आयाळ असलेला वाघ ! - १

Submitted by स्पार्टाकस on 6 December, 2013 - 23:41

शिकार कथा सांगणं ही एक कला आहे. ऐकणा-याची किंवा वाचणा-याची उत्कंठा शेवटपर्यंत टिकवून ठेवणं हे शिका-याचं प्रमुख उद्दीष्ट असतं. शिकारीच्या प्रत्येक लहानसहान गोष्टीची आणि आलेल्या अपयशाची तो उजळणी करत राहीला तर ते कंटाळवाणं च-हाट होण्याची शक्यता असते. आलेल्या अपयशाचा भाग वगळला तर प्रत्येक शिकार - वाघाची असो वा चित्त्याची - हा काही दिवसांचा आटपणारा आणि हमखास यशस्वी होणारा साधा सऱळ मामला असतो अशी समजून होण्याची दाट शक्यता असते.

प्रत्यक्षात मात्र परिस्थीती बरोबर उलट असते. अनेकवेळा शिका-याला पराभवाचं तोंड पाहवं लागतं. काही ना काही कारणाने अपयशाचा सामना करावा लागतो. वाघाच्या किंवा चित्त्याच्या मागावर जाताना अनेक शारिरीक आणि मानसीक तणावांचा सामना करावा लागतो. शिका-याने कितीही प्रयत्न केले तरी अनेकदा महिन्या महिन्यात जनावराची गाठ पडत नाही. कधी कधी एखाद्या जनावराला गाठण्यास वर्षानुवर्ष लागतात. इतकं असूनही गाठ पडल्यावर हमखास शिकार पदरात पडण्याची शाश्वती नसते.

या वाघाच्या शिकारीसाठी मी पाच वर्षे प्रयत्न करत होतो. अर्थात सलग पाच वर्षे मी त्याच्या मागावर नव्हतो. माझ्या व्यतिरिक्त मुंबई आणि बंगलोर इथले अनेक शिकारी आणि परिसरातले जमीनदार त्याला गाठण्याच्या प्रयत्नात होते. पण या बिलंदर वाघाने पाच वर्षे सगळ्यांना गुंगारा देण्यात यश मिळवलं होतं.

या वाघाच्या मानेभोवती आणि कानांच्या मागे चित्रविचित्र पध्द्तीने केस वाढलेले होते, त्यामुळे वाघाचं कपाळ आणि हनुवटी संपूर्णपणे झाकली जात होती. या वाढलेल्या केसांमुळे वाघांचं डोकं अथवा चेहरा प्रचंड मोठा दिसत असे. त्याला पाहिलेले सर्वजण त्याच्या डोक्याचं वर्णन करताना पसरलेल्या दोन्ही हातांच्या एका टोकापासून दुस-या टोकापर्तंत करत असत. अर्थात त्याला पाहिलेले फारच थोडेजण त्याचं वर्णन करण्यास जीवंत राहीले होते.

शिमोगा शहरापासून सोळा मैलांवर कुमसी हे गाव आहे. कुमसी पासून पुढे चार मैलांवर छोर्डी हे लहानसं खेडेगाव आहे. या गावाभोवतीच्या जंगलात या वाघोबाचा मुक्त संचार होता. छोर्डी पासून पुढे नऊ मैलांवर आनंदपुरम, आणि तिथून अकरा मैलांवर सागर हे तालुक्याचं शहर होतं आणि सागर पासून पुढे सोळा मैलांवर तलगुप्पा खेड्याच्या पुढे प्रसिध्द गिरसप्पा धबधबा. हा धबधबा जोग धबधबा म्हणूनही ओळखला जातो. शरावती नदी चार वेगवेगळ्या प्रवाहांत इथे स्वतःला सुमारे ९५० फूटांवरुन खाली झोकून देते. हे दृष्य अत्यंत प्रेक्षणीय असतं. या परिसरातल्या रौद्र गंभीर आणि उत्साही वातावरणामुळे अनेक कलाकारांना स्फूर्ती मिळालेली आहे.

जोग धबधब्याच्या परिसरात दोन डाकबंगले आहेत. शरावती नदी ही मुंबई व म्हैसूर प्रांतांची सीमारेषा. शरावतीच्या दक्षिण किना-यावर म्हैसूर प्रांतात असलेला नवीन डाकबंगला म्हैसूर बंगला म्हणून ओळखला जातो. पलीकडच्या किना-यावर असलेला मुंबई प्रांतातला डाकबंगला ओघानेच मुंबई बंगला म्हणून प्रसिध्द आहे. म्हैसूर बंगल्याच्या तुलनेत हा मुंबई बंगला ब-याचदा ओस पडलेला असतो. या दोन्ही बंगल्यात असलेल्या नोंदवहीत अनेकांनी या परिसरात आपल्याला सुचलेल्या कविता खरडून ठेवलेल्या आहेत ! काही कविता खरोखरच चांगल्या असल्या तरी काही मात्र अत्यंत हास्यास्पद आहेत.

