गणपती बाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या!!

Submitted by kunitari on 19 November, 2013 - 17:08

सचिन निवृत्त होतोय. घरातल्या गणपतीच्या विसर्जनाच्या दिवशी जसे वाटते तसे वाटते आहे.

वास्तविक मी स्वतः कधी फार क्रिकेट खेळलो नाही पण पाहिले मात्र भरपूर!! अगदी उद्या वार्षिक परीक्षा असताना देखील आज पूर्ण दिवस क्रिकेट पाहिले. त्यातून मग व्हायचा तो परिणाम वेळोवेळी झालेला आहे. पण त्याची फारशी खंत वाटत नाही. उलट त्यातलेच काही काही सामने तर अगदी आजही पूर्णपणे आठवतात. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका हा असाच एक सामना. दुसर्या दिवशी MQC चा पेपर. तरी गल्लीतल्या वासू काकाने बोलावले सामना बघायला. वासू काका म्हणजे मुलखाचा मऊ माणूस!! म्हणाला "अरे शेंगदाणे आणि गुळ पण आणुन ठेवला आहे." त्याचा आग्रह मोडणे ब्रह्मदेवालाही जमायचे नाही. म्हटले जाऊ १ तास!! जाउन पाहतो तर तिथे अख्खी गल्ली जमली होती. धनु दादा, राणा दादा, प्रताप फाटक, नाना, नंदू आणी शेखर कोडोलीकर, मंदार महाजन, कलंदर आणि गोट्या आगलावे, शेखर काका, त्याची मुले, सुनील आणि तान्या कागवाडे, अमित आणि अवधूत बोडस अशी सगळी मंडळी जमली होती. वास्तविक या सर्व लोकांच्या घरी TV होता. पण महत्वाचा सामना असला कि सगळी गल्ली वासू काका कडे जमायची. मग एकमेकांच्या उखाळ्या-पाखाळ्या निघायच्या. सामना कोण जिंकणार याच्या पैजा लागायच्या. तेंडल्या किती मारणार याच्यावर पैजा लागायच्या. द्रविड खूप हळू रन काढतो. त्याला काढून टाका. अझरूद्दीन ची फिल्डिंग एकदम भारी. वगैरे अनेक मत-मतांतरे प्रकट व्हायची. प्रत्येकाला मत मांडायचा पुर्ण अधिकार होता. एकेक जण मग अगदी तल्लीन होऊन त्याचे त्याचे आख्यान लावायचा. इतकच काय तर तेंडूलकर चे काय चुकते आणि त्याने काय करायला हवे याच्यावरही एखादे बौद्धिक व्हायचे. जावेद मियांदाद ने शेवटच्या चेंडूवर मारलेल्या सिक्सर चे स्मरण व्हायचे. लगेच कुणीतरी चेतन शर्माची बाजू घेऊन त्याच्या वर्ल्ड कप मधल्या hat-trick ची आठवण काढायचे. मग कपिल देव चे स्मरण ठरलेले. मग ८३ चा वर्ल्ड कप. विवियन रिचर्डस. मोहिंदर अमरनाथ. श्रीकांत, गावस्कर हे सगळे ओळीने चर्चेला यायचे. त्या प्रत्येकाचे कौतुक हि व्हायचे आणि त्यांच्या चुकाही शोधल्या जायच्या. एखाद्या वेळी करायला काही हरकत नाही. पण प्रत्येक सामन्यात हे सारे आलटून पालटून व्हायचे. पहिल्या १०-१२ ओवर हा सगळा किल्ला चालत असे. मग आपली ब्याटिङ्ग असली आणि १-२ जण लवकर घरी गेले कि मग वातावरण तणावपूर्ण व्हायचे. मग थोडा वेळ मंडळी शेंगा खाण्यात गुंग असल्या सारखी दाखवायची. या शांततेत जो कोणी पहिला बोलेल त्याची काही खैर नसायची. "बोलू नको रे बाबा!! आउट बिऊट व्हायचा तो!!" असली वाक्ये सर्रास यायची. यालाच बहुधा समाधी म्हणत असावेत.

