१९९६ माऊंट एव्हरेस्ट - ९

Submitted by स्पार्टाकस on 19 December, 2013 - 22:51

एव्हरेस्टच्या वायव्य धारेवर तिबेटच्या बाजूने चढाई करण्यासाठी इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस आणि जपानी फुकोका मोहीमेव्यतिरिक्त इतरही अनेक मोहीमा शिखरावरील चढाईसाठी तळ ठोकून होत्या. मात्रं यापैकी कोणीही १०-११ मे रोजी चढाईचा प्रयत्न केला नव्हता !

इंग्लंडच्या चॅनल ४ - हिमालयन किंगडमची मोहीम एव्हरेस्टच्या पायथ्याला होती. सायमन लोवेच्या नेतृत्वाखालील या मोहीमेचं प्रमुख उद्दीष्ट ब्रिटीश अभिनेता ब्रायन ब्लेस्डच्या एव्हरेस्टवरच्या चढाईचं चित्रीकरण हे होतं. गाजलेला ब्रिटीश गिर्यारोहक अ‍ॅलन हिंक्स या मोहीमेचा भाग होता. साहसी खेळांवरील कार्यक्रम दिग्दर्शीत करणारा गिर्यारोहक मॅट डिकन्सन या चित्रीकरणाचा दिग्दर्शक होता. कीस्ट हूफ्ट, रॉजर पोर्त्च, मार्टीन बार्नीकॉट, टोर रामसेन हे गिर्यारोहक आणि संदीप धिल्लन हा गिर्यारोहक आणि डॉक्टर या मोहीमेचा हिस्सा होते. फायनान्शियल टाईम्सचा पत्रकार रिचर्ड कॉपर मोहीमेच्या वृत्तसंकलनासाठी आला होता.

त्यांच्याव्यतिरिक्त नॉर्वेजीयन, स्पॅनीश, जर्मन आणि स्लोवानियन मोहीमांचाही बेस कँप वर मुक्काम होता. त्यांच्याशिवाय ऑस्ट्रीयन गिर्यारोहक रेनहार्ड व्लासिच आणि त्याचा हंगेरीयन जोडीदार हे देखील बेस कँपवर होते.

१६ मे पासूनच रेनहार्ड व्लासिच आणि त्याचा जोडीदार कँप ६ वर होते. व्लासिचला एच.ए.पी.ई आणि एच. ए. सी. ई. दोन्हीने ग्रासलं होतं. त्याचा जोडीदार त्याची शुश्रुषा करत कँप ६ वर थांबला होता !

१७ मे ला अ‍ॅलन हिंक्स आणि मॅट डिकन्सन कँप ५ वरून कँप ६ वर चढाई करत होते. वाटेत त्यांना नॉर्वेजियन मोहीमेचा प्रमुख जॉन खाली उतरताना भेटला. एव्हरेस्टची त्याची ही तिसरी अपयशी मोहीम होती. त्याच्या तुकडीतील गिर्यारोहक शिखरावर चढाईसाठी पहाटेच निघाले होते. त्याच्याकडून त्यांना व्लासिचची अवस्था अत्यंत गंभीर असल्याची बातमी कळली होती. व्लासिच कोमात गेला होता !

१८ मे च्या रात्री हिंक्स आणि डिकन्सन ८३०० मी ( २७२३० फूट ) उंचीवरील कँप ६ मध्ये दुस-या दिवसाच्या अंतीम चढाईची चर्चा करत असतानाच अचानक एक गिर्यारोहक धडपडत त्यांच्या तंबूत आला. तो व्लासिचचा हंगेरियन जोडीदार होता !

" मला मदत करा प्लीज.. मला ऑक्सीजन आणि खाण्यासाठी हवं आहे !"

अडखळत तो दोघांना म्हणाला. त्याला अल्टीट्यूड सिकनेसचा त्रास जाणवत होता हे हिंक्स - डिकन्सनच्या ध्यानात आलं.

