१९९६ माऊंट एव्हरेस्ट - १० (अंतिम)

Submitted by स्पार्टाकस on 20 December, 2013 - 22:39

१९९६ माऊंट एव्हरेस्ट ही लेखमाला आज संपली. ही लेखमाला प्रकाशीत करू दिल्याबद्दल मायबोली प्रशासनाचा मी अत्यंत आभारी आहे. या लेखमालेच्या निमित्ताने माझ्या संग्रहात असलेली अनेक पुस्तकं आणि इंटरनेटवरील अनेक लेख पुन्हा वाचण्याचा योग आला.

ही लेखमाला तुम्हा सर्वांना कशी वाटली हे जरूर कळवा.

****************************************************************************************************************************

एव्हरेस्टच्या इतिहासात जॉर्ज मॅलरी आणि अ‍ॅन्ड्र्यू आयर्विन यांना अनन्यसाधारण महत्व आहे. १९२४ सालच्या मोहीमेत मॅलरी-आयर्विन एव्हरेस्टवर पोहोचले की नाही हा वाद अद्यापही सुरू आहे. मॅलरी आणि आयर्विनचं नक्की काय झालं असावं याचा शोध घेण्यासाठी अनेक मोहीमा एव्हरेस्टवर आखण्यात आल्या आहेत.

१९३३ सालच्या अशाच एका मोहीमेत तिबेटमधल्या एव्हरेस्टच्या वायव्य धारेवर २७७६० फूट उंचीवर आयर्विनची आईस एक्स सापडली होती. मात्र मॅलरी अथवा आयर्विनचे मृतदेह दिसून आले नव्हते.

१९९९ च्या शोध मोहीमेत कॉनरॅड अ‍ॅन्करला ८१५७ मी ( २६७६० फूट ) उंचीवर एक मृतदेह आढळून आला ! आयर्विनची आईस एक्स इथून सुमारे ३०० मी वर सापडली असल्यामुळे हा मृतदेह त्याचाच असावा अशी अ‍ॅन्करची कल्पना झाली. आयर्विनजवळ असलेला कॅमेरा सापडला असता आणि त्यात शिखरावरचे फोटो असते तर मॅलरी - आयर्विन शिखरावर पोहोचल्याचा निर्णायक पुरावा मिळाला असता.

अ‍ॅन्करने मृतदेहाची नीट तपासणी केली. कपड्यावरच्या शिवणीतील नाव वाचल्यावर अ‍ॅन्करला आश्चर्याचा धक्का बसला.

तो जॉर्ज मॅलरी होता !

बर्फात ७५ वर्षे राहिल्यावरही मॅलरीचा मृतदेह सुस्थितीत होता. मात्र त्याच्या मृतदेहावर कोणताही कॅमेरा मिळाला नाही. त्याच्या कमरेभोवती दोराचा जोरदार हिसका बसल्याची तसेच कपाळावर गोल्फच्या चेंडूच्या आकाराची जखम दिसून आली. कपाळावरच्या या आघातानेच त्याचा जीव घेतला असावा. दोराच्या हिसक्याच्या खुणेवरून मॅलरी आणि आयर्विन एकमेकांशी दोराने संलग्न होते हे सूचीत होत होतं.

२००१ च्या मोहीमेत मॅलरी - आयर्विनने उभारलेला शेवटचा कँप शोधण्यात यश आलं. मात्र आयर्विनचा कॅमेरा त्यात मिळून आला नाही.

अँड्र्यू आयर्विनचा मृतदेह आजतागायत मिळालेला नाही !

मॅलरीचा मृतदेह मिळाल्यामुळे तो आणि आयर्विन शिखरावर पोहोचण्यात यशस्वी झाले होते वा नाही या वादाला पुन्हा खतपाणी मिळालं असलं तरीही तसा निर्णायक पुरावा आजतागायत मिळालेला नाही.

एव्हरेस्टनंतर...

जॉन क्राकुअर सिएटलला परतला. डग हॅन्सनचं उरलेलं सामान त्याने आपल्याबरोबर परत नेलं होतं. सिएटलला डगची मुलं अँजी आणि जेमी आणि प्रेयसी कॅरन यांच्यासमोर काय बोलावं हे त्याला कळेना. अँडी हॅरीसची प्रेयसी फियोना मॅकफर्सन हिच्याशी क्राकुअरचा संपर्क झाल्यावर तिला आपल्या रागावर नियंत्रण ठेवणं अशक्य झालं. क्राकुअरच्या गैरसमजामुळे तिला झालेल्या त्रासाची कल्पनाही करणं अशक्यं होतं. क्राकुअरची तिने चांगलीच खरडपट्टी काढली. त्याउलट हॉलची पत्नी जान आरनॉल्डने त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न केला.

अँडी हॅरीस आणि डग हॅन्सन यांचे मृतदेह आजतागायत सापडलेले नाहीत ! एव्हरेस्टच्या ' मिसींग पर्सन ब्युरो ' मध्ये दोघांचा कायमचा समावेश झालेला आहे.

भारतीय मोहीमेतील गिर्यारोहक त्सेवांग पाल्जरचा मृतदेह एव्हरेस्टच्या इतिहासात ग्रीन बूट्स म्हणून प्रसिध्द आहे. पाल्जरने घातलेल्या हिरव्या रंगाच्या गिर्यारोहणाच्या बुटांमुळे त्याला हे नाव मिळालेलं आहे. तिबेटकडून चढाईच्या मार्गावर असलेल्या पहिल्या पायरीच्या खाली सुमारे ८४३० मी उंचीवरील एका घळीत आजही ग्रीन बूट्सचा मृतदेह आहे ! हा मृतदेह पाल्जरचा नसून दोर्जे मोरुपचा असावा असाही एक प्रवाद आहे.

२००६ साली ब्रिटीश गिर्यारोहक डेव्हीड शार्पला एव्हरेस्ट उतरून येताना ग्रीन बूट्सच्या शेजारीच मृत्यूने गाठलं.

