जो भी प्यार से मिला हम उसी के हो लिये :)

Submitted by अतुल ठाकुर on 17 December, 2013 - 04:42

kishore.jpg

किशोर कुमार बद्दल मला नेहेमी एक गोष्ट महत्वाची वाटते कि जी गाणी त्याला मिळाली त्यातला काव्यगुण लक्षात घेतला तर तो रफीला मिळालेल्या एकाचढ एक गाण्याच्या तुलनेत कमी होता. किशोरला अगदी नंतरच्या काळात गुलजार सारखा प्रतिभावंत गीतकार मिळाला. तरीही त्याची गाणी लोकप्रिय झाली यातच किशोरदांचं यश आहे असं मला वाटतं. याबद्दल भिन्न मते असु शकतात पण रफीकडे किंवा तलतकडे असलेल्या गझल किंवा इतर अनेक क्लासिक म्ह्टली जाणारी गीते बाजुला ठेवली कि उरलेली उडत्या ठायीची गाणी किशोरच्या वाट्याला आली. तरीही त्याने ती लोकप्रिय केली. गाईड हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. “दिन ढल जाये”, “क्या से क्या हो गया” च्या तुलनेत “गाता रहे मेरा दिल” हे श्रवणीय वाटलं तरी काव्य यादृष्टीने बरोबरीचं ठरणार नाही. शायरीच्या बाबतीत जुन्या संगितकारांनी किशोरचा कधीही विचारदेखिल केलेला नाही. अमिताभच्या सुपरस्टारपदात किशोरचा वाटा आहेच. मात्र “कभी कभी” च्या तरल गीतांसाठी मुकेशला बोलवावं लागलं आणि किशोरच्या वाट्याला आलं ते “प्यार कर लिया तो क्या”. सारखं सुमार गाणं.

त्रिमुर्तीमधील राजसाहेब मुकेशच्याच आवाजात गायिले. दिलीप साहेबांनी रफीच पसंद केला. किशोरची क्लासिक म्ह्टली जाणारी बहुतेक गाणी ही प्रथम देव आनंदने पडद्यावर गायिली त्यानंतर काही प्रमाणात राजेश खन्नाने. अमिताभला मिळालेली किशोरची गाणी कितीही लोकप्रिय असली तरी त्यांना क्लासिक म्ह्णावं काय हा प्रश्नच आहे. इतर अतिशय महत्वाची गणली जाणारी किशोरची गाणी खुद्द किशोरने स्वतःच पडद्यावर गायिली आहेत. त्यात “पायलवाली देखना”, “अगर सुनले तो इक नगमा”, “मेरे मेहबुब कयामत होगी”, “ठंडी हवा ये चांदनी सुहानी”, “अजनबीसे बनके करो ना किनारा”, “कोई लौटादे मेरे बीते हुए दिन”, “हवाओं पे लिख दो”, “जीवन से ना हार जीने वाले” अशी अनेक.

पुढे काही क्लासिक गणली गेलेली गाणी ही नायक म्ह्णुन हिन्दीत फारसे न गाजलेल्या लोकांच्या पदरी पडली. त्यात “तुम कितनी खुबसुरत हो” (किरण कुमार), “चंदा कि किरनोंसे लिपटी हवाये” (बलदेव खोसा), “ये वोही गीत है”, “समा है सुहाना सुहाना” (जलाल आगा)ही काही त्यातील लोकप्रिय गाणी आहेत. आघाडीच्या नायकांनी किशोरचा आवाज कितीही वापरला तरी दिलिपचं रफी बरोबरचं किंवा राज कपूरचं मुकेशबरोबरीचं सातत्य हे ज्या प्रकारचं होतं तसं फारसं कुणाचंही झालं नाही. त्यामुळे झालं हे की “पल पल दिल के पास”, ” देखा है जिंदगी को कुछ इतना करीब से” सारखी जबरद्स्त गाणी धर्मेंद्र साठी गाऊन देखिल किशोर हा धर्मेंद्रचा आवाज होऊ शकला नाही. अमिताभच्या वाट्याला क्लासिक आलं ते “रिमझीम गिरे सावन”, आणि दुसरं ” हर हसीं चिज का मै तलबगार हुं” काही प्रमाणात “अभिमान” चित्रपटाचा अपवाद वगळला तर बाकी सगळा मामला “खईके पान बनारसवाला” आणि “जहां चार यार मिल जाये” वालाच होता. पुढे काही मिळालं नाही म्ह्णुन “मंझिले अपनी जगह है” साठी गळे काढणारी माणसे अवतरली.

