मराठी गझल उमलत आहे

Submitted by बेफ़िकीर on 25 November, 2013 - 13:26

मी सच्चा आहे, पण जगाने मला जाणले नाही, हे असले जग मी तुच्छ लेखतो.

मराठी गझलने हे सांगणे केव्हाच थांबवलेले आहे.

मराठी गझलेला प्रेयसी, गमे-रोजगार, सामाजिकता, निसर्ग, जातपात, नोस्टॅल्जिया, चमत्कृती, पचण्यास सुलभ असा स्पष्टवक्तेपणा हे व इतर कित्येक असे अनेक कोन लाभलेले आहेत.

वैभव देशमुख आणि सतीश दराडे ह्यांच्या गझला माणसातील हारवलेले माणूसपण जागवत आहेत.

डॉ. अनंत ढवळेंची तर परंपराच वेगळी निघालेली आहे.

डॉ. समीर चव्हाण गझलेत सूक्ष्म भावनिक कंगोरे आणत आहेत.

डॉ. कैलास गायकवाड ह्यांची गझल परखड होत चाललेली आहे.

एकाच आकृतीबंधात इतके वैविध्य दिसणे खचितच आनंददायी आहे.

चित्तरंजन भटांची गझल लालित्य, गझलेचा बाज आणि लाज सांभाळूनही एकसे एक सरस खयाल देत आहे.

गझलेला एकच 'खरा' चेहरा आणि बाकी मुखवटे होते, आता चेहरेच चेहरे आहेत.

ढवळे म्हणतातः मी एकटाच होतो, मी एकटाच आहे

चित्तरंजन भटांमधील निरागस मुलगा म्हणतो: हुंदडावे वाटले आजन्म वार्‍यासारखे

सतीश दराडे, पुस्तके जाळून चूल पेटवणारी मुलगी बघून म्हणतातः या मुलीला कसे मी अडाणी म्हणू

लेट्स विटनेस द सेलिब्रेशन नेम्ड अ‍ॅज मराठी गझल!

आनंदयात्री म्हणतातः वाहत्या गर्दीत माझा चेहरा शोधू नको तू

विदिपा म्हणतातः इतक्या आवेगाने त्याची बंडी भिडते घामाला!

सत्यवादी वैवकु वयानुसार विठ्ठलाला विचारतो: भिजण्यास घाबरतात त्या पोरी कश्या पटवायच्या?

सुप्रिया जाधव उद्गारतातः दररोज एक वादळ दारावरून जाते

ज्येष्ठ व माझे आवडते गझलकार श्री. प्रदीप कुलकर्णी म्हणतातः

मी असा तसा काही, उन्मळायचो नाही!

लोकहो, आणखी काय हवे आहे?

या ललितलेखाचा शेवट दोन अत्यावश्यक शेरांनी करतो:

क्षणांवर काळजीपूर्वक क्षणांची चवड रचलेली
उभे आयुष्य म्हणजे एक डोलारा असू शकतो - वैभव जोशी

मला भेटायला आले, मला भेटून जाताना......
मला भेटायचे नाही असे ठरवून गेलेले - डॉ. ज्ञानेश पाटील

कृपया, मराठी गझलच्या बदलत्या रुपाला दमदार पाठिंबा द्या मित्रांनो!

घाईघाईत खरडलेल्या लेखात अनेक नामोल्लेख चुकून राहून गेलेले आहेत. ही माणसे गझलेतील जाणती माणसे असून गझलेला नवीन डायमेन्शन देऊ करणारी माणसे आहेत.

पुलस्ति

क्रांति सडेकर

अभिजीत दाते

याशिवाय, रसप, वैभव फाटक व आणखीन काही ताजेतवाने गझलकार नवनवीन खयाल देत आहेतच.

जसजशी नांवे सुचत जातील तसतशी ती शेरांसहित मूळ लेखात नोंदवली जातीलच.

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद.
भूषणः मोठ्या मनाने लिहिलेस तू सगळे.
तुझ्या योगदानाचा उल्लेख टाळणे अप्रशस्त ठरेल.
मला अतिशय आवडलेला तुझा एक शेर देत आहे:

घातली मी साद जेव्हा थांबले नाही कुणी
चांगले आहेत सारे आपले नाही कुणी

मराठी गझल भरभराटीकडे जात आहे असे म्हणायला हरकत नसावी.

समीर

सुंदर लेख. आजच्या मराठी गझलेत वाचकाला विचारप्रवण करण्याचे, भावविवश करण्याचे सामर्थ्य नक्कीच आहे. मुख्य म्हणजे एखाद्या नवोदिताला या काव्यप्रकाराबद्दल प्रत्यक्ष/ अप्रत्यक्षरित्या भरभरून शिकता येईल अशी संधी उपलब्ध आहे, ज्ञान वाटण्यास तयार ज्येष्ठ माणसे आहेत. केवळ सादरीकरणातूनच नव्हे तर लिखित शब्दांतूनही तितक्याच उत्कटतेने भावना पोचवणारे गझलकार आहेत. त्यादृष्टीने मराठी गझल नक्कीच भरभराटीकडे जात आहे. चिअर्स टू दॅट.
निव्वळ वाचक म्हणून कधी कधी न रुचणारी बाब म्हणजे काही कवींच्या ठायी असलेली अनावश्यक आक्रमकता. एकमेकांवर टिका टिप्पणी विशेषतः प्रतिकूल टीका करताना गोष्टी गुद्यांवर यायला वेळ लागत नाही. निखळ चर्चा उपकारकच असली तरी अश्या अकारण हमरीतुमरीने इतरांचे अनिष्ट मनोरंजन होते आणि मुख्य म्हणजे गझल बदनाम होते असे वाटते.

गजलेतल्या तांत्रिक बाजू कळत नसल्या तरी गजल वाचायला खूप आवडते. मायबोलीवर येऊन तुम्हां सर्वांच्या अनेक सुंदर गजला वाचायला मिळाल्या त्याबद्दल सगळ्यांचेच खूप आभार आणि खूप शुभेच्छा!

बे.फि.म्हणत आहेत ते सत्य आहे. त्याबरोबरच नाण्याची दुसरी बाजू पाहिलीच पाहिजे. ती म्हणजे "भरतीचे शेर". फक्त तांत्रिकदृष्ट्या बरोबर आहे म्हणून एखादा शेर गज़लेत घुसडावा का? याचं भान प्रत्येक गज़लकाराने - विशेषतः प्रथितयश गज़लकाराने - ठेवलेच पाहिजे.

मॅनेजमेन्टमध्ये एक जपानी थेयरी आहे. कामाच्या जागी अनावश्यक गोष्टींची अडगळ काढून टाकणे. त्याच्यात एक खूप सुंदर विचार आहे. एखादी गोष्ट लागणार आहे; ती ठेवा. एखादी गोष्ट लागणार नाही हे खात्रीपूर्वक ठाऊक आहे; ती काढून टाका; आणि एखादी गोष्ट लागणार आहे किंवा नाही हे खात्रीपूर्वक सांगता येत नाही ; ती काढून टाका... नंतर कधीतरी लागेल या विचाराने ठेऊ नका! हीच वृत्ती गज़लकाराने बाळगली पाहिजे. हे खूप कठिण काम आहे. पण हे केल्याशिवाय गज़ल सुधारणार नाही.

