाहीन बेगच्या अनुभवाची कमी किती जाणवणार होती ?

रात्री २.००

पाकीस्तानी पोर्टर आणि चिरींग दोर्जे, पेम्बा गाल्जे हे शेर्पा अंतिम चढाईसाठी दोर बांधण्याच्या मोहीमेवर आघाडीवर निघाले. एकांडा स्पॅनीश बसाक गिर्यारोहक अल्बर्टो झरीन रात्री १.३० वाजता कँप ४ वर पोहोचला होता. मात्रं अ‍ॅब्रझी स्पर आणि सेसन मार्गावरून चढाई करणा-या गिर्यारोहकांची गर्दी टाळण्यासाठी लगेच शिखरावर अंतिम चढाईसाठी निघण्याचा त्याचा बेत होता ! कँप ४ वरुन पोर्टर आणि शेर्पांचा गट निघालेला पाहताच झरीन त्यांच्यात सामील झाला.

कँप ४ पासून काही अंतरावर असतानाच झरीनच्या पुढे असलेल्या दोन पोर्टरनी सुरक्षा दोर बांधण्यास सुरवात केली. खरंतर इथे अद्यापही ब-यापैकी सपाटी होती, त्यामुळे सुरक्षा दोराची अजिबात गरज भासणार नव्हती. झरीन पार गोंधळला होता. मात्रं कोणताही आक्षेप न घेता तो त्यांना दोर बांधण्यास मदत करू लागला. कदाचित आपल्या तुकडीतील गिर्यारोहकांच्या कौशल्याबद्दल त्या पोर्टरना शंका असावी.

पहाटे ३.००

झरीन आणि पोर्टर-शेर्पा एव्हाना बरेच पुढे गेलेले होते. किम जे सू च्या कोरीयन मोहीमेतील गिर्यारोहकांची दोन गटांत विभागणी करण्यात आली होती. त्यापैकी पहिला गट शिखराच्या मार्गाला लागला होता. त्यांच्यापाठी सर्बीयन तुकडीतील गिर्यारोहक होते. पाठोपाठ सेसील स्कॉग, रॉल्फ बेई आणि लार्स फ्लॅटो नासा होते. ऑयस्टीन स्टँगलँड कँप ४ वर पोहोचला होता, पण प्रचंड थकव्यामुळे त्याने शिखरावर चढाई न करता विश्रांती घेण्याचा मार्ग पत्करला होता. त्यांच्या पाठी विल्को वॅन रुजेनची डच मोहीम आणि ह्युजेस डी'ऑब्रेड आणि त्याचा पोर्टर मेहेरबान करीम होते. मार्को कन्फर्टोलाही शिखराच्या मार्गाला लागला होता. सर्वात शेवटी अमेरिकन मोहीमेतील शेर्पा चिरींग दोर्जे आणि इतर गिर्यारोहक होते.

मार्टीन वॅन एकच्या वेबसाईटवर बातमी झळकली,
" विल्को, कॅस आणि जेरार्ड्ची के २ च्या शिखराच्या दिशेने अंतिम चढाईस सुरवात !"

पहाटे ५.००

अल्बर्टो झरीन आणि त्याच्याबरोबर असलेली पोर्टर आणि शेर्पांची तुकडी सुरक्षा दोर बांधत एव्हाना बॉटलनेकच्या पायथ्याशी पोहोचली होती. एव्हाना सूर्योदय झाला होता. उगवत्या सूर्याच्या प्रकाशात के २ च्या परिसरात असलेली ब्रॉड पीक, गशेर्ब्रम १ आणि २, नंगा पर्वत, माशेर्ब्रम आणि इतर गिरीशिखरं उजळून निघत होती. मात्र के २ समोर ती शिखरं कितीतरी लहानखुरी भासत होती. काही वेळ विश्रांती घेतल्यावर झरीनने पुढची वाट पकडली.

सकाळी ६.३०

गिर्यारोहकांच्या गर्दीत अम्रेरिकन तुकडीतील फ्रेड्रीक स्ट्रँग, क्रिस क्लि़क आणि एरिक मेयर सर्वात मागे होते. सकाळच्या उजेडात बॉटलनेकचं दर्शन होताच ते थक्क होऊन पाहत राहिले. छाती दडपून टाकणारा तो उतार आणि त्याच्या माथ्यावर उभे असलेले ते हिमखंड ( सीरॅक ) पाहून ते भारावले होते. मात्रं शिखरावर जाण्यासाठी त्या हिमखंडांच्या सावलीतून जाण्यास पर्याय नव्हता.

त्याच वेळी एरिक मेयरच्या अनुभवी नजरेस धडकी भरवणारं एक दृष्य दिसलं !

बॉटलनेकच्या वर असलेल्या सीरॅक मधून लहान-लहान बर्फाचे पुंजके खाली घसरत होते ! कधी ना कधीतरी सीरॅकचा भाग कोसळणार होता !

सकाळी ८.००

अल्बर्टो झरीनने एव्हाबा बॉटलनेकचा ट्रॅव्हर्स ओलांडला होता ! काही क्षण थांबून त्याने आजूबाजूच्या परिसराचं निरिक्षण केलं आणि बॉटलनेकमधून चढाई करणारी तीव्र उताराची वाट धरली.

