असच आपलं सटर फटर... दहा

Submitted by ह.बा. on 16 December, 2013 - 06:16

आय गॉटच कसला पोपट झाला
वडाच झाला चांगला
आब्रू काडली राव पोरानं
इज्जतीची माती झाली
कसं नाक काप्लं!
चांगलाच पचका झाला
बाकी स्वानुभवानं ज्ञात झालेली वाक्य जोडावीत...

.........................................

"काय झालं?"
"काय नाय"
"आं?"
"आता म्हणल की काय नाय"
"म फव का नाय खाल्ल?"
"नग मला... मानापानाची काय पध्दत हाय का तिला? पसंद हाय म्हून सांगतायसा बापल्याक... सगळ्यांच्या पाया पडली माज्या पडली का?"
"ए आता नवं खेटाक काडू नगो आदिच लगीन ठरना झालय..."
"करा जावा तुमचं तुमीच..."

................................................

बुवांच किर्तन झालं, लोक जवळ गेले तसेच आण्णा जवळ गेले... "वा बुवा वा! काय किर्तान केलं बरका तुमी... पिक्लिया शेंडे कडू म्हणजे.. खतराच..."
"शेंडे नाय वो शेंदे...पिकलीया शेंदे कडूपण गेले, तैसे आम्हा केले नारायणे..."
"हा हा तेच पण काम क्रोद म्होव काय काय र्‍हायतच नाय वो... आहा... लय भारी.."
"सगळी पांडूरंगाची कृपा ... धन्यवाद!"
"नाय पण गाणं काय जमलं नाय बरका"
एका वाक्यात बुवांचा चेहरा लग्नाच्या मेकपसारखा लाल गुंद झाला.... "म्हंजे?"
"मंजे लय भेसाड आवाज काडलासा.... किर्तन लय खतरा बरका... पण आवाज लयच मजी..."
पिकलेल्या शेंदाचा चेंदा मेंदा झाला. बुवा फेटा काढून सरसावले....
"तुम्हाला गाण्यातलं काय कळतं?"
"चिडू नगा म्हाराज..."
"चार माणसात आपमान करुन वर चिडू नका म्हणताय... म्हंजे.... अं... ही काय ही आहे का... पध्दत?"
मानापमान गळालेल्या या पिकलेल्या शेंदाचा पिकलेपणा अनुभवाचा आणि अनुभुतीचा नसून शेवटी तोही सामान्य माणसासारखाच बेगडी आहे हे कळायला आण्णांची दोनच वाक्यं पुरेशी होती. तीन तासाच्या किर्तनात थापा मारण्यापेक्षा समारोपाच्या दोन वाक्यात वैश्विक सत्याची प्रत्यक्ष अनुभुती देणारे आण्णाच तुकारामाचे खरे वारसदार आहेत हे वाक्य चूक आहे काय? असो, आपल्याला काय सटर फटर लिहायचं आणी पुढे जायचं आहे...

तर घडले असे की मान असणे अत्यावश्यक असल्याचे आम्ही एका धार्मिक पुस्तकात वाचले... पण सन्मान म्हंजे नेमके काय? इथेच आमचा विचार खुंटतो... अपमानित न झालेला असा सन्मानवीर आम्ही बर्‍याच दिवसापासून शोधत आहोत.. सन्मान म्हणजे मनाचा खेळ आहे.. की अपमान पचविणे ही शुध्द पांचट आणि खोटी संकल्पना आहे?...

'सन्मान माणसासोबत जन्माला येतो आणि त्याच्यासोबत वाढत जातो... की माणूस वाढला की सन्मान जन्माला येतो आणि हळू हळू लहान होत जातो...?' जावद्याना राव....