अनेकदा वाघ नरभक्षक होण्यापूर्वी एका विशीष्ट चाकोरीतून जात असतो. गावाभोवतीच्या जंगलात शिकार करता-करता गुरं उचलण्यापासून सुरवात होते. भरपूर चा-यावर पोसलेल्या आणि नैसर्गीक भक्ष्यापेक्षा सहज रितीने मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या मेजवानीचा वाघाला मोह पडला नाही तरच नवल. जंगलातील जनावारांचा पाठलाग करण्यात शक्ती खर्च करण्यापेक्षा कमी श्रमांत चरबीने भरलेल्या गाई-गुरांची शिकार साधणं वाघाच्या दृष्टीने केव्हाही श्रेयस्कर.

या वाघानेही गावातल्या गुरांपासूनच सुरवात केली. छोर्डी गावातून गुरांचा फडशा पाडण्याचं सत्रं त्याने आरंभलं. वाघाचा त्रास प्रमाणाबाहेर वाढल्यावर गुराख्यांपैकी एकाने आपल्या जवळच्या शॉटगनने एका झाडाच्या बुंध्यामागून वाघावर गोळी झाडली. गोळी वाघाच्या उजव्या बरगडीजवळ चाटून गेली. त्यानंतर हा वाघ काही काळ गुप्त झाला. काही दिवसांनी परतून त्याने आनंदपुरमच्या आसपास राखीव जंगलात चरायला जाणारी गुरं उचलण्याचे उद्योग पुन्हा सुरू केले. अजूनही तो बिघडला नव्हता. कोणत्याही मनुष्यप्राण्यावर त्याने हल्ला चढवला नव्हता.

पुन्हा एकदा त्याचं अस्तित्वं गुरा़ख्यांच्या दृष्टीने तापदायक ठरलं होतं. या वेळी गुराख्यांपैकी एकाने पूर्वी मारून टाकलेल्या भक्ष्याकडे परतत असतांना माचाणावरून वाघावर गोळी झाडली. गोळी वाघाच्या पुढच्या पायावर लागली. वाघ पुन्हा एकदा जंगलात निघून गेला आणि गुराख्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. आता तो पुन्हा परतून येणार नाही अशी सर्वांची कल्पना झाली.

परंतु काही महिन्यांनी वाघ परतला तेव्हा त्याच्यात पूर्ण बदल झाला होता. वाघापासून आता गुरांना फारसा धोका उरलेला नव्हता, पण गुराख्यांचं जीवन मात्रं धोक्यात आलं होतं ! गोळीच्या जखमेमुळे या वाघाचं जंगलातल्या सर्वात भयंकर प्राण्यात रुपांतर झालं होतं. तो आता नरभक्षक झाला होता !

वाघाच्या पुढच्या उजव्या पायात घुसलेल्या गोळीने एका हाडाचा तुकडा उडवला होता. कालांतराने हाड जुळून आलं होतं पण तो पाय काहीसा आखूड आणि वाकडा झाला होता. पूर्वीप्रमाणे आवाज न करता सावजाच्या ऩकळत झडप घालणं त्याला अशक्यं होऊन बसलं होतं. झेप घेऊन भक्ष्याला लोळवणं आणि जीव जाईपर्यंत जखडूण ठेवणं त्याला आता जमत नव्हतं. गाई देखील अनेकदा त्याच्या तावडीतून निसटून गेल्या होत्या. कित्येकदा त्यांनी वाघाला पाठीवरून उडवून लावलं होतं.

उपासमारीमुळे वाघ अशक्त आणि खूप बारीक झाला होता. झुडूपांतून फिरणारे उंदीर देखील त्याला हुलकावणी देऊन निसटून जात असत ! भूक भागवण्यासाठी बेडूक-खेकडे पकडून तो खाऊ लागला. शेवटी निरुपायाने त्याला मनुष्यप्राण्याकडे मोहरा वळवावा लागला. त्याला टिपल्यानंतर त्याच्या तपासणी करताना त्याच्या पायातलं हे वैगुण्य माझ्या ध्यानात आलं होतं.

एके दिवशी एक माणूस बसने आनंदपुरम गावात उतरला आणि जंगलातल्या वाटेने तीन मैलांवरील आपल्या वस्तीवर निघाला. आदल्या दिवशी काही व्यवहारानिमित्त तो शिमोग्याला गेला होता आणि दुपारच्या जेवणासाठी आपण परत येऊ असं त्याने आपल्या पत्नीला सांगून ठेवलं होतं. मात्रं तो न आल्याने कोणाला काही विशेष वावगं वाटलं नाही. काही कामानिमीत्त तो शिमोग्यातच थांबला असावा अशी घरच्या मंडळींची समजूत झाली होती.

