माणसे

Submitted by निलेश_पंडित on 29 November, 2013 - 03:31

पाहिली डोळ्यांत सारे वाचणारी माणसे
आणि डोळ्यांतूनही ना सांगणारी माणसे

भेटली झेपावणारी एकटी शिखराकडे
आणि काही सोबतीने चालणारी माणसे

भाग्य माझे लाभली जी प्रेम सारे बोलली
मात्र मौनातूनही रागावणारी माणसे

राहिली माझ्यासवे क्षण फक्त काही मोजके
अंतरी पण जन्म सारा दाटणारी माणसे

कैद मी स्वप्नात असता मारण्या मज धावली
ती निघाली नित्य माझी वाटणारी माणसे

- निलेश पंडित

Group content visibility: 
Public - accessible to all site users

राहिली माझ्यासवे क्षण फक्त थोडे मोजके
अंतरी पण जन्म सारा दाटणारी माणसे

.. दोन गुरुतुल्य व्यक्ति आठवल्या.

सुंदर रचना.

छान

छान.

राहिली माझ्यासवे क्षण फक्त थोडे मोजके
अंतरी पण जन्म सारा दाटणारी माणसे

हा शेर छान आहे. पण...

थोडे आणि मोजके हे दोन्ही एकच अर्थी शब्द आहेत. त्याचप्रमाणे, दुसऱ्या ओळीतील अंतरी हा शब्द वरील ओळीशी थेट संबंध लावतो, इतकेच नाही तर तो वरील ओळीचाच भाग वाटतो आहे. माझ्यामते ही तांत्रिक गोष्ट आपल्याही लक्षात आली असेल.

पुलेशु.

राहिली माझ्यासवे क्षण फक्त थोडे मोजके
अंतरी पण जन्म सारा दाटणारी माणसे

>> मस्त !!
अ.अ.जोशी ह्यांच्याशी सहमत..!

मस्त गज़ल! आवडली!

इलाहीची ग़ज़ल आठवली...

"ऐकलेली पाहिलेली माणसे गेली कुठे?
पुस्तकातुन वाचलेली माणसे गेली कुठे?"

Happy

जोशी साहेब … रसप … उत्तम प्रतिसाद … धन्यवाद … "फक्त काही मोजके" असं करतो …
मनापासून आभार

पोरे साहेब …

भाग्य माझे … (माणसे) लाभली … जी प्रेम सारे बोलली …
मात्र (एरवी… ) … मौनातूनही रागावणारी माणसे …

किंवा

"अशी माणसं लाभली जी त्यांचं सारं प्रेम खुलेपणाने बोलली … ती … तीच माणसं … जी एरवी मौनातून माझ्यावर राग व्यक्त करतात."

मान्य … थोडा "नीरगाठउकल" पद्धतीचा शेर झालाय Sad

निलेश..गझल आवडली...

एक गोष्ट..

बरेच मिसरे सुट्टे वाचले तर व्याकरणात चूक वाटते..

उदा.

राहिली माझ्यासवे क्षण फक्त काही मोजके..

धन्यवाद जोशी (ज.श.) साहेब … थोड्या गझला गेल्या वर्षभरात लिहिण्याचा प्रयत्न केला आहे पण गझल माझ्या साठी नवाच काव्य प्रकार आहे … त्यामुळे या बाबी अजून नीट सांभाळल्या जात नाहीत माझ्याकडून … आपण म्हणताय त्यामध्ये मिसरा अधिक सोपा, सरळ असावा असा मी प्रयत्न करेन....

या शेरा बद्दल थोडा खुलासा ...

राहिली माझ्यासवे क्षण फक्त काही मोजके
अंतरी पण जन्म सारा दाटणारी माणसे

या मध्ये "सारा जन्म अंतरी दाटणारी माणसे... फक्त काही मोजके क्षण माझ्यासवे राहिली" ही फोड अभिप्रेत आहे. "राहिली" हे क्रियापद 'क्षण' साठी नसून 'माणसे' साठी आहे.

थोडेसे-मोजके ही देखील गफलत आहेच पण् दाटणारी च्या शेरात एक बेसिक गफलत खालच्या ओळीत आहे
तीची मांडणी सुलभ नाही खाली पण आला तर वर जरी/ तरी आणता आले असते म्हणून तो पण् एकटा /चुकल्यागत वाटतो.....
जन्म सारा दाटणारी ह्यातही जन्मास अंतरी(म्हणजे कुठेतरी आतल्या बाजूला ) दाटतात अशी माणसे असा विचित्रसा अर्थ लागू पाहत आहे ...जन्मभर हा अर्थ अधिक नेमकेपण्नाने स्पष्ट्त करणारा शब्द तिथे हवाच आहे

आता अजून विचार करण्याची गरज काफियाबाबत आहे दाटणारी असे म्हणताना भावुकता उफाळून आली आहे (उचंबळ् ) हे स्पष्टच दिसते ते गरजेचेही आहेच पण तो शब्द त्याला दुसराकोणी साथीदार शेरात नसल्याने एकटादुकटा वाटतो आणि जास्त भावही(वेटेज) खावून जातो आहे त्यामुळे शेर काफियानुसारी असल्याचे जाणवते व खटकत राहते

असे करता येइल

राहिली माझ्यासवे क्षण फार थोडेसेच ती
अंतरी आजन्म माझ्या राहणारी माणसे

नांदणारी..असेही करता येइल ..अजून विचार करा आपणासच अजून काही छान सुचेल आपोआप

टीप : सहसा आभार मानताना सर्व प्रतिसादकांचे रसिकांचे मानावेत अशी पद्धत आहे तुम्हाला माहीत नसावी असे वाटत नाही पण् फक्त दोघातीघांचेच आभार मानता आणि वर त्यांच्या प्रतिसादाना उत्तम प्रतिसाद म्हणता बाकीचे काय टाईम्पास म्हणून आले आहेत काय तुमची गझल वाचायला .. .:राग:

ह्या प्रतिसादाबद्दल माझे आभार मानू नका मला नकोत मानलेत तरी मी स्वीकारणार नाही

ण् फक्त दोघातीघांचेच आभार मानता आणि वर त्यांच्या प्रतिसादाना उत्तम प्रतिसाद म्हणता बाकीचे काय टाईम्पास म्हणून आले आहेत काय तुमची गझल वाचायला .. .राग

ह्या प्रतिसादाबद्दल माझे आभार मानू नका मला नकोत मानलेत तरी मी स्वीकारणार नाही

>>>>>
उगी उगी वैभू..... ललू नतो !! Wink Proud

वैभवराव … फेसबुक वरील ओळखी मुळे अति परिचयात अवज्ञा झाली बहुतेक माझ्याकडून … आता तुम्ही नाही म्हणालात तरी मानतो मी आभार … कसंही करून स्वीकाराच … !! Happy Happy
असो.
तुमची शिफारस पटण्याजोगी आहे … मी करतो बदल काहीतरी.
कळावे … लोभ असावा …

(लवकर ते आभार स्वीकाराच जरा … ) Happy

... सर्वांचे मनापासून आभार ... आभार मानल्याने रचना वर येते ... या जाणिवेने मी थोडा साशंक होतो ... गैरसमज नसावा.

पाहिली डोळ्यांत सारे वाचणारी माणसे
आणि डोळ्यांतूनही ना सांगणारी माणसे

राहिली माझ्यासवे क्षण फक्त काही मोजके
अंतरी पण जन्म सारा दाटणारी माणसे

हे शेर सर्वात विशेष वाटले.