" काय झालं ?" हिंक्सने शांत सुरात विचारलं.
" माझा मित्र रेनहार्ड तिकडे मरणाच्या दारात आहे !" एका तंबूकडे बोट करत तो म्हणाला," काहीही करून मला त्याला खाली घेऊन जाणं आवश्यक आहे. मला त्याला खाली नेण्यासाठी मदत करा !"
" नॉर्वेजियन डॉक्टर मॉर्टनने त्याला तपासलं नाही ?"
" तपासलं ! तो कोमा मध्ये आहे ! त्याला एडेमा झाला आहे !"
" तो कोमात असेल तर तू काही करू श़कणार नाहीस ! तो निश्चित मरणार आहे. तुझ्याजवळ ऑक्सीजन आहे ?!"
" नाही ! मी एक टँक घेऊ का ?" तंबूतील टँककडे बोट दाखवत त्याने विचारलं.
" तुला पाहिजे तेवढे घे !"
" आपण त्याला खाली घेऊन जाऊ शकतो ! मला काहीतरी हालचाल करावीच लागेल !"
" आपण काहीही करू शकत नाही !" हिंक्स शांतपणे पण ठाम आवाजात म्हणाला, " तो शुध्दीवर असता आणि इथे कितीही माणसं मदतीला असती तरीही त्याला खाली उतरवणं अशक्यं झालं असतं ! कँप ५ वर उतरणा-या वाटेचा विचार कर. तिथल्या कड्यांवरून त्याला खाली नेणं कसं जमणार आहे ?"

तो हंगेरीयन काही क्षण गप्प राहीला. त्याला सगळं पटत होतं पण आपल्या जोडीदाराला सोडून जाण्याची कल्पना त्याला सहन होत नव्हती ! व्लासिचचा श्वासही धड नव्हता. मधूनच तो श्वास घेत होता.

हिंक्स आणि डिकन्सन दोघांच्याही डोक्यात एकच गोष्ट घोळत होती. व्लासीचच्या जोडीला त्या हंगेरियन गिर्यारोहकाचा जीवही धोक्यात होता !

" हे बघ, रेनहार्ड निश्चीत मरण पावणार आहे. तू काहीही करू शकणार नाहीस !" ठाम सुरात हिंक्स बोलत होता, " तू जर खाली परत गेला नाहीस तर उद्या त्याच्याबरोबर तू पण मरून पडशील ! आता एक कर, दोन ऑक्सीजन टँक्स घे, आजची रात्र काढ ! उद्या सकाळी इथून अजून एक टँक उचल आणि खाली जा ! तू स्वतः खाली उतरू शकशील का ?"

त्या हंगेरियन गिर्यारोहकाने मान डोलवली. दोन ऑक्सीजन टँक्स घेऊन तो आपल्या तंबूकडे परत गेला.

मॅट डिकन्सन म्हणतो,

" तो कोणत्या मनस्थितीत असेल याची मी कल्पनाही करू शकत नव्हतो ! काही तासांत व्लासिच त्याच्या शेजारी मरण पावणार होता. त्याचा स्वतःचा जीवही धोक्यात आलेला होता !"

डिकन्सन आणि हि़ंक्स आपल्या पूर्वीच्या योजनेनुसार रात्री अडीच वाजता तीन शेर्पांसह अंतीम चढाईसाठी निघाले.

" आमच्या पासून काही अंतरावर व्लासिच मरणाच्या दारात पडला होता !" डिकन्सन म्हणतो, " असं असतनाही शिखरावर जाण्याचा आमचा निर्णय कदाचित असमर्थनीय वाटू शकतो. परंतु त्या परिस्थितीत आम्ही त्याच्यासाठी काहीही करू शकत नव्हतो. ८३०० मी उंचीवरुन त्याला खाली आणणं आणि ते ही तो कोमात असताना निव्वळ अशक्य होतं !"

व्लासिचचा हंगेरीयन जोडीदार सुखरूप बेस कँपला परतला.

