सॅव्हेज माऊंटन - १

Submitted by स्पार्टाकस on 27 December, 2013 - 01:27

भारताच्या उत्तरेला हिमालयाच्याच तोडीची पण कमी लांबीची एक पर्वतरांग पसरलेली आहे.

काराकोरम !

काराकोरम पर्वतरांग सुमारे ५०० किमी पसरलेली आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगिट-बाल्टीस्तान, भारतातील लडाख आणि चीनच्या झिअ‍ॅन्ग्जँग प्रांतात पसरलेल्या या पर्वतश्रेणीत जगातील काही सर्वोच्च शिखरांचा समावेश होतो.

काराकोरमचा सुमारे २८ ते ५०% भाग ग्लेशीयर्सने भरलेला आहे. हिमालय (८-१२%) आणि आल्प्स (२-३%) च्या तुलनेत हे प्रमाण खूपच जास्त आहे. धृवीय प्रदेशांचा अपवाद वगळता जगातील सर्वात मोठी ग्लेशीयर्स इथे पसरलेली आहेत. भारत आणि पाकीस्तानच्या दरम्यानचं सियाचेन ग्लेशीयर आणि बिआफो ग्लेशीयर ही धृवीय प्रदेशाबाहेरील दुस-या आणि तिस-या क्रमांकाची सर्वात मोठी ग्लेशीअर्स आहेत.

काराकोरमच्या आग्नेयेला तिबेटचं पठार आहे. उत्तरेला पामीर पर्वतरांग पसरलेली आहे. दक्षिणेला पूर्व-पश्चिम वाहणा-या गिलगीट, सिंधू आणि श्योक नद्या आहेत. या नद्यांच्या खो-यांमुळेच हिमालयाच्या वायव्य टोकापासून काराकोरम पर्वतरांग अलग झालेली आहे. पाकीस्तान आणि चीन यांना जोडणारा काराकोरम हायवे याच भागातून जातो.

१८५६ साली ब्रिटीशांनी हिंदुस्थानचा शास्त्रोक्त पध्दतीने सर्व्हे करण्यास सुरवात केली. या सर्व्हेत अर्थातच काराकोरम पर्वताचा समावेश होता. १८८७ मध्ये कर्नल फ्रान्सिस यंग्सबँड मुझ्ताग खिंड पार करण्यात यशस्वी झाला. जनरल जॉर्ज कॉकरील १८९२ मध्ये हन्झा नदीच्या खो-यात पोहोचला. परंतु त्यापूर्वीच १८५८ मध्ये थॉमस माँटगोमेरीने काराकोरमच्या पर्वतशिखरांची नोंद केली होती. मात्र यातील एक शिखर मात्र खूपच दूरच्या प्रदेशात असल्याचं त्याच्या ध्यानात आलं होतं. बाल्ट्रू ग्लेशीयरवरच्या अस्कोल या शेवटच्या गावातून तर हे शिखर दिसतही नव्हतं. ग्लेशीयरच्या शेवटच्या टोकावरून आकाशात घुसल्याप्रमाणे दिसणारं पर्वताचं शिखरच दृष्टीस पडत होतं.

माँटगोमेरीने काराकोरम पर्वताच्या पाच शिखरांना के १ ते के ५ अशी नावं दिली. यथावकाश के १, के ३, के ४ आणि के ५ यांचं स्थानिक भाषेतील प्रचलीत नावांप्रमाणे अनुक्रमे माशेर्ब्रम, ब्रॉड पीक, गशेर्ब्रम २ आणि गशेर्ब्रम १ असं नामकरण करण्यात आलं, पण या मालिकेतील दुस-या शिखराला मात्र माँटगोम्रेरीने दिलेलं नावच आजतागायत चिकटून राहीलं आहे.

के २ !

K2 - 01.jpg

गिलगीट-बाल्टीस्तान आणि चीनच्या ताक्सकोर्गन ताजिक प्रांताच्या सीमारेषेवर असलेलं के २ हे माऊंट एव्हरेस्टच्या खालोखाल जगातील दुस-या क्रमांकाचं सर्वोच्च शिखर आहे. ८६११ मी ( २८२५१ फूट ) उंच असलेलं के २ हे काराकोरम मधील सर्वोच्च शिखर आहे.