त्या दिवशी संध्याकाळी आणि दुस-याही दिवशी तो परतला नाही. तिस-या दिवशी त्याच्या मोठ्या मुलाने शिमोगा गाठून चौकशी केली. आपले वडील तीन दिवसांपूर्वीच गावी गेल्याचं त्याला कळल्यावर तो गावी परतला. कदाचीत व्यवहारानिमीत्त तो सागर इथे गेला असावा असा सर्वांनी तर्क केला.

पाच दिवस उलटल्यावरही त्याचा पत्ता न लागल्यावर मात्रं त्याच्या घरचे काळजीत पडले. दरोडेखोरांनी जंगलात गाठून त्याला लुटलं असावं आणि त्याचा घात केला असावा या भीतीने घरच्यांनी पोलीसात तक्रार नोंदवली. जंगलात तपास करताना पोलीसांना एक रबरी स्लीपर आढळून आली. घरच्या माणसांनी ती स्लीपर ओळखली. पोलीसांनी परिसरातल्या अनेक गुंडांना आणि दरोडेखोरांना अटक करून पोलीसांनी चौकशी केली परंतु काही निष्पन्न झालं नाही.

पोलीसांनी आता जंगलात अधीक बारकाईने शोध घेण्यास सुरवात केली. काही अंतरावर झुडूपांत अडकलेले कपड्यांचे तुकडे आणि रक्ताचे डाग आढळून आले. जवळच असलेल्या एका झ-याच्या काठावर वाघाच्या पंजांचे ठसेही आढळले होते. अर्थात त्या प्रदेशात अनेक वाघ होते आणि त्या माणसाच्या गायब होण्यात वाघाचा हात असल्याचा कोणताही पुरावा आढळून आलेला नव्हता. वाघाचे ठसे जवळपास आढळणं हा निव्वळ योगायोग असू शकत होता.

त्या माणसाच्या गायब होण्यामागचं रहस्यं कधीच उलगडलं नाही.

या घटनेनंतर सुमारे पंधरा दिवसांनी एक सायकलस्वार कुमसीहून छोर्डी गावात चालला होता. वाटेत नदीवरच्या पुलावरून तो जात असताना त्याला पुलाखाली नदीच्या काठी पाणी पिणारा वाघ दिसला. सायकल थांबवून तो त्या वाघाचं निरीक्षण करु लागला. पाणी पिऊन वाघ पलीकडच्या काठावर चढू लागला. आण़खीन सेकंदभरातच तो दिसेनासा झाला असता. तेवढ्यात सायकलस्वाराला वाघाची गंमत करण्याची लहर आली. त्याने तोंडाने शुक-शुक करून वाघाचं लक्षं वेधून घेतलं. वाघाने मागे वळून पाहीलं आणि जोरदार डरकाळी फोडली.

घाईघाईतच त्या माणसाने पुलावरचा आपला पाय काढला आणि सायकलीचं पॅड्ल मारायला सुरवात केली. शक्यं तितक्या वेगात तो छोर्डीला पोहोचला. गावातल्या लोकांना त्याने वाटेत आपल्यावर वाघाने हल्ला केल्याची आणि केवळ सुदैवानेच आपण बचावल्याची कथा तिखटमीठ लावून सांगीतली.

पुढचा महिनाभर काहीच घडलं नाही. छोर्डीपासून आनंदपुरमच्या दिशेने जाणा-या रस्त्यावर तुप्पूर हे लहानसं खेडं होतं. इथली एक बाई भल्या सकाळी आपल्या म्हशीला घेऊन नदीवर गेली होती. पाणी पिऊन झाल्यावर म्हैस पाण्यात डुंबत होती. गावातली दुसरी एक बाई पाणी भरण्यास नदीवर आली होती. पाणी भरून झाल्यावर म्हशीच्या मालकीणीशी दोन शब्दं बोलून ती वळली आणि पाण्याने भरलेलं भांडं घेऊन गावाकडे परतली. जेमतेम शंभर यार्ड ती चालून जाते न जाते तोच तिला मागून जोरदार किंकाळी ऐकू आली. मागे वळून पाहिलं तर तिच्या मैत्रीणीला तोंडात धरून जंगलात जाणारा वाघ दिसला !

हातातलं भांडं तसंच टाकून त्या बाईने गावात धूम ठोकली. गावक-यांनी माणसांची जमवाजमव केली आणि लाठ्या-काठ्या आणि कु-हाडी घेऊन ओरडा-आरडा करत ते वाघ गेल्याच्या दिशेला निघाले. काही अंतरावरच त्यांना त्या स्त्रीचे उरलेसुरले अवशेष दिसून आले.