बेक वेदर्सचा फ्रॉस्टबाईट झालेला उजवा हात मनगट आणि कोपराच्या मध्ये कापावा लागला. त्याच्या डाव्या हाताची पाचही बोटं आणि दोन्ही पायाची बोटंही त्याला गमवावी लागली. त्याच्या नाकचा शेंडा कापून कान आणि कपाळावरच्या पेशींचा वापर करून पुन्हा बसवण्यात आला ! बेक वेदर्स अद्यापही डलासमध्ये आपली पॅथॉलॉजी सांभाळतो आहे ! त्याचबरोबर तो व्याख्यानंही देत असतो.

माईक ग्रूम आणि नील बिडलमन यांनी आपलं गिर्यारोहण पुढे चालू ठेवलं. ग्रूमने १९९९ मध्ये जगातील ५ व्या क्रमांकाचं मकालू ( ८४६३ मी ) शिखर सर केलं.

क्लेव स्कोनींग, शार्लोट फॉक्स, टिम मॅडसन, सँडी हिल पिटमन, मार्टीन अ‍ॅडम्स अमेरिकेत परतले. पीट स्कोनींगनी कँप ३ वरुन शिखरावर चढाई करण्याचं ऐनवेळी रद्द केलं होतं. २२ सप्टेंबर २००४ रोजी पीटचं निधन झालं.

१९९७ च्या हिवाळ्यात बुकरीव आणि सायमन मोरो अन्नपूर्णा शिखराच्या मोहीमेवर होते. ५७०० मी उंचीवर ते सुरक्षा दोर बांधत असताना प्रचंड मोठा हिमप्रपात ( अ‍ॅव्हलाँच ) आला ! या हिमप्रपातामुळे मोरो आपल्या तंबूजवळ फेकला गेला ! बर्फातून कशीबशी आपली सुटका करून मोरो बाहेर पडला परंतु बुकरीव किंवा फोटोग्राफर डिमीट्री सोब्लेव यांचा पत्ता नव्हता ! मोरो बेस कँपवर परतला.

अनातोली बुकरीवची कारकीर्द अन्नपूर्णाच्या हिमप्रपातात संपुष्टात आली !

बुकरीवच्या म्हणण्याप्रमाणे मृत्यूपूर्वी नऊ महीने हिमप्रपातात आपला मृत्यू होणार असल्याचं त्याला स्वप्नात दिसलं होतं. फक्त कोणत्या पर्वतावर हे त्याला कळलं नव्हतं ! त्या स्वप्नावर त्याचा पूर्ण विश्वास बसला होता. आपल्या अनेक सहका-यांना त्याने हे बोलून दाखवलं होतं. काही जणांनी त्याला गिर्यारोहण सोडून वेगळी वाट निवडण्याचा सल्ला दिला. बुकरीव उत्तरला,

" गिर्यारोहण हे माझ्या आयुष्याचं अंतिम ध्येय आहे ! मी दुसरं काहीही करू शकणार नाही !"

आपल्या शब्दाला जागून बुकरीवने अन्नपूर्णावर मृत्यूला कवटाळलं !

ब्रूस हॅरॉड मागे पडल्यावर त्याची कोणतीही पर्वा न करता शिखरावर पोहोचलेल्या इयन वूडॉल आणि कॅथी ओ'ड्वूड यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली. वूडॉलने हॅरॉड फोटो काढण्यात रेंगाळल्याचं कारण पुढे केलं पण प्रत्यक्षात हॅरॉडच्या कॅमे-यात शिखरावर पोहोचण्यापूर्वी फक्त दोन फोटो काढले असल्याचं स्यू थॉमसनला आढळून आलं. हॅरॉड दमल्यामुळे मागे पडल्याचाही वूडॉलने दावा केला. प्रत्यक्षात वूडॉल आणि ओ'डवूड पेक्षा हॅरॉड अधीक अनुभवी आणि शारिरीकदृष्ट्या तंदुरुस्त असल्याचं डेव्हीड ब्रेशीअर्स आणि एड व्हिस्टर्स यांनी नमूद केलं होतं. हॅरॉडच्या जोडीला एकही शेर्पा मागे का ठेवण्यात आला नाही तसंच परतीच्या वाटेवर हॅरॉडची गाठ पडल्यावर त्याला मागे परतण्यास का प्रवृत्त केलं नाही यावर वूडॉलने कधीच स्पष्टीकरण दिलं नाही.

इयन वूडॉल आणि कॅथी ओ'ड्वूड १९९८ मध्ये पुन्हा एव्हरेस्टच्या मोहीमेवर असताना त्यांची गाठ त्यांची पूर्वीची सहकारी फ्रान्सिस अर्स्नेटीव्हशी पडली. ती आपल्या आयुष्याच्या अखेरच्या घटका मोजत होती. आपला चढाईचा बेत रद्द करून दोघांनी तिला मदत करण्याचा तासभर प्रयत्न केला, पण अखेर निरुपायाने ते खाली परतले.

वूडॉल आणि ओ'ड्वूड २००१ मध्ये विवाहबध्द झाले.

२००७ मध्ये वूडॉलने ताओ ऑफ एव्हरेस्ट या नावाने पुन्हा एव्हरेस्टवर मोहीम आखली. त्याचा उद्देश अर्स्नेटीव्ह आणि ग्रीन बूट्स च्या प्रेतांना गिर्यारोहणाच्या मार्गावरुन हटवून पर्वतावर चिरविश्रांती देण्याचा होता. २३ मे २००७ ला वूडॉल आणि फुरी शेर्पा यांनी अर्स्नेटीव्हचा मृतदेह हलविण्यात यश मिळवलं, परंतु ग्रीन बूट्स मात्र अद्यापही एव्हरेस्टवरचा कायमचा निवासी आहे !

जॉन क्राकुअरने आपल्या एव्हरेस्ट मोहीमेचं वर्णन करणारं Into Thin Air हे पुस्तक लिहीलं.

