अन्या - ६

Submitted by बेफ़िकीर on 1 December, 2013 - 06:42

करायला जावे एक अन भलतेच व्हावे तसे झाले होते.

मोजून पंचवीस दिवस झाले तेव्हा अन्याच्या डोक्यात प्रकाश पडला. बुवा, महाराज होणे ही गंमत नाही. एक मोठी जबाबदारी आहे. ती पेलावी लागणार आहे. आता आपण इतके पुढे आलो आहोत की मागे वळून सगळ्यांना सांगणे की बाबांनो मी फुकट खायला मिळावे म्हणून हे उपद्व्याप केले तर आपण जिवंत गाडले जाऊ.

या काळात तर्‍हेतर्‍हेचे प्रकार घडले. बायाबापड्या उगाच येताजाता झोपडीलाच नमस्कार करू लागल्या. उटणी अन् साबण लावून आंघोळी झडू लागल्या. त्याही दिवसातून तीनतीनदा! आता अंग थोडेसे मळले तरी स्वतःची घाण वाटू लागली होती. नियमीत आणि अतिरिक्त खाणे दिमतीला असल्याने दोन तास जरी खायला मिळाले नाही तरी खवखव सुटू लागली होती. अंगावर बाळसे आल्यासारखे वाटू लागले होते. जवळपास थोडे पैसे साठू लागले होते. पवार आणि इग्याला हिशोब विचारावा असे वाटू लागले होते. आजवर हिशोबाचा प्रश्नच नव्हता कारण स्वतःजवळ स्वतःचे असे काहीच नसायचे आणि फक्त दुसर्‍याजवळचे चोरायचे असायचे. आता स्वतःच्या ढोंगाला भुलून तालुकेकर नाणी ठेवत आहेत आणि ती पवार आणि इग्या स्वतःच्या कंबरेला खोवत आहेत हे दिसू लागले होते. ही माया आपण जमवायची तर हे जमवतात हे डोक्यात घुसू लागले होते. मनात विष पेरले जाऊ लागले होते. पहाटे झोपडी झाडायला येणार्‍या सवाष्णीची नितळ पाठ पाहून नेमके करावे काय हे समजत नव्हते. त्यात तिच्यादृष्टीने अन्या हे अवलिया बाबा असल्याने त्यांच्यासमोर भीतीने ती जेमतेम मिनिटभर थांबत होती. इग्या मात्र तिच्यावर लाईन मारू लागला होता आणि चार दोन दिवसांत पवार आणि अन्यालाही समजून चुकले होते की अवलिया बाबांच्या कृपेने बहुधा इग्याच्या पदरात ते लावण्य लवकरच पडणार! त्यामुळे हुरहुर लागलेल्या अन्याने त्या बाबीतीलही लक्ष काढून घेतले होते. शिगलकरला मारायला टपलेले रामोशी अवलिया बाबांचा निरोप पवारकडून समजताच त्या तालुक्यातूनच पळून गेले होते. त्यांचा काही विश्वास बसलेला नव्हता की हे बाबा आपल्याला बोलावून स्वतःजवळ बाळगतील. त्यांना तो सापळाच वाटलेला होता. हे एवढे सगळे होत असताना अखंड जपजाप्य, नामःस्मरण, आरती, उदबत्या, निरांजने, जयघोष, भक्तीभाव, श्रद्धा, समर्पणाच्या भावनेतून घातलेली लोटांगणे ह्या सगळ्याला ऊत आलेला होता. त्याचा एक तिसराच परिणाम मनावर होऊ लागला होता. नुसतेच जमान्याने आपल्याला सलाम मारावा आणि फुकट खायला आणून द्यावे ह्या इच्छेने बुवा झालेल्या अन्याला आता त्या वातावरणामुळे पवित्र वगैरे वाटू लागले होते. नकळत तोंडात जय गोरखनाथ, हरि ओम तत्सत असले शब्द येऊ लागले होते. कोणत्यातरी अज्ञात शक्तीला आपण नकळत आळवत आहोत हे मधूनच जाणवल्यावर अन्या मनाशीच चमकत होता. हे असले कुठे काय पाहिजे होते आपल्याला? आपण सगळ्यांना फसवत आहोत हे सांगण्याची वेळच हातातून निसटलेली होती. दोडा आता येता जाता एक केळे ठेवून जात होता. शकुंतला बरी व्हायच्या मार्गावर होती. तिचा नवरा जांभळे कैदेत होता. तानाजीचे आई बाप रोज तानाजीला तिन्मुर्ती दत्तासमोर आडवा करून जात होते. मुल्ला आपापली माणसे घेऊन काही ना काही देऊन जातच होता. परिस्थिती अशी आली होती की हे शिवधनुष्य पेलण्यासाठी आपल्याला गाव जे समजत आहे तेच आपण बनण्याची गरज आहे हे अन्याच्या टाळक्यात आता नीट घुसलेलेही होते आणि नकळत त्याचे मनही त्याला असाच निर्वाळा देत होते की सगळे गाव ज्या देवापुढे नमते त्या देवाचा आपल्याला अवतार समजले जात आहे व आपल्यालाही देवाचे नामस्मरण केल्यावर मनःशांती मिळत आहे. त्या लहान मनातील पापपुण्याच्या अर्धवट पिकलेल्या व्याख्यांना जपजाप्यामुळे विशिष्ट कंगोरे लाभू लागले होते.