माझे 'आयुष्यात' एक प्रामाणिक मत आहे. ज्या क्षेत्रात मी अजून काही करून दाखवलेले नाही, ते क्षेत्र नक्कीच आश्वासक आहे.

पा
ठिं
बा

!

समयोचित लेख!

धन्यवाद!

वे कह रहे है गजलगो नही रहे शायर
मै सुन रहा हरेक सिम्त से गजल लोगो
- दुष्यंतकुमार

संपूर्ण ललित आणि समीरजींच्या प्रतिसादाशी पूर्णतः सहमत . माझ वाचन तसं पाहता अगदीच सुमार पण गझलेच्या ख-या अर्थाने प्रेमात पडायला झाल ते आजकालची मराठी गझल वाचूनच.

-सुप्रिया.

भूषणजींशी सहमत आहे.

गझलेला अनेक चेहरे लाभले आहेत.

एक अतिशय सच्चा आणि प्रामाणिक चेहरा आहे,"बेफिकीर" यांचा.

गझलेत प्रत्येक जण शक्यतो स्वतःस इतरांकडून भेटलेल्या व्यथेचे उदात्तेकरण करुन किंवा प्रदर्शन मांडून आपले वेगळेपण अधोरेखित करत असतो.....प्रेयसी,देव्, मित्र्,नातलग यांनी आपला कसा गैरफायदा घेतला किंवा आपण किती दु:ख पचवत आहोत ब्ला ब्ला.....

पण भूषणजी या पठडीपेक्षा पूर्णतः वेगळे आहेत.आपण केलेल्या चुकाही " तुझ्या चौथ्याच दि हवशी बारमध्ये प्यायलो आई" अश्या जाहीरपणे रीयल बेफिकिरीने मांडतात. मराठी गझलेतील आजच्या मोजक्या अग्रणींमधे भूषणजी यांचे स्थान अव्वल आहे.

या प्रतिसादास अंत नसेल...पण तरी याचा शेवट भूषणजींच्याच एका शेराने करतो.

कागदाचे ढीग संपावे तरी उरते कधी
अन कधी आयुष्य हे ओळीत एका मावते.

--बेफिकीर.

<<<<<<<एक अतिशय सच्चा आणि प्रामाणिक चेहरा आहे,"बेफिकीर" यांचा.>>>>>

<<<<<पण भूषणजी या पठडीपेक्षा पूर्णतः वेगळे आहेत.आपण केलेल्या चुकाही " तुझ्या चौथ्याच दि हवशी बारमध्ये प्यायलो आई" अश्या जाहीरपणे रीयल बेफिकिरीने मांडतात. मराठी गझलेतील आजच्या मोजक्या अग्रणींमधे भूषणजी यांचे स्थान अव्वल आहे.>>>>>>

अनुमोदन !!

मित्रांनो, म भांच्या 'तू मला ओवाळ आता मी तुला ओवाळतो' वळणावर ही चर्चा जाणार नाही याची कृपया जबाबदारी घ्यावीत. आपण एकमेकांनाच ग्रेट म्हणत बसणे हा येथील हेतू असू शकत नाही. आपले सर्वांचे एकमेकांवर व एकमेकांच्या गझलांवर पारदर्शक व निर्हेतुक प्रेम आहे.

एनीवे धागा काढण्याची बुद्धी मला (इतर कोणत्यातरी चर्चेमुळे) झालीच आहे तर या धाग्यावर खालील गोष्टी करता येतील का तेही बघूयात का?

१. मराठी गझलेचा कसकसा विकास होत आहे याची स्वत:ला आलेली प्रत्यंतरे, अनुभव येथे नोंदवायला लागू.

२. उत्तम शेर (मग ते कोणाचेही असोत, फक्त मराठी व तांत्रिकदृष्ट्या शुद्ध असायला हवेत) नोंदवू व ते का आवडले ते लिहू. 'का आवडले नाहीत' अश्या स्वरुपाच्या मतांचेही स्वागत पण चर्चा संयत ठेवू.

३. मराठी गझल क्षेत्रातील नवीन डेव्हलपमेंट्स (काही झाल्यास) येथे नोंदवू.

पटत आहे का बघा! खरा पाठिंबा हा असा असायला हवा असे मला तरी वाटते. तरीही, माझ्याही गझलेचे कौतुक करणार्‍या दिलखुलास रसिकांचे व गझलकारांचे नम्र आभार मानतो.

-'बेफिकीर'!

प्राजक्ता पटवर्धन उर्फ मायबोलीकर गझलकारा प्राजू ह्यांचा 'मौनाची आर्जवे' हा प्रथम गझलसंग्रह ३० नोव्हेंबर रोजी प्रकाशित होत आहे. प्राजू त्याबाबतीतील धागा काढतीलच. पण ह्या गझलसंग्रहास प्रकाशनाआधीच बुलढाणा साहित्य परिषदेचा 'आद्य गझलकार श्री अमृतराय पुरस्कार' मिळालेला आहे.

अभिनंदन प्राजू!

-'बेफिकीर'!

गझल ह्या विषयाचीच मुळात नव्याने तोंडओळख झालेला मी, इतकेच म्हणू शकतो की मराठीत काहीही विधायक असं घडत असेल तर माझा त्याला पाठिंबा आहे; कारण मराठीवर माझं खूप प्रेम आहे.

’मराठी गझल उमलत आहे’ ही वस्तुस्थिती असल्यास आनंदाची बाब आहे.

हा धागा वाचून अधिक माहिती मिळवणे आणि मराठी गझलेला शुभेच्छा देणे इतकेच मला करता येण्यासारखे असल्याने ...... खूप शुभेच्छा.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
बेफींच्या वरील पोस्टमधले खालील मुद्दे महत्वाचे वाटतात.
१. मराठी गझलेचा कसकसा विकास होत आहे याची स्वत:ला आलेली प्रत्यंतरे, अनुभव येथे नोंदवायला लागू.

२. उत्तम शेर (मग ते कोणाचेही असोत, फक्त मराठी व तांत्रिकदृष्ट्या शुद्ध असायला हवेत) नोंदवू व ते का आवडले ते लिहू. 'का आवडले नाहीत' अश्या स्वरुपाच्या मतांचेही स्वागत पण चर्चा संयत ठेवू.

३. मराठी गझल क्षेत्रातील नवीन डेव्हलपमेंट्स (काही झाल्यास) येथे नोंदवू.

>>गझल ह्या विषयाचीच मुळात नव्याने तोंडओळख झालेला मी, इतकेच म्हणू शकतो की मराठीत काहीही विधायक असं घडत असेल तर माझा त्याला पाठिंबा आहे; कारण मराठीवर माझं खूप प्रेम आहे.>>
उल्हासजींशी सहमत. तसेच अमेय, अंजली, शरद, रसप यांचेही विचार आवडले .