आपल्या या पुस्तकात क्राकुअरने हॉलची तुकडी वगळता इतर सर्वच गिर्यारोहकांवर विशेषतः अनातोली बुकरीव आणि लोपसांग जंगबू शेर्पा यांच्यावर अनेक ठिकाणी टिका केली आहे.

क्राकुअरच्या आक्षेपांना बुकरीवने गॅरी वेस्टर्न डिवाल्टच्या साथीने आपल्या The Climb : Tragic Ambitions on Mount Everest या पुस्तकात मुद्देसूद उत्तर दिलं आहे.

लोपसांग जंगबू शेर्पानेही क्राकुअरने घेतलेल्या आपल्यावरील आक्षेप खोडून काढणारं पत्रं आऊटलूक मासिकाच्या संपादकांना पाठवलं होतं.

आजही क्राकुअर आणि बुकरीव यांच्या समर्थकांतील वाद संपलेला नाही. क्राकुअरने आपल्या पुस्तकाच्या प्रत्येक नवीन आवृत्तीत बुकरीववर नवीन आरोप केले आहेत.

बेक वेदर्सने आपल्या अनुभवांच वर्णन आपल्या Left For Dead : My Journey Home from Mount Everest या आपल्या पुस्तकात केलं आहे. लेनी गॅमलगार्डने आपले अनुभव Climbing High या आपल्या पुस्तकात मांडले आहेत. दोघांनीही अनातोली बुकरीवने साऊथ कोलवरच्या वादळात गिर्यारोहकांच्या केलेल्या धाडसी सुटकेचं प्रांजळपणे कौतुक केलं आहे.

एड व्हिस्टर्सने पुढे ८००० मी वरील चौदाही हिमशिखरं चढण्याचा पराक्रम केला. डेव्हीड ब्रेशीअर्स आणि पीट अ‍ॅथन्स यांच्या सहाय्याने तो अद्यापही गिर्यारोहण मोहीमा आखून पार पाडतो आहे ! व्हिस्टर्स आणि अ‍ॅथन्स यांचा शेर्पांचा अपवाद वगळता सात वेळा एव्हरेस्ट चढून गेलेल्या चार गिर्यारोहकांत समावेश आहे.

एव्हरेस्टवर आलेले भीतीदायक अनुभव मात्र अद्यापही कोणीही विसरलं नसावं !

****************************************************************************************************************************

क्राकुअर - बुकरीव / लोपसांग वाद

जॉन क्राकुअरने आपल्या Into Thin Air या पुस्तकात बुकरीववर अनेक आक्षेप घेतले आहेत. बुकरीवने ऑक्सीजन न वापरणं, त्याने आपल्या क्लायंट्सच्या आधी साऊथ कोलवर परत येणं यावर क्राकुअरने विशेष टिका केली आहे. क्राकुअरच्या टिकेचा एकून सूर या सर्व अपघाताला काही अंशी बुकरीव आणि लोपसांग जबाबदार होते असा आहे.

बुकरीवने एव्हरेस्टच्या माथ्यावर पोहोचण्यापूर्वीच साऊथ समिटवरच्या दगडी पाय-यांवर आणि हिलरी स्टेपच्या कठीण कड्यावर सर्वात प्रथम चढाई करून सुरक्षा दोर बांधलेले होते. शिखरावरुन बुकरीव परत फिरला तेव्हा नील बिडलमन शिखरावर होता. स्कॉट फिशर आणि लोपसांग हे अनुभवी गिर्यारोहक शिखराच्या वाटेवर होते. त्याच्या तुकडीतील पाच क्लायंट्सना सुरक्षीत खाली आणण्यास हे तिघंही समर्थ होते असा विचार बुकरीवने केल्यास त्याची चूक नव्हती. हॉलच्या तुकडीतील सदस्यांची जबाबदारी बुकरीववर नव्हती.

बुकरीव मार्टीन अ‍ॅडम्सबरोबर हिलरी स्टेप उतरून येईपर्यंत होता. अ‍ॅडम्सने बुकरीवला आपल्याला सोडून पुढे जाण्यास कोणताही आक्षेप घेतला नव्हता. त्यामुळे बुकरीव संध्याकाळी ५.०० वाजता कँप ४ वर पोहोचला होता. हिमवादळाची चाहूल लागताच सुटका पथक तयार करण्यासाठी प्रयत्न करणं त्यामुळेच त्याला शक्य झालं होतं.

साऊथ कोलवर वादळाचा जोर वाढल्यावर बुकरीव गिर्यारोहकांच्या शोधार्थ पुन्हा चढाई करत होता. मात्र त्यावेळी बिडलमन - ग्रूम आणि इतर गिर्यारोहक साऊथ कोलवर वादळात भरकटत असल्याने त्याची कोणाशीही गाठ पडली नाही. बिडलमन कँप ४ वर पोहोचताच बुकरीवने अथक प्रयत्नाने फॉक्स, सँडी हिल आणि मॅडसनला कँप ४ वर परत आणलं होतं.

जवळपास रात्रभर बुकरीव वादळाशी झगडत असताना क्राकुअर आपल्या तंबूत झोपी गेला होता. दुस-या दिवशीच्या वादळातही बुकरीवन फिशरपर्यंत पोहोचला, परंतु त्यापूर्वीच फिशर मरण पावला होता.

१९९७ साली बुकरीवला अमेरीकन अल्पाईन क्लबतर्फे डेव्हीड ए. सोवेल्स स्मरणपदक देण्यात आलं. गिर्यारोहणातील हा सर्वोच्च अमेरिकन पुरस्कार आहे. १९९६ च्या एव्हरेस्ट मोहीमेत स्वतःच्या जीवाची पर्वा न करता गिर्यारोहकांची सुखरूप सुटका केल्याबद्दल बुकरीवचा सन्मान करण्यात आला होता.