के २ मुख्यतः नजरेत भरतं ते सभोवतालच्या प्रदेशाच्या तुलनेत असलेल्या त्याच्या उंचीमुळे. आसपासच्या ग्लेशीयर्सने भरलेल्या खो-यांपेक्षा के २ चं शिखर सुमारे ३००० मी ( १०००० फूट ) उंचावर आहे ! के २ चं शिखर हे चारही बाजूंनी तीव्र उतार असलेल्या पिरॅमीडसारखं आहे. ४००० मी अंतरात २८००-३००० मी उंची गाठणा-या के २ ची चढाई एव्हरेस्टच्या तुलनेने जास्त धोकादायक मानली जाते. शिखरावर पोहोचणा-या दर चार गिर्यारोहकांच्या तुलनेत एका गिर्यारोहकाला आपले प्राण गमवावे लागले आहेत. के २ चं मृत्यूचं प्रमाण ( मॉर्टेलीटी रेशो ) जगातील सर्वात जास्त मृत्यूप्रमाण असलेल्या अन्नपूर्णाच्या पाठोपाठ दुस-या क्रमांकावर आहे !

१८९२ मध्ये मार्टीन कॉनवेच्या नेतृत्वाखालील मोहीमेने कॉन्कोर्डीया वर प्रथम पाऊल ठेवलं. बाल्ट्रू आणि गॉडविन-ऑस्टेन ग्लेशीयर सांधणा-या कॉन्कोर्डीया इथून काराकोरमच्या सर्वोच्च शिखरांचं दर्शन होतं. खराब हवामानामुळे कॉनवेच्या मोहीमेला केवळ शिखरांचं दुरून निरीक्षण करण्यावरच समाधान मानावं लागलं.

१९०२ साली ऑस्कर एकेन्स्टाईन, अ‍ॅलीस्टर क्रॉली, जूल्स जॅकॉट-गिलर्मोड, हेन्रीक फ्नल, व्हिक्टर वेलस्ली आणि गाय नोवेल्स यांनी आग्नेय दिशेने चढाईची योजना आखली. के २ वरील ही पहिली मोहीम ! आधुनीक दळणवळणांचा संपूर्ण अभाव असलेल्या त्या प्रदेशातून के २ चा पायथा गाठण्यासच त्यांना तब्बल १४ दिवस लागले ! अत्यंत प्रतिकूल हवामानात त्यांनी तब्बल पाच वेळा चढाईचा प्रयत्न करुन ६५२५ मी ( २१४०६ फूट ) उंची गाठली. परंतु निरुपायाने त्यांना आपली मोहीम आवरती घ्यावी लागली.

१९०९ मध्ये अ‍ॅब्रझीचा ड्यूक लुईगी अमीडीओ याच्या नेतृत्वाखाली के २ वर मोहीम आखण्यात आली. के २ च्या ईशान्य धारेवरून चढाई करत त्यानी ६२५० मी ( २०५१० फूट ) उंची गाठली. ईशान्येकडील ही धार पुढे अ‍ॅब्रझी स्पर म्हणून के २ वरील चढाईच्या सर्वात रूळलेल्या वाटेचा एक भाग झाली असली, तरी त्यावेळी ती कठीण चढाईमुळे बाद ठरवण्यात आली होती ! चढाईचा दुसरा कोणताही मार्ग न सापडल्यामुळे अमीडीओने के २ वर कोणीही कधीच चढाई करू शकणार नाही असं भाकीत केलं !

