कुबडी माझी लाडाची लाडाची गं

Submitted by मुंगेरीलाल on 28 November, 2013 - 19:37

आयुष्याच्या शेवटी चष्मा, मानेचा/कमरेचा पट्टा आणि शेवटी दातांची कवळी अशा विविध अवयवांसाठीच्या "कुबड्या" लावायची वेळ येते. या गोष्टी वरवर सारख्या दिसल्या तरी ज्याच्या त्यालाच फिट्ट बसतात आणि उपयोगी पडतात.

त्या तशाच आणि तितक्याच दुसऱ्यालाही फायद्याच्या ठरतील असा आपला भ्रम कधीच नसतो. योगायोगानं तसं कधी झालंच तर आपल्याला क्षणभर आश्चर्य आणि गंमत वाटते. पण तो केवळ योगायोग असतो हे आपण पक्कं जाणून असतो. या अनुभवावरून आणखी एका तिसऱ्या व्यक्तीला आपण त्या वापरून पहा असं कधी म्हणत नाही, आग्रह वगैरे करत नाही आणि जरी केलाच तरी त्यानं नको म्हंटल्यावर रुसून बसत नाही किंवा त्याला शिष्ठ, अहंमन्य वगैरे मनातल्या-मनात नावंही ठेवत नाही.

साधारण याच वयात, म्हणजे चष्मा आणि पट्ट्याच्या मधल्या काळात आपलं स्वतःचं आयुष्याचं तत्वज्ञान नावाच्या कुबडीची मेंदू या अवयवासाठी आवश्यकता भासायला लागते. अशी कुबडी बाहेरून माप देऊन करून घेता येत नाही. मग ती आपण स्वतः बनवायला घेतो आणि स्वतःला फिट्ट बसेपर्यंत ठोकून, घासून, थापून, चोपून-चापून घेत राहतो. आणि एकदा का ती मापाची बसली असं वाटलं की मात्र आधी वर्णन केलेल्या दृश्य कुबड्यांच्या विपरीत इतरांना ते घालून पाहण्याचा आग्रह करत सुटतो. कधी-कधी तर हे इतकं होतं की त्याची तुलना दात असणाऱ्यांनाही कवळीचा आग्रह करण्याशीच होईल.

असा आपण कधी चष्मा, मानेचा पट्टा आणि दातांची कवळीचा का आग्रह करत नाही? कारण त्या गोष्टी आपण बनवलेल्या नसतात. त्यात 'मी' नसतो. तात्पर्य - वयाच्या जितक्या लवकर आपलं स्वतःचं तत्वज्ञान बनेल, तितके आपण माणूसघाणे आणि अप्रिय होत जातो. मरण अटळ आहे, पण म्हातारपण टाळता येतं, विशेषतः मानसिक म्हातारपण - जे राठ झालेल्या तत्वज्ञानाच्या कुबड्यांनी माणसाला अधिकच अपंग बनवतं आणि एकलकोंडं पाडतं.

मला हे कुणी सांगितलं? कसं सुचलं? आजपर्यंतच्या भल्या-बुऱ्या अनुभवातून आलंय ते महाराजा. आणि असं वाटतंय की मस्त फिट्ट बसतंय मला. तुम्हालाही पटलं ना? अहो, पटेल. जरा बघा की प्रयत्न करून. नीट वाचा पहिल्यापासून. प्लीज Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान Happy

शेवटच्या दोन ओळींतली जम्मत मस्त...

छान लिहिलीय... विचार करायला लावणारं..
बरेच दिवसानंतर तुमचं लिखाण वाचायला मिळालं! Happy

धन्यवाद रेणुका, माशा, दिनेश, बागेश्री. Happy
होय, बराच खंड पडलाय. अर्धवट सुचलेलं इथे ढकलण्याऐवजी काही काळ, पुण्याच्या एका जुन्या बेकरी सारखा 'पॅटीस संपले' असा पवित्रा घेणं योग्य वाटलं.
नियमित लिहायचा नक्की प्रयत्न करेन, पण बऱ्याच दिवसांनी सोडलेल्या नळाचं पहिलं बादलीभर पाणी गढूळ वाटलं तर सोडून द्यावं ही विनंती. Happy

तात्पर्य - वयाच्या जितक्या लवकर आपलं स्वतःचं तत्वज्ञान बनेल, तितके आपण माणूसघाणे आणि अप्रिय होत जातो.>>>> हे अजिबातच नही पटेश. Happy

पण >>>> वर्णन केलेल्या दृश्य कुबड्यांच्या विपरीत इतरांना ते घालून पाहण्याचा आग्रह करत सुटतो.>>>> पण या लोकां साठी ते चपखल बसते असे आपल्याला (?) वाटते. Wink

हे बगा जमतय का? Wink मापात

पारिजाता, अश्विनीमामी, इब्लिस, निवांत पाटील, प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

@इब्लिस, निवांत पाटील - लेखातले तर्क आणि गृहितकं सापेक्ष आहेत (कारण व्यक्ती म्हणून माझ्या अनुभवांच्या आणि त्यांच्या विश्लेषण-संश्लेष्णाच्या असलेल्या मर्यादा). पण गम्मत अशी की कसा कोण जाणे, लेख स्वतःवरच खूष आणि कोडगा झालाय. त्याला पटेश-नॉट-पटेश सारख्या व्यक्तीसापेक्ष सुया-टाचण्यानी खिंडार पडणं कठीण आहे. (आपले कपडे चिंध्या होतील पण याचा मुद्दा छद्मीपणे हसत म्हणत राहिलं - पहा माझं बरोबर ठरलं की नाही? :-)) त्याला बेट्याला घोडचूक दाखवून देईल असा वर्मी बसणारा भालाच हवा. तो जर सापडला तर घ्या पवित्रा. मी पण तुमच्या बाजूनी हात लावायला तयार आहे. Happy

अजुन जरा मापासाठी घासाघीस..... दुसर्‍याला मापात बसतय कि नाही हे पहाण आणि त्यान ते घातलच पाहिजे हा अट्टाहास धरणं यातलाच फरक तो काय....... बसं.....

आपल्या 'चष्म्यानी' दुसर्यानी बघावं हा अट्टाहास तर असतोच की ! आणि मग समोरच्याला ते जमल नाही की तो 'न समजुन घेणारा' ठरतो..असो..तुमचा लेख बघुन छान वाटलं...लेखणीला 'धार' करण्याचा प्रयत्न आहे का ? Happy
आता 'नळ' सतत वाहता राहो हीच इच्छा ! Welcome back !