इटालियन गिर्यारोहक सायमन मोरो क्राकुअरने बुकरीववर घेतलेल्या आक्षेपांना उत्तर देताना म्हणतो,

" जॉन क्राकुअरची एव्हरेस्ट मोहीम ही ८००० मी. वरची पहीली चढाई होती. अनातोली बुकरीव वीस वर्ष हिमालयात वावरलेला होता. क्राकुअरने बुकरीवला गिर्यारोहण मोहीमेतील जबाबदारीबद्दल शिकवणं म्हणजे मेडीकलचं एखादं पुस्तक वाचून कोणीही विख्यात सर्जनला ऑपरेशन कसं करावं हे शिकवण्यासारखं आहे ! १९९६ च्या मोहीमेतील बुकरीवच्या निर्णयांबद्दल काही वक्तव्य करण्यापूर्वी एक ध्यानात घ्या.. बुकरीवचा एकही क्लायंट प्राणास मुकला नाही !"

क्राकुअरने लोपसांगबद्दलही अनेक आक्षेप नोंदवले आहेत. सँडी हिल पिटमनने लोपसांगला खूप मोठ्या रकमेचं आमिष दिल्यामुळे लोपसांग चढाईच्या दरम्यान तिला विशेष मदत करत होता असा क्राकुअरने आपल्या पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीत दावा केला आहे. लोपसांग आणि पिटमन दोघांनीही या दाव्याला आक्षेप घेतला होता. विशेष म्हणजे पुस्तकाच्या नंतरच्या आवृत्तीत क्राकुअरने हा दावा मागे घेतला आहे !

लोपसांगने पिटमनला सुरक्षा दोराच्या सहाय्याने मदत करण्याचंही योग्य कारण दिलं आहे. आपल्या प्रत्येक मोहीमेत कमकुवत वाटणा-या क्लायंटला आधार देण्यासाठी दोराचा वापर केला असल्याचं त्याने स्पष्टपणे नमूद केलं आहे. लोपसांगच्या तब्येतीविषयी क्राकुअरने घेतलेले आक्षेपही निराधार आहेत.

Into Thin Air या आपल्या पुस्तकात क्राकुअरने फिशरच्या तुकडीतील महिला गिर्यारोहकाच्या प्रेमप्रकरणाचाही उल्लेख केला आहे. क्राकुअरने या गिर्यारोहकाचं नाव देण्याचं टा़ळलं असलं तरी त्याचा एकूण सूर शेर्पांच्या दृष्टीने पवित्र असलेल्या पर्वतावरील विवाहबाह्य संबंध असाच आहे.

हा उल्लेख बहुधा फॉक्स आणि मॅडसन यांच्याबद्दल असावा. फॉक्स मॅडसनची गर्लफ्रेंड होती. तिच्या शब्दाखातर मॅडसेन एव्हरेस्टवर आला होता. स्वतः अमेरिकन संस्कृतीत वाढलेल्या क्राकुअरने असा आक्षेप नोंदवावा हे काहीसं आश्चर्यकारकच !

अनाकलनीय निर्णय

९ मे च्या रात्री चढाई सुरू होण्यापूर्वी सुरक्षा दोर बांधण्याच्या दृष्टीने शेर्पांचं पथक आघाडीवर पाठवण्याचं हॉल आणि फिशरने ठरवलं होतं. मात्रं प्रत्यक्षात शेर्पांचं हे पथक पुढे गेलंच नव्हतं. मॉन्टेनेग्रोच्या मोहीमेतील गिर्यारोहकांनी साऊथ समिटपर्यंत दोर बांधल्याची माहीती हॉल आणि फिशरला मिळाली होती असं लोपसांग नमूद करतो, मात्र त्यापुढेही हिलरी स्टेपवर आणि वरती दोर बांधण्यास शेर्पांना पुढे पाठवण्याचं हॉल-फिशरने का रहीत केलं असावं ? या निर्णयामुळे बाल्कनीपासूनच चढाईला उशीर होण्यास सुरवात झाली होती.

तसंच आपल्या सर्व गिर्यारोहकांना एकत्र ठेवण्याच्या हॉलच्या निर्णयामुळे आघाडीवर असलेल्या क्राकुअर, ग्रूम आणि अंग दोर्जेला सर्वांची वाट पाहत बाल्कनीत थांबून राहवं लागलं होतं. नील बिडलमन आणि अंग दोर्जेने दोर बांधताच फिशरची तुकडी आणि मकालू गाऊदेखील क्राकुअर, ग्रूम आणि दोर्जेला ओलांडून पुढे निघून गेली होती. बाल्कनीतच झालेल्या उशीरामुळे फ्रॅंक फिशबेक, स्टुअर्ट हचिन्सन, जॉन टेस्क आणि लू कासिस्च्के यांना माघारीचा निर्णय घ्यावा लागला होता.

साऊथ समिटवरही सुमारे तासभर अंग दोर्जे लोपसांगची वाट पाहत बसला होता. दोर्जेच्या साथीला एक शेर्पा असूनही केवळ लोपसांग आला नाही म्हणून त्याने दोर बांधण्यास सुरवातही केली नव्हती. दोर्जे आणि लोपसांग यांच्यात वैयक्तीक वाद असला तरीही एकंदर मोहीमेच्या सुरक्षीततेच्या दृष्टीने दोर्जेने वेळ वाया घालवणं हे चूक नव्हतं का ? बिडलमन, बुकरीव, ग्रूम दोर बांधत असताना क्राकुअरने त्यांना मदत केली, परंतु अंग दोर्जे तरीही जागेवरून हलला नव्हता !

Into Thin Air मध्ये क्राकुअरने अंग दोर्जेच्या या वर्तणुकीबद्दल चकार शब्दही काढलेला नाही !

चढाईच्या वेळेस झालेल्या या उशिरामुळे अर्थातच उपलब्ध एकमेव सुरक्षा दोरावर गिर्यारोहकांची रांग लागली. या कोंडीमुळे हिलरी स्टेपच्या माथ्यावर शिखरावरून उतरून येणा-या क्राकुअर आणि हॅरीसला तब्बल दीड तास वाट पाहवी लागली होती.

