पृथ्वी वृत्त : ‘’ नभ निळे ‘’

Submitted by भारती.. on 6 December, 2013 - 11:36

पृथ्वी वृत्त : ‘’ नभ निळे ‘’
(लगाल ललगा लगा लललगा लगागा लगा )
( वृत्तलक्षण -ज,स,ज,स,य,ल,ग -'अधी ज स ज त्यापुढे, स य ल गीच पृथ्वी वसे ', यति ८ वर )

विमान उचले जरा जडशिळा रुपेरी कुशी
गती भरत यंत्रणा थरथरे अवाढव्यशी
सहास्य परिचारिका सुवसना करे आर्जवा
‘’सुटे धरणिबंध हा पथिकमित्रहो सज्ज व्हा’’

जसे हळुहळू चढे वर विमान वेगे उठे
घरे नगर कार्यक्षेत्र पथजाल मागे सुटे
क्षणैक नजरेपुढे झरझरा नकाशा सरे
विशाल तिमिरावरी विरळ रोषणाई उरे

उडे शकट एकटा नवनव्या प्रदेशांवरी
किती प्रहर नेणिवेत झरती उदासीपरी
अधांतरच आपले घर नवे मनाला गमे
गवाक्ष पडद्यामधे लपत शर्वरी आक्रमे

सरे समय नाकळे असत नीज की जागृती
तशात परिचारिका दिसत भास-शी आकृती
नसेच पण भास तो, हसत ती करे स्वागता
‘’उठा दिवस हा शुभंकर असो तुम्हा सर्वथा ‘’

गवाक्ष उजळे दिसे उगवती धरे लालिमा
अपार नभपोकळीत झळके नवा नीलिमा
कुठे पुसट पुंजके ढग असे वहाती सुखे
असा दिन महोत्सवी नयन पाहती कौतुके

नभात नभ गुंतले नभ नभामध्ये लोपले
नभास नभ भेटले नभ नभावरी लोटले
निळे नितळ मोकळे झळकते नभाचे तळे
किती उजळ कोवळे चमकती दिशांचे मळे

प्रवास असती किती कुठुनसे कुठे जायचे
मला निखळ वैभवी क्षण असे सवे न्यायचे
असो कलह तल्खली गलबला जिवाभोवती
परंतु एकट क्षणी नभ निळे मला सोबती ..

- भारती बिर्जे डिग्गीकर

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नभात नभ गुंतले नभ नभामध्ये लोपले
नभास नभ भेटले नभ नभावरी लोटले
निळे नितळ मोकळे झळकते नभाचे तळे
किती उजळ कोवळे चमकती दिशांचे मळ>>>>>> मस्त

__________/\____________

पुन्हा तेच म्हणायचे आहे ..."महाकवयित्री आहात !!!!"

सुरेख..
एका सुरेख flight चा भावानुभव दीलास दीदी.
आणि आकाशाशी नाते सांगणार्‍या या नितान्त सुन्दर शब्द प्रवसासठी तू पृथ्वी वृत्त वापरलयस.
व्वा.. __/\__

काय आणि किती लिहावे भारती तुमच्या या वृत्तबद्ध काव्याविषयी ? आमचे भाग्य थोर की तुमच्यासारख्या लखलखत्या प्रतिभाशाली कवयित्रीसमवेत मायबोलीवर ओळख झाली आणि त्यानिमित्ताने मुक्तछंदाच्या या जमान्यात आजही वृत्तांच्या नियमांना समोर ठेवून त्याना कवितारुप देणारे कुणीतरी इथे आहे हे एक मोठे विशेष आहे.

"नभात नभ गुंतले नभ नभामध्ये लोपले
नभास नभ भेटले नभ नभावरी लोटले
निळे नितळ मोकळे झळकते नभाचे तळे
किती उजळ कोवळे चमकती दिशांचे मळे..."

