अंत नसलेल्या कथा- १

Submitted by साजिरा on 13 November, 2013 - 07:05

आताच्या रविवार-सकाळी त्याला पुन्हा ते सारं आठवलं.

कालच त्याने त्याच्या सुंदर वन-बीएचके महालाचा ताबा घेतला होता. फर्निचरचा सोस नव्हताच, पण किचन-प्लंबिंग-खिडक्या-पडदे-बसायची जागा-झोपायची जागा-स्टडी-लायब्ररी हे त्याने मनासारखं आणि अद्ययावत करून घेतलं होतं. खिडक्यांतून दिसणार्‍या टेकड्या, त्यांमधला सुर्यास्त आणि त्यानंतरचा दूरवर दिसणारा हायवेवरचा झगमगाट हे फारच विलोभनीय होतं.

लग्न होईस्तोवर हा महाल फक्त आणि फक्त आपलाच- अशी सुखद कल्पना पुन्हा पुन्हा मनात घोळवत अख्खा शनिवार त्याने सगळं नीट लावण्यात घालवला. सगळं झाल्यावर तो नेटकेपणाने जेवला आणि सुखाने झोपला. मग जागा झाला तेव्हा रविवारसकाळ उत्सुकतेने त्याच्या महालात डोकावत असल्यासारखी दिसत होती. मग उत्साहाने तो उठला आणि त्या रविवारसकाळचं बोट धरून म्हणाला- चल बरं, महाल सोडून जरा राज्यात फेरफटका मारू. आपली प्रजा आणि प्रजेची सोसायटी कशी आहे ते तरी बघू.

रविवारसकाळ आधीच आनंदात आणि उत्साहात असल्याने प्रश्नच नव्हता. मग तो या नव्या सोसायटीत बिल्डरने बांधलेले सुबक जॉगिंग ट्रॅक्स, बसायचे कट्टे, फुलझाडांचे ताटवे, बांबूची बेटे, पोहण्याचा तलाव, घसरगुंड्या नि झोके बघत फिरला. सगळं कसं नीटनेटकं, स्वच्छ, सुंदर, ताजंतवानं आणि उजळ. आजच जन्माला आल्यासारखं.

शिवाय महत्वाचं म्हणजे सारं कसं देवाने निर्माण केल्यासारखं अस्पर्शित. झाडं बर्‍यापैकी तशीच ठेवून त्या मायबाप दयाळू बिल्डरने इमारती बांधल्या होत्या. शिवाय स्वतः आणखी नवी झाडं आणून लावलेली. मग फुलझाडं, शोभेची रोपं, लॉन यांच्या शिस्तीतल्या ओळीच्या ओळी आणि छोटी मोठी मैदानं. यामुळे जुने नवे पक्षी आपल्याच धुंदीत आणि देवाची लेकरं असल्यागत बागडत आणि आवाज करत इकडेतिकडे उडत होते.

याशिवायचं आणखी एक महत्वाचं म्हणजे राहायला अजून कुणी फारसं आलं नव्हतं. माणसांचे आवाज नव्हते. माणसं नाहीत म्हटल्यावर कचरा आपोआपच नव्हता. नाही म्हणायला वाळलेला पालापाचोळा, आणि सुकून खाली पडलेली फुलंबिलं होती. पण तीही देवाने सांगितल्यागत आणि जागेवर हक्क दाखवल्यागत, सुखाने पडून असल्यागत. देवाचे हे तुरळक वारसदार सोडले तर जिकडे तिकडे फक्त आणि फक्त प्रसन्न सोनेरी सुवासिक रविवारसकाळ. आणि तिचं बोट धरून अख्ख्या कॅनव्हासच्या कुठेतरी कोपर्‍यात चितारल्यागत जिवंत-हाडामांसाचा तो. हे सारं भव्य नेपथ्य फक्त त्याच्याचसाठी कुणीतरी खूप कष्ट करून उभारल्यागत.

