अन्या - ४

Submitted by बेफ़िकीर on 19 November, 2013 - 05:00

पोटात अन्न मावण्याला मर्यादा असते हे अन्याला आयुष्यात पहिल्यांदाच समजले. गाईगुरांप्रमाणे रवंथ करण्याची सोय आपल्या शरीरात किती आवश्यक आहे हेही लक्षात आले त्याच्या! केळी, नारळ, वड्या, बेसन, फुटाणे! आपण काय करून बसलो आहोत हे लक्षातही राहिलेले नव्हते त्याच्या! समोर अन्न दिसले. तो प्रसाद होता. दत्त या नावाखाली मिळालेला. दत्त हे नांव सार्थ कशाने ठरले तर दोडा गुलाबेच्या कपाटाखाली माळ मिळाली. शकुंतला जांभळेचा जीव वाचला. तानाजीच्या बापाची कोंबडी सापडली. इसरार नावाचे बालक एका म्हशीच्या धडकेपासून वाचून ते आता ऐंशी वर्ष निर्विघ्नपणे जगेल असा आशीर्वाद दिला गेला. एक नव्याण्णव टक्के लाकडे स्मशानात पोचलेले म्हातारे तीन दिवसांनी आपला भाग्योदय होणार या आनंदात नाचू लागले. दोडा गुलाबे पोलिस पाटलाच्या चौकशीची उत्तरे निर्भीडपणे देत होता कारण कपाटाखाली पडलेली माळ त्याच्याआधी गावकर्‍यांनी पाहिलेली होती. दोडाचा आत्मविश्वास इतका होता की घटकाभर सगळ्यांनाच वाटले होते की दत्त या नावाखाली वावरणारे पोरगे आपल्याला येडे बनवत आहे. पण शकुंतला जांभळे उपचारांसाठी जाण्याआधी अन्याच्या पायावर कोसळून गेलेली होती. तिचा नवरा बेड्या हातात पडूनही अन्याला लांबून नमस्कार करत होता. अन्यामुळेच आपण केलेला गुन्हा शोधता आला आणि आपल्याला शिक्षा होणार हे माहीत असूनही अन्या हा त्याच्यासाठी एक चमत्कार होता. भजन सुरू झाले होते. बायाबापड्या समोर येऊन हात जोडत होत्या. बारकी पोरे प्रसाद आणि जिवंत देव या आकर्षणाने आजूबाजूला रेंगाळत होती. काही भाविक तल्लीन होऊन ताना मारत होते, टाळ कुटत होते. आणि अन्या?

अन्या दोन्ही हातांनी मिळेल तो पदार्थ तोंडात कोंबत होता. आजचे आज, उद्याचे कोणी पाहिले आहे? खरे समजले तर हीच माणसे उद्या आपली कणीक तिंबतील हे अन्याला मनातून माहीत होते. त्यामुळे आत्ता खाता येत आहे तर खाऊन घेऊ हा त्याचा हिशोब होता.

पण!

पण गर्दीत काही सूज्ञ माणसेही होती. त्यांचे अन्याकडे बारीक लक्ष होते. हा तिन्मुर्ती दत्त म्हणवणारा बारका पोरगा आहे कोण, आला कोठून आणि अचानक चमत्कार कसे करू लागला हे त्यांना समजत तर नव्हतेच पण जे पाहात आहोत ते पटतही नव्हते. त्यांच्यात कुजबूज सुरू होती. उगाचच्या उगाच कोणीतरी देवपदाला पोचणे त्यांना मान्य नव्हते.

पण!

