लेखकाला लिखाणाची प्रचंड भूक लागलेली असते ....

Submitted by मी मी on 2 December, 2013 - 00:12

लेखकाला खरतर लिखाणाची प्रचंड भूक लागलेली असते लिहिणे सुचले नाही किंवा लिहायला मिळाले नाही कि उपासमारच झाल्यागत होते जणू.

जसे चवी चवीचे जेवणाचे प्रकार तसे अनेक विषयवार लिखाण पण त्यातल्या त्यात एखादा विषय जास्त चविष्ट लागतो चघळून चघळून चोथा होईपर्यंत चर्वण करत राहावा वाटतो.

काही विषय अतीच सुमार असतात, एखाद्या नावडत्या पदार्थासारखा… आपल्याला आवडत नाही म्हणून त्याकडे नजर हि फिरवू नये असं होतं, पण सणावाराला नाही का काही विशिष्ट पदार्थ करायचेच असतात आवडत नसतील तरी निदान नैवेद्याला म्हणून तरी …. तसंच मग या विषयांच हि होतं, एखाद्या प्रसंगानुरूप, परिस्थिती घडून आली कि ह्या विषयाला हात घालावाच लागतो. निदान नैवेद्यासारख्या थोड्या पुड्या सोडून तरी मांडाव्या लागतात.

काही पदार्थ चवीला आवडतात म्हणून खायचे काही प्रकृतीला चांगले म्हणून …
लेखकालाही त्याच्या लिखाणाच्या बाबतीत अशीच विभागणी करावी लागते.
काही विषय अत्यंत आवडीचे त्यावर लिहायचे पण काही विषय समाजाला पोषक म्हणून हाताळायचे …

कधी बदल म्हणून मग पाणीपुरी, आलूचाट सारखा कधीतरी न वयाचा न प्रतिष्ठेचा विचार करता चाखायचा प्रेम, रोमान्स, लहानपण किंवा खट्याळपणा… हे त्यातलेच काही विषय.

एकंदरीत काय तर शेवटी सगळं काही भुकेवर येउन थांबतं …. जेवढी आणि जशी भूक तसे तसे विषयाच्या पक्वान्नाचे पान वाढले जाते …. आपण आपल्या भुकेप्रमाणे त्यातले उचलून चाखत राहायचे.

म्हणूनच म्हणाले …. लेखकाला खरतर लिखाणाची प्रचंड भूक लागलेली असते लिहिणे सुचले नाही किंवा लिहायला मिळाले नाही कि उपासमारच झाल्यागत होत राहते. मग यातून वेगवेगळी आजारही संभवतात. यावरचे उपचार वेगळे आणि उपचाराच्या पद्धतीही वेगळ्या असतात.…तेव्हा लेखकांनी लिहित राहावे तब्बेतीची काळजी घेत राहावे ….

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users