थोडक्यात, ह्यापुढे खरोखरच श्रद्धेने देवदेव करणे हेच आपले कर्तव्य आहे आणि ते आपल्यालाही आवडू लागले आहे हे अन्याला समजले होते. त्यातच कोणी कीर्तनकार रात्री भजन कीर्तन करत असताना अन्याच्या कानावर सुविचार पडत होते. चोरी करू नये, सत्य बोलावे, देवावर श्रद्धा ठेवावी, आपण फक्त निमित्तमात्र आहोत, कर्ताकरविता वेगळाच आहे वगैरे विचारांचे अर्थ नुसतेच समजत नव्हते तर आपल्याला आपल्यात भिनवल्याशिवाय गत्यंतर नाही हेही कळू लागले होते. अन्या, तिन्मुर्ती दत्ताचा अवतार, झाडवाले बाबा आणि अवलिया महाराज ह्या चारही अवतारांपेक्षा हा पाचवा नवीन अवतार, शुद्ध अंतःकरणाचा एक निरुपद्रवी व समाजाला श्रद्धेच्या मार्गावर जाण्यास सुचवणारा जीव अन्याला सर्वाधिक भावू लागला होता. त्याचा विश्वासच बसत नव्हता की आपल्यात हा बदल होत आहे.

तालुक्याच्या दृष्टीने तर फारच उत्तम घडत होते. जे लोक अजुनही अन्याच्या विरुद्ध काही मते मांडता येतात का अश्या विचारांत होते ते आता एकंदर प्रकार पाहून खासगीत कबूल करत होते की हा जो कोण अवतार म्हणवणारा उपटलेला आहे तो निरुपद्रवी व चांगला आहे. तो कसलीही मागणी करत नाही आणि समोर जे पडते त्यावरच समाधानी असतो. आपोआप त्यांचीही निष्पाप मने त्यांना झोपडीकडे पाहून लांबून का होईना हळूच हात जोडायला सुचवू लागली होती. ज्यांची आधीच भक्ती बसली होती त्यांना तर फार काहीच करावे लागत नव्हते. रोज दोनदा नमस्कार करा, हवे तर जपजाप्याला जाऊन बसा, हवे तर एखादा प्रश्न विचारा, वाटले तर एखादे फळ किंवा एखादे नाणे समोर ठेवा आणि देवाचे नांव घेऊन शांत व्हा! दगडाच्या देवापुढे नमण्यापेक्षा ह्या जिवंत अवतारापुढे नमण्यात काय वाईट असे त्यांचे मत झालेले होते.