डेव्हीड ब्रेशीअर्सच्या आयमॅक्स मोहीमेतील गिर्यारोहक बेस कँपवर परतले होते. या मोहीमेचा मुख्य उद्देश हिमालयन किंगडमच्या मोहीमेप्रमाणेच एव्हरेस्टच्या चढाईचं चित्रीकरण करणं हा होता. आतापर्यंत या मोहीमेत तब्बल ५५ लाख डॉलर्स गुंतलेले होते ! हॉल आणि फिशरची तुकडी बेस कँप सोडून काठमांडूला निघून गेल्यावर त्यांनी पूर्ण विचाराअंती पुन्हा शिखरावर जाण्याची योजना आखली ! स्वतः ब्रेशीअर्स, एड व्हिस्टर्स, रॉबर्ट शॉअर असे कसलेले गिर्यारोहक असल्याने त्यांना यशाची संपूर्ण खात्री वाटत होती.

एड व्हिस्टर्सची पत्नी पॉला बार्टन व्हिस्टर्स ही आयमॅक्सची बेस कँप मॅनेजर होती. १०-११ मे रोजी हॉल आणि फिशरच्या तुकडीतील गिर्यारोहक मृत्यूशी झगडत असताना ती बेस कँपवर रेडीओद्वारे त्यांच्या संपर्कात होती. हॉल आणि फिशरच्या मृत्यूने तिला जबरदस्त धक्का बसला होता. तशा परिस्थितीतही ब्रेशीअर्स - व्हिस्टर्सचा शिखरावर चढाई करण्याचा निर्णय ऐकून काय करावं समजेना.

" त्या दोन दिवसात जे काही झालं त्यानंतर आमची मोहीम गुंडाळण्यात येईल अशी माझी जवळपास खात्री झाली होती !" पॉला म्हणते, " पण डेव्हीड आणि एडचा माथ्यावर जाण्याचा निर्णय ऐकून मला काय बोलावं कळेना !"

पॉला व्हिस्टर्स बेस कँप सोडून टेंगबोचे इथल्या बौध्द विहारात ( मॉनेस्ट्री ) जाऊन राहीली ! पाच दिवसांनी ती बेस कँपवर परतली.

" पूर्ण विचार केल्यावर मला डेव्हीड आणि एडचं मत पटलं. रॉब आणि स्कॉट गेले होते. ते परत येणं शक्य नव्हतं. अशा परिस्थितीत आमची मोहीम अर्धवट सोडण्यात काही अर्थ नव्हता !"

२२ मे ला आयमॅक्स मोहीमेतील गिर्यारोहक साऊथ कोलवर पोहोचले. त्या रात्रीच अनुकुल हवामानात त्यांनी शिखरावर अंतीम चढाईस सुरवात केली.

२३ मे सकाळी ११.०० वाजता एड व्हिस्टर्स एव्हरेस्टच्या शिखरावर पोहोचला. अनातोली बुकरीवप्रमाणेच त्याने ऑक्सीजन टँकचा वापर केला नव्हता. ११.३० च्या सुमाराला ब्रेशीअर्सने माथा गाठला. त्याच्यानंतर काही वेळातच अर्सेली सेगारा, रॉबर्ट शॉअर आणि जामलींग नोर्गे माथ्यावर पोहोचले. जामलींग नोर्गे हा तेनसिंगचा मुलगा आणि नोर्गे खानदानातील एव्हरेस्टच्या माथ्यावर पोहोचलेला ९ वा गिर्यारोहक होता ! स्वीडनहून सायकलने काठमांडूपर्यंत आलेला गोरान क्रप आणि अंग रिता शेर्पा हे देखील त्या दिवशी माथ्यावर पोहोचण्यात यशस्वी ठरले होते. अंग रिताची ही एव्हरेस्टच्या शिखरावर पोहोचण्याची दहावी खेप होती !

