१९९६ माऊंट एव्हरेस्ट - ७

Submitted by स्पार्टाकस on 16 December, 2013 - 21:06

११ मे १९९६

एव्हरेस्टच्या तिबेटच्या बाजूला इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीसांच्या जवळच जपानी मोहीमेचा कँप ६ होता. कोणत्याही परिस्थितीत ११ मे रोजी एव्हरेस्टचा माथा गाठायचाच या निर्णयावर जपानी ठाम होते. १० मे च्या वादळानंतरही त्यांच्या योजनेत कोणताही बदल झालेला नव्हता. पहाटे ४.०० वाजताच जपानी तुकडीतील दोन गिर्यारोहक हिरोशी हनाडा आणि इझुकी शिकेगवा तीन शेर्पांसह अंतिम चढाईसाठी बाहेर पडले होते.

पहाटे ४.४३

रेडीओवर रॉब हॉलचा संदेश आला. त्याचा आवाज जेमतेम ऐकू येत होता.

" माझ्या पायातील संवेदना कमी झाली आहे. मला चालणं अशक्य होतं आहे. चालताना मी कुठे तरी नक्की धडपडेन अशी मला भीती वाटते." तो म्हणाला, " हॅरॉल्ड ( हॅरीस ) रात्री माझ्याबरोबर होता, पण तो आता कुठे दिसत नाही !"
" तू आता कुठे आहेस ?"
" साऊथ समिट !"

हॉलजवळ हॅरीसने आणलेले दोन ऑक्सीजन सिलेंडर्स होते, परंतु त्याच्या रेग्युलेटरवर बर्फ जमा झालेला होता, त्यामुळे त्याला सिलेंडर्स वापरता येत नव्हते ! तो बर्फ साफ करण्याच्या मागे लागला होता.

पहाटे ५.००

हॉलचा पुन्हा संदेश आला. त्याने आपल्या पत्नीशी बोलण्याची ईच्छा प्रदर्शीत केल्यावर बेस कँप वरून सॅटेलाईट फोनने क्राईस्टचर्चला त्याच्या पत्नीला फोन लावण्यात आला ! ती सात महिन्यांची गर्भवती होती. हॉल बरोबर तिने १९९३ मध्ये एव्हरेस्टच्या माथा गाठला होता. तिला तो कोणत्या परिस्थितीत असेल याची नेमकी कल्पना होती.

" त्याचा आवाज ऐकताच मी सुन्न झाले !" जान अरनॉल्ड म्हणते, " तो अडखळत बोलत होता. तो कोणत्या परिस्थितीत आहे याची मला पूर्ण कल्पना होती. आम्ही दोघांनी अनेकदा एव्हरेस्टच्या वरच्या उतारांवरून एखाद्याची सुटका करणं किती कठीण आहे याची चर्चा केली होती !"

पहाटे ५.३०

हॉलने डेक्सामेथासनचा डोस घेतला. आदल्या संध्याकाळी याच औषधाचं इंजेक्शन दिल्यावर सँडी हिलला खाली उतरून येणं शक्य झालं होतं ! तो अद्यापही आपल्या ऑक्सीजन रेग्युलेटरवचा बर्फ काढण्यात मग्न होता. त्याही परिस्थितीत रेडीओवरून तो इतर गिर्यारोहकांची चौकशी करत होता ! फिशर, गाऊ, नम्बा, वेदर्स आणि विशेषतः हॅरीसची त्याला काळजी वाटत होती. त्याला हुरुप येण्यासाठी म्हणून कँप २ वर असलेल्या आयमॅक्स मोहीमेतील गिर्यारोहक आणि हॉलचा जवळचा मित्र एड व्हिस्टर्सने एक बातमी दडपून दिली,

" अँडी आमच्याबरोबर इथे सुखरूप आहे ! तू लवकरात लवकर खाली उतरण्यास सुरवात कर !"
" डगची काय परिस्थिती आहे ?" डॉ कॅरोलीन मॅकेंझीने विचारलं
" ही इज् गॉन !" हॉल उत्तरला. पुन्हा एकदाही त्याने डगचं नाव काढलं नाही !

सकाळी ६.००

गाय कॉटरने हॉलशी संपर्क साधला. हॉलने त्याला सूर्योदय झाल्याचं सांगीतलं. रात्रभर कोणत्याही आडोशाविना आणि ऑक्सीजनविना ८७५० मी ( २८७०० फूट ) उंचीवर आणि ते देखील झंझावाती हिमवादळात आणि जवळपास -५० डिग्री बोच-या थंडीत तो इतका वेळ तग धरू शकला हेच आश्चर्य होतं ! मात्रं अद्यापही त्याचा ऑक्सीजन रेग्युलेटर दुरूस्त झाला नव्हता ! या रेडीओ संभाषणातही त्याने हॅरीसची चौकशी केली होती !

हिमवादळ एव्हाना थंडावलं होतं, पण वा-याचा जोर अजूनही टिकून होता. ४० मैलाच्या वेगाने वारे साऊथ आणि एव्हरेस्टच्या शिखरापर्यंतच्या प्रदेशाला झोडपून काढत होते.

तिबेटच्या बाजूने चढाई करणारे हनाडा, शिकेगवा आणि त्यांचे तीन शेर्पा पहिल्या पायरीच्या तळाशी पोहोचलेले होते. पहिली पायरी चढून ते वर पोहोचले आणि भारतीय तुकडीतील त्सेवांग पाल्जर त्यांच्या दृष्टीस पडला !

पाल्जर रात्रभर भर वादळात पहिल्या पायरीच्या माथ्यावर बसून राहीलेला होता. त्याच्या दोन्ही हाता-पायांना फ्रॉस्टबाईट झाला होता. पण तो पूर्ण शुध्दीवर होता. हनाडा-शिकेगवा बरोबर असलेल्या शेर्पांना पाल्जरला मदत करण्याची ईच्छा होती. परंतु त्यामु़ळे कदाचित शिखरावर पोहोचण्यास उशीर झाला असता. जपानी गिर्यारोहकांनी आपल्या शेर्पांना पुढची वाटचाल करण्याची आज्ञा केली. इयन वूडॉल प्रमाणेच हनाडा-शिकेगवाने संकटात सापडलेल्या गिर्यारोहकांना मदत न करता आपल्या चढाईवरच लक्षं केंद्रीत केलं होतं.

