फिनिक्स पान १७(समाप्त)

Submitted by पशुपति on 29 November, 2013 - 10:39

प्रभूंनी त्याला विचारले, “तू आम्हाला पलीकडे नेणार आहेस ते ठीक आहे. पण त्याचे मोल किती घेणार ते आधी सांग.”
तो चतुर केवट म्हणाला, “आपणदोघे सम-व्यावसायिक आहोत. त्यामुळे मला तुमच्याकडून मोल घेता येणार नाही. इतरांना जर हे कळले तर मला वाळीत टाकतील.”
प्रभू मनातल्या मनात हसले तरीपण वरकरणी विचारले, “ तुला आमच्याकडून मोल नको ते कबूल! पण आपण दोघे सम-व्यावसायिक कसे?”
त्यावरकेवटने खुलासा केला, “नाही कसे? तुम्ही आपल्या भक्तांना संसार सागरातून तरुन नेता, मी आलेल्या प्रवाश्यांनानदीपलीकडे नेतो. आता तुमचा पसारा माझ्यापेक्षा मोठा आहे, कबूल!! पण व्यवसाय मात्र तोच!”
त्याचा खुलासा ऐकून तिघांनाही गंमत वाटली. मग प्रभू नावेत बसायला सरसावले.तेवढ्यातकेवटने त्यांना अडवले आणि तो म्हणाला, “तुम्हाला असे बसता येणार नाही.”
प्रभू म्हणाले, “का बुवा....आता काय झाले?”
“मला आधी तुमचे पाय धुवावे लागतील.” केवट
“आता हे काय नवीनच काढलेस? पाय धुण्याचा आणि नावेत बसण्याचा काय संबंध??” प्रभूंनी विचारले.
“तसं नाही, मी तुमच्याबद्दल बरेच काही ऐकले आहे. एका शिळेला तुमचीपायधूळ लागली आणि तिची एक बाई झाली. आणखी असे बरेच काही. मी गरीब माणूस. माझ्याकडेही एकच नाव आहे. हिचे काही झाले तर माझे रोजचे हाल होतील.”
शेवटीकेवटने सर्व आपल्या मनासारखे करून तिघांना नदीच्या दुसऱ्या तीरावर नेले.
गोष्ट संपवून सुब्रतो म्हणाला, “तर असा हा केवट! तू माझ्यासाठी केवटच आहेस. फक्त मी प्रभू नाही...तरी तू मला तरून नेलेस.दोघेही वेळेचे भान हरवून बसले होते. एक गोष्ट सांगण्यात रंगून गेला होता आणि एक ऐकण्यात रंगून गेला होता.ड्रायव्हरच्या आवाजाने दोघेही भानावर आले. “चला साहेब, खूप उशीर झाला आहे.” ड्रायव्हरला पण ह्या गोष्टीची आता सवय झाली होती.ड्रायव्हरने चला म्हणाल्यावरदोघेही स्मित कटाक्ष टाकून उठले आणि सावकाश पावले टाकत आपल्या गाडीकडे निघाले.ड्रायव्हरमधे पण त्यांना केवट दिसू लागला होता.

........समाप्त........

Group content visibility: 
Public - accessible to all site users