पण गंमत तर आणखीही एक होती. गर्दीत अशीही काही माणसे होती ज्यांना अन्या नावाच्या बारा वर्षाच्या पोराचा अचानक झालेला हा उत्कर्ष ही एक संधी वाटत होती. अशी डोकेबाज माणसे दोघेच होती. पवार आणि इंगल्गी! हा इंगल्गी इग्या ह्या नावाने परिचित होता. मोठा धार्मिक इसम म्हणवला जायचा. पवार तर येता जाता नामस्मरण करणारा माणूस! मात्र या दोघांचे खरे स्वरूप तिसरेच होते. संतपदाला पोचण्याची त्यांना घाई होती. पण जनता चमत्काराला भुलत असल्याने आणि चमत्कार करताच येत नसल्याने ते नुसतेच धार्मिक असल्याचा आव आणून वावरत असत. मात्र आज झालेला चमत्कार हा त्यांच्या रक्ताला उसळ्या मारायला लावत होता. चक्क एक बारा वर्षाचे पोरगे कुठूनसे येते काय आणि तालुक्यातील दहा टक्के माणसे त्याला दत्ताचा अवतार मानतात काय! आपण काय इतकी वर्षे झक् मारत होतो का ही त्यांच्या मनातील पहिली भावना होती. पण हळूहळू दुराभिमान बाजूला ठेवून त्यांनी तर्कशास्त्रीय धोरण आखले. गंमत म्हणजे एकमेकांमधून विस्तव न जाणारे हे पवार आणि इग्या आज अचानक गुरूबंधूप्रमाणे एकमेकांशी बोलूचालू लागले. ते पाहून तर जनता स्तिमितच झाली. पवार आणि इग्या असतील तिशीपस्तिशीचे! अन्या बारा वर्षाचा! पण अन्या अवतार होता. आपसूकच पवार आणि इग्या हे अवताराचे दास होऊ पाहू लागले. आणि हा हा म्हणता म्हणता एका रिंगणात पवार लागला की घुमायला?

पवारचा प्रॉब्लेम होता. त्याला फक्त अमिताभ बच्चनसारखे कुल्ले हालवत बीभत्सच नाचता येई. पण आता अंगात आल्याचा अभिनय अस्सल वाटण्यासाठी म्हणून त्याने जमीनीवर बसून घुमायला सुरुवात केली. क्षणभर तर ते घुमणे पाहून खुद्द दत्ताचा अवतारच हादरला. पण हा आपल्याप्रती असलेल्या भक्तीचा एक मृदू आविष्कार असल्याचे ध्यानात येताच त्याने काही साखरफुटाणे तोंडात टाकले. पवारचे ते घुमणे पाहून इग्याला आठवले की आपल्यालाही एक शरीर प्राप्त झालेले असून आपणही ते कसबीपणे हालवत ठेवू शकतो. इग्या पवारच्या बाजूने नाचत गोल फिरू लागला. ही जोडगोळी एक होण्यामागे निव्वळ आणि निव्वळ दत्त असल्याचे समजल्याने तर जे अन्याबाबत शंका घेत होते त्यातलेही दोघे चौघे भाविकांच्या पार्टीत आले. आता पवार आणि इग्या एकमेकांना टाळ्या देत घुमत फिरत राहिले. ते पाहून हुंडा या कारणासाठी अनन्वित छळ करता यावा म्हणून लग्न करून गावात आणलेल्या विवाहितांच्या मनांमधील भावनांचे बंधारे फुटले. पदर कंबरेला खोवून त्या दिवाळीत चुकीच्या पद्धतीने उडणार्‍या भुईचक्रासारख्या लोळू लागल्या. त्यांचे मळवट भरायला एकच झुंबड उडाली. भजनी मंडळाचा आवाज टिपेला पोचला. पवार आणि इग्याला पहिले यश मिळाले. त्यांच्यातील वितुष्ट संपणे हा गावाला चमत्कार वाटत असल्याचे पाहून त्यांच्या अंगात न आलेल्या अंगात येण्याला भलता जोर चढला. त्यामुळे भारावून जाऊन त्यांच्या उडत्या पायांवर माथा टेकवण्यासाठी काही बायका आपल्या पोरांना ढकलू लागल्या. इकडे अन्याने घशात बोट घातले तर बोटाला खोबरे लागेल इतके भरलेले होते तरी कोंबतच होता. ह्या अचाट जमावाला एका ठिकाणी पाहून घाबरलेली गाई गुरे कोणीही न हाकलता स्वतःच्या गंतव्य स्थानी घाईघाईने निघालेली होती. इग्याने आळस देताना कुत्रे लांब होते तसा लांब होऊन अन्याला एक नमस्कार घातला. घाईघाईने पवारही लोटांगण घालता झाला. तोवर इग्याने काही सवाष्णींना उद्देशून 'खंबीर हो, तुझेही दिवस येतील' असले स्पेसिफिक टाईम फ्रेम नसलेले आशीर्वाद ऐकवले. ते पाहून नवतारुण्याने ओथंबलेल्या सवाष्णींची एक चळत इग्याच्या आशीर्वादासाठी धडपडू लागली. इग्यामुळे इगो दुखावलेल्या पवारला हे पाहून मत्सर वाटला व त्याने 'तुझेही दिवस येतील' या इग्याच्या आशीर्वादात भान न राहून सूक्ष्म बदल करून 'तुलाही दिवस जातील' असा आशीर्वाद द्यायला सुरुवात केली. क्षणभर सगळेच हबकले. हा आशीर्वाद कुमारिका, प्रौढा, आधीच कित्येकदा दिवस गेलेल्या आणि काही पुरुष ह्यांनाही ऐकवला जाऊ लागला तसा असंतोष माजू लागला. पुरुषांनी तर भ्या वाटून पवार आणि इग्याभोवतीच्या वलयातून पायच काढता घेतला. न जाणो चमत्कार व्हायचा आणि आपलीच पाळी चुकायची! पण पवारच्या ते लक्षात आले तसा पवार सावधपणे आशीर्वाद देऊ लागला. पण आता शंका बळावलेली होती व तिचे निराकरण यशस्वीपणे करण्यासाठी काहीतरी नवीन प्रभावी उपाय योजायला हवा आहे हे पवारला समजले. त्याने धाडकन अंग भुईवर टाकले. भिंतीवरून पाल पडावी तसा पवार हवेतून जमीनीवर पडला तसं मग पब्लिक चरकून बाजूला झालं! 'काय झालं, काय झालं' अश्या विचारणा सुरू झाल्या तसा जमेल तश्या गूढ आवाजात पवार म्हणाला की गावात पापं वाढल्यामुळे महाराजांचे आगमन झालेले आहे, त्यांची व्यवस्थित प्रतिष्ठापना केलेली बरी, ते रागावले तर भलतेच व्हायचे.

