DSLR फिल्म मेकिंग

Submitted by सदानंद कुलकर्णी on 23 November, 2013 - 05:44

डिजिटल तंत्रज्ञानाने कायाकल्प केला नाही असे एकही क्षेत्र सध्या उरलेले नाही. त्यामुळेच पंधरा-वीस वर्षांपूर्वी अशक्यप्राय वाटणाऱ्या बहुतेक सर्व गोष्टी आता आपल्या आवाक्यात आलेल्या आहे. 'दुनिया मेरी मुठ्ठी' में ही या डिजिटल युगाची पंचलाईनच झाली आहे.

सिनेमाचे शुटींग चालू असताना आपल्याला कधी-कुठे दिसले तर भारीभरकम कॅमेरे, तितक्याच तोलामोलाच्या लेन्सेस, ट्रकभर लायटिंग साहित्य, क्रेन्स असा प्रचंड बारदाना आणि ती हाताळणारी ढीगभर माणसे ठळकपणे दिसतात. चित्रीकरणाचा हा सगळा प्रपंच चालविण्यासाठी भरभक्कम खर्च निर्मात्याला करावा लागत असणारच. बिगबजेट कमर्शिअल सिनेसाठी या सगळ्या खर्चाची तरतूद केलेली असल्याने तिथे काही अडचण येत नसावी. पण एखाद्या चित्रपटात नवोदित, कमी मानधन घेणारे किंवा अगदीच न घेणारे पण गुणवान कलाकार असतील तरीही तांत्रिक बाबींवरील खर्च हा करावाच लागतो. बजेटचे गणित कोलमडल्यामुळे कितीतरी सिनेमे अपूर्णच राहात असतील.

सध्या चित्रपट निर्मिती मध्ये तर डिजिटल हा शब्द किंवा हे तंत्र वापरल्याशिवाय पानही हलवता येणार नाही अशी स्थिती आहे. १९९१ साली 'जुम्मा चुम्मा दे दे' या गाण्याच्या रेकोर्डिंगसाठी भारतात पहिल्यांदा मल्टीट्रॅक डिजिटल रेकोर्डिंग तंत्रज्ञानाचा वापर झाल्याचे कुठेतरी वाचल्याचे आठवते (चूभूदेघे) तेंव्हापासून चित्रपट निर्मिती उत्तरोत्तर डिजिटल तंत्रमय होत गेली. चित्रीकरणासाठी Red, Arri अशा कंपन्यांनी सिनेमा चित्रित करू शकणारे डिजिटल कॅमेरे बाजारात आणले पण त्यांची किमत पंचवीस ते पन्नास लाखांच्या पुढेच होती. आजही असे कॅमेरे बिगबजेट फिल्म्ससाठी वापरतात मात्र लो बजेट फिल्मसाठी ते भाड्याने घेणे हाच एकमेव पर्याय शिल्लक होता त्याचे सर्व साहित्यासह दिवसाचे भाडे वीस पंचवीस हजाराच्या पुढेच जायचे. या प्रवासातील सध्याचा आणि सुपरहीट ट्रेंड म्हणजे 'DSLR फिल्म मेकिंग'. हे तंत्र लो बजेट फिल्म मेकर्स, इंडिपेंडंट फिल्म मेकर्स, डॉक्युमेंटरी फिल्म मेकर्स किंवा नो बजेट फिल्म मेकर्स यांच्यासाठी अक्षरशः वरदान ठरले आहे.