झरीनच्या पाठोपाठ पोर्टर आणि शेर्पा पेम्बा आणि चिरिंग दोर्जे सुरक्षा दोर बांधत झपाट्याने चढाई करत होते. मात्रं त्यांच्या पाठी असलेल्या कोरीयन तुकडीतील गिर्यारोहक अनेकदा वाटेत विश्रांतीसाठी थांबत होते. त्यांना ओलांडून पुढे जाण्याचा मार्ग नसल्याने सर्वांनाच थांबून राहण्यापलीकडे पर्याय नव्हता !

त्यातच एक नवीन समस्या उभी राहिली होती.

पोर्टर आणि शेर्पांकडे असलेला सुरक्षा दोर संपला होता !

बेस कँपवर असताना झालेल्या मिटींगमध्ये ठरल्याप्रमाणे प्रत्येक मोहीमेतील गिर्यारोहकांनी अंतिम चढाईसाठी लागणारी सामग्री पुरवण्याचं ठरलं होतं. मात्रं कोणीतरी चुकारपणा केला होता ! तसंच कँप ४ पासून काही अंतरावरच असताना आवश्यकता नसतानाही सुरक्षा दोर बांधल्यामुळे आता बॉटलनेकच्या तीव्र उतारांवर बांधण्यासाठी दोर उपलब्ध नव्हता !

शाहीन बेगच्या अनुभवाची कमी अजून कधी जाणवणार होती ?

बॉटलनेकच्या ट्रॅव्हर्स मधून कधीही खाली झेपावण्यास तयार असलेल्या सीरॅक समोरून लवकरात लवकर पार होणं अत्यावश्यक असताना नेमक्या त्याच ठिकाणी गिर्यारोहक अडकून राहीले होते !

सर्बीयन मोहीमेतील पाकीस्तानी पोर्टर मोहम्मद खानने बॉटलनेकमधून वर चढाई करण्यास नकार दिला ! पाठीवरची सामानाची बॅग बर्फात टाकून त्याने सरळ परतीची वाट धरली !

गिर्यारोहकांच्या माळेच्या शेवटी असलेल्या स्ट्रँग आणि मेयरने सर्व परिस्थितीचा विचार केला. आतापर्यंत झालेला उशीर पाहता बॉटलनेकमधून पार झाल्यावरही शिखरावर पोहोचण्यास किमान दुपारचे ४.०० वाजणार होते. शिखरावरून परत खाली येताना अंधारात बॉटलनेक उतरावं लागणार होतं ! तसंच वरच्या सीरॅकमधून सुरू झालेल्या बर्फाच्या गळतीचीही काळजी होतीच.

पूर्ण विचाराअंती स्ट्रँग, मेयर आणि क्रिस किन्कल यांनी परत फिरण्याचा निर्णय घेतला !

सकाळी १०.३०

अल्बर्टो झरीन सुरक्षा दोराविना चढाई करून बॉटलनेकच्या माथ्यावर पोहोचला होता !

त्याच्या पाठोपाठ असलेले पोर्टर आणि शेर्पा मात्र सुरक्षा दोर बांधल्याविना वर जाण्यास तयार नव्हते. मागून येणा-या गिर्यारोहकांच्या सुरक्षेसाठी दोर बांधणं अत्यावश्यक होतं. झरीनच्या पाठीवरच्या बॅगेत १५० मी दोर होता, पण शेर्पा आणि पोर्टरकडून त्याला खालून दोराची व्यवस्था होत असल्याचं कळल्यामुळे तो वाट पाहत बसून होता !

बॉटलनेकच्या माथ्यावर जाणा-या घळीच्या तोंडाशी ड्रेन मँडीक एका दगडावर बसून राहीला होता. त्याच्या पुढे आणि मागे गिर्यारोहकांची रांग लागली होती. सुरक्षा दोर संपल्यामुळे काय करावं हे कोणालाच समजत नव्हतं.

गिर्यारोहकांच्या रांगेत अडकलेल्या विल्को वॅन रूजेनचा संयम एव्हाना संपला होता. त्याचा आक्रमक स्वभाव उफाळून आला.

" काय चाललं आहे ? लवकर चला ! वाटेत थांबू नका !"

रुजेनने सुरक्षा दोर सोडला आणि बर्फावरुन चढाईला सुरवात केली ! वाटेत भेटलेल्या प्रत्येक गिर्यारोहकाला तो आपण या मोहीमेसाठी किती मेहनत घेतली आहे आणि खर्च केला आहे हे ओरडून सांगत होता !

गिर्यारोहकांना ओलांडून पुढे जाण्याच्या नादात रुजेनचा पाय घसरला आणि तो सर्बीयन गिर्यारोहक प्रेड्रॅग झॅगोरॅक इसो प्लॅनीक वर आदळला ! रुजेनच्या क्रम्पॉनमुळे प्लॅनीकच्या जॅकेटची बाही फाटून निघाली होती आणि त्याच्या दंडाला जखम झाली होती ! प्लॅनीकच्या पाठीच असलेल्या शेर्पाने रुजेनचं जॅकेट पकडल्यामुळे तो खाली कोसळण्यापासून वाचला होता !

एव्हाना सुरक्षा दोराची समस्या सुटली होती ! बॉटलनेकच्या खालच्या उतारांवर बांधलेला सुरक्षा दोर सोडवून गिर्यारोहकांनी आघाडीवर असलेल्या पोर्टर आणि शेर्पांकडे पोहोचवला होता ! दोर बांधला जाताच इतका वेळ एका ठिकाणी अडकलेला गिर्यारोहकांचा जथ्था अखेरीस हलू लागला !

Bottleneck 1 - Mace.jpeg
बॉटलनेकचा तीव्र उताराचा ट्रॅव्हर्स.