आता मात्र एक असंतुष्ट जमाव मध्ये पडला. एका पहिलवानी अंगाच्या प्रौढ माणसाने जोरदार आवाज काढून सगळ्यांचे लक्ष वेधले आणि शक्य तितका कठोर चेहरा करून त्याने विचारले.

"ह्ये पोरगं अवतार हाये कशावरून? कोन म्हन्तं ह्ये अवतार हाये? उगा गावकर्‍यांना यड्यात काढता क्काय?"

आता आली का पंचाईत? ह्या पहिलवानामागे दहा बारा उन्मत्त टाळकी जमा झाली. बरं त्याने तर डायरेक्ट मेथड वापरलेली होती. चाचरत चाचरत बोलला असता तर पवार आणि इग्याने काहीतरी शक्कल तरी लढवली असती. पण या थेटपणाला आणि दहा बारा टग्यांना कोण विरोध करू शकणार? आता मार खायची वेळ टाळणे आवश्यक होते. पवार आणि इग्या प्रकाशवेगाने विचार करत होते. गावकरी हबकून एकदा अन्याकडे, एकदा पहिलवानाकडे आणि एकदा पवार अन् इग्याकडे बघत होते. या क्षणापर्यंत तोंडात चुरमुरे कोंबणार्‍या अन्यालाही जाणीव झाली की आपल्याला जिची भीती वाटत होती ती घटिका फारच लवकर उद्भवलेली आहे. त्यात पुन्हा दत्ताचा अवतार असा अधाशीपणे कसा काय खाईल हे आपल्या टाळक्यात आधीच यायला हवे होते हे त्याला आत्ता समजले.

आता करावे काय? पळ काढावा तर आपल्या बापाच्याने पळणे होणार नाही असली एकेक माणसे इथे आहेत. खंबीरपणे उभे राहावे तर आपण एका झापडीचे नाही आहोत. नाटक करावे तर पुन्हा चमत्कार केल्याशिवाय नाटकाला अर्थ नाही. अंधार पडला आहे म्हणून लपू पाहावे तर तालुका म्हणजे गाव नाही आपण न सापडायला! आणि मुख्य म्हणजे आपल्या गावात आपण केलेल्या गोष्टींना शिक्षा मिळत असे त्यात जरा तरी माणूसकीचा ओलावा असे कारण आपण त्याच गावातले आहोत. हा आहे तालुका, माणसे परकी, सगळेच निराळे! इथे आपण मेलो तरी कोणाला काही फरक पडणार नाही.

वय वर्षे बारा! जगाला उल्लू बनवून स्वार्थ साधण्याची अक्कल ह्याच वयात आलेली. पण जगासमोर भांडे फुटले तर काय करावे हे समजण्याची अक्कल अर्थातच नव्हती. संकट समोर आ वासून उभे होते. मुळात आपण ह्या वयात अजिबात महाराज वाटत नाही हेच समजण्याची अक्कल नव्हती.

