छंदांविषयी – अनिल अवचट….एका हिमनगाचं दर्शन

Submitted by अतुल ठाकुर on 20 December, 2013 - 10:04

chhandavishayi1.jpg

अनिल अवचटांची पुस्तके त्यातील सामाजिक आशयामुळे सुरुवातीपासुनच वेगळी वाटली होती. त्यातुन त्यांची “रिपोर्ताज” प्रकारची शैली आवडुन गेली. त्यांचं मिळेल ते पुस्तक वाचत सुटलो. त्यापुस्तकांमधुन सामाजिक प्रश्नांबरोबरच अवचटदेखिल उलगडत गेले. प्रत्येक प्रश्नांबद्दल त्यांना असलेली बांधिलकी, समाजातल्या खालच्या थरातील लोकांबद्दलचा अस्सल जिव्हाळा आणि त्यांच्याबाबत ठरवलेल्या तत्वांचं चोख पालन पाहुन अवचटांबद्दल फक्त आणि फक्त अतीव आदरच वाटला. स्वतःच्या मुलींना साधारण शाळांमध्ये पाठवणे, त्यांना झोपडपट्टीतल्या मुलांबरोबर खुशाल मिसळु देणे, अशा किती गोष्टी सांगाव्यात? त्यानंतर येतो तो मुक्तांगणचा व्याप आणि त्यात अवचटांचे सर्वार्थाने झोकुन देणे. डॉ.सुनंदा अवचटांचा करारी स्वभाव, पतीला त्यांनी दिलेली साथ, अवचटांचं सर्वार्थाने त्यांच्यावर अवलंबुन राहाणं, आपल्या पत्नीचा अनेक बाबतीतला थोरपणा मोकळेपणाने मान्य करणं, हे पाहुन हे एक जगावेगळं जोडपं आहे याची कल्पना आली. त्यांच्या मुक्ता आणि यशोदा या मुलींची देखिल वर्णने घटनेच्या ओघात आलेली अनेकदा वाचली. इतकी पुस्तके आणि इतक्यांदा वाचल्यानंतर अनिल अवचट हा लेखक आपल्याला कळला या मिजाशीत वावरत होतो. पण त्यांचं “छंदाविषयी” हे पुस्तक हाती पडलं आणि आमची ती मिजास उतरली. या लेखकाबद्दल अपल्याला फारच थोडी माहिती आहे ही जाणीव तर चटकन झाली. मात्र अवचट हे व्यक्तीमत्व अफाट आणि अजस्त्र आहे याची कल्पना मात्र हे पुस्तक वाचल्यावर आली हे आवर्जुन नमुद करावसं वाटतं. हे पुस्तक अनिल अवचट या हिमनगाचं फक्त टोकच आपण आजवर पाहिलं, त्या हिमनगाचा कित्येकपटीने मोठा भाग आपल्याला अज्ञात आहे याची जाणीव निश्चितपणे करुन देतं.

पुस्तकाच्या दर्शनी रुपातही त्याचं निराळेपण दिसतं. चौरसाकृती आकाराचं हे पुस्तक आणि त्यावरच्या रंगीबेरंगी तुकड्याचं डिझाईन. एकदा हातात घेतल्यावर सोडवत नाही. अवचटांनी त्यांच्या अनेक छंदाबद्दल यात सविस्तर लिहिलं आहे. काही छंद, जसे चित्रकला, स्वयंपाक, ओरिगामी, फोटोग्राफी, लाकडातील शिल्पकला, वासरी, वाचन यावर विस्तृत लेख आहेत. तर “इतर छंद” या लेखात त्यांच्या कोडी सोडविण्याची आवड, जादु वगैरेंबद्दल लेखन आहे. या माणसाला इतका वेळ कसा मिळत असेल असा प्रश्न वाचकाच्या मनात येतो न येतो तोच त्याचं उत्तरही अवचट देऊन मोकळे होतात. त्यांचे हे छंद मुळातच त्यांच्या जीवनशैलीशी सुसंवाद साधुन आहेत. त्यांनी छंदांचा पसारा होऊ दिला नाही. त्यामुळे सभा असो, चित्रपटगृह असो, बस स्टँडवर बसची वाट पाहणं असो, कुठेही अवचटांना वेळ कसा घालवावा हा प्रश्नच पडला नाही. ओरिगामी किंवा स्केचेसची वही बाहेर काढुन कलेची उपासना सुरु. पुण्याहुन मुंबईला येण्यासाठी गाडीत बसल्यावर एकदा मान खाली घालुन अवचट आपल्या कलेच्या प्रांतात शिरले कि मान वर केल्यावर दादरच आलेले दिसले. मध्ये कोण आले गेले, चहावाल्यांच्या आरोळ्या, शेजारपाजारच्या लोकांच्या गप्पा, कसलाही पत्ता नाही. अशी एकतानता आणि तल्लीनता साधलेल्या या माणसाला अवलिया नाही तर दुसरे काय म्हणायचे?