ही फक्त सुरवात होती. वाघाने आता नियमीतपणे माणसं उचलण्यास सुरवात केली. कुमसी-छोर्डी-आनंदपुरम ते पार जोग धबधब्यापर्यंतच्या आणि त्यापलीकडच्याही परिसरात त्याने मानवी बळी घेतले. वाघाच्या शिकारीसाठी वनखात्याने जंगल मुक्त असल्याचं जाहीर केलं.

वनखात्याच्या आव्हानाला चांगला प्रतिसाद मिळाला. म्हैसूर तसेच मुंबई राज्यांतून अनेक उत्साही शिकारी वाघाच्या मागावर या परिसरात तळ ठोकून होते. त्यांनी अनेक महिने जिद्दीने प्रयत्न केले, पण वाघाने सर्वांना झुकांडी देत माणसं मारण्याचं आपलं काम अव्याहतपणे सुरुच ठेवलं. हा वाघ आमिष म्हणून बांधण्यात आलेल्या एकाही जनावराला तोंड लावत नव्हता.

जॅक हौटन नावाचा माझा एक मित्र होता. सुमारे साडेसहा फूट उंच आणि चांगला जाड-जूड असलेला जॅक आम्हां मित्रमंडळींत 'लॉफ्टी' म्हणून प्रसिध्द होता. त्याने या वाघाला गाठण्याचा बेत केला आणि मला बोलावणं पाठवलं. वाघ नरभक्षक झाल्यानंतर सुमारे वर्षाभराने आम्ही त्याच्या मागावर निघालो होतो.

माझ्याजवळ जेमतेम आठवड्याची रजा शिल्लक होती. आम्ही त्याच्या कारने बंगलोरहून निघालो. आठवड्याभराने मी रेल्वेने बंगलोरला परतणार होतो. लॉफ्टी महिनाभर तिथे राहणार होता. शिमोगा गाठून आम्ही तिथल्या वनाधिका-याची गाठ घेतली. त्याच्याकडून आम्हांला या वाघाच्या बळींची आणि बळींच्या जागांची तारीखवार माहीती मिळवायची होती.

नरभक्षक वाघ नेहमी एका विशीष्ट परिसरातच बळी घेत असतो. त्यामुळे त्याच्या बळींची नकाशावर तारीखवार नोंदणी करून त्याच्या भ्रमंतीचा मार्ग निश्चीत करणं फारसं कठीण नसतं. वाघाचा पुढील हालचालीचा यावरून अंदाज करता येऊ शकतो. वाघ कुमसी पासून छोर्डी - आनंदपुरम ते पार शरावतीच्या काठावर जोग धबधब्यापर्यंतच्या जंगलात माणसं उचलत असल्याचं आमच्या ध्यानात आलं.

हा प्रदेश बराच विस्तीर्ण होता. घनदाट जंगल या भागात पसरलेलं होतं. मधून मधून लहानमोठी खेडी विखुरलेली होती. जवळपास सर्वच गावातल्या गुराख्यांचा गुरांना चरण्यासाठी जंगलात नेण्याचा शिरस्ता होता. त्यापैकी शेकड्याने जनावरं वाघ आणि चित्ते यांना बळी पडतात. नरभक्षकानेही यापैकी काही जनावरांचा फडशा पाडला असण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. निव्वळ मानवी मांसावर इतके दिवस तग धरून राहणं अशक्यं होतं. गावक-यांच्या मत मात्रं आमच्या बरोबर उलट होतं. त्यांच्या म्हणण्यानुसार हा वाघ पाळीव जनावरांकडे ढूंकून पाहत नव्हता.

लॉफ्टीने तुप्पूरच्या डाकबंगल्यात मुक्काम टाकला. हा टुमदार डाकबंगला रस्त्यापासून सुमारे दोनशे यार्ड जंगलाच्या अंतर्भागात आहे. हा सर्व प्रदेश शिका-यांच्या दृष्टीने स्वर्ग होता. हरणांचे अनेक कळप इथे होते. त्या वर्षी तर काहींच्या शिंगांची विक्रमी वाढ झालेली होती. कित्येक डौलदार सांबरंही आमच्या नजरेस पडली होती.

लॉफ्टीने दोन वयात आलेल्या म्हशी आणि एक म्हातारा बैल अशी तीन जनावरं विकत घेतली. दोनपैकी एक म्हैस सायकलस्वाराने वाघ पाहिला होता त्या जागी आणि दुसरी म्हैस आनंदपुरमहून येणारा तो माणूस ज्या जागी गायब झाला होता त्या वाटेवर बांधली. म्हातारा बैल तुप्पूरच्या त्या बाईचा बळी गेला होता त्या जागी बांधण्यात आला. आणखी दोन जनावरं आम्ही जोग धबधब्याच्या परिसरात शरावतीच्या दोन्ही तीरांवर बांधली. आलटून-पालटून मुंबई आणि तुप्पूर डाकबंगल्यात राहयचं आणि वाघाने एखादं जनावर उचललं तर त्यासाठी माचाण बांधून बसायचं अशी आमची योजना ठरली.

