तुझा तो...... हा कुठे असतो रे आता?

Submitted by बेफ़िकीर on 27 November, 2013 - 00:10

अरे अत्रे? इकडे कुठे? फारा दिवसांनीच भेटलो यार? दिवस कसले, वर्षे! काय म्हणतोस? सगळे ठीकठाक? घरी सगळे कसे काय आहेत? बाकी धंदापाणी? काय नशीब आहे राव, आज आपण इथे भेटू असे स्वप्नातही वाटले नव्हते.

अरे हो! तुझा तो हा भेटला होता परवा, कोण तो... वन्या वन्या! वन्या भेटला होता. नाही का, तू लहान असताना तुमच्या घरात कामाला बाई होती तिचा मुलगा? तू त्याला खेळायला घ्यायचा नाहीस बघ सोसायटीतल्या मुलांबरोबर! साला एक तर गरीब, त्यात पुन्हा खालच्या जातीचा! खेळणार तुमच्यात! असे कसे चालेल? तुझे स्पष्ट बोलणे दिसायचे फक्त, पण सगळ्यांच्या मनातलेच बोलायचास! मग बसला होता आठवतं का टुकूटुकू लांबून तुमचं क्रिकेट बघत! दहा रुपयांची वर्गणी काढायची बॅट आणण्यासाठी तर ह्यांच्या बापाच्या खिशात दहा पैसे नसणार! आणि आले क्रिकेट खेळायला! परवाच भेटला होता. म्हणाला अत्रेसाहेबांना रस्त्यात चक्कर आली म्हणून त्यांचा हात धरून उठवले तर खेकसले. म्हणाले माझा मी समर्थ आहे. साले हे कधी सुधरायचे नाहीत. चार चार दिवस आंघोळ नाही आणि पैसे मिळू शकतील अशी शक्यता वाटली की अगदी जीव टाकल्यासारखे दाखवणार!

बाकी काय म्हणतोस? मी? मी मागेच आलो या भागात राहायला. फ्लॅट सिस्टीमचा वैताग आला यार? आपल्या लहानपणीची शांतता आणि भरपूर मोकळी मैदाने हा प्रकारच राहिला नाही. तू रिटायर्ड कधी झालास?

हां! अरे परवा तुझा तो हा भेटला होता.... तो... आपला.. सोपान सोपान! वॉचमन नाही का सोसायटीचा? कसला झाडला होतास तू त्याला, आठवतं का? म्हणाला होतास टिचभर तुझी खोली आणि चार पोरं झालीयत अन् वर रात्रभर सोसायटीच्या कनेक्शनने झोपडीत बल्ब लावून झोपायला कुठला बादशहा लागून गेलास काय? हा हा! लायकी काढल्याशिवाय साले गप्प होत नाहीत. परवा रस्त्यात भेटला. हा असा काटकुळा झालाय नुसता. बायको वारली म्हणे त्याची! चारही पोरे वेगवेगळी राहतात. हा एकेकाकडे एकेक आठवडा काढतो. साले इस्टेटीसारखे पोरांमध्ये वाटले गेले तरी चरबी बघ, म्हणतो कसा, चार मुले हीच दौलत! केव्हाही कोणाकडेही जाता येते. तू असतास तर म्हणाला असतास की तुमच्यासारख्यांमुळेच तुमची लोकसंख्या वाढतीय आणि देश भिकेला लागतोय. पण तो तुझ्याबद्दल मात्र अगदी हात जोडून बोलला हो? म्हणाला अत्रेसाहेब नसते तर सोसायटीतून हाकलला गेला नसतो आणि मग जी मेहनत करावी लागली ती केली नसती तर आज हे दिवसच पाहायला मिळाले नसते. साला ह्यांच्याशी चांगले वागा, वाईट वागा, हे निगरगट्टच!

त्या सोपानवरून आठवलं मला! अत्रे, तुला उत्तम मारवाडी आठवतो का रे? आपल्या सोसायटीतल्या ए बिल्डिंगच्या तळमजल्याला पुढच्या खोलीत दुकान आणि मागच्या खोलीत घर थाटणारा? अरे तो गेला म्हणे! मला? मला कसे कळले म्हणजे त्याचा पोरगा भेटला होता रस्त्यात! जितेश! त्या मारवाड्याला भारी झापलावतास तू! कुठून आलात राजस्थानहून आणि आमच्याच जीवावर धंदे करून परत आमच्याच नाकावर टिच्चून आमच्यासारख्याच सोसायटीत राहता? कसला चेहरा पडला त्याचा! सोसायटीच्या ए जी एम मध्ये तो मारवाडी काय म्हणाला, की पाणी पुरत नाही. तेव्हा तू हा डायलॉग टाकलावतास बघ! खाली बघत निघून गेला तो! त्याचा मुलगाही त्याच्याबरोबर निघून गेला. जाताना तू मागून खडे बोल सुनावलेस. भडव्यांनो आधी आमच्यासारखी शिक्षणे घ्या, जबाबदारीच्या नोकर्‍या करा आणि मग मीटिंगला येऊन बसत जा! अरे हो, तो जितेश डॉक्टर झाला. साले डोनेशनचे डॉक्टर हे! भरले असतील कुठलेतरी दहा पाच लाख कर्ज काढून! काय? जितेश काय म्हणतो माहितीय का मला? म्हणे अत्रेकाकांची ट्रीटमेंट मीच केली, त्यांच्या मुलाने हॉस्पीटलमध्ये पाय ठेवला नाही आणि त्यांच्या पेन्शनीतून त्यांचा हॉस्पीटलचा खर्च भागेना म्हणून मी म्हणे बावीस हजार दिले. हो का रे? पण मी काय म्हणतो अत्रे? हा एक प्रकारे आपला हक्कच नाही का? साले राज्य आपले, जमीन आपली, हे उंटावर बसणारे लोक वाळवंट सोडून इकडे येणार आणि पाणी पुरत नाही म्हणणार! ह्यांना पडला भुर्दंड तर बिघडले काय च्यायला?

