रिस्क मॅनेजमेंटः धोका व्यवस्थापन

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago
Time to
read
1’

तस पाहिल तर risk management हा पद्व्युत्तर मॅनेजमेंट अभ्यासक्रमातील एक विषय आहे. रिस्क मॅनेजमेंट हे जरी मूलतः व्यवसायाभिमुख शिक्षण असले तरी मला वाटत सद्द्य परिस्थितीत, अवघ्या जगावर दहशतवादाचे सावट असताना त्या अनुशंगाने रिस्क मॅनेजमेंट चे शिक्षण, वापर अन पॉलिसी जास्त महत्वाची ठरते. विशेषतः अमेरीकेरील ९/११ च्या हल्ल्यानंतर risk management ला नवे आयाम प्राप्त झाले आहेत. त्या अनुशंगाने भारतातील सद्द्य परिस्थितीच्या अन मुम्बई वरील हल्ल्यांच्या अनुशंगाने इथे risk management कसे काय उपयुक्त ठरते यावर थोडेसे विश्लेषण. अर्थात, त्यासाठी risk management मधिल काही व्याख्या वा संज्ञा समजून घेणे उचित ठरेल.

सर्वसाधारण "एखादी घटना ज्यात नुकसान वा इजा सम्भवते" त्यास रिस्क म्हणतात. रिस्क ला मि इथे "धोका" हा साधा मराठी शब्द वापरतोय. या विषयातील बरेचसे तज्ञ हे धोक्याची व्याख्या uncertainty शी जोडतात, ज्याला आपण अनिश्चीत असे म्हणू शकतो. थोडक्यात एखाद्या ठिकाणी दहशतवादी हल्ला होवू शकतो असा धोका आहे पण कधी केव्हा कुठे होईल हे निश्चीत नाही. अर्थात जगात कुठ्ल्याच गोष्टीची निश्चींती नसते, एक मृत्त्यू सोडल्यास.. ही विचीत्र वस्तूस्थिती आहे.
तर धोका व्यवस्थापान हे कुठल्या मार्गाने करता येईल हे पाहण्याआधी धोका व्यवस्थापनाचा मूळ उद्देश, हेतू काय आहे तर "बर्‍याच प्रमाणात धोका कमी करणे किव्वा धोका नाहिसा करणे अन त्याचवेळी धोक्याच्या अनुशंगाने येणारी संधीचा जास्ती जास्त फायदा करून घेणे". हे धोका अन संधी समिकरण पुढील उतार्‍यात उदाहरणांसहीत समजावून घेता येईल.
धोका व्यवस्थापनाची काही सर्वमान्य तत्वे:

१. धोका टाळणे: हा एक मुलभूत तात्विक मार्ग आहे. मुम्बईबद्दल बोलायचे तर एक सामन्य नागरीक म्हणून जी जी स्थळे, जागा, गोष्टी या दहशतवादाला बळी पडू शकण्याची शक्यता अधिक आहे तिथे न जाणे, जाण्याचे शक्यतो टाळणे, असा एक ठोस निर्णय घ्यावा लागेल. हा प्रकार अगदी टोकाचा वाटू शकतो पण धोका पूर्णपणे टाळायचा तर "त्या वाट्याला न गेलेले बरे" असा एक सर्वसामान्य दृष्टीकोन ठेवता येईल. प्रत्त्यक्षात मात्र हा पर्याय अशक्य वाटतो. किंबहुना अशा ठिकाणि आम्ही मुद्दमून जाणार अन दहशतवाद्यान्ना दाखवून देणार की कितिही धोका असला तरी आम्ही डगमगणार नाही असा आजकालचा नवा मंत्र आहे..याने मूळ धोका मात्र "टळत नाही" हे समजून घ्यायला हवे. पुढचा हल्ला होत नाही तोवर ती जागा सुरक्षित आहे हा एक खोटा आभास त्यात आहे.

२. धोका कमी करणे: थोडक्यात पर्यायी मार्ग शोधणे आणि परिस्थिती, प्रांत, यानुसार उपायांमधे बदल करणे. जसे ताज, गेटवे, विधान भवन यासारख्या मोक्याच्या, राष्ट्रीय मान्यता असलेल्या जागांवर सतत कडक सुरक्षा ठेवणे, ठराविक संख्येपेक्षा जास्त लोकाना अशा ठिकाणि एका वेळी राहू/येवू न देणे. बाँब हल्ल्यात ताज च्या इमारतीस पूर्णपणे उध्वस्त करणे अतीरेक्यान्ना शक्य झाले नाही कारण ताज चे बांधकाम प्रचंड मजबूत आहे (ब्रिटीशांच्या काळात टाटान्नी ही इमारत बान्धली यातच सर्व आल. आजकाल बान्धायला घेतलेले पूलही पूर्ण व्हायच्या आधीच पडतात..). धोका कमी करण्याच हे एक उत्तम उदाहरण आहे.

३. धोका हस्तांतरीत करणे: थोडक्यात "ये अपने बस की बात नही" तेव्हा इथे धोक्याचे व्यवस्थापन करण्यात कुशल अन अनुभवी असलेल्या एखाद्या संस्थेस धोका हाताळण्याचे काम वा जबाबदारी देणे. जसे ताज मधे दोन दिवस चार अतिरेकी अख्ख्या शहरास, पोलिस अन सुक्ष यंत्रणेस वेठीस धरून होते तेव्हा तिथे इस्राईली कमांडोज ना ऑपरेशन दिले जावे असा एक सूर होता. इस्रायल च कौशल्य, तंत्र, कार्यपध्धती या बाबतीत जगमान्य आहे.

४. धोका वाटून घेणे: एका व्यक्तीचे, वा राष्ट्राचे हे काम नाही तर इथे दहशतवादाने पछाड्लेल्या सर्वान्नी एकत्र येवून प्रयत्न करणे.