या सर्वात गंमतीची बाब ही होती की नुसते पोटभर खायला मिळणे ह्या पलीकडे अन्याची काही अपेक्षाच नसल्याने कोणाला कसली तोशीसच पडत नव्हती त्याची भक्ती करण्यात! ह्या एकाच कारणाने अन्याचा दबदबा बर्‍यापैकी वाढला होता. केव्हाही बघावे तर झोपडीबाहेर जपजाप्य, आरती, नामस्मरण, कीर्तन असेच काहीतरी चाललेले असायचे. मग प्रॉब्लेम काय? त्यामुळे पोलिस खात्याला इकडे लक्ष देण्याची गरजच वाटत नव्हती. मुळातच हा सगळा प्रकार निरुपद्रवी आणि तसाही भक्तीमार्गाचा अवलंब करणारा असल्याने आता दररोज चमत्काराची आवश्यकताही वाटत नव्हती कोणाला! एस टी बसमधून उतरणारे नागरिक येताजाता लांबून उगाचच हात जोडून पुढे चालू लागत होते. ज्यांना काहीच माहीत नव्हते तेही चौकशी करून हात जोडत होते. ज्यांच्यामुळे परगावातील काहींना अवलिया बाबांचा महिमा समजलेला होता ते हळूहळू तालुक्याला येऊन आपल्या पोराबाळांना बाबांसमोर दंडवत घालायला लावत होते. कोणी आजारी असला तर बाबा त्याला प्रसादाचे फळ देत असत. कोणाला गरीबी भेडसावत असली तर बाबा त्याला फुटाणे देत. ह्या लोकांची ही संकटे पुढे खरंच नष्ट होणार होती की नव्हती हे आत्तातरी कोणालाच माहीत नव्हते. पण अविकसित, अशिक्षित, अडाणी, गरीबीने पोळलेल्या आणि भावुक समाजाला एक मानसिक आधार मात्र तूर्तास मिळालेला होता.

मात्र...... पवार आणि इग्या इतके लेचेपेचे नव्हते. हा अवलिया बाबा उद्या कदाचित उघडा पडेल हे त्यांना ज्ञात होते. तेव्हा आपलीही खैर नसणार हेही त्यांना समजलेले होते. त्यामुळे संगनमत करून त्यांनी आत्ताच सगळी तयारी सुरू केलेली होती. अन्याला कल्पनाही नव्हती या दोघांनी दर्शनाचे पैसे लावलेले होते. प्रसादाच्या अटी घातलेल्या होत्या. एका वहीत देणगीदाराची नांवे वगैरे लिहायला सुरुवात केलेली होती. आणि गेल्या काही दिवसांत या दोघांनी मिळून चौदाशे रुपयांची रोकडही जमा केलेली होती. ही रोकड जर अन्याला मिळाली असती तर अन्याला हेही समजले नसते की त्याचे करावे काय! पण अन्या खुष राहावा म्हणून रोज रात्री त्याला घोट दोन घोट आंबुस पाणी आणि दोन तळलेले मासे मिळत होते. गावकर्‍यांमध्ये आता पवार आणि इग्याचे स्थान महत्वाचे झालेले होते. मात्र कोणाच्या डोळ्यावर येईल इतकी रक्कम त्यांनी अजुन कोणाकडेही मागीतलेली नव्हती. कोणत्याही क्षणी पळून जायचे झाले तर कुठे पळायचे हेही त्यांचे ठरलेले होते. आपापसात मात्र त्यांनी हिशोब अगदी चोख ठेवलेला होता. पवारचे कुटुंबीय मधेच येऊन त्याला घरी चला म्हणाले तर पवार त्यांना अद्वातद्वा बोलून घालवून देत होता. एखादवेळी अन्या झोपलेला असला तर पवार किंवा इग्या भक्तांना स्वतःच 'देवाचे दास' या रुपात दर्शन देत होते. होता होईल तो मोठे व्हायचे आणि नंतरचे नंतर बघायचे हा त्यांचा हिशोब होता.