सकाळी ६.३०

जॉन क्राकुअरला जाग आली होती. तो ऑक्सीजनच्या शोधात एका तंबूतून दुस-या तंबूत फिरत होता. त्याचवेळी त्याची स्टुअर्ट हचिन्सनशी गाठ पडली.

" अँडी हॅरीसचा अद्याप पत्ता नाही ! तो परतलेला नाही !" हचिन्सन म्हणाला.
" इम्पॉसीबल ! काल मी अँडीला कँपच्या दिशेला येताना पाहीलं ! माझ्या आधीच तो खाली पोहोचला होता !" क्राकुअर उद्गारला.
" तुझा काहीतरी गैरसमज झाला होता जॉन. अँडी काल रात्री रॉब बरोबर हिलरी स्टेपवर होता !"

हचिन्सनच्या तोंडून हे ऐकताच क्राकुअर नखशिखान्त हादरला !

आदल्या रात्री परतल्यावर त्याने हॅरीस परत आल्याचं आपण पाहीलं असल्याचं हचिन्सनला खात्रीपूर्वक सांगीतलं होतं. हचिन्सनने बेस कँपला तसा संदेश दिला होता आणि बेस कँप वरून अँडी सुखरूप असल्याची बातमी न्यूझीलंडमध्ये त्याच्या कुटुंबीयांना आणि प्रेयसी फियोना मॅकफर्सन हिला कळवण्यात आली होती !

आणि हॅरीसचा पत्ता लागत नव्हता !

हॅरीस सुरक्षीत नाही आणि तो कदाचित मॄत्यूमुखी पडला असण्याची शक्यत असल्याचं मॅकफर्सनला कळवण्याचं अप्रिय काम जान आरनॉल्डवर येऊन पडलं ! त्या दोघींच्या मनस्थितीची कल्पनाही करणं अशक्यं होतं.

सकाळी ७.३०

हॅरीसच्या शोधासाठी साऊथ कोलवर गेलेला क्राकुअर कँप ४ वर परतला होता.

कँप ४ वर पोहोचण्यासाठी चढाईच्या मार्गावरून उतरून डाव्या हाताला वळावं लागणार होतं, मात्रं रात्रीच्या वादळात आणि आधीच अल्टीतट्यूड सिकनेसमुळे संतुलीत विचार करण्याच्या मनस्थितीत नसलेला हॅरीस हे वळण विसरुन पुढे जाण्याची शक्यता होती. तसं झालं असतं तर ल्होत्से धारेवरून तो ४००० फूट खाली वेस्टर्न कूमवर कोसळला असता !

ल्होत्से धारेच्या कड्याच्या दिशेने जाणा-या क्रॅम्पॉनमुळे बर्फात उमटलेल्या खुणा क्राकुअरच्या दृष्टीस पडल्या होत्या !

क्राकुअर परतल्यावर हचिन्सनने त्याला यासुको नम्बा आणि बेक वेदर्स मरण पावल्याची बातमी सांगीतली ! स्कॉट फिशर आणि मकालू गाऊ अद्याप साऊथ कोलपासून १२०० फूट उंचीवर होते. हॉल साऊथ समिटवर होता.

काही वेळातच हचिन्सनच्या रेडीओची बॅटरी संपली आणि तो बंद पडला ! आयमॅक्स मोहीमेच्या गिर्यारोहकांना हचिन्सनचा रेडीओ बंद झाल्याची कल्पना येताच त्यांनी फिशरच्या तुकडीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा रेडीओदेखील बंद पडला होता !

साऊथ कोलवर आता फक्त एकाच गिर्यारोहकांच्या तुकडीकडे शक्तीमान रेडीओ होता. आयमॅक्सच्या डेव्हीड ब्रेशीअर्सने त्यांच्याशी संपर्क साधला.

" ही इमरजन्सी आहे ! वरच्या उतारावर अनेक गिर्यारोहक मरणाच्या दारात आहेत. त्यांची सुटका करण्यासाठी आम्हाला हचिन्सनच्या संपर्कात राहवं लागणार आहे. प्लीज ! तुमचा रेडीओ हचिन्सनला द्या !"
" सॉरी ! मी माझा रेडीओ देणार नाही !" इयन वूडॉलने संभाषण संपवलं !

इतर गिर्यारोहक जीवन-मृत्यूच्या सीमेवर असतानाही इयन वूडॉलने कोणालाही मदत करण्याचं साफ नाकारलं होतं !

सकाळी ८.००

बिडलमन, बुकरीव, ग्रूम, टेस्क, कासिस्च्के, मॅडसन, स्कोनींग, पिटमन, फॉक्स, गॅमलगार्ड आणि अ‍ॅडम्स आपापल्या तंबूत अतीश्रमाने दमून पडलेले होते. क्राकुअर हॅरीसचा शोध घेऊन परतला होता.

स्टुअर्ट हचिन्सनने बेक वेदर्स आणि यासुको नम्बा यांचे मृतदेह शोधून काढण्यासाठी चार शेर्पांसह साऊथ कोलवर शोधाशोध सुरू केली. अनातोली बुकरीवकडून नेमकी दिशा समजून घेऊन शेर्पांनी कांगशुंग धारेच्या जवळ असलेल्या शिळांजवळ बर्फात अर्धवट बुडालेले दोन देह नेमके शोधून काढलेले होते ! दोन्ही देहांचं शीर आणि कमरेपर्यंतचा भाग बर्फात बुडालेला होता. साऊथ कोलवर वा-याचा तुफानी मारा अद्यापही सुरुच होता.