अरे हो! परवा ती ही भेटली होती... कोण ती??... आशा आशा! आशाबाई म्हणतात आता सगळे तिला! नवर्‍याने हाकललेली! पदरात दोन पोरं! अडाणी नंबर एक! तू अन् तुझ्या बायकोने घरकामाला ठेवलं तेव्हा कुठे उभी राहिली आयुष्यात! आणि तिच्या त्या चार वर्षाच्या मुलाने कप फोडला तेव्हा? कसली हाणली होतीस तू त्याच्या कानाखाली. वर हग्या दम भरला होतास त्या बाईला. तुझ्या नवर्‍याने तुला हाकलले म्हणून इथे ठेवले आहे. ह्या कपाचे पैसे पगारातून कापणार म्हणालास आणि कापलेसही! कसली भेदरून ती बाई त्या मुलाला जवळ घेऊन तुझ्याकडे बघत होती. तुझा लेका अत्रे थाटच निराळा होता हां पण! तर हां! परवा ती रस्त्यात भेटली आणि म्हणाली काय माहितीय का? म्हणे लेक मालिश करायला शिकला माझा. साली ह्यांना कामंही असलीच जमणार! कधी इमानदारीत शिकणार नाहीत हे! तर म्हणे अत्रेसाहेबांचं डावं अंग लुळं पडलंय, अन् माझा लेक रोज चोळून देतो. पैसे घेत नाही. मी मनात म्हंटलं पैसे मागायला तोंड आहे का त्याला? आयुष्यात उभाच मुळी तो तुझ्यामुळे राहिलाय. पण अत्रे? मला कळलंच नव्हतं रे तुला पॅरलिसिस झाल्याचं? आता तर चांगला दिसतोयस की? खोटं बोलली असणार ती बया नक्कीच!

अरे त्यावरून आठवलं! लोकं किती खोटं बोलतात ना? मगाशी इथला महापालिकेचा कर्मचारी फोनवर एका गुरुजींना म्हणाला की लवकर वैकुंठावर या! ब्राह्मणाची बॉडी आलीय! तिकडून त्याला कोणीतरी भोसडला, म्हणे मेल्यावर जातपात पाळताय, आंदोलन करू काय?

अत्रे??????.... काय सांगतोस काय?...... लेका मेलास तू? अरे पण......

अरे हो! तुला सांगायचेच राहिले. मीही मेलो कधीच! इथे फ्लॅट सिस्टीम नाही, पाणीप्रश्न नाही, रात्रभर बल्ब जळवावा लागत नाही, टिचभर खोलीपेक्षा कमी जागाही पुरू शकते, कोणी कोणाला 'आमच्या राज्यात का आलात' असे म्हणू शकतही नाही आणि म्हणू इच्छीतही नाही! अत्रे, अरे इथे दहा रुपये वर्गणीही मागावी लागत नाही रे आपल्याला जाळायला, महापालिका बेवारशी प्रेत म्हंटले की स्वतःहून उचलून जाळून टाकते अत्रे!

अरे हो, ते एक विचारायचं विसरलोच की मी?

अत्रे??????...... तुझा तो...... हा कुठे असतो रे आता??????...... तुझा तो अहं?

===============

-'बेफिकीर'!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच!!! एकदम पटेश! असा फाजिल अहं मिरवत फिरणार्‍यांच्या थोबाडित मारणारा लेख.

जबरी! हा अनूभव प्रत्यक्ष घेतलाय्.:फिदी: मी, माझा, माझे म्हणणार्‍या माणसावर दुसर्‍याची मदत घ्यायची कशी वेळ येते, ते मध्यंतरी अनूभवले. काही लोक मोठ्या मनाने आपल्या अशा चूका मान्य करतात आणी काही मात्र सुधरता सुधरत नाहीत. यात माणसेच कशाला? बायका पण असतात की वो.

Always be kind with people on your way up.... because you never know whom you will meet on your way down!!!

खूप पूर्वी वाचलेला हा सुविचार आठवला. बेफि, छान लिहिल आहे

चांगल लिहिलय.
तुमच ऑब्जरव्हेशन चांगलं आहे बेफी.
आणि तुम्ही व्यक्तही करु शकता. Happy

Pages