असं सारं श्रीमंत भारीपण अंगा-खांद्या-मनावर लेवून मिरवल्यागत फिरत फिरत तो त्या दैवी सोसायटीच्या पूर्व भागात आला. इथं आणखीच भरपूर मोकळी जागा आणि जिकडेतिकडे शिस्तीत पुन्हा रोपटी, ताटवे आणि केशरीपिवळ्या पेव्हरब्लॉक्सच्या पायघड्या. खुशालून जाऊन त्याने आणखी दूरवर नजर टाकली तर त्या केशरीपिवळ्या पायघड्यांशी रंगसंगती साधत लाजतमुरडत उभं असलेलं इवलंसं देऊळ.

ते देऊळ त्यानं क्षण-दोनक्षणभर टक लावून पाहिलं आणि आताच्या या रविवार-सकाळी त्याला पुन्हा ते सारं आठवलं.

’आणि या ठिकाणी आम्ही एक सुंदर गणेश मंदिर बांधत आहोत. बघा.. हे असं’ असं बिल्डरचा सेल्स एक्झिक्युटिव्ह त्याला पुन्हा पुन्हा सांगत होता- ते त्याला आता आठवलं. तेव्हा बाहेर मंदिरं काय कमी आहेत, म्हणून आता राहायच्या जागांतही मंदिरं?- असं विचारावं असं त्याला तीव्रतेने वाटून गेलं होतं, पण खूप कामं फार कमी वेळेत आवरायची सल्याने त्याने तो मुकाट्याने गिळून टाकला होता. राहायची जागा कितीही भिकार नि घाणेरडी असो पण मंदिरं मात्र मोठी, भव्य, चकाचक, सुंदर, रंगीबेरंगी- इत्यादी झालीच पाहिजेत- या मॅड भाबड्या खुनशी प्रकरणाचं आपण एकटे काहीही करू शकत नाही, हे त्याला बर्‍याच पूर्वी नीट कळलं होतंच. त्यामुळे त्या एक्झिक्युटिव्हच्या इतर बडबडीकडे लक्ष न देता त्याने तिथून काढता पाय घेतला होता.

आता त्या देवळाचं ताजं लखलखणारं रंगरूप, रविवारसकाळच्या प्रकाशामुळेही असेल, बघून त्याची पावलं आपोआप तिकडे वळली. किंवा मग त्या रविवारसकाळचं बोट धरलेलं असल्यामुळेही असेल. किंवा मग पुन्हा या पूर्व भागात पाऊल टाकायचं नाही- हे ठरवण्याची कारणं शोधण्यासाठीही असेल. किंवा काहीतरी दैवी घडायचं असेल, म्हणूनही असेल. किंवा कितीही काहीही दैवी वगैरे असलं घडलं तरी ते रूटीन सामान्य आणि रँडम सिलेक्शन म्हणूनच असतं- हे पुन्हा एकदा सिद्ध होण्यासाठीही असेल. काय असेल- ते या रविवारसकाळलाही सांगता येणारं नसेल. पण त्याची पावलं आपोआप मंदिराकडे वळली, हे खरं.

तो जवळ आला तेव्हा कळलं- हा खरा केशरी रंग नाहीच. म्हणजे असं, की नेहमीच्या देवळांत मंदिरांत दिसतो तो नाही. तो जरा गडद होता. मातकट-तपकिरी किंवा किरमिजी रंगाकडे झुकणारा. किंवा खरं म्हणजे एक्झॅक्टली तसाही नाही. पण धर्मवाचक जातीवाचक पंथवाचक झेंडावाचक समूहवाचक केशरी नव्हता हे नक्की.

तो तसा खुद्द देवानेच दिल्यागत रंग बघून त्याला उत्साह आला. त्या रविवारसकाळमुळे हा अकारण उत्साह उत्पन्न झाला आहे की काय असा एक छोटा संशय त्याला येऊन गेला. पण तसं असेल तर बरंच आहे आणि आपल्या वागण्याचं खापर एक दिवस तरी या रविवारसकाळवर फोडता येईल आणि दुसर्‍या दिवशी आपले आपण नामानिराळे ओरिजिनल, स्वतंत्र!

