पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव - २०१४

Submitted by चिनूक्स on 26 December, 2013 - 06:53

सकाळच्या थंडीत घाईघाईनं गाठलेलं सिटिप्राईड.
हातात महोत्सवाचं असंख्य खुणा केलेलं वेळापत्रक.
पॉपकॉर्नचा सुवास.
लॉबीत प्रेक्षकांच्या गराड्यातले समर नखाते आणि सतीश आळेकर.
या स्क्रीनकडून त्या स्क्रीनकडे होणारी पळापळ.
तासभर आधी लागणार्‍या रांगा.
आणि आठवडाभर अद्वितीय सुख देणारे जगभरातले चित्रपट...

महाराष्ट्र शासन व पुणे फिल्म फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बारावा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव यंदा ९ ते १६ जानेवारी, २०१४, या कालावधीत होणार आहे.

या वर्षी मराठी स्पर्धात्मक विभागात ३५ चित्रपटांनी भाग घेतला. निवडसमितीनं अंतिम फेरीसाठी सात चित्रपटांची निवड केली. हे चित्रपट पुढीलप्रमाणे -

१. टपाल - लक्ष्मण उतेकर
२. अस्तु - सुमित्रा भावे - सुनील सुकथनकर
३. ७२ मैल - एक प्रवास - कै. राजीव पाटील
. मौनराग - वैभव आबनावे
५. फॅण्ड्री - नागराज मंजुळे
. नारबाची वाडी - आदित्य सरपोतदार
७. रेगे - अभिजीत पानसे

या विभागात सर्वोत्कृष्ट चित्रपट, दिग्दर्शन, पटकथा, अभिनय आणि छायाचित्रण यांसाठी पुरस्कार दिले जातील.

जागतिक स्पर्धात्मक विभागात यंदा विविध देशांतील पाचशेहून अधिक चित्रपटांमधून १४ चित्रपटांची निवड करण्यात आली आहे.

हे चित्रपट पुढीलप्रमाणे -

1. Das Wochenende (The weekend) - Germany - Nina Grosse
2. I Corpi Estranei (Foreign Bodies) - Italy - Mirko Locatelli
3. Dziewczyna z Scafy (The girl from the wardrobe) - Poland - Bodo Kox
4. Tian Zhu Ding (Touch of sin) - China & Japan - Jia Zhang-ke
5. Dom s Bashenkoy (House with a turret) - Ukraine - Eva Neyman
6. Papusza - Poland - Joanna Kos-Krauze & Krzysztof Krauze
7. La Pasion de Michelangelo (The passion of Michelengelo) - Chile, France & Argentina
8. Buqueiemon (Chameleon) - Azarbaijan - Hasanov & Elvin Adigozel
9. Kanyaka Talkies (Virgin Talkies) - India - K. R. Manoj
10. Rosie - Switzerland & Germany - Marcel Gisler
11. Fasle Kargadan (Rhino season) - Iraq & Turkey - Bahman Ghobadi
12. Queen of Montreuil - France - Solveig Anspach
13. Night train to Lisbon - Germany, Portugal & Switzerland - Bille August
14. Mr. Morgan's last love - Belgium & Germany - Sandra Nettlebeck

या विभागात सर्वोत्कृष्ट चित्रपट व दिग्दर्शक यांना पुरस्कार देण्यात येतील.

स्पर्धाविभागातल्या या चित्रपटांशिवाय 'जागतिक चित्रपट' या विभागात पन्नास देशांमधील ८२ चित्रपट दाखवण्यात येणार आहेत.

यंदाच्या महोत्सवात 'कंट्री फोकस' विभागात तैवान, इस्रायल, फ्रांस, हंगेरी, स्पेन आणि द. कोरिया हे देश आहेत.
हंगेरीच्या सांस्कृतिक जीवनाशी संबंधित व इस्रायलच्या लोकजीवनाशी संबंधित चित्रपट महोत्सवात दाखवले जातील. काही उत्तम फ्रेंच अ‍ॅनिमेशनपटही यंदा बघायला मिळतील. महोत्सवाचं खास आकर्षण असेल द. कोरियन चित्रपट. स्पॅनिश चित्रपट मुख्यत्वे संगीत व नृत्य यांवर आधारलेले असतील.

'रेट्रोस्पेक्टिव्ह' विभागात यंदा फेलिनी, इस्त्वान झाबो, गोरान पास्काल्येविक, बेन्वा जाको व बिली वाईल्डर यांचे चित्रपट असतील. शिवाय अदूर गोपालकृष्णन यांच्या चित्रपटांचा खास विभाग असेल.