माझ्या अंदाजानुसार वाघ त्या वेळेला सागर आणि आनंदपुरमच्या दरम्यानच्या जंगलात असणार होता. तिस-या दिवशी मी स्वतः एक म्हैस विकत घेतली आणि दोन्ही गावांच्या मधोमध रस्त्यापासून सुमारे फर्लांगभर अंतरावर जंगलात बांधून ठेवली.

त्या रात्री आम्ही मुंबई बंगल्यावर मुक्काम केला. दुस-या दिवशी बंगल्याच्या परिसरातील दोन्ही जनावरं सुखरुप होती. तुप्पूर कडे जाताना वाटेत मी बांधलेली म्हैस वाघाने मारल्याचं आमच्या निदर्शनास आलं. लॉफ्टी अत्यंत खिलाडूवृत्तीचा होता. म्हैस मी बांधलेली असल्याने वाघासाठी मी बसावं असा त्याने आग्रह धरला. त्यावरून आमच्यात थोडासा वाद देखील झाला. शेवटी आम्ही टॉस केला आणि लॉफ्टीने तो जिंकला.

लॉफ्टीला तिथे सोडून मी गावात आलो आणि माचाण बांधण्यासाठी सामान आणि माणसं घेऊन परतलो. आमचं जेवण चालू असताना त्या माणसांनी माचाण बांधलं. जेवण आटपल्यावर लॉफ्टीने कारच्या मागच्या सीटवर ताणून दिली. भरदिवसा रस्त्यावर वाघोबा येण्याची शक्यता नसल्याने आम्ही सुरक्षीत होतो.

चार-साडेचारच्या सुमाराला लॉफ्टी माचाणावर बसला. त्याच्याजवळ त्याची लाडकी ८ मिमीची माऊसर रायफल होती. दुस-या दिवशी पहाटे परतण्याचा बेत करून मी त्या माणसांसह तुप्पूर गाठलं. तुप्पूरला त्या माणसांना सोडून मी परतलो आणी आनंदपुरमच्या छोट्याश्या डाकबंगल्यात रात्रीपुरता मुकाम टाकला.

दुस्र-या दिवशी पहाटेच मी त्या झाडापाशी आलो. अगोदरच ठरल्याप्रमाणे कारचा हॉर्न मी एका विशीष्ट पध्द्तीने वाजवल्यावर लॉफ्टीने मला प्रतिसाद दिला. मी झाडाच्या दिशेने जात असतानाच अर्ध्या वाटेत त्याची गाठ पडली. रात्री अपेक्षेपेक्षा कितीतरी लवकर वाघ आल्याचं त्याने मला सांगीतलं. त्याने अर्थातर वाघाला गोळी घातली होती.

मी त्याचं अभिनंदन केलं. लॉफ्टीचा उत्साह आणि आनंद नुसता उतू जात होता. उत्साहाच्या भरात त्याची अखंड बडबड सुरू होती. मी त्याच्याबरोबर त्याने मारलेला वाघ पाहण्यास गेलो. तो एक मोठा आणि रुबाबदार नर वाघ होता. त्याच्या देहावरचे मोठे पट्टे चमकदार दिसत होते. पण... पण दुर्दैवाने त्या वाघाच्या मानेभोवती केस नव्हते ! सरकारी वृत्तपत्रांत स्प्ष्टपणे नमूद केलेल्या वाघाच्या मानेभोवती असलेल्या आयाळीचा तिथे मागमूसही नव्हता. तो नरभक्षक नव्हता ! अर्थात लॉफ्टीच्या उत्साहावर आणि आनंदावर विरजण टाकणारी ती बातमी त्याला सांगण्याची माझी छाती झाली नाही.

मी मनःपूर्वक त्याचं अभिनंदन केलं आणि त्याला तिथेच सोडून वाघाला वाहून नेण्यासाठी माणसं आणि सामुग्री आणण्यासाठी तुप्पूर गाठलं. तुप्पूरहून आणलेल्या माणसांच्या मदतीने आम्ही वाघाला कारच्या बॉनेटवर बांधलं. वाघाला बॉनेटवर बांधल्याने रस्ता जवळ्जवळ दिसत नव्हता त्यामुळे लॉफ्टीला कार चालवणं कठीण जात होतं.

आनंदपुरमला जाताना वाटेत वाघाला पाहण्यासाठी गावकरी गोळा झाले. इथेच लॉफ्टीच्या भ्रमाचा भोपळा फुटला.