अ‍ॅब्रझीच्या ड्यूकच्या दाव्यामुळे पुढची २९ वर्षे के २ वर चढाईचा कोणीही प्रयत्न केला नाही. १९३८ साली चार्ल्स ह्यूस्टनच्या नेतृत्वाखाली अमेरिकन मोहीमेने चढाईच्या दृष्टीने के २ ची पाहणी केली. अ‍ॅब्रझी स्परवरून पुढे जाणारा मार्ग हाच शिखरावर पोहोचण्याचा योग्य मार्ग असल्याची त्यांची पूर्ण खात्री पटली. ह्यूस्टनच्या तुकडीने ८००० मी ( २६००० फूट ) उंचीपर्यंत चढाई केली, परंतु खराब हवामान आणि संपत आलेल्या अन्नसाठ्यामुळे त्यांना माघार घ्यावी लागली.

१९३९ मध्ये फ्रिट्झ विस्नरच्या नेतृत्वाखाली अमेरिकन पुन्हा के २ वर परतले. विस्नर शिखरापासून केवळ २०० मी ( ६६० फूट ) अंतरावर असताना त्याला परत फिरावं लागलं. दुर्दैवाने बेस कँप वर परतताना डडली वोल्फ, पसांग किकुली, पसांग कितर आणि पिंटसो पर्वतावर रहस्यमयरित्या गायब झाले.

दुस-या महायुध्दामुळे आणि भारत-पाकीस्तान स्वतंत्र झाल्यावर १९४७ सालच्या काश्मीर वादामुळे के २ वर चढाईसाठी गिलगिट परिसरात प्रवेश करणं मुष्कील झालं होतं. १९५३ मध्ये चार्ल्स ह्यूस्टनने पाकीस्तान सरकारची परवानगी मिळाल्यावर पुन्हा के २ च्या मोहीमेसाठी जुळवाजुळव सुरू केली. स्वतः ह्यूस्टन, रॉबर्ट बेट्स, रॉबर्ट क्रेग, आर्ट गिल्के, डी मोलीनर, जॉर्ज बेल, टोनी स्ट्रेथर आणि पीट स्कोनींग हे या मोहीमेतील गिर्यारोहक होते. मात्र प्रतिथयश गिर्यारोहक विली उन्सोल्ड, पॉल पेट्झोल्ड्ट आणि खुद्द फ्रिट्झ विस्नरचा या मोहीमेत समावेश करण्यात आला नव्हता !

सर्व गिर्यारोहकांची रावळपिंडीत भेट झाली आणि त्यांनी विमानाने स्कार्दू गाठलं. स्कार्दूहून अस्कोलमार्गे लांबलचक ट्रेक करत त्यांनी बाल्ट्रू ग्लेशीयर वरून २० जूनला के २ चा पायथा गाठला. १९३८ च्या मोहीमेचा अनुभव असल्याने ह्यूस्टनने अन्नाची भरपूर तरतूद असलेले कँप स्थापन करण्यावर भर दिला होता. मात्र मदतीला शेर्पा नसल्याने अन्नधान्याची वाहतूक करण्यासाठी गिर्यारोहकांनाच कँप दरम्यान फे-या माराव्या लागणार होत्या.

१ ऑगस्टपर्यंत ७८०० मी उंचीवर कँप ८ उभारण्यात आला होता. २ ऑगस्टला सर्व गिर्यारोहक कँप ८ वर पोहोचले आणि शिखरावरील अंतिम चढाईच्या दृष्टीने त्यांनी तयारीस सुरवात केली. मात्र नेमक्या त्याच वेळी वादळाला सुरवात झाली आणि दुस-या दिवशी चढाईला सुरवात करण्याची त्यांची योजना प्रत्यक्षात उतरू शकली नाही. मात्र तरीही कोणाच्याही मनात परतीचा विचार आला नव्हता. वादळाचा जोर मात्र वाढतच होता. ४ ऑगस्टला ह्यूस्टन आणि बेल यांचा तंबू वादळाने उडवून लावल्यावर त्यांना इतर तंबूत आश्रय घेण्यास भाग पडलं.

