बहाणे तुझे सोड सारे जरा ..

Submitted by प्राजु on 11 December, 2013 - 13:06

बहाणे तुझे सोड सारे जरा अन खरे रूप माझे मला दाव रे
अता धुरकटूनी पुन्हा आरशा तू नको खाउ इतका फ़ुका भाव रे

किती वेगळ्या भूमिका मी वठवते, किती रोज घेते मुखवटे नवे
विसरलेय ओळख कशी मीच माझी, जरा सांग माझे मला नाव रे

सगे सोयरे वा कुणी ना कुठेही, तरीही भटकते पहा मी अशी
जगाया हवे वेड काहीतरी मग, म्हणुन शोधते मी नवा गाव रे

मिळवले किती काय मी जीवनी या नसे प्रश्न माझ्या मनी हा कधी
जमवली तुझी आठवे अंतराशी, मला भासते मी जणू साव रे

करु आकडेमोड आपण जराशी, हिशोबासही चोख राहू जरा
किती घेतले अन कुणी घेतलेले, सुखाचा कसा लावला भाव रे ?

इथूनी तिथूनी चहू बाजुनी आज पडझड किती होत आहे पहा
मला सावरायास ना वेळ झाला कसा नेटका घातला घाव रे

उभारेन मीही नव्याने स्वतःला, नवा डाव मांडेन हेही खरे
बिनाशर्त माझा तुम्हीही परंतू करा एकदा पूर्ण पाडाव रे

कशाला वृथा काळजी ही मनाला, इथे मोडला मोडु दे सोड ना
जिथे सोबतीने वसू तेथ मांडू नव्याश्या पटावर नवा डाव रे

-प्राजु

Group content visibility: 
Public - accessible to all site users

करु आकडेमोड आपण जराशी, हिशोबासही चोख राहू जरा
किती घेतले अन कुणी घेतलेले, सुखाचा कसा लावला भाव रे ?....व्वाह..

लिहता येत न्हाही तर मुळात ल्ह्यायचेच का?

र ला ट किम्वा 'भाव' ला 'साव' जोडल्याने गझल होते का?

नुस्ती लै जम्वायला हर्स्व चे दिर्ग आनि दिर्ग चे हर्स्व करने.. आनि तेपन परतेक ओलीत सोबून दिस्ते का?

फाल्तू गझल !@#$%^&*

उभारेन मीही नव्याने पुन्हा अन नवा डाव मांडेन हेही खरे
बिनाशर्त माझा तुम्हीही परंतू करा एकदा पूर्ण पाडाव रे

हा शेर आवडला, विशेषतः सानी मिसरा. वरच्या ओळीत उभारेन = उभी राहीन / उभारी घेईन असे समजून घ्यावे लागते आहे. अन्यथा काय उभारेन? असा प्रश्न पडतो. पण एकूण शेर आवडला.
बाकी शेरही चांगले आहेत, पण र्‍हस्व/दीर्घ सूट बर्‍याचवेळा घेतली गेली असे मलाही वाटले. (कृपया गैरसमज न करून घेता हा प्रतिसाद सकारात्मकरित्या घ्याल, अशी विनंती आहे.)

सर्वांचे मनापासून आभार.

ज्ञानेश जी,
तुमचे म्हणणे योग्य आहे. उभारेन.. (कोल्हापूरचा परिणाम) हे तिथे चुकीचेच वाटते आहे. त्यात आता बदल करते आहे. तो योग्य वाटला तर नक्की सांगा... मार्गदर्शन असेच मिळत राहो.

बापरे कठीण आहे हे वृत्त. छान संभाळलय, प्राजू.
विसरलेय ओळख ... विसरले आहे चं हे बोली रूप मला भावलं.
गझल अशीच समृद्धं होत जाते का? का ह्याला सूट घेतली म्हणायचं?

मला तरी ती अधिक समृद्धं वाटते. जाणकार अधिक जाणोत.