" साहेब, हा नरभक्षक नाही ! " वाघाला पाहताक्षणीच गावकरी उद्गारले.
" नरभक्षक नाही ? " लॉफ्टीने थोड्याश्या घुश्श्यातच विचारलं, " हा नरभक्षकच आहे ! मी याची शिकार केली आहे ! हा नरभक्षक नाही हे तुम्ही कशाच्या आधारे म्हणता ? "
" पण साहेब, या वाघाला आयाळ कुठे आहे ? " गावक-यांनी सवाल केला.
" आयाळ.." क्षणभर लॉफ्टी गोंधळून गेला आणि एकदम सगळा प्रकार ध्यानात आल्यावर त्याच्या चेह-यावर वेदनेची झाक चमकून गेली.
" आयाळीच्या बाबतीत मी पूर्णपणे विसरून गेलो होतो. मी चुकून दुसराच वाघ मारला " तो खेदाने उद्गारला. माझ्या कडे पाहून त्याने विचारलं, " तुझ्या लक्षात आलं होतं आयाळीबद्द्ल ? तू मला आधीच का बोलला नाहीस ? "
" मला सकाळीच कल्पना आली होती लॉफ्टी " मी कबूली दिली, " पण तुला सांगण्याची माझी हिंमत झाली नाही. अर्थात जे काही झालं त्यात तुझी काहीच चूक नाही. वाघ रात्रीच्या अंधारात आला होता आणि टॉर्चच्या प्रकाशात तुला आयाळ दिसणं शक्यंच नव्हतं. तू मारलेला वाघही चांगला मोठा आहे. सो चिअर अप! "

पण माझ्या बोलण्याचा काही उपयोग झाला नाही. आपण चुकीचा वाघ मारल्याचं लॉफ्टीच्या इतकं मनाला लागलं होतं की डाकबंगल्यावर वाघाचं कातडं सोडवण्याच्या कामातही त्याने रस दाखवला नाही. कातडं सोडवताना वाघाच्या दातांकडे आणि धारदार नखांकडे त्याचं लक्षं वेधण्याच्या माझ्या प्रयत्नांकडेही त्याने साफ दुर्लक्षं केलं. त्याचा उत्साह वाढविण्याच्या माझ्या कोणत्याही प्रयत्नांना त्याने दाद दिली नाही.
" तो नरभक्षक नाही हे मला समजलं असतं तर मी त्याला मारलं नसतं " एवढेच उद्गार त्याने काढले.
आपलं अपयश झटकून टाकण्याऐवजी लॉफ्टी निराशेच्या गर्तेत आणखीनच बुडत गेला. दुस-या दिवशी सकाळपर्यंत वाघाची काही खबर आली नाही किंवा एकाही आमिषाचा बळी पडला नाही तर बंगलोरला परतण्याचा त्याने निश्चय केला !

दुस-या दिवशी सकाळी लवकर उठून आम्ही तुप्पूर परिसरातल्या तीनही आमिषांची तपासणी केली. दोन्ही म्हशी आणि म्हातारा बैल सुरक्षीत होता. जोग धबधब्याच्या परिसरातील दोन्ही म्हशीदेखील सुखरूप होत्या. पूर्वी ठरल्याप्रमाणे आम्ही सर्व जनावरं त्यांच्या मूळ मालकांना पावपट किंमतीत विकून टाकली आणि त्या दुपारी बंगलोरला परतलो.

काही महीने वाघाची काहीच बातमी आली नाही. जवळपास वर्षभराने वाघाने एका मजूराला कुमसीपासून जवळच रस्त्याच्या कडेलाच खाऊन टाकल्याची बातमी आली. शिमोग्याच्या वनाधिका-यांना पत्र पाठवून मी मला वाघाच्या बातम्या तारेने कळवायची विनंती केली.

म्हैसूर प्रांतातल्या इतर जिल्ह्यांच्या तुलनेने शिमोगा जिल्ह्यातल्या जंगलातल्या प्रदेशांत अनेक लहानमोठी खेडी वसलेली आहेत. इतर जिल्ह्यांच्या तुलनेने ब-याच प्रमाणात इथे शेती केली जाते. या भागातले रस्ते आणि पायवाटांवरही सतत वाहतूक सुरू असते. मात्र या सगळ्यामुळे वाघाचा संचार एखाद्या विशिष्ट भागापुरता मर्यादीत न राहता तो कुठेही प्रगटण्याची शक्यता बरीच वाढली होती. विशेष म्हणजे या भागातल्या जंगलात कोणत्याही आदीवासी जमातीची वस्ती नाही. जंगलात काम करणारे मजूर मुख्यतः मलबार भागातून आलेले मल्याळी भाषीक आहेत. त्यांच्यानंतर क्रमांक लागतो तो लंबानी लोकांचा.