एकंदरीत अवलिया बाबा स्थिरावू लागले होते. त्यांचे मूळ गाव कोणते ते दुबेमुळे सगळ्यांना माहीत असले तरी त्या गावी जायचे कशाला हाच विचार प्रत्येकाचा होता. देवच इथे असला तर मंदिरात कशाला जायचे? अश्या लोकांना एक म्हसोबा हवा असतो. काही चांगले झाले तर त्याच्यामुळे झाले आणि वाईट झाले तर त्याचा कोप झाला! यापलीकडे विचार करू शकत नाहीत अशी काही माणसे असतात. दुर्दैवाने बहुसंख्य माणसे अशी असतात त्या ठिकाणी बुवाबाजी पिकते. इतकेच झालेले होते.

हळूहळू झोपडीचेही स्वरूप बदलू लागले. बाजूने एक चांगला मातीचा ओटा तयार झाला. बाभळीचे कुंपण बसले. कोणीतरी उगाचच एक घंटा आणून बसवली. अंगणात भक्तांना बसायची जागा आणि महाराजांना बसायची जागा ठरवल्या गेल्या. एक फलक लागला, त्यावर महाराजांची दिनचर्या अशुद्ध मराठीत लिहिली गेली. हिरवे किंवा भगवे कापड महाराजांच्या चरणी अर्पण करणार्‍याला पहिले दर्शन मिळू लागले. याचे कारण ती कापडे दुसरीकडे नेऊन अतिशय स्वस्तात विकून पवार आणि इग्या माया जमवू लागले. महाराजांनी उष्टावलेले भोजन लहान मुलांना दिले जाऊ लागले. सगळेच स्वतःसाठी चाललेले आहे असे वाटू नये म्हणून पवार आणि इग्या दुपारी चक्क संस्कार वर्ग घेऊ लागले. ह्यात लहान मुलांना प्रार्थना शिकवली जाऊ लागली. कसे वागावे, कसे वागू नये हे अनंतर कीर्तने आणि भजने अटेंड केलेल्या ह्या दोघांना तोंडपाठच होते. तेच त्या मुलांच्या कानावर घातले जाऊ लागले. तेवढे मात्र मोफत केले या जोडीने! बरं, म्हंटले तर हे संस्कार वर्ग काही वाईट नव्हते. मुलांना लहानपणीच सत्य बोलावे, मोह ठेवू नये, मेहनत करावी वगैरे बाळकडू पाजले गेले तर उत्तमच की, असा विचार करत अधिकाधिक पालक ह्या मोफत संस्कार वर्गात आपल्या मुलांना बसवू लागले. एक तास संस्कार वर्ग होतील म्हणता म्हणता तेच तीन तासांवर गेले आणि तीन तास झाल्यावर मात्र त्याची माफक फी आकारली जायला सुरुवात झाली.

चहुबाजूंनी अचानक श्रद्धा, प्रसाद, नैवेद्य, जयघोष, स्तुतीसुमने आणि मुख्य म्हणजे धनाचे प्रवाह येऊन आदळायला लागले तशी मात्र एकदा ह्या तिघांची एक गुप्त मीटिंग झाली. ह्या असल्या मीटिंगा घेणे आणि त्यात स्वतःचे म्हणणे खरे करून घेणे ह्यात इग्या एक नंबर होता. त्याने पवार आणि अन्याला नीट समजावले की अन्याला एक महाराज म्हणून काही कौशल्ये आत्मसात करावी लागतील. भाषा सुधारावी लागेल. लिहावाचायला शिकावे लागेल. कोणी समोर आले तर शुद्ध भाषेत चार उपदेशपर वाक्ये बोलता यायला हवीत. फार दिवस हे लाड सुरू राहणार नाहीत,. त्यापूर्वीच गावात काहीतरी भव्यदिव्य घडवून आणून बक्कळ माया जमवून दुसर्‍या गावात स्थलांतर करायला हवे. शेवटी ह्या तालुक्याचे एक विशिष्ट पोटेन्शिअल आहे, ज्यापलीकडे येथे काहीही होणार नाही. ह्याशिवाय आपला दबदबा निर्माण व्हावा म्हणून एखादी पालखी वगैरे दरवर्षी काढायला हवी. ती चार गावातून फिरवायला हवी. तोंडदेखली का होईना समाजसेवा केल्याचे दाखवायला हवे. गाव स्वच्छ केले की रोगराई नष्ट होईल हा विचार पसरवून स्वतः जातीने झाडू हातात धरायला हवा. खरोखरच मोठे व्हायचे किंवा निदान ठरायचे असेल तर आधी थोडी तरी मेहनत घ्यायलाच हवी. इग्याने बडबडताना अन्या आणि पवारला अशी काही स्वप्ने दाखवली की दोघे अबोलच झाले. आश्रम काय, मंदिरे काय, जमीनी काय, देणग्या काय, मोटारी काय आणि देणग्या काय! आपण आत्ता अतिशय भिकार परिस्थिती आहोत तरी गावकर्‍यांचा इतका पाठिंबा आहे. ह्या पाठिंब्यामार्फत मिळेल तेवढे मिळवून अधिक मोठे व्हायला हवे. आपण जितके अधिक मोठे होऊ तितके आपोआप आणखीन मोठे होण्याचे आपले रस्ते सुकर होतील हे एका रात्रीत अन्या आणि पवारच्या गळी उतरले.