शिखरावरच्या चढाईच्या दरम्यान सर्वांनाच बाल्कनीच्या खाली फिशर आणि साऊथ समिटवर हॉलचे गोठलेले मृतदेह ओलांडून जावं लागलं होतं ! एड व्हिस्टर्स दोघांचाही जवळचा मित्र होता. तो म्हणतो,

" स्कॉटची पत्नी जेनी आणि रॉबची पत्नी जान, दोघींनीही त्यांची शेवटची आठवण म्हणून त्यांच्या मृतदेहांवरील एखादी वस्तू आणण्याचं मला बजावून सांगीतलं होतं. रॉबच्या देहावरून त्याचं घड्या़ळ आणि स्कॉटची वेडींग रिंग आणण्याचा माझा विचार होता. दोघांचेही देह अर्धे बर्फात बुडाले होते. बर्फ खणण्याइतकी शक्ती माझ्यात उरली नव्हती !"

व्हिस्टर्सने आपल्या मित्रांच्या संगतीत काही क्षण व्यतीत केले.

" माझ्याशेजारी झोपलेला रॉब कधीही उठून बसेल असं मला सतत वाटत होतं !" तो म्हणतो, " स्कॉटशेजारी बसून मी त्याची चौकशी केली ! कसा आहेस स्कॉट ? नक्की झालं तरी काय ?"

२४ मे ला आयमॅक्स मोहीमेतील गिर्यारोहक साऊथ कोलवरून कँप २ वर उतरत असताना दक्षिण आफ्रीकेच्या मोहीमेतील इयन वूडॉल, कॅथी ओ'ड्वड, ब्रूस हॅरॉड आणि चार शेर्पांशी त्यांची यलो बँडवर गाठ पडली. वूडॉल आणि कंपनी शिखरावर चढाईच्या मोहीमेवर निघाले होते.

" मी मुद्दाम त्यांच्याबरोबर सुमारे अर्धा तास थांबलो !" ब्रेशीअर्स म्हणतो, " हॅरॉड अगदी तंदुरूस्त दिसत होता. आमची मोहीम यशस्वी झाल्याबद्दल त्याने आमचं अभिनंदन केलं. वूडॉल आणि कॅथी मात्र पूर्ण दमलेले दिसत होते. मी त्यांना पूर्ण काळजी घेण्याचं बजावलं. शिखरावर पोहोचणं तसं सोपं असतं, पण सुखरूप खाली परतून येणं हे मात्र अतिशय कठीण आहे !"

त्याच रात्री वूडॉल आणि ओ'ड्वड यांनी पेंबा तेंडी, अंग दोर्जे ( हॉलच्या तुकडीतील अंग दोर्जे तो हा नव्हे !) आणि जंगबू शेर्पासह साऊथ कोलवरून शिखराकडे प्रस्थान ठेवलं. त्यांच्यापाठोपाठ काही मिनीटांतच हॅरॉड निघाला होता, पण चढाईच्या मार्गात हॅरॉड खूप मागे पडत गेला. त्याच्याजवळ रेडीओ नसल्याने तो नेमका कुठे आहे याचा कोणालाच पत्ता नव्हता.

२५ मे ला सकाळी ९.५५ मिनीटांनी वूडॉल आणि पेंबा तेंडी एव्हरेस्टच्या माथ्यावर पोहोचले ! त्यांच्या पाठोपाठ १०.२० ला कॅथी ऑ'ड्वड, दोर्जे आणि जंगबू शिखरावर पोहोचण्यात यशस्वी झाले. ते शिखरावर असताना हॅरॉड अद्याप नैऋत्य धारेवरच चढाई करत होता !

१२.३० च्या सुमाराला खाली उतरत असलेल्या वूडॉल, ओ'ड्वड आणि शेर्पांशी त्याची गाठ पडली. अंग दोर्जेने त्याला आपल्याजवळचा रेडीओ दिला आणि त्याच्यासाठी ऑक्सीजन टँक ठेवलेली नेमकी जागा सांगीतली. ते खाली उतरून गेल्यावर हॅरॉड एकटाच पुढे निघाला ! वूडॉल किंवा शेर्पांनी त्याला परत फिरण्याची सूचना का केली नाही हे कोडंच आहे.