हचिन्सनने पहिला देह पाठीवर निजवला आणि त्याच्या चेह-यावरून सुमारे तीन इंच बर्फ खरवडून काढला ! ती यासुको नम्बा होती ! ती बेशुध्द होती परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे अद्यापही जीवंत होती ! तिचा श्वास जेमतेम सुरू होता ! परंतु ती मृत्यूपंथाला लागलेली होती.

हचिन्सन वेदर्सकडे वळला. त्याचीही अवस्था नम्बासारखीच होती. त्याच्या चेह-यावर बर्फ साचला होता. हचिन्सनने त्याच्या चेह-यावरचा बर्फ दूर करताच त्याला आश्चर्याचा दुसरा धक्का बसला ! नम्बाप्रमाणेच वेदर्सही जीवंत होता आणि शुध्दीवर होता ! हचिन्सनला पाहताच तो बोलण्याचा प्रयत्न करू लागला, पण त्याच्या तोंडून धड शब्द फुटत नव्हता. त्याच्या हातात हँडग्लोव्हज नव्हते. हचिन्सनने त्याला उठवून बसण्याचा प्रयत्न केला, परंतु तो पुन्हा आडवा झाला ! नम्बाप्रमाणेच वेदर्सही मृत्यूपंथाला लागला होता.

हादरलेल्या हचिन्सनने शेर्पांना गाठून लाखपा चिरीचा सल्ला विचारला. लाखपा चिरी अत्यंत अनुभवी शेर्पा होता. त्याने सारासार विचार करून हचिन्सनला नम्बा आणि वेदर्सला तिथेच सोडून परत फिरण्याचा सल्ला दिला ! नम्बा आणि वेदर्सला कँप ४ वर नेण्यात जरी ते यशस्वी झाले असते, तरीही जोपर्यंत ते आपल्या पायांनी चालू शकत नव्हते तो पर्यंत त्यांच्या सुटकेची कोणतीही शक्यता नव्हती !

हचिन्सन शेर्पांसह कँप ४ वर परतला तेव्हा तो मनातून पूर्णपणे उध्वस्त झाला होता. त्याचे डोळे पाण्याने भरून आले होते. आपल्या सहका-यांना मृत्यूच्या दारात सोडून यावं लागल्यामुळे तो विलक्षण खिन्न झाला होता. क्राकुअर, टेस्क आणि ग्रूम यांच्याशी त्याने चर्चा केली. चर्चेअंती हचिन्सनचा निर्णय योग्य असल्याचं सर्वांचं मत पडलं. हचिन्सन म्हणतो,

" यासुको आणि बेकला तिथे सोडणं ही माझ्या दृष्टीने सर्वात कठीण गोष्ट होती. आपल्यात वावरत असलेल्या सहका-यांना मरणाच्या दारात सोडून परत येणं या कल्पनेनेच मनाचा थरकाप उडतो, मात्र त्या परिस्थितीत तसं करण्यावाचून आमच्यापुढे काहीही पर्याय नव्हता !"

सकाळी ८.४५

हॉलने आपल्या बेस कँप मॅनेजर हेलन विल्टनशी संपर्क साधला,

" मी काल रात्री अँडीला पाहिलं होतं. तो माझ्या अगोदर खाली उतरून गेला असावा असं मला वाटत आहे. तो नक्की कुठे आहे ? कोणाला माहीत आहे का ?"

हेलनने त्याच्या प्रश्नाला बगल देण्याचा प्रयत्न केला.

" माझ्या समोर अँडीचं जॅकेट, आईस एक्स आणि बाकीच्या वस्तू दिसताहेत !" हॉल
" रॉब ! जॅकेट घाल आणि खाली उतरण्यास सुरवात कर प्लीज ! इतरांची सुटका करण्याचे प्रयत्न सुरु आहेत ! तू खाली उतर !" एड व्हिस्टर्स

इयन वूडॉलने इतरांना मदत करण्यास साफ नकार दिला असला तरी बाकीच्या मोहीमांतील गिर्यारोहक मात्र शिखरावर चढाईचा आपला इरादा बदलून हॉल, फिशर आणि गाऊच्या गिर्यारोहकांच्या मदतीला धावले होते.

आयमॅक्स मोहीमेचा प्रमुख डेव्हीड ब्रेशीअर्सने साऊथ कोलवरील आपल्या कँप मधील रेडीओच्या बॅटरी वापरण्याचा संदेश हचिन्सन - क्राकुअरपर्यंत पोहोचवला. बेस कँपशी त्यांचा संपर्क साधणं त्यामुळे शक्य होणार होतं. कँप ३ वरून अनेक गिर्यारोहक आणि शेर्पा साऊथ कोलच्या वाटेला लागले होते.

सकाळी ९.००

रेग्युलेटरवरचा बर्फ साफ करण्यात अखेर हॉलला यश आलं ! सोळा तासांनंतर हॉलला ऑक्सीजन टँक वापरता येत होता ! सुटकेची आशा पालवली !

" रॉब ! प्लीज खाली उतर !" आवाजावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत हेलन विल्टन उद्गारली, " दोन महिन्यांनी तुला तुझं बाळ पाहायचं आहे ! त्याच्यासाठी तुला खाली उतरावच लागेल ! गेट मूव्हींग !"
" तू खाली आलास की आपण थायलंडला जाणार आहोत रॉब !" एड व्हिस्टर्स खेळकरपणे म्हणाला, " आपल्याला बरोबर स्विमींगला जायचं आहे. तू नशिबवान आहेस लेका. तुझं मूल तुझ्यापेक्षा नक्कीच चांगलं दिसणारं असेल !"

व्हिस्टर्सच्या या कोपरखळीवर हॉल मनमुराद हसला.

एव्हरेस्टच्या वरच्या उतारावर पुन्हा ढग जमा होण्यास सुरवात झाली होती !