५. धोका सतत राहणार आहे हे मान्य करून त्याचे व्यवस्थापन करणे: सध्ध्या वेगवेगळ्या रुपात जगभर बोकाळलेला दहशतवाद पाहता हाच एक पर्याय शिल्लक आहे असे वाटते.
देशांतर्गत आणि आंतर्राष्ट्रीय स्तरावर अशा दोन अन्गाने या पार्यायाचा विचार करावा लागेल:

१. एक टॉप डाऊन विचार केला तर मुम्बईपुरते बोलायचे तर मुम्बईचे क्षेत्रफळ अन लोकसंख्या यांचे प्रमाण निश्चीत करावे लागेल. दर दिवशी पर प्रांतातून मुम्बईत येणारे लोंढे थाम्बवावे लागतील. जसा एखाद्या इमारतीचा fsi (चटईक्षेत्र निर्देशांक) असतो तसा संपूर्ण शहराचाही असतो. अलिकडे जगभरात ज्या planned citys वसवल्या गेल्या आहेत त्यात याचे काटेखोरपणे पालन केले गेले आहे. तसे नसेल तर लोकसंख्येचा भार सहन न झाल्याने सर्व व्यवस्था कोलमडते मग त्यात सर्वच आल: समाज, दैनंदीन गरजा, संधी, नोकर्‍या, हक्क, सुव्यवस्था, आरोग्य, इत्यादी. गेले अनेक वर्षे मतांच्या राजकारणातून हे येणारे लोंढे अधिकृत करून वसवले जात आहेत. त्यातून उद्भवणार्‍या सामाजिक समस्या, बेकारी, असुरक्षित समाज जीवन हे सर्व घटक "अपप्रवृत्तींन्ना" कारक ठरतात. मग थोड्या फार पैशासाठी अनेक युवक जाणते वा अजाणतेपणाने दहशतवादाच्या जाळ्यात अडकतात. यातील कित्त्येकांन्ना आपण नक्की किती मोठ्या विघातक षडयंत्राचा भाग आहोत हेच माहित नसते. त्यामूळे mass scale किव्वा सर्वसमावेशक संख्यावाचक दृष्टीकोनातून धोका कमी करायचा तर हे पाऊल प्रथम उचलायला हवे. आता ऊशीर झाला आहे यात वाद नाही पण राजकीय इच्छाशक्ति असेल तर सुप्रिम कोर्टाच्या निर्णयानुसार १९९५ पर्यंत्(च) वसलेल्या झोपड्या अन पर्यायाने हा परप्रांतीय लोंढा "मुम्बैकर" म्हणून ठेवून उरलेल्यान्ना मूळ गावी पाठवणे आवश्यक आहे. मला वाटत अलिकडे विलासरावांचे सरकार असताना त्यांच्या सरकारने १९९९ पर्यंतच्या झोपड्या अधिकृत करून घेतल्या.. अन तरिही इथे येणारे लोंढे सम्पत नाहीयेत. या सर्व पर प्रांतीयांसाठी त्यांच्या प्रांतात रोजगारी, सन्धी निर्माण करण्याचे धोरण सरकारला देश्-पातळीवर राबवावे लागेल. "मुलभूत" गरजांसाठी हे लोंढे स्थलांतर करता कामा नयेत, आधुनिक अन विशेष सन्धींसाठीच परवानगी दिली जावी.