ब्रूस हॅरॉड एव्हरेस्टच्या माथ्यावर पोहोचला तेव्हा संध्याकाळचे ५.०५ वाजले होते !

शिखरावर पोहोचल्यावर हॅरॉडने बेस कँपवर रेडीओ ऑपरेटर पॅट्रीक कॉनरॉयला आपण शिखरावर पोहोचल्याचा संदेश पाठवला. योगायोगाने त्याचवेळी हॅरॉडची प्रेयसी स्यू थॉमसनने बेस कँपवर सॅटेलाईट फोनद्वारे संपर्क साधला होता ! हॅरॉड त्या क्षणी एव्हरेस्टवर असल्याचं कळल्यावर तिला धक्काच बसला.

" ब्रूस या क्षणी एव्हरेस्टच्या माथ्यावर आहे हे ऐकून मी हादरलेच !" थॉमसन म्हणते, " संध्याकाळचे सव्वापाच वाजले होते ! त्याच्याशी मी बोलले तेव्हा मात्र तो एकदम नॉर्मल होता ! आपण कोणत्या परिस्थितीत आहोत याची त्याला पूर्ण कल्पना होती !"

ब्रूस हॅरॉडला साऊथ कोलवरून एव्हरेस्टच्या माथ्यावर पोहोचण्यास तब्बल सतरा तास लागले होते.

हॅरॉडने हॉल आणि फिशरच्या तुकडीची झालेली वाताहात पाहीली होती. त्या वेळी तो साऊथ कोलवरच होता. त्याच्या चढाईच्या दरम्यान त्याला हॉल आणि फिशरचे मृतदेह ओलांडून जावे लागले होते. मात्र तरीही त्याने आपली चढाई सुरूच ठेवली होती. परत फिरण्याचा विचार त्याने का केला नाही ?

हॅरॉडचा सहकारी आणि वूडॉलच्या हुकुमशाहीला कंटाळून मोहीम सोडून गेलेला गिर्यारोहक अँडी डी'क्लर्क म्हणतो,

" एव्हरेस्टच्या शिखरावर संध्याकाळी पाच वाजता आणि जोडीला कोणी नसताना उभं असणं या विचारानेही मनाचा थरकाप उडतो !"

हॅरॉडकडून संध्याकाळी ५.१५ नंतर कोणताही संदेश आला नाही. कॅथी ओ'ड्वूड म्हणते,

" आम्ही साऊथ कोलवर त्याच्या संदेशाची वाट पाहत होतो. शिखरापर्यंतच्या चढाईने आम्ही इतके दमलो होतो की आम्हांला झोप लागली. दुस-या दिवशी सकाळपर्यंत त्याच्याकडून कोणताही संदेश आला नाही हे कळल्यावर बेस कँपला परतण्यावाचून आमच्यापुढे पर्याय उरला नव्हता !"

ब्रूस हॅरॉड या मोसमातील एव्हरेस्टवर मरण पावलेला अकरावा गिर्यारोहक ! नवांग तोपचे जून मध्ये काठमांडूच्या हॉस्पीटलमध्ये मरण पावला.

एव्हरेस्टवरचं मृत्यूसत्र अद्याप संपलं नव्हतं !
आणखीन आहुती पडायच्या बाकी होत्या !

१९९६ च्या सप्टेंबर महिन्यात स्कॉट फिशरच्या तुकडीचा शेर्पा सरदार लोपसांग जंगबू शेर्पा एव्हरेस्टवर परतला. नेपाळ मधून चढाई करणा-या जपानी मोहीमेचा शेर्पा सरदार म्हणून त्याची नेमणूक झाली होती.

