चांदण्यांनो ...

Submitted by Kiran P. Joshi on 5 January, 2014 - 03:34

भारली जणु तिच्या स्मृतींनी खेळणारी ही हवा
चांदण्यांनो प्रेरणांनी साजणीला जागवा.

मौनात गेले पक्षीगण सारे, नि:शब्द झाल्या दाही दिशा
थंडावली चाल पाना-फुलांची, सुस्तावली आज सारी निशा
कुणी न येथे निरोप सांगण्या, तुम्हीच माझे दूत व्हा...!

चांदण्यांनो प्रेरणांनी साजणीला जागवा.

सांगून टाका तिला एकदाचे, गुपीत सारे माझ्या मनाचे
भेटुनी गेली ती मला जे,उपकार सारे त्या त्या क्षणांचे
रोखुनी टाका पळ विरहाचे, छळ मनाचा थांबवा...!

चांदण्यांनो प्रेरणांनी साजणीला जागवा.

चढेल लाली गालावरती तिने हे सारे ऐकता
म्हणेल मजला ठाऊक सारे तुम्हे कशास हे सांगता?
सांगु नका आणखी कुणाला, करु नका हो गवगवा...!

चांदण्यांनो प्रेरणांनी साजणीला जागवा.

जर तुम्हास ती रागे भरली, थोडे देखील भिऊ नका
झाकुन टाकु चंद्र आपण, लपवुन टाकु तारका
विसरुन जा बुजण्यास आता धैर्य थोडे दाखवा !

चांदण्यांनो प्रेरणांनी साजणीला जागवा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users