2008 K2 - 1.jpg
बॉटलनेक मधून चढाई करणारे गिर्यारोहक

ड्रेन मँडीकने प्लॅनीक आणि रुजेनची झालेली टक्कर पाहीली होती. प्लॅनीक गिर्यारोहकांच्या रांगेतून बाजूला झाला होता आणि आपला ऑक्सीजन सिलेंडर बदलण्याच्या बेतात होता. मँडीकने प्लॅनीक वर पोहोचेपर्यंत बाजूला थांबण्याचा विचार केला पण तो पर्यंत सेसील स्कॉग आणि रॉल्फ बेई त्याच्या पाठी येऊन पोहोचले होते.

स्कॉगच्या पाठीवर असलेल्या सॅकमधून तिला ऑक्सीजन सिलेंडर हवा होता. मँडीकने तिला मदत करण्याची तयारी दर्शवली. सुरक्षा दोरापासून आपलं कॅराबिनर मोकळं करुन त्याने स्कॉगच्या बाजूला एक पाऊल टाकलं. स्कॉग पुढे सरकली. तिला पुढे जाऊ देण्यासाठी त्याने आणखीन एक पाऊल बाजूला टाकलं आणि...

... मँडीकचा तोल गेला !

पाय घसरून तो थेट सेसील स्कॉगवर आदळला ! अनपेक्षीतपणे मँडीक आपटल्यामुळे स्कॉगचा तोल गेला आणि दोघंही बॉटलनेकच्या ३०० फूट उतारावर घसरले ! मात्रं जेमतेम तीन फूट घसरल्यावर सुरक्षा दोराशी संलग्न असल्याने स्कॉगची घसरगुंडी थांबली ! ती सुरक्षीत होती !

आ SS वासून पाहत असलेल्या इतर गिर्यारोहकांच्या बाजूने वेगाने घसरत मँडीक बॉटलनेकच्या ३०० फूट उतारावर दिसेनासा झाला !

" ड्रेन !"

प्लॅनीक खाली कोसळणा-या मँडीककडे हादरून पाहत राहिला ! सुमारे चारशे फूट घसरल्यावर मँडीकचा देह स्थिरावला. मात्रं काही क्षणातंच मँडीक उठून उभा राहिला ! प्लॅनीकने सुटकेचा नि:श्वास टाकला ! सुदैवाने मँडीकला कोणतीही दुखापत झालेली दिसत नव्हती !

पुढच्याच क्षणी मँडीक तोल जाऊन पुन्हा घसरला ! यावेळी सुमारे तीनशे फूट ! अवाक् होऊन प्लॅनीक पाहत असतांनाच इतर गिर्यारोहकांचा ओरडा-आरडा त्याच्या कानावर आला.

" त्याचा पाय हलतो आहे ! तो जिवंत आहे !"

तत्क्षणी प्लॅनीकने मँडीकच्या दिशेने खाली उतरण्यास सुरवात केली ! कोणत्याही परिस्थितीत आपल्या मित्रापर्यंत पोहोचणं हा एकच विचार त्याच्या मनात होता !

सुमारे पंधरा मिनीटांतच प्लॅनीक मँडीकपाशी पोहोचला. मात्रं त्याची अवस्था पाहून त्याला भोवळ येण्याचंच बाकी राहिलं होतं ! मँडीकचं डोकं दगडावर आपटलं होतं. त्याच्या डोक्यातून रक्ताची धार लागली होती. प्लॅनीकने धीर धरुन त्याला पाठीवर निजवलं आणि श्वास देण्याचा प्रयत्नं करु लागला.

मँडीकची त्वचा अद्यापही गरम लागत होती. त्याचा श्वास सुरु होण्याची काही क्षण वाट पाहून प्लॅनीकने पुन्हा त्याला श्वास देण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी त्याच्या नाडीचे ठोके तपासण्याचा तो आकांती प्रयत्न करत होता.

ड्रेन मँडीकने दगडावर आपटताक्षणीच प्राण सोडला होता !
के २ वरील मृत्यूसत्रात पहिली आहुती पडली !

प्लॅनीकच्या पाठोपाठ मिओड्रॅक जोकोविच आणि मोहम्मद हुसेन प्लॅनीकजवळ पोहोचले होते. मँडीक मरण पावलेला पाहून जोकोविचला अश्रू आवरेनात ! काय करावं या विचारात ते असतानाच प्लॅनीकने रेडीओवरुन बेस कँपवर असलेल्या मिलीवॉज एर्डेल्जनशी संपर्क साधला.

" खाली उतरुन या !" एर्डेल्जन गरजला, " ताबडतोब खाली उतरा !"

प्लॅनीकने सर्बीयाच्या झेंड्यात मँडीकचा मृतदेह गुंडाळला. त्याच्या कमरेच्या पट्ट्याला त्यांनी सुमारे तीस फूट सुरक्षा दोर बांधला. त्याच्या मृतदेह बेस कँपवर नेण्याचा त्यांचा इरादा होता ! २७००० फूट उंचीवरुन मृतदेह खाली आणणं ही अशक्य कोटीतली गोष्ट होती, पण मँडीकला तिथे सोडण्याची त्यांची तयारी नव्हती !

माघार घेऊन कँप ४ वर पोहोचलेल्या स्ट्रँग, मेयर आणि इटालियन गिर्यारोहक रॉबर्ट मॅनीने मँडीकला झालेला अपघात पाहीला होता. स्ट्रँगने चिरींग दोर्जेशी रेडीओ संपर्क साधला. चिरींगकडून त्याला सर्बीयन गिर्यारोहक खाली कोसळल्याचं कळलं.