महोत्सवात फिल्म्स डिव्हिजनच्या वतीनं बेगम अख्तर, स्मिता पाटील, गुलजार, भालजी पेंढारकर, अदूर गोपालकृष्णन, सौमित्र चटर्जी यांच्यावर तयार केलेले लघुपट दाखवले जातील. शिवाय नॅशनल फिल्म्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने निर्माण केलेले १५ उत्तम चित्रपटही महोत्सवात असतील.

महोत्सवात 'आजचे भारतीय चित्रपट' हा विभाग असेल. या विभागात विविध भारतीय भाषांमधील सर्वोत्तम चित्रपट दाखवले जातील. ऋतुपर्ण घोष यांचा 'सत्यान्वेषी' हा शेवटचा चित्रपट या विभागात आहे.

यंदा भारतात जर्मन भाषेच्या अध्यापनाला शंभर वर्षं पूर्ण होत आहेत. १९१४ साली पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये जर्मन भाषेचे वर्ग सर्वप्रथम सुरू झाले. या निमित्तानं पुणे विद्यापीठ व मॅक्समुल्लर भवन यांनी अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. या कार्यक्रमांचा महत्त्वाचा हिस्सा आहे वर्षभर चालणारा चित्रपट महोत्सव. या महोत्सवाची सुरुवात 'पिफ'मध्ये होणार आहे.

महोत्सवाला जोडूनच काही कार्यशाळांचं आयोजन केलं आहे. जर्मन संस्कृती व चित्रपट यांवर एक कार्यशाळा असेल. नवीन डिजिटल तंत्रज्ञान व त्याचा चित्रपटांत वापर हा एका कार्यशाळेचा विषय असेल. तसंच, भारतीय चित्रपटांना जागतिक प्रेक्षक कसे मिळवून देता येतील, यांवर एक चर्चासत्र होईल.

महोत्सवाचं खास आकर्षण असेल 'विजय तेंडुलकर स्मृती व्याख्यान'. श्री. इलियाराजा व श्री. रसूल पुकुटी यांनी यापूर्वी ही व्याख्यानं दिली आहेत.

महोत्सवासाठी नोंदणी सुरू झाली आहे. सिटिप्राईड कोथरुड, ईस्क्वेअर, आयनॉक्स आणि सिटिप्राईड, सातारा रस्ता, येथे सकाळी १० ते संध्या. ६.३० या वेळेत नोंदणी करता येईल. नोंदणी करताना आपला फोटो असलेलं एक ओळखपत्र बाळगणं आवश्यक आहे.

नोंदणीशुल्क - रु. ७००.
फिल्म सोसायट्यांचे सभासद, विद्यार्थी व चित्रपटसृष्टीशी संबंधित असलेल्यांना शुल्कात सवलत आहे.

चित्रपट सिटिप्राईड कोथरुड, सातारा रस्ता, अभिरुची मॉल, आर डेक्कन, ईस्क्वेअर, आयनॉक्स आणि राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय या ठिकाणी दाखवण्यात येतील.

दरवर्षी अनेक मायबोलीकर या चित्रपटमहोत्सवाला हजेरी लावत असतात. यंदाचं वर्षही त्याला अपवाद नसेल.

या बाफवर महोत्सवाशी संबंधित बातम्या, चित्रपटांचं वेळापत्रक, परीक्षणं इतरांच्या आधी वाचायला मिळतील, हा प्रयत्न आहे. Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सही आहे... Happy चित्रपट पाहणार्‍यांनी त्यावर सविस्तर लिहिण्यासाठी टाळाटाळ करू नका ही विनंती.

त्यांची वेब साइट, तिकिटं मिळण्याची काय सोय आहे याची पण माहिती इथे हेडरमध्ये देता येइल का?

थँक्स, माहिती दिल्याबद्दल.
पिफची फार आतुरतेने वाट बघतो आहे. मागच्या वर्षाचा अनुभव खूप सुंदर होता. संपूर्ण आठवडाभर झपाटल्यासारखं सकाळपासून संध्याकाळापर्यंत थेटराच्या ऊबदार आश्वासक अंधारात बसून जगभरातले एकाहून एक जबरदस्त सिनेमे बघायला मिळणं, जगभरातल्या कथा-कहाण्यांशी रिलेट करता येणं, एक संपला की पुढच्या सिनेम्याची आतुरतेने वाट बघणं, एकाच वेळी अनेक ठिकाणी वेगवेगळे सिनेमे चालू असल्याने निवड करताना भांबावून जाणं.. सारंच मंतरलेलं, आणि भारी. Happy

सातशे रुपयात कोणते चित्रपट पाहाता येतील ?ते निवडता येते किंवा दोन तीनच पाहायचे तर बुकिंग करतांना काय करतात ?