माझी गझलशी ओळख फार जुनी, पण तिच्या खोलात जाणे होत नाही आळसाने किंवा सहजप्रवृत्तीने.
पण म्हणून काय झालं , एखादी चुकली माकलेली गझल लिहिण्याचा हक्क राखून ठेवत आहे Happy

मायबोलीवरच अलीकडची गझल वाचली.बेफिकीर,वैवकु , सुप्रिया, प्राजू,(अभिनंदन प्राजू! ), विदिपा, कैलासजी, समीर.. तुम्ही सर्व माबोकर गझलकारांनी रंगवलेल्या गझलच्या सुंदर, तरुण, रसपूर्ण अशा कित्येक मुद्रा भावल्या . कधी तंत्रच कुरघोडी करतानाही जाणवले. शब्दच्छल व वैचारिक वाद अन हाणामाऱ्याही वाचल्या , सोसल्या.तुमच्या बांधीलकीचेच ते आविष्कार आहेत हे मुळात जाणवले.

गेल्या वर्षभरात गझलने अनेक आनंदाचे क्षण दिलेत एकूण कवितेसारखेच. खूप आभार अन शुभेच्छा !

एक नम्र सूचना:- हा एका सामान्य मायबोलीकराचा प्रतिसाद आहे. 'गझलकारा'चा नाही. मी आता गझलकार वगैरे राहिलेलो नाही. कृपया माझ्या कुठल्याही लिखाणाकडे यापुढे याच दृष्टीने पाहिले जावे.

---------------------------------------------------------

प्रस्तुत लेख आजकालच्या, त्यातही नेटवर लिहिणार्‍या शायरांच्या गेल्या पाच सात वर्षांच्या लिखाणावर बोलतो आहे. माझ्या (म्हणजे सामान्य माबोकराच्या) मते 'मराठी गझलचे वर्तमान आणि भवितव्य' सारख्या मोठ्या विषयावर काहीएक निष्कर्षात्मक बोलण्यासाठी हा डेटा अपुरा आहे. इंटरनेटवर लिहित नसल्याने चंद्रशेखर सानेकर यातून सुटले का? किंवा मग यवतमाळचा सिद्धार्थ भगत? हे लोक काय ताकदीचे लिहितात, हे त्यांचे छापील लिखाण वाचले त्यानंतर कळले मला. कृपया इथे लग्नपत्रिकेप्रमाणे सगळ्यांची नावे आलीच पाहिजेत, अशा स्वरूपाचा हा मुद्दा नाही. पण 'भटांनंतरची गझल' चे दोन्ही वर्जन्स (श्री. कदम आणि श्री. पांचाळे) वाचल्यानंतर मला प्रकर्षाने एक गोष्ट जाणवली, ती म्हणजे महाराष्ट्रभर (किंवा जगभर) जी मराठी गझल लिहिली जाते आहे, तीसुद्धा नेटवर- त्यातही मायबोलीवर लिहिल्या जाणार्‍या गझलेइतकीच दर्जेदार आणि भिकारसुद्धा असल्याने तितकीच उल्लेखनीय आहे. श्री. बेफिकीर यांनी दूरान्वयानेही तसे सुचवलेले नसले तरी हा लेख 'आपण म्हणजेच मराठी गझल' असा समज अन्य अ‍ॅमॅच्युरांच्या मनात उत्पन्न करून देण्यास पुरेसा आहे. आत्मविश्वास ही एक चांगली गोष्ट आहे, पण मराठी गझलेची पालखी आपल्या चिमुकल्या खांद्यांवर घ्यायला उत्सुक असणार्‍या असंख्य महाभागांना या ओझ्याची व्याप्ती काय आहे, हे आधी कळले पाहिजे असे वाटते. मला ती पूर्णपणे समजली आहे का? तर अजिबात नाही. पण तुम्हां लोकांपैकी अनेकांना ती समजलेली नाही, एवढे मला नक्की समजले आहे. पालखीच्या वजनाखाली तुम्ही चिरडले जाल, याचे वैषम्य नाही. पालखी कोलमडेल- ही भीती आहे.
मला या लेखातले पहिलेच वाक्य खटकले-
मी सच्चा आहे, पण जगाने मला जाणले नाही, हे असले जग मी तुच्छ लेखतो.
मराठी गझलने हे सांगणे केव्हाच थांबवलेले आहे.

मुळात हे सांगण्यात काय चूक आहे? त्या पिढीच्या संवेदना त्यांनी त्यांच्या शब्दात, त्यांच्या गझलेत, त्यांच्या पद्धतीने मांडल्या. गेट ओव्हर इट ! तुम्हाला आवडेल असे त्यांनी का लिहावे? तुम्ही लिहिलेले त्यांना आवडलेच असते का? तुमचे शेर पुढच्या पिढीला आवडतील याची खात्री आहे का? थोरामोठ्यांबद्दल दाखवण्याचा सगळा आदर प्रस्तुत नेटकरी पिढीने फक्त उर्दू शायरांबद्दल राखून ठेवला आहे असे दिसते. मलासुद्धा कुठल्याही जुन्या काळच्या मराठी गझलकारापेक्षा वैभव जोशींचे शेर आज जास्त आवडतात, श्रेष्ठ वाटतात.

बोलला नाही तरीही जाब मागत राहिला
रात्रभर माझ्या उशाशी फोन वाजत राहिला
खूप दिवसांनी तुला मी फेसबुकवर पाहिले
स्क्रोल केल्यासारखा मग काळ सरकत राहिला

या शेरांशी मी कनेक्ट होऊ शकतो, कदाचित व्याकूळ होऊ शकतो. पण आणखी तीस वर्षांनी एखादा गझलवीर या शेरांना 'हाऊ चाईल्डिश' म्हणत हसू शकतो, ही शक्यता आहेच ना? त्याने वैभवचे मोठेपण कमी होणार नाही. त्याक्षणी त्या रचनेने तुम्हाला काय फील दिला, हे महत्वाचे. भटांचे आणि समकालिनांचे आज तुम्हाला मंचीय अथवा टाळ्याखाऊ वाटत असलेले शेर कधीतरी कोणाच्यातरी अंगावर काटा किंवा डोळ्यात पाणी आणून गेले असतील, त्याचा अनादर होऊ नये असे वाटते. कुठल्यातरी वयस्कर दाढीधारी शायराच्या पडदानशीन कुमारिकेप्रति असलेल्या नाजूक भावना आस्थेने समजावून घेणारे संवेदनशील लोक आहात तुम्ही. आपल्या ओबडधोबड मराठी मनाच्या भावनाही समजावून घ्या !