६ ऑगस्टपर्यंत सर्वांनी वाट पाहीली, परंतु हवामान सुधारण्याची काहीही चिन्हं न दिसल्याने त्यांच्यात परतीची चर्चा सुरू झाली. दुस-या दिवशी हवामान सुधारलं, परंतु आर्ट गिल्के आपल्या तंबूबाहेर कोसळल्यावर शिखराचा माथा गाठण्याचा विचार कुठल्या कुठे पळाला. आर्टला रक्तात गुठळ्या होण्याचा विकार जडला होता. ७८०० मी उंचीवर तर हा विकार अर्थातच प्राणघातक ठरणार होता. सर्वांनी गिल्केला वाचवण्याचा शक्य तो प्रयत्न करून त्याला बेस कँपवर आणण्याचा निश्चय केला. मात्र जोरदार हिमवादळाने त्यांना कँप ८ वरच अडकवून ठेवलं होतं !

१० ऑगस्ट पर्यंत गिर्यारोहक कँप ८ वरच होते ! डेथ झोन (८००० मी) च्या इतक्या जवळ असल्याने गिल्केबरोबर त्यांचाही जीव आता धोक्यात आला होता. गिल्केसह कमी उंचीच्या कँपवर परतण्यापलीकडे आता दुसरा उपाय नव्हता ! गिल्केला दोर आणि स्लीपींग बॅगपासून बनवण्यात आलेल्या तात्पुरत्या स्ट्रेचरमध्ये गुंडाळून सर्वांनी ७५०० मी उंचीवरील कँप ७ च्या दिशेने मार्गक्रमणा करण्यास सुरवात केली.

एका उतारावरून उतरत असताना जॉर्ज बेलचा तोल गेला आणि तो बर्फाच्या मोठ्या तुकड्यावर कोसळला ! बेल कोसळताच त्याच्याशी सुरक्षा दोराने संलग्न असलेला टोनी स्ट्रेथरही खेचला गेला ! स्ट्रेथर नेमका ह्यूस्टन आणि बेट्स यांना जोडणा-या दोरावर पडल्याने दे दोघेही खेचले गेले ! त्यांच्यापाठोपाठ मोलीनर आणि त्याच्याशी सुरक्षा दोराने बांधला गेलेला स्लीपींग बॅगेतील गिल्के हे दोघंही कोसळले. पीट स्कोनींगने मात्र चपळाईने बर्फाच्छादीत खडकाला आपली आईस एक्स अडकवली आणि आपल्या खांद्यावर दोर गुंडाळून घेत खाली पडणा-या गिर्यारोहकांना सावरलं ! स्कोनींगच्या हुशारीने आणि समयसूचकतेने सहा जणांचा जीव वाचला अन्यथा ते सर्वजण २१०० मी खोल गॉड्विन-ऑस्टेन ग्लेशीयरवर कोसळले असते !

अपघातातून सावरून गिर्यारोहक कँप ५ वर पोहोचले, परंतु आर्ट गिल्के मात्र अदृष्य झाला होता ! आपल्यामुळे आपल्या सहका-यांचा जीव धोक्यात येतो आहे याची कल्पना आल्यावर स्लीपींग बॅगला बांधलेले दोर कापून त्याने मरण पत्करलं होतं असं बहुतेक सर्व गिर्यारोहकांचं मत होतं. पीट स्कोनींगच्या मते मात्र गिल्केने मरण पत्करलं नसतं तर त्याला वाचवणं शक्यं झालं असतं, मात्र फ्रॉस्टबाईटने त्याला आपल्या हाता-पायांचा काही भाग मात्र निश्चितच गमवावा लागला असता !

कँप ७ वरून पाच दिवसांत सर्व गिर्यारोहक बेस कँपवर परतले. जॉर्ज बेलच्या पायाला फ्रॉस्टबाईटने ग्रासलं होतं. ह्यूस्टनच्या डोक्याला इजा झाली होती. बेस कँपवर परतताना त्यांना काही खडकांवर रक्ताचे डाग आणि आईस एक्स आढळून आली. मात्र गिल्केचा अथवा त्याच्या मृतदेहाचा पत्ता लागला नाही !

के २ च्या शिखरावर जाणा-या दोन मुख्य वाटा आहेत.