" त्याचा पाय अद्याप हलतो आहे !"

चिरींगकडून ही माहीती मिळताच स्ट्रँगने सुटकेच्या दृष्टीने तयारीस सुरवात केली. काही मिनीटांतच तो बॉटलनेकच्या मार्गाला लागला !

दुपारी १२.००

आघाडीवर असलेला अल्बर्टो झरीन बॉटलनेकच्या माथ्यावर तब्बल दोन तास इतर गिर्यारोहकांची वाट पाहत थांबला होता !

चढाईचया दरम्यान दोर बांधताना झरीनने आपला कॅमेरा एका शेर्पाच्या हवाली केला होता. के २ च्या माथ्यावर आपला फोटो काढून घेण्याची त्याची मनीषा होती. परंतु दोर बांधण्यात झालेल्या उशीरामुळे अद्यापही शेर्पा बॉटलनेकच्या माथ्यावर पोहोचलेले नव्हते. त्यातच ड्रेन मँडीकला झालेल्या अपघातामुळे नुकतेच पुढे चढाई करू लागलेले गिर्यारोहक पुन्हा जागच्या जागी थांबले होते !

झरीनने खाली असलेल्या गिर्यारोहकांना हाका मारण्याचा सपाटा लावला.

" कम् ऑन ! लवकर चला ! वरच्या सीरॅक कडे लक्ष असू देत !"

झरीनच्या मागे असलेल्या कोरीयन मोहीमेतील गिर्यारोहकांची प्रगती धीम्या गतीने सुरु होती. वरच्या उतारावर दोर बांधत आणि ऑक्सीजन सिलेंडर बदलण्यासाठी थांबल्यामुळे त्यांना बराच वेळ लागत होत.

अखेर झरीनचा संयम संपला ! कॅमे-याविनाच त्याने शिखराकडे कूच केलं !

ड्रेन मँडीकच्या मृत्यूने हादरलेल्या गिर्यारोहकांना वॅन रूजेन आणि मार्को कन्फर्टोलाने पुढे चलण्यास प्रवृत्त केलं होतं ! सर्बीयन गिर्यारोहक मँडीकसह खाली निघालेले दिसत होते. कँप ४ वरून त्यांच्या मदतीला निघालेला स्ट्रँग आणि त्याच्या पाठी एरिक मेयरही सर्वांना दिसत होते. परतण्याचा निर्णय घेतल्यास सुटकेला अडथळा निर्माण होण्याची शक्यता होती. अर्थात रुजेन आणि कन्फर्टोलाच्या मनात परतीचा विचारही आला नव्हता ! इतर सर्वजणही अनुभवी गिर्यारोहक होते. कधी ना कधी आपल्या सहका-याचा पहाडावर बळी पडल्याचं प्रत्येकाने अनुभवलं होतं !

दुपारी १.००

अल्बर्टो झरीन शिखराच्या मार्गाला लागला होता.

कँप ४ वरून निघालेला फ्रेड्रीक स्ट्रँग एव्हाना मँडीकच्या देहासह खाली उतरणा-या सर्बीयन गिर्यारोहकांशी पोहोचला होता. सर्बीयन गिर्यारोहकांचा मँडीकला बेस कँपवर नेण्याचा विचार ऐकून स्ट्रँग वेड्यासारखा त्यांच्याकडे पाहत राहीला !

स्ट्रँगने मोठ्या मुष्कीलीने त्यांची समजूत घातली. बेस कँपवर मँडीकचा मृतदेह नेणं सर्वस्वी अशक्यं होतं. अखेर कँप ४ वर मँडीकला चिरविश्रांती देण्यास प्लॅनीक आणि जोकोविचने होकार दिला. अर्थात कँप ४ वर मृतदेह नेणंही सोपं नव्हतंच ! ते बॉटलनेकच्या ४० डिग्रीच्या उतारावर होते !

स्ट्रँगने जुनी स्लीपींग बॅग काढून त्यात मँडीकचा देह गुंडाळला. त्याच्या कमरेभोवती दोर बांधून त्याचं एक टोक त्याने आपल्या हाती घेतलं तर दुसरं टोक प्लॅनीक-जोकोविच यांनी धरलं होतं. अर्थात कोणत्याही क्षणी मँडीकचा मृतदेह दोरातून निसटल्यास त्याला तिथेच सोडून द्यावं लागणार होतं. अन्यथा ते तिघंही खेचले जाण्याचा धोका होता ! दोघांच्याही पाठीवरच्या बॅग मोहम्मद हुसेनने आपल्या त्याब्यात घेतल्या.

नेमक्या त्याच वेळेला शिखराकडे मार्गक्रमण करणा-या गिर्यारोहकांच्या रांगेतून एक गिर्यारोहक खाली उतरुन त्यांच्यापाशी पोहोचला ! तो होता ह्युजेस डी'ऑब्रेडचा पोर्टर जेहान बेग !

जेहान बेगचं व्यक्तिमत्वं काहीसं वादग्रस्त होतं. शाहीन बेगचा तो चुलतभाऊ होता. शाहीन, जेहान आणि डी'ऑब्रेडचे उरलेले दोन पोर्टर कुदरत अली आणि मेहेरबान करीम एकाच खेड्यात राहणारे एकमेकांचे नातेवाईक होते ! इतर पोर्टरमध्ये नसलेला गिर्यारोहकांना खडसावण्याचा स्पष्टवक्तेपणा बेगमध्ये ठासून भरलेला होता !