~ वेडच लागले हे कडवे वारंवार वाचताना....गुंतून गेलो मी ह्या नभनाद भ्रमात...."निळे नितळ" प्रतिमा इतकी प्रभावी आहे की त्यापुढे नभाचे तळे असणार हे मी गृहित धरले होते.

उपेन्द्रवज्रा आणि इंद्रवज्रा यांची महती वर्णन करणार्‍या एकदोन रचना अशाच अवांतर वाचनात आल्या होत्या. त्यावेळी मंदारमाला आणि पृथ्वी या वृत्तांचाही आलेला पुसटसा उल्लेख स्मरणी आहे. पृथ्वीला 'सुवृत्त बहु चांगले' असेही त्या पुस्तकात म्हटल्याचे आठवते...पक्के नाही, तरीही गौरविले आहे जरूर.... तुमची ही कविता 'बहु चांगली' याच गटात येईल हे मात्र सोळा आणे सत्य.

क्लासिक शब्द, क्लासिक वृत्त आणि क्लासिक कवयित्री. दिवसाची प्रसन्न सुरुवात झाली. तुमच्या कवितेचे नभांगण असेच नितळ निळे राहो ही शुभेच्छा.

वाहवा!! मस्त!! पुन्हा पुन्हा वाचावी अशी काव्यरचना!

विमानप्रवासाचे इतके वेगळे आणि सुंदर वर्णन माझ्या वाचनात तरी नाही!

नभात नभ गुंतले नभ नभामध्ये लोपले
नभास नभ भेटले नभ नभावरी लोटले
निळे नितळ मोकळे झळकते नभाचे तळे
किती उजळ कोवळे चमकती दिशांचे मळ>>>>>> किती सुंदर!!

"नभात नभ गुंतले नभ नभामध्ये लोपले
नभास नभ भेटले नभ नभावरी लोटले
निळे नितळ मोकळे झळकते नभाचे तळे
किती उजळ कोवळे चमकती दिशांचे मळे..."

~ वेडच लागले हे कडवे वारंवार वाचताना....गुंतून गेलो मी ह्या नभनाद भ्रमात...."निळे नितळ" प्रतिमा इतकी प्रभावी >>>>>> अग्दी अग्दी ......

हा आगळा वेगळा विमानप्रवास घडवल्याबद्दल मनापासून धन्यवाद ......

आभार सर्वांचे . माझ्या ज्या कवितेवरच्या आपलेपणातून हे प्रतिसाद आलेत , ती काव्याभिव्यक्ती निरनिराळ्या वृत्तात अनुभवून पाहते आहे .त्यातलेच हे 'सुवृत्त बहु चांगले' , आपल्या सर्वांच्या परिचयाची स्थिर, विचारमग्न , आशादायी लय असलेले पृथ्वी वृत्त. या वृत्तातून आकाशावर प्रेम करणे क्रमप्राप्त होते जणू ..

व्वा ! मस्त वाटलं वाचताना .... छानच.
विमानप्रवासाचे वर्णन आणि तेही अशा छान वृत्तात.... विमानाच्या सुखद प्रवासाचा मस्त फील आला.
शेवटून दुसर्‍या वृत्तातला अनुप्रास सुंदरच.

माझ्या मते, कविता केवळ वर्णात्मक न राहता शेवटच्या कडव्यात
ज्या विचारांवर सुंदर लॅंडिंग करते, ते सर्वात महत्वाचं वाटलं.
------------------------------------------------------------------------------------
फक्त काही थोड्या ओळींमधे यतिभंग असावा की काय असे वाटले.
किंवा मी उगाचच अडखळलो असेनही.
-------------------------------------------------------------------------------------
भारतीजी,
एक विनंती : अशा वृत्तांची माहिती देतांना लगावलीच्या आधी
गण आणि वृत्त लक्षणे सांगून ती लक्षात ठेवण्याची पारंपारिक ओळ उद्धृत केल्यास
त्या निमित्ताने वृत्ताची माहिती/उजळणी होईल. जसे -----
वृत्त : पृथ्वी
गण : ज स ज स य ल ग

