देहाच्या गाडीची मारू बेल डबल

Submitted by बेफ़िकीर on 28 December, 2013 - 13:39

मळमळवे दुर्गंध सुडाच्या वांत्यांचा
घुसमटवे सहवास चिकटत्या नात्यांचा
ईर्ष्येच्या पायावर वसलेली सख्ये
छुपा विषारी डंख मखमली पात्यांचा

चौकशीस एखादी खिडकीही नाही
वेळ घालवायाला टपरीही नाही
खिसा स्वभावाचा कापाया ही गर्दी
चोर सुखाचा पकडाया कोणी नाही

आठवणींचे स्थानक आहे गजबजले
ज्यामध्ये माझे हे माझेपण रुजले
मुळापासुनी उपटावे व्यक्तित्वाला
स्वप्न प्रवाही होण्याचे ज्याचे थिजले

गैरमुसल्सल आयुष्या कर नवी गझल
रितेपणाच्या गावी जाण्या काढ सहल
इच्छेच्या प्राबल्याचे इंधन भरुनी
देहाच्या गाडीची मारू बेल डबल

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रितेपणाच्या गावी जाण्या काढ सहल
इच्छेच्या प्राबल्याचे इंधन भरुनी
देहाच्या गाडीची मारू बेल डबल>>

व्वा व्वा!

खिसा स्वभावाचा कापाया ही गर्दी
चोर सुखाचा पकडाया कोणी नाही....... वा

आठवणींचे स्थानक आहे गजबजले
ज्यामध्ये माझे हे माझेपण रुजले
मुळापासुनी उपटावे व्यक्तित्वाला
स्वप्न प्रवाही होण्याचे ज्याचे थिजले.....क्या बात

गैरमुसल्सल आयुष्या कर नवी गझल
रितेपणाच्या गावी जाण्या काढ सहल
इच्छेच्या प्राबल्याचे इंधन भरुनी
देहाच्या गाडीची मारू बेल डबल..........अशक्य आवडल हे कडवं

धन्यवाद !

कवितेतून अस्वस्थतेचा भाव चांगला प्रकट झालाय.

मळमळवे दुर्गंध सुडाच्या वांत्यांचा
घुसमटवे सहवास चिकटत्या नात्यांचा >>> या ओळी, त्यांतील अर्थामुळे आणि
बीभत्स रसाचा स्पर्श झाल्याने सर्वात खास वाटल्या.

खिसा स्वभावाचा कापाया ही गर्दी >>> छान.
गैरमुसल्सल आयुष्या कर नवी गझल >>> मस्त.

बीभत्स वास्तव , नकारात्म भावना यांच्या टप्प्यावरून सहल निघाली आहे तीही रितेपणाच्या गावाला आणि तरीही उत्साह , आशावाद लपता लपत नाहीय शेवटच्या कडव्यातला..इच्छेच्या इंधनाची जादू औरच !