डी'ओब्रेडने बॉटलनेकच्या पायथ्यापाशी ऑक्सीजन सिलेंडर पोहोचवल्यावर बेगला खाली परतण्यास परवानगी दिलेली होती. बेगला अल्टीट्यूड सिकनेसचा त्रास जाणवत होता. त्याची वागणूक काहीही विक्षीप्तपणाची असल्याचं कुदरत अली आणि करीमच्या ध्यानात आलं होतं.

त्यांच्यापाशी पोहोचल्यावर बेगने मँडीकच्या मृतदेहाकडे काही क्षण पाहीलं.

" सॉरी !" तो म्हणाला, " मी काही मदत करू शकणार नाही ! मी आतापर्यंत एकही मृतदेह पाहीलेला नाही !"
" ठीक आहे !" प्लॅनीक उत्तरला !

सर्वांनी निघण्याची तयारी केली. त्याच वेळी बेग पुढे सरसावला,

" सॉरी ! मी तुम्हाला मदत करतो !"
" तू ठीक आहेस ना ?" स्ट्रँगने संशयाने त्याच्याकडे पाहत विचारलं.
" मी ठीक आहे ! एकदम ठीक !" एकेक शब्दावर जोर देत बेग उत्तरला.

प्लॅनीक आणि जोकोविचने दोराची मागची बाजू धरली होती. स्ट्रँग आणि बेग पुढच्या बाजूला होते. स्ट्रँगने आपल्या आईस एक्सच्या हँडलला दोर गुंडाळला होता. काही वेळ मार्गक्रमणा केल्यावर स्ट्रँगला बेग आपल्या पाठीशी खूप जवळ पोहोचल्याची जाणिव झाली.

" मागे हो !" स्ट्रँग त्याच्यावर खेकसला !
" माझी काही चूक नाही !" बेग थंडपणे उत्तरला.

बेगच्या आवाजात पडलेला फरक पाहून स्ट्रँग चपापला. त्याचवेळी बेगने दोर सोडून दिल्याने आपल्यावर पडलेल्या जास्तीच्या भाराची त्याला जाणीव झाली. मँडीकच्या मृतदेह डाव्या बाजूला घसरण्यास सुरवात झाली !

त्याचवेळी एरीक मेयर अवघ्या साठ यार्डांवर पोहोचला होता. मेयर पोहोचताच बेगची जागा तो घेऊ शकणार होता ! स्ट्रँग याच विचारात असताना बेग त्याच्यावर येऊन धडकला !

बेग खाली घसरु लागला ! मात्रं अद्यापही त्याने दोर सोडला नव्हता ! त्यामुळे स्ट्रँगही घसरणार होता !

" दोर सोड !" स्ट्रँग ओरडला
" दोर सोड ! प्लीज !" प्लॅनीक, जोकोविच आणि महंमद हुसेन एका सुरात ओरडले !

जेहान बेगला ते काय बोलत आहेत हे अजिबात समजत नव्हतं ! त्याच्या मनावरचा ताबा पूर्ण उडाला होता !

" दोर सोड बेग ! फॉर क्राईस्ट्स सेक !" स्ट्रँग पुन्हा ओरडला.

.... आणि बेगने दोर सोडला.

स्ट्रँग, प्लॅनीक, जोकोविच घसरण्यापासून वाचले होते.

बेग मात्र वेगाने घसरत खाली चालला होता.

" आईस एक्स ! थांब ! आईस एक्स वापर !" स्ट्रँग ओरडला !

मात्र बेगने त्याला कसलाही प्रतिसाद दिला नाही ! आईस एक्स वापरून आपलं घसरणं थांबवण्याचा कोणताही प्रयत्नं तो करत नव्हता ! खाली बसलेल्या अवस्थेत घसरत असलेला बेग मध्येच पालथा झाला होता. त्याची सर्व सामग्री उडून बाजूला पडली होती. पूर्वेला असलेल्या उतारावरून तो वेगात घसरत होता.

" थांब ! उजवी कडे वळ !" एरीक मेयर जोरात ओरडला, " कँप ४ कडे जा !"

मात्र बेग कोणाचंही ऐकण्याच्या पलीकडे गेला होता. वेगाने घसरत तो उताराच्या टोकाला पोहोचला आणि एक किंकाळी फोडून कड्यापलीकडे दिसेनासा झाला !

आईस एक्स वापरून आपला जीव वाचवण्याचा कोणताही प्रयत्न त्याने केला नव्हता !

प्लॅनीक, जोकोविच, स्ट्रँग, मेयर आणि महंमद हुसेन जागच्या जागी खिळून पाहत होते. सर्वात प्रथम सावरला तो एरिक मेयर. प्लॅनीक आणि जोकोविचला त्याने डेक्सामेथासनची गोळी दिली. या औषधाने उंचीचा त्रास जाणवत नाही. मँडीकचा मृतदेह त्याच जागी सोडण्याचा त्यांनी निर्णय घेतला. सावधपणे वाटचाल करत सर्वजण कँप ४ वर परतले. मात्रं कँप ४ वर पोहोचण्यापूर्वी महंमद हुसेनने कड्याच्या टोकावर असलेली जेहान बेगची सर्व सामग्री ताब्यात घेतली होती !

कँप ४ वर परतल्यावर मेयरने बेगच्या मृत्यूची कडवट बातमी बेस कँपवर कळवली.