एव्हरेस्टच्या चढाईत योग्य वेळी परत फिरण्याचा निर्णय हा अतिशय मोलाचा ठरतो. अंधार पडण्यापूर्वी परतून साऊथ कोलवरील कँप ४ गाठणं याला गिर्यारोहकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्व आहे. बेस कँपवर असताना अनेकदा हॉल आणि फिशर दोघांनीही दुपारी १ ते २ ही परतीची योग्य वेळ असल्याचं आपल्या तुकडीतील सदस्यांना अनेकदा सांगीतलं होतं. अर्थात परतीची नेमकी वेळ ही त्या वेळच्या हवामानावर आणि गिर्यारोहकांच्या प्रगतीवर आणि योग्य निर्णयक्षमतेवर अवलंबून असते.

दुर्दैवाने १० मे च्या चढाईच्या दिवशी हॉल किंवा फिशरने कोणालाही नक्की कोणती वेळ ही शिखरावर पोहोचण्याची अखेरची वेळ ( टर्न अराउंड टाईम ) आहे हे आपल्या तुकडीतील एकाही सदस्याला सांगितलं नव्हतं. फिशबेक, हचिन्सन, कासिस्चे आणि टेस्क परत फिरल्यावरही हॉल आणि फिशरने कोणालाही परत फिरण्याची सूचना दिलेली नव्हती. स्वतः फिशर आणि डग हॅन्सनसह हॉल सर्वात शेवटी एव्हरेस्टवर पोहोचले होते.

हॉल आणि फिशर यांच्यातील व्यावसायिक स्पर्धा याला ब-याच अंशी कारणीभूत असावी. हॉलच्या तुकडीतील आठ पैकी चार क्लायंटस अगोदरच मागे फिरले होते. बेक वेदर्सही परतण्याचीच जास्त शक्यता होती याची हॉलला कल्पना होती. दुसरीकडे फिशरच्या क्लायंट्सपैकी सहा क्लायंट्स हॉलच्या पुढे गेले होते. नेमक्या याच गोष्टीचा हॉलला विषाद वाटला होता. क्राकुअरपाशी त्याने तसा स्पष्ट उल्लेख केला होता.

क्राकुअरचा हॉलच्या मोहीमेतील सहभाग हा देखील काही अंशी हॉलच्या परत न फिरण्याला कारणीभूत झाला असावा. क्राकुअर आऊटलूक मासिकातर्फे एव्हरेस्टच्या मोहीमेवर लेख लिहीण्याच्या कामगिरीवर हॉलच्या तुकडीत सामील झाला होता. त्या मोबदल्यात हॉलला आऊटलूक मासिकात जाहीरातीसाठी मोठी जागा मिळणार होती. तसंच त्याने क्राकुअरला आपल्या मोहीमेत सहभागी करून घेण्यासाठी मोठी सवलतही दिली होती. हॉलच्या दृष्टीने मोहीम यशस्वी होणं आणि क्राकुअर एव्हरेस्टच्या माथ्यावर पोहोचणं हे मिळणारी प्रसिध्दी आणि भविष्यातील व्यावसायिक संधी या दोन्ही बाबतीत अतिशय महत्वाचं होतं.

डग हॅन्सन १९९५ मध्ये हॉलबरोबरच एव्हरेस्टच्या मोहीमेवर आलेला होता. शिखरापासून जेमतेम १०० मी अंतरावर असताना दुपारी २.३० च्या सुमाराला हॉलने त्याला मागे फिरण्यास भाग पाडलं होतं. या वेळी डगला आपल्या तुकडीत सामील करून घेताना हॉलने त्याला मोठी सवलत दिलेली होती. त्यामुळे डग शिखरावर पोहोचेपर्यंत वाट पाहण्याशिवाय हॉलजवळ पर्याय उरला नाही.

स्कॉट फिशर परत न फिरण्याचं कारण मात्र व्यावसायिक नसून हॉलशी असलेली वैयक्तीक स्पर्धा हे असावं. हॉल आणि फिशर दोघंही कसलेले गिर्यारोहक होते. गिर्यारोहकांच्या वर्तुळात दोघांचंही मोठं नाव होतं. हॉल शिखरावर पोहोचलेला असताना आपण परत फिरणं हे फिशरला रूचणारं नव्हतं. त्याच हेतूने त्याने शारिरीक थकव्याकडे दुर्लक्षं करून आपली चढाई सुरू ठेवली असावी. अर्थात याचं मोल त्याला आपल्या प्राणांनी चुकवावं लागलं.

मकालू गाऊच्या बाबतीत मात्र एव्हरेस्टच्या माथ्यावर पोहोचणं हे एकमेव लक्षं असल्याने परत फिरण्याचा प्रश्नच येत नव्हता.

परतीच्या वाटेवर डग हॅन्सन बेशुध्दावस्थेत असतानाही हॉल त्याच्याबरोबर थांबून राहीला होता. डग हॉलचा क्लायंट होता त्यामुळे नैतीक दृष्ट्या त्याची जबाबदारी हॉलवर होती. मात्र हॅन्सन बेशुध्द झाल्यावर आणि तो खाली उतरू शकणार नाही हे स्पष्ट झाल्यावरही हॉलने हिलरी स्टेपवरून खाली येण्यास नकार का दिला हे कळून येत नाही. हॉल साऊथ समिटवर उतरला याचा अर्थ त्यावेळी त्याच्या हाता-पायांना फ्रॉस्टबाईट झालेला नव्हता. हॅन्सन उतरू शकणार नाही हे स्पष्ट झाल्यावर हॉलने साऊथ समिट गाठलं असतं तर तो निश्चीतच कँप ४ पर्यंत येऊ शकत होता.