हे सारं विवेचन यासाठी कि महत्वाचा म्हटला जाईल असा नायक देव आनंदचा अपवाद वगळता हाताशी नाही. अशा परिस्थीतीत किशोरकुमार त्या काळात टिकुन राहिला आणि त्या कालावधीत महत्वाची, क्लासिक म्ह्टली जाणारी गाणी त्याने गायिली. पुढे राजेश खन्नाचे “मेरे सपनों कि रानी” युग आले. त्यातला किशोरच्या लोकप्रियतेत त्याकाळच्या तरुणाईचा हात होता हे नाकारता येणर नाही. त्यामुळे गीतांमध्ये काव्यगुण फारसा नसला तरी किशोरच्या आवाजातील तरुणाईचा जोश, सत्तरच्या दशकातील बदलणार्‍या परिस्थीतीचे चित्रपटात पडलेले प्रतिबिंब आणि त्याला चपखल न्याय देणारा तरुण सळसळत्या रक्ताचे प्रतिनिधित्व करणारा, काहीसा बिनधास्त, हॅपि गो लकी, कलंदर असा किशोरचा आवाज त्या पिढीने उचलुन धरला. तेव्हाही “परदा है परदा” रफीच गात होता. “मै पल दो पल का शायर हुं” मुकेशसाठी लिहिलं जात होतं तरीही किशोर नुसता टिकला नाही तर त्याच्या वावटळीत भले भले मागे पडले. हे किशोरच्या प्रचंड गुणवत्तेचं यश आहे असं मला वाटतं.

अतुल ठाकुर

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह मस्त लेख. किशोर कुमारकडे जे वैविध्य होतं ते रफी मुकेशक्डे खचितच नव्हतं.

मायबोलीवर एक किशोर कुमारचे जबरदस्त फॅन आहेत त्याम्चा प्रतिसाद वाचायला उत्सुक आहे. Happy

बस्स इतनाही? वाचायला सुरु केल्यावर लगेचच संपला असं वाटलं.
छान निरिक्षणं नोंदवली आहेत. आवडली. दिग्गजांसमोर टिकून राहिला आणि आजही आहे. गुणवत्ता, भरीला आर्डींची साथ आणि जोडीला नक्कीच त्याला काहितरी दैवी देणगीही असावी.

'परदा है परदा' मध्ये रफीसाठी मुद्दाम उल्लेखण्याजोगं विशेष काय ते मात्र समजलं नाही, थोडं उलगडून सांगा.

माझा सगळ्यात जास्त आवडता गायक. बरीचशी सुरेल गाणी या यादीत नाहीयेत.

चित्रपटःकिनारा, अभिमान्, अमानुष अजून खूप खूप.

अमिताभसाठी किशोरच फिट्ट होता हे विसरता येणार नाही. मजबूर, बेमिसाल, डॉन, लावारीस, नमक हलाल.

थोडक्यात का लिहीला?

"किशोरदा गाना दिलसे गाते थे, गलेसे नही..." - हीच त्यांची गुणवत्ता, खासियत वगैरे सर्वच ...

इतक्या व्होलाटाइल आवाजाचा गायक पुन्हा होणे नाही. इतका नैसर्गिक आवाज की जणू एखादा मस्त खळाळणारा जिवंत झराच.....

स्व. पं. कुमारजी गंधर्व यांनादेखील किशोरदाच सगळ्यात जास्त आवडायचे.