एक दुसरा मुद्दा आहे माध्यमाचा. गझल किंवा कुठलीही कलाकृती नुसती निर्माण करून चालत नाही. ती लोकांपर्यंत पोचवावी लागते. आधी मुशायर्‍यात गझल सादर करणे किंवा छापून लोकांपर्यंत पोचवणे हे दोन पर्याय असत. त्यात आता नेटची भर पडली आहे.
जाहीर मुशायर्‍याचे बरे असते. लोक फक्त ठराविक शेर (किंवा विचार) लक्षात ठेवतात. त्यांनाच दाद मिळालेली असते. क्वचित कोणी प्रत्यक्ष भेटून अमुकतमुक खूप आवडले वगैरे सांगतो. बाकी शेर हवेवर वाहून जातात. पण यात धोका असा असतो की दादखाऊ, भडक, विचित्र शेर लिहिण्याची प्रवृत्ती वाढते. एखादा सखोल विचार असलेला चांगला शेर मँगो पीपलच्या डोक्यावरून जातो आणि त्याला काहीच दाद न मिळाल्याने नाउमेद झालेला शायर भविष्यात तशा प्रकारे लिहिणे टाळू शकतो.
हा धोका छापील माध्यमात नसतो. तुम्ही तुमचे मन कागदावर काढून ठेऊ शकता. कोण काय म्हणेल ही भीती एकांतात लिहिलेल्या कवितेला नसते. पण मग आपले लिखाण वाचून रसिकाचे डोळे पाणावले की त्याला जांभई आली हे कळण्याचीही काही सोय नसते. पत्र लिहून आवर्जून आपला अभिप्राय कळवणारे लोक दुर्मिळ असतात. मुशायर्‍यात बाकीच्या शायरांना तुम्ही ऐकता, कोणीतरी तुमच्या चुका सुधारते- एकूण ज्ञानाची थोडीफार देवाणघेवाण होते. ती सोय छापील माध्यमांत फारशी नसते.
नेटवर या दोन्ही माध्यमांचे फायदे आणि तोटे शतगुणित होऊन येतात.अर्थातच नेटचे फायदे अनेक आहेत. इथे तुम्हाला शिकायला बरेच मिळते. शिकवणारे (किंवा शिकवू शकणारे) लोक सदैव उपलब्ध असतात. इतरांच्या गझला केव्हाही आणि वारंवार वाचायला मिळणे शक्य असते. अर्थातच तुम्ही त्या गझलांच्या प्रभावाखाली येणेही शक्य असते.
मुशायर्‍याच्या स्टेजवर जायला किंवा कविता छापून आणायला तुम्हाला एक किमान 'हैसियत' लागते, ज्याची नेटवर अजिबात गरज नसते. तुम्ही लिंबुटिंबु असलात तरी एकदम ज्येष्ठांच्या समकक्ष 'कवी' किंवा 'गझलकार' या विभागात दाखल होता. हे म्हणजे चिंटू (दुसरी-ब) याने काढलेले 'त्रिकोणी डोंगररांगांतून डोकावणारा हसरा सूर्य आणि त्याने सोडलेली नदी' हे चित्र राजा रविवर्म्याच्या चित्राशेजारी ठेवण्यासारखे आहे. पण ते असो. नेटवर मुशायर्‍याप्रमाणेच तात्काळ दाद मिळू शकते, पण तशाच तात्काळ शिव्याही मिळू शकतात. एवढ्यावर गोष्ट थांबत नाही. शायरालाही प्रतिसाद द्यायची सोय असते. रसिक जसे कवीचे कवित्व काढू शकतो, तसे कवीही रसिकाची रसिकता काढू शकतो. आणि हे सगळे 'स्टोअर' होऊन जाते. मुशायर्‍यात मिळालेली किंवा न मिळालेली दाद कालांतराने विसरली जाते. नेटवरचे लिखित शब्द डाचत राहतात. हे आत्यंतिक इंटरॅक्टिव्ह माध्यम तुम्हाला खूप जास्त प्रभावित आणि व्याप्त करते, मधे जी स्पेस आवश्यक असते ती राहू देत नाही. हा निसरडा उतार आहे. इथे राजकारण करण्याला प्रचंड स्कोप असतो, आणि तुम्ही संत नसाल, तर तुम्ही या राजकारणात न पडणे जवळपास अशक्य आहे.
आपल्या लाडक्या मायबोलीवर आणि माझ्या पाहण्यात असलेल्या अन्य बर्‍याच मराठी साईट्सवर अनेकदा हेच चालते. कंपू बनतात. विरोधी कंपू बनतात. (काहीवेळा विद्रोही कंपूही बनतात!) 'अहो रूपम अहो ध्वनी' चे प्रयोग हाऊसफुल्ल चालतात. तुम्ही चांगल्या भावनेतून दिलेल्या नकारात्मक प्रतिसादानेही लोकांचे इगो दुखावले जातात- इतके की तुम्हाला फोन येऊन स्पष्टीकरण मागीतले जाऊ शकते ! एकाद्या विचित्र नावाआडून तुम्हाला शिव्या दिल्या जातात, ज्याचे तोंडही तुम्ही पाहिलेले नाही त्या माणसाकडून तुमची किंवा तुमच्याकडून त्याची अक्कल काढली जाते, वाचन काढले जाते, लाज काढली जाते.... सुदैवाने अद्याप चप्पल किंवा कपडे काढले जात नाहीत, आणि नुसत्या फोनऐवजी गुंड किंवा शार्पशूटर्स तुमच्या घरापर्यंत येत नाहीत. मी मायबोलीवर (आणि अन्य काही साईट्सवर) प्रकाशित झालेली प्रत्येक गझल वाचत असतो. पण चांगला अथवा वाईट असा काहीही प्रतिसाद देण्याची हल्ली भीती वाटायला लागली आहे ! प्रत्येक शब्द फार जपून लिहावा लागतो हल्ली. कोण कशाने दुखावेल सांगता येत नाही. कोणाशीही प्रदीर्घ वाद घालण्याचे किंवा स्पष्टीकरणे देण्याचे सामर्थ्य माझ्यात नाही. म्हणून या लेखाच्या निमित्ताने मनातली सगळी खदखद (किंवा गरळ म्हणा पाहिजे तर) काढून टाकतो आहे.

लोकहो ! मराठी गझलेची धुरा आहे तुमच्या खांद्यांवर. (फक्त तुमच्याच नाही.) तुमच्या हातून मोठे काम घडायचे असेल तर तुम्ही इतके बालिश, उथळ आणि आत्मकेंद्रित असून चालणार नाही. सल्ले देणारे सगळे शत्रू नसतात आणि कौतुक करणारे सगळे हितचिंतक नसतात, एवढी बेसिक समज तुम्हाला नसेल तर तुमच्या गझलेत काय खोली येणारे कप्पाळ ! तुमच्यापैकी अनेकजण उत्कृष्ट लिहितात, काहींचे काही शेर दैवी म्हणावेत इतके सुरेख असतात, अनेकजण प्रगतीपथावर आहेत आणि काहींना गझल कधीही वश होईलसे दिसत नाही. पण आपल्या मर्यादांचे भान प्रत्येकाला असावे आणि ते कोणी देत असेल तर त्याला पाण्यात पाहणे सोडून द्या, एवढेच सांगायचे आहे. सरस्वतीच्या पुत्रांचे मन इतके छोटे नसावे.

आणि हो, इंटरनेटचा आणखी एक उसूल आहे. मूळ लेखापेक्षा एखादा प्रतिसाद जास्त मोठा असेल, तर प्रतिसादकाचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय, तो गंडलाय असे हमखास समजावे.
थांबतो.

मित्र-मैत्रिणींनो,

मी गज़लचा बर्‍यापैकी अभ्यास केला आहे, वाचन केले आहे, चिंतन केले आहे. त्यानुसार माझी काही मते मांडतोय. ती पूर्वीसुद्धा वेळोवेळी मांडली असावीत; पण या ठिकाणी पुनरुक्ती करणे यथोचित ठरेल.

