
मी मिळतील ते वेस्टर्नपट पाहतो. आणि प्रत्येक चित्रपट दर्जेदार नसला तरी त्यात काहीतरी गवसतंच. आणि कंटाळा तर कधीच येत नाही. मात्र “लास्ट ट्रेन फ्रॉम गनहिल” ची गोष्टच वेगळी. दर्जेदार कलाकारांचा जबरदस्त अभिनय, चित्रपटाची वेग आणि शेवटपर्यंत प्रेक्षकांना खिळवुन, गुंगवुन ठेवणारी कथा, हे सारं असलं तरीही हा चित्रपट इतर वेस्टर्नपटांच्या तुलनेने तितकासा प्रसिद्ध नाही. याचं मला वाटणारं एक कारण म्हणजे, वेस्टर्नपटात नेहेमी दिसणारी मैदानं, टेकड्या, तुफान घोडेस्वारी, पटापटा बाहेर निघणार्या गन्स यात नाहीत. म्ह्णजे त्यादृष्टीने म्हणायचं झालं तर हा पारंपरिक वेस्टर्नपटाच्या चाकोरीतील चित्रपट नव्हे.
देखणा, उमदा कर्क डग्लस, एका टाऊन मधील मार्शल. त्याच्या पत्नीवर बलात्कार होतो. आणि बलात्कार करणार्याच्या घोड्याचे खोगीर हे नेमके त्याच्या जिवलग मित्राचे (अँथनी क्वीनचे)निघते. खोगीर घेऊन खुनी पकडायला निघालेला मार्शल अँथनी क्वीनच्या गनहिल टाउनमध्ये पोहोचतो. तेथे त्याच्या लक्षात येते कि आपला मित्र हा या टाऊनचा जवळपास मालकच आहे आणि पत्नीवर बलात्कार हा आपल्या मित्राच्या लाडावलेल्या मुलाने केलेला आहे. आपल्या गुन्हेगार मुलाला मार्शलच्या सुपुर्द करण्यास अँथनी क्वीन नकार देतो. कर्क डग्लसला गुन्हेगाराला पकडुन नेण्यासाठी संपूर्ण टाउन विरुद्ध एकाकी झुंज द्यावी लागते. “लास्ट ट्रेन फ्रॉम गनहिल” हे आहे त्या एकाकी झुंजीची कथा. गनहील टाऊनमधील शेवटची ट्रेन गुन्हेगाराला घेऊनच पकडण्याची जिद्द बाळगलेला डग्लस आणि त्याच्या विरुद्ध उभा ठकलेला त्याचा एके काळचा जिवलग मित्र अँथनी क्वीन. बाकी सारे प्रत्यक्ष चित्रपटातच पाहण्याजोगे. येथे सांगण्यात अर्थ नाही.
संपूर्ण चित्रपटात तणावपूर्ण वातावरण असल्याने, मोकळी जागा अशी कुठेच नाही. विनोद निर्मिती, खुसखुशीत संवादाला वावच नाही. सुरुवातीपासुनच कर्क डग्लस गुन्हेगाराला पकडण्यासाठी गनहिलला येतो आणि त्याला प्रत्येकाकडुन विरोधच होतो. नकळत त्याचे दु:ख हे प्रेक्षकांचे दु:ख बनुन जाते. त्याने योजलेला प्रत्येक उपाय यशस्वी व्हावा, त्याला कुठुनतरी मदत मिळावी अशी इच्छा धरुन आपण पुढची दृश्ये पाहु लागतो. मात्र त्यामुळे प्रत्येक दृश्य हे मास्टरपीस झालेले आहे. असे चित्रपट फार कमी पाहायला मिळतात ज्यात एखादीही फ्रेम वाया गेल्यासारखी वाटत नाही. एखादे दृश्य नसते तरी चालले असते असे वाटत नाही. हा या जातकुळीतला चित्रपट आहे. येथे याचं एखादं उदाहरण द्यायला हरकत नसावी.
हताश झालेला कर्क डग्लस गुन्हेगाराला पकडण्यासाठी वणवणत असतो. एव्हाना पर्यंत त्या छोट्याशा गनहिलमध्ये हा मार्शल कशासाठी आलेला आहे हे माहित झालेले असते. सारी माणसे अँथनी क्वीनची आश्रीत असतात. त्याचवेळी डग्लसला समोर ओट्यावर तीन माणसे त्याच्याकडे पाहात असलेली दिसतात. निराश व्हायला तयार असलेला डग्लस त्यांच्याजवळ येऊन गुन्हेगाराचा पत्ता विचारतो. पत्ता सांगणे तर दुरच पण त्याच्या पत्नीवर झालेल्या बलात्काराचा अत्यंत घृणास्पद रितीने उल्लेख होतो. हा उल्लेख करणारा बोलत बोलत डग्लसजवळ जातात अक्षरश विद्युत वेगाने डग्लस कोपराचा एक घाणाघाती फटका त्याच्या चेहर्यावर हाणुन त्याला लोळवतो. या दृश्याने थक्क व्हायला होतं. असे अनेक “पंचेस” चित्रपटात आहेत.