बेक वेदर्स बाल्कनीत हॉलची वाट पाहत थांबला होता. हचिन्सन, कासिस्च्के आणि टेस्क परत फिरले तेव्हा दुपारचे बारा वाजून गेलेले होते. त्यांच्याबरोबर दोन शेर्पादेखील होते. आपण शिखरावर चढाई करू शकत नाही याची एव्हाना वेदर्सला कल्पना आलेली होती. त्याच वेळी तो त्यांच्याबरोबर परत फिरला असता तर आपला हात गमावण्याची त्याच्यावर वेळ आली नसती.

तिबेटच्या बाजूने चढाई करणा-या भारतीत आणि जपानी मोहीमेत शिखरावर पोहोचण्याची तीव्र स्पर्धा होती. त्यातूनच हरभजन सिंह, ताशी राम आणि हिरा राम परत फिरल्यावर आणि हिमवादळाची चिन्हं दिसत असतानाही सामलां, पाल्जर आणि मोरूप यांनी आपली चढाई चालूच ठेवली होती, त्याची परिणीती अर्थातच त्यांच्या मृत्यूत झाली. जपानी गिर्यारोहकांनी त्यांना कोणतीही मदत करण्याचा प्रयत्न केला नाही हे निंदनीय असलं तरीही विपरीत हवामानातही शिखरावर चढाईचा त्यांचा अट्टाहासही तितकाच कारणीभूत होता.

रेनहार्ड व्लासीचचा ऑक्सीजनविना एव्हरेस्टवर चढण्याचा निर्णयही असाच आत्मघातकी होता. व्लासीचने यापूर्वी कधीही ऑक्सीजनविना चढाई केलेली नव्हती.

अर्थात या सर्व जर-तरच्या गोष्टी झाल्या. प्रत्यक्षात अनेक अनाकलनीय निर्णयांमुळे गिर्यारोहकांना प्राणाला मुकावं लागलं हे नाकारता येत नाही.

गेल्या काही वर्षांत एव्हरेस्टचं झालेलं व्यावसायिकीकरण हे चिंताजनक आहे. अनेक गिर्यारोहण संस्था ६५ ते ७० हजार डॉलर्सच्या मोबदल्यात गिर्यारोहकांना एव्हरेस्टच्या माथ्यावर नेण्याच्या मोहीमा आखत असतात. या मोहीमांतील अनेक गिर्यारोहक हे अननुभवी आणि गिर्यारोहणाचं कोणतंही प्रशिक्षणाचा पूर्ण अभाव असलेले असता॑त. साहजिकच त्यांची जबाबदारी गाईड आणि शेर्पांवर येऊन पडते.

गिर्यारोहणात ऑक्सीजन टॅंक वापरावा की नाही हा सनातन प्रश्न वर्षानुवर्षे चर्चेचा आणि वादाचा मुद्दा आहे. ऑक्सीजन टँक वापरणं हे खिलाडूवृत्तीच्या विरुध्द असल्याचं मत अनेक गिर्यारोहक मांडतात. गिर्यारोहणात ऑक्सीजन सिलेंडर वापरणं म्हणजे सुरक्षीततेची खोटी भावना मनात निर्माण होणं असं अनेक गिर्यारोहकांचं मत असतं.

अननुभवी क्लायंट्सना ऑक्सीजन टँक्सच्या मदतीने एव्हरेस्टवर नेणं हे क्लायंट्स आणि व्यावसायिक गिर्यारोहक आणि गाईड्सच्या दृष्टीने धोकादायक असलं तरीही एव्हरेस्टचं शिखर गाठण्याची असलेली तीव्र स्पर्धा आणि त्यात खेळणारा पैसा याचा विचार करता नजिकच्या भविष्यात अधिकाधीक मोहीमा एव्हरेस्टवर जात राहणार हे उघड आहे. हाच खरा चिंतेचा विषय आहे !

एव्हरेस्टवरील गिर्यारोहकांचे काही फोटो -

अनातोली बुकरीव आणि मार्टीन अ‍ॅडम्स - एव्हरेस्टच्या शिखरावर - जॉन क्राकुअरने काढलेला फोटो
Boukreev - Adams on Everest.jpg

ब्रूस हॅरॉड - एव्हरेस्टच्या शिखरावर - हॅरॉडने स्वतः काढलेला फोटो
Bruce Harrod Summit.jpg

रॉब हॉल
Rob Hall.jpg

स्कॉट फिशर
Scott Fischer.jpg

अनातोली बुकरीव
Anatoli Boukreev.jpg

डेव्हीड ब्रेशीअर्स
David Brashears.jpg

एड व्हिस्टर्स
Ed Visters.jpg

त्सेवांग सामलां
Tsewang Samala.jpg

त्सेवांग पाल्जर
Tsewang Paljor.jpg

एव्हरेस्टवरील सर्वात प्रसिध्द मृतदेह - ग्रीन बूट्स
Green Boots.jpg

अ‍ॅलन हिंक्स
Alan Hinkes.jpg

मॅट डिकन्सन
Matt Dickinson.jpg

टॉड बर्लसन
Todd Burlson.jpg

नील बिडलमन
Neil Bidleman.jpg

माईक ग्रूम
Mike Groom.jpg

अँडी हॅरीस
Andy Harris.jpg

जॉन क्राकुअर
John Krakuar.jpg

बेक वेदर्स
Beck Weathers.jpg

पीट स्कोनींग
Pete Schoneing.jpeg

डग हॅन्सन
Doug Hansen.png

लेनी गॅमलगार्ड
Lene Gammelgaard.jpg

टिम मॅडसन
Tim Madsen.jpg

शार्लोट फॉक्स
Charlotte Fox.jpg

सँडी हिल पिटमन
Sandy Hill Pitman.jpg

यासुको नम्बा
Yasuko Namba.jpg

लोपसांग जंगबू शेर्पा
Lopsang Jangbu.jpg

अंग दोर्जे शेर्पा
Ang Dorje.jpg

मकालू गाऊ
Makalu Gau.png

जॉन टेस्क
John Taske.jpg

लू कासिस्च्के
Lou Kasischke.png

इयन वूडॉल
Ian Woodall.jpg

कॅथी ओ'ड्वूड
Cathy O'Dwod.jpg****************************************************************************************************************************