पहिला मुद्दा: गज़ल या शब्दाचा उच्चार कसा असावा. नक्कीच 'गझल' असा असू नये; गज़ल असाच असावा. हे मत डॉ. राम कदम, डॉ. विनय वाईकर, ज्येष्ठ गज़लकार इलाही जमादार, डॉ. सुरेशचंद्र नाडकर्णी, भीमराव पांचाळे [कुणी म्हणेल 'भीमराव पांचाळे गज़ल लिहीत नाहीत, फक्त गातात'. पण त्यांचे मत महत्वाचे आहे कारण ते उच्चाराशी संबंधित आहे.] या मान्यवरांनी मान्य केले आहे (किंबुहना त्यांच्यापासूनच मी हे शिकलो आहे). मग इतरांना मान्य करण्यास अडचण का यावी? याची तीन कारणे मला दिसतातः पहिले म्हणजे सुरेश भटांचा प्रभाव. दुसरे म्हणजे अगोदर गज़ल या उर्दू शब्दाचा गझल हा मराठी शब्द कसा झाला ते ठाऊक नसणे आणि तिसरे म्हणजे 'काय फरक पडतो' ही वृत्ती.

कै. सुरेश भट यांना मी मानतो. ते आणि त्यांची 'गझल' वंदणीय आहे हे मी मान्य करतो. पण म्हणून गज़ल चा उच्चार गझल करू नये असे माझे प्रांजळ मत आहे. दुर्दैवाने 'सुरेश भट म्हणतात ती पूर्व दिशा' ही वृत्ती बहुसंख्य गज़लकारांमध्ये बाणलेली आहे.

उर्दू गज़ल चे मराठी गझल कसे झाले याबद्दल मला कुठेही युक्तीवाद आढळला नाही. मी चिंतन करून काढलेला युक्तीवाद खालीलप्रमाणे आहे. गज़लचा अर्थ देताना कुणी म्हटले आहे की इंग्रजी गॅझेल या शब्दावरून गझल हा शब्द आला. हे चुकीचे आहे. इंग्रजी गॅझेल पूर्वी गज़ल पर्शिया इराण मध्ये प्रचलित होती. फक्त इतर असंख्य शब्दांप्रमाणे इंग्रजांनी त्यांना जे उच्चार जमत नव्हते त्याचा अपभ्रंश केला. आपण तो शब्द इंग्रजीतून उचलला; त्याऐवजी उर्दूमधून उचलायला हवा होता. जर उर्दूमध्ये गज़ल असा उच्चार होतो मग मराठीत का नाही? फक्त ज खाली टिंब देता येत नाही म्हणून? जहाज ज आणि राजा मधला ज हे दोन उच्चार आहेतच. आणि टिंब द्यायला हरकत काय आहे?

आता गज़ल थोडी भडक झाली असली तरी गज़ल चे मूळ स्वरूप एका 'शालीन स्त्री प्रमाणे' आहे. जड उच्चार अशा प्रवृत्तीला भावत नाहीत. हा फरक पडतो. मराठीतील काही मान्यवरांनी 'तो गझल' असे पुल्लिंगी स्वरूपसुद्धा केल्याचे आपल्याला ठाऊकच असेल.

माझी इतर मते मी कालांतराने सांगेन. सध्या थांबतो.

छान प्रतिसाद ज्ञानेश, काही भाग पटला काही नाही.

शरद - तुमचा मुद्दा (गझल / गजल) हा जुना आहे व त्यावर आता काही विशेष वाद राहिलेला नसावा, किंबहुना, गझल म्हणायला तरी काय हरकत आहे असे मला वाटते.

दरम्यानः

जातीने वरचढ होतो ना धर्माने धड होतो...
मी इथल्या मानवतेच्या भाग्याची पडझड होतो....

हा सतीश दराडेंचा फेसबूकवर वाचलेला एक शेर! (त्यांच्या परवानगीशिवाय देत आहे, आशा आहे की त्यांना ह्यात अडचण नसावी)

ह्या शेराबद्दल रसिकांना काय वाटते?

<<तुमचा मुद्दा (गझल / गजल) हा जुना आहे व त्यावर आता काही विशेष वाद राहिलेला नसावा, किंबहुना, गझल म्हणायला तरी काय हरकत आहे असे मला वाटते.>>

तसे सारेच मुद्दे जुने आहेत. Happy

हरकत अशी आहे की गज़ल ही स्त्रिलिंगी आहे. झ हा जड उच्चार या काव्यप्रकाराला मानवत नाही.

ज्ञानेश,

प्रतिसादातील कळकळ अक्षरशः पोहोचली त्यामुळे प्रतिसाद फारच आवडला. परंतू आधी डिस्क्लेमर देऊन स्वतःला बाजूला काढून ठेऊन उरलेल्यांना तुम्ही, तुमचे, तुमची, तुमच्या असे संबोधणे पटले नाही.

आपण सध्या गझल लिहीत नाहीत(म्हणजे निदान जालावर तरी पाहण्यात नाहीत) म्हणजे आपला गझलेशी संबंध संपला असे आपण मानू शकाल पण रसिकांना ज्ञानेश पाटील गझलकार वाटतात की नाही हे आपल्या हातात नाही. मी तुम्हाला गझलकारच समजतो(माझ्या समजण्याला काही विशेष भाव आहे असे म्हणायचे नसून हा एक रसिक म्हणून माझा अधिकार आहे असे म्हणायचे आहे - आय हॅव पावर टू चूझ).

जातीने वरचढ होतो ना धर्माने धड होतो...
मी इथल्या मानवतेच्या भाग्याची पडझड होतो....

शेर ठीक वाटला

'होतो' ऐवजी 'आहे' ही रदीफ चालू शकते. होतो म्हटले की आता परीस्थितीत बदल झालेला आहे किंवा व्यक्ती हयात नाही असा अर्थ निघतो. परीस्थितीत बदल झाला असल्यास शेर केवळ वर्णन ह्या पलिकडे जात नाही.

मात्र ज्ञानेशने वर म्हटल्याप्रमाणे हा शेर मुशायर्‍यात टाळ्या घेण्यासाठी आयडीयल शेर आहे असे मला वाटते.

इथली मानवता असे का म्हटले आहे? अन्य कुठल्या ठिकाणी मानवता असावी?

जर धर्मानेच धड नाही तर जातीचा प्रश्न उद्भवत नाही असेही वाटते.

हे डिसेक्शन नाही, फक्त मुद्दे मांडत आहे, चर्चेचे स्वागत!

<<इथली मानवता असे का म्हटले आहे? अन्य कुठल्या ठिकाणी मानवता असावी?>>
इथल्या म्हणजे अर्थातच 'भारतातल्या'. अन्य देशातल्या नव्हे Happy

जातीने वरचढ होतो ना धर्माने धड होतो...
मी इथल्या मानवतेच्या भाग्याची पडझड होतो....

शेर अगदी आतून आलाय अस वाटून गेल. जी बाब माणसाच्या हातात नसते नि तात्कालिन स्वार्थासाठी समाजाने ती लादलेली असते पण त्यावरूनच जेव्हा एखाद्याची पत ठरवली जाते तेव्हा मनाला येणारी विनस्मकता तंतोतंत उतरलीय शेरातून.

'मी इथल्या मानवतेच्या भाग्याची पडझड होतो....'

