“ए आज्जी मी आलो !”
मोठ्याने आरोळी ठोकत मी माजघर ओलांडून देवघराकडे धाव घेई .आजी तिथे नक्की असणार हे माहित होते.हातातील वही व पोथी बाजूला ठेवून आजी प्रेमाने माझे स्वागत करीत असे .”सुनील किती वाळलास रे ” ,म्हणून गालावरून हात फिरवे आणि स्वत:च्या कानशिलावर बोट मोडत असे .मामाकडून आजोळहून घरी आल्यावर हा नेहमीच पहिला सीन असे .मग सुटीतील दोन महिण्याच्या गैरहजरीचा मोबदला सव्याज मिळत असे .
घरातील कामात आईला मदत केल्यावर आजीचा बहुतेक मुक्काम देवघरात असे .दिवाबत्ती, देवपूजा सारा जिम्मा तिच्याकडे असे . संध्याकाळी ती देवळात जायची ,तिथेच जुन्या मैत्रिणी बरोबर बोलायची तेवढे सोडले कि मग बाकी ना कुणाच्या अध्यातमध्यात वा गप्पा टप्पात. तिला त्याची मुळीच आवड नव्हती .पण उपासतापासाचे मात्र तिला वेड होते .त्यामुळे तिच्याकडे एक उपासाचे लाडू व सुक्या मेवा ठेवायचा डब्बा नेहमी असे .तिला तो खातांना मी कधीच पहिला नव्हता परंतु आमचा मात्र त्यावर केव्हाही हक्क असे . शाळा, खेळ, अभ्यास या साऱ्यातून आजी साठी वेळ मुद्दाम काढावा लागायचा नाही .ती या साऱ्यात अंतर्भूत असायची.खरतर माझे पानही तिच्या शिवाय हलत नसे .
आजीला दोन सवयी होत्या ते म्हणजे साध पान खायची अन वहीत राम राम लिहित बसायची पानाचा तो वेगळा गंध नेहमी तिच्या कपड्याला येत असे .मी त्या लिहिण्या वरून तिला नेहमी चिडवत असे,म्हणायचो “अगं आजी, असे राम राम लिहून का कुठे राम मिळतो ? तू उगाच शाई आणि वह्या वाया घालवतेस बघ “. आजी माझ्याकडे बघून गोड हसे आणि मला डब्यातला एक लाडू वा सुकामेवा देत असे .तिच्या गोड हसण्यामुळे अन लाडूच्या प्रसादाने चर्चा वाढत नसे .मला नेहमी वाटे आजीला समजावून सांगायला पाहिजे .असे राम राम लिहून बोट व पाठ दुखून का घेतेस .पण ते सांगणे या एका वाक्याच्या पुढे कधी गेलेच नाही
पुढे आम्ही शहरात आलो .आजी मात्र गावी तिकडेच राहिली .सुटीत भेटी गाठी होत असत .प्रेमाचे उधान येत असे .हळू हळू थकलेली आजी कालप्रवाहात विरघळून गेली .तिचे जाणे हृदयात मोठी पोकळी निर्माण करून गेले .पण ती जाणार हे तिला, आम्हा सर्वांना माहित होते .तिच्या जाण्यात आजारपण नव्हते ,दु:ख नव्हते ,वेदना नव्हत्या पान गळून पडावे तशी आजी गेली .
गावातील घर बंद झाले ,येणे जाणे हि कमी झाले .बऱ्याच वर्षांनी एकदा गावी गेलो .सात बाराचे जुने उतारे आणायला ,रहिवासाचा दाखला काढणे आणि इतर काही अत्यावश्यक कामा करता .घर साफ करून घेतले .जुन्या आठवणीत मन बुडून गेले .
जुन्या लोखंडी पेटीत पेपर शोधत होतो ,अचानक आजीच्या त्या रामनामाच्या वह्या सापडल्या .एका ओळीत लिहलेल्या काहीही खाडाखोड नसलेल्या .स्पष्ट रेखीव सुंदर जणू एकेक अक्षर कोरून काढलेल्या .माझ्या डोळ्यात पाणी आले .आजीच्या आठवणी फेर धरून नाचू लागल्या .ते माझे बोलणे आठवले “आजी कश्याला उगाच सदानकदा लिहित असतेस हे”.त्यावर आजीचे हसणे जणू कालचीच गोष्ट वाटू लागली .प्रेमाने हृदयाशी धरलेल्या त्या वह्या मी पुन्हा उघडून पाहू लागलो .त्या प्रत्येक वहीच्या पहिल्या पानावर संकल्प होता सुनीलच्या आरोग्य, जय, लाभ, यश, कीर्तीसाठी .माझ्या गळ्यात हुंदका दाटून आला ,आणि डोळ्यातून पुन्हा अश्रू धारा वाहू लागल्या .