DSLR फिल्म मेकिंग प्रक्रियेत चित्रीकरणासाठी चक्क फोटोग्राफी साठी वापरला जाणारा, फुल हाय डेफिनेशन व्हिडिओ शुटींग करू शकणारा डिजिटल SLR कॅमेरा वापरला जातो. आजवर फक्त फोटोग्राफी साठीच वापरला जाणारा DSLR कॅमेरा हा सिनेमाच्या शुटिंगसाठी वापरणे हे अचंबित करणारे वास्तव प्रत्यक्षात आणले ते सप्टेंबर २००९ मध्ये बाजारात आलेल्या Canon 7D या क्रांतिकारक कॅमेराने (ज्याची किंमत एक लाख रुपयाच्या आसपास आहे)

बघता-बघता 'लो बजेट फिल्म मेकिंग' म्हणजेच 'DSLR फिल्म मेकिंग' हे समीकरण रूढ होत गेले. आता तर तो नियमच बनला आहे अशी स्थिती आहे.

हा कॅमेरा बाजारात येण्यापूर्वी डिजिटल तंत्रज्ञान वापरून शुटींग करणारे ढीगभर प्रोफेशनल व्हिडीओ कॅमेरे बाजारात होतेच. त्यांच्या किमतीही दोन लाख ते दहा लाख रुपये या दरम्यान होत्या. ते वापरून व्हिडीओ फिल्म्स, डॉक्युमेंटरी फिल्म्स तयार केल्या जात होत्याच पण त्याचे दृष्यमुल्य हे व्हिडीओचेच होते. शिवाय हे 'व्हिडीओ कॅमेरे' असल्याने त्यांची फ्रेम साईझ full HD च्या तुलनेने खूप लहान म्हणजे 720X576 पिक्सल्स एवढीच असायची. त्यामुळे अशा फिल्मस थियेटर मध्ये दाखवणे शक्यच नव्हते. त्या एकतर टीव्हीवर किंवा कॉम्प्युटर वर पहिल्या जायच्या. शिवाय त्या इंटरलेस असायच्या म्हणजे त्यातील फ्रेम्स आडव्या रेषांच्या दोन वेगवेगळ्या फिल्डस पासून बनायच्या. Full HD व्हिडीओची ची फ्रेम साईझ 1920 x 1080 पिक्सल्स एवढी असते आणि त्यातील प्रत्येक फ्रेम ही स्वतंत्र चित्र अर्थात Progressive असते म्हणून त्याला 1080P असे म्हणतात.

व्हिडीओ कॅमेराने चित्रित केलेल्या या फिल्म्स cinematic वाटत नसत. कारण बहुतेक कॅमेरे हे फिक्स्ड लेन्सचे असत, त्यांची डेप्थ ऑफ फिल्ड खूप जास्त असे. मुख्य विषय फोकस मध्ये ठेवून बाकी घटक डी-फोकस, धूसर करण्यास अशा कॅमेरांमध्ये खूप मर्यादा असत. तसेच हे व्हिडीओ कॅमेरे ठराविक कलर स्पेस (NTSC किंवा PAL) वापरून शुटींग करत असत. टीव्ही वर दिसणारे एखादे दृश्य व्हिडीओ आहे की cinematic आहे यातील फरक आपल्याला चटकन कळतो ते या कलर स्पेस (सिनेमा गॅमा) मुळेच. तसेच व्हिडीओ कॅमेरा एकतर 25 FPS (फ्रेम्स पर सेकंद) किंवा 30 FPS या गतीने शुटींग करत असत. 25 किंवा 30 FPS गतीने चित्रित केलेले दृश्य मानवी नजरेला वास्तववादी दिसते. सिनेमाची गती ही 24 FPS असते. 24 FPS गतीच्या दृश्यात अत्यंत सूक्ष्म थरथर (flicker) असते त्यामुळे समोरचे दृश्य तरंगत गेल्याचा परिणाम पाहणाऱ्याला मिळतो, दृश्य स्वप्नवत (dramatic) वाटते. शॅलो डेप्थ ऑफ फिल्ड, डायनॅमिक सिनेमा गॅमा, आणि 24 FPS या सर्व घटकांमुळे सिनेमा हा व्हिडीओ पेक्षा वेगळा दिसतो, स्वप्नवत भासतो. यालाच बहुचर्चित 'सिनेमा लुक' किंवा 'फिल्म लुक' म्हणतात.