दुपारी १.३०

अल्बर्टो झरीन शिखराकडे जाणा-या अंतिम उतारावर पोहोचला होता ! आतापर्यंत एकट्याने त्याने वरपर्यंतची वाट शोधून काढली होती. काही क्षण दम खाऊन त्याने पुन्हा चढाईस सुरवात केली !

बॉटलनेकच्या उतारावर अद्यापही गिर्यारोहक शिखराच्या दिशेने मार्गक्रमण करत होते !

हिमखंडांसमोरच्या ट्रॅव्हर्सवरून गिर्यारोहक पुढे सरकत होते. बॉटलनेकच्या पायथ्याशी मँडीक पाठोपाठ जेहान बेगनेही मृत्यूला कवटाळल्याचा त्यांना पत्ताच नव्हता !

कोरीयन तुकडीतील गिर्यारोहकांचा ऑक्सीजन सिलेंडर्स बदलण्याचा कार्यक्रम अद्यापही आटपला नव्हता ! इतरांना मागे थांबून राहण्यापलीकडे पर्याय नव्हता. एकदा खाली कोसळण्यापासून वाचल्यावर सर्वाना घाई करण्यापलीकडे काहीही करण्याची विल्को वॅन रु़जेनचीही ईच्छा नव्हती !

कोरीयन गिर्यारोहकांचं ऑक्सीजन सिलेंडर्स बदलणं अखेर एकदाचं संपलं ! पुन्हा सर्वजण मार्गाला लागले. मात्र एका बर्फाच्या तु़कड्याजवळ बांधलेल्या ऑक्सीजन सिलेंडर्समुळे सर्वांनाच धाकधूक वाटत होती.

ड्रेन मँडीक सेसील स्कॉगवर आदळून झालेल्या अपघातामुळे स्कॉगपेक्षाही रॉल्फ बेई हादरला होता. तरीही तो अद्यापही वरच्या दिशेने मार्गक्रमणा करत होता. मात्रं आपला स्टॅमिना कमी पडत असल्याची त्याला कल्पना आली होती. त्याच्या पुढे काही अंतरावर असलेला ह्युजेस डी'ऑब्रेडही एव्हाना बराच थकला होता. त्याचा ऑक्सीजन सिलेंडर संपला होता. त्याच्याही पुढे असलेले वॅन रुजेन, डी गेवेल आणि जेरार्ड मॅक्डोनेल हळूहळू वर सरकत होते. त्यांचा सहकारी जेली स्टेलमन मात्रं बॉटलनेकच्या पायथ्याशीच मागे फिरला होता !

दुपारी ३.००

अल्बर्टो झरीन के २ च्या माथ्यावर पोहोचला होता !

या मोसमातील के २ चं शिखर गाठणारा तो पहिला गिर्यारोहक !

शिखरावर बसून झरीनने घड्याळावर नजर टाकली. ते घड्याळ आपल्या वडिलांची स्मृती म्हणून त्याने स्वतःजवळ बाळगलं होतं ! के २ वरील सुरक्षीत परत फिरण्याच्या वेळेत ( टर्न अराउंड टाईम ) मध्ये तो शिखरावर पोहोचण्यात यशस्वी झाला होता ! मात्रं इतर गिर्यारोहक अद्याप खूपच खाली होते ! त्याचा कॅमेरा मात्रं अद्यापही खाली असलेल्या शेर्पाकडे राहिला होता !

झरीनने शिखराच्या माथ्यावर एक चक्कर मारली. अद्याप कोणाचीही चाहूल लागत नव्हती. शिखराच्या दुस-या बाजूला सुमारे पंधरा फूट खाली आरामात बसण्यासारखी जागा होती. तिथे खाली उतरुन झरीनने आजूबाजूला नजर टाकली.

के २ च्या आसमंतातील अनेक शिखरं दृष्टीस पडत होती. भारत, चीन, पाकीस्तान तिन्ही देशांच्या सीमा तिथून दिसत होत्या. गरमा-गरम चहाचे घुटके घेत तो तिथे लवंडला ! कँप ३ वरून निघाल्यावर गेले चोवीस तास तो सतत चढाई करत होता !

बॉटलनेकच्या माथ्यावर पोहोचलेले गिर्यारोहक अद्यापही शिखराच्या दिशेने धीम्या गतीने मार्गक्रमणा करत होते. मात्रं वाटेत आडव्या आलेल्या एका बर्फाळ उतारावर पोर्टर आणि शेर्पा दोर बांधत असल्याने पुन्हा सर्वजण वाट पाहत थांबले होते ! मात्रं शेवटच्या सुमारे पंधरा फूट उंचीच्या सरळसोट बर्फाळ भिंतीपुढे कोरीयन गिर्यारोहकांची काही मात्रा चालेना ! इतर सर्वांना त्यांच्यापुढे जाणं शक्य असूनही शेर्पांविषयीच्या आदराने सर्वजण वाट पाहत थांबले होते.

शेवटी जुमीक भोटेने भिंतीवर चढाई करून एक दोर खाली सोडला. कसेबसे कोरीयन गिर्यारोहक त्या भिंतीवर चढून जाण्यात यशस्वी ठरले. सतत घसरणा-या एका गिर्यारोहकाला रुजेनने आपली एक आईस एक्स देऊ केली होती !

सतत होत असलेल्या दिरंगाईमुळे शिखराच्या माथ्यावर पोहोचून सुखरुप उतरुन येण्याविषयी काही जणांच्या मनात शंका उत्पन्न झाली होती. मार्को कन्फर्टोला त्यांना म्हणाला,

" १९५४ मध्ये लॅसेडेली आणि कॉम्पॅगोनी संध्याकाळी ६.०० वाजता शिखरावर पोहोचले होते ! आणि सुखरुप खाली उतरून आले ! आपणही सहज परतून येऊ !"

