चालायचेच माझे हे वागणे दिवाणे

Submitted by जयदीप. on 9 December, 2013 - 14:56

चालायचेच माझे हे वागणे दिवाणे
मी आरशामधेही शून्यातले पहाणे

हे गौण की मला तू नेले कुठेच नाही
मी चालवून घेतो- माझे कुठे न जाणे!

मी राखतो पुरेशी आता जमीन माझी
जमिनीत पेरले मी शब्दाळले बियाणे

वाटे नशीब आहे भलते हुशार झाले
फेटाळते कसेही, देते नवे बहाणे!

वाचून घे अता तू शब्दात ना असे जे
वाचू नको असे तू हे नेहमी प्रमाणे.....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मतला सर्वात विशेष वाटला.
शेवटच्या शेरातील खयाल चांगला आहे.
परंतु, "ओळींमधील काही" मधून "between the lines" हा आशय नीटसा स्पष्ट होत नाही. वैम.
(आशय तोच आहे ना ?)

मी राखतो पुरेशी आता जमीन माझी<<< जमीन राखलेली नाही आहेत. मतल्यात रहाणे आणि पहाणे आलेले आहे, पुढे तसेच काफिये लागतात Happy

अख्खी गझल माझ्या नजरेतून पाहता अचूक म्हणावी अशी <<< वैवकु, अलामत भंगलेली निसटलेली दिसत आहे तुमच्या नजरेतून Happy

मला रहाणे पहाणे या शब्दांबद्दलही शंका होती..
राहणे पाहणे की रहाणे पहाणे..
पण माडगुळकरांची कविता...
लाजून हासणे मध्ये पहाणे हा शब्द वाचला.

पण माडगुळकरांची कविता...
लाजून हासणे मध्ये पहाणे हा शब्द वाचला.<<<

पाहणे व राहणे असेच शब्द आहेत माझ्यामते! (कोणी तज्ञ सांगतीलच). मोठमोठे कवी शब्दांना वळवतात ते काव्यमाधुर्य वाढवण्यासाठीच! अशी शेकडो उदाहरणे आहेत. गद्य लिहिताना मात्र असे करू नये, शब्दच माहीत नसला किंवा चुकून झाले तर गोष्ट वेगळी. (हेच मुक्तछंदालाही लागू आहे).

हे गौण की मला तू नेले कुठेच नाही
मी चालवून घेतो- माझे कुठे न जाणे!

शेर इंटरेस्टींग वाटला, ह्यातली गंमत अजून खुलवता येईल असे वाटले.

शुभेच्छा!

हे गौण की मला तू नेले कुठेच नाही
मी चालवून घेतो- माझे कुठे न जाणे!...वा !

बरेच खयालही आवडले.

-सुप्रिया.