असा चोरून विचार केल्यावर मग त्याला पुन्हा एकदम दुप्पट हुरूप आला. त्याच्या हालचाली वाढल्या. हुरूप हातापायांवर उतरून चेहर्‍यावर दिसू लागला की काय, म्हणून तो चपापला. पण रविवारसकाळ आपल्याच नादात असल्याने ते चालून गेलं.

मग तो मंदिराच्या समोर उभा राहून निरखून बघू लागला. जेमतेम आठ बाय आठ फूट एवढ्याच जागेत ते उभं होतं. पण लहान मूल पहिल्यांदा उभं राहत असल्याच्या नवलाईने आणि प्रसन्नपणे उभं होतं. कमीत कमी नक्षी असलेले पण सुबक असे चार खांब आणि वर शंक्वाकृती छप्पर- बास. मागची भिंत होती, आणि इतर तिन्ही बाजू मोकळ्या. एका बाजूला आसरा घेतल्यागत कसलासा वेल वरपर्यंत चढला होता. सगळ्या बाजूंना सुंदर फुलझाडं आणि शोभेची रोपटी देखील.

त्याने आतमध्ये पाहिलं तर पूजा अर्चा नित्यनेम आरती होत असलेलं कुठचंही चिन्ह दिसेना. धूप-उदबत्ती-निरांजन-हळद-कुंकू-तांदूळ-तेल-वाती-दक्षिणा-नैवेद्य-फुलं-दूर्वा यांतलं आणि यांसारखं काहीही नाही.

तो समाधानाने तिथंच खाली बसला. खूप वेळ मंदिराकडे पाहत राहिल्यावर त्याला हे मंदिर नसावंच मुळी, असंही वाटून गेलं. तिथल्या त्या वातावरणात आणि अवकाशात असं वाटत होतं, की मनातली सुप्त इच्छा डोकं वर काढत होती- हे त्याचं त्यालाही सांगता आलं नसतं. मात्र या रविवारसकाळसोबत इथं याच ठिकाणी बसून आपला जन्म सहज आणि सुखाने जाईल- हे मात्र त्याने रविवारसकाळला बजावून सांगितलं.

***

तो कितीतरी वेळ तसाच ध्यानधारणेत मग्न झाल्यागत बसून राहिला. हे असं मग्न होणं आजकाल फार दुर्मिळ झालं होतं, आणि आजच्याबद्दल रविवारसकाळसोबत या चिमुकल्या मंदिराचेही आभार मानलेच पाहिजेत असं मनात येता येताच तो पाठ फिरवून बसला.

पाठ फिरवली तेव्हा त्याला कळलं- ही जागा बर्‍यापैकी उंचावर आहे, आणि पाचशे घरांची ही नवीकोरी सोसायटी भातुकली मांडून ठेवल्यागत अख्खीच्या अख्खी इथून दिसतेय. आंघोळ करून नवे कपडे घालून गंध-पावडर-टिकली-काजळ करून एकमेकांचे हात धरून उभ्या ठाकलेल्या इमारती.

एकेक इमारत तो न्याहाळून बघू लागला. त्याची नजर प्रवास करत हळूहळू सर्वात जवळच्या इमारतीवर आली, तेव्हा तो किंचित दचकला. पहिल्याच मजल्यावरच्या बाल्कनीत एक मुलगी त्याच्याकडे टक लावून बघत होती. रविवारसकाळचं निमित्त साधून ती न्हायल्यानंतर केस वाळवत असावी. आपण काय काय करत असताना, कुठं कसं बघत असताना हिनं बघितलं? त्याला एकदम चोरी पकडली गेल्यागत झालं. आपण स्वतःशीच बोलत विचार करत असताना चित्रविचित्र हावभाव करताना तर नाही ना बघितलं?

त्याने नजर वळवली खरी, पण काही क्षणांनी खेचली गेल्यागत पुन्हा नजर तिकडे गेलीच. ती आता किंचित हसत होती. म्हणजे असावी. त्याने नजर वळवून पुन्हा काही क्षणांनी बघितलं, तर कसल्याशा खुणा करत होती. बोट दाखवून काही सांगत होती. जरा वेळाने त्याच्या लक्षात आलं- मघाशी त्या रविवारसकाळसोबतच्या ध्यानधारणेत कशी कोण जाणे, त्याची एक चप्पल चुकून देवळात गेली होती. तिथं बसताना भान न राहवून असं झालं असावं.