२. नागरीक हे शासन व्यवस्थेचे श्रवण, दृष्टि अन वाचा इंद्रीय आहेत. घटनास्थळी प्रथम हजर असतो नागरीक या अर्थी नागरीक हा कुठल्याही घटनेचा first reponse resource असतो हे ध्यानात घेवून नागरीकाला सक्षम करणे गरजेचे ठरते. जसे सर्दी झाली की घसा, कान यानाही त्रास होतो, ते कमकुवत होतात तसेच वरीलपैकी कुठलाही एक घटक कमी पडला तर इतर दोन्हीवर परिणाम होतो अन परिणामी त्यावर विसंबून शासन यंत्रणा निकामी होते. मुम्बई सारख्या शहरात घरातील कमवता मनुष्य व स्त्री ही दिवसातील साधारण कमीत कमी १२-१४ तास कामात व्यस्त असते. उरलेल्या १० तासापैकी दैनंदीन काम, घरगुती गरजा, कौटूंबीक जबाबदार्‍या, विश्राम या सर्वातून जो काही वेळ मिळेल त्यातही नागरीकाला सक्षम राह्ण्याच्या दृष्टीकोनातून काय ऐकणे, पहाणे, बोलणे अपेक्षित आहे याचा अभ्यास करून तसे कार्यक्रम राबवायला हवेत. नागरीकाचा वा कुटुम्बाचा बहुतांशी सर्व "उरलेला वेळ" हा tv वरील बाष्कळ विनोदी कार्यक्रम, फालतू reality shows, सास बहू मालिका, छोट्या मोठ्या स्पर्धा किव्वा फक्त क्रिकेट पहाण्यातच जात असेल तर त्याची वरील तिन्ही इंद्रीये ही पूर्णपणे कमकुवत होण्यास वेळ लागत नाही. दैअनंदीन धकाधकीत ही करमणुक वा मनोरंजन हे केवळ मनोरंजन न राहता आपल्या वैचारीक विवेक बुद्धी, प्रतिभेस शिथील नक्की करत आहेत. आपल्या आसपास काय घडते आहे, समाजातिल महत्वाचे प्रश्ण, ते पाहण्याची, त्यावर बोलण्याची संधी, व्यासपीठे, साप्ताहिक चर्चासत्रे, प्रात्यक्षिके, समाजसेवेची workshops इत्यादी सर्व नागरीकाला सतत उपलब्ध करून देण्याची मोठी जबाबदारी स्थानिक प्रशासनाचि आहे, यात सर्व प्रसार माध्यमे, वृत्तपत्रे यांचा सक्तीचा सहभाग असणे आवश्यक करायला हवे. घराच्या चार भिंतीत आयुष्य जगणारा नागरीक बाहेरच्या जगात फक्त एक लोंढ्यातील क्रमांक बनून राहतो. ही जबाबदारी जशी शासनाची आहे तशीच प्रत्त्येक नागरीकाचिही आहे. यातून अपोआप आजूबाजूच्या व्यक्ती, परिस्थिती चे सर्वेक्षण, निरीक्षण, संवेदन, केले जाते अन काही विपरीत गोष्टि वा शंका निर्माण झाल्या तर त्या लगेच निदर्शनास आणून देता येतात. माझ्या दृष्टीने हा first response इतर कुठल्याही सुसज्ज intellignce surveyllance पेक्षा अधिक परिणामकारक ठरतो. आजच्या ndtv च्या चर्चेत दीया मिरझा Happy ने हाच मुद्दा उपस्थित केला होता.
३. माझ्या आधीच्या लेखात मि असे म्हटले होते की दैनंदीन जिवनात अगदी छोट्या गोष्टिन्ची सुरक्षा, जागरुकता आपण दाखवली तरी धोका कमी करता येतो. याने दहशतवाद कसा कमी होईल? असा प्रश्ण उपस्थित होतो. याचे उत्तर मला थोड्या वेगळ्या दृष्टीकोनातून द्यायचे आहे. मानसिक अन शारिरीक ताण हा कुठल्याही गुन्हामागे एक प्रमुख घटक असतो असे सर्व वैद्यकीय व मानस शास्त्र तज्ञान्नी मान्य केले आहे. विशेषतः मुम्बई सारख्या शहरात सकाळी उठल्यापासून रात्री झोपर्यंत (अन नन्तरही) प्रचंड ताण आहे. हा ताण अगदी लहान मोठ्या गोष्टीतून निर्माण होतो जसे, traffic jam, बेकार रस्ते, वीज कपात, पिण्याच्या पाण्याची बोंब, गर्दी, प्रदूषण, इत्यादी अनेक... या सर्व गोश्टी अन प्रश्ण हे जरी सामान्य नागरीकाच्या कक्षेबाहेरचे असले तरी त्याचा परिणाम सामन्य माणसालाच भोगावा लागतो. यातून एकंदरीत शासन, समाज याबद्दल मनात हतबलता, आकस, चीड, उद्वेग निर्माण होतो. दहशतवादी पाकीस्तानातून येतात हे बहुतांशी खरे मानले तरी बरेचसे स्थानिक लोक त्यान्ना मदत करतात हे आजवर दिसले आहे. याची कारणे धर्मांन्धता, गरिबी, जातीयतवाद, राजकारण इत्यादी काहीही असली तरी ते सर्व मुखवटे आहेत, आतील माणूस हा आधीच ताणाला बळी पडलेला असतो हे समजून घेतले पाहीजे. समजाविघातक तत्व वा कारवाया यन्ना मदत करून आपली हतबलता, राग व्यक्त करण्यापेक्षा समाजात आपले म्हणणे अन ताण व्यक्त करायला इतर पुरोगामी व्यासपीठे, मार्ग उपलब्ध आहेत हा विश्वास अशा भरकटलेल्या नागरिकाला असेल तर या दहशतवादाला स्थानिक घटकांकडून खत पाणि मिळणार नाही. nobody cares for me so I have to care for my myself and find my own solution..हा मुळात रुजू पाहणारा विचार याच ताणावामुळे अधिक बळकट होतो. तेव्हा प्रत्त्येक नागरीकाने एक जबाब्दार सक्षम नागरीक म्हणून स्वताबरोबर दुसर्‍याची किमान काळजी ठेवणे गरजेचे आहे. अन याचे प्रकटीकरण फक्त अडी अडचणीच्या वेळी (दंगे, जाळपोळ, स्फोट, इत्यादी) नको तर रोजच्या दैनंदिनीतही दिसायला हवे.

आत्मघातकी हल्ले, धर्माच्या नावाखाली केलेले स्फोट, लोकहत्त्या हा दहशतवाद मला तरी स्थानिक वाटत नाही. तो आंतरराष्ट्रीय स्तरावर पोसलेला अजेंडा आहे. सामन्य नागरीकाच्या कक्षेबाहेर त्याची व्याप्ती अन उगम आहे अन तिथे देश, सरकार यांची सुरक्षा विषयक धोरणेच जास्त महत्वाची ठरतात अन तो एक स्वतंत्र अभ्यास अन चर्चेचा विषय आहे.
मि पुन्हा हेच म्हणेन दहशतवाद हा पहिले मनात, मेंदूत जन्म घेतो अन तो कशा रूपाने प्रकट होईल हे परिस्थितीवर अवलंबून आहे.

४. अजून बर्‍याच गोष्टी स्थानिक स्तरावर किव्वा ग्रास रूट स्तरावर राबवणे आवश्यक आहे. सर्व समावेशक प्राथमिक शिक्षण, "मूल्यांकीत" शिक्षण, व्यापक विकसनशील धोरणे, किमान प्राथमिक आरोग्य सुविधा या जोपर्यंत अगदी सर्वात खालच्या स्तरापर्यंत पोचत नाहीत तोवर ही प्रगत अन अप्रगत समाजातील विषमता, वैचारीक दरी कायम राहणार आहे अन त्यातून पुन्हा समाज विघटक अन विघातक तत्व जन्म घेतील किव्वा पोसली जातील यात शंका नाही. एकीकडे आपण पोलिसान्ना ak47,56 द्यायची मागणि करतो तर दुसरीकडे बहुतांशी अप्रगत भाग, वर्ग, समाज हा दिवसात ४ तास वीज आणि पाणि यावर अवलंबून असतो हे विसरतो. अतीरेक्यांकडे ग्रेनेडस सुद्धा होते मग काय नाक्यावरील प्रत्त्येक पोलिस, हवाल्दार यान्ना ग्रेनेड्स देणार आहोत का..? याला अंत नाही अन शस्त्र सुसज्जता आवश्यक असली तरी शस्त्राच्या आधारावर हा धोका टाळता येणार नाहीये. आपला समाजाचा मुलभूत पाया घट्ट करण गरजेच आहे. ते होत नाही तोपर्यंत हे शस्त्र, अण्वस्त्र, नव नविन सुरक्षा संस्था, कमांडो प्रशीक्षण, याचा कितीही डोलारा उभारला तरी जास्त काळ तो डोलारा टिकणार नाही.