लंबानी ही जिप्सी जमात आहे. लंबानी बरेचसे युरोपातल्या रोमन भटक्या जमातीतल्या लोकांसारखे दिसतात. लंबानी स्त्रिया त्यांच्या उजळ रंगामुळे आणि वेशभूषेमुळे इतर गावकरी स्त्रियांपेक्षा चटकन ओळखू येतात. कोपरापर्यंत घातलेल्या बांगड्या, गळ्यात अनेकरंगी मण्यांच्या माळा, कानात आणि नाकात वेगवेगळ्या प्रक्रारच्या रिंगा आणि हातापायांच्या बोटांत अनेक अंगठ्या असा त्यांचा थाट असतो. लंबानी स्त्रिया साडी न नेसता घागरा-चोळी घालतात आणि शालीसारखे वस्त्र खांद्यांवरून घेतात. लंबानी पुरुष मात्र बरेचसे त्या भागातल्या कानडी गावक-यांप्रमाणेच मळकट शर्ट आणि हाफ पँट किंवा धोतर असा पेहराव करतात.

भारतात आढळणा-या जिप्सींचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे, जिप्सी पुरूष आणि स्त्रिया या कोणत्याही बाबतीत समान दिसत नाहीत. स्त्रिया अतिशय सुरेख आणि आखीव-रेखीव तर पुरुष अगदीच ओबडधोबड !

लंबानी जिप्सींचं एक वैशिष्ट्य म्हणजे पिढ्यान पिढ्या त्यांनी आपल्या जमातीच्या चालीरीती आणि वेगळेपणा जपलेला आहे. अर्थात याचं संपूर्ण श्रेय लंबानी स्त्रियांना आहे. लंबानी पुरुष हे तसे आळशीच असतात. ही भटकी जमात जास्त दिवस एका जागी राहत नाही. गावात न राहता गावाबाहेर गवताची स्वतंत्र पालं बांधून राहण्याकडेच त्यांचा कल असतो. जनावरांचा माग काढण्यात ते तितकेसे हुशार नसले तरीही गावक-यांच्या तुलनेत बरेच प्रामाणिक आणि सहकार्यास तत्पर असतात.

म्हैसूर राज्याच्या पश्चिम भागातले बागाईतदार आणि सधन शेतकरी-यांच्या कॉफी आणि संत्र्यांच्या मळयातील मजुरांत मुख्य भरणा या लंबानींचा मुख्यतः लंबानी स्त्रियांचा असतो. उरलेले मजूर हे पश्चिम किना-यावरचे मल्याळी भाषिक. मात्र हे मल्याळी लोक अत्यंत बेभरवशाचे असतात. मालकाकडून आगाऊ पैशांची उचल करणं आणि पैसे पदरात पडल्यावर गावी पसार होणं यात मल्याळी लोकांचा हातखंडा असतो. त्यामुळे तुलनेने प्रामाणीक लंबानींवरच शेतकरी अवलंबून असतात. लंबानीं स्त्रिया जास्तकरून कामाच्या बदल्यात पैशापेक्षा अन्नधान्याची मागणी करतात. पैसे मिळाले तर ते बहुतांश वेळी दारुमध्येच उडवले जातात. हे त्याचं कारण असावं.

मी वर उल्लेख केल्याप्रमाणे जंगलात जनावरांचा माग काढण्याच्या दृष्टीने मात्रं या लंबानी जिप्सींचा फारसा उपयोग नसतो. पुजारी, शोलगा, करुंबा आणि चेंचू आदीवासी जंगली जनावरांचे माग काढण्यात एकदम पटाईत असतात. या वाघाच्या मागावर जाताना मात्र मला माझा अनुभव आणि जंगलाचं ज्ञान यावरच मुख्यतः विसंबून राहवं लागणार होतं.
सुमारे महीन्याभराने मला शिमोग्याच्या वनाधिका-याचं पत्रं आलं. कुमसी आणि छोर्डीच्या दरम्यान रस्त्यापासून जवळच सागाच्या झाडाची पानं गोळा करणा-या एका स्त्रीचा वाघाने बळी घेतला होता.

सागाची पानं आकाराने मोठी आणि जाड असतात. ती सहसा फाटत नाहीत. दक्षिण भारतातील ब-याचशा होटेलांमधून त्यांच्यापासून बनवलेल्या पत्रावळ्यांचा वापर केला जातो. चार्-पाच पानं एकत्र करून गवताच्या काडीने सांधून अथवा शिवून अशा पत्रावळी तयार केल्या जातात. सर्व दक्षिण भारतातून अशा पत्रावळींना प्रचंड मागणी असते. वनखात्याकडून वेळोवेळी जंगलातील पट्ट्यांचा लिलाव केला जातो. लिलावात पट्टे भाड्याने घेणारे ठेकेदार पानं गोळा करण्यासाठी स्त्रियांची नेमणूक करतात. हजार पानांच्या मोबदल्यात त्यांना विशीष्ट पैसे दिले जातात.