आता या गोष्टीचं त्याला काही वाटलं नाही. कारण देव-देऊळ-मूर्ती याबाबतची त्याची स्वतःची काही पक्की अशी मतं होती. पण ही मुलगी सांगत होती, म्हणून त्याने चूक झाल्याचं स्वीकारल्यागत ती चप्पल बाहेर घेतली. एकतर देवाबद्दलची मतं वेगळी, आणि मूर्तीवर किंवा चित्रावर विश्वास नाही, कुठचीही श्रद्धा आजवर जोपासली नाही- हे सारं पुराण त्या ओळखही नसलेल्या मुलीला सांगण्यात अर्थ नव्हता. आणि दुसरं म्हणजे विश्वास, श्रद्धा इत्यादी असलेल्या लोकांसमोर ते डिवचले जातील किंवा त्यांना मुद्दाम केल्यागत वाटेल- असं काही करण्याचं किंवा बोलण्याचं तो टाळत असे.

तो मग तिथून निघाला. मघाच्याच नक्षीदार पायवाटेनं पश्चिमेकडे चालत निघाला. मोठा कम्युनिटी हॉल आणि त्याशेजारचा स्विमिंग पूल ओलांडल्यावर वळण होतं. तिथं त्याने मागे वळून देवळाकडे बघितलं, तर ते प्रसन्न हसत असल्यागत त्याच्याकडे बघत होतं.

आणि ती मुलगी अजून तिच्या बाल्कनीतच होती. ते तसलं प्रसन्न वगैरे ती हसत होती की ते टुमदार देऊळ- असा एक छोटासा गोंधळ त्याचा झालाच.

***

आठवड्याच्या चाकाशी घट्टपैकी स्वतःला बांधून घेतलं, की रविवारसकाळ जरा जास्तच प्रसन्न हसत महालात डोकावते असा त्याचा अनुभव होताच. पुढच्या रविवारसकाळीही अगदी अस्संच झालं.

मग कुठूनतरी अचाट ऊर्जा घेऊन तो उठला, आणि पटापट आवरून बाहेर पडला. पार्किंगमध्ये बघितलं तर एक ट्रक आडदांडपणे उभा होता. कुणी तरी आलं असावं नव्याने राहायला. खूप लोक, भरपूर आवाज आणि बेदम सामान असा एकंदर जंगी कार्यक्रम दिसत होता. तिथून तो पटकन निघाला आणि इमारतींच्या मधून असलेल्या झाडा-पायवाटांमधून फिरायला सुरू केली. मागच्या वेळेसारखंच- त्या रविवारसकाळचं बोट वगैरे धरून.

त्याने हिशेब केला- सार्‍या सोसायटीत एक चक्कर टाकायची म्हणजे एक किलोमीटरचा तरी फेरा. हे मस्तच झालं. बाहेर रस्त्यांवर जायची गरज नाही. इतकंच काय, पण जिम-बिमच्या भानगडींचीही गरज नाही. दम असेल तितका पायी फिरण्याचा नि पळण्याचा व्यायाम करा इथंच.

त्याच्या इमारतीत आले तसे इतर इमारतींतही गेल्या आठवड्यात काही कुटुंबं राहायला आलेली दिसत होती. तुरळक आवाज कानी पडत होते. ते ऐकत देवळाजवळ आला, तेव्हा ते तसंच लहान मुलाच्या उत्साहात उभं होतं. त्याचा तो गडद रंग सकाळच्या प्रकाशात न्याहाळत तो जवळ गेला तेव्हा त्याला दिसलं- एक वयस्कर गृहस्थ पीतांबर नेसून पूजा-आरती वगैरे करत होते. गेल्या वेळेला हे नव्हते आणि पूजाअर्चा चालू असल्याचं काही चिन्हही नव्हतं. देवळाचे पुजारी असावेत आणि याच आठवड्यात आले असावेत.