अवचटांनी हे छंद जोपासण्यासाठी जे जे गुरु केले त्यांची व्यक्तीचित्र या लेखात त्यांनी रेखाटली आहेत. चित्रकलेतला त्यांचा गुरु मनोहर, त्याच्याकडुन प्रथम चित्र कशी पाहावित याचे मिळालेले शिक्षण, हळुहळु त्या कलेत त्यांची होत गेलेली प्रगती, मनोहरचे दारुचे व्यसन आणि त्यापायी झालेली वाताहत याचे सारे वर्णन लेखात आहे. आणि त्यात स्वतः अवचट गुंतलेले आहेत. अवचटांच्या “रिपोर्टाज” शैलीची सवय असणार्‍यांना यापुस्तकाचे हेही वेगळेपण जाणवेल. अवचट या सार्‍या गोतावळ्यात पूर्णपणे गुंतलेले आहेत. येथे त्यांचे अलिप्त राहुन केलेले निरिक्षण नाही तर गुरुच्या शोकांतिकेमुळे पावलागणिक स्वतःला झालेल्या वेदना अवचट लिहुन जातात. ओरिगामीमधील जपानचे कासे गुरुजी, त्यांची ओरिगामीवरील पकड, ओरिगामीतील मास्टर्सची माहिती, त्या कलेच्या साधनेमुळे मिळालेले एकाचढ एक मित्र मैत्रिणी या सार्‍यांबद्दल अवचट लिहिताना रंगुन जातात. स्वयंपाक करताना मित्रांसाठी रांधायचं म्हणजे अवचटांना कोण उत्साह. मित्र मैत्रिणींची त्या निमित्ताने पुजा बांधलेली असते असं त्यानी लेखाच्या शेवटी म्हटलेलं आहे. अवचटांना त्यांच्या छंदापायी अनेक जिवाभावाचे मित्र मिळाले, लहान मुलांशी संवाद साधता आला, आयुष्य निर्मितीक्षम होऊन समृद्धतर झालेच पण त्यांनी कलेचा कधीही बाजार मांडला नाही. खर्‍या अर्थाने स्वानंदासाठी उपासना चालु ठेवली. मित्रांच्या आग्रहाखातरदेखिल अवचट यात पडले नाहीत. “ओरिगामी” वगळता कसलेही प्रदर्शन भरवले नाही. त्यात देखिल एका अनोख्या कलेची आपल्या लोकांना ओळख व्हावी हाच उद्देश होता. छंद जोपासताना कसलाही लोभ नाही, निर्मितीचा आनंद वगळता काहीही मिळवण्याची इच्छा नाही, कुणाशीही स्पर्धा नाही, कसलेही “किलर इन्स्टींक्ट नाही. बहुधा या निर्लेप राहाण्याच्या वृत्तीमुळेच त्यांना या कलांचा निर्भेळ आनंद घेता आला असावा. यामुळेच “छंदाविषयी” हे पुस्तक अवचटांचे एकातर्‍हेने जीवनावरील भाष्यदेखिल झाले आहे.

आणखि एका गमतीशीर पैलुचा उल्लेख केल्याशिवाय राहावत नाही. एरवी अवचट गुरु वगैरेंवर टिका करताना दिसतात. येथे मात्र आपल्या छंदामधल्या गुरुंसमोर ते संपूर्ण शरण आहेत. अगदी अध्यात्मिकतेची आठवण यावी इतके अवचट त्यांच्या गुरुंबद्दल भावुक होताना दिसतात. बासरीवादनाचा उल्लेख करताना एके दिवशी अचानक अवचटांना सूर “दिसतो”. हे वर्णन मुळातुनच वाचण्याजोगे. एरवी वैज्ञानिकतेला प्रमाण मानणार्‍या अवचटांनी या सूर दिसण्याचे गुढ वर्णन बहारदारपणे केले आहे. मनाला चटका लावणारी वर्णने तर अनेक येतात. दादरच्या गर्दीत बासरी विकणारे धोत्रे आणि म्युनिसिपाल्टीच्या लोकांनी त्यांच्या बासर्‍या रस्त्यावर सांडुन, त्यावर नाचुन त्यांची केलेली मोडतोड हा अतिशय हदरवुन टाकणारा प्रसंग त्यांनी लेखात वर्णिला आहे. नाचताना “ना रहेगा बांस, ना बजेगी बांसुरी” असे आसुरी आनंदाने त्यांचे ओरडणे, सारेच भयंकर. धोत्र्यांचे हा प्रसंग सांगताना डोळ्यात तरळलेले पाणी वाचकांनादेखिल सुन्न करुन जाते.