या निमीत्ताने दोन विशेष आठवणी -

सुमारे दोन महिन्यांपूर्वी डलासमध्येच एका सेमीनारला गेलो असताना अनपेक्षीतपणे १९९६ च्या एव्हरेस्ट मोहीमेतील बेक वेदर्सशी गाठ पडली. सुमारे अर्धा तास त्यांच्याशी गप्पा मारण्याचा योग आला. एव्हरेस्टवर घेतलेल्या अनुभवानंतरही आजही हात गमावल्याची खंत न बाळगता ते आपलं आयुष्य दिलखुलासपणे जगत आहेत. या लेखमालेमागील प्रेरणा ही बेक वेदर्सची ती भेट हे म्हणण्यास हरकत नाही.

दुसरी आठवण सुमारे १६ वर्षांपूर्वीची -

१९९७ मध्ये मार्चच्या अखेरीस मी आणि माझे दोन मित्र एव्हरेस्ट बेस कँपच्या ट्रेकला गेलो होतो. नामचे बाजार इथल्या एका हॉटेलमध्ये आमचा मुक्काम होता. आमच्याबरोबर अनेक परदेशी गिर्यारोहकही तिथे होते. सकाळी नाष्ट्यासाठी आम्ही खाली आलो तेव्हा आमच्या बाजूच्या टेबलावर त्यांच्यापैकी एक गिर्यारोहक येऊन बसला. आम्ही त्याच्याशी गप्पा मारण्यास सुरवात केली. आम्ही तिथे काय करत आहोत याची त्याने चौकशी केल्यावर आम्ही बेस कँपला चाललो असल्याचं त्याला उत्साहाने सांगितलं. त्यानेही आम्हाला शुभेच्छा दिल्या. आम्ही सहजच त्याच्या मोहीमेची चौकशी केली,

" मी एव्हरेस्टच्या शिखरावर जातो आहे !" त्याने बाँब टाकला !

आम्ही त्याच्याकडे आSS वासून पाहत राहीलो !

तो गिर्यारोहक दुसरा-तिसरा कोणीही नसून अनातोली बुकरीव होता !

त्यावेळी एव्हरेस्ट् विषयी फारसं काही वाचनात आलेलं नसल्याने बुकरीव ही काय चीज आहे हे माहीत नव्हतं. पुढे Into Thin Air वाचनात आल्यावर अनातोली बुकरीव या नावाचा नेमका संदर्भ लागला ! त्यावेळी तो नेमका कोण आहे ही कल्पना असती तर किमान त्याच्यासह एक फोटो काढून घेतला असता. पण ते होणं नव्हतं

****************************************************************************************************************************

संदर्भ -

From The Summit - सर एडमंड हिलरी
Ghosts Of Everest - जोआकेम हेम्लेब
Everest North Side - जोआकेम हेम्लेब
The Crystal Horizon: Everest - The First Solo Ascent - रेनॉल्ड मेसनर
All Fourteen 8,000ers - रेनॉल्ड मेसनर
Into Thin Air - जॉन क्राकुअर
The Climb : Tragic Ambitions on Everest - अनातोली बुकरीव आणि गॅरी वेस्टर्न डिवाल्ट
Climbing High - लेनी गॅमलगार्ड
Left For Dead : My Journey Home From Everest - बेक वेदर्स
The Other Side of Everest : Climbing the North Face Through the Killer Storm - मॅट डिकन्सन
No Shortcuts to the Top: Climbing the Worlds 14 Highest Peaks - एड व्हिस्टर्स
Storm Over Everest - डेव्हीड ब्रेशीअर्स

याव्यतिरिक्त इंटरनेट वरील अनेक संकेतस्थळांवरील लेख आणि विकीपीडीयावरील अमुल्य माहीती.
सर्व फोटो इंटरनेटवरून साभार.

समाप्त

१९९६ माऊंट एव्हरेस्ट - ९

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

" गिर्यारोहण हे माझ्या आयुष्याचं अंतिम ध्येय आहे ! मी दुसरं काहीही करू शकणार नाही !"

आपल्या शब्दाला जागून बुकरीवने अन्नपूर्णावर मृत्यूला कवटाळलं ! >>>>> ध्येयासक्तीचे मूर्तिमंत उदाहरण आहे हे.....

जबरदस्त लेखमालिका .....

या सगळ्या गिर्यारोहकांचे फोटो दिलेत हे फार चांगले केलेत.... (बुकरीव बरोबर तुमचा फोटो पाह्यला आम्हा सर्वांनाच अतिशय आवडले असते..........)

मनापासून धन्यवाद -स्पार्टाकस ...... पु ले शु

अतिशय सुरेख लेखमला !
Into thin air दोनवेळा लायब्ररीतून आणून न वाचताच परत द्यायला लागलं होतं... त्यामुळे ह्या दुर्घटनेबद्दल काहिच माहिती नव्हती.. इतकी सविस्तर लेखमला लिहिल्याबद्दल धन्यवाद !
लिखाणाची आणि वर्णनाची शैली खूप आवडली..
आपण आत्ता कितीही उहापोह केला तरी त्यावेळी निर्णय घेताना लोकांच्या मनात काय सुरु असेल काय माहित !

पुढील लेखनासाठी शुभेच्छा ! Happy

या लेखमालेबद्दल तसेच संदर्भ सूचीसाठी अनेकानेक धन्यवाद ...

आपल्या आवडीच्या विषयांवर अजूनही लिहित रहा... वाचायला नक्की आवडेल..

या लेखमालिकेच्या निमित्ताने एव्हरेस्ट फिरुन आलो.

व्यावसायिक स्पर्धेतुन त्याची वात लावायला घेतली आहे, तिव्र निशेध.