अतुल, किशोरबद्दलचं मनोगत आवडलं. तोकडं असलं तरिही Happy
प्यार कर लिया तो क्या हे सुमार गाणं का? चांगलं आहे की... मला आवडतं. त्यातही अगदी सुमार धरलं तरीही किशोरने त्या गाण्याचं सोनंच केलं की.
शेवटी प्रस्थापितांसमोर नवोदितांना काही काळ (आपली छाप उमटवेपर्यंत) जे वाट्याला येईल ते ते स्विकारावे लागते याला किशोरही अपवाद नाही. एकिकडे किशोर आल्यामुळे रफिची लॉबी डळमळित झाली कारण राजेश खन्ना जिथे तिथे त्यालाच प्रमोट करत होता असं वाचण्यात आलं. इथे तुमचा सुरू थोडा निराळा वाटला. कोणत्याही ट्रान्झिशन फेजमध्ये थोडे फायदे थोडे तोटे असणारच. नाही का?

किशोर गाणं शिकला नव्हता (साग्रसंगित) पण त्याला सुरांचं ज्ञान अगदी चपखल असल्याने त्याची गायकी आणि संगितबद्धता फारच प्रभावी ठरली.

लोकांनी जो किशोर उचलून धरला (देखा ना हाय रे सोचा ना, घुंघरू की तर्‍हा... चिंगारी कोई भडके इ.) वाला. तो व्यक्तिश: मला इतका भावला नाही. पण
आके सिधी लगी दिल पे जैसे,
आँखोमे तुम दिल मे तुम,
मेरे मेहबूब कयामत होगी..
आ चल के तुझे मै ले के चलू एक ऐसे
हवाओंपे लिख दो हवाओंके नाम
जीवन से ना हार जीनेवाले....

आणि अशी अनेक गाणी गाणारा मात्र मनात घर करून राहिलाय.

रफीला मिळालेल्या एकाचढ एक गाण्याच्या तुलनेत कमी होता >> शेवटी हा काळाचा महिमा आहे. ८५-९० सालची गाणी किशोरच्या गाण्यांशी जर कंपेअर केली तर किशोरची गाणी उजवी ठरतील. शेवटी गीत कोणतंही असो आपल्या गायकीने त्याचं सोनं करणं हे गायकाच्या हाती असतं. जे किशोरने पुरेपुर केलं. Happy

(तुमच्या लेखापेक्षा माझा प्रतिसादच लांबलचक होतोय वाटतं. Uhoh :हहगलो:)

विवेचन आवडलं .. क्लासिकल शिकलं आणि तशीच (क्लासिकल्/सेमी क्लासिकल) गाणी जास्त पॉप्युलर असली तरच गायक श्रेष्ठ असं का बरं?

किशोरच्या आवाजाची जादू बाकी कोणाच्यातच नाही असं मला वाटतं .. Happy

भरत, लिहा की .. किशोर साठी वादाला कधीही तयार .. Wink

रफी, मुकेश, मन्ना डे आणि महेंद्र कपूर यांच्यापेक्षा मी किशोरला श्रेष्ठ मानतो व त्यात माझ्या आवडीचा भागही आहे हे कबूल करतो. किशोरचा मी नुसताच फॅन नाही तर मी ज्या काळात 'लहानाचा मोठा' (?) झालो त्या काळावर राजेश - अमिताभ - किशोर ह्या युगाचा जबरदस्त प्रभावही आहे.

पण तरीही:

१. हा लेख त्रोटक वाटला
२. काही मुद्दे पटले नाहीत.
३. काही मुद्दे आले नाहीत
४. काही मुद्दे वादग्रस्तपणे आले

आणि तरीही, ह्या लेखावर अजुन एक मोठा (याहून मोठा) प्रतिसाद द्यायची इच्छा आहे जी उद्या पूर्ण करेन.

जरा विस्कळीत झाला आहे लेख. डीटेल प्रतिक्रिया जमेल तशी देतो.

पण साधारण ५०-७० दशकांमधे किशोरला जास्त गाणी न मिळण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे तो स्वतःच अभिनयाला जास्त प्राधान्य देत असे.

कभी कभी हा १९७६ सालचा. तोपर्यंत अमिताभचा आवाज म्हणून किशोर एस्टॅब्लिश झालेला नव्हता. तो झाला तो १९७७ च्या अ.अ.अँ पासून. आणि अमिताभसाठी त्याने गायलेल्या गाण्यांना फारच 'डिसमिस' करून टाकले आहेत तुम्ही. त्याबद्दल नंतर सविस्तर.