अनिल अवचटांच्या आजवरच्या लिखाणातील हे अगदी वेगळ्या तर्‍हेचं पुस्तक. ज्यांना अवचट माहित आहेत त्यांना हे पुस्तक एका वेगळ्याच तर्‍हेचा आनंद देइल, ज्यांना अवचट माहीत नाहीत त्यांना नवीन काहीतरी अपुर्व सापडल्यासारखं वाटेल. आमच्यासारखे जे अवचटांच्या लिखाणाशी बर्‍यापैकी परिचित आहेत त्यांना हे पुस्तक वाचुन विस्मय वाटेल. या पुस्तकातुन जाणवलेल्या अवचटांच्या स्वभावातल्या एका गोष्टीवर अक्षरशः जीव ओवाळावासा वाटतो. यातली एखादी कला थोडीशी जरी वश झाली तर हवेत उडु लागण्याच्या या जमान्यात अवचटांना काय हवे असेल तर या कलेच्या माध्यमाने सामान्य माणसे, मुले यांच्या जवळ कसे जाता येइल, त्यांच्याशी नाते प्रस्थापित कसे करता येइल. असे अनेक प्रसंग या पुस्तकात जागोजाग सापडतात. अशाच एका हृद्य प्रसंगात अवचट स्टेशनवर उतरल्यावर एक आजी त्यांच्याकडे नातवासाठी ओरिगामीतलं काहीतरी करुन देण्याची विनंती करतात. अवचट ती मान्य करुन तेथेच बाकड्यावर बसुन काही वस्तु करुन देतात. माणसांची दु:खे कमी करण्याचा ध्यास असलेल्या अवचटांची ही कृती स्वाभाविकच म्हटली पाहिजे. मात्र यातुन अनेक बोलक्या सुधारकांपेक्षा, आपल्या तत्वे कटाक्षाने कृतीत उतरविण्याच्या स्वभावामुळे या माणसाने सर्वसामान्यांशी दुर्मिळ अशी एकतानता साधली आहे हे जाणवतं आणि आपण फारच छोटे वाटु लागतो. आपली सुख दु:खे फार लहान वाटु लागतात. अवचटांप्रमाणेच जनसामान्यांशी संवाद साधण्याची उर्मी दाटुन येते. अवचटांनी हातचं राखुन कधीही लिहिलं नाही. त्यांच्या लिखाणात ते स्वतःबद्दलही आवश्यक तेथे लिहित जातातच. मात्र “छंदांविषयी” या पुस्तकाच्या निमित्ताने या लेखकाने अत्यंत अगत्याने वाचकाला माजघरात प्रवेश दिला आहे असे मला वाटते.

अतुल ठाकुर

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मात्र अवचट हे व्यक्तीमत्व अफाट आणि अजस्त्र आहे याची कल्पना मात्र हे पुस्तक वाचल्यावर आली>>>>हे पुस्तक वाचले आहे. अतिशय सुरेख! तुम्ही यथार्थ वर्णन केले आहे.

अजून नाही वाचलं हे पुस्तक.
>>धन्यवाद, वरील पुस्तकाचा परिचय इथे दिल्याबद्दल.>>+१

दहा बारा वर्षांपूर्वी दिवाळी अंकात (कालनिर्णय ?)यांच्या छंदांविषयी वाचल्याचे आठवते .
छंद जोपासणे याकडे फारच दुर्लक्ष केले जाते .

कुठल्यातरी हिंदी सिनेमाचा हिरो असले उद्योग(!) करताना दिसेल तेव्हा छंदांना बरे दिवस येतील .

बालपणचे छंद रिटायरमेंटनंतर उपयोगी पडतात .

देखणे ते चेहरे जे प्रांजळांचे आरसे ..... आणि

जीवन त्यांना कळले हो...... या बाकीबाब यांच्या दोन्ही कविता ज्यांना पुरेपूर लागू आहेत ते डॉ. अनिल अवचट खरोखरच ग्रेट, ग्रेट.. ग्रेटच आहेत.........

अतुलजी, पुस्तक परिचय सुरेखच आहे पण अनिलजींचे व्यक्तिमत्व तुम्ही इथे इतक्या सुंदर पद्धतीने उलगडले आहे की - वाह... क्या बात है - असेच म्हणावेसे वाटते....

मनापासून धन्यवाद.....

अत्यंत मर्मग्राही लेख! अवचटांबद्दल अतिशय यथार्थ आणि समर्पक शब्दांत तुम्ही लिहिलंय. पण तरिही या पल्याड ते आहेत याची जाणीवही तुमच्या या लेखात आहे. लेख खूप आवडला.