Canon 7D या कॅमेराने हा सिनेमा लुक फिल्म मेकरच्या अगदी तळहातावर आणून दिला. या कॅमेराचा सेन्सर हा APS-C अर्थात 25x16 MM या आकाराचा होता. हव्या त्या दृश्य परिणामासाठी वेगवेगळ्या आणि तुलनेने स्वस्त लेन्सेसची प्रचंड मोठी रेंज स्थानिक बाजारपेठेत उपलब्ध असल्याने या क्षेत्रात काम करणाऱ्या किंवा तंत्रज्ञान परवडत नसल्याने प्रवाहाच्या बाजूला पडलेल्या तंत्रज्ञांना हर्षवायूच झाला नसता तर नवल. या कॅमेराचे स्वागत बाजारात अशा प्रकारे केले जाईल याची कल्पना खुद्द Canon कंपनीला सुद्धा नव्हती. त्यानंतर आलेल्या Canon 5D-II (सध्या Canon 5D-III) या DSLR कॅमेराने तर लो बजेट फिल्म मेकिंग च्या दुनियेत अक्षरशः धुमाकूळ घातला. हा full frame म्हणजे 35 MM आकाराचा सेन्सर असलेला कॅमेरा होता. जबरदस्त पिक्चर क्वालिटी, कमी प्रकाशात चित्रित करण्याची अजोड क्षमता, शॅलो डेप्थ ऑफ फिल्ड या आघाड्यांवर तो 7D पेक्षा सरस होता. त्याची किंमत साधारणतः दीड पावणे दोन लाखांच्या आसपास होती. त्याच्या पिक्चर क्वालिटी ची तुलना अत्यंत महागड्या प्रोफेशनल कॅमेरासोबत केली जाऊ लागली. मेन स्ट्रीम फिल्म मध्ये सुद्धा हा कॅमेरा वापरण्याचा विचार होवू लागला. हॉलीवूड मधील अनेक दिग्गजानी हे तंत्रज्ञान वापरायला सुरुवात केली. जगात जे होते ते काही काळाने भारतात पोचते या न्यायाने आपल्याकडेही हे तंत्रज्ञान वापरायला सुरुवात झाली.

बॉलीवूड मध्ये हे तंत्रज्ञान प्रथम आणले ते अमोल गोळे या मराठमोळ्या तंत्रज्ञाने. त्याने अमोल गुप्ते सोबत 'स्टेनले का डिब्बा' हा बहुचर्चित सिनेमा Canon 7D या कॅमेराने चित्रित केला. त्यानंतर त्याने मराठी मध्ये गजर, रत्नाकर मतकरी यांचा इंवेस्टमेंट असे काही सिनेमे Canon DSLR वापरून चित्रित केले. अमोल गोळे हा एवढासा कॅमेरा घेवून सेट वर जायचा तेंव्हा त्याच्यावर आपल्याकडील बुजुर्ग मंडळी त्याच्यावर हसायची म्हणे! रामगोपाल वर्माने 'Not A Love Story' हा सिनेमा Canon 5D-II वापरून चित्रित केला. (हा सिनेमा कधी आला आणि गेला ते मात्र माहित नाही) आता मात्र हे तंत्रज्ञान चांगलेच रुळले असल्याने त्याची आताशा न्यूज बनत नाही. संजीव कपूरचे फूड फूड च्यानलचे सर्व प्रोग्राम्स Canon 5D वापरून चित्रित करतात म्हणे.

