गाण्यांची वही हरवली आहे

Submitted by रसप on 24 November, 2013 - 23:15

आजकाल मी मोजकीच गाणी गात असतो,
जी मला पाठ आहेत,
कारण माझी गाण्यांची वही हरवली आहे

अनेक शब्द माझ्याभोवती पिंगा घालतात
अर्ध्या-मुर्ध्या ओळी डिवचत राहतात
गाऊ शकणार नसताना अचानक काही गाणी आठवतात
शब्द, ओळी आणि सूर चकवा देऊन जातात
काहीच हातात उरत नाही
आणि मी गात राहतो तीच गाणी,
जी मला पाठ आहेत
कारण माझी गाण्यांची वही हरवली आहे

पूर्वी माझ्याकडे खूप वेळ होता
प्रत्येक गाण्याचा एक असा एकसष्टावा क्षण होता
आता प्रत्येक विसरलेलं गाणं एकेक क्षण घेऊन गेलंय
माझ्या मिनिटा-मिनिटाचं सगळं गणितच बिघडलंय
चुकलेल्या मात्रांवरचे हुकलेले क्षण मी सतत शोधत असतो
दिवसाच्या चोवीस तासांचा हिशोब रोज जुळवत असतो
मात्र वेळेची जुळवाजुळव नेहमीच जमत नाही
आणि मी गात राहतो तीच गाणी,
जी मला पाठ आहेत
कारण माझी गाण्यांची वही हरवली आहे

रंगलेल्या मैफलीत अनेक आवाज मला सांगतात, 'तू गा'
पण माझ्या आतून एक एकटा आवाज येतच नसतो
काय गावं तेच उमगत नसतं
मनातलं आणि डोक्यातलं गाणं नेहमीच वेगळं असतं
दोन्हींपैकी कुठलंच गाणं ओठांवर येत नाही
मैफल सरत राहते पण मला अनावर होत नाही
मी शून्य नजरेने काही निरक्षर भावना वाचत राहतो
अन् भवतालीच्या प्रत्येकाचा हेवा करत राहतो
आपल्याला हवं ते प्रत्येक जण गात असतो,
फक्त मलाच सुचत नाही
आणि मी गात राहतो तीच गाणी,
जी मला पाठ आहेत
कारण माझी गाण्यांची वही हरवली आहे

एक थिजलेलं गाणं
माझ्या डोळ्यांत कुणाला तरी दिसतं
मला हवं ते गाणं
दुसरंच कुणी गायला लागतं
त्या सुरांत नकळतच मी माझा सूर मिसळतो
काही क्षणांसाठी स्वत:लाच गवसतो
पण गाणाऱ्यापेक्षा पेक्षा मीच जास्त खूश असतो
कदाचित त्यालाही काही दुसरंच गायचं असतं
मला दिसतो त्या शून्य चेहऱ्यात माझाच विषण्ण चेहरा
अन् कळतं की मी एकटाच नाही
जो गात राहतो तीच गाणी,
जी पाठ आहेत
इथे तर प्रत्येकाची गाण्यांची वही हरवली आहे..!!

....रसप....
२४ नोव्हेंबर २०१३
http://www.ranjeetparadkar.com/2013/11/blog-post_25.html

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त मस्त कविता!!! अतिप्रचंड आवडली. अजून कशी काय वाचनात आली नव्हती कोण जाणे....

खरोखर... माझीही गाण्याची वही हरवली आहे!!!

अफाट सुरेख. रसप, मनकवडा आहेस कि काय बाबा? अगदी हुबेहूब माझ्या मनातली भावना उतरवून काढलीयेस या कविते मध्ये… सौ साल जियो दोस्त!!