किशोरसारखं वैविध्य रफीत नव्हतं....असं एक मत प्रतिक्रियेत वाचलं.
वैयक्तिक मताचा आणि आवडीचा आदर राखून इतकंच म्हणतो की रफीने सगळ्या प्रकारची गाणी गायलेत...शास्त्रीय, सुगम, गजल, उडत्या चालीची, संथ चालीची, दु:खी-आनंदी-खेळकर-टपोरी...आणि ती तेवढ्याच ताकदीने गायलेत...त्यामुळे माझ्यामते गायकांच्यातला अष्टपैलू गायक केवळ रफीच आहे...अर्थात म्हणून किशोर, मन्नाडे, तलत,महेंद्र कपूर,मुकेश आणि अन्य गायक कमी ताकतीचे होते असा त्याचा अर्थ होत नाही...प्रत्येकाचे आपापले वैशिष्ठ्य हे आहेच आणि ते अमान्य करण्याचा करंटेपणा मी तरी करणार नाही...कारण ह्या सगळ्यांनीच आपल्याला खूप आनंद दिलाय...त्यांच्या वाट्याला आलेली गाणी त्यांनी तेवढ्याच ताकतीने गायलेत हे कुणीही मान्य करेल...प्रत्येकजण आपापल्या जागी श्रेष्ठच आहे.आणि हे सगळे गायक त्यांच्या त्यांच्या खास आवाजामुळे आणि वैषिष्ठ्यांमुळे माझे आवडते आहेत.

जाता जाता...एखाद्या व्यक्तीबद्दल गौरवोद्गार काढतांना उगाच त्या व्यक्तीची तुलना इतरांशी करून त्यांना कमीपणा देऊ नये असं माझं प्रांजळ मत आहे...त्यामुळे ज्यांच्या गौरवपर आपण लिहितोय/बोलतोय ते बाजूला सरून उगाच काथ्याकूट होत राहतो.

जो तो रुमाल टाकतोय! Proud

किशोरकुमार उपेक्षित वगैरे होता असं मला अजिबात वाटत नाही आणि उपेक्षित असण्यानसण्यामुळे त्याला काही कमीजास्त मोठेपणा येतो असंही नाही. उमेदवारी, बॅड पॅचेस कोणालाच चुकत नाहीत. त्यासाठी इतरांच्या टॅलन्ट किंवा यशाशी तुलना करायचं प्रयोजन समजत नाही.

दुसरी बाब, चित्रपट हा एक कथा सांगण्यासाठी अनेक कलांचा समन्वय साधून बनवला जातो. जसं एखादा चांगला अभिनेता शरीरयष्टी पात्राशी विसंगत असल्यामुळे रोल गमावू शकतो तसंच पार्श्वगायकही. त्याचा त्याच्या गायक म्हणून टॅलन्टशी संबंध असेलच असं नाही.

पण साधारण ५०-७० दशकांमधे किशोरला जास्त गाणी न मिळण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे तो स्वतःच अभिनयाला जास्त प्राधान्य देत असे.<<<

अशोक कुमारने सांगितलेल्या माहितीनुसार ही माहिती चुकीची ठरते.

किशोरला पार्श्वगायकच व्हायचे होते, पण थोरल्या भावाच्या हुकुमामुळे त्याला अभिनय करावा लागला व त्याचा विरोध म्हणून तो एकदा घरातून पळूनही गेला. पण नंतर त्याला दोन्ही कामे हळूहळू मिळू लागली. पार्श्वगायक म्हणून तो शेवटी इतका बिझी झाला की त्याच्या स्वतःच्या अभिनीत एका गाण्याला त्याला रफीचा आवाज घ्यावा लागला.

कीशोर कुमार प्रचंड आवडतो. पण गायक म्हणून रफी कीशोर पेक्षा सरस होता असं माझं वै. म.

