मन माझी जागा असुनी

Submitted by बागेश्री on 19 December, 2013 - 20:41

मी मिटून डोळे घेता
ह्या मनात उन अवतरते,
तावदान मनभितींचे
रंगांनी उजळुन जाते

मनि छप्पा पाणी चाले
कवडसे लुकलूकणारे
जे हाती आले काही
ते निसटुन जाई सारे

रमणार कितीसा येथे
वेड्याश्या खेळामध्ये
अनवाणी चालू लागे
मी मूकाट उन्हामध्ये

हा मंद मंदसा वारा
मज उगा आवडू पाहे,
गुलमोहर रस्त्यावरचा
ह्या पायाखालुन वाहे...
का अशी शांतता मजला
कोठेही गवसत नाही
मन माझी जागा असुनी
नित परकी भासत राही

विभ्रम ते खोटे त्याचे,
खेळही खरा ना वाटे
का माझ्यामधल्या मजला
फुटले अगणित हे फाटे

-बागेश्री

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुझ्या पठडीत बसत नाही ................. Sad प्रयत्न स्तुत्य आहे परंतु तुझी मूळ शैलीच अप्रतीम आहे. अजून काय सांगू ??

अज्ञातजी,
तुझ्या पठडीत बसत नाही ................. >> Agreed.

आज-काल ह्या फॉर्म मध्ये सुचतंय. त्यामुळे हा फ्लो... शिवाय वेगळे प्रयोग करून बघण्याची खुमखूमी..

माझ्या शैलीतल्या नव्या काही तयार आहेत. करेन लवकरच पोस्ट Happy

आज-काल ह्या फॉर्म मध्ये सुचतंय. >>> एकेक फॉर्म पाहुणा बनून येतो खरा असा आपल्याकडे Happy

आवडली ग Happy

बगेश्री, प्रयोग करायलाच हवेत. त्यातूनच आपल्याला आपली खरी ओळख मिळते आणि आपला मूळ पिंड बळकट होतो. आत्मविश्वास वाढतो. कीप इट अप ........ Happy

जबरदस्त कविता - हा कवितेचा फॉर्म मला तरी खूप आवडला..... जियो .....

.....आशय अतिशय भुरळ घालणारा.....

सहज उतरलेली कविता .... छान.
एक-दोन जागा सोडल्यास लयदेखील चांगली सांभाळलेय.
शेवटचे कडवे सर्वात विशेष.

धन्यवाद मंडळी..

वैभव,
प्रतिसाद समजला नाही.