वा ! खरोखर अशा मानवतेच्या भाग्याची जितकी किव करावी तितकी थोडीच आहे.

धन्यवाद.

-सुप्रिया.

ज्ञानेशरावांचे बरेच मुद्दे पटले नाहीत. अपरिपक्व वाटले म्हणून लिहीत आहे.

एक नम्र सूचना:- हा एका सामान्य मायबोलीकराचा प्रतिसाद आहे. 'गझलकारा'चा नाही. मी आता गझलकार वगैरे राहिलेलो नाही. कृपया माझ्या कुठल्याही लिखाणाकडे यापुढे याच दृष्टीने पाहिले जावे.

गझलकार किंवा कवी हा आयुष्यभर कवीच असतो. आपण गझलकार राहिला नाहीत म्हणता मात्र आपल्या प्रतिसादाचा टोन सामान्य मायबोलीकराचा वाटत नाही. किंबुहना ते शक्यच नाही.
माणूस आपल्यातला कवी बाजूला काढून तटस्थेने भूमिका मांडू शकतो हे पटत नाही.

प्रस्तुत लेख आजकालच्या, त्यातही नेटवर लिहिणार्‍या शायरांच्या गेल्या पाच सात वर्षांच्या लिखाणावर बोलतो आहे. माझ्या (म्हणजे सामान्य माबोकराच्या) मते 'मराठी गझलचे वर्तमान आणि भवितव्य' सारख्या मोठ्या विषयावर काहीएक निष्कर्षात्मक बोलण्यासाठी हा डेटा अपुरा आहे. इंटरनेटवर लिहित नसल्याने चंद्रशेखर सानेकर यातून सुटले का? किंवा मग यवतमाळचा सिद्धार्थ भगत? हे लोक काय ताकदीचे लिहितात, हे त्यांचे छापील लिखाण वाचले त्यानंतर कळले मला. कृपया इथे लग्नपत्रिकेप्रमाणे सगळ्यांची नावे आलीच पाहिजेत, अशा स्वरूपाचा हा मुद्दा नाही.

आपण छेडलेल्या प्रश्नाचे उत्तर आपल्या शेवटच्या ओळीत आहे. भूषणने कुठलाही क्लेम केलेला नाही. भावनेच्या भरात प्रामाणिकपणे सुचेल तसे लिहिले असावे, असे वाटले. त्याची आवड-निवड रिफलेक्ट होणे स्वाभाविक आहे.
हे सांगायची गरज नाही. किंबहुना हे सांगायची गरज वाटत असेल तर इथल्या लोकांना काही कळत नाही ह्याकडे बोट जाते.

पण 'भटांनंतरची गझल' चे दोन्ही वर्जन्स (श्री. कदम आणि श्री. पांचाळे) वाचल्यानंतर मला प्रकर्षाने एक गोष्ट जाणवली, ती म्हणजे महाराष्ट्रभर (किंवा जगभर) जी मराठी गझल लिहिली जाते आहे, तीसुद्धा नेटवर- त्यातही मायबोलीवर लिहिल्या जाणार्‍या गझलेइतकीच दर्जेदार आणि भिकारसुद्धा असल्याने तितकीच उल्लेखनीय आहे. श्री. बेफिकीर यांनी दूरान्वयानेही तसे सुचवलेले नसले तरी हा लेख 'आपण म्हणजेच मराठी गझल' असा समज अन्य अ‍ॅमॅच्युरांच्या मनात उत्पन्न करून देण्यास पुरेसा आहे. आत्मविश्वास ही एक चांगली गोष्ट आहे, पण मराठी गझलेची पालखी आपल्या चिमुकल्या खांद्यांवर घ्यायला उत्सुक असणार्‍या असंख्य महाभागांना या ओझ्याची व्याप्ती काय आहे, हे आधी कळले पाहिजे असे वाटते. मला ती पूर्णपणे समजली आहे का? तर अजिबात नाही. पण तुम्हां लोकांपैकी अनेकांना ती समजलेली नाही, एवढे मला नक्की समजले आहे. पालखीच्या वजनाखाली तुम्ही चिरडले जाल, याचे वैषम्य नाही. पालखी कोलमडेल- ही भीती आहे.

गझलेची पालखी वगैरे रूप देणेच मला हास्यास्पद वाटते. जो तो आपल्याला एक्प्रेस करण्यासाठी, आपले कौतुक पहाण्यासाठी गझल लिहित/जगत असतो. काही जुन्या गझलकारांचा गझलेला आयुष्य समर्पण केल्याचा दावा आहे तोच चुकीचा आहे. मुशायरा फुकटात करता का तुम्ही. हे असे की मी म्हणायचे की मी शिक्षणासाठी आयुष्य लावले. पगार घेत नाही का तुम्ही ? कसली डोंबल्याची ओझ्याची व्याप्ती. गझल/कविता माझा आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे. त्याविषयी हवे तितके हवे तेव्हा बोलायला तयार आहे. ह्यात माझा स्वार्थ आहे. मानवाच्या कोणत्याही कृतीत एक स्वार्थ दडलेला असतो. ह्यात गैर काहीच नाही.

मला या लेखातले पहिलेच वाक्य खटकले-
मी सच्चा आहे, पण जगाने मला जाणले नाही, हे असले जग मी तुच्छ लेखतो.
मराठी गझलने हे सांगणे केव्हाच थांबवलेले आहे.

मुळात हे सांगण्यात काय चूक आहे? त्या पिढीच्या संवेदना त्यांनी त्यांच्या शब्दात, त्यांच्या गझलेत, त्यांच्या पद्धतीने मांडल्या. गेट ओव्हर इट !

चूक काहीच नाही. मात्र अश्याने गझल तक्रारींची यादी बनत असेल तर गझल (पोएट्री) राहते कुठे ?
रिवायती शायरीवर फिराकने मारलेले शेरे आपण वाचलेत का ? अश्याच भावना नंतर ऊरबडवेपणा होऊन राहतात की नाही ?

तुम्हाला आवडेल असे त्यांनी का लिहावे? तुम्ही लिहिलेले त्यांना आवडलेच असते का? तुमचे शेर पुढच्या पिढीला आवडतील याची खात्री आहे का? थोरामोठ्यांबद्दल दाखवण्याचा सगळा आदर प्रस्तुत नेटकरी पिढीने फक्त उर्दू शायरांबद्दल राखून ठेवला आहे असे दिसते.

ज्याने-त्याने आपल्याला पटेल-आवडेल असेच लिहायला हवे.
भटांच्या पिढीने मोठ्या प्रमाणात आणि दुदैवाने भटांना काय आवडतं ते लिहिलेय.
उदाहरणासकट सांगता येईल. पण राहून दे.

पण आणखी तीस वर्षांनी एखादा गझलवीर या शेरांना 'हाऊ चाईल्डिश' म्हणत हसू शकतो, ही शक्यता आहेच ना? त्याने वैभवचे मोठेपण कमी होणार नाही. त्याक्षणी त्या रचनेने तुम्हाला काय फील दिला, हे महत्वाचे. भटांचे आणि समकालिनांचे आज तुम्हाला मंचीय अथवा टाळ्याखाऊ वाटत असलेले शेर कधीतरी कोणाच्यातरी अंगावर काटा किंवा डोळ्यात पाणी आणून गेले असतील, त्याचा अनादर होऊ नये असे वाटते. कुठल्यातरी वयस्कर दाढीधारी शायराच्या पडदानशीन कुमारिकेप्रति असलेल्या नाजूक भावना आस्थेने समजावून घेणारे संवेदनशील लोक आहात तुम्ही. आपल्या ओबडधोबड मराठी मनाच्या भावनाही समजावून घ्या !