चमत्कार, चमत्कार, चमत्कार!

आत्ता, ह्या क्षणी, एका जालिम चमत्काराची आवश्यकता होती. गावकरी स्तब्ध झालेले होते. आपण स्तब्ध झाल्याची जाणीव झाल्याबरोब्बर दत्ताचा अवतारही स्तब्ध होऊन बावचळून पाहात आहे हेही सगळ्यांच्या लक्षात आले होते. मनावर असलेला श्रद्धेचा पगडा दूर होऊन त्याची जागा आता अतिरेकी संताप घेऊ पाहात होता. एक दोघे तर दोन पावले पुढेही झालेले होते. पवार आणि इग्या न घाबरल्याचे दाखवत मागे मागे सरकू लागले होते. आणि त्यातच तो प्रकार घडला.

एक गाडी आली. त्यातून एक शिपाई आणि दोडा उतरले. गर्दीत आले. शिपायाने अन्याची गचांडी धरून दिली एक चढवून त्याच्या कानाखाली. मागून बघतो तर गावातला दुबे प्रकटला. दुबे माळेची तक्रार करायला तालुक्याला आलेला होता. तेव्हाच त्या माळेसकट पोलिसांनी दोडाला पकडून तिथे हजर केले होते. दुबेने सगळा प्रकार सांगितला तसे दत्ताच्या अवताराला अद्दल घडवायला सगळे जातीने तिथे आले. जमीनीत धूळ खात पडलेल्या अन्याला शिपाई ओरडून म्हणाला......

"मादरचोद? माळ चोरून दुसर्‍याच्या घरात टाकून द्येव होतोस व्हय?"

शिपायाने अन्याचे दोन्ही पाय एकाच हाताने धरले आणि त्याला उलटा उचलून गाडीकडे निघाला.

दत्ताचा अवतार संपुष्टात आला होता. मागे जमलेल्या गर्दीतील भाविक लोक प्रथम हळहळत होते व नंतर त्यांनी लहान लहान दगड उचलले. नेम धरून अन्याला दगड मारायला सुरुवात झाली. काही जणांनी तर पवार आणि इग्यालाही धरले. त्यांची निराळीच गोची झाली. आजवर धार्मिक म्हणवून घेणारे ते ह्या असल्या अवतार वगैरे भानगडीत न पडणारे म्हणून ख्यात होते. पण आज चमत्कारी अवतार गावात आल्याआल्या स्वतःलाही देवत्व मिळावे या स्वार्थाने त्यांनी एका नालायक मुलाची अचानक सोबत केली होती. त्यामुळे त्यांच संतपनाचा बुरखाही गळून पडला होता.

उलटा झालेल्या अन्याला अख्खे गाव उलटे दिसत होते. लहान लहान दगड लागल्याचे दु:ख नव्हते त्याला. उलट पोटभर खाता आले ह्याचा आनंदच होता. पण बोच ही होती की वाटली त्याहून फारच लवकर चोरी पकडली गेलेली होती. त्यातच उलटे जाता जाता त्याच्या तोंडासमोर एक खराब झाल्यामुळे कोणीतरी फेकलेले केळ आले. उजव्या हाताने ते पटकन उचलून त्याने ते खायलाही सुरुवात केली. इतकी अशक्य निर्लज्जता लाभलेल्या त्या मुलाचे ते कृत्य पाहून गावकरी अवाक झाले.

आपण येड्यात निघालो ही भावना काही गावकर्‍यांना सोसेना! त्यांनी पवार आणि इग्या ह्या दोघांनीच हे अवताराचे भूत उभे केले असा आरोप ठेवून त्यांनाही चौकीवर न्यायची विनंती शिपायाला केली. आणि त्याच क्षणी अन्याला लांबवर, इतका अंधार असूनही काहीतरी दिसले. ते काय आहे हे कळायला त्याला दोन तीन क्षण लागले इतकेच! पण जेव्हा कळाले तेव्हा त्याला हेही कळाले......

...... की मगाचपासून आपण ज्या क्षणाची वाट पाहात आहोत तो चमत्काराचा क्षण जवळ येऊन ठेपला आहे...

उलटा जात असतानाच अन्याने डावीकडे आणि उजवीकडे पाहिले... थोड्याच अंतरावर एक श्रमदानातून बांधलेले मारुती मंदिर त्याला दिसले. ते दिसताच अन्या जिवाच्या आकांताने ओरडला...