५. अंतरराष्ट्रीय स्तरावर नवनविन हितसंबंध, व्यापार, लष्करी संबंध जुळवणे इत्यादी सर्व आवश्यक आहे महत्वाचे आहे अन ते चालूच आहे.. आजकालच्या जगात हे असे "धोका हस्तांतरण", "धोका वाटून घेणे" इत्यादी तत्वे अगदी अमेरिकेसारख्या बलाढ्य अन प्रगत समजल्या जाणार्‍या राष्ट्रान्नाही राबवावीच लागतात, आपणही ती राबवूच पण त्या बरोबर अधिक महत्वाचे काय असेल तर स्थानिक पातळीवर योग्य अनुशासन राबवणे. मला वाटत नाही सध्ध्या जे काही होत आहे ते system failure आहे, ते अनुशासन वा implementation failure अधिक आहे म्हणूनच अशा system ला नेत्याची नाही व्यवस्थापकाची गरज आहे. व्यवस्थापक जे शासन अन अनुशासन याकडे एक निष्णात व्यवस्थापक म्हणून पाहतील अन धोरणे राबवतील.
rediff.com वर एका लेखात (http://www.rediff.com/money/2008/dec/06guest-terror-what-happens-to-the-...) याचा उल्लेख होता, गेल्या अनेक दशकात, भारतातील शासन अन अनुशासन याकडे व्यवस्थापक म्हणून पाहणारी एकच व्यकती होती, राजीव गांधी. :
"All this requires leadership. The last prime minister who thought in a managerial framework was Rajiv Gandhi. He talked about the 15 per cent problem, he set up the National Security Guards, and he got IAF aircraft to carry soldiers all the way to Maldives (when it faced a coup) faster than the NSG reached the Gateway of India last week!"
काय दुर्दैव आहे पहा हेच राजीव गांधी स्वता: अशाच दहशतवादी हल्ल्यास बळी पडले. यावरून हेच सिध्ध होत की दहशतवादाकडे एका वेगळ्या दृष्टीकोनातून पहायची गरज आहे.

वरील लेखात सुचीत केलेले transparancy, accountability, technology या गोष्टि देखिल धोका व्यवस्थापनासाठी कशा वापरता येवू शकतात हे आपल्यातील इतर वाचक, लेखक, समीक्षक मंडळीन्नी लिहावे अशी मि विनंती करीन...

जाता जाता, अमेरीकेतही ९/११ झाले ते का? आणि त्यानंतर अमेरीकेने काही अमूलाग्र बदल केले ते कसे? असा प्रश्ण मागिल लेखात उपस्थित केले गेली होता.
आत्मघातकी हल्ला हा प्रकारच अमेरिकेला तोही त्यांच्या जमिनीवर नविन होता, अनपेकक्षित होता. हे असे काहीतरी भन्नाट अतीरेकी करू शकतील यावर ९/११ च्या आधी कुणाचा विश्वास नव्हता. त्यातून अमेरिका हे बर्‍याच अंशी मुक्त राष्ट्र आहे जिथे सर्व प्रकारचे स्वातंत्र्य सहज उपलब्ध आहे. त्याचाही या अतीरेक्यान्नी गैरफायदा घेतला. त्यातून अमेरिकेवरील हल्ल्यामागे खूप मोठे प्लॅनिंग होते अन हा कट बराच काळ शिजत होता हेही नंतर उघड झाले. आपल्या बाजूला राहणारा विद्यार्थी हा अशा संशयास्पद कामात, कटात गुंतला आहे याची शेजारच्या अमेरिकन माणसाला खबरबातही नव्हती. शक्यतो इतरांच्यात ढवळाढवळ न करणार्‍या अन आपले आपले जपणार्‍या टिपिकल अमेरिकन रहाणीमानाचा तो एक तोटा होता असेही म्हणता येईल.
थोडक्यात वर उल्लेखलेल्या सर्व अंतर्गत सुरक्षेच्या बाबी (social security card, national id card सकट) कार्यरत असताना देखिल केवळ अतीरेक्यांची "आत्मघातकी विचारप्रणाली" अन "स्वता:बद्दल चा अहंकार अन गाफिलपणा" यामूळे अमेरिकेवर ९/११ चा हल्ला झाला असे म्हणता येईल. मुळात ९/११ चा हल्ला का झाला हा मात्र अमेरिकेच्या आजवरच्या (चूकीच्या) परराष्ट्र धोरणाचा परिणाम आहे असे यातील तज्ञ मंडळी मानतात.