सातशे रुपयांमध्ये ९ तारखेपासून १६ तारखेपर्यंत दाखवले जाणारे कुठलेही चित्रपट पाहता येतील. दोन किंवा तीनच चित्रपट बघायचे असले तरी सातशे रुपयांचं डेलिगेट कार्डच घ्यावं लागतं.
शनिवार -रविवार या दोन दिवसांत साधारण ९-१० चित्रपट बघता येतात. अगदी चार-पाच चित्रपट बघायला मिळाले तरी पैसे पूर्ण वसूल. Happy

साजिरा, तू गेल्या वर्षी पहिल्यांदा पिफला गेला होतास का? Uhoh

मी पहिली दोन वर्षे गेले होते, मग परत कधी जमलं नाही. पण पहिली दोन वर्षं मात्र अगदी सगळी कामं शक्यतोवर बाजूला ठेवून भरपेट सिनेमे बघून घेतलेले. सकाळी नऊ ते रात्री एक-दीड. तेव्हा आयनॉक्स, सिटि प्राईड सातारा रोड आणि एनएफएआय मधे शोज असत.
८०-९०च्या दशकात पुण्यात चाकोरीबाहेर सिनेमे पहायला मिळणं खूप अवघड होतं. आशय क्लब माझ्या आठवणीप्रमाणे खूपसा इर्रेग्युलर होता आणि फक्त शनिवारचे अर्काईव्जमधले शोज. ते सदस्यत्वपण सहजी मिळत नसे. दूरदर्शनचे शुक्रवार रात्रीचे इंग्लिश सिनेमे आणि रविवार दुपारचे रीजनल सिनेमे यावर भिस्त ठेवावी लागे. व्हिडिओ कॅसेट्समधे इंग्लिश क्लासिक्स मिळत पण भारतीय आणि परदेशी क्लासिक्स क्वचितच, अपवाद म्हणून कॅम्पमधे एक व्हिडिओ रेन्टल होतं तेवढाच. या पार्श्वभूमीवर पिफ सुरू झाल्याचं भयंकरच अप्रूप होतं माझ्या आणि आसपासच्या पिढ्यांना... थॅन्क्स, जब्बार आणि मंडळी!! Happy Happy

'पिफ'चे रात्री ९चे खेळ काही वर्षांपूर्वी बंद झाले. आता सगळ्यांत शेवटचा खेळ ६ वाजता असतो. Sad त्यामुळे रोज जास्तीत जास्त फक्त पाच चित्रपट पूर्ण बघता येतात.
'पिफ'चं भव्य स्वरूप बरचसं सुरेश कलमाडी यांच्यामुळे आहे.

हो वरदा, गेल्या वर्षी पहिल्यांदाच. त्याआधी कधीच का गेलो नाही- ते काही आठवत नाही. Sad

मागल्या वर्षी हपापल्यागत आठवड्यात २५-२६ सिनेमे बघितले..

कोणी कोणी केलं रजिस्ट्रेशन ? Happy
मी आणलं काल डेलिगेट कार्ड..
चिन्मय, गेल्यावर्षीप्रमाणे रेकमेंडेशन्स सांग नक्की.. गेल्यावर्षी लय भारी सिनेमे पाहिले होते.. महायुद्धाच्या पार्श्वभुमीवरचे सगळे सही होते..

पराग,
महोत्सवातल्या महत्त्वाच्या कार्यक्रमांच्या माहितीसाठी http://www.maayboli.com/node/47106 हा बाफ उघडला आहे.
तसंच, महोत्सवातल्या महत्त्वाच्या चित्रपटांच्या माहितीसाठीही वेगळा बाफ उघडतो आहे.
महोत्सवाचं वेळापत्रक आज / उद्या रात्री अपलोड होईल.

हो तो बाफ पाहिला.. मी चित्रपटांची रेकमेनडेशन्स म्हणतोय.. गेल्यावर्षी जसं आपण एसेमेस/फोन/आदल्या दिवशी रात्री ठरवायचो तसं...
बायदवे.. ९ चे शो बंद का केले? तो १० नंतरचा नियम फक्त आऊटडोअर कार्यक्रमांना आहे ना ?
वर्किंग डे ला ६ चे चित्रपट सोईचे पडले असते खरतर.. माझी भिस्त फक्त शनिवार / रविवार आणि मी एक दिवस दांडी मारणार आहे त्यावर..

झकास. वाचतोय. अजुन काही करु शकत नाही. आवडलेल्या चितपटांबद्दल नक्की लिहा.
३ मिनिटांचा लघुपट महोत्सवादरम्यान बनवायचा आहे?