असेच अजून छान छान लेख तुमच्याकडून यावेत ही सदिच्छा!.....:स्मित:

>>एरवी अवचट गुरु वगैरेंवर टिका करताना दिसतात. येथे मात्र आपल्या छंदामधल्या गुरुंसमोर ते संपूर्ण शरण आहेत. अगदी अध्यात्मिकतेची आठवण यावी इतके अवचट त्यांच्या गुरुंबद्दल भावुक होताना दिसतात.<<
हे निरिक्षण इतक मार्मिक आहे कि मी अतुलजींच्या प्रेमात पडलो. Happy

पुस्तक वाचले होते ...आवडले होतेच ... तुम्ही दिलेला परिचय हि आवडल्लाच त्यामुळे....
पुस्तक वाचुन वाटले होते कि खरच आपण किती कारण देतो काहीही न करता ... खरी आवड असली कि सवड मिळ्तेच

अतुल, अक्षरशः प्रत्येक वाक्याला अनुमोदन. छान लिहिलत. मी देखिल आधी त्यांची इतर पुस्तकं वाचली होती. नंतर हे वाचलं. आणि वाचतांना "अरे, हे पण; असं पण !!! अशीच रिअ‍ॅकशन होती

अतुल... मला वाटते तुमच्याशी बोलणे वा वि.पू. तून चर्चा झाल्यावरच मी देखील 'छंदाविषयी' पुस्तक खरेदी करायला गेलो होतो. घेतल्याक्षणीच पुस्तकाच्या मांडणीच्या प्रेमातच प्रथम वाचक पडतो आणि मग साहजिकच कुतूहलाने मुखपृष्ठ व मांडणीकारांच्या नावाकडे माझे लक्ष गेले....अशोक गोखले व अपर्णा जोशी...या दोन कलाकारांनी एका पानाचे सरळसरळ दोन भाग करून अवचटांचा मजकूर आणि त्यांची रेखाटने इतकी आकर्षक आणि व्यवस्थितपणे बसविली आहेत तोही मग एक छंद बनून जाईल असा विश्वास वाटला.

"छंदाविषयी..." हे पुस्तक जितके सुंदर तितकाच तुम्ही करून दिलेला हा परिचय तितकाच ओघवता आणि नेमका उतरला आहे. पुस्तकातील "बासरीचा नाद" प्रकरण मला सर्वात आवडलेले. इंजिनिअर असलेल्या गेंडे याना अवचट जेव्हा विचारतात, "पण बासरीतून आवाज निर्माणच होतो कसा ?" तेव्हा पटते की अनिल अवचट एखादी गोष्ट समजून घेण्यासाठी आपली प्रश्नावली अत्यंत प्राथमिक पातळीवर अशी आणतात. इतका साधा हा प्रश्न, जो कित्येकांना पडणारच नाही...पण अवचटांची हीच ख्याती....मग गिंडेनी त्याना सविस्तर उत्तर दिले आहे, ते मुळातूनच वाचायला हवे....शिक्षण कसे देणे यापेक्षा ते कसे मिळविणे किती महत्वाचे आहे हे जाणायचे असेल तर अवचटांचे प्रश्न वाचायला हवेत....विविध क्षेत्रातील.

याच लेखातील धोत्रे बासरीवाले यांच्याशी पडलेली अवचटांची गाठ हे अतिशय वाचनीय असे प्रकरण झाले आहे....तितकेच दु:खीही...विशेषतः म्युनिसिपालिटी कर्मचार्‍यांनी जेव्हा त्यांच्या सार्‍या बासर्‍या तोडून त्यावर नाचलेही....पण त्यातूनही अवचट तो छंद शिकले....शिकविणार्‍या गिंडे आणि धोत्रे यानी तो शिकविलाही. पुण्यातील 'पन्नालाल घोष स्मृती समारोह" प्रसंगी अनेक तालेवारांनी हजेरी लावली होती, तरीही मुख्य संयोजक श्री.अरविंद गजेन्द्रगडकर यानी तसल्या गर्दीत पायजमा शर्टात एका कोपर्‍यात उभे असलेल्या धोत्र्यांना त्यानी ओळखले व हजर असलेल्या तमाम रसिकांना "रस्त्याकडेचा मुरलीधर" अशी ओळख करून दिली....आणि त्यांच्याभोवती शालही गुंडाळली.

"छंदाविषयी...." वाचताना अशी दुर्लक्षीतांची कदर झाल्याचेही समजते.

कालच ह्या पुस्तकाची छोटीशी झलक शशांक पुरंदरेंमुळे मिळाली आहे.
हे पुस्तक संग्रही ठेवण्याजोगे आहे यात शंका नाही.
आता घेतोच हे पुस्तक लवकरात लवकर.
अतुलजी, खूप खूप धन्यवाद ह्या लेखाबद्दल.

वा वा,,, अतुल... अतिशय सुरेख परिचय. पुस्तक अन लेखक दोघांचं
ही असं एकत्रं कौतुक अतिशय ओघवत्या शैलीत.
पुस्तक घेणारच घेणार.