फिनिक्स

Submitted by पशुपति on 16 November, 2013 - 09:33

एकेदिवशी दोघे बागेत बसले असताना तिला एक कल्पना सुचली.
“ए, तुला मी सांगते तसं एक चित्र काढता येईल का?”
“म्हणजे कसं? चित्राचा विषय तरी सांगशील...”
“तसा विषय अगदी सोपा आहे. आपल्या समोरची जेवढी बाग दिसतेय ना, तीच काढ. ती झाडे, त्यातून गळून पडणारी पाने, ती छोटी छोटी फुलझाडे, ती बागडणारी लहान मुले, जमिनीवरीलगवत, त्यावर बसलेली सर्व माणसे इत्यादी सर्वकाही चित्रात येऊ दे. काढशील का माझ्यासाठी एवढे?”
“बापरे, हा विषय तुला सोपा वाटतो? खूप अवघड आहे, तरी पण मी प्रयत्न करीन. पण एका अटीवर....माझी स्फुर्तीदेवता मी चित्र काढताना माझ्याजवळ हवी.”
“अरे कसं शक्य आहे ते? एवढा वेळ घराबाहेर....काय सांगणार मी घरी रोज? आत्ता सुद्धा रोज त्रेधातिरपीट उडते माझी! पण डोळ्यावर येण्याइतका उशीर होत नसल्याने फारसे कोणी विचारतनाही.
“मग असं करूया का? फक्त शनिवार-रविवार दोन तास. तेवढा वेळेत जमेल तेवढे करू.”
“ओके...सुरु तर कर! काही अडचण आली तर सांगेनच.”
सुब्रतोलादुसऱ्या दिवशी रामप्रसादने जवळजवळ पकडलेच! “अरे, आहेस कुठे? गेल्या पंधरा दिवसांत एकदाही भेटलं नाहीस ! आम्हा दोघांना तर इतके चुकल्यासारखे वाटत आहे कि काही विचारू नकोस! शिवाय अपराधीपणाची भावना आहेच! गावाकडील लोक काय म्हणतील मला? एकट्या आलेल्या एका मुलाची विचारपूस पण करता आली नाही. ते काही नाही, आज ऑफिस सुटल्यावर मी तुला घरी घेऊन जाणार आहे. मी एकटा घरी गेलो तर सुचित्रा मला घरात घेणार नाही! तिचा आदेश आहे असं समज.”
सुब्रतोला आग्रह मोडता आला नाही. संध्याकाळी ऑफिस सुटण्याआधी सुनंदाची मैत्रिण मिश्किलपणे सांगत आली, “अग ए सुनंदा, तुझ्या त्या बंगाली बाबूचा फोन आहे. फोन घेणार कि सांगू आली नाही म्हणून??”
सुनंदा मनात म्हणाली, “ह्या मैत्रिणींचा काही भरोसा नाही, सांगतीलही तसं!” हातातलं काम तसंच टाकून सुनंदा फोनजवळ धावतच गेली. जाताना जितक्या वेगाने गेली, परतताना तेवढ्याच जडअंतःकरणाने सावकाश पावले टाकत आली.आपल्या खुर्चीवर बसून टेबलावर डोके ठेवून तशीच बसून राहिली. ऑफिस सुटले तरी उठायचे भान राहिले नव्हते तिला!
मैत्रिणीने शेवटी तिला उठवले. “चला आता बाईसाहेब! बंगाली बाबू नाही तर नाही, आज आम्ही सोबत करू एका मुलीची!!”
.......क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users