Canon 7D आणि 5D हे कॅमेरे डिझाईन करताना canon ने फोटोग्राफी हाच उद्देश्य ठेवलेला असल्याने एक फिल्म लुक ही प्रचंड जमेची बाजू सोडली तर audio recording, audio monitoring, focus peaking, follow focus Zebra, Histogram अशा उपयुक्त सुविधा त्यात नव्हत्या. त्यांची भरपाई करण्यासाठी काही संगणक तज्ञांनी Magic Lantern हे Canon DSLR हॅक करणारे आणि त्यात या सुविधांची भर घालणारे ओपन सोर्स सॉफ्टवेअर तयार केले. Magic Lantern हे Canon DSLR मध्ये इन्स्टॉल केल्यानंतर त्यात अत्यंत महागड्या सिनेमा कॅमेरामध्ये असलेल्या विविध सुविधांची भर पडते. Magic Lantern हे सॉफ्टवेअर 7D सोडून बाकी सर्व नव्या आणि जुन्या हाय डेफिनेशन DSLR मध्ये इन्स्टॉल करता येत असल्याने आजवर फक्त फोटोग्राफी साठीच वापरले जाणारे काही जुने कॅमेरेसुद्धा लो बजेट फिल्म मेकिंग साठी वापरले जाऊ लागले. (Magic Lantern हे canon चे अधिकृत सॉफ्टवेअर नसून ते कॅमेरा हॅक करणारे सॉफ्टवेअर आहे. ते इन्स्टॉल केल्यास कॅमेराची वारंटी संपते हे मात्र लक्षात घ्यायला हवे.)

फिल्म मेकिंग मधील हा नवीन ट्रेंड लक्षात घेवून Technicolor ही सिनेमा कलर प्रोसेसिंग तंत्रज्ञानातील बुजुर्ग कंपनी आणि खुद्द Canon एकत्र आले. त्यांनी DSLR फिल्म मेकिंग साठी खास Technicolor Cinestyle ही कलर प्रोफाईल तयार केली. ती मोफत उपलब्ध आहे. या कलर प्रोफाईल मुळे Canon DSLR ची dynamic range मोठ्या प्रमाणात वाढते (प्रकाश आणि सावली या परस्पर विरोधी वातावरणातील बारकावे एकाच वेळी, एकाच फ्रेम मध्ये टिपण्याची क्षमता म्हणजे dynamic range). Technicolor Cinestyle हे canon ने अधिकृत केलेले उत्पादन असल्याने ते वापरण्यात वारंटी बार होण्याचा कोणताही धोका नाही.

या आघाडीवर Canon मुसंडी मारून खूप पुढे गेले आहे. Magic Lantern आणि Technicolor Cinestyle हे या प्रवासातील मैलाचे दगड ठरले आहेत. ही दोन्ही सॉफ्टवेअर फक्त Canon DSLR मध्येच वापरता येत असल्याने सध्यातरी DSLR फिल्म मेकिंग साठी Canon कॅमेरे मोठ्या प्रमाणात वापरली जातात. Nikon, Sony या कंपन्या सध्यातरी या शर्यतीत बऱ्याच मागे पडल्या आहेत. Magic Lantern आणि Technicolor Cinestyle न वापरता सुद्धा Nikon, Sony या कंपन्यांचे कॅमेरे वापरून लो बजेट, नो बजेट, वैयक्तिक, घरघुती, हौशी, फिल्म फेस्टिवल साठी फुल एचडी आणि सिनेमॅटिक दृश्यानुभव देणाऱ्या व्हिडीओ फिल्मस तयार करता येतील. DSLR फिल्म मेकिंग साठी 7D किंवा 5D याच प्रकारचे कॅमेरे पाहिजेत असे मात्र अजिबात नाही. अगदी पंचवीस हजाराचा एन्ट्री लेवल DSLR सुद्धा वापरता येईल.

तंत्रज्ञानात होणारी प्रगती कुणालाही जुमानत नाही ते आपल्या गतीने पुढे-पुढे जात राहते आणि सर्वसामान्यांना नवनवीन क्षितीजं मोकळी करत जाते हेच खरे.