आणि दुसर्‍या दिवशी सकाळी दहा वाजता गावात एक भयानक बातमी वार्‍यासारखी पसरली. अवलिया बाबांचा कोप होण्याची शक्यता आहे. का? तर म्हणे तालुक्याचे ठिकाण असून सर्वत्र घाणीचे साम्राज्य आहे आणि त्यामुळे होणार्‍या रोगराईमुळे लहान मुलांना आजारी पडावे लागत आहे. गाव झोपडीपुढे हळूहळू जमा होऊ लागले. बहुतेकांना वाटले की आता महाराज बाहेर येऊन सर्वांना झापडणार! पण बघतात तो काय? स्वच्छ नाहिलेले आणि नवी कोरी वस्त्रे परिधान केलेले अवलिया बाबा एका हातात खराटा आणि एका हातात बादली घेऊन दारात उभे. कोणाहीकडे ढुंकून न पाहता निघाले ते तडक बसस्थानकाकडे! गेल्या एका महिन्यात हा अवतार गावाला झोपडीच्या बाहेर पाहायला मिळालेला नव्हता. ज्यांच्या दर्शनासाठी पवार आणि इग्याचे पाय धरावे लागतात आणि नाण्यांचा नैवेद्य ठेवावा लागतो त्या अवलिया बाबांचे तळपत्या उन्हात सूर्याला देखील लाजवेल असे प्रकाशमान दर्शन फुकट? गावकर्‍यांची नुसती झुंबड उडाली. पण लाथेने लोकांना हुसकावत संतापलेले अवलिया बाबा बसस्थानकावर पोचले आणि जय गोरखनाथची आरोळी ठोकून त्यांनि सरळ बसस्थाक झाडायलाच सुरुवात केली. अवाक झालेला जमाव दोन पाच मिनिटे खुळ्यागत उभा राहिला असेल तेवढाच! सहाव्या मिनिटाला बसस्थानक लखलखीत व्हायला सुरुवात झाली. पोत्याने धूळ उडत होती. लोक तोंडाला फडके गुंडाळून एकमेकांकडे बादल्या आणि टोपल्या हॅन्ड ओव्हर करू लागले. एक लांब रांग लावण्यात आली आणि सगला कचरा नाल्याच्या एका बाजूला कोणाला त्रास होणार नाही अश्या पद्धतीने साचवायला सुरुवात झाली. दुपारी तीन वाजता अथक परिश्रमांनी भोवळ आल्यासारखे वाटले तेव्हा अवलिया बाबा आपल्या झोपडीकडे परतू लागले. आज त्या स्थानकावर आलेल्या यच्चयावत बसगाड्या, त्यातील चालक, वाहक आणि प्रवासी खुळ्यागत तो प्रकार बघत होते. एरवी नाकाला पदर लावल्याशिवाय बसमधून खाली न उतरणार्‍या बायका आज बसस्थानक बघून हरखून जात होत्या. कुठूनतरी अचानक फोटोग्राफर उगवलेला होता आणि बसस्थानकाची कोरी करकरीत अवस्था कॅमेर्‍यात बंद झालेली होती. तालुकामित्र या साप्ताहिकाचे ह्यावेळचे हेडिंग असणार होते...... 'अवलियाबाबांमुळे कोर्‍हे स्थानक फाईव्ह स्टार'!