लक्षात ठेवण्यासाठी : जया जसज त्यापुढे सयलगा हि ’पृथ्वी’ वदा

आभार पुनरेकवार Happy
उल्हासजी, यती आठव्या अक्षरावर आहे. यतीभंग मला वाटतं या रचनेत एखाद्या ओळीत आलाय
>>घरे नगर कार्यक्षेत्र पथजाल मागे सुटे >>

दुरुस्त केला नाही :), बाकी सूचनेप्रमाणे वृत्तलक्षण देत आहे .

भारती,
ज्या ज्या वेळी विमानात बसेन त्या त्या वेळी या ओळी आठवतील.
या अनुभवावर कविता असू शकते, अशी कल्पनाही केली नव्हती कधी मी.

नभात नभ गुंतले नभ नभामध्ये लोपले
नभास नभ भेटले नभ नभावरी लोटले
निळे नितळ मोकळे झळकते नभाचे तळे
किती उजळ कोवळे चमकती दिशांचे मळे

इतका सुंदर अनुप्रास! व्वा!

वृत्त इतके छान सांभाळले आहे. यासाठी साधना लागते!

कविता खूप आवडली! Happy

या वृत्तातली ती कविता होती ना...

'प्रियकर पक्ष्याचा बाण लागून मृत्यू होतो, आणि त्याची प्रिया शोक करते. .... शब्द आठवत नाहीत .... उठे धडपडे.. एवढे दोनच शब्द आठवतात!

क्लासिक !!! फार आवडली.

आठवी-नववीच्या मुलांना अभ्यासक्रमात लावलीच पाहिजे ही कविता असं वाटलं.
प्रत्यक्षात अनुभवलेला आगगाडीचा प्रवास आम्हाला जसा कवितेतून नव्याने भेटायचा तसंच अगदी सहज विमानप्रवास करणार्‍या आजच्या मुलांना तो अनुभव कवितेतून भेटुदे Happy

भारतीताई,

अतिशय सुंदर कविता आहे. प्रतिभेने ओतप्रोत भरलेली आहे. वर शरद म्हणालेत तशी तुमची साधना जाणवते. तसं पाहायला गेलं तर विमानप्रवासाचा अनुभव एकदम चाकोरीबद्ध (mundane) असतो. त्याचं एव्हढं सुरेख वर्णन करता येतं हेच मोठं नवल आहे.

तुमच्या चकित करणार्‍या प्रतिभेस मानाचा मुजरा! Happy

आ.न.,
-गा.पै.

मला हि एक ओल आथवते आहे, क्श्नोक्श् नि पदे उथे परि बले उथे बापदि
कअवितेबद्दल निश्ब्द !

< निळे नितळ मोकळे झळकते नभाचे तळे
किती उजळ कोवळे चमकती दिशांचे मळे>>

ह्या ओळीं मधील '''' ची आवर्तने अप्रतिम आहेत.शब्द,भाषा ह्यावर पक्की मांड असल्या शिवाय हे शक्य नाही..

.. अप्रतिम कविता..

क्षणो क्षणी पडे उठे परी बळे उडे बापडी
....................स्तिमित दृष्टीला झापडी

म्हणाल भुलली जगा विसरली प्रिया लेकरा
म्हणून अति संकटे उडत पातले मी घरा

लहानपणी शाळेत शिकलेली हि कविता मला इतकीच आठवते . उरलेल्या ओळी कोणी सांगू शकेल तर खूप आनद होईल . मला मायबोलीच्या कि बोर्ड वर लिहिता येत नाही म्हणून अभिप्राय नीट लिहिता येत नव्हता . कविता खूप खूप आवडली आणि लहानपणीच्या विश्वात घेऊन गेली .मनापासून अभिनंदन .

शिल्पा....