मार्को कन्फर्टोलाच्या बोलण्याचा सर्वांवर परिणाम झाला. एव्हाना कोरीयन गिर्यारोहक त्या बर्फाळ भिंतीवर चढून गेले होते ! सर्वजण पुन्हा वरच्या मार्गाला लागले ! के २ चं शिखर आता कुठे त्यांच्या दृष्टीस पडलं होतं !

रॉल्फ बेईवर मात्रं कन्फर्टोलाच्या बोलण्याचा कोणताही परिणाम झाला नव्हता. आपली ताकद कमी पडत असल्याचं त्याच्या ध्यानात आलं होतं. शिखरावर जाण्याचा आपला बेत त्याने रहित केला.

" मी इथेच थांबणार आहे !" तो स्कॉगला म्हणाला, " तू परत येताना मी इथेच तुला भेटेन !"

स्कॉगला आपल्या नव-याची काळजी वाटत होती. पण त्याचा निर्णय योग्य आहे हे तिला पटत होतं. त्याला हात करुन ती पुढे निघाली. बेईचा जवळचा मित्र असलेला जेरार्ड मॅक्डोनेलही त्याच्या माघारीमुळे नाखूश होता. पण ते फारसं मनावर न घेता त्याने शिखराची वाट पकडली. एकेक करुन सर्वजण त्याला ओलांडून शिखराच्या दिशेने निघून गेले.

दुपारी ३.४०

के २ च्या माथ्यावर असलेल्या अल्बर्टो झरीनने घड्याळात पाहीलं. त्याच्याव्यतिरिक्त अद्याप एकही गिर्यारोहक वर पोहोचला नव्हता. झरीनने खाली उतरण्यास सुरवात केली. इतर सर्व गिर्यारोहक अद्यापही वर चढत होते !

अल्बर्टो झरीन हा एकमेव गिर्यारोहक योग्य वेळेत शिखरावर पोहोचून परत फिरला होता !

अंतिम चढाईत झालेला उशीर किती धोकादायक ठरणार होता ?

दुपारचे ४.३०

परतीच्या वाटेला लागलेल्या झरीनची अद्यापही वर चढत असलेल्या गिर्यारोहकांशी गाठ पडली. किम जे सूने झरीनचं अभिनंदन केलं आणि शिखरावर जाण्याचा मार्ग आखल्याबद्दल त्याचे आभार मानले. किमच्या शेर्पाने झरीनचा कॅमेरा आठवणीने परत केला.

काही वेळातच झरीनची डी'ऑब्रेडशी गाठ पडली.

" अल्बर्टो !"
" बॉन्जुअर हुजेस !" झरीन म्हणाला, पण डी'ऑब्रेडची शारिरीक स्थिती पाहून तो काळजीत पडला, " सांभाळून जा ! बराच उशीर झाला आहे !"

त्याच वेळी डी'ऑब्रेडचा पोर्टर मेहेरबान करीम तिथे पोहोचला. तो डी'ऑब्रेडला लवकर वर चढण्याची घाई करू लागला.

" अच्छा ! बेस कँपवर भेटूच !" डी'ऑब्रेड उत्तरला आणि त्याने शिखराची वाट धरली !

पुढे आलेल्या झरीनची गाठ सेसील स्कॉग आणि लार्स फ्लेटो नेसाशी पडली. त्याला पाहताच स्कॉगने चढाईची चौकशी केली.

" सुमारे दीड तास !" झरीन उत्तरला, " मात्रं, इथूनही परत फिरण्यास हरकत नाही !"

स्कॉगने पुढचा मार्ग पत्करला !

काही अंतर उतरताच झरीनला रॉल्फ बेई दिसला. तो स्कॉग आणि नेसाची वाट पाहत होता. झरीनने त्याला कँप ४ वर परतण्याविषयी सुचवलं, पण सेसीलला सोडून खाली उतरण्यास बेईची तयारी नव्हती ! झरीनने त्याचा निरोप घेतला आणि तो बॉटलनेकच्या उताराच्या मार्गाला लागला.

संध्याकाळी ५.३०

दक्षिण कोरीयन मोहीमेतील शेर्पा जुमीक भोटे के २ च्या शिखरावर पोहोचला होता !
त्याच्यापाठोपाठ नोर्वेजियन लार्स फ्लॅटो नेसाने कोरियन गिर्यारोहकांना मागे टाकून शिखर गाठलं होतं !
अनुभवी गिर्यारोहक नसूनही पहिल्याच प्रयत्नात नेसाने के २ वर यशस्वी चढाई केली होती !
नेसापाठोपाठ दहा मिनीटांत सेसील स्कॉग के २ च्या शिखरावर उभी होती !

" काँग्रेजुलेशन्स सेसील !" नेसाने तिचं स्वागत केलं !

स्कॉगपाठोपाठ काही मिनीटांतच कोरीयन मोहीमेतील इतर गिर्यारोहकांनी के २ चा माथा गाठला !

संध्याकाळी ६.००

डच आणि फ्रेंच मोहीमेतील गिर्यारोहक अद्यापही शिखराच्या दिशेने मार्गक्रमणा करत होते !
मार्को कन्फर्टोलाही त्यांच्या मागोमाग होता !

चिरींग दोर्जे त्यांना लवकर पाय उचलण्याची घाई करत होता.
" इथे कधीही अ‍ॅव्हलाँच येऊ शकतं !"