Canon 60D वापरून मी केलेली लुडबुड खाली देत आहे.
http://vimeo.com/41202878
DSLR फिल्म मेकिंग संबंधी अधिक माहिती साठी काही लिंक्स देत आहे.

http://www.technicolor.com/en/solutions-services/cinestyle
http://magiclantern.wikia.com/wiki/Magic_Lantern_Firmware_Wiki
http://www.magiclantern.fm/
http://dearcinema.com/interview/the-magician-with-a-dslr-camera-amole-go...
http://epaper.timesofindia.com/Repository/ml.asp?Ref=VE9JTS8yMDExLzA2LzE...

व्हिडीओ ट्युटोरिअल्स
http://www.youtube.com/user/FenchelJanisch2?feature=watch

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त माहिती. व्हिडीओ आणि सिनेमा यातला फरक पहिल्यांदाच समजला. आता हळुहळु लग्नाच्या सिडीज पण सिनेमासारख्या दिसु लागतील. Happy

छान लेख आणि तोंडओळख.

कॅमेरा मॉडेल्स मधे थोडी गफलत झाली आहे.
<<सप्टेंबर २००९ मध्ये बाजारात आलेल्या Canon 7D >> ७डी च्या आधी ५डी मार्क २ आला.
५डी मार्क २ हा सप्टे. २००८ मधे आनाउन्स झाला तर ७डी नोव्हें २००९ मधे.
५डी मार्क २ या कॅमेर्‍याने फिल्म शुटींगचे वास्तव प्रत्यक्षात आणले. त्यावेळी म्हणजे २००८ मधे विन्सेंट लाफोरे या फोटोग्राफरने Reverie नावाचा एक अप्रतिम व्हिडीयो केला होता. तो बराच फेमस झाला होता. कॅननच्या वेबसाईटवरही तो पहाता येईल.

त्याचे मेकींग इथे बघता येईल

<कमी प्रकाशात चित्रित करण्याची अजोड क्षमता, शॅलो डेप्थ ऑफ फिल्ड या आघाड्यांवर तो 7D पेक्षा सरस होता. > हे या दोन कॅमेर्‍यांमधे या गोष्टी कॅमेर्‍याच्या लेन्सवर अवलंबुन आहे. दोन्हीचा सेन्सर एकाच प्रकारचा आहे. प्रोसेसर ७डीचा थोडा नविन आहे कारण ७डी एक वर्षाने बाजारात आला.

मस्त माहिती. अमोल गोळे बद्दल आणि ५D बद्दल आधीही वाचलं होतं. आतापर्यंत कित्येकदा या 5D ला नुस्तं शोकेसमध्ये काचेच्या आडुनच बघितलय. अजुन इतकं बजेट नाही. Happy
असो. माझ्याकडुन एक लिंक. हा माणुस सुरुवात जरा कंटाळवाणी करतो, पण बघण्यासारखे ट्युटोरिअल्स आहेत.
http://www.youtube.com/user/indymogul?feature=watch

नुकतच कॅनॉन ५००D वर चित्रीत केलेली एक शॉर्ट फिल्म बघितली होती. पण ती थिएटरमध्ये दाखवता येईल, अशी नसावी असा अंदाज आहे. कृपया जाणकारांनी प्रकाश टाकावा. {सेन्सर साईजचा फरक?}
canon 500D अंदाजे ५०० युएसडीच्या जवळपास मिळेल.
२५००० चा डिएसएलआर कोणता हो?

सदानंद खास आभार.

दादुमामा झकास लेखन .
कैनन ही कंपनी काहितरी
नवीन गोष्टी सतात आणत असते .
ते करतांना अगोदरच्या लेन्सेस पण नव्या कैमऱ्यांना बसतील
हे लक्षात ठेवावे लागते .
परंतु काही नवीन तंत्रज्ञान कैमरा बॉडीत आणतांना त्यांना लेन्सचा जुना प्रचलित माउंट
अडचणीचा वाटल्याने बदलावा लागला .

