अंत नसलेल्या कथा- ४

Submitted by साजिरा on 9 December, 2013 - 01:25

बायकोच्या लाल झालेल्या चेहेर्‍याकडे आणि आईच्या चेहेर्‍यावरच्या सुरकुत्यांतूनही बाहेर पडू पाहणार्‍या रागाकडे तो हताश होऊन आळीपाळीने पाहत, दाढीचे खुंट खाजवत उपायाचा विचार करत राहिला. उपाय काहीच नाही, हे त्याने खरं तर कधीच ठरवून टाकलं होतं. ओसरीत शांतपणे बसलेल्या बापाकडे मग तो टक लावून पाहत राहिला.

हे तिघेही दिलाचे तुकडे बनून बसलेले. या घराच्या चित्रातून कुणालातरी एकाला वजा करण्याच्या कल्पनेनेच त्याला कापरं भरे. मळ्यावर जाऊन गुरागत कामाचे डोंगर उपसून टाकण्याची शक्ती नाहीशी होई. या अशा वागण्याला मात्र बायकोने बोटचेपेपण ठरवलं होतं. पण त्यालाही त्याचा इलाज नव्हता. या दोघींचा वाद झाला, की त्याचं डोकं संपे. डोळ्यांना समोरचं दिसेना आणि मेंदूला समोरचं पोचेना. सैरभैर होई आणि शक्तीपात झाल्यागत तो शून्य होऊन बसून राही. मग बापच त्याला कुठंतरी कोपर्‍यात घेऊन जाई आणि डोक्यावरून मायेचा हात फिरवत आपल्या बाटलीतली कपभर दारू त्याला पाजे. त्याचे डोळे स्वप्नाळू मधाळ झाले की बापाला पोराचं नि स्वतःचंही बाळपण सापडे. कधी डोळ्यांनी तर कधी मायेच्या स्पर्शाने दोघे बोलत राहत.

दोघींचं भांडण संपून सारं नीट झालं की मग त्याला जणू धुमारे फुटत. लहान पोरागत तो घरभर खिदळत राही. पोटभर जेवण जाई. पोटभरून झोप लागे.

***

संध्याकाळी तो पुन्हा घरी आला तेव्हा प्रकरण चिघळलं होतं. इतकं, की घराच्या चार खोल्यांची दोन-दोन खोल्यांत विभागणी होऊन मधलं दार बंद झालं होतं..!

बायको उपाशानेच निजलेली. पलीकडेही सामसुम. दाराच्या तळाशी फळी थोडी तुटली होती, तीतून त्याने कानोसा घेण्याचा प्रयत्न केला. बाहेर जाऊन पलीकडे आईला तोंड दाखवून विचारणार-बोलणार तरी काय हा प्रश्नच होता. त्यालाही जेवण जाणं शक्यच नव्हतं. तसाच तळमळत तो अंधारात पडून राहिला.

कित्येकदा कुशी बदलल्यावर पुन्हा तो मधल्या, बंद झालेल्या दारापाशी येऊन बसला. बसून डोळे मिटण्याचा प्रयत्न करू लागला, पण तशातच म्हातार्‍याच्या खोकण्याचा आवाज आला. कानोसा घेतल्यावर त्याच्या लक्षात आलं.. म्हाताराही पलीकडे येऊन बसलाय. दाराजवळ.

हुकमी खाकरत आणि घोगर्‍या आवाजात बापाने त्याला हलकीच हाक मारली, तसा तो अस्फुट हुंकारला. खालच्या तुटक्या फळीशी काहीतरी खुडबुड झाली, म्हणून त्याने बघितलं, तर म्हातार्‍याने बाटली सरकवलेली.

तो मग नीटच उठून बसला. एक मोठा घोट घेऊन त्याने आधार मिळाल्यागत मान मागे भिंतीला टेकवली. जराशानं आणखी एक घोट घेऊन बाटली पल्याड सरकवली. दारापलीकडच्या हालचालीमुळे, खुडबुडीमुळे त्याला जणू हुरूप आला. दिवसभरच्या थकल्या शरीराला हुरूप मिळाला. रात्रभर असंच बसावं वाटलं.

घरघरत पण हलकं हसत मायेच्या ओलाव्याने बाप त्याला शब्दांनी गोंजारू लागला. बाप जवान असताना तेव्हा तरणी असलेली म्हातारी नि तिची सासू कशा एकदा गाव गोळा करून कचाकचा भांडल्या होत्या नि परत दुसर्‍या दिवशी गळ्यात गळा घालून नि एकमेकाची फळी सावरत गावाला शिव्या देऊ लागल्या- त्याची गोष्ट सांगू लागल्या. बापाच्या गोष्टीला हुंकार भरत तोही खुसखुसू लागला.

मघाशी जळत असलेले घसे आता मधाचे झाले. बंद पडलेली डोकी द्वाड कार्ट्यागत बागडू लागली. मघाशी झुडूपाआड रोगट दिसणारा चंद्र चांगला डोकीवर येऊन लखलखू लागला नि स्तब्ध झालेलं वारं चाल मिळाल्यागत भिरभिरत फटी-वळचणींतून कानाशी गुज करत जोजवू लागलं.

***
***

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users