फिनिक्स पान१०

Submitted by पशुपति on 22 November, 2013 - 05:03

सुब्रतोला आय. सी. यू. मध्ये ठेवले. सुनंदा अर्धा-पाऊण तासाने शुद्धीवर आली. शुद्धीवर येताच तिने सुब्रतोची चौकशी सुरु केली. सुचित्राने नि:शब्दपणे तिला धीर दिला आणि तिच्या पाठीवरून हात फिरवीत राहिली. रामप्रसादने थोडीशी उसंत मिळताच सुनंदाच्या घरी फोन केला आणि सर्व परिस्थितीची कल्पना दिली. ते सर्व ऐकून सुनंदाचे वडील दचकलेच! वरकरणी फारशी रिएक्शन न दाखवता दोन तासात तिथे पोहोचतो असा त्यांनी निरोप दिला. सुनंदाचे आई-वडील आणि त्यांच्या ओळखीचे एक प्रख्यात डॉक्टर असे सगळे लोणावळ्यात पोहोचले. आईला पाहताच सुनंदाचा बांध फुटला. “आईईई....” असा जोरात हुंदका देऊन ती आईला बिलगली. आई तरी धीर देण्यापलीकडे काय करू शकत होती?
पुण्याच्याडॉक्टरांनी एकंदर परिस्थितीचा अंदाज घेऊन सांगितले, “पुण्याला नेणे आवश्यक आहे. मेंदूची शस्त्रक्रिया करायला लागेल. तुमची तयारी असेल तर मी आत्ताच ऑपरेशनची तयारी करायला सांगतो म्हणजे वेळ जाणार नाही.”
लोणावळ्याच्या हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेऊन सर्व मंडळी पुण्याला निघाली. सुनंदाच्या डोळ्याचे पाणी काही खळत नव्हते. तिघांच्याही डोक्यात एकच विचार....’कुठून दुर्बुद्धी झाली आणि लोणावळ्याचा कार्यक्रम आखला??’ रामप्रसाद्च्या डोक्यावर आणखी एक ओझे...’आपल्या गावाकडच्या लोकांना काय तोंड दाखवणार?’ ह्या सर्व विचाराने रामप्रसाद पण सुन्न बसला होता. सुनंदाच्या आईच्या डोक्यात वेगळाच विचार,’लग्न ठरले नाही तोवर ही घटना...ह्यात सुनंदाच्या पायगुणाचा काय दोष? तरीपण लोक बोलल्याशिवाय राहतील थोडेच!’ वडिलांच्या मनात आले, ‘आता काही कारणाने लग्न जर मोडले तर पुन्हा पायपीट आली. back टू स्क़्वेअर वन!’ ह्या विचारांच्या गोंधळात एकटी सुचित्रा सोडून सुनंदाच्या मनाचा विचार मात्र कोणीच करत नव्हते. डॉक्टर मात्र अगदी तटस्थ वृत्तीने बसले होते. त्यांच्या मनात एकाच विचार...’समोर पेशंट आहे आणि त्याला वाचवण्यासाठी आपले सागेल कसब पणाला लावायचे आहे.’ ज्या एका व्यक्तीसाठी सर्वांची धावपळ सुरु होती, ती मात्र शांत, निर्विचार आणि निर्विकार दिसत होती.
पुण्याला पोचल्यावर अम्बुलंस तडक हॉस्पिटलकडे वळवली. परिस्थितीचे गांभीर्य आधीच कळवल्यामुळे ऑपेरशन थिएटर तयारच होते. पेशंटला आत घेतल्यावर नर्सेसची लगबग सुरु झाली. दर १५-२० मिनिटांनी औषधाची एक एक यादी बाहेर येत होती. डॉक्टरांनी कल्पना दिल्यामुळे रक्ताच्या बाटल्यांची सोय मात्र झाली होती. ३-४ तासांनी डॉक्टर बाहेर आले. बरेच थकल्यासारखे दिसत होते. पण लढाई जिंकल्याचा आनंदही चेहऱ्यावर दिसत होता. बाहेर आल्यावर त्यांनी सांगितले, “मेंदूचे ऑपरेशन चांगले झाले आहे, एक-दीड तासात पेशंट जागा होईलच. पायांचा जरा प्रॉब्लेम आहे..ते आपण नंतर बघू....”

....क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users