"हनुमंता.... तिन्मुर्ती दत्ताच्या अवताराची सुटका कर... म्हैस उधळव"

अन्याच्या निर्लज्जपणाचा कळस झालेला होता. गावकर्‍यांनी हे विधान ऐकून तर आणखीनच संतापून काही दगड फेकले. त्यातील काही पोलिस शिपायालाच लागल्याने त्याने मागे वळून सगळ्यांना दरडावले. तेवढ्यात लांबवर काहीतरी धुमश्चक्री व्हावी तसे आवाज आले. शिपायासकट सगळ्यांनी मागे वळून पाहिले तर तुफान वेगाने एक उधळलेली म्हैस गर्दीच्या दिशेने येत होती. जनता निमिषार्धात स्तब्ध झाली. सगळे जागच्याजागी थिजले. एखाद्या बी ग्रेड चित्रपटाच्या नायिकेच्या अंगावरील टॉवेल गळून पडावा तसा शिपायाच्या हातातून दत्ताचा अवतार गळून खाली पडला व स्वतःच्या पायांवर उभा राहिला. निष्प्राण पुतळ्यांसारखे उभे असलेले गावकरी ते धूड पाहून घाबरून शेवटी बाजूला झाले. म्हशीला स्वतःचे विचार होते. स्वतःची दिशा होती. उधळण्याचे समर्थनीय कारण होते. भन्नाट वारा होता व त्या वार्‍यातच वरच्या अंगाला कोणीतरी तिची शेपूट पिरगाळलेली होती. त्या एकुण प्रकारामुळे तिच्या मेंदूत घडलेल्या रासायनिक प्रक्रियेचा एक दृष्य परिणाम म्हणून ती बेभानपणे गर्दीत घुसली होती. गावकरी धक्काबुक्की करत बाजूला होत असताना न हालणारी अशी तीनच माणसे होती. दत्ताचा अवतार, शिपायाचा अवतार आणि दोडा!

म्हैस जवळ आली आणि शेवटच्या क्षणी दत्ताचा अवतार चपळाईने बाजूला झाला. दोडा शिंगांवर उचलला गेला. शिपाई त्या म्हशीच्या धडकेने उताणा पडून धूळ खाऊ लागला. काही अंतरावर म्हशीला दोडा शिंगावर असल्याची जाणीव झाली. स्वतःच्याच शिंगांचे प्रथमच वजन वाटल्यामुळे तिने शिंगे झटकली व कस्प्टासारखा दोडा कुठेतरी फेकला गेला. इकडे दत्ताचा अवतार मोठ्या मनाने श्रमदानवाल्या मारुतीला फुकटचा सल्ला देत होता.

"हनुमंता, गावकरी चुकले, त्यांन्ला माफी दे"

एकुण प्रकाराला काय म्हणावे हे कोणालाच समजत नव्हते. पण पवार आणि इग्याला चांगले समजले. प्रथम पवार लोटांगण घालायला धावला, पाठोपाठ इग्या दत्ताच्या अवतारासमोर भुईसपाट झाला. दोघांनी हमसाहमशी रडत भेकत गावकर्‍यांच्या वतीने दत्ताची माफी मागीतली, कोपू नये म्हणून विनवण्या केल्या.

सपाटून गांड आपटलेला शिपाई न उभा राहू शकत होता न पडून राहू शकत होता. त्याने अर्धवट शारीरिक अवस्थेतच दत्ताच्या अवताराला लांबून हात जोडले. हा अवतारच असण्याला शासकीय प्रमाणपत्र मिळाल्याने सासरी डोक्यावरचा पदरही न सरकणार्‍या सवाष्णी आपापल्या वेण्या सोडून अवताराच्या पायाची धूळ मस्तकी लावायला धावल्या. मगाचचे दहा बारा उन्मत्त लोक म्हैस केव्हा केव्हा उधळू शकते ह्याच्या त्यांना माहीत असलेल्या कारणांत एक कारण मनातल्या मनात वाढवत होते. 'दत्तम्हाराजांची आज्ञा झाल्यावं' असे ते कारण होते.

भरल्या पोटी तुडुंब मार खाऊन आणि काही मिनिटे सगळे जग उलटे कसे दिसते ह्याचा अनुभव घेऊन ठेचकाळलेले, रक्ताळलेले दत्त महाराज जेव्हा पुन्हा स्थानापन्न झाले, तेव्हा सर्वात पहिला नमस्कार दुबेने केला. वाकलेल्या दुबेला महाराजांनी आशीर्वाद म्हणून हे वाक्य ऐकवले.

