दुसऱ्या दिवशी सुब्रतोचे आई-वडील पुण्यात आले. ऑपरेशन व्यवस्थित झाले ऐकल्यावर त्यांना जरा हायसे झाले. सुब्रतोला जाग येईपर्यंतसर्वजण हॉस्पिटलमधेच होते. आता त्याला स्पेशल रूममध्येहलवले होते. आईने तर हॉस्पिटलमधेच राहायचे ठरवले. सुनंदाने पण १५ दिवसांची रजा काढली. हॉस्पिटल बाहेरची सर्व कामे आपसूकच तिच्याकडे आली. डॉक्टरांची व्हिजीट रोजच होती. डोक्याची जखम पण कोरडी होत चालली होती.सुब्रतोच्या पायाकडे त्यांचे विशेष लक्ष होते. पायाला केवळ जखम ह्यापलीकडे काही असेल असे वाटत नव्हते.तिसऱ्या दिवशी डॉक्टरांनी जाहीर केले, ‘उद्या आपण bandage काढणार आहोत. सर्व आलबेल असेल तर दोन दिवसांत डिस्चार्ज देऊ शकू.’ सुब्रतो पण बऱ्यापैकी रिकव्हर झाला होता. पण bandageकाढल्याखेरीज कुठली हालचाल करणे शक्य नव्हते. पडून राहायचा त्याला अतोनात कंटाळा आला होता.दोन-तीन तास सुनंदा त्याच्याजवळ येऊन बसायची तेवढाच काय तो विरंगुळा!
दुसऱ्या दिवशीडॉक्टरांनी bandage काढायच्या आधी सुब्रतोच्या आई-वडिलांना वेगळे डॉक्टर्स रुममध्ये बोलावून नेले. आई-वडील दोघेही चिंतीत झाले. डॉक्टर आता काय सांगणार आहेत? डॉक्टरांनी सांगायला सुरुवात केली, “हे बघा, पेशंटच्या डोक्याचे ऑपरेशन उत्तम झालं आहे. रिकव्हरी पण वेळेच्या बरीच आधी झाली आहे. त्यामुळे डोक्यासंबंधी काळजी करायचे काही कारण नाही. दोन्ही पायांचा मात्र प्रॉबलेम आहे. पडल्यामुळे दोन्ही पायांच्या मुख्य शिरांना धक्का पोहोचला आहे. त्यामुळे त्याला आज तरी चालता येणार नाही.”
सुब्रतोच्या आईने अधीरपणे विचारले, “कितना दिन में चोल शकेगा डाक्टरशाब?”
डॉक्टर म्हणाले, “तसे काही सांगता यायचे नाही...पण एक महिना ते सहा महिने एवढी मुदत लागेल. मी औषधे लिहून देतच आहे.त्याबरोबर फिजीओ थेरपिस्टकडूनमी सांगेन ते पायाचे व्यायाम करून घ्यावे लागतील. पंधरा-वीस दिवसांनी पेशंटला उठून उभे राहायला मदत करा. उभे राहण्याची प्रोसेस सगळ्यात अवघड, वेळखाऊ आणि रिकव्हरीच्या दृष्टीने क्रिटीकल आहे. नंतर सगळे सोपे आहे. चालायला इतर साधने पण उपलब्ध आहेतच.”
हेसर्व ऐकल्यावर आई-वडिलांवर तर आभाळच कोसळले. आईचे तर हुंदके थांबेचनात. ‘देवा....हेतू काय चालवलं आहेस?? माझ्या पोराला आधी पाडले....त्याच्या डोक्याला मार लागला...आणि आता तू त्याला लुळा केलास!’
ज्याच्याकडून दानाची अपेक्षा करावी, त्याने झोळीच हिसकावून घ्यावी असा काहीसा प्रकार सुब्रतो आणि त्याच्या आई-वडिलांच्या बाबतीत घडत होता.
....क्रमशः