हनाडा आणि शिकेगवा एव्हाना दुस-या पायरीच्या माथ्यावर पोहोचले होते. दुस-या पायरीच्या माथ्यावरच त्यांना त्सेवांग सामलां आणि दोर्जे मोरूप भेटले. रात्रभर वादळात सापडल्याने आणि ऑक्सीजनविना दोघांचीही अवस्था गंभीर होती. पण दोघंही अद्याप पूर्ण शुध्दीवर होते. जपानी गिर्यारोहकांनी त्यांच्यापासून पुढे १०० फूट अंतरावर बसून विश्रांती घेतली. आपले ऑक्सीजन टँक बदलले आणि ते पुढे निघाले. सामलां - मोरुप यांना पाणी आणि ऑक्सीजन देण्याची कामी शेर्पाची सूचना हनाडा-शिकेगवा यांनी धुडकावली आणि पुन्हा चढाईस प्रारंभ केला.

"आम्ही त्यांना ओळखत नव्हतो !" हनाडा म्हणला, " आम्ही त्यांच्याशी बोललो नाही. आम्ही त्यांना काही मदत केली नाही. आमच्यासमोर शिखराचा माथा गाठण्याचं ध्येय होतं. आम्ही कोणाला मदत करण्याच्या भानगडीत पडत नाही !"

" आम्ही एव्हरेस्टवर आमच्या चढाईसाठी आलो होतो ! एव्हरेस्टचा माथा गाठणं एवढी एकच गोष्ट आम्हाला दिसत होती. इतर बाबींकडे लक्ष देण्यास आमच्यापाशी वेळ नव्हता !" शिकेगवा म्हणाला

जपानी गिर्यारोहकांच्या मनोवृत्तीतील क्षुद्रपणा इयन वूडॉलपेक्षा रेसभरही कमी नव्हता.

मोहीमेच्या सुरवातीपासूनच जपानी गिर्यारोहकांनी भारतीय तुकडीशी प्रत्येक बाबतीत स्पर्धा सुरू होती. भारतीय गिर्यारोहक एव्हरेस्टच्या माथ्यावर पोहोचल्याचं कळल्यावर ११ मे च्या तुफानी वादळातही आपल्या चढाईच्या योजनेवर ते ठाम राहीले होते. भारतीय गिर्यारोहकांना मदत करण्याची कामीची सूचना त्यांनी अर्थातच धुडकावली होती.

सकाळी १०.००

कॅंप ४ वरून पाच शेर्पा ऑक्सीजन आणि चहाने भरलेला थर्मास घेऊन हॉल, फिशर आणि गाऊच्या सुटकेसाठी निघाले. स्वतः प्रचंड थकलेले असतानाही त्यांनी पुन्हा चढाईला सुरवात केली ! मात्रं त्यांच्याबरोबर जाण्याचं इतरांच्या अंगात्र त्राण उरलं नव्हतं.

सकाळी ११.३०

नील बिडलमनने फिशरच्या तुकडीतील गिर्यारोहकांसह साऊथ कोलवरून खाली उतरण्याचा निर्णय घेतला ! एकेक करून आपल्या सर्व क्लायंट्सना त्याने जमा केलं आणि परतीच्या वाटेला लावलं. तो म्हणतो,

" २६००० फूट उंचीवर आवश्यकतेपेक्षा जास्तं काळ थांबणं अजिबात हितावह नसतं. स्कॉट आणि रॉबच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू झाले होते. स्कॉट परतून येईपर्यंत साऊथ कोल वर त्याच्यासाठी थांबण्याचं अनातोलीने ठरवलं होतं. त्यामुळे बाकीच्या सर्वांना घेऊन मी खाली उतरण्यास सुरवात केली !"

दुपारी १२.००

कँप ४ वरून निघालेले पाच शेर्पा अखेर स्कॉट फिशर आणि मकालू गाऊपर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाले होते !

त्यांनी फिशरला ऑक्सीजन देण्याचा प्रयत्न केला, पण त्याने कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्याचे डोळे एकाच जागी खिळलेले होते. दात घट्ट आवळलेले होते. फक्त त्याचा श्वास अद्याप सुरू होता. फिशर मृत्यूपंथाला लागलेला होता. त्याच्यासाठी काहीही करणं शक्य नव्हतं.

त्याच्यामानाने गाऊची परिस्थिती बरी होती. गरम चहा पोटात गेल्यावर आणि ऑक्सीजन मिळाल्यावर शेर्पांच्या मदतीने तो उभा राहू शकला आणि अडखळत का होईना पण पावलं टाकत खाली उतरू लागला. फिशरला सोडून गाऊसह तीन शेर्पा मागे फिरले.

अंग दोर्जे आणि लाखपा चिरी जीवाची पर्वा न करता वर सरकत होते ! कोणत्याही परिस्थितीत हॉलपर्यंत पोहोचायचंच या ईर्ष्येने वा-याशी मुकाबला करत त्यांची चढाई सुरूच होती !

टॉड बर्लसन आणि पीट अ‍ॅथन्स हे आंतरराष्ट्रीय मोहीमेतील गिर्यारोहक कँप ३ वरुन वर चढून साऊथ कोलवर पोहोचले होते ! डेव्हीड ब्रेशीअर्सच्या सूचनेनुसार बर्लसनने आयमॅक्सच्या कँपमधील ऑक्सीजन टँक्स वादळाशी झगडणा-या गिर्यारोहकांना देण्यास सुरवात केली. आपल्या ५५ लाख डॉलर्सच्या एव्हरेस्ट चित्रीकरणाच्या मोहीमेचा विचार ब्रेशीअर्सने बाजूला सारला होता.

हनाडा, शिकेगवा आणि तीन शेर्पा एव्हरेस्टच्या माथ्यावर पोहोचले. तुफान वादळातही त्यांनी एव्हरेस्टचं शिखर गाठलं होतं.

रॉब हॉल त्या वेळी शिखरापासून अर्ध्या तास अंतरावर साऊथ समिटवर होता. कामी शेर्पाच्या म्हणण्यानुसार ही बातमी कळताच तीन पैकी एक शेर्पाने त्याच्या मदतीला जाण्याचा प्रस्ताव मांडला, पण जपान्यांनी त्यांची सूचना धुडकावून लावली.