तो तिथून थोडा दूर गेला आणि एका बाकड्यावर बसून देवळाकडे बघत राहिला. ते गृहस्थ निघून गेल्यावर तो देवळाच्या जवळ गेला तेव्हा धूप-उदबत्त्यांचा वास आला. शिवाय निरांजनात ज्योतही तेवत होती. त्याने त्या गडद शेंदरी-मातकट रंगाच्या मोठ्या सुबक खांबांवर हळुवार हात फिरवला आणि त्यांना हुंगल्यागत करून, एका खांबाला पाठ टेकून तो बसला.

मग त्याने समोर बघितलं, तर रविवारसकाळ आजही समोरच्या बाल्कनीत प्रसन्नपणे उतरली होती.

मग ती मुलगी बाल्कनीतून आत गेली, आणि थेट खालीच आली. हातात पुजेची ताटली आणि नैवेद्य- असं काहीतरी असावं. मंदिरात जाऊन तिनं मनोभावे नमस्कार केला. तीनचार मिनिटंभरून कसलंसं स्तोत्रही म्हटलं. ते म्हणताना तिने डोळे मिटले असावेत असं त्याला उगाच वाटलं. तिला पाठमोरी असलेली तो बघत राहिला.

मग तिनं त्याला प्रसाद दिला. नाव विचारलं आणि स्वतःचंही सांगितलं. मग नव्याने राहायला आलात का, कुठे आणि कधी- इत्यादी जुजबी चौकशा झाल्या. मग ती गालांवर खळ्या पाडत निघून गेली. तिचा सारा चेहरा झाकला जाऊन फक्त डोळे दिसले तरी ती हसताना सहज कळेल असं त्याला वाटलं. शिवाय स्तोत्र वगैरे म्हणत होती, तेव्हा ते डोळे, कदाचित मिटलेले, बघायला हवे होते- असंही.

तंद्रीत तो बराच वेळ बसून राहिला, मग उठला. परत जाताना त्यानं स्विमिंग पुलाच्या कोपर्‍यावर वळून काळजीच्या नजरेनं बघितलं- ते मंदिराकडे की त्याच्या शेजारच्या बाल्कनीकडे, ते त्याचं त्यालाच कळलं नसतं.

***

पावसाचा पहिला महिना त्याच्या वनबीएचके महालातच नाही, तर त्याच्या सार्‍या आसमंतात राजाचं सुख आणि रुबाब पेरून गेला. हा स्वच्छ सुवासिक आसमंत पावसाने धुवून निघाल्यावर आणखीच साजरा दिसू लागला. अलवार आणि भव्य असं काहीतरी एकाच वेळी असू शकतं हे त्याला नव्याने कळलं. अशा आणखीही काही नव्या जाणीवांना आयुष्यात पहिल्यांदाच तो या पावसाळ्यात उत्साहाने सामोरा गेला. त्याने आता डायरी लिहायचं बंद केलं. हे सारं नवंकोरं इतकं सुंदर होतं, की ते मावत नसताना बळजबरीने शब्दांत कोंबायचं- हा आडमुठा व्याप आणि ताप नंतर कधीतरी करू असं त्यानं ठरवूनच टाकलं.

***

एकदा रविवारसकाळसोबत फिरायला निघाल्यावर त्याला दिसलं, मंदिरासमोर भलामोठा कायमस्वरूपी मंडप तयार झाला आहे. मंदिराच्या कित्येक पट लांबीरूंदीचा, आणि मंदिरापेक्षाही उंच. तो हबकलाच. जवळ जाऊन बघितलं तर त्या गडद केशरी मातकट रंगाच्या त्या मोठ्या खांबांचा आधार घेऊन दोन्ही बाजूंना काचेच्या भिंती आणि समोरच्या बाजूला काचेचा नक्षीदार दरवाजा- असं तयार झालं होतं.