गांधिजीना मान होता... त्याना गोळ्या घातल्या... नेत्याना मान असतो(हसा) त्याना शिव्या घालतात... भटजीना मान असतो... त्याना शिधा घालतात... संताना मान असतो... त्यांचा समाधी सोहळा घालतात... मग आपल्याला मान असला तर आपल्यालाही काहीतरी घालतील असे वाटलेने आम्ही ज्ञानी सांप्रदायास प्रश्न केला... 'न मोडणार्‍या प्रतिष्ठाप्राप्तीसाठी' कोणते व्रत करावे? त्याचा विधी काय? धनाची लक्ष्मी, ज्ञानाची सरस्वती, मनाची रती, निर्मीतीचा ब्रह्मा, केटरिंगचा विष्णू, विद्युतदाहिनी ओनर शंकर... तैसा दावा प्रतिष्ठेचा दाता | हवा नमस्कार येता जाता | झुकावा जनांचा माथा | ऐसे करा ||... मग काय एकापुढे एक धावे अशी अवस्था झाली...
'हे निर्बूध्द हबालका...
ऐक प्रतिष्ठेची कथा | न लगे फार बुध्दीमता | धवल कुर्ते, सुवर्ण साखळी घेता | रुबाबी होशील ||" आम्ही म्हणालो खरे आहे... थोडीशी दाढी वाढवली तर आण्खीच परतिष्टीत होउ... हा हा लय भारी आयड्या...
"नादान मनुष्या... आवर स्वतःला..." चपापलो... सटपटलो... हबकलो....
"कापडाने का साधते काम? काहीही करतो झंडू बाम..."
बुवा काय करू सांगावे आपण ... आम्ही आपलेही करू भजन...
"मनाशी बांध खूण गाठ, सल्ले देतील सतराशे साठ, माझ्यानंतर शहाणा कोण!, एवढाच कर मंत्र पाठ!"....
काय आयड्या बगा ना राव... दुसर्‍याला मुर्ख म्हटल्यावर आपण शहाणे होणारच...
प्रतिष्टा व्रताची शक्कल लढवा | चेष्टा करून प्रतिष्टा वाढवा!.
पण धवल कुर्ता माणसात फाटला की अपमान... चेष्टा करता करता आपलीच टिंगल झाली तर...
आणि मला तर न मोडणारी प्रतिष्ठा हवी... 'जो अपमानित होत नाही तो सन्मान हवा'...
कुणासारखा?... रुषीमुनींसारखा.... नाय नाय... त्यानी तर शाप देऊन देऊन हैरान केलं लोकांना...
देवासारखा.... नको नको त्यांच्या तर पुजेत खंड पडला तरी शांत्या कराव्या लागतात एवढे कोपिट सगळे... मग कुणासारखा...अं... आपण पॅक झालो... तुमीच सांगा एखाद्या अनअपमानेबल सन्मानाचं उदाहरण... कधीच कुणाकडूनच अपमानित झाला नाही अश्या सन्मानाच उदाहरण...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गर्व नि स्वाभिमान यातली रेषा अत्यंत अस्पष्टआहेम, सहजासहजी दिसत नाही, दुसर्‍यांना तर नाहीच. ज्याला तुम्ही स्वाभिमान म्हणता त्याला दुसरे गर्व म्हणतात.
कशाबद्दल मान नि अपमान मानायचा हे मानणार्‍यावर अवलंबून. "तुमचा बाब्या गणितात अगदी हुषार हो, दिसायला असे ना का वेडाबिद्रा" असे ऐकल्यावर प्रश्न - मी गणितात हुषार याचा अभिमान बाळगायचा, पण दिसायला नीट नाही याबद्दल अपमान मानायचा, राग धरायचा, अगदी डूख धरायचा हे ज्याने त्यानेच ठरवावे. परत जर "वेडाबिद्रा" दिसतोय असे म्हंटले याकडे दुर्लक्ष केले तर कुणि दुसराच येऊन मनात भरवेल की अरे त्याने तुझा अपमान केला, तू सहन कसा करतोस, तुला स्वाभिमान नाही का?
मग?
हे मी जवळ जवळ आयुष्यभर अनुभवले. मग शेवटी "पिकलीया शेंदे कडूपण गेले" हे कळले. शेंदे अगदी नासेपर्यंत पिकवले, आता मन शांत आहे.
दुर्दैवाने अभिमान धरावा असे काही सापडतच नाही - जाउ दे. अनेक वर्षे गेली, थोडी उरली. आता काही करायचे उरले नाही. . करायचा काय मान अपमान,