हे पहा एखाद-दुसरा शेर कोणाचाही फसू शकतो. मात्र एक कवी म्हणून ग्रेट हा कालातीत ग्रेट असतो.
जे ग्रेट असते ते तुमची आवड आमची आवड ह्यापुढचं असतं. मीर, गालिब ह्यांच्या महानतेला कोणीही एक कवी म्हणून नाकारू शकत नाही.

एक दुसरा मुद्दा आहे माध्यमाचा. गझल किंवा कुठलीही कलाकृती नुसती निर्माण करून चालत नाही. ती लोकांपर्यंत पोचवावी लागते. आधी मुशायर्‍यात गझल सादर करणे किंवा छापून लोकांपर्यंत पोचवणे हे दोन पर्याय असत. त्यात आता नेटची भर पडली आहे.
जाहीर मुशायर्‍याचे बरे असते. लोक फक्त ठराविक शेर (किंवा विचार) लक्षात ठेवतात. त्यांनाच दाद मिळालेली असते. क्वचित कोणी प्रत्यक्ष भेटून अमुकतमुक खूप आवडले वगैरे सांगतो. बाकी शेर हवेवर वाहून जातात. पण यात धोका असा असतो की दादखाऊ, भडक, विचित्र शेर लिहिण्याची प्रवृत्ती वाढते. एखादा सखोल विचार असलेला चांगला शेर मँगो पीपलच्या डोक्यावरून जातो आणि त्याला काहीच दाद न मिळाल्याने नाउमेद झालेला शायर भविष्यात तशा प्रकारे लिहिणे टाळू शकतो.
हा धोका छापील माध्यमात नसतो. तुम्ही तुमचे मन कागदावर काढून ठेऊ शकता. कोण काय म्हणेल ही भीती एकांतात लिहिलेल्या कवितेला नसते. पण मग आपले लिखाण वाचून रसिकाचे डोळे पाणावले की त्याला जांभई आली हे कळण्याचीही काही सोय नसते. पत्र लिहून आवर्जून आपला अभिप्राय कळवणारे लोक दुर्मिळ असतात. मुशायर्‍यात बाकीच्या शायरांना तुम्ही ऐकता, कोणीतरी तुमच्या चुका सुधारते- एकूण ज्ञानाची थोडीफार देवाणघेवाण होते. ती सोय छापील माध्यमांत फारशी नसते.
नेटवर या दोन्ही माध्यमांचे फायदे आणि तोटे शतगुणित होऊन येतात.अर्थातच नेटचे फायदे अनेक आहेत. इथे तुम्हाला शिकायला बरेच मिळते. शिकवणारे (किंवा शिकवू शकणारे) लोक सदैव उपलब्ध असतात. इतरांच्या गझला केव्हाही आणि वारंवार वाचायला मिळणे शक्य असते. अर्थातच तुम्ही त्या गझलांच्या प्रभावाखाली येणेही शक्य असते.
मुशायर्‍याच्या स्टेजवर जायला किंवा कविता छापून आणायला तुम्हाला एक किमान 'हैसियत' लागते, ज्याची नेटवर अजिबात गरज नसते. तुम्ही लिंबुटिंबु असलात तरी एकदम ज्येष्ठांच्या समकक्ष 'कवी' किंवा 'गझलकार' या विभागात दाखल होता. हे म्हणजे चिंटू (दुसरी-ब) याने काढलेले 'त्रिकोणी डोंगररांगांतून डोकावणारा हसरा सूर्य आणि त्याने सोडलेली नदी' हे चित्र राजा रविवर्म्याच्या चित्राशेजारी ठेवण्यासारखे आहे. पण ते असो. नेटवर मुशायर्‍याप्रमाणेच तात्काळ दाद मिळू शकते, पण तशाच तात्काळ शिव्याही मिळू शकतात. एवढ्यावर गोष्ट थांबत नाही. शायरालाही प्रतिसाद द्यायची सोय असते. रसिक जसे कवीचे कवित्व काढू शकतो, तसे कवीही रसिकाची रसिकता काढू शकतो. आणि हे सगळे 'स्टोअर' होऊन जाते. मुशायर्‍यात मिळालेली किंवा न मिळालेली दाद कालांतराने विसरली जाते. नेटवरचे लिखित शब्द डाचत राहतात. हे आत्यंतिक इंटरॅक्टिव्ह माध्यम तुम्हाला खूप जास्त प्रभावित आणि व्याप्त करते, मधे जी स्पेस आवश्यक असते ती राहू देत नाही. हा निसरडा उतार आहे. इथे राजकारण करण्याला प्रचंड स्कोप असतो, आणि तुम्ही संत नसाल, तर तुम्ही या राजकारणात न पडणे जवळपास अशक्य आहे.
आपल्या लाडक्या मायबोलीवर आणि माझ्या पाहण्यात असलेल्या अन्य बर्‍याच मराठी साईट्सवर अनेकदा हेच चालते. कंपू बनतात. विरोधी कंपू बनतात. (काहीवेळा विद्रोही कंपूही बनतात!) 'अहो रूपम अहो ध्वनी' चे प्रयोग हाऊसफुल्ल चालतात. तुम्ही चांगल्या भावनेतून दिलेल्या नकारात्मक प्रतिसादानेही लोकांचे इगो दुखावले जातात- इतके की तुम्हाला फोन येऊन स्पष्टीकरण मागीतले जाऊ शकते ! एकाद्या विचित्र नावाआडून तुम्हाला शिव्या दिल्या जातात, ज्याचे तोंडही तुम्ही पाहिलेले नाही त्या माणसाकडून तुमची किंवा तुमच्याकडून त्याची अक्कल काढली जाते, वाचन काढले जाते, लाज काढली जाते.... सुदैवाने अद्याप चप्पल किंवा कपडे काढले जात नाहीत, आणि नुसत्या फोनऐवजी गुंड किंवा शार्पशूटर्स तुमच्या घरापर्यंत येत नाहीत. मी मायबोलीवर (आणि अन्य काही साईट्सवर) प्रकाशित झालेली प्रत्येक गझल वाचत असतो. पण चांगला अथवा वाईट असा काहीही प्रतिसाद देण्याची हल्ली भीती वाटायला लागली आहे ! प्रत्येक शब्द फार जपून लिहावा लागतो हल्ली. कोण कशाने दुखावेल सांगता येत नाही. कोणाशीही प्रदीर्घ वाद घालण्याचे किंवा स्पष्टीकरणे देण्याचे सामर्थ्य माझ्यात नाही. म्हणून या लेखाच्या निमित्ताने मनातली सगळी खदखद (किंवा गरळ म्हणा पाहिजे तर) काढून टाकतो आहे.

ह्याचा प्रस्तुत लेखाशी काय संबंध हे लक्षात आले नाही.