दुपारचे १२.३०

हनाडा, शिकेगवा आणि तीन शेर्पांनी शिखरावरून खाली उतरण्यास सुरवात केली. खाली उतरताना त्यांना पुन्हा भारतीय गिर्यारोहक दिसणार होते.

दुपारचे ३.००

हनाडा-शिकेगवा आणि शेर्पा दुस-या पायरीच्या माथ्यावर पोहोचले होते. मोरूप मरण पावला होता. मात्र सामलां अद्यापही शुध्दीवर होता. मात्र त्याच्या देहाभोवती दोराच्या पडलेल्या वेटोळ्यामुळे त्याला हालचाल करता येत नव्हती.

या खेपेला जपानी गिर्यारोहकांचं काहीही न ऐकता कामी शेर्पाने सामलांला दोरातून सुटण्यास मदत केली. मात्र सामलांला आधाराशिवाय चालता येणं अशक्य होतं.

वा-याशी आणि थंडीशी मुकाबला करत अंग दोर्जे आणि लाखपा चिरी साऊथ समिटच्या खाली सुमारे ३०० मी ( १००० फूट ) पोहोचले होते. पण वा-याच्या वाढत्या वेगापुढे नाईलाजाने अखेर त्यांना माघार घ्यावी लागली. निरुपायाने त्यांनी कँप ४ वर परतीचा मार्ग पत्करला.

आणि त्याबरोबरच रॉब हॉलची सुटकेची शेवटची आशा मावळली.

दुपारचे ३.२०

" रॉब ! खाली उतरण्यास सुरवात कर ! प्लीज!" गाय कॉटरने हॉलला संदेश पाठवला.
" हे बघ, " हॉल वैतागलेल्या सुरात उद्गारला, " माझ्या हाताला फ्रॉस्टबाईट झालेला आहे. दोरावरून स्वतः खाली उतरणं मला शक्य झालं असतं तर मी एव्हाना खाली पोहोचलो असतो ! गरम चहा घेऊन दोघा-तिघांना पाठवा म्हणजे मी उतरू शकेन !"
" दोर्जे आणि चिरी वर येत होते, पण वा-यामुळे त्यांना परत फिरावं लागलं ! तुलाच खाली उतरावं लागेल रॉब !"
" मी आजची रात्र इथे निश्चीत काढू शकतो !" त्या परिस्थितीतही हॉल उत्तरला, " उद्या सकाळी नऊ-दहा पर्यंत कोणाला तरी वर पाठवा !"
" टफ मॅन बिग गाय् ! सकाळी आम्ही कोणाला तरी वर पाठवतो !"

दुपारचे ४.३०

बर्लसन आणि अ‍ॅथन्स हॉल, फिशर आणि गाऊच्या सुटकेच्या प्रयत्नांची वाट पाहत कँप ४ वर थांबले होते. बर्लसन तंबूच्या बाहेर उभा असताना त्याला कँपच्या दिशेने चालत येणारी एक आकृती दिसली. त्याने अ‍ॅथन्सचंही तिकडे लक्षं वेधलं.

त्या आकृतीचा उजवा हात बाजूला सॅल्यूट करण्याच्या पवित्र्यात गोठलेला दिसत होता. त्याला पाहून अ‍ॅथन्सला एखाद्या हॉरर चित्रपटातील ममी चालत समोर आल्याचा भास झाला. ती आकृती कँपमध्ये शिरताच बर्लसनला आश्चर्याचा प्रचंड धक्का बसला ! डोळे फाडून तो त्या आकृतीकडे पाहत राहीला आणि दुस-याच क्षणी स्टुअर्ट हचिन्सनला बोलावण्यासाठी धावत सुटला.

भुतासारखी प्रगटलेली आणि ममीसारखी दिसणारी ती आकृती म्हणजे दुसरंतिसरं कोणी नव्हतं..

तो बेक वेदर्स होता !

गेले पंधरा तास तुफान वादळात सापडलेला वेदर्स नम्बाप्रमाणेच कोणत्याही मदतीच्या पलीकडे गेल्याची खात्री पटल्यामुळे हचिन्सनने त्याला तिथेच सोडण्याचा निर्णय घेतला होता. वेदर्स म्हणतो,

" माझा संपूर्ण चेहरा गोठला होता ! माझे हात आणि पाय गोठले होते. माझी हालचाल मंदावली होती. माझी शुध्द जात होती. शेवटी मी बर्फावर पडून मरणाची वाट पाहत राहीलो !"

पुढचे कित्येक तास तो वादळाच्या मा-यात तसाच पडून होता ! मात्र त्याला त्यातील काहीही आठवत नव्हतं !

अचानकपणे जगण्याच्या तीव्र उर्मीने तो शुध्दीवर आला ! चेह-यावरचा बर्फ बाजूला सारून त्याने डोळे उघडले आणि तो पूर्ण भानावर आला !

" मी स्वप्नात आहे अशीच आधी माझी कल्पना झाली ! मी घरी बेडवर झोपलो आहे असंच मला वाटत होतं. मग मी एका कुशीवर वळलो आणि माझा उजवा हात मला दिसला. त्याबरोबर मी कुठे आहे याची मला कल्पना आली ! मी कोणत्या परिस्थितीत सापडलो आहे याची मला पूर्ण कल्पना आली !

मला जिवंत राहायचं होतं. माझ्या मदतीला कोणीही येणार नाही याची मला कल्पना आली. जी काही हालचाल करायची होती ती माझी मलाच करावी लागणार होती ! कम ऑन बेक ! तुझ्या बायकोसाठी आणि मुलांसाठी तुला जगायलाच हवं. मी स्वतःलाच बजावलं ! त्यांच्याशी पुन्हा बोलण्याच्या, त्यांना पुन्हा पाहण्याच्या जबरदस्त ईच्छेने सगळं बळ एकवटून मी उठून उभा राहिलो आणि अंदाजाने कँपच्या दिशेने निघालो !"