@सावली कॅमेरा रिलीज डेट मध्ये झालेल्या गफलतीबद्दल दिलगीर. तथापि----

5d आणि 7d यांचे सेन्सर पूर्ण वेगवेगळे आहेत. 7d या कॅमेराचा सेन्सर (इमेजिंग डिव्हाइस) हा APS-C अर्थात 25x16 MM या आकाराचा होता. 5d हा full frame म्हणजे 35 MM आकाराचा सेन्सर असलेला कॅमेरा होता. दोघांचाच काय पण त्यावेळी canon च्या सर्व कॅमेरामध्ये डीजीक 4 हाच प्रोसेसर असायचा.

In 2008, Canon introduced the new DIGIC 4 processor, used by the EOS 1100D/Rebel T3, EOS 500D/Rebel T1i, EOS 550D/Rebel T2i, EOS 600D/Rebel T3i, EOS 50D, EOS 60D, EOS 5D Mark II and EOS-1D X (for metering and AF only). It is also used in newer cameras in Canon's PowerShot lines (A, G, S, SD, and SX).

7d मध्ये दोन डीजीक-4 प्रोसेसर होते. त्यामुळे त्याचा burst speed 5d2 पेक्षा जास्त होता म्हणून तो स्पोर्ट्स फोटोग्राफी मध्ये अधिक वापरला जायचा. पण इमेज क्वालिटी मध्ये 5d2 हाच सरस होता कारण हा full frame होता.

सध्या canon सर्व कॅमेरामध्ये डीजीक 5, 5+ हे प्रोसेसर वापरत आहे.

@विजय देशमुख धन्यवाद!

1 DSLR वर चित्रित केलेली फिल्म आहे तशीच थियेटर मध्ये दाखवता येत नाही. कारण तो full HD असला तरी शेवटी व्हिडीओच असतो. हा व्हिडीओ 2K रेजोल्युशन च्या जवळपास असतो. 2k म्हणजे 2048 × 1152 पिक्सल्स. full HD व्हिडीओ थियेटर साठी 4K रेजोल्युशनला डिजिटल इंटरमिजीएट (DI) प्रक्रियेतून अपस्केल केला जातो.

2 canon 1100 18-55 लेन्सास साधारण २५ हजार पेक्षाही कमी किमतीत उपलब्ध आहे. पण तो HD व्हिडीओ रेकोर्ड करतो. full hd नाही.
पाहा http://www.amazon.in/Canon-EOS-1100D-EF-S-18-55/dp/B008O2OMXC?tag=googin...

Nikon D ३१०० full HD रुपये २१,४९९ (फक्त कॅमेरा बॉडी)
http://www.amazon.in/Nikon-D3100-Digital-Camera-Black/dp/B005PREXF6?tag=...

3 मल्टी कॅमेरा एडिटिंग ही सुविधा बहुतेक सर्व व्यावसायिक व्हिडीओ एडिटिंग सॉफ्टवेअर मध्ये उपलब्ध आहे. मल्टी कॅमेरा एडिटिंग करण्यासाठी एकाच प्रसंगाचे अनेक कॅमेरे वापरून विविध angle मधून सलग शुटींग केले जाते. हे सर्व footage एडिटिंग system मध्ये capture केले जाते. सर्व footage साठी एक सामायिक entry point किंवा sync point आधीच निर्धारित केलेला असतो. त्या point वर एडिटिंग timeline मध्ये वेगवेगळ्या track वर हे footage लोड करून प्रत्येक track मधील हवा असलेला तेवढा भाग ठेवून सर्वांचा एकाच व्हिडीओ render केला जातो. analog व्हिडीओ च्या जमान्यात मल्टी कॅमेरा शुटींगचे online editing केले जायचे. ते शुटींग चालू असताना त्याच वेळी (real time) केले जायचे. त्याचेच offline रूप म्हणजे मल्टी कॅमेरा एडिटिंग.

छान माहिती. पण हे तंत्रज्ञान फार भराभर पुढे जात राहणार आहे.

यू ट्यूबवरची अर्थफ्लाईट ही क्लीप अवश्य बघा. अशक्य कॅमेरामन आहेत !