अल्बर्टो झरीनने कँप ४ गाठला होता ! मात्रं तिथे न थांबता तो झपाट्याने कँप ३ च्या मार्गाला लागला होता !

संध्याकाळी ७.००

सेसील स्कॉग आणि लार्स नेसा शिखरावरुन परतीच्या वाटेला लागले होते. आपली वाट पाहत बेई थांबला असेल याची तिला पूर्ण कल्पना होती.

दमलेभागलेले विल्को वॅन रूजेन, कॅस वॅन डी गेवेल आणि जेरार्ड मॅक्डोनेल अखेर शिखरावर पोहोचले ! शिखरावर पोहोचताच त्यांची पेम्बा ग्याल्जेशी गाठ पडली ! सर्वांनी एकच जल्लोष केला !

वॅन रुजेनने सॅटेलाईट फोनने मार्टीन वॅन एकशी संपर्क साधला,
" मार्टीन, आम्ही के २ च्या शिखरावर आहोत !"

काही मिनीटांतच डच वेबसाईटवर त्यांच्या यशस्वी चढाईची बातमी झळकली.

जेरार्ड मॅक्डोनेलने आयर्लंडमध्ये असलेल्या आपल्या कुटुंबियांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्याला यश आलं नाही. मात्रं अलास्कात असलेल्या आपल्या गर्लफ्रेंडशी त्याचा संपर्क झाला होता !

डच गिर्यारोहकांच्या पाठोपाठ दमलाभागलेला ह्युजेस डी'ऑब्रेड माथ्यावर पोहोचला ! त्याच्याबरोबर त्याचा पोर्टर मेहेरबान करीम होता !

कॅस वॅन डी गेवेलने डी'ऑब्रेडचं अभीनंदन केलं. डी'ऑब्रेडने आपल्या कुटुंबियांशी संपर्क साधला,
" ही माझी शेवटची चढाई ! यापुढे गिर्यारोहण बंद !" एकसष्ट वर्षांच्या डी'ऑब्रेडने सर्वांसमोर आपल्या मुलीशी बोलताना आपला निर्णय जाहीर केला !

डी'ऑब्रेडच्या आग्रहावरून जुमीक भोटेने नेपाळमध्ये आपल्या पत्नीशी संपर्क साधला. जुमीक के २ च्या मोहीमेवर निघाला तेव्हा ती गरोदर होती. जुमीकला मुलगा झाला होता !

काही वेळातच कोरीयन गिर्यारोहकांनी आणि डी'ऑब्रेडने परतीचा मार्ग सुधरला.

रात्री ८.००

डच गिर्यारोहक परतीच्या वाटेला लागले असतानाच मार्को कन्फर्टोला अखेरीस शिखरावर पोहोचला होता ! कॅस वॅन डी गेवेलला त्याने आपला फोटो काढण्याची विनंती केली.

" लवकर आटप !" वॅन डी गेवेल उद्गारला, " आधीच आपल्याला उशीर झाला आहे !"

कन्फर्टोलाने सॅटेलाईट फोनवरून इटलीत संपर्क साधला. आपण माथ्यावर पोहोचल्याचं आणि लगेच खाली निघत असल्याचं सांगून त्याने फोन बंद केला आणि परतीची वाट पकडली.

शिखराच्या माथ्यावर पोहोचण्यापूर्वीच ड्रेन मँडीक आणि जेहान बेग प्राणाला मुकले होते.
बॉटलनेकच्या उतारांवर कँप ४ कडे परतणा-या गिर्यारोहकांपुढे काय वाढून ठेवलं होतं ?

क्रमश :
 
 
सॅव्हेज माऊंटन - ५                                                                                                            सॅव्हेज माऊंटन - ७

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Sad

सकाळी १०.३०

अल्बर्टो झरीन सुरक्षा दोराविना चढाई करून बॉटलनेकच्या माथ्यावर पोहोचला होता ! >> हे टायपो आहे का?

राजू,

झरीन बॉटलनेकच्या माथ्यावर पोहोचताना त्याने दोर वापरला नव्हता. टायपो नाही.

ह्म्म! के२चा माथा नाही... बरोबर... धन्यवाद स्पार्टाकस! के२ लेखमालिकापण चांगली मांडलेली आहे... थरारकपणा जाणवत आहे...

शिखरावर रात्री ८ वाजता Uhoh

चढाईचया दरम्यान दोर बांधताना झरीनने आपला कॅमेरा एका शेर्पाच्या हवाली केला होता. के २ च्या माथ्यावर आपला फोटो काढून घेण्याची त्याची मनीषा होती. परंतु दोर बांधण्यात झालेल्या उशीरामुळे अद्यापही शेर्पा बॉटलनेकच्या माथ्यावर पोहोचलेले नव्हते. त्यातच ड्रेन मँडीकला झालेल्या अपघातामुळे नुकतेच पुढे चढाई करू लागलेले गिर्यारोहक पुन्हा जागच्या जागी थांबले होते !

मँडीकने खाली असलेल्या गिर्यारोहकांना हाका मारण्याचा सपाटा लावला.
>>>ही टायपो आहे कां? कारण मँडीकने आधीच आपले प्राण गमावले आहेत.

धन्यवाद आऊटडोअर्स,

ती टायपो होती. ड्रेन मँडीक आधीच मरण पावला होता. बाकीच्यांना हाका मारणारा गिर्यारोहक झरीन होता.
योग्य बदल केला आहे.