<लोकांनी जो किशोर उचलून धरला (देखा ना हाय रे सोचा ना, घुंघरू की तर्‍हा... चिंगारी कोई भडके इ.) वाला. तो व्यक्तिश: मला इतका भावला नाही. पण
आके सिधी लगी दिल पे जैसे,
आँखोमे तुम दिल मे तुम,
मेरे मेहबूब कयामत होगी..
आ चल के तुझे मै ले के चलू एक ऐसे
हवाओंपे लिख दो हवाओंके नाम
जीवन से ना हार जीनेवाले....
आणि अशी अनेक गाणी गाणारा मात्र मनात घर करून राहिलाय. >
दक्षिणा यांच्या वरील मताला +१

किशोर विक्षिप्तही होता, म्हणे घरी आलेल्या पाहुण्यांना तो कवटीच्या आकाराच्या कपमधून चहा द्यायचा. हे म्हणजे राजकुमारपेक्षा अधिक झाले.

किशोर उपेक्षित होता ह्याची जी कारणे लेखात सांगितली आहेत (काव्यगुण असलेली गाणी त्याच्या वाट्याला न येणे) त्याला काही तांत्रिक कारणेही आहेत.

छातीत श्वास भरून घ्यायची त्याची क्षमता अद्भुत व इतर गायकांच्या तुलनेत सरळ सरळ अधिक होती. ह्यामुळे (यती वगैरे सारख्या ठिकाणी) श्वास घेण्याची गॅप घेणे वगैरे प्रकार त्याला तुलनेने कमी करावे लागायचे. पण प्रशिक्षण आणि रियाझ ह्यात तो रफीच्या मागे होता हे कोणीही सांगू शकेल. आवाज ही काही प्रयत्नांनी मिळणारी बाब नव्हे, रफीच्या आवाजात रोमँटिक ( त्या काळातील व्याख्येनुसार) नायकाला शोभेल अशी गीते अधिक खुलत. (शम्मी, दिलीप आणि खुद्द देव आनंदही - खोया खोया चाँद). आवाज चढणे, वळणे ह्याबाबतीत एक गायक म्हणून रफी टेक्निकली सुपिरियर होता हे कोणीही मान्य करायला हवे.

पण किशोरमध्ये 'जान' होती हे मात्र खरे!

>> एखाद्या व्यक्तीबद्दल गौरवोद्गार काढतांना उगाच त्या व्यक्तीची तुलना इतरांशी करून त्यांना कमीपणा देऊ नये असं माझं प्रांजळ मत आहे

देव काका, जेव्हा एकसे एक नावं दिसतात तेव्हा अमुक एखादं नाव हीच माझी सर्वश्रेष्ठ आवड हे लिहीताना बाकीच्यांशी तुलना होणारच ना? वरच्या लेखात कुठल्याही इतर गायकांनां कमीपणा दिला आहे असं मला वाटत नाही ..

फाचा मुद्दा पटला की अमिताभच्या गाण्यांनां अगदीच "डिसमिस" केलं आहे .. आणि अमिताभची गाणी जेव्हढ्या जास्त (तरूण(?)) लोकांपर्यंत पोचली आणि प्रसिद्ध झाली तेव्हढी बाकीच्या अभिनेत्यांची आणि गायकांची झाली असं मला वाटत नाही ..

"किशोर उपेक्षीत राहिला" असंही लेखात म्हंटल्याचं जाणवत नाही .. अर्थात काही संगीतकार, अभिनेते ह्यांनीं आपापले इन्फ्लुएन्सेस् वापरलेही असतील पण तसं असूनही किंवा किशोरला अमुक एक "राज कपूर" किंवा "दिलीप कुमार" न मिळूनही किशोर च्या नावावर एव्हढी जबरदस्त पॉप्युलारिटी आहे असं लेखात म्हंटलं आहे (असं अर्थातच मला वाटत आहे .. ) Happy

नवीन निश्चलसाठी गायलेली गीते किशोरची खरी ओळख एका प्रकारे सांगतात. ना कोणाला बुढ्ढा मिल गया आवडेल, ना हिरॉईन, ना नवीन निश्चल, पण रातकली आवडणार नाही असे होणे अवघड! पार्श्वगायक मूळ चित्रपटापेक्षा भाव खाऊन जाणे हे असे! हे रफी व मुकेशच्या बाबतीतही झालेले असेलही, पण लगेच संदर्भ आठवत नाही आहे व जे काही आठवत आहे ते राज कपूर आणि दिलीप कुमार वगैरेंच्या अभिनयाने झाकोळले गेलेले आठवत आहे.