२५ सप्टेंबरच्या दुपारी कँप ३ वरून साऊथ कोलवर चढाई सुरू होती. गिर्यारोहक ल्होत्से धारेवर ७४०० मी ( २४६७० फूट ) उंचीवर मार्गक्रमणा करत असताना प्रचंड मोठा हिमप्रपात ( अ‍ॅव्हलॉन्च ) उसळला ! या हिमप्रपातात लोपसांग, दक्षिण कोरीयन मोहीमेतील दावा शेर्पा आणि आंतरराष्ट्रीय मोहीमेतील फ्रेंच गिर्यारोहक येव ब्यूचॉन् वाहून गेले. लोपसांग, दावा आणि ब्यूचॉन् यांचे मृतदेह कधीच मिळाले नाही.

एव्हरेस्टवरील १९९६ च्या वर्षात एकूण १५ गिर्यारोहक बळी पडले होते.

मॅट डिकन्सनच्या शब्दांत सांगायचं तर,

" एव्हरेस्टवर चढाईसाठी येणारा प्रत्येकजण या पर्वताशी अलिखीत करार करून येतो. मी माझं आयुष्यं पणाला लावतो आहे. मी इथे मरण पावण्याची शक्यता आहे याची मला पूर्ण कल्पना आहे !"

१९९६ च्या एव्हरेस्टच्या मोहीमेनंतर अनातोली बुकरीव लगेचच एकटाच ल्होत्सेच्या मोहीमेवर गेला. या मोहीमेवर जाण्याचा त्याचा मुख्य हेतू हा एव्हरेस्टवर झालेल्या दुर्दैवी घटनांचाबद्दल आत्मपरीक्षण करणं हा होता. सर्वांपासून दूर त्याला स्वतःसाठी वेळ हवा होता.

बुकरीव १९९७ मध्ये इंडोनेशीयन लष्कराच्या तुकडीचा गाईड म्हणून एव्हरेस्टवर परतला. बुकरीवच्या जोडीला व्लादिमीर बाश्क्रोव आणि येवगेनी विनोगार्ड्स्की हे दोन गिर्यारोहक आणि पुढे एव्हरेस्टवर सर्वात जास्त वेळा चढण्याचा विक्रम करणारे आपा शेर्पा होते.

२६ एप्रिलच्या सकाळी आपा शेर्पा हिलरी स्टेपच्या पायथ्याशी पोहोचले असताना त्याना ब्रूस हॅरॉडचा दोराला लटकलेला मृतदेह दिसून आला ! हॅरॉड परतीच्या वाटेवर हिलरी स्टेपच्या पायथ्याशी मरण पावला होता ! त्याच्या देहाच्या खाली डोकं - वर पाय अशा अवस्थेवरुन हिलरी स्टेप उतरताना तो पडला असावा याची त्यांना कल्पना आली. बुकरीव आणि त्याच्याबरोबरचे गिर्यारोहक सुमारे २.०० च्या सुमाराला शिखरावर पोहोचले.

बुकरीवच्या मोहीमेनंतर आयमॅक्स मोहीमेतील डेव्हीड ब्रेशीअर्स आणि एड व्हिस्टर्स चित्रीकरणाच्या मोहीमेवर पुन्हा एव्हरेस्टवर परतले. त्यांच्या तुकडीमध्ये पीट अ‍ॅथन्सही होता. २२ मे च्या रात्री ब्रेशीअर्स, व्हिस्टर्स आणि अ‍ॅथन्स यांनी अंतीम चढाईस सुरवात केली.

