फिनिक्स पान ०९

Submitted by पशुपति on 21 November, 2013 - 08:30

ऑगस्ट महिना. पावसाच्याजोरदार सरी सगळीकडे पडत होत्या. उन्हाने तापलेली आणि तहानेने व्याकुळ झालेली जमिन आता शांत झाली होती. आकाशात सूर्य असून नसल्यासारखा, दिवस आहे एवढेच कळण्यापुरता! झाडांनी मलूलपणा टाकून दिला होता आणिनवनिर्मितीला सुरुवात केली होती. त्यामुळे जिकडे पाहावे तिकडे हिरवे रान! हिरव्यागार झाडांमुळे पावसाचे थेंब एका पानावरून दुसऱ्या पणावर घरंगळत खाली पडत एक वेगळेच गाणे गात होते. जणू, झाडांची पाने सुद्धा आनंदाने नाचत गात होती.
पुण्यात सुद्धा लोकांमध्येपावसाळा संचारला होता. थव्याथव्याने वेगवेगळ्या ठिकाणी सहली निघत होत्या. ट्रेकिंगला पण जोर आला होता. सिंहगड, लोणावळा, भीमाशंकर, नायकिणीचा महाल इत्यादी ठिकाणे लोकांच्या गर्दीने उसळी मारत होती. नाहीतर एरवी ह्या ठिकाणांची कोणाला आठवण होणार? सुब्रतो आणि सुनंदा तरी मागे का म्हणून राहतील?ते दोघे आणि रामप्रसाद, सुचित्रा ह्या चौघांनी मिळून लोणावळ्याला जाण्याचा बेत आखला. एका रविवारी चौघेही लोणावळा लोकलने सकाळीच निघाले. दुपारपर्यंत चौघांनी भरपूर भटकंती केली. खाल्ले, प्यायले, मजा केली मग ठरवले आपण भुशी धरणावर जाऊन मनसोक्त डुंबूया! धरणावर येऊन पाहतात तर काय, पाण्यापेक्षा माणसेच तुडुंब भरलेली!! त्यातल्यात्यात कमी गर्दीच्या ठिकाणी चौघेही पाण्यात उतरले. सुब्रतोला तर जास्तच उत्साह संचारला होता. कधी काठावर ये, उडी मार....कधी पाण्यात गुडूप होऊन लांब कुठेतरी बाहेर ये...!!
त्याचा हा सगळा प्रकार पाहून सुनंदा म्हणाली, “चला, जाऊया आता.”
पण एवढ्या कोलाहलात तिचा आवाज कोणाला ऐकू जाणार? पण तिच्या जीवाची घालमेल मात्र सारखी वाढतच होती. एवढ्यात जवळच तिला लोकांचा आरडाओरडा ऐकू आला. काही लोकांनी एका तरुण मुलाला उचलून पाण्याबाहेर काढले होते. त्याच्या डोक्याला आणि पायाला जबर मार लागला होता. जखमेतून बरेच रक्त वाहून गेल्याने तो बेशुद्ध पडला होता.सुनंदाने इकडेतिकडे नजर टाकली, सुब्रतो काही दिसला नाही. आता मात्र तिच्या काळजाचा ठोका चुकला आणि ती गर्दीच्या दिशेने धावली. गर्दीतून वाट काढत जवळ जाऊन पाहते तर काय, ते दृश्य पाहून सुनंदा तर बेशुद्धच पडली. सुचित्रा जवळच होती म्हणून बरे झाले....सावरली तिला! रामप्रसादनी मात्र झटपट पावले उचलली. अम्बुलंस बोलावून दोघांनाही जवळच्याच हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
........क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users