पण ९/११ नंतर मात्र अमेरीकेने दहशतवादाविरुध्ध एक मोठी आघाडी उघाडली:
आंतर राष्ट्रीय स्तरावर अमेरिकेने एक coalltion तयार केले आणि आधी अफगाणिस्तान च्या विरुध्ध आणि नंतर इराक च्या विरुध्ध थेट युध्ध कारवाइ केली, ती अजूनही चालू आहे. त्याच बरोबर अंतर्गत सुरक्षेमधे अमूलाग्र बदल केले. सर्वच गोष्टी बरोबर होत्या असे नव्हे पण आपण त्यातील चांगल्या गोष्टि बघुया कारण दुसर्‍याच्या उणीवा काढण्याने आपल्यात सुधारणा होणार नाहीये. यात बरेच बदल हे छुपे होते तर काही थेट बदल होते:

विमानतळ सुरक्षेमधे खूप मोठ बदल केला गेला. फक्त प्रवाशांन्नाच आत जाण्यास परवानगी, गाड्यांची, सामानाची सूक्ष्म तपासणी, प्रवशांचि तपासणी, चक्क racial profiling, विमान प्रवासातही लागू केलेले कडक नियम, random screening, requirement of 2 forms of identities असे अनेक बदल वेळो वेळी केले गेले. cockpits मधे लोखंडि दरवाजे बसवणे, इत्यादी.
रस्ते मार्ग, वाहतुक यातूनही धोका सम्भवतो हे जाणून काही मोक्याच्या मार्गावरून, पुलांवरून (ny brooklyn bridge), वगैरे ट्रक सारखी अवजड वाहने, मालवाहतूक यास मज्जाव करण्यात आला.
सर्व मोठी, पर्यटक आकर्षणे असलेल्या स्थळांवर x ray screening, bag checking, id checking या बरोबर खडा पोलिस बंदोबस्त ठेवला गेला.
प्रत्त्येक सरकारी दफ्तरी, इमारती, कार्यालयातून काम करणार्‍यांचे वा इच्छुकांचे संपूर्ण background screening checks केले जात होते. मला स्वताला याचा अनुभव आहे कारण ९११ नंतर विमानतळ, nuclear facilities इथे सल्लगार म्हणून काम करण्याआधी आम्हा सर्वांचे, अगदी अमेरिकन नागरिकांचेही पुन्हा background screening केले गेले होते. अलिकडे तर nasa, nuclear facilities, ports, naval bases इथे कंसल्टंट म्हणून काम करायलाही "अमेरिकन नागरीकत्व आवश्यक" असते.
टपाल खात्यातून athrax सारखी विषारी पावडर पाठवली गेल्या नंतर तिथेही कडक नियम लागू केले गेले: ठराविक आकारमानाचे टपाल, कुठले पदार्थ काय पाठवता येते, इत्यादी वर निर्बंध लादले गेले.
अगदी साध्या गोष्टि जसे driver license या पूर्वी सहज मिळत होत्या त्यातही कडक नियम, चौकशी, कायदेशीर बंधने (जसे विद्यार्थी, h1, इत्यादीनाच थोड्या मुदतीचा परवाना देणे) लादली गेली.
इतकच काय अगदी उघड उघड काही मुस्लिम धार्मिक संस्थांची बँक खाती गोठवली गेली. अनेक मुस्लिम धंदे, व्यावसायिक, शिक्षण संस्था यांवर auditing लाद्ले गेले.
९११ मधले अतीरेकी विद्यार्थी होते, स्थानिक हवाई उड्डण केंद्रांमधून प्रशिक्षण घेत होते हे पहाता, अनेक हवाई प्रशिक्षण केंद्रे बंद केली गेली किम्बहुना अशा ठिकाणी मुस्लिम धर्माच्या विद्यार्थ्यांन्ना प्रवेश नाकारला गेला. आंतर् राष्ट्रीय स्तरावर चक्क मुस्लिम वा इतर सम्बन्धीत देशातील विद्यार्थी, यात्री, पर्यटक इत्यादिन्ना व्हिसा मिळवणे अशक्यप्राय करून टाकले.
telephone tapping मोठ्या प्रमाणावर केले गेले. यातल्या बर्‍याचश्या गोष्टी नंतर उघडकीस आल्या पण racial profiling च्या बळावर कुणालाही चौकशी साठी ताब्यात घेणे, घरांचि झडती घेणे, दूरध्वनी संभाषण टॅप करणे यास सरकारने छुपी सम्मती दिली होती.

अशी अनेक स्थानिक व राष्ट्रीय सुरक्षा धोरणे अन बदल अमेरिकन सरकारने राबवले. त्याचा एक मोठ्ठा फायदा म्हणजे त्यानंतर अमेरीकेवर "बाहेरच्या" अतीरेकींचा एकही दहशतवादी हल्ला झालेला नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर मात्र अमेरिकन नागरिकांची सुरक्षा अन जिवीतास अधिक धोका निर्माण झाला हे दुर्दैवाने नमूद करावे लागेल अन अर्थातच त्याची कारणे वेगळी आहेत पण त्यापासून भारताला बरेच काही शिकण्या सारखे आहे.

एकंदरीत कुणाला पटो वा न पटो धोका (दहशतवाद या अर्थी) हा आज आपल्या जिवनाचा घटक बनलेला आहे... त्याला काबूत ठेवणे हे शक्य आहे पण त्याचे समूळ उच्चाटन सध्ध्या तरी अशक्य आहे.

धोका व्यवस्थापन या अनुशंगाने तुम्हाला काही मुद्दे सुचत असतील तर इथे अवश्य लिहा.

ता.क.: रोज रात्री झोपताना उद्या पुन्हा आपण जिवंत उठू, रात्री अचानक आपली फुफ्फुसे वा श्वसनसंस्था बंद पडणार नाही हे गृहीत धरून आपण झोपतो. जिथे हा रोजचा धोका आपण पत्करतोय तिथे दहशतवाद हा काही नविन पाहुणा राहिलेला नाही.

विषय: 
प्रकार: 

.... जन्माला येणारा प्रत्येक जण मरणारच आहे. अन दहतवादी कारवाई त मेला तर त्यात वाईट वाटण्या सारखे काय आहे? दहशतवादा च्या लढाईत जरी तो मेला नाही तरी, असा न तसा तो मरणारच आहे ना?

ता. क. हे माझे नव्हे... सलाल्लुद्दीन चे मत हे..... तो च तो पाकी अतिरेकी संघटनांचा प्रमुख!

मला वाटत नाही सध्ध्या जे काही होत आहे ते system failure आहे, ते अनुशासन वा implementation failure अधिक आहे म्हणूनच अशा system ला नेत्याची नाही व्यवस्थापकाची गरज आहे. >>

हो..... योजकः तत्र दुर्लभः अशीच परिस्थिती आहे...