वास्तविक दोन वेळा इतर गिर्यारोहक वेदर्सपर्यंत येऊन गेले होते, हचिन्सन प्रमाणेच कँप मध्ये परत नेऊनही तो वाचण्याची अजिबात शक्यता नाही याची खात्री पटल्यावर त्यांनी त्याला मृत्यूच्या हवाली केलं होतं.

आणि आता तो आपल्या पायांनी चालत परत आला होता !

वेदर्सला उजव्या डोळ्याने अजिबात दिसत नव्हतं. डाव्या डोळ्यानेही जेमतेम पाच फूट अंतरावरचं दिसत असूनही अडखळत धडपडत तो वा-याकडे तोंड करून चालत निघाला. कँपच्या दिशेचा त्या परिस्थितीतही त्याने अचूक अंदाज बांधला हे सुदैवच ! अन्यथा कांगशुंग धारेच्या ७००० फूट कड्यापासून तो फक्त तीस फूट अंतरावर होता ! मधूनच थांबत अडखळत दीड तासाने तो कँप ४ वर पोहोचला होता !

हचिन्सन वेदर्सला परत आलेला पाहून बेशुध्द पडायचाच बाकी राहीला होता ! बर्लसन आणि अ‍ॅथन्सच्या मदतीने त्याने वेदर्सला एका रिकाम्या तंबूत दोन स्लीपींग बॅग्ज्स आणि गरम पाण्याच्या बाटल्या यात गुंडाळून ठेवलं. हचिन्सन म्हणतो,

" आमच्यापैकी कोणालाही बेक ती रात्र काढू शकेल असं वाटत नव्हतं ! आणि सकाळपर्यंत त्याने तग धरली असती तरीही त्याला खाली कसं उतरवावं हा गहन प्रश्न होता !"

जपानी गिर्यारोहकांनी भारतीयांच्या सुटकेसाठी पाच गिर्यारोहकांना पाठवत असल्याचं मोहींदर सिंहना रेडीओवर कळवलं. प्रत्यक्षात एकही जपानी गिर्यारोहक कँप ६ वरून बाहेर पडला नाही.

संधाकाळी ५.००

मकालू गाऊ आणि फिशरच्या सुटकेसाठी गेलेले शेर्पा एव्हाना गाऊसह कँप ४ वर परतले होते. गाऊचीही अवस्था वेदर्सपेक्षा फारशी वेगळी नव्हती. त्याच्याही हाता-पायाला प्रचंड फ्रॉस्टबाईट झाला होता.

शेर्पांकडून फिशरची अवस्था कळल्याबरोबर बुकरीवने सुटकेचा प्रयत्न करण्याचं ठरवलं. वादळाचा जोर पुन्हा वाढत असतानाही बुकरीवने ऑक्सीजन आणि गरम चहा घेऊन फिशरच्या सुटकेसाठी चढाई सुरु केली !

संध्याकाळी ५.३०

हनाडा आणि शिकेगवा कँप ६ वर पोहोचले. पहिल्या पायरीच्या खाली त्यांना पाल्जर दिसला होता, पण त्याच्या मदतीसाठी ते थांबले नाहीत !

संध्याकाळी ६.००

जपानी मोहीमेतील तीन शेर्पा कँप ६ वर पोहोचले.

भारतीय गिर्यारोहकांच्या सुटकेची शेवटची आशा मावळली.

संध्याकाळी ६.२०

गाय कॉटर पुमोरीच्या पायथ्यापासून एव्हरेस्टच्या बेस कँपवर येऊन पोहोचला होता. त्याचा हॉलला संदेश आला. क्राईस्टचर्चवरून हॉलच्या पत्नीला - जान आरनॉल्डला त्याच्याशी बोलायचं होतं. हॉलने तिची चौकशी केली.

" कशी आहेस ?"
" मी सतत तुझा विचार करते आहे !" जान अरनॉल्ड उत्तरली, " माझ्या अपेक्षेपेक्षा तू बराच ठीक आहेस असं वाटतं आहे !"
" मी ठीक आहे !" हॉल उत्तरला, " माझ्या हातापायांना फक्त फ्रॉस्टबाईट झाला आहे. बाकी काही नाही !"
" तू परत आलास की सर्व ठीक होईल. उद्या सकाळी तुझी नक्की सुटका होईल याची मला खात्री आहे. मी तुझ्याबरोबर आहे ! लवकर परत ये !"
" तू शांतपणे झोप. माझा फारसा विचार करू नकोस ! आय लव्ह यू !"

रॉब हॉलचे हे शेवटचे शब्द ! त्यानंतर त्याचा कोणाशीही रेडीओ संपर्क झाला नाही ! काही तासांनी त्याने शेवटचा श्वास घेतला !

संध्याकाळी ७.३०

फिशरच्या शोधात गेलेला बुकरीव अखेरीस त्याच्यापाशी पोहोचला होता ! वादळाने आता उग्र रूप धारण केलं होतं. फिशरचा ऑक्सीजन मास्क त्याच्या गळ्यात होता. ऑक्सीजन टँक पूर्ण रिकामा होता. त्याचा डाऊन सूट अर्धा उघडा होता. संपूर्ण शरीर गोठलेलं होतं !

" मी काहीही करू शकत नव्हतो !" बुकरीव म्हणतो, " स्कॉट मरण पावला होता !"

जड अंत:करणाने बुकरीवने फिशरची आईस एक्स, कॅमेरा आणि आवडती खिशातील सुरी ( पॉकेट नाईफ ) काढून घेतली. फिशरच्या बॅगने त्याचा चेहरा झाकून ठेवला आणि खाली उतरण्यास सुरवात केली.

रात्री ८.००

जपानी गिर्यारोहकांनी भारतीयांच्या सुटकेचा कोणताही प्रयत्न केला नव्हता याची एव्हाना मोहींदर सिंहना कल्पना आली.