तो मटकन खाली बसला. नाईलाज झाल्यागत त्याने आजूबाजूला बघितलं, तर बरेच बदल झालेले दिसले. मंडपात एका बाजूला पुस्तकांची दोनतीन मोठी कपाटं होती. काचेची, आणि कुलुपं लावलेली. त्यात सारी धार्मिक आणि देवावरची पुस्तकं, जाडजूड ग्रंथ. गीताही अर्थात होतीच. मंडपात सतरंज्या पसरल्या होत्या. मध्यभागी एक स्टेनलेस स्टीलची चकचकीत दक्षिणापेटी दिसत होती. बाजूला एक टेबल आणि खुर्ची- मंदिराचं नवीन ऑफिस असल्यागत. मंडपाच्या बाहेर एक नवा चप्पल स्टँडही आलेला दिसत होता.

ती खाली आली, आणि नेहमीसारख्याच गप्पा सुरू झाल्या. ती मंदिराच्या या नवीन सुंदर रूपाबद्दल भरभरून बोलत होती. ही आषाढी एकादशीची तयारी असल्याचं त्याला कळलं. त्याला हेही कळलं, की तिचे वडिल संतसाहित्याचे अभ्यासक होते. राज्यशासनाचा पुरस्कार वगैरे मिळालेले. आषाढी एकादशीच्या एक महिना आधीपासून पासून इथं कीर्तनं आणि व्याख्यानं होणार होती. त्यासाठी स्वतः ते वडील आणि इतरही काही मोठे लोक, किर्तनकार वगैरे येणार होते.

तो अचानक म्हणाला- हे काही बरं नाही.

असं बोलणं तोडून काहीतरी भलतंच ऐकू आल्यावर तिनं त्याच्याकडे आश्चर्याने पाहिलं. ती काहीतरी विचारणार तेवढ्यात त्याने विचारलं- त्या दोन चाफ्याच्या झाडांच्या मागं एक मांजरी आणि तिची चार पिल्लं याची पळापळी आणि लपाछपीचा खेळ चाललेला असायचा. तर ते लोक कुठे गेले?

काहीच न कळल्यासारखं तिनं आजूबाजूला नजर फिरविली, आणि- असतील इथंच कुठेतरी- असं काहीसं म्हटलं.

आणि देवळाच्या एका खांबावर हट्टाने आणि दाटी करून चढलेला तो वेल कुठेय?- असं विचारावंसं त्याला वाटलं, पण कसल्याशा तिरमिरीत तो उठलाच. तेवढ्यात मंडपात प्रवेश करणारे ते पितांबर नेसणारे पुजारी गृहस्थ त्याला सामोरे आले. त्यांनी काहीतरी विचारलं, पण ते काहीच न कळून तो कसनुसा हसला.

मला काम आहे जरा. मी निघतो. संध्याकाळी भेटू या का?- असं तिला उद्देशून म्हणत उत्तराची वाट न बघता तो निघून जाऊ लागला. जाताना इमारतींच्या खालून जाताना त्याला आता अनेक आवाज येऊ लागले.

म्हणजे झालं असं होतं, की आता त्या दैवी सोसायटीत बहुतेक लोक राहायला आले होते. आणि त्यांच्या, ज्याच्या त्याच्या महालांतही रविवारसकाळ आलेली होतीच. तिचं बोट धरून प्रत्येक जण काहीनाकाही करत होता. शिवाय वेगवेगळे आवाजही करत होता. साफसफाईचे आवाज. मोलकरणींचे आवाज. भांडी घासण्याचे, पडण्याचे, रचण्याचे आवाज. मुलांचे रडण्याचे, पडण्याचे आवाज. ताईदादा-आईबाबा यांचे दरडावण्याचे आवाज. कुकरच्या शिट्ट्यांचे आवाज. पार्किंगमधल्या गाड्यांचे आवाज. पाळलेल्या कुत्र्या-मांजरांचे आवाज. पार्किंगमध्ये आणि असेल नसेल त्या मैदानांत खेळणार्‍या पोरांचे आवाज.

