मायकल

Submitted by निलेश_पंडित on 1 December, 2013 - 00:33

कुरळे केस नि सतेज कांती, स्वच्छ निळे प्रामाणिक डोळे
सुरकुतलेला जरी चेहरा, वाक्पटुता वाणीतुन खेळे

अनुभव सारे पचवुन रक्ती, झाला होता अखेर थंड
गुर्मी जिरुनी तरुणपणाची, विझले होते बौद्धिक बंड

स्वैराचा अन् स्वातंत्र्याचा कुण्या काळचा अजेय भोक्ता
मनस्वितेने पाश तोडुनी अता एकटा उरला होता

वर्षे पस्तिस ...संसाराची क्षणार्धात झुरळासम झटकुन
गिरवित बसला कडवट पाढा एकाकी मग मनात वाकुन

पाश्चात्त्यांच्या यशस्वितेचे अनेक पैलू शिकवी मज तो
कळले नाही परंतु त्याला बंधनातही सुखान्त रुजतो

अतिरेकाने होय विकृती स्वच्छ निखालसशा मूल्यांची
विषण्ण करते मला आजही फासावरची अखेर त्याची

- निलेश पंडित

Group content visibility: 
Public - accessible to all site users

निदा....

ही पूर्वी वाचली होतीच, आवडलीही होती आणि आत्ताही जाम आवडली.. पण एक विचार मनात आला, बघा बरोबर वाटतो का..

ही व्यक्तिचित्रणपर कविता आहे. सहसा अश्या कवितेत दोन महत्वाचे भाग असतात. १.व्यक्तिरेखा रंगवणे २. त्या व्यक्तिरेखेची कहाणी. काही कवितांत क्र. १ जास्त महत्वाचा, काहींत क्र. २. ह्या कवितेत दोन्हीही गोष्टी पुरेश्या मांडल्या गेल्या नाहीत, असं वाटतंय. अखेरची द्विपदी आघात करतेय, पण तत्पूर्वी 'मायकल'ची पुरेशी ओळख होत नाहीये. त्याची अखेर चुटपुट लावतेय, पण कहाणी नीटशी समजत नाहीये. थोडा अधिक विस्तार करावा का ? काय वाटतं ?

रसप ... तू म्हणतोयस त्यात तथ्य आहे ... कारण विशिष्ट अनुभूतीचं प्रातिनिधिक तरीही साधारण (representative yet generalised) चित्र रंगवण्याचा हा प्रयास आहे. मी विचार करतो.... मी कालच इतरत्र कुठेतरी लिहिलं ... काही तपशील अव्यक्त असावा ... तो किती असावा हे ठरवण्यात थोडी चूक झाली असेल कदाचित ....

रणजीत ... डॉक्टर साहेब ... लवकरच थोडा अधिक तपशील कवितेत दोन तीन ओळींद्वारे वाढवतो ...
आभार ...

कवितेतला आशय, विषय वेगळाच आहे..... छान.

"पाश्चात्त्यांच्या यशस्वितेचे अनेक पैलू शिकवी मज तो
कळले नाही परंतु त्याला बंधनातही सुखान्त रुजतो" >>> हे खास.

खूप आवडली कविता

रणजीत +१ ...ओळी वाढवताना एक जरा पहाल का की तुम्ही सांगताय तो मायकल्बद्दलच सांगताय गनरल एखाद कुठल्या व्यक्तीबद्दल नाही हे स्पष्ट करणार्‍या ओळी सहसा होतात का पाहा
ह्या साठी मला वाटते मायकल बद्दल वाटणारी वास्तल्य भावना जरा अजून नीट मनातून बाहेर काढा ..अजून छान होईल कविता
पर्टिक्यूलर मायकेल तुमच्यासाठी....ते सांगा ....तुमच्या मनातला मायकेल आम्हालाही तसा दिसला पाहिजे

पाश्चात्त्यांच्या यशस्वितेचे अनेक पैलू शिकवी मज तो<<< ithe paahaa tumachyaat aaNi tyaachyaat kashee kanekTiviTee dasate ..tase kaaheese