लोकहो ! मराठी गझलेची धुरा आहे तुमच्या खांद्यांवर. (फक्त तुमच्याच नाही.) तुमच्या हातून मोठे काम घडायचे असेल तर तुम्ही इतके बालिश, उथळ आणि आत्मकेंद्रित असून चालणार नाही. सल्ले देणारे सगळे शत्रू नसतात आणि कौतुक करणारे सगळे हितचिंतक नसतात, एवढी बेसिक समज तुम्हाला नसेल तर तुमच्या गझलेत काय खोली येणारे कप्पाळ ! तुमच्यापैकी अनेकजण उत्कृष्ट लिहितात, काहींचे काही शेर दैवी म्हणावेत इतके सुरेख असतात, अनेकजण प्रगतीपथावर आहेत आणि काहींना गझल कधीही वश होईलसे दिसत नाही. पण आपल्या मर्यादांचे भान प्रत्येकाला असावे आणि ते कोणी देत असेल तर त्याला पाण्यात पाहणे सोडून द्या, एवढेच सांगायचे आहे. सरस्वतीच्या पुत्रांचे मन इतके छोटे नसावे.

आणि हो, इंटरनेटचा आणखी एक उसूल आहे. मूळ लेखापेक्षा एखादा प्रतिसाद जास्त मोठा असेल, तर प्रतिसादकाचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय, तो गंडलाय असे हमखास समजावे.
थांबतो.

कसली धुरा नि काय. नेते बनू नका कवी बना.
जो पर्यंत जमेल तो पर्यंत लिहा, वाचा, शिका आणि शिकवा.
ज्ञानाकडे जाणारा मार्ग फक्त आनंदाचा असतो. मीर म्हणतो होशियारी से बडा कोई नशा नही. अजून काय.

इथल्या म्हणजे अर्थातच 'भारतातल्या'. अन्य देशातल्या नव्हे>>>

Lol

मला आधी मानवता ही मनुष्यप्राण्याशी संबंधित संज्ञा आहे असे वाटायचे. तिच्या देशानुरूप वर्गीकरणाबाबत नव्यानेच समजत आहे.

ज्ञानेश,
संपूर्ण पोस्ट्ला अनुमोदन..!

तुम्ही विषय काढलाच आहेत म्हणूनः अत्यंत विनम्र व १००% प्रामाणि़क हा वैभवच्या सर्वच रचनांचा पाया होता/आहे. (गुलमोहर आर्काईव्ह्ज) त्यामूळे कुठेही शाब्दिक तडजोड, जोडाजोड वा फुकटची जुळवाजुळव न करता सहज आणि ऊस्फूर्तपणे प्रकट होणे हा एक लोभसवाणा गुण त्या सर्व रचनांमधून समोर येत असे. ज्या रचनेला तांत्रिक वा शाब्दीक रसग्रहणाच्या कुबड्या लागत नाहीत ती रचना सुंदर अशी माझ्यापूर्ती मी व्याख्या केली आहे. मग फॉर्म वा फॉर्मॅट काहिही असो..

आजकाल मात्र, अनेक व्यासपिठांवरून (नेट, भेट, प्रकाशन, ई..) निव्वळ अभिनिवेष, प्रदर्शन, व 'मी कुठल्याही गण वृत्त मात्रा' ई मध्ये लिहू शकतो हे सिध्द करायची चाढाओढ लागल्यागत गझला लिहीलेल्या दिसतात. मुळात अशा मान मुरगळलेल्या रचना वाचकाला काय कप्पाळ भिडणार?

बाकी नेट चे फायदे तोटे हा वाद जुना आहे. विशेषतः गुलमोहरवरील लिखाण चकटफू असल्याने लिखाण अक्षरशः ढीगाने येते. मात्र प्रत्त्येक शब्द लिहायला जर पैसे मोजावे लागले तर 'ऊमलणे' सोडाच अगदी बी रूजवायला देखिल धजणारे फारच कमी असतील. यातून 'रंगीबेरंगी' धारकांना वगळता येईल. प्रशासकांची या बाबातची भूमिका व पॉलिसी सर्वज्ञात आहे आणि तो एव्हाना चर्चेचा विषयही नाही. तेव्हा ईथेच थांबतो.

रच्याकने: आजकाल ईथे सरसकट कुठल्याही साहित्य प्रकारावर प्रतिक्रीया देणे मात्र अवघड झाले आहे हे मान्य! (मायबोलीवरील ११ वर्षाच्या वावरानंतर निरीक्षणाअंती झालेले हे वैयक्तीक मत आहे. ईतरांना पटावे असा आग्रह नाही.)

तुम्ही विषय काढलाच आहेत म्हणूनः अत्यंत विनम्र व १००% प्रामाणि़क हा वैभवच्या सर्वच रचनांचा पाया होता/आहे. (गुलमोहर आर्काईव्ह्ज) त्यामूळे कुठेही शाब्दिक तडजोड, जोडाजोड वा फुकटची जुळवाजुळव न करता सहज आणि ऊस्फूर्तपणे प्रकट होणे हा एक लोभसवाणा गुण त्या सर्व रचनांमधून समोर येत असे. ज्या रचनेला फुका तांत्रिक वा शाब्दीक रसग्रहणाच्या कुबड्या लागत नाहीत ती रचना सुंदर अशी माझ्यापूर्ती मी व्याख्या केली आहे. मग फॉर्म वा फॉर्मॅट काहिही असो..

छान आहे पुराण. तुम्ही व्याख्या स्वतःपुरती केलीत हेही बरेच आहे.

आजकाल मात्र, अनेक व्यासपिठांवरून (नेट, भेट, प्रकाशन, ई..) निव्वळ अभिनिवेष, प्रदर्शन, व 'मी कुठल्याही गण वृत्त मात्रा' ई मध्ये लिहू शकतो हे सिध्द करायची चाढाओढ लागल्यागत गझला लिहीलेल्या दिसतात. मुळात अशा मान मुरगळलेल्या रचना वाचकाला काय कप्पाळ भिडणार?

आक्षेप फक्त आजकाल शब्दावर आहे.

बाकी नेट चे फायदे तोटे हा वाद जुना आहे. विशेषतः गुलमोहरवरील लिखाण चकटफू असल्याने लिखाण अक्षरशः ढीगाने येते. मात्र प्रत्त्येक शब्द लिहायला जर पैसे मोजावे लागले तर 'ऊमलणे' सोडाच अगदी बी रूजवायला देखिल धजणारे फारच कमी असतील. यातून 'रंगीबेरंगी' धारकांना वगळता येईल. प्रशासकांची या बाबातची भूमिका व पॉलिसी सर्वज्ञात आहे आणि तो एव्हाना चर्चेचा विषयही नाही. तेव्हा ईथेच थांबतो.

थांबल्यावर दोन पावलं रस्त्याकडेला चालतात हे माहिती नव्हतं.

>>छान आहे पुराण.
तुम्ही पण वैभवचे पंखे दिसताय..! चांगलं आहे.

>>थांबल्यावर दोन पावलं रस्त्याकडेला चालतात हे माहिती नव्हतं.

हरकत नाही. नविन आहात... जमेल हळू हळू तेही... Happy तूर्तास, तुम्ही माझ्या चालण्याची चिंता करू नका.

Pages