पण जरा विचार केला तर हेच सगळे त्या दोघांमध्येही होते.

बहुधा - योग्य पिढीला योग्य सुरावट मिळवून देणे हे विधात्याने किशोरच्या रुपाने प्रथमच केले असावे, इतक्या एकजिनसीपणे हे काँबो आधी कधी निर्माण झाके नसावे, म्हणजे, सत्तरच्या दशकातील युवक युवती, राजेश शर्मिला आणि किशोर! आह!

(पुन्हा - पण मग गुनगुनारहे है भवरें चे काय?) Proud

>> गुनगुनारहे है भवरें चे काय?

काहीच नाही .. "देखा एक ख्वाब तो ये" ऐकलं की राजेश, शर्मिला, रफी ह्यांनां विसरायला होतं .. अमिताभ, रेखा, किशोरच परत परत ऐकावे, बघावे वाटतात .. Wink

अमिताभ, रेखा, किशोरच परत परत ऐकावे, बघावे वाटतात .. डोळा मारा<<<

हेच ते! अन् लोक मला नावे ठेवतात.

आधी चारचौघांत डोळे कोण मारतं ते बघा म्हणावं!

Light 1

किशोरसारखं वैविध्य रफीत नव्हतं....असं एक मत प्रतिक्रियेत वाचलं.
वैयक्तिक मताचा आणि आवडीचा आदर राखून इतकंच म्हणतो की रफीने सगळ्या प्रकारची गाणी गायलेत...शास्त्रीय, सुगम, गजल, उडत्या चालीची, संथ चालीची, दु:खी-आनंदी-खेळकर-टपोरी...आणि ती तेवढ्याच ताकदीने गायलेत...त्यामुळे माझ्यामते गायकांच्यातला अष्टपैलू गायक केवळ रफीच आहे...अर्थात म्हणून किशोर, मन्नाडे, तलत,महेंद्र कपूर,मुकेश आणि अन्य गायक कमी ताकतीचे होते असा त्याचा अर्थ होत नाही...प्रत्येकाचे आपापले वैशिष्ठ्य हे आहेच आणि ते अमान्य करण्याचा करंटेपणा मी तरी करणार नाही...कारण ह्या सगळ्यांनीच आपल्याला खूप आनंद दिलाय...त्यांच्या वाट्याला आलेली गाणी त्यांनी तेवढ्याच ताकतीने गायलेत हे कुणीही मान्य करेल...प्रत्येकजण आपापल्या जागी श्रेष्ठच आहे.आणि हे सगळे गायक त्यांच्या त्यांच्या खास आवाजामुळे आणि वैषिष्ठ्यांमुळे माझे आवडते आहेत.

जाता जाता...एखाद्या व्यक्तीबद्दल गौरवोद्गार काढतांना उगाच त्या व्यक्तीची तुलना इतरांशी करून त्यांना कमीपणा देऊ नये असं माझं प्रांजळ मत आहे...त्यामुळे ज्यांच्या गौरवपर आपण लिहितोय/बोलतोय ते बाजूला सरून उगाच काथ्याकूट होत राहतो.
>> +१०००.

देव काका, जेव्हा एकसे एक नावं दिसतात तेव्हा अमुक एखादं नाव हीच माझी सर्वश्रेष्ठ आवड हे लिहीताना बाकीच्यांशी तुलना होणारच ना? >> ह्याबाबत बेफिकिर ह्यांचे प्रांजळ म्हणणे पटले "रफी, मुकेश, मन्ना डे आणि महेंद्र कपूर यांच्यापेक्षा मी किशोरला श्रेष्ठ मानतो व त्यात माझ्या आवडीचा भागही आहे हे कबूल करतो."