आता इतके सारे आवाज घेऊन इतके सारे लोक आले कधी? एकाच दैवी रविवारसकाळचा मुहूर्त साधून तर नक्कीच आले नसावेत. हळूहळू आले असावेत, एकेक करून आले असावेत. सामानाच्या ट्रकसकट आणि पोराबाळांसकट गाड्यांसकट मोलकरणींसकट आले असावेत. आपल्याला कसं कळलं नाही?

किंवा असं झालं असेल, की आपलंच लक्ष गेलं नाही इतक्या दिवसांत.

आता तर त्याला कित्येक हजार वासही येऊ लागले. पोह्यांचा, वड्यांचा, इडलीचा, चहाचा, मटणाचा, फोडणीचा, धुराचा, गॅस सिलिंडरचा, तेल-पावडर-क्रीम्स-पर्फ्युम्सचा.

आणि च्यायला आपण मूर्ख आहोत झालं. इतक्या मोठ्या सोसायटीत तितके लोक, तितके आवाज आणि तितके वास कधी ना कधी येणारच ना. त्यात काय विशेष.

तो त्या नक्षीदार पायवाटेच्या वळणावर आला तेव्हा त्याला स्विमिंग पुलावरच्या गर्दीचा आवाज आला. त्याने मागे वळून पाहिलं तर देवळाचा मंडप लग्नाच्या मंडपाएवढा भव्य दिसत होता. सुंदर. नक्षीदार. रेंगीबेरंगी. इवलंस देऊळ वेगळ्याच काहीतरी बेंगरूळ रंगाचं दिसत होतं.

ती अजूनही त्याच्याकडे बघत होती. इतक्या मोठ्या मंडपाशेजारी इवलीशी, चोरून उभी असल्यागत.

किंवा मग असं असेल, की ते देऊळ चोरून उभं असेल. नीट सांगता येणार नाही.

***

आपल्या महालात रविवारसकाळ येते आणि मग आपण उत्साहाने भरून-भारून जातो- हे त्याला एव्हाना सवयीचं झालं होतं. आजही तशीच ऊर्जा गोळा करत तो उठला. हळूहळू आवरलं. आणि छानपैकी स्वच्छ नवे कपडे घालून तो फिरायला निघाला.

दरवाजा उघडला तर एकदम पाच-सात लोक दारात. त्यांनी सांगितलं ते असं, की आपल्या नव्या सोसायटीचं एक नवं सांस्कृतिक मंडळ स्थापन झालं आहे. हे मंडळ आता दरवर्षी गणेशोत्सव, नवरात्र, कोजागिरी, रंगपंचमी, फ्रेंडशिप डे इत्यादी इत्यादी साजरं करणार. सोसायटीतलं सोशल वातावरण सुधरवणार. सार्‍यांना एकत्र आणणार- वगैरे. त्यांनी हातात पत्रक दिलं. शिवाय ऐच्छिक वर्गणी द्यायचं ठिकाण वगैरेही सांगितलं. त्यांना हो म्हणून तो बाहेर पडला.

सगळ्या इमारती नक्षीदार पायवाटांनी फिरून झाल्यावर तो मंदिराकडे आला. आज मोठीच धामधूम दिसत होती. आज वारीमधली एक पालखी मुक्कामाला येणार होती. आज आणि उद्या बरेच कार्यक्रम होते. त्याचं भलंमोठं पोस्टरच मंडपाच्या बाहेर लावलं होतं. देवाची गाणी आणि आरत्या वगैरे लाऊडस्पीकरवर हळू आवाजात लावलेली.

तो मंडपाच्या आत गेला, तर समोर ते गडद किरमिजी-केशरी रंगाचे खांब झाकून टाकणारी ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांची भलीमोठी छायाचित्रं लावली होती. शिवाय आतमध्ये एक संपूर्ण काचेची भिंत झाकणारं विठ्ठलाचं कलात्मक पेंटिंग काचेमध्ये फ्रेम करून लावलं होतं.

ती लगबगीने त्याच्याजवळ आली. ती मृदंग छान वाजवते. आणि शिवाय हार्मोनियम. आजच्या काही कार्यक्रमांत ती वाजवणार होती- त्याबद्दल बोलत होती. तो तिच्या डोळ्यांकडे बघत राहिला. तिचं हसणं आणि उत्साह तिच्या बदामी मोठ्या काळ्याभोर डोळ्यांत स्पष्ट दिसत होतं.