पहीली वाट अ‍ॅब्रझी स्परमार्गे जाते. के २ च्या ईशान्य धारेवरून गिलगिट-बाल्टीस्तानमधून येणारी ही वाट गॉडविन-ऑस्टेन ग्लेशीयरमार्गे अ‍ॅब्रझी स्परवर चढते. अ‍ॅब्रझी स्परच्या सुरवातीला ५४०० मी ( १७७०० फूट ) उंचीवर अ‍ॅडव्हान्स बेस कँप उभारला जातो. अ‍ॅब्रझी स्परवरून अनेक खडकांमधून आणि बर्फाच्छादीत भागांवरून ही वाट एकापाठोपाठ एक असलेल्या दोन अडथळ्यांपाशी येऊन पोहोचते.

हाऊस चिमनी हा उभाच्या उभा खडकाचा चढ आहे. इथून पुढे जाण्यासाठी टेक्नीकल रॉक क्लाईंबींगचं तंत्र अवगत असणं अत्यावश्यक आहे. हाऊस चिमनीवरून पुढे गेल्यावर लागतं ब्लॅक पिरॅमीड. हाऊस चिमनीप्रमाणे या ब्लॅक पिरॅमीडवर चढाईसाठीही रॉक क्लाईंबीगशिवाय पर्याय नसतो. ब्लॅक पिरॅमीड पार केल्यावर दोन्ही बाजूला खोल दरी असलेल्या आणि तीव्र उताराच्या धारेवरून मार्गक्रमणा केल्यावर सुमारे ७९०० मी वर ब-यापैकी समतल असलेली पर्वताची कड ( शोल्डर ) येते. या पर्वताच्या कडेवरच शेवटचा कँप उभारला जातो.

पर्वताच्या कडेवरील शेवटच्या कँपवरून निघाल्यावर पुढचा टप्पा म्हणजे सुमारे ८२०० मी उंचीवरील एक अरूंद घळवजा कपार ! ही कपार शिखरापासून फक्त ४०० मी खाली आहे. ही कपार ओलांडून जाण्यासाठी धोकादायकरित्या पुढे झुकलेल्या हिमखंडांसमोरुन किमान १०० मी अंतर आडवं कापण्याला पर्याय नसतो ! इथे असलेला सुमारे ५०-६० डिग्रीचा तीव्र उतार आणि कधीही हिमखंड ( सीरॅक ) कोसळण्याची भीती असल्याने के २ च्या चढाईतील हा सर्वात धोक्याचा भाग आहे. या कपारीशेजारी असलेला बर्फाच्छादीत चढ सरळसोट असल्याने पुढे झुकलेल्या हिमखंडांसमोरून जाण्याशिवाय गत्यंतर नसतं.

के २ च्या चढाईतील हेच ते कुप्रसिध्द बॉटलनेक !

गेल्या काही वर्षात झालेले ९५% अपघात या बॉटलनेकमध्येच झालेले आहेत ! बॉटलनेक पार केल्यावर तीव्र उतारावरून बर्फात चढाई केल्यावर के २ चं शिखर गाठता येतं !

अ‍ॅब्रझी स्परच्या बरोबर विरुध्द बाजूला उत्तरेकडून चीनमार्गे के २ वर चढणारी वाट येते. अ‍ॅब्रझी स्परच्या तुलनेत ही वाट अधीक धोकादायक आणि टेक्नीकल चढाईची आहे. या मार्गाने के २ वर चढाईसाठी शक्सगाम नदी ओलांडावी लागते. ही नदी पार करणं हे देखील अवघड काम आहे. बेस कँपवरून निघाल्यावर खड्या चढणीची लांबलचक वाट अनेक ठिकाणी रॉक क्लाईंबींग करत ७९०० मी वरील गरूडाचं घरटं ( ईगल्स नेस्ट ) या नावाने ओळखल्या जाणा-या शेवटच्या कँपमध्ये पोहोचते. इथून डाव्या हाताला असलेल्या अत्यंत धोकादायक आणि कधीही कोसळू शकणा-या हिमखंडांनी भरलेल्या ग्लेशीयरवरून ही वाट शिखराच्या अंतिम उतारावर पोहोचते !