"दत्तावं कुत्रं सोडतूस?? गावाकं जा आन् दोन दिस उपास कर! गरिबाला दान कर. झुरळं खाणार्‍या बाईला कोंबडं दे. ज्ज्जा??"

दुबेने दत्तावर कुत्रे कधी सोडलेले होते हे तालुक्याला माहीत नव्हते. पण सोडलेले नसते तर दुबे तसे स्पष्ट म्हणालाच असता की? दुबे तर मान खाली घालून उभा होता. ह्याचा अर्थ अवताराला अंतर्ज्ञानाने समजलेले होते की दुबेने कुठेतरी कधीतरी दत्तावरच कुत्रे सोडलेले आहे. गावाने दुबेला तालुक्यातून घालवला. बायकोची माळ सापडलेला दुबे स्वतःच्या डोळ्यांनी चमत्कार पाहून परतत असताना त्याला गावातली झुरळे खाणारी एकमेव बाई कोण हे आठवले. तिला कोंबडे देणे जीवावर येत होते त्याच्या! पण एक कोंबडं देऊन जर तालुका आपल्याला स्वीकारणार असेल तर हिशोब फायद्याचाच होता.

इकडे दोडा विव्हळत अवतारासमोर वाकत होता. पवार आणि इग्याने अवताराशेजारी एक वेगळे बस्तान बसवून 'दक्षिणा, नारळ वगैरे हिक्कं ठिवा' अश्या गर्जना सुरू केल्या होत्या. म्हैस गुप्त झाली होती. काही मंडळी दत्ताची आज्ञा शिरसावंद्य मानणार्‍या हनुमंतासमोर लोटांगण घालत होती. समोर आलेला प्रसादाचा आयटेम इग्याने अवताराच्या पायाला लावून मग भक्ताला परत द्यायचा सपाटा सुरू केला. अवतारापर्यंत पोचण्याचे एक्स्क्ल्युझिव्ह राईट्स पवार व इग्याकडे असणे तालुक्याने मान्य केले.

भविष्यातल्या एका मोठ्या पंथाचे बस्तान आज बसत होते.

मात्र...... अवताराचे तिकडे लक्ष नव्हते. अवताराला दिसत होती एका सवाष्णीच्या पाठीची पन्हाळ... जी चारू नाचणारणीच्या पन्हाळीसारखीच वाटत होती. अंधार्‍या गुहेतील भावना पुन्हा उफाळत असल्याची जाणीव अन्याला झाली तसा तो हरखला. जे गेले ते एकदाच जाते असे नसून वारंवार जाऊ शकते हे ज्ञान त्याला मिळाले. कसलाही विधिनिषेध न बाळगता त्याने गर्जना करत त्या सवाष्णीच्या पाठीवरून हात फिरवला...

"आमची खरी भगत हाये ही... हिला जपा"

हरखलेली ती सवाष्ण घेरी येऊन पडायच्या बेताला आली होती तेव्हा......

...... दत्ताच्या अवताराचे डोळे त्या अंधारातही लख्खपणे लकाकले... कारण......

प्रथमच त्या दक्षिणा, प्रसाद वगैरेच्या चटईवर....

...... एक अख्खी दहाची नोट येऊन पडलेली होती!!!!!!

=====================

-'बेफिकीर'!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लवकर भाग टाकल्या बद्दल धन्यवाद..................!!!
हा भागपण मस्त झालाय..................... एकदम भारी!!!

सुंदर बेफिजी
ढोंगी साधुंच्या जन्माला समाज पण तितकाच जबाबदार असतो.
आणि अशा बुवांच आयुष्य पण काही सओपे नसणार.
शेवटी परिस्थितीच माणसाला "ढोंगीबुवा" बनवते हे खरेच असावे.

@ लग्न करून गावात आणलेल्या विवाहितांच्या मनांमधील भावनांचे बंधारे फुटले. पदर कंबरेला खोवून त्या दिवाळीत चुकीच्या पद्धतीने उडणार्‍या भुईचक्रासारख्या लोळू लागल्या...... Rofl

मस्तच...बेफि...

आमित

अपेक्षेप्रमाणे ऊत्तम

सध्याच्या बुवाबाजीचा समाजावर होणारा परीणाम दिसणार बहुदा

पुढील भाग लवकर येऊ द्या राव