त्या रात्री या घटनेमुळे असेल कदाचित ,मला एक स्वप्न पडले .त्या देवघरात आजी बसली आहे.राम नाम लिहित .आणि मी नेहमी सारखा तिथे धावत जातो आज्जी म्हणून ओरडत आणि तिच्या मांडीवर डोके ठेवतो .आणि मला जाणवले अरे हे तर मी बघतो आहे अचानक मला मी ते दृश बघणारा वेगळा अशी जाणीव होवू लागली .आता आजीच्या मांडीवर मी नव्हतो .एक गोरापान अतिशय सुंदर मुलगा तिथे लोळत होता आणि आजी त्याला लिहिता लिहिता थोपटत होती .मला राग आला माझ्या जागेवर आणखी कुणीतरी झोपलाय आणि आजीला कळत कसे नाही .मी जोराने ओरडून सांगायचे ठरवले पण माझा आवाज मलाच एकू येईना .मला काही सुचेना .त्या मुलाकडे तो कोण आहे या बद्दल ची उत्सुकता ,त्याचा राग, हेवा अश्या भावनांनी मन भरले होते .तोच त्या मुलाचे माझ्याकडे लक्ष्य गेले .तो तसाच लोळत माझ्याकडे बघत हसला आणि कुणी तरी कानात बोलले “रामलला” !! मी दचकून उठलो .अंगावर रोमांच उभे राहिले ,डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहू लागला.आजीच्या साध्या पानाचा दरवळ सभोवताली दाटून राहिला होता .
विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/
मायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.
सुंदर....
सुंदर....
छान!
छान!
अंतःकरणाला
अंतःकरणाला भिडणारे.....
...... नि:शब्द ....
फारच सुंदर...............
फारच सुंदर...............
बाहेरगावी असल्याने इतक्या
बाहेरगावी असल्याने इतक्या उशिरा धन्यवाद लिहतोय ,त्या बद्दल क्षमस्व .धन्यवाद विजय राजू ,प्रसन्न ,शशांक .
सुंदर
सुंदर
धन्स नीलिमा .
धन्स नीलिमा .
बघितलंच नव्हतं हे! शेवटचा
बघितलंच नव्हतं हे! शेवटचा परिच्छेद वाचताना अंगावर काटा उभा राहिला गोरापान श्रीराम!
तुमच्या आजीची गोष्ट वाचून माझ्या आजोबांची आठवण आली. मला कळायला लागल्यापासून ते जाईपर्यंत मी त्यांना नित्यनेमाने "श्री राम जय राम जय जय राम" जप बिनओळींच्या कागदावर लिहिताना पाहिलं आहे. त्या कागदांची बाडं ते गिरगावातल्या अक्कलकोट स्वामींच्या मठात स्वामींच्या चरणांवर ठेवून येत. ते गेल्यावर त्यांच्या शेवटच्या बाडांपैकी निम्मी बाबांनी स्वामी मठात नेऊन ठेवली. उरलेली निम्मी मी माझ्या लग्नानंतर माझ्या घरी घेऊन आले. अजून माझ्याजवळ एका कापडात गुंडाळून ती सांभाळून ठेवली आहेत. योगायोग असा की रामनाम लिहिणं हे पुढे माझ्याही आयुष्यात आणलं गेलं. त्याचीच इच्छा
भगवंताला पिता आणि त्यालाच आपलं बाळ म्हणून अनुभवणं ही आंदोलनं खूप छान असतात
खूप छान. जय श्रीराम
खूप छान. जय श्रीराम
खूप छान लिखाण
खूप छान लिखाण
(No subject)
खूप छान!
खूप छान!
सुंदर
सुंदर
सुंदर.
सुंदर.
फार सुंदर!
फार सुंदर!
सुरेख!
सुरेख!
खूप छान!
खूप छान!
छान
छान
खूप छान!
खूप छान!
छान कथा
छान कथा
अंगावर काटाच उभा राहिला शेवट
अंगावर काटाच उभा राहिला शेवट वाचून..खूप सुंदर..अगदी डोळ्यासमोर सगळे बघत आहे असे वाटले...अवांतर नुकतेच अयोध्येला रामलल्ला चे दर्शन करण्याचा योग आला आणि हा लेख वाचून परत एकदा दर्शन घडले..
>>>>>त्या प्रत्येक वहीच्या
>>>>>त्या प्रत्येक वहीच्या पहिल्या पानावर संकल्प होता सुनीलच्या आरोग्य, जय, लाभ, यश, कीर्तीसाठी
_/\_ आजीची आशीर्वाद न काय!