तिचं बोलणं संपल्यावर त्याच्याकडे लक्ष गेलं. सुटीच्या इतक्या प्रसन्न सकाळी हा असा कोमेजल्यागत का दिसतो आहे, ते तिला कळेना. तिने काळजीने त्याच्या कपाळाला हात लावला. त्याला वाटलं, तिने हळूच त्याच्या कानांच्या पाळ्यांना आणि घशात खोलवर कुठेतरी हात लावावा. कदाचित तिथं गरम वाटलं असतं.

ताप नाही, पण जरा अस्वस्थ वाटतंय. रात्रीच्या जागरणानं असेल. जरा झोपतो थोडा- असं काहीतरी बोलून तो तिथून निघाला. नक्षीदार पायवाटेवरचे नक्षीदर पेव्हर ब्लॉक्स मोजण्याचा प्रयत्न करत तो वळणापाशी पोचला. असं मोजत गेल्याने कदाचित इमारतींतले शंभर प्रकारचे आवाज लक्षात येणार नाहीत- असं त्याला वाटलं.

घरात गेल्यावर त्याला गोंधळल्यागत झालं. आपण तिच्याशी काहीच बोललो नाही. की बोललो? आणि काय? आणि शिवाय आज आपण त्या पायवाटेवरच्या वळणावर वळूनही पाहिलं नाही. ती आपल्यामागे येत होती का? आणि कदाचित हाकाही मारल्या असतील. तेवढंही ऐकू आलं नसेल तर कमाल आहे.

मग त्याला एकदम ताप आल्यासारखं वाटलं. धडपडत त्यानं सारे दरवाजे, खिडक्या, पडदे बंद करून करून टाकले. ब्लँकेट काढून आडवं होईस्तोवर भोवळ येतेय का- असं त्याला वाटलं.

तेवढ्यात बेल वाजली. खरंच वाजली का- असा संशय येऊन त्याने पुन्हा बेल वाजायची वाट बघितली. ती वाजलीच. मग तो अवसान गोळा करून उठला. कीहोलमधून बघितलं, तर तीच होती.

तो खाली मान घालून तसाच उभा राहिला. आणखी एकदा बेल वाजली तसं त्याने दचकून दाराकडे बघितलं. आणि निग्रहाने बेडरूमकडे वळला. आता झोपायलाच हवं. त्रास होतोय फार. दरवाजा काय, केव्हाही उघडता येईल.

त्याने ब्लँकेट पांघरलं, तर दुप्पट जोमाने थंडी त्याच्यावर चाल करून आली. त्याला आता गेल्या महिन्या-दोन महिन्यातले, डायरीत न लिहिलेले कितीतरी प्रसंग आठवले. तिच्यासोबतचं बोलणं आठवलं. चेहरा झाकून फक्त डोळे उघडे ठेवल्यावरही हसू शकणारे डोळे आठवले.

हे डायरीत नंतर कधीतरी लिहू. पण आता बेल वाजली तर दरवाजा उघडायला हवा.

किंवा मग पुन्हा बेल वाजली तेव्हा ठरवू पुन्हा नव्याने.
पण पुन्हा वाजली तर. तेव्हा बघू.

***
***

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सगळा मनाचा खेळ आहे झालं Proud

अगदीच टाकाऊ नाहीये. काही काही वर्णने चांगली उतरली आहेत. चालू दे Happy

भारी! घट्टमुट्ट बांधलेली कथा. चित्रदर्शी वर्णनांत तू गाज, ऑफिस किंवा त्याहीआधी दरजा, गावशीवपासून सरसच आहेस. असे नवे नवे प्रयोग करावेसे वाटणं आणि ते प्रत्यक्श करताही येणं खास आहे. ऑल द बेस्ट!

मस्त! मला फार आवडली... त्याच्या मनात काय चाललं असेल ते कळलं मला बहुदा!