रात्री ९.३०

अनातोली बुकरीव कँप ४ वर परतला.

बेक वेदर्स आणि मकालू गाऊ अतिशय गंभीर अवस्थेत कँप ४ वर अद्याप जीवंत होते.
यासुको नम्बा साऊथ कोलवर मरण पावली होती.
स्कॉट फिशर साऊथ कोलच्या वर १२०० फूट उंचीवर पर्वताच्या एका धारेवर चिरविश्रांती घेत होता.
अँडी हॅरीस आणि डग हॅन्सन यांनी वरच्या उतारांवर मृत्यूला कवटाळलं होतं.
त्सेवांग सामलां, दोर्जे मोरूप तिबेटच्या बाजूला दुस-या पायरीवर मृत्यूमुखी पडले होते.
त्सेवांग पाल्जर कँप ६ पासून फक्त १०० मी उंचीवर मरण पावला होता.
रॉब हॉल साऊथ समिटवर शेवटचे क्षण मोजत होता.

एका दिवसात एव्हरेस्टवरच्या वादळाने आठ बळी घेतले होते. !

जपान्यांनी वेळेवर मदत केली असती तर एका तरी भारतीय गिर्यारोहकाला वाचवणं निश्चीतच शक्यं झालं असतं. कदाचित रॉब हॉललाही !

आदल्या दिवसापेक्षाही जोरदार हिमवादळाने साऊथ कोल आणि नॉर्थ कोलच्या परिसरात थैमान मांडलं होतं. गाऊ आणि वेदर्स सुरक्षीत खाली पोहोचणार होते का ?

क्रमशः

१९९६ माऊंट एव्हरेस्ट - ६.............................................................................................१९९६ माऊंट एव्हरेस्ट - ८

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त. मागच्या भागातल्या प्रतिसादात लिहिल्याप्रमाणे ह्या पुस्तकावर बनलेला पिक्चर आज पाहिला. ज्यात बरंच कापलं गेलं आहे. भारतीय टीम, जपानी टीम वगैरे दाखवलेल्याही नाहीत.
>>हचिन्सनने पहिला देह पाठीवर निजवला आणि त्याच्या चेह-यावरून सुमारे तीन इंच बर्फ खरवडून काढला ! ती यासुको नम्बा होती ! ती बेशुध्द होती परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे अद्यापही जीवंत होती ! तिचा श्वास जेमतेम सुरू होता ! परंतु ती मृत्यूपंथाला लागलेली होती.

हचिन्सन वेदर्सकडे वळला. त्याचीही अवस्था नम्बासारखीच होती. त्याच्या चेह-यावर बर्फ साचला होता. हचिन्सनने त्याच्या चेह-यावरचा बर्फ दूर करताच त्याला आश्चर्याचा दुसरा धक्का बसला ! नम्बाप्रमाणेच वेदर्सही जीवंत होता आणि शुध्दीवर होता ! हचिन्सनला पाहताच तो बोलण्याचा प्रयत्न करू लागला, पण त्याच्या तोंडून धड शब्द फुटत नव्हता. त्याच्या हातात हँडग्लोव्हज नव्हते. हचिन्सनने त्याला उठवून बसण्याचा प्रयत्न केला, परंतु तो पुन्हा आडवा झाला ! नम्बाप्रमाणेच वेदर्सही मृत्यूपंथाला लागला होता.>> हे ही थोडं बदलून दाखवलं आहे. अर्थात एवढं मोठं पुस्तक दीड तासात बसवणं शक्यही नाही म्हणा.

सायो,
चित्रपट संपूर्णपणे क्राकुअरच्या पुस्तकावर आहे. इतरांचा त्यात विचारही केलेला नाही. क्राकुअरने आपली टीम सोडून इतरांवर विशेषतः बुकरीव वर विनाकारण टीका केलेली आहे.

जपानी गिर्यारोहकांच्या मनोवृत्तीतील क्षुद्रपणा इयन वूडॉलपेक्षा रेसभरही कमी नव्हता.

जपानी गिर्यारोहकांनी भारतीयांच्या सुटकेसाठी पाच गिर्यारोहकांना पाठवत असल्याचं मोहींदर सिंहना रेडीओवर कळवलं. प्रत्यक्षात एकही जपानी गिर्यारोहक कँप ६ वरून बाहेर पडला नाही.

एका दिवसात एव्हरेस्टवरच्या वादळाने आठ बळी घेतले होते. !

जपान्यांनी वेळेवर मदत केली असती तर एका तरी भारतीय गिर्यारोहकाला वाचवणं निश्चीतच शक्यं झालं असतं. कदाचित रॉब हॉललाही ! >>>>>>>>

अरे रे रे रे ...........पार एव्हरेस्ट सारखे सर्वोच्च शिखर चढणारी माणसे इतक्या "खुज्या" मनोवृत्तीची ???????
काय म्हणावे याला ????

अखेर मानवी मनच ते!!!! एव्हरेस्टवरच्या वार्‍यापेक्षाही लहरी असणारे ते --- ते केव्हा कसं वागेल याची खात्री कोणीतरी देऊ शकेल का ????

या पार्श्वभूमीवर हा अनुभव खूपच सुखावह वाटला ...
<<<<अंग दोर्जे आणि लाखपा चिरी जीवाची पर्वा न करता वर सरकत होते ! कोणत्याही परिस्थितीत हॉलपर्यंत पोहोचायचंच या ईर्ष्येने वा-याशी मुकाबला करत त्यांची चढाई सुरूच होती !>>>>>>

फारच वाईट वाटले हा भाग वाचताना..... लेखन कौशल्य मात्र जबरदस्त .......

सगळे भाग वाचुन काढले. वाचुन सुन्न झाल्यासारख वाटतय आणि पुढे काय होणार याची उत्सुकता पण आहे. लिखाण जबरदस्त आहे तुमचं!!