धोका व्यवस्थापन ला आम्हि " आपत्कालिन व्यवस्थापन " असे म्हणतो. मी स्वतः ७ दिवसाचा कोर्स केला आहे. खुपच उपयुक्त आणि आजच्या काळात सर्वांना आवश्यक असा हा अभ्यास क्रम आहे. आज ज्ञात अज्ञात सर्व धोके, त्यांच्याबद्दल माहिती आणि त्यापासुन बाचावाचे शक्य असलेले सर्व उपाय ह्यांचा प्रात्यक्शिक नुसार सराव करुन घेतला जातो. उदाहरण म्हणजे ... आतचेच पाहुया. ताज मधुन बर्याच लोकाना वरच्या मजल्यावर अडकलेले पाहिले. फायर ब्रिगेड येईल तेव्हा येइल तोपर्यंत शक्य असल्यास चादरी दुपट्टा साडी जे असेल ते वापरुन गाठी मारुन दोर बनवावा आणि उतरण्याचा प्रयत्न करावा. जसा काहि लोकानी केलाहि टी वी वर पाहिले. अश्या प्रसंगी गाठी कशा माराव्यात ह्याची माहिति असल्यास उपयोगी पडते.

वेळेअभावी मी सुरुवात आता करत नाही. लवकरच एक एक धोका आणि त्याची माहिति, त्यापासुन बचावाच्या शक्यता... जेवढे मला माहित आहे, किवा माहिति लिहण्याचा लवकरच प्रयत्न करेन.

चला आपण सर्व एक एक धोका पाहुयात आणि सजग राहुयात. न जाणो उद्या अशी एखादी वेळ आपल्या पैकी कोणावर आली तर अश्या प्रसंगी कसे वागावे ह्याचे भान राहु शकते.

विमानाचे अपहरण केले, अतिरेकी हल्ला झाला, आकाशातुन हवाई हल्ल्ला झाला, रॉकेट , मिसाईल्स चा मारा करण्यात आला, जैविक बॉम्ब चा मारा झाला किवा विषारी वायु चा मारा करण्यात आला, पुर, भुकंम्प, सुनामी, दंगल, युद्ध, अणुबॉम्ब ( ह्याची माहिती असलेली बरी)

एखाद्या विषयाचे अज्ञान हे जास्त भयवह असते. त्यापेक्शा जुजबी ओळख असणे केव्हाही चांगलेच.

एका इस्रायली संस्थेने १८०० भारतीय फक्त गेल्या दिड वर्षात दहशतवादामूळे मेले अशी नोंद केलीये, आपल्या सरकार कडे तशी नोंद आहे का? ह्याची मला खात्री नाही.

योग लेख चांगलाच आहे. फक्त ते इस्रायली कमांडो कडे सोपवने असे लोक म्हणत होते ते आवडले नाही. आत्ता महाराष्ट सरकारने परत मुंबईचा मुद्दा उपस्थित केला तर लालू, अमरसिंग सारखे लोक परत विरोध करनार. मुंबई बद्दल काहीतरी करने आवश्यक आहे.

मला खूप विस्कळीत वाटला लेख. 'धोका टाळणे','कमी करणे' इत्यादी कल्पना इथे लागू करताना त्याची दिलेली उदाहरणे चुकीची आहेत आणि उपाय सुचवलेले नाहीतच किंवा चुकीचे आहेत. धोका टाळणे हे अशक्य आहे असं तुम्ही म्हणता आहात, पुन्हा धोका कमी करण्यासाठी "राष्ट्रीय मान्यता असलेल्या जागांवर सतत कडक सुरक्षा ठेवणे" हा उपाय म्हणता, पण याच जागा "धोकादायक" कशावरुन?
मुळात 'धोका कुठून आहे' हे पाहून तो कमी करण्याचा उपाय पूर्ण शक्तीनिशी तिथेच पहिल्यांदा झाला पाहिजे!

>>आत्मघातकी हल्ले, धर्माच्या नावाखाली केलेले स्फोट, लोकहत्त्या हा दहशतवाद मला तरी स्थानिक वाटत नाही. तो आंतरराष्ट्रीय स्तरावर पोसलेला अजेंडा आहे. सामन्य नागरीकाच्या कक्षेबाहेर त्याची व्याप्ती अन उगम आहे अन तिथे देश, सरकार यांची सुरक्षा विषयक धोरणेच जास्त महत्वाची ठरतात

हे बरोबर आहे. आणि भारत सध्या याच प्रकारच्या दहशतवादाचा बळी आहे. तेव्हा कोणती धोरणे महत्वाची ठरतात ते तुम्ही लिहिलेच आहे.

>>माझ्या आधीच्या लेखात मि असे म्हटले होते की दैनंदीन जिवनात अगदी छोट्या गोष्टिन्ची सुरक्षा, जागरुकता आपण दाखवली तरी धोका कमी करता येतो. याने दहशतवाद कसा कमी होईल? असा प्रश्ण उपस्थित होतो. याचे उत्तर मला थोड्या वेगळ्या दृष्टीकोनातून द्यायचे आहे.
या संपूर्ण पॅरामध्ये तुम्ही जे काही लिहिले आहे त्याच्याशी मी अजिबात सहमत नाही. मुंबईतल्या धकाधकीच्या जीवनाचा ताण पडून शासन आणि समाजाबद्दल आकस निर्माण होऊन लोक दहशतवाद्याना मदत करतात?? हे काही पटले नाही.
पुन्हा यावर उपाय म्हणून तुम्ही म्हणता-
>>तेव्हा प्रत्त्येक नागरीकाने एक जबाब्दार सक्षम नागरीक म्हणून स्वताबरोबर दुसर्‍याची किमान काळजी ठेवणे गरजेचे आहे.
म्हणजे नक्की काय करायचे? त्याने धकाधकीच्या जीवनाचा ताण कसा कमी होणार?