या व्यतिरिक्त के २ वर जाणारी आणखीन एक वाट म्हणजे सेसन मार्ग. ही ईशान्येच्या दक्षिणेला असलेली वाट अ‍ॅब्रझी स्परला पर्याय म्हणून वापरता येऊ शकते. या वाटेने गेल्यास ब्लॅक पिरॅमीड टाळता येतं. ही वाट बॉटलनेकच्या आधी अ‍ॅब्रझी स्परमार्गे येणा-या वाटेला येऊन मिळते.

के २ वरील सर्वात धोकादायक मार्ग म्हणजे दक्षिण उतारावरून (साऊथ फेस ) सरळ वर चढणारी वाट. ही वाट अत्यंत टेक्नीकल चढाईची आणि धोकादायक वाट आहे. रेनॉल्ड मेसनरने या वाटेचं वर्णन 'आत्महत्येचा मार्ग' या शब्दात केलं आहे ! १९८६ मध्ये सुप्रसिध्द पोलीश गिर्यारोहक जेर्झी कुकुच्झ्का आणि तडेउस्झ पिट्रोवस्की यांनी या मार्गावरून यशस्वी चढाई केली होती ! परत उतरताना पिट्रोवस्कीला आपले प्राण गमवावे लागले. त्यानंतर आजतागायत त्या वाटेने कोणीही चढाई केलेली नाही !

१९५४ मध्ये अर्डीटो देसीओ च्या नेतृत्वाखालील तुकडीने अखेर के २ वर चढाई करण्यात यश मिळवलं. १९५३ च्या अमेरीकन मोहीमेतील पाकीस्तानी कर्नल अताउल्ला या मोहीमेतही सहभागी होता. वॉल्टर बोनॅटी आणि पोर्टर आमीर माहदी यांनी ८१०० मी पर्यंत चढाई करून शिखरावर जाणा-या गिर्यारोहकांना वेळेवर ऑक्सीजन सिलेंडर पोहोचवले होते.

३१ जुलै १९५४ ला लिन्को लॅसेडेली आणि अचिली कॉम्पॅगोनी यांनी शिखर गाठलं.

पहिल्या यशस्वी चढाईनंतर पुढील २३ वर्षे कोणताही गिर्यारोहक के २ च्या माथ्यावर पोहोचला नाही ! १९७७ मध्ये इचिरो योशीवाझाच्या जपानी तुकडीने शिखरावर अ‍ॅब्रझी स्परमार्गे अखेर यशस्वी चढाई केली. अश्रफ अमान हा के २ वर पाय ठेवणारा पहिला पाकीस्तानी गिर्यारोहक होता.

१९७८ मध्ये जेम्स व्हिटेकरच्या अमेरीकन मोहीमेने उत्तरेकडून येणा-या धोकादायक मार्गाने शिखरावर चढाई केली. शिखराच्या खाली काही अंतरावर असलेल्या उभ्या बर्फाच्या कड्यामुळे शिखराला वळसा घालून त्यांनी शेवटच्या चढाईत अ‍ॅब्रझी स्परवरून येणारी वाट पकडली. लुईस रिचार्ड्ट, जिम विकवायर, जॉन रॉसकेली आणि रिक रिजवे यांनी अखेर शिखरमाथा गाठला ! परतीच्या वाटेवर झालेल्या उशीरामुळे विकवायरला शिखरापासून फक्त १५० मी कमी उंचीवर उघड्यावर रात्र ( बायव्हॉक ) घालवावी लागली ! गिर्यारोहणाच्या इतिहासातील विक्रमी बायव्हॉक पैकी हा एक बायव्हॉक ठरला ! अमेरिकन तुकडीसाठी ही मोहीम १९३८ पासूनच्या के २ मोहीमांचं फलीत असल्याने खास होती !

१९८२ मध्ये इसाओ शिन्काई आणि मासात्सुगो कोनीशीच्या जपानी मोहीमेनेही व्हिटेकरच्या अमेरीकन मोहीमेप्रमाणेच उत्तरेच्या धोकादायक मार्गाने शिखर गाठलं. मात्र १४ ऑगस्टला शिखरावरुन परत उतरत असताना युखिहीरो यानागिसावाला मृत्यूने गाठलंच !