Spartacus, tumchya lekhmalene khup aanand dila. Khup dhanyavad! Sagale bhaag agadi abhyaspoorna lihile hote. Barrech navin mahitee milali. Sagale bhag punha ekda wachnar aahe.

Hallich ek sachha mountaineer Reinhold Messner cha ek interview pahanyat aala. Jon Krakauer ani Anatoli Boukreev baddal tyanchi mate samajali.
http://youtu.be/yaWHdHPwkV0

Apratim lekhmale baddal punha ekda dhanyavad!

सपूंर्ण लेखमालिका - अप्रतिम! ही लेखमालिका वाचण्याअगोदर माऊंट एव्हरेस्ट हे जगातले सर्वात ऊंच शिखर एवढं माहिती होतं... तुमच्या लेखमालिकेमुळे माऊंट एव्हरेस्ट आणि गिर्यारोहकांची रोचक माहिती मिळाली! जंगलशिकारी लेखामुळे सुध्दा भारताविषयी अजून वेगळे गवसले होते!

स्पार्टाकस - दहा दिवसात लेखमालिका पूर्ण केल्यामुळे पुन्हा एकदा धन्यवाद, आता तुमच्या पोतडीतून अजून वेगळे काहितरी काढा!

वरच्या सगळ्या प्रतिसादांना अनुमोदन. अख्खी लेखमालाच भारी होती. त्यात तुम्ही पटापट भाग टाकत होतात त्यामुळे लिंकही तुटत नव्हती आणि वाट बघणं कंटाळवाणं होत नव्हतं, थरार टिकून होता.
तुम्ही बेक वेदर्स, बुकरीवला भेटलात म्हणजे भारीच.
आता पुढे काय लिहायला घेताय?

स्पार्टाकस,

जबरदस्त लेखन आहे. या मोहिमेबद्दल वाचलं होतं बरंच आधीही, तरीपण सुन्न व्हायला होतंच! एव्हरेस्ट म्हंटलं की डेथझोन (८००० मीटर्सपेक्षा उंची) आलाच. हे सारे मृत्यू उतरताना झालेले आहेत. दुपारी १४०० वाजता असाल तिथून मागे फिरायलाच हवं. तिथे तडजोड नाही.

चार दिवसांत अकरा माणसे मेली तरी १९९६ हे वर्ष सांख्यिकीय दृष्ट्या सुरक्षित होते असं म्हणतात! Uhoh

>> Before 1996, one in four climbers had died making the ascent; 1996 saw huge numbers
>> of people attempting the climb and the statistics for 1996 reveal that only one in seven
>> died.

नेमक्या याच कारणामुळे एव्हरेस्टचे अति व्यवसायीकरण झाले आहे असा आरोप केला जातो.

असो.

यानिमित्ते वसंत लिमयांच्या कांचनगंगेच्या मोहिमेची आठवण झाली. तीत संजय बोरोळे अतिश्रमामुळे मृत्युमुखी पडले होते.

आ.न.,
-गा.पै.

सर्वांचे मनापासून आभार..!!

एव्ह्रेस्ट बेस ट्रेक केल्याला बरीच वर्षे झाली. शेवटचा २००३ मध्ये गेलो होतो. पुन्हा गेलो तर नक्की वर्णन करेन.

फारच छान लेखमाला!
पण आता रोज इथे येउन तुमचे लेख वाचायची सवय लावलीये तुम्ही. त्यामुळे पुढच लिहायला घ्या कसे Happy

संपूर्ण लेखमाला वाचून काढली

थरारक वर्णन केल आहे
सुंदर लेखमालेसाठी खूप धन्यवाद
स्पार्टाकस.>>>>>+1111

अप्रतिम लेखमाला. .......... आज वाचून काढली..

ही लेखमालिका वाचण्याअगोदर माऊंट एव्हरेस्ट हे जगातले सर्वात ऊंच शिखर एवढं माहिती होतं... तुमच्या लेखमालिकेमुळे माऊंट एव्हरेस्ट आणि गिर्यारोहकांची रोचक माहिती मिळाली! जंगलशिकारी लेखामुळे सुध्दा भारताविषयी अजून वेगळे गवसले होते! >>++१११

स्पार्टा खुपच सुंदर लिखाण.

मी ही मालिका वाच्लेली नाही. Happy आज पहिल्यांदाच दिसली खरतरं. Sad

पहिल्यापासून वाचतो आणि मग हे वाचून नीट प्रतिसाद देईन.

सध्या Into Thin Air वाचतोय.

ट्रॅप चा भाग आला नव्हता म्हणून ही मालिका वाचायला घेतली अन संपवल्याशिवाय सोडली नाही! जबरदस्त थरार !!
सगळी कॅरेक्टर्स शेवटच्या भागापर्यन्त ओळखीची होऊन गेली. त्यातल्या दोघांना तुम्ही भेटलायत हे वाचून फारच भारी वाटलं!
याच १९९६ डिझास्टर वर एक सिनेमा येतोय याच वर्षी , आता नक्की बघेन
"एव्हरेस्ट"
http://www.imdb.com/title/tt2719848/

शेवलेखमाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत खिळवून ठेवते. प्रत्येक भाग अतिशय उत्कंठावर्धक आहे. एका दमात सगळे भाग वाचून काढले. बर्‍याच दिवसांनी काहीतरी वेगळे वाचल्याचे समाधान वाटले. तुमचे आभार !

अरे जबरी मैत्रेयी ! हा सिनेमा बघायला मजा येईल एकदम.. सगळी ह्यातली / खरी कॅरॅक्टर्स आहेत त्यात.

Into the thin air
वाचले
पुस्तकात अनेक तपशील आहेत पण ही लेखमाला पुस्तकापेक्षा सरस उतरली आहे

क्रकुर बुकरिव वादात त्याने आपले सविस्तर म्हणणे दिले आहे
ते काही अंशी पटते