ही ती कविता..... "केवढे हे क्रौर्य !"

क्षणोक्षणी पडे, उठे, परि बळे, उडे बापडी,
चुके पथहि, येउनी स्तिमित दृष्टिला झापडी.
किती घळघळा गळे रुधिर कोमलांगातुनी,
तशीच निजकोटरा परत पातली पक्षिणी.

म्हणे निजशिशूंप्रती, अधिक बोलवेना मला,
तुम्हांस अजि अंतीचा कवळ एक मी आणला,
करा मधुर हा! चला, भरविते तुम्हा एकदा,
करी जतन यापुढे प्रभु पिता अनाथां सदा!

अहा! मधुर गाउनी रमविले सकाळी जना,
कृतघ्न मज मारतील नच ही मनी कल्पना,
तुम्हांस्तव मुखी सुखे धरुन घांस झाडावरी
क्षणैक बसले तो शिरे बाण माझ्या उरीं

निघुन नरजातिला रमविण्यांत गेले वय,
म्हणून वधिले मला! किती दया! कसा हा नय!
उदार बहु शूर हा नर खरोखरी जाहला
वधुनी मज पाखरा निरपराध की दुर्बला!

म्हणाल, भुलली जगा, विसरली प्रियां लेकरां
म्हणून अतिसंकटे उडत पातले मी घरा,
नसे लवहि उष्णता, नच कुशीत माझ्या शिरा,
स्मरा मजबरोबरी परि दयाघना खरा.

असो, रुधिर वाहुनी नच भिजो सुशय्या तरी
म्हणून तरुच्या तळी निजलि ती द्विजा भूवरी.
जिवंत बहु बोलकें किति सुरम्य ते उत्पल,
नरे धरुन नाशिले, खचित थोर बुध्दिबल.

मातीत ते पसरिले अतिरम्य पंख,
केले वरी उदर पांडुर निष्कलंक,
चंचू तशीच उघडी पद लांबवीले,
निष्प्राण देह पडला! श्रमही निमाले!

~ नारायण वामन टिळक

पृथ्वी वृत्तातीलच ही कविता आहे.

या अनुभवावर कविता असू शकते, अशी कल्पनाही केली नव्हती कधी मी.>>
अगदी अगदी दिनेशदा..

भारतीताई.... तुस्सी ग्रेट हो!

अभिजात मराठी कवितेची धुरा एकविसाव्या शतकात "भारती बिर्जे डिग्गीकर" ह्यांच्याकडे आहे असे म्हणतो.

हॅट्स ऑफ्फ, भारती ताई..!!

---------------------------------------

>>विजय दिनकर पाटील | 8 December, 2013 - 09:09 नवीन
अभिजात मराठी कवितेची धुरा एकविसाव्या शतकात "भारती बिर्जे डिग्गीकर" ह्यांच्याकडे आहे असे म्हणतो.<<

कोई शक़ ?

वैभवजी..... अहो त्यात थॅन्क्स कसले ? एका अभ्यासू सदस्याने त्या कवितेची आपुलकीने इथे चौकशी केली आणि नेमकी ती माझ्याकडे होती....तीच इथे दिली...इतकेच माझे काम.

बाकी या कवितेमुळे "भारती बिर्जे डिग्गीकर" हे नाव इथल्या सर्व साहित्यप्रेमीच्या मनी ज्या आदराने वसले आहे ते पाहून मला खूप संतोष होत आहे. त्या सर्वार्थाने पात्र आहेत.

अशोकजी खूप खूप धन्यवाद .गेले कित्येक दिवस अर्धवट आठवत असलेली कविता मनाला त्रास देत होती. तुम्ही दिलेली पूर्ण कविता वाचून खूप बरे वाटले . आणखी एक सांगायचे म्हणजे लहानपणी कविता शिकताना समजलेले पण हृदयाला न भिडलेले मानवाचे क्रौर्य आज डोळे ओलावून गेले .

Pages