मग एक २-४ खणखणीत चौके नाहीतर छक्के बसले कि मग मंडळी पुन्हा जमिनीवर यायची. त्या बॉलरचा उद्धार व्हायचा. थोड्या जास्त विकेट गेल्या असतील तर त्याचे आई-वडील देखील निघायचे. आणि ते झाले कि आता त्याचे काय चुकले याची चर्चा सुरु!! आता तो पुढच्या वेळे पासून घरी जाणार काय? याच्यावर एक छोटेखानी परिसंवाद व्हायचा. मग हळुच कुणीतरी वासू काकाच्या बायकोला चहाची ऑर्डर द्यायचा. वासू काका कोकणस्थ आणि काकू देशस्थ!! आणि याचा सगळा फायदा तिथे जमलेली लबाड मंडळी लगोलग करून घ्यायची. "वहिनी करा तुम्ही चहा. दाखवून द्या देशस्थ कसे असतात ते." असा कुणीतरी देशस्थ आक्रोश करायचा. वाहिनी चहा घेऊन यायची. आणि मग एखादा कोकणस्थ शहाजोग पणे म्हणायचा "अरे वासू बिस्किटे आण. दाखवून दे कोकणस्थ काय चीज असते ते." यथास्थित चहा आणि मारी बिस्किटे खाउन पुन्हा चर्चा सुरु. देशस्थ श्रेष्ठ कि कोकणस्थ? मग सावरकर कोकणस्थ होते. बर मग रामदास देशस्थ होते. बर मग टिळक कोकणस्थ होते. बर मग ज्ञानेश्वर देशस्थ होते. मग सेनापती बापट, सी डी देशमुख, धनंजयराव गाडगीळ, बाजीराव पेशवे, पंत प्रतिनिधी अशा सर्व थोर विभूतींचे स्मरण व्हायचे. आणि हे सगळे चालू असताना अचानक कुणीतरी आउट व्ह्यायचा आणि मग परत एकदा सगळे शांत! "च्याइला तरी तुम्हाला सांगत होतो जरा गप्प बसा म्हणून!! पण ऐकतील तर शप्पथ!! आता आउट झाला न द्रविड. बसा आता बोम्बलत त्याच्या नावाने." असा कुणीतरी सणसणीत बार काढायचा. परत कुणीतरी फुसकुली सोडायचा "ए द्रविड देशस्थ का कोकणस्थ रे?" त्याच्यावर दुसरा कुणीतरी वार करायचा "मुसल्मान. तुला काय करायची रे द्रविड ची जात?" मग अजून कुणीतरी म्हणायचे "द्रविड आणि मुसलमान? छे शक्यच नाही. अरे द्रविड म्हणजे आर्य आणि द्रविड मधला द्रविड!!" मग थोडा वेळ आर्य आणि द्रविड याच्यावर चर्चा व्हायची. मग मराठी म्हणजे आर्य का द्रविड याच्यावर चर्चा व्हायची. एकुण रोजच्या जगण्यातल्या चिंतांना इथे वाव नसे. हि एक धर्म सभाच म्हणायची. धर्म फक्त क्रिकेट आणि त्याचा महादेव म्हणजे सचिन!! आणि जेव्हा हा महादेव ब्याटिङ्ग करायला यायचा तेव्हा हीच खिल्ल्या उडवणारी मंडळी अगदी चिडीचूप असायची. सचिन ला टाकलेला प्रत्येक चेंडू हा साक्षात ईश्वरी संकेत असल्यासारखी मंडळी झपाटून बघायची. आणि त्याचा प्रत्येक फटका हा ईश्वरी प्रसाद असल्यासारखा स्विकारायची. ज्या मंडळीना पूर्ण दिवस मैफिलीला यायला जमायचे नाही ते सुद्धा सचिन खेळायला आला कि हटकून हजार व्हायचे. पण मग दाराची बेल वाजली तरी उघडायला कुणीही उठायचे नाही. सगळा समाधीचाच भाग होता. सचिन चा प्रत्येक फटका म्हणजे एखादे शिल्प असायचे आणि ते पाहताना हि तमाम जनता मुग्ध होऊन जायची. प्रत्येक चेंडूला मनात धास्ती असायची. अपेक्षा एकाच "आउट नको होऊ बाबा आता या बॉलवर!!"… सचिन ने खेळत राहिले पाहिजे. भले मग त्याने फटकेबाजी केली नाही तरी चालेल. पण त्याने तिथे क्रिझ वरती असले पाहिजे. असा साधा विचार माझ्या मनात असायचा. देवाबद्दल देखील आपल्याला असेच काहीतरी वाटते नाही का? अर्थात काही लोक जसे देवाला चार आणे टाकून लाटरीचे लाखाचे तिकीट लागावे म्हणून प्रार्थना करतात तसे वासू काकाच्या घरी देखील "आम्ही गप्प बसतो. पण तू खेळ आणि चांगल्या १०० रन तरी काढच. " अशी प्रार्थना करणारे हि होते. सचिन वर सगळ्यांचा हक्क होता. सचिन म्हणजे सगळ्यांची स्वप्नांची खाण होती. सचिन म्हणजे धावांचे यंत्र होते. सचिन म्हणजे क्रिकेटच सर्व श्रेष्ठ तंत्र होते. सचिन म्हणजे विजयाचे मंत्र होते. देव, देऊळ, पुजारी, मंत्र, प्रार्थना आणि प्रसाद सगळे सगळे सचिन तर होता !!! त्यावर ह्या भाबड्या लोकांनी जिवापाड प्रेम केले. यांचा सगळा जोश सचिन असे पर्यंत च असायचा. एकदा सचिन गेला कि मग हळु हळू एकेक देशस्थ कि कोकणस्थ काहीतरी कारणे सांगून काढता पाय घेत. अर्ध्या तासात वासू काकाचे घर रिकामे व्हायचे. मग घर खायला उठते असे वाटुन काका गल्लीच्या चौकात येउन उभा राहायचा.

आज सचिन चा शेवटचा सामना!! आता मी काही मिरजेत नाही. त्यामुळे वासू काकाच्या घरी किती गर्दी जमली आहे ते मला ठाऊक नाही. पण आता पुढच्या सामान्यांना वासू काकाचे घर असेच भरेल याची मात्र मला खात्री नाही.

अतिशय उत्साहाने आपण मखर तयार करतो. त्यात गणपतीची प्रेमळ मूर्ती बसवतो. पूजा-अर्चा सारे मनातले जे काही पवित्र म्हणुन असते ते सगळे त्या गणपतीला वाहतो. त्याच्या बहिणीला बोलवतो. मोदकाचा नैवेद्य दाखवतो. आणि एक दिवशी आरती म्हणून त्याचे विसर्जन करतो. नदी पर्यंत जाई तोवर मारे मोठ मोठ्याने म्हणत जातो "१ २ ३ ४, गणपतीचा जय जय कार". घरी येताना पाय दिशा हरवून बसतात. आवाज फुटतच नाही. रिकाम्या माखाराकडे पाहून आतल्या आत जीव घुसमटत राहतो "गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला".

आणि मग भाबडी समजूत काढत म्हणतो
"गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या"

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users