चेकोस्लोवाकीयन गिर्यारोहक जोसेफ राकोन्काज याने १९८३ च्या इटालियन मोहीमेतून उत्तरेच्या मार्गाने के २ चा माथा गाठला. तिन वर्षांनी १९८६ मध्ये त्याने अ‍ॅब्रझी स्परमार्गे पुन्हा शिखर पादाक्रांत केलं. रान्कोकाज के २ च्या माथ्यावर दोन वेळा चढाई करणारा पहिला गिर्यारोहक होता !

रान्कोकाज १९८६ मध्ये अ‍ॅब्रझी स्परमार्गे के २ च्या मोहीमेवर असतानाच के २ ने प्रथमच गिर्यारोहकांना आपली चुणूक दाखवली !

( क्रमश : )

.....................................................................................................................................सॅव्हेज माऊंटन - २

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वाह, काय योगायोग. आत्ताच्या आत्ताच के२ वरच्या दोन डॉक्युमेंटरीज बघितल्या मी.

कालच वर तुम्ही लिहिलेली चार्ल्स ह्युस्टनच्या मोहिमेची डॉक्युमेंटरी बघितली आणि आज तुमचा लेख आला.

आता दर वेळी लेख मस्त आहे वगैरे नाही लिहीणार. कृपया गृहीतच धरा...;)

पुढचे भाग वाचावयास अधीर....

स्पार्टाकस, तुम्ही कायम हिमालयात नाहीतर आल्प्स, अँडीज अशा ठिकाणीच वास्तव्याला असता का ....

सध्या जरा पठारावर आलेले दिसताय आमच्यासाठी .... Happy Wink ......

तुम्ही जे लिहित असता ते त्या त्या ठिकाणावरुनच लिहिताय इतके सॉल्लिड जमलेले असते - फारच प्रत्ययकारी लेखनशैली .....

असेच लिहित रहा - आम्हा वाचकांना वेगवेगळ्या गिर्यारोहकांचे विविध अनुभव सांगत रहा...

या नव्या लेखमालेसाठी अनेकानेक शुभेच्छा आणि मनापासून धन्स ......

खूप छान! के २ बदद्ल अगोदर काही माहिती नव्हतं, पण तुमच्या माऊंट एव्हरेस्ट लेखमालाच्या वेळी नेटवर त्याविषयी वाचलं होते... ते गिर्यारोहकांसाठी कठीण आहे... तुम्ही खूप विस्तृतपणे लिहितात आणि त्यामुळे त्या शिखराविषयी ओढ वाटून नेटवर त्याचाविषयी अजून वाचन होते... धन्यवाद स्पार्टाकस!

सर्वांचे मनापासून आभार.!

हर्पेन, आवडलं तर सांगू नका, पण कंटाळवाणं झालं तर मात्रं नक्की कान उपटा. wink.gif
शशांक, मला खरोखरच कोणत्यातरी पर्वतावर राहायला आवडेल कायमचं. पण काय करणार, आलीया भोगासी.

मस्त चालू झालीये लेखमाला. के २ बद्दल विशेष माहिती नसल्याने वाचायची उत्सुकता आहे.
अधे मधे फोटो टाकता आल्यास (बॉटलनेक वगैरे) जरा अंदाज यायला मदत होईल.

Spartacus, matterhorn ani k2 he agdi mast wishay niwadle aahet. Lekhan as usual top class!

Hee image paha http://www.nytimes.com/imagepages/2008/08/05/world/06k2.1.ready.html

Hya image madhye jithe "end of anchored ropes" ase lihile aahe, tith pasoon pudhchi 55-60 degree slop warchi chadhai free climb ki kay? Nidan pitons thokat tari jat asteel na?

Kahi video clips madhye bottle neck, traverse climb pahila. To cerrac mahaprachand aahe. Ani traverse cha slope pan khatarnak aahe.

Mast lekhmala! Thanks!,