बळी गेलेली दुर्दैवी स्त्री देखील सागाची पानं गोळा करणा-यांपैकीच होती. इतर स्त्रियांच्या बरोबरीने ती पानं गोळा करण्यात मग्न असतानाच एका झाडामागून अचानक झडप घालून वाघाने तिला उचललं आणि तो जंगलात पसार झाला. बाकीच्या सर्व स्त्रियांनी गावात धूम ठोकली. माणसांची आणि काठ्या-कु-हाडींची जमवाजमव करुन गावकरी त्या ठिकाणी परतले. थोडावेळ शोध घेतल्यावर काही अंतरावर तिचं अर्धवट खाल्लेलं कलेवर दिसून आलं.

पत्राच्या शेवटी वनाधिका-याने मला या वाघाच्या शिकारीसाठी येण्याची विनंती केली होती. माझी मुख्य समस्या रजेची होती. या वाघाचा त्या विभागात शोध घेणं हे मोठं कठीण काम होतं. त्यासाठी कित्येक दिवस कदाचीत काही महिनेदेखील लागणार होते. या सगळ्याचा विचार करून मी वनाधिका-याच्या नावे एक लांबलचक पत्रं लिहीलं. रजेच्या कारणामुळे नरभक्षकाच्या मागावर जाण्यात मी असमर्थता प्रगट केली होती. जंगलात शक्यतो किमान तीन-चार जणांच्या घोळक्याने आणि शस्त्रसज्ज होऊन जावं अशी त्या भागातील सर्व वनरक्षक आणि पोलीसांमार्फत गावक-यांना सावधगीरीची सूचना द्यावी. शक्यतो मुख्य रस्त्याचा वापर आणि तो देखील दिवसा उजेडीच करावा. जंगलात काम करणा-या मजूरांनी आणि गुराख्यांनी जंगलात जाणं तूर्तास रहीत करावं अशीही मी सूचना दिली होती. वाघाला आमिष म्हणून वनखात्याने अर्धा डझन जनावरं विविध ठिकाणी बांधावीत. मानवी बळी गेल्यास त्याच्या नातेवाईकांना प्रेताचा अंत्यसंस्कार करण्यापासून परवृत्त करण्याची आणि तारेने मला कळविण्याची मी विनंती केली होती. एखाद्या जनावराची वाघाने शिकार केल्यास मी पोहोचेपर्यंत त्याचे अवशेष हलविण्यात येऊ नयेत असंही मी पत्रात नमूद केलं होतं.

चार दिवसांनी वनाधिका-याचं उत्तर आलं. मी येऊ शकत नसल्यामुळे त्याने खेद व्यक्त केला होता. एवढ्या मोठ्या प्रदेशात राहणा-या प्रत्येक गावक-यापर्यंत माझी सूचना पोहोचवणं शक्यं नव्हतं आणि बळी गेलेल्या कोणत्याही माणसाचे नातेवाईक त्याचा मृतदेह आमिष म्हणून वापरून देणार नाहीत असंही त्याने कळवलं होतं. वनखात्याच्या नियमांत वाघासाठी जनावरं बांधण्यासाठी खर्च करण्याची कोणतीही तरतूद नसल्याचंही त्याने स्पष्टं केलं होतं.

अर्थत मला याच उत्तराची अपेक्षा होती ! वनाधिका-याच्या विनंतीनुसार जाणं शक्य नसल्याने माझी बाजू मांडण्यासाठीच मी ते पत्रं पाठवलं होतं.

काही आठवडे शांततेत गेले. आणि एक दिवस मला वनाधिका-याची तार आली. छोर्डीजवळच्या कराडीबेट्टा व्याघ्र अभयारण्याला लागूनच असलेल्या मोठ्या रस्त्यावरच वाघाने लाकूडतोड्या आणि त्याचा तरूण मुलगा या दोघांचा बळी घेतला होता. लाकूडतोड्याचं प्रेत रस्त्यावरच टाकून मुलाला घेऊन वाघ जंगलात निघून गेला होता.

( मूळ कथा : केनेथ अँडरसन )

( क्रमश: )

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त चालू आहे. भाषांतर एकदम चपखल आहे.

जाणार्‍या, येणार्‍या इत्यादी शब्दांमधला 'र्‍या' लिहिण्यासाठी Ryaa असं टाईप करा. Happy

Paravach belgaum madhe eka vaghachi shikar keli ggeli ..... Kahi anshi ashyach prakare