असच आपलं सटर फटर... नऊ.

Submitted by ह.बा. on 15 December, 2013 - 02:22

खुषखबर! खुषखबर! खुषखबर!
मस्तवाल माणसाचा तोरा उतरला आहे... वर्षापुर्वीच त्यांचा माज मेला!!! मेला!!! मेला!!!

कॉलेजचं इलेक्शन..
"माझ्या विरूध्द उभा राहणार हाणम्या?"
"मग?"
"मार खायाचाय का?"
"घव तवा पोळ्या... बगू"
"बरं"
निकाल!
'हणमंत शिंदे तीन मतानी विजयी...'
त्याच्या गावात. त्याच्या नातेवाईकाच्या कॉलेजात. त्याचा पराभव करून युआर झालो...

जिवन शिक्षण विद्या मंदीर मालखेड....
"काळ्या... कुट्टया... रेड्या... वैभ्या तुला दावतो बग आं... बारका हाय म्हणून लय काय ताकत दाव्तुयास काय लय..." डोळे पुसत रडू आवरत कोंडलेला श्वास घेत कसा बसा दम दिला मी त्याला. तो सातवीत मी पाचवीत... दुपारच्या सुट्टीत माझ्या छातीत त्यानं बुक्की मारली. त्याला हात लावणं माझ्या ताकदीच्या पलीकडच्या भलतीकडेच होतं... दुसर्‍या दिवशीची प्रार्थना. हंसवाहीनी सरस्वतीच्या पदकमली रमते... मग ज्ञान मंदिरा, सत्यम शिवम सुंदरा... आणि मधेच आयो... मेलो ए... हाण्म्याअ‍ॅए... नको ए... गुरूजी... वैभ्या सगळ्या मैदानात पळ्त होता... पाठ रक्ताने भिजलेली... सगळी शाळा नुस्ती बघत होती... ताकद नव्हतीच माझ्यात पण माज होता... काही लोक त्याला धाडस म्हणतात. तो सगळ्याना मारतो, पेन चोरतो, सफाई करत नाही, आणि काल त्यानं मला सार्‍या शाळेसमोर मारलं. एक जुनं ब्लेडचं पान. बेसावध वैभ्या आणि जन्माची अद्दल...

"हाणम्या साल्या तुला जगावेगळा माज हाय बरका..."
"खरय दोस्ता मलाही तसच वाटतं स्वतःबद्दल"
"एखाद्या दिवशी बाराच्या भावात जाशील"
"तसं ऑलरेडी मेनी टाईम्स ह्याप्पनड आहे"
"मग काय बोलणार"
"खरच की... घ्या विश्रांती"

बर्‍याच वेळा ह्या माजाची जाणिव करून देणारे मित्र भेटले. ते बोलले मी ऐकलं विषय संपला... भूक नसताना जेवणं, झोप नसताना झोपणं, चूक नसताना घाबरणं.... आरोग्यास हानिकारक! घाबरावसं वाटलं नाही, माघार घ्यायला जमली नाही... शाळेचा मुख्यमंत्री, हायस्कूलमधे सीआर, कॉलेजमधे युआर... ना ताकद ना पैसा ना पाठींबा... पण लाल रुमालावर नेम धरून पळणार्‍या सांडासारखा धावत राहिलो... मिळवत राहिलो... माजत राहिलो... पण वाढता वाढता झाड आभाळाहून मोठं होत नाही... पाय नसलेली पोरगी उत्तूंग हिमालयाची उंची पावलात मोजते... नसानसात माधुर्य भरणार्‍या जिवनदायी कृष्णेलाही अंत आहे आणि तो गोड नाही खारट आहे... सगळ्यालाच अंत आहे. सिमा आहे. मरण आहे...
आता कसा माज मेल्यासारखा बोलतोय ना मी...
खुषखबर! खुषखबर! खुषखबर!
मस्तवाल माणसाचा तोरा उतरला आहे... वर्षापुर्वीच त्यांचा माज मेला!!! मेला!!! मेला!!!

२६ नोव्हेंबर २०१२ ला सकाळी सात वाजता फोन आला. दादा घरी ये सगळ्यांना घेऊन ये. लगेच निघ. बायकोला आणि पोराला घेऊन गावात गेलो. सारा गाव घरासमोर जमलेला. बाहेरच्या खोलीत भिंतीला टेकून माझा मेलेला माज बसलेला. पाऊल उचलेना... आवाज निघेना... बापू मेला... बाप मेला... माज मेला... तोंडातून आवाज निघाला नाही... आताही निघत नाही... स्वतःच्या पोरावर ओरडायची भिती वाटते... कॉलेजवर जायची भिती वाटते... वैभ्या दिसला की भिती वाटते... ना ताकद ना पाठिंबा ना पैसा... ना माज...
ही वेळही जाईल कदाचित पण नेहमीप्रमाणे सटर फटर प्रश्न पडत राहतात... सगळ्यांचच असं होत असेल का? बाप मरत असेल आणि मग त्याच्यासोबत माजही...?

या मालिकेतील मागील काही एपिसोड :

http://www.maayboli.com/node/31285
http://www.maayboli.com/node/31583
http://www.maayboli.com/node/31338

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हबा... खुप दिवसांनी दिसलास आणि तो ही असा 'तुटलेला'. Sad
होतं रे सगळ्यांचच असं होतं. पण 'काळ' हे खुप रामबाण औषध आहे. तु नक्कीच सावरशील.
मनाच्या कुठल्यातरी कोपर्‍यात या आठवणी दडवुन ठेवायच्या असतात. आणी कधीतरी एकटं बसलं ना तर त्या आठवायच्या मस्त!!
वरवर हसायचं असतं. सावरायचं असतं.
आम्हाला पुन्हा तुझा 'झंझावात' पहायचा आहे. परत ये!

नको रे राजा...
असा हबा बघायची सवय नाहीये आम्हाला ! आम्हाला तोच जुना हब्या हवाय. बिनधास्त शिव्या देणारा, कानाखाली आवाज काढीन म्हणणारा.....

ह बा ची आठवण काढुन पंधरा दिवस पण नाही झालेत.
विशल्यालाच विचारलेलं मी.

आज इकडे बघुन आनंद तर झाला पण वाचुन लैच वाइट्ट..

सेल्फ रीयलाईझेशन प्रत्येकाला होत असते.

ही तीच फेज असेल तर खर्‍या अर्थाने जबाबदार प्रौढ होण्याकडे यशस्वी वाटचाल सुरू झालीय असे समजावे.

बापूंना श्रद्धांजली.

परंतू एक वर्षानंतर आणि तेही ह्या माध्यमातून सांगतोयस त्याबद्दल भरपूर राग Angry मधल्या काळात अनेकवेळा तुझा फोन कधी लागला नाही कधी उचलला गेला नाही.

सेल्फ रीयलाईझेशन प्रत्येकाला होत असते.
ही तीच फेज असेल तर खर्‍या अर्थाने जबाबदार प्रौढ होण्याकडे यशस्वी वाटचाल सुरू झालीय असे समजावे.
बापूंना श्रद्धांजली. >>>> +१

Sad