कलाकारांच्या कामाबद्दल काय म्हणणार. कर्क डग्लसचा मार्शल कायम लक्षात राहणारा. त्याला वाटत असलेली चीड, हताशा, हृदयात दडवलेले दु:ख सारे अगदी चेहर्यावर वाचुन घ्यावे. हसरा डग्लस फक्त पहिली पाच मिनिटेच आहे. त्यानंतर संघर्षात बुडालेला डग्लस पेक्षकांची मने जिंकतो. अँथनी क्वीनच्या भुमिकेला जास्त कंगोरे आहेत. त्याला मुलाची चुक मान्य असते. मात्र त्याच्यातला बाप मुलाला मार्शलच्या हवाली करायला तयार होत नाही. पुत्रप्रेम आणि मैत्री यांच्या कचाट्यात सापडलेली ही व्यक्तीरेखा अँथनी क्वीनने जबरदस्त उभी केली आहे. हा प्रेक्षकांची सहानुभुती मिळवुन जातो. आणखी एका अत्यंत गुणी अभिनेत्रीचा उल्लेख करावाच लागेल. ती म्हणजे कॅरोलिन जोन्स. “हाऊस ऑफ वॅक्स” मध्ये हीचं काम खुप आवडलं होतंच. एक अतिशय अवघड भुमिका या अभिनेत्रीने “लास्ट ट्रेन…” मध्ये साकारली आहे. ही डग्लसला मदत करणारी गनहिलमधील एकमेव व्यक्ती.
“लास्ट ट्रेन फ्रॉम गनहिल” हा वेस्टर्नपट म्हणजे सर्जियो लिऑनची “द गुड…” किंवा “वन्स अपॉन अ टाईम” नव्हे. नेहेमीच्या अपेक्षा बाळगुन हा चित्रपट पाहता येणार नाही. मात्र एक अगदी वेगळ्या धाटणीचा वेस्टर्नपट पाहिल्याचं समाधान हा चित्रपट नक्कीच देऊन जातो.
अतुल ठाकुर
छान लिहिलयं, पहायला आवडेल.
छान लिहिलयं, पहायला आवडेल. तसे वेस्टर्न धाटणीचे चित्रपट मल एवढे आवडत नाहीत, पण तुम्ही इतकं छान रसग्रहण केलय या चित्रपटाचं, तर हा पाहेन.
लिस्ट मधे टाकला हा माहितही
लिस्ट मधे टाकला
हा माहितही नव्हता मला.
पहायला हवा.
पहायला हवा.
बघणार.... अजुन लिहा तुमच्या
बघणार.... अजुन लिहा तुमच्या आवडत्या पश्चिमीपटांबद्दल.
I also liked western movies.
I also liked western movies. A similar movie I remember was "Man Hunt". But best was "Vera Cruz" starring Burt Lanchester and Garry Cooper.
वेरा क्रुझ वर लिहायचे आहे
वेरा क्रुझ वर लिहायचे आहे कुरेसाहेब
छानच लिहिलंय. कर्क डग्लस
छानच लिहिलंय.
कर्क डग्लस म्हणजे मायकल डग्लसचा बाप ना?
मस्त लिहिलय
मस्त लिहिलय
छान लिहीले आहे! याच थीमवर
छान लिहीले आहे!
याच थीमवर कोणतातरी हिंदी सिनेमा पाहिल्याचे अंधूक आठवते आहे, बहुतेक भवानी जंक्शन.
भवानी जंक्शन पाहिला का एकदम
भवानी जंक्शन पाहिला का एकदम ह्याच्यावर आधारित आहे.
छान लिहीले आहे ..
छान लिहीले आहे ..
खरंच एक अप्रतिम चित्रपट ! छान
खरंच एक अप्रतिम चित्रपट ! छान मांडलीय ही आठवण !!
कथानकातलं द्वंद्व व तें साकार करायला दोन कसलेले अभिनेते [ अँथनी क्वीनच्या अभिनयाबद्दलसुद्धां काय बोलावं ! ] यामुळे व इ. सर्वच बाबतीत 'वेस्टर्न मूव्हीज'ना एका वेगळ्याच उंचीवर नेणारा हा अविस्मरणीय चित्रपट.
<< कर्क डग्लस म्हणजे मायकल डग्लसचा बाप ना? >> मला - किंवा माझ्या पिढीतल्याना - " मायकल डग्लस म्हणजे कर्क डग्लसचा मुलगा ना ? " , असं विचारलेलं अधिक रुचेल ! [ अर्थात, मायकलला कमी न लेखतां ].