यंदाच्या 'पिफ'ची काही खास आकर्षणं...

Submitted by चिनूक्स on 5 January, 2014 - 07:10

९ - १६ जानेवारी या काळात होणार्‍या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दोनशेहून अधिक चित्रपट दाखवले जाणार आहेत.

या चित्रपटांखेरीज काही खास कार्यक्रमही महोत्सवादरम्यान आयोजित केले आहेत. महोत्सवाचं उद्घाटन ९ जानेवारी रोजी दुपारी ४.१५ वाजता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते होईल.

भारतीय चित्रपटसृष्टीस महत्त्वाचं योगदान देणार्‍या दिग्गजांचा दरवर्षी महोत्सवात गौरव केला जातो. यंदा ख्यातनाम दिग्दर्शक श्री. अदूर गोपालकृष्णन व अभिनेते श्री. विनोद खन्ना यांचा भारतीय चित्रपटसृष्टीसाठी महान योगदान विशेष पुरस्कार - पिफ २०१४ या पुरस्कारानं गौरव केला जाणार आहे.

तसंच एस. डी. बर्मन इंटरनॅशनल अवॉर्ड फॉर क्रिएटिव्ह साऊंड अ‍ॅण्ड म्यूझिक हा पुरस्कार यंदा पं. हृदयनाथ मंगेशकार यांना प्रदान करण्यात येणार आहे.

हे दोन्ही पुरस्कार ९ जानेवारी रोजी होणार्‍या उद्घाटन सोहळ्यात देण्यात येतील.

उद्घाटन समारंभास महोत्सवाच्या ज्यूरीचे सदस्यही उपस्थित असतील. यंदाच्या ज्यूरीत दिलीप पाडगावकर (भारत), अजूम रजबअली (भारत), लॉरेन्स कार्डीश (अमेरिका), निकी करिमी (इराण), अ‍ॅलेक्झाण्ड्रा स्टुअर्ट्स् (कॅनडा), एदुआर्दो रोसोफ (मेक्सिको), क्लॉस मेक (जर्मनी), जेबिआ एंजिलो (स्पेन) या दिग्गजांचा समावेश आहे.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे सादर होणार्‍या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमानं या उद्घाटन सोहळ्याची सुरुवात होईल.

कार्यक्रमानंतर इस्रायलचा 'अ‍ॅना अरेबिया' हा अ‍ॅमाज् गिताई दिग्दर्शित चित्रपट दाखवण्यात येईल.

१० जानेवारीपासून ईस्क्वेअर (गणेशखिंड रस्ता), सिटिप्राईड (कोथरुड, डेक्कन, सातारा रस्ता), आयनॉक्स (बंडगार्डन रस्ता), राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय या एकूण सात ठिकाणी अकरा पडद्यांवर २३२ चित्रपट दाखवले जातील.

***

यंदाचा महोत्सव पूर्वीच्या महोत्सवांपेक्षा जरा वेगळा असणार आहे. यंदा प्रथमच महोत्सवादरम्यान लघुपट तयार करण्याची स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. स्पर्धेत भाग घेणार्‍यांनी तीन मिनिटांचा लघुपट तयार करायचा आहे. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. स्पर्धेची घोषणा महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी केली जाईल.

***

महोत्सवात दाखवल्या जाणार्‍या चित्रपटांमधून कलेची जाणीव व्यापक होते, त्याचप्रमाणे चित्रपटामागील अर्थशास्त्रही समजावं, यासाठी यंदा प्रथमच काही मास्टरक्लासांचं आयोजन केलं गेलं आहे. लॉस एंजल्स फिल्म काऊंसिलचं यासाठी सहकार्य लाभलं आहे.

पहिला मास्टरक्लास ११ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता असेल. सोनी पिक्चर्सच्या विद्या पाचस 'फिल्म फ्रँचाएझिंग' या विषयावर मार्गदर्शन करतील. नंतर उदय सिंग 'भारतीय चित्रपटांना जागतिक स्तरावर ओळख कशी मिळवून देता येईल' याबद्दल बोलतील. ही कार्यशाळा दुपारी १ वाजता असेल.

१२ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता फॉक्स-स्टार स्टुडिओजच्या मार्केटिंग विभागाचे प्रमुख असलेले विवेक कृष्णानी 'चित्रपटांचं मार्केटिंग कसा करावं' याबद्दल बोलतील. १३ जानेवारी रोजी 'इंटरनेटच्या युगात चित्रपटांचं आर्थिक गणित' या विषयावर सुधांशू वत्स हे व्हायाकॉम एटीन या संस्थेचे सीईओ यांचा मास्टरक्लास होईल.

यंदाचं विजय तेंडुलकर स्मृती व्याख्यान श्री. उदय निरगुडकर देणार आहेत. सेल्युलॉईड मागे पडून आज चित्रपट डिजिटल झाले आहेत. या तंत्रज्ञानाबद्दल, त्यातील अडचणींबद्दल, फायद्यांबद्दल ते बोलतील.

हे मास्टरक्लास व व्याख्यान महोत्सवात नोंदणी केलेल्या सर्वांना खुले असतील.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद चिन्मय, खुप मोलाची माहिती. कार्यक्रमात खुप नाविन्य आणि वैविध्य दिसते आहे. जमवायला हवे.
उदघाटन सोहळा कुठे असणार आहे?
हे उदय निरगुडकर म्हणजे पत्रकार आहेत तेच का?

हम्म... आम्हाला द्राक्षे आंबटच. Sad
पण बघु, किती बघायला मिळतात इथे. नाहीतर आमच्या लायब्ररीत ऑर्डर देईन. Happy