बाळू शिंत्रेला अनमोल रत्न पुरस्कार द्या - भाग १

Submitted by जुनाच कुणीतरी on 19 November, 2013 - 07:48

तुम्हाला बाळू शिंत्रे माहीत नसेल तर चूक तुमची नाही. हल्लीच्या पिढीला ही नावं कुठं माहीत असतात ? जुन्या काळातल्या मन्या सुर्वे यांच्या जीवनावर आधारीत एक प्रेरणादायी सिनेमा नुकताच येऊन गेला. असं काही झालं कि हल्लीच्या पब्लॉकला त्या काळात पण भारी भारी लोक होवुन गेल्याचं पटतं.

बाळू शिंत्रे कुणी गँगस्टर नव्हता. तो काय होता, कोण होता हे सांगायला गेलं तर विकीपीडीयाची एक नवी आवृत्ती काढावी लागेल आणि इंटरनेट -२ सुरू करावं लागेल. तो काय नव्हता हे सोपं आहे सांगायला. पण तो काय नव्हता हे आठवून सांगावं लागेल. इथं भाव खाण्यासाठी तो स्त्री नव्हता असं सेफ विधान करण्याचा मोह झाला होता पण आठवलं आमच्या वाड्यातल्या नाटकात त्याने स्त्री भूमिका केली होती. ती इतकी खरी खुरी झाली होती कि त्या नाटकात काम करणा-या वाड्यातल्या पुरूष नटांच्या बायका (आपापल्या) नव-यांवर खवळून होत्या. स्टेजवर मिठ्या मारणारी ही आडदांड बया स्टेजच्या मागं काय करत असेल, तालमींना आपण हजर का राहीलो नाही या विचारांनी त्या बायकांना कित्येक महीने झोप लागत नव्हती. ती बाई नव्हती तर बाळू शिंत्रे होता असं विनवून सांगितल्यावर तर बायकांनी अतिशय कडक शब्दात (आपापल्या) नव-यांची निर्भत्सना केली होती. त्या मिठ्या एखाद्या पुरुषाच्या असणं शक्यच नाही, यावर सर्वांचं एकमत होतं.

एकदा तर बाळू शिंत्रेनी कॉलेजच्या नाटकात बारा रोल केले होते. आजवर हे रेकॉर्ड मोडलेलं नाही. पण बाळूने मात्र त्याची वाच्यता कुणाकडं करू नका असं नम्रतापूर्वक सांगितलं. या प्रसंगावरून आपण पाहीलं कि बाळूमधे अभिनयाचे गुण ठासून भरलेले होते, पण प्रसिद्धीपासून तो दूर राहत होता. असं का हा प्रश्न विचारल्यावर बाळूने जे उत्तर दिलं ते कंपनीत सप्लायरकडून मिळालेल्या डायरीत नोंदवून ठेवलेलं आहे. बाळू म्हणाला कि जर हे रेकॉर्ड मी नोंदवलं तर भविष्यात या क्षेत्रात नव्याने येणा-यांना करण्यासाठी काहीच उरणार नाही. त्यांच्या सर्जनशीलतेची उर्मीच नाहीशी झाली तर हे क्षेत्र अधःकारमय होऊन जाईल. बाळू शिंत्रे काय इतर कुठल्या क्षेत्रात रमू शकतो, पण उद्याच्या ध्येयवेड्या तरुणाचं स्वप्न उमलण्याआधीच कोमेजावं असं मला कधीच वाटणार नाही.

बाळूचे हे बोल माझ्याकडे लिहीलेले आहेत. प्रसिद्धीपरांग्मुखता हा दुर्गुण असल्याने त्या दिवशी टाळ्या वाजवण्यासाठी कुणीच नव्हतं. दुर्दैव ! बाळूचं नाही, भारतातील करोडो रसिकांचं.

माझा दादा बाळूच्या आठवणी सांगायचा. बाळूने कॉलेजचा अभ्यास मुद्दामच केला नाही. दहावीला त्याला सहजच शंभर टक्के गुण मिळाले असते. पण त्याने मुद्दामच ३५% वर बास केलं होतं. प्रत्येक पेपर ३५% सोडवून तितकेच मार्क्स मिळवणं हे तितकं सोपं नाही. आजपर्यंत असा विक्रम एकाच महापुरुषाने केला आहे असं ऐकून आहे. असा महापुरूष गेल्या दहा हजार वर्षात झाला नाही आणि पुढच्या दहा हजार वर्षात होणार नाही. ३५% गुण मिळाल्यावर त्याचा सत्कार झाला. त्यावेळी जास्त गुण का मिळवलं नाही या विषयावर बोलताना बाळूने आपले मौलिक विचार प्रकट केले. तो म्हणाला कि पासिंगला ३५% गुण आवश्यक असताना अधिक गुणांची अपेक्षा बाळगणे हे लालची असल्याचे लक्षण आहे. अधिक गुण ही एक प्रकारे उधळपट्टी असून चंगळवादाची सुरूवात आहे. दुर्दैवाने अनेक मुलांना या चंगळवादाला बळी पडावे लागत आहे. जास्त गुण मिळवणा-यांना मोजक्या महाविद्यालयात प्रवेश मिळणे हे भांडवलशाहीचे लक्षण आहे. मला या मुलांच्या मार्गातला अडथळा बनणे कधीच आवडणार नाही.

बाळूने कॉलेजात अकरावीच्या पुढच्या वर्गात जाण्याचा कधीही प्रयत्न केला नाही. पण होतकरू मुलांना मार्गदर्शन करण्यात त्याने कधीच कुचराई केली नाही.

क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गप्पिष्ठ, मी शांततेचं नोबेल म्हणत होतो! पण तुम्हाला वेगळं नोबेल द्यायचं असेल तर माझी हरकत नाही! Wink
आ.न.,
-गा.पै.