उत्कंठा वाढत चालली आहे.
पार एव्हरेस्ट सारखे सर्वोच्च शिखर चढणारी माणसे इतक्या "खुज्या" मनोवृत्तीची ??????? >> ह्या पार्श्वभूमीवर आपले उमेश झिरपे (गेल्या वर्षी ह्यांच्या नेतॄत्वाखाली भारतीय टिमने एव्हरेस्ट पादाक्रांत केले) स्वतः मागे राहून टिमला समिटवर जाउ दिले (ऑक्सीजन सिलेंडर नव्हते म्हणून) हे फारच महान आहे ना?
तसच अरुणिमा नी अपंगत्वावर मात करून केलेली यशस्वी चढाई पण .

ह्या पार्श्वभूमीवर आपले उमेश झिरपे (गेल्या वर्षी ह्यांच्या नेतॄत्वाखाली भारतीय टिमने एव्हरेस्ट पादाक्रांत केले) स्वतः मागे राहून टिमला समिटवर जाउ दिले (ऑक्सीजन सिलेंडर नव्हते म्हणून) हे फारच महान आहे ना? >> अनुमोदन. एव्हरेस्टवर चढण्याची संधी मिळवणं हे अतिशय दुर्मीळ आणि खर्चीक काम असतं. अशा परिस्थितीत स्वतःऐवजी आपल्या टिम मेंबरला शिखरावर जाऊ देणं हे खरंच ग्रेट ! भल्याभल्यांना तो मोह आवरत नाही.

अनेक गिर्यारोहक केवळ इतरांच्या शिखरावर पोहोचण्याच्या हव्यासापायी आपल्या प्राणाला मुकले आहेत. इंग्लंडचा डेव्हीड शार्प हे त्याचं उत्तम उदाहरण. २००६ मध्ये एव्हरेस्टच्या माथ्याजवळच असलेल्या डेव्हीडजवळून तब्बल चाळीस गिर्यारोहक गेले पण मदतीला कोणीही थांबलं नाही !

ही लेखमाला संपू नये असे वाटते. स्पार्टाकस वर्णन असे करतात की प्रत्येक प्रसंगाचे डोळ्यांसमोर चित्र उभे राहते.

बेक वेदर्स हा एव्हरेस्ट हाय-कँपवरील अपघातात काही अगदी मोजक्या जिवंत परत आलेल्यांपैकी असा चमत्कार!

१५ तास उणे ४०-५० तापमानात प्राणवायू नळकांड्याशिवाय आणि हातमोजे हरवलेल्या अवस्थेत काढल्यामुळे बेकला चेहरा आणि हाताला सीव्हिअर फ्रॉस्टबाईट्स, तसेच हायपोथर्मिआची लागण झाली होती. डावा डोळा पूर्ण निकामी, तर उजव्या डोळ्याने इतके धूसर की पाच फुटापलीकडचे स्पष्ट दिसेना!

बेक जेव्हा साऊथकोलवर तंबूत कोलमडत आला तेव्हा त्याची फ्रॉस्टबाईट्समुळे काय हालत झाली होती, ते खालील दुव्यावरून लक्षात येईल. पान स्क्रोल-डाऊन करावे लागेल.
http://fivestrokeroll.wordpress.com/2010/11/23/inside-the-1996-everest-d...
(त्याच पानावर, डॉ. केन कॅमलर, जे त्या एक्स्पिडिशनचा भाग होते, त्यांचा स्लाईड-शो/ व्हिडिओ पाहण्यासारखा आहे.)

नंतर बेकवर १० शस्त्रक्रिया कराव्या लागल्या. दोन्ही हाताचे काही भाग, चेह-यावरील काही भाग कापून टाकावे लागले.

आजचे बेक वेदर्स असे जीवन जगत आहेत. http://www.aopa.org/AOPA-Live.aspx?watch=41ODM2MTqgBVi_Ui_xBGOfGWC7_1pcrG

जीवनेच्छा बलियसि!

काय नाव आहे त्या चित्रपटाचं?>> मी हा बघितला, IN THIN AIR DEATH ON EVEREST (http://www.youtube.com/watch?v=S39TJpnnKvg)
जबरद्स्त लेखनशैली... धन्यवाद स्पार्टाकस! तुमच्यामुळे खूप नवनवीन आणि चांगली माहित मिळत आहे.

अभिजित.. लो स्लाईड शो मस्त आहे एकदम ! फक्त तुम्ही बेक वेदर्स जिंवत आहे हा सस्पेन्स फोडलात की.. Happy

मी ह्या घटनेबद्दल काही नेटवर वाचणं टाळतोय आणि
<<गाऊ आणि वेदर्स सुरक्षीत खाली पोहोचणार होते का ?>> हे वाक्य वाचून फार उत्सुकता लागली होती.. Happy

अहो स्पार्टाकस.. पुढचा भाग टाका लवकर.. !

पराग, वर स्पार्टाकसने जी पुस्तकांची नावं दिलीयेत त्यात बेक वेदर्सचं पण आहे एक. म्हणजे तो जिवंत आहे असं झालंच नां?

आडो.. खरं सांगायचं तर ती नावं सुद्धा मी वाचली नव्हती.. ही मालिका संपली की वाचेन सगळे रेफरन्सेस वगैरे.. Into thin air पण वाचेन.

आधी <<आजचे बेक वेदर्स असे जीवन जगत आहेत.>> हे वाक्य वाचलं.. मग लिंक.. आणि मग स्लाईड शो..
स्लाईड शो पण अर्धाच पाहिला आहे अजून...

बेक वेदर्स जिंवत आहे हे कळल्याने सस्पेन्स फोडल्याचा खूप त्रास झाला अश्यातला भाग नाही.. पण ते स्लाईड शो बद्दल लिहायला आलो होतो तेव्हा ते ही लिहिलं.. Happy

ओके पराग. ती पुस्तकांची नाव वाचल्यावर माझा सस्पेन्स संपला तिथेच. त्यातली कोणती मिळतायत का वाचायला हे शोधत होते मी.