साऊथ कोलपासून १२०० फूट उंचीवर असलेल्या स्कॉट फिशरचा मृतदेह बुकरीवने दगडांचा वापर करून झाकून टाकला होता. साऊथ समिटवर असलेल्या हॉलचा देहही बर्फामध्ये गाडला गेलेला होता. हिलरी स्टेपच्या पायथ्याशी ब्रेशीअर्स पोहोचला तेव्हा त्याला दोराला खिळलेल्या अवस्थेत ब्रूस हॅरॉडचा उलटा लटकलेला मृतदेह दिसला. बुकरीवच्या तुकडीप्रमाणेच त्याच्या देहाला वळसा घालून ब्रेशीअर्स शिखरावर पोहोचला. त्याच्या पाठोपाठ व्हिस्टर्स आणि अ‍ॅथन्स शिखरावर पोहोचले.

शिखरावर चढाईपूर्वी ब्रेशीअर्सचा स्यू थॉमसनशी संपर्क झाला होता. हॅरॉडचा कॅमेरा किंवा एखादी वस्तू आठवण म्हणून परत आणण्याची तिने सूचना केली होती.

" आदल्या वर्षी रॉब हॉलची आईस एक्स त्याच्या तेव्हा जन्माला न आलेल्या मुलीसाठी न आणल्याचं शल्य मला डाचत होतं !" ब्रेशीअर्स म्हणतो, " या वर्षी काहीही झालं तरी हॅरॉडची आठवण म्हणून काहीतरी वस्तू परत आणण्याचा माझा निर्धार होता !"

ब्रेशीअर्स हिलरी स्टेप उतरुन आला तो हॅरॉडचा मृतदेह गायब झाला होता ! ब्रेशीअर्सच्या पाठोपाठ चढाई करत असलेल्या पीट अ‍ॅथन्सने हॅरॉडची बॅग ताब्यात घेतली होती आणि त्याला लटकावून ठेवणारा दोर कापून टाकला होता. हॅरॉडचा देह खालच्या दरीत दिसेनासा झाला होता !

ब्रेशीअर्स निराश मनाने इंग्लंडला परतल्यावर काही दिवसांनी त्याला थॉमसनकडून हॅरॉडने एव्हरेस्टवर घेतलेले फोटो भेट म्हणून आले ! पीट अ‍ॅथन्सने हॅरॉडचा कॅमेरा थॉमसनला पाठवला होता !

एव्हरेस्टच्या १९९६ च्या मोहीमेतील वाचलेल्या गिर्यारोहकांचं पुढे काय झालं ? आज ते कोणत्या परिस्थितीत आहेत ? अद्यापही त्यांच्यापैकी कोणी गिर्यारोहण करत आहेत का ?

क्रमश:

१९९६ माऊंट एव्हरेस्ट - ८.............................................................................१९९६ माऊंट एव्हरेस्ट - १० ( अंतिम )

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

" एव्हरेस्टच्या शिखरावर संध्याकाळी पाच वाजता आणि जोडीला कोणी नसताना उभं असणं या विचारानेही मनाचा थरकाप उडतो !">>>
नुसते वाक्य वाचूनच अंगावर काटा आला. त्याने खरे काय अनुभवले असेल? जाताना सहकार्यांचे मृतदेह बघूनही पुढे जात राहणे म्हणजे कमालीची विल पॉवर असेल या लोकांमध्ये! मस्त Happy

" एव्हरेस्टच्या शिखरावर संध्याकाळी पाच वाजता आणि जोडीला कोणी नसताना उभं असणं या विचारानेही मनाचा थरकाप उडतो !">>>
नुसते वाक्य वाचूनच अंगावर काटा आला. त्याने खरे काय अनुभवले असेल?

>>>>> अगदी !

आवडला हा भागही.. पुढच्या भागाची उत्सुकता आहेच..

बापरे!!!

मानवी मनातील गुंतागुंत ह्या अनुशंगाने पाहिलं तर प्रचंड काहितरी वेगळंच पहिल्यांदाच वाचतोय ही जाणीव सतत आहेच.

सर्वांचे मनापासून आभार..!

पुढील भाग हा या मालिकेचा अखेरचा भाग आहे.