भारतात सतत हल्ले होतात याचे कारण भारत 'इझी टार्गेट' आहे. जेव्हा कडक सुरक्षा व्यवस्था येऊन अश्या गोष्टी करणे अवघड होऊन बसेल तेव्हा ते गप्प बसतील किंवा दुसर्‍या इझी टार्गेटकडे वळतील. अमेरिकेने हेच केले. जेव्हा इथे हल्ले करणे सोपी गोष्ट राहिली नाही (तशी ती कधीच नव्हती, म्हणूनच जे झाले ते खूप प्लॅन करुन झाले.) तेव्हा पुन्हा हल्ले झाले नाहीत. नजीकच्या काळात होणार नाहीतच असे नाही, पण ते करणे सोपे नाही आहे! काल राईसबाईंची मुलाखत होती 'धीस वीक' मध्ये. तेव्हा त्या म्हणाल्या, सप्टे. ११ नंतरचा त्यांचा प्रत्येक दिवस हा सप्टे. १२ सारखा आहे.

इथे काय उपाय योजले याची लिस्ट मला नको होती, मला एवढंच म्हणायचं होतं की बदललेल्या व्यवस्थेशी सहकार्य करण्याव्यतिरिक्त माझ्यावर अन्य कोणतीही जबाबदारी नव्हती. आणि जगातल्या कुठल्याच सामान्य नागरिकावर याचा अतिरिक्त बोजा असता कामा नये, ताण असता कामा नये.

>>आपल्या बाजूला राहणारा विद्यार्थी हा अशा संशयास्पद कामात, कटात गुंतला आहे याची शेजारच्या अमेरिकन माणसाला खबरबातही नव्हती. शक्यतो इतरांच्यात ढवळाढवळ न करणार्‍या अन आपले आपले जपणार्‍या टिपिकल अमेरिकन रहाणीमानाचा तो एक तोटा होता
अमेरिकन माणूस अजूनही असाच रहातो. त्यात काहीही बदल झालेला नाही. दहशतवाद हा जीवनाचा घटक बनवून घेणे मला मान्य नाही. भारतातल्या आणि कुठल्याच व्यक्तीच्या जीवनाचा तो भाग असता कामा नये. त्यांना सुरक्षित आयुष्य जगण्याचा अधिकार आहे. आधीच ताण कमी नाहीत. त्यांना ती सुरक्षा पुरवणे योग्य प्रयत्न केल्यास शक्य आहे. एखाद्या देशातली जनता दहशतवादाला जीवनाचा घटक समजून वागणार असेल तर त्या जनतेने एकही नवीन जीव जगात आणू नये!

योग, लेख चांगला आहे.

९-११ नंतरच्या अमेरिकेच्या दहशतवादविरोधी यंत्रणेबद्दल भारताची तुलना करणं मला मुळात योग्य वाटंत नाही. कारण भारतासमोर कश्याही प्रकारची यंत्रणा राबवताना येणार्‍या त्रुटी फार वेगळ्या प्रकारच्या आहेत, उपस्थित होणारे अडथळे वेगळे आहेत. ह्या संदर्भात काही करायचंच झालं तर अमेरिकेचं मॉडेल अभ्यासून ते भारतासारख्या देशाला कशाप्रकारे ऍडाप्ट करता येईल ह्याचा विचार आवश्यक आहे असं मला वाटतं.

>>दहशतवाद हा जीवनाचा घटक बनवून घेणे मला मान्य नाही.
तो कुणालाच मान्य नसतो. पण सत्य परिस्थिती नेहमीच काय मान्य आहे किंवा नाही ह्याच्याशी सांगड घालून नसते हे कबुल असावं. तो तसा घटक होऊ नये म्हणून काय करता येईल ह्याचसाठी सगळा खटाटोप.

>>एखाद्या देशातली जनता दहशतवादाला जीवनाचा घटक समजून वागणार असेल तर त्या जनतेने एकही नवीन जीव जगात आणू नये!
हे खूप भावुक विधान झालं. पण इस्त्रायलसारखं राष्ट्र 'दहशतवादाला जीवनाचा घटक' मान्य करुनही जगतंय.

मृ, लेख का आवडला ते लिही. Happy
>>एकंदरीत कुणाला पटो वा न पटो धोका (दहशतवाद या अर्थी) हा आज आपल्या जिवनाचा घटक बनलेला आहे
असं योगनी वर लिहिलं आहे.

>>पण इस्त्रायलसारखं राष्ट्र 'दहशतवादाला जीवनाचा घटक' मान्य करुनही जगतंय>>
हे कशावरुन? त्यांच्या देशातही सतत दहशतवादी हल्ले होतात म्हणून काय त्यांची मानसिकता अशी बनली आहे असं आपण ठामपणे कसं काय म्हणू शकू? 'दहशतवादी प्रवृत्ती आहेत' हे मान्य करुन त्यावर उपाय करणं वेगळं आणि त्याला 'जीवनाचा घटक' म्हणणं वेगळं.

मागच्या लेखाच्या शेवटी 'सामान्य माणसाने दैनंदिन जीवनात काय करावे म्हणजे त्याचा दहशतवाद रोखायला मदत होईल' यावर लेख लिहिणार म्हटले होते. तो हाच असावा म्हणून त्या दृष्टीने मी पाहिले तर मला काही उत्तरे सापडली नाहीत.