यड्याचा बाजार नुसता! राहत्या घरी कधी इकडची काडी तिकडे न केलेल्या अन्याने आज गाढवासारखे राबून नवेच उदाहरण घालून दिलेले होते. आपण स्वतः इतके छान काम करू शकतो हे पाहून गावकर्‍यांनीच तोंडे बोटात घातली होती. कोण म्हणू शकेल की हे अनावश्यक होते? कोण म्हणू शकेल की ही अंधश्रद्धा होती? इग्या आणि पवारच्या अंगावर राबलेले असूनही दहा दहा मुठी मांस चढलेले होते कारण तालुकामित्रवाल्यांनी दोघांचे फोटो आणि मुलाखती घेतलेल्या होत्या. येत्या मंगळवारी तालुक्यात सर्वत्र एकच नांव गाजणार होते!

'अवलिया बाबा'!!!!!!

अन्या निर्जीव प्रेतासारखा पडून होता. अंग इतके दुखत होते की उठवतही नव्हते. आज भक्तांना दर्शनासाठी बाबा बाहेर येणार नाहीत हे जाहीर करण्यात आले. बहुधा बाबा अजुन कोपलेलेच असावेत असे समजून गावकर्‍यांनी संध्याकाळी स्वतःच एक समीती नेमून चर्चा केली. निष्कर्ष पवार आणि इग्याला सांगण्यात आला. तो असा होता की येत्या आठ दिवसांत आम्ही तालुक्यातील या सर्वात मोठ्या गावाचे व तालुका ठिकाण असलेल्या कोर्‍हेचे एका अतिशय स्वच्छ जागेत रुपांतर करू, महाराजांना म्हणावे की राग सोडावा!

शेवटी कसेबसे लंगडत का होईना, अवलिया बाबांनी रात्री नऊ वाजता भक्तांना झोपडीबाहेर दर्शन दिले आणि जयघोष झाला.

वैतागलेले महाराज आंबलेल्या अंगाने आत गेले तेव्हा पवार आणि इग्या आत आले आणि प्रथमच त्या दोघांनी मनापासून अन्याला हात जोडले. हा आदर अन्याने केलेल्या अभिनयाला होता, जो पाहून दोघेही सकाळपासून अवाक झालेले होते. राबायला तर त्या दोघांनाही लागलेच होते, पण अन्या फारच राबला होता. तसेही, इतर भक्तांना कामे शिकवायची जबाबदारी इग्या आणि पवारवर असल्याने त्यांना तसेही काम कमी पडले होते.

एक महिना मुक्कामास असलेल्या तिन्मुर्ती दत्ताच्या अवताराने आज प्रथमच एक सार्वजनिक हिताचे कार्य केलेले होते. असे कार्य ज्याबाबत हरकत घेण्याचे कोणाला काही कारणच नव्हते. ह्या कार्याची दखल ताबडतोब घेतली गेली आणि दुसर्‍या दिवशी सकाळी कोर्‍हेच्या तावडे पाटलांनी स्वतःच्या वाड्यावर महाराजांची अभिषेकासहित पूजा ठेवल्याचे जाहीर केले. भक्तीला राजकारणाचा पहिलावहिला आधार मिळाला. आता मागे बघणे उरलेले नव्हते. फक्त आहे ते आहे त्या शैलीने पुढे नेत गेले की झाले.

दुसर्‍या दिवशी सकाळी किमान दिडशेचा जमाव तावडे पाटलांच्या वाड्यासमोर जमला. अवलिया बाबांच्या आगमनासाठी गाव ताटकळत असताना एक बातमी वादळासारखी आली आणि तावडे पाटलांच्या वाड्याला अवाक करून गेली......

'पूजा झाली तर बाबांच्या झोपडीसमोर होईल, पाटलांच्या वाड्यावर नाही'

=================

-'बेफिकीर'!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users