अभिनिवेश

Submitted by रसप on 29 November, 2013 - 03:25

क्षितिजावर अडला आहे
उत्तुंग नभाचा पूर
वा सहनशीलतेअंती
उधळले कुणी चौखूर

की पायदळाच्या तुकड्या
ह्या दबा धरुन बसलेल्या
घेरून, गराडा घालुन
हल्ल्यासाठी टपलेल्या

रंजला कुणी विद्रोही
बांधून मनाशी गाठ
देणार कदाचित आता
तो उद्रेकाला वाट

हे सगळे सगळे दिसते
मी तरी उदासिन, निश्चल
राखतो चेहरा माझा
पण आतुन अस्थिर, चंचल

हृदयाच्या पटलावरती
शब्दांनी खरवडतो मी
डोळ्यांच्या लालीने मग
कवितेला पेटवतो मी

मी षंढ, थंड रक्ताचा
मी कुणी न क्रांतीकारक
अभिनिवेश दाखवणारा
मी हताश कवितासाधक

....रसप....
२९ नोव्हेंबर २०१३
http://www.ranjeetparadkar.com/2013/11/blog-post_29.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अतिशय आवडली … तुझ्या कवितांमधल्या सर्वोत्कृष्ट निवडायच्या ठरवल्या तर त्यांत ही एक असेल …