लालू, तुझा हा प्रश्ण आमच्या मराठीच्या बाईंसारखा वाटला : (सानुनासिक) "दिघे, नुस्तंच चांगलाय उतारा म्हणून चालंत नाही. संदर्भासह स्पष्टीकरण दे!!!! "

'लेख आवडला' म्हणून पटला असं होत नाही. पण एकूण बराच विचार करून लिहिलाय असं वाटलं. भाषा आवडली. मुख्य म्हणजे मला समजला!!!!! Proud

इस्त्रायल आणि दहशतवाद ह्यावर माझ्या इस्त्रायली सहकार्‍यांनी दिलेले लेख वाचलेत. एकून ६ इस्रायली लॅबमधे होते. त्यांच्याशी बोलणं व्हायचं. 'बर्‍याच गोष्टींचा सोक्षमोक्ष लागल्याशिवाय देशात शांततेचा विचारही अशक्य आहे.' हे त्यांचं म्हणणं. माझे प्रश्ण 'राजकीय स्तरावर काय करता येईल' वगैरेपेक्षा 'तुम्हाला भिती नाही का वाटंत?' बाजारात जाणारा नवरा किंवा बायको घरी सुखरुप परत येईल की नाही' असे असायचे. परिस्थिती तशीच होती. वरचेवर बॉम्ब्स्फोट व्हायचे. पण हे लोक वरवर तरी खंबीर दिसायचे. 'हे तर घडंत रहाणार. घाबरलो तर दैनंदिन जीवन कसं चालणार?' हा त्यांनी विचारलेल्या प्रश्णाचा अवाका तेव्हा मला कळला नव्हता!

खाली काही लेखांची लिंक देतेय. वाचण्यासारखे आहेत. माझ्या जुन्या ई-मेल्समधे त्या सहकार्‍यांनी पाठवलेल्या लिंक्स शोधते. मिळाल्या तर इथे नक्की देईन.
http://www.slate.com/id/2186143/entry/2186144/
http://www.ariel-sharon-life-story.com/08-Ariel-Sharon-Biography-1971-Wa...
http://www.life-after-terror.org/ स्तुत्य उपक्रम.
हा ब्लॉग एका अमेरिकनचा... http://dailysally.blogspot.com/2006/02/terrorism-daily-fact-of-life.html ह्या लेखातलं हे वाक्य And yet Israelis too--at least on the surface--worry more about taxes than terrorism. कुठेतरी मनात घर करून बसलं. Throughout Israel, risk management is a necessary daily fact of life. हे ब्लॉग लेखकाचं वाक्य परिचीत वाटलं.

Mrinmayee,

लिंक्स चांगल्या आहेत... धन्यवाद!

Bhumika,
धोका व्यवस्थापन व आपत्कालीन व्यवस्थापन एकच वाटले तरी थोडे वेगळे विषय आहेत... धोका व्यवस्थापन बहुतांशी proactive असते, आपत्कालीन हे बहुतांशी reactive असते. अर्थात दोन्ही तितकेच महत्वाचे आहेत. चांगली माहिती लिहीलीस.

Lalu,
I wish this article had all the answers you were expecting... for now I guess noone has answers to this problem.
तरिही या लेखात मि म्हटले तसे "first response resource" होण्यासाठी (यात भरपूर गोष्टि आल्या ज्या त्या उतार्‍यात लिहील्या आहेत) जबाबदार नागरीक म्हणून जे जे आवश्यक आहे ते ते दैनंदीन जीवनात केले तरी दहशतवादाचा धोका बर्‍याच प्रमाणात कमी होवू शकेल. मि दहशतवादाकडे "समाजविघातक तत्व/कृत्त्य" या अर्थी पहातो आहे, बाँबस्फोट, ak47, 56, फक्त या अर्थी नव्हे.

>>'हे तर घडंत रहाणार'
नेमकं हेच यावेळी मुंबईकरांनी आणि भारतीयांनी नाकारलं ना? तसंच पाहिजे.
लिन्क मधला पहिला लेख Israel's tradition of combining tourism and lobbying वर आहे. 'Life after terror' उपक्रम चांगला आहे. त्या अमेरिकनच्या ब्लॉगवरचे Americans think we know what it means to live with terrorism हे पहिले वाक्य वाचल्यावर पुढचे काही वाचण्याची गरज वाटली नाही.

मृ, स्पष्ट केलंस ते बरं झालं. कारण हा वैचारिक लेख आहे. 'भाषा आवडली' म्हणणं म्हणजे एक वैचारिक लेख म्हणून तो फसला असा अर्थ होतो. 'विचार करुन लिहिलाय' पेक्षा मला असं वाटलं की लेख लिहिण्यापूर्वी जो विचार केलाय तोच लिहून काढलाय. आणि तो विचारही पूर्ण झालेला नाही त्यामुळे त्यातून काही ठोस मुद्दे निघण्याऐवजी हे इन्ट्रॉडक्शन वाटते आहे. मूळ मुद्दे आलेच नाहीत. त्यामुळे तो विस्कळीत आणि पोकळ झालाय. कारण वाचताना प्रत्येक वाक्य आणि पॅरामधून काही अर्थ काढताना त्रास पडला. अजून एक लिहावा लागणार. Happy

>>मि दहशतवादाकडे "समाजविघातक तत्व/कृत्त्य" या अर्थी पहातो आहे
>>प्राथमिक शिक्षण, "मूल्यांकीत" शिक्षण, व्यापक विकसनशील धोरणे, किमान प्राथमिक आरोग्य सुविधा
योग, या गोष्टी असल्याच पाहिजेत. मग त्या जनतेला दहशतवादाची भीती असो वा नसो. तसंच या सुविधा ज्या देशातल्या जनतेकडे आहेत ते दहशतवादापासून मुक्त आहेत असेही नाही. त्यामुळे शिक्षण, प्राथमिक गरजांची पूर्तता या गोष्टींच्या अभावातून गुन्हेगारी सारखी समाजविघातक कृत्ये वाढतात हे मान्य आहे पण दहशतवाद आणि ही कृत्ये यात फरक आहे. असो. Happy

>>त्या अमेरिकनच्या ब्लॉगवरचे Americans think we know what it means to live with terrorism हे पहिले वाक्य वाचल्यावर पुढचे काही वाचण्याची गरज वाटली नाही.
पुढचं वाच!!!