फिनिक्स-पान०४

Submitted by पशुपति on 15 November, 2013 - 08:39

दुसऱ्यादिवशी ऑफिसमध्ये रामप्रसाद भेटला. “ अरे, काय कुठे असतोस तू?? ऑफिसमध्ये पण भेट नाही, घरी पण आला नाहीस! आज आपण बरोबरच बाहेर पडू. मस्तपैकी घरी चहा घेऊ आणि आपण तिघेही बाहेर जेवायला जाऊ. एखादा छानसा हिंदी सिनेमा पण बघू. नाहीतरी उद्या सुट्टीच आहे. उशिरा उठले तरी चालेल.” सिनेमा बरा होता. इंटरवल झाली.
सुब्रतो म्हणाला, “मी आपल्यासाठी आईस्क्रिम घेऊन येतो.”
बाहेर येऊन आईस्क्रिम पार्लरवर कोणत्या फ्लेवरचे आईस्क्रिम घ्यावे हे काही त्याला ठरवता येईना. तेवढ्यात एका मुलीचा आवाज त्याच्या कानी पडला, “अहो, तीन कोर्नेतो द्या.”
“येस.....आपण पण कोर्नेतोच घेऊया.” सुब्रतोच्या मनात आले. त्याने सहजच मान वळवून पहिले, तर काउंटरवर सुनंदा पैसे देत होती. तो धावतच काउंटरपाशी गेला आणि म्हणाला, “आणखी तीन कोर्नेतो द्या.” या धडपडीत त्याने तिच्या अंगावरच धडक दिली आणि ती पण पडता पडता वाचली. त्याला पाहून तिला आश्चर्याचा धक्काच बसला.दोघेही मग गप्पा मारत तिथेच उभे राहिले. सिनेमा सुरु झाल्याची घंटा वाजली तरी ह्यांचे लक्ष होते कुठे! पाच मिनिटांनी शेवटी डोअरमनने सिनेमा सुरु झाल्याचे सांगितले, तेंव्हा कुठे हे भानावर आले. आणि मग पळत पळतच आपआपल्या जागेवर गेले.
रामप्रसाद म्हणाला, “काय रे, इतका वेळ? का पार्लरवर भेटली की काय कोणी??”
पुढे संपूर्ण वेळ पडद्यावर सुब्रतोला सुनंदाच दिसत होती. सिनेमा संपल्यावर दोघांची नजरभेट झाली. रामप्रसादच्या लक्षात येणार नाही अश्या बेताने सुब्रतोने टाटा केला. पण सुचित्राच्या नजरेतून मात्र ते सुटले नाही.‘कुछ तो है..!!’ असे मनात म्हणून ती गप्प राहिली. (....सिक्स्थ सेन्स!!)
दुसऱ्या दिवशीपासून ऑफिस सुटल्यावर सुब्रतो आणि सुनंदा रोज भेटू लागले. कधी एफ. सी. रोड, कधी वैशाली, कधीbund garden रोड, तर कधी सारसबाग. प्रेमाचे अंकुर दोघांच्या मनात फुलू लागले.रोजच्या भेटीत त्या अंकुराला पालवी फुटून त्याचे इवलेसे रोपटे कधी झाले ते दोघांच्याही लक्षात आले नाही. आता तर त्यातून कळी पण उमलली होती. तिच्या वाढदिवसानिमित्त त्याने तिचे एक छानसे portrait काढून तिला भेट दिले होते.तिने पण त्याचा हात हातात घेऊन बराच वेळ घट्ट दाबून धरला. जणू तिला सुचवायचे होते, ‘हीचित्रकाराची बोटे आहेत, जपून ठेव. ह्यातून अजून बरेच काही निर्माण व्हायचे आहे. आणि ह्या तुझ्या निर्मिती कार्यात माझी तुला सदैवसाथ राहील.’

.......क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users