" एव्हरेस्टच्या शिखरावर संध्याकाळी पाच वाजता आणि जोडीला कोणी नसताना उभं असणं या विचारानेही मनाचा थरकाप उडतो !">>> हा तर जिवंत समाधी / हाराकिरीचाच प्रकार म्हणायचा....

पुढील भाग हा या मालिकेचा अखेरचा भाग आहे.>>> ह्या बद्दल वाईटही वाटतंय आणि उगाच पाणीदार करून वाढीव न केल्याचा आनंदही होतोय Happy

सगळेच्या सगळे भाग वाचताना मिळालेल्या अत्यंत उच्च प्रतीच्या वाचनानंदाकरता मानावे तितके आभार कमीच Happy

हॅरॉडचा अपमृत्यू मनाला चटका लावणारा आहे.

>>वूडॉल किंवा शेर्पांनी त्याला परत फिरण्याची सूचना का केली नाही हे कोडंच आहे. >>
वूडॉल आणि कॅथीवर हॅरॉडला तसेच सोडून आल्याबद्दल आरोप केले गेले. विकीवर लिहिले आहे," Both O'Dowd and Ian Woodall were accused of abandoning Herrod and falsifying the account of their separation." कॅथीचे पुस्तक वाचल्यावर तिचे काय समर्थन होते ते समजेल. पुस्तक भारतात उपलब्ध नाही.

वूडॉलने मात्र प्रत्येक प्रसंगात आपली छाप सोडली आहे असे दिसते. Sad

इंटरनेटवर एव्हरेस्ट चढायांच्या गोष्टी वाचताना आपल्या पुण्याच्या दीपक कुलकर्णींच्या नेतृत्वाखाली गेलेल्या भारतातल्या पहिल्या (अयशस्वी) सिव्हिल एक्सिपिडिशनबद्दल (१९९२) फारच त्रोटक (किंबहुना नाहीच) वाचायला मिळाले. कुलकर्णींना खराब हवामानामुळे जीव गमवावा लागला. माझ्या मते साऊथ समिट पर्यंत पोहोचले होते ते!

एव्हरेस्टचे पुणे-कनेक्शन मात्र अत्यंत अभिमानास्पद आहे. आत्तापर्यंत तब्बल १६ पुणेकरांनी शिखर गाठले आहे. जय महाराष्ट्र!

>>एव्हरेस्टच्या १९९६ च्या मोहिमेतील वाचलेल्या गिर्यारोहकांचे पुढे काय झालं ? आज ते कोणत्या परिस्थितीत आहेत ? अद्यापही त्यांच्यापैकी कोणी गिर्यारोहण करत आहेत का ?>>

हे जाणून घेण्याची खूपच उत्सुकता आहे.

धन्यवाद, स्पार्टाकस!

अरे रे रे ......१९९६ च्या एव्हरेस्ट मोहिमेत इतकेजण मृत्युमुखी पडले हे अज्जिबात माहित नव्हते ....

.....माझी तरी यातली उत्सुकता आता पार संपलीये - अजून असे किती जणांचे मृत्यू वाचायचे !!!

एव्हरेस्टच्या १९९६ च्या मोहिमेतील वाचलेल्या गिर्यारोहकांचे पुढे काय झालं ? आज ते कोणत्या परिस्थितीत आहेत ? अद्यापही त्यांच्यापैकी कोणी गिर्यारोहण करत आहेत का ? >>> हे जाणून घेण्याची खूपच उत्सुकता आहे. >>>> +१०००....

स्पार्टाकस, तुमच्या लेखनशैलीला मात्र सलामच .... अतिशय जबरदस्त लेखनशैली - खिळवून ठेवणारी ....

.....माझी तरी यातली उत्सुकता आता पार संपलीये - अजून असे किती जणांचे मृत्यू वाचायचे !!! >> एव्हरेस्टवर जाणा-या प्रत्येकाला.. आणि एव्हरेस्टच नाही उंच पर्वतशिखरांवर गिर्यारोहण करणा-या कोणालाही मृत्यूची तयारी ठेवावीच लागते.