शेपु चिकन अर्थातच डिल चिकन

Submitted by अल्पना on 11 November, 2013 - 11:00
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

चिकनचे ८-१० लहान (बोनलेस) तुकडे, चमचाभर आलं-लसूण (बारीक चिरून किंवा ओबडधोबड वाटून), १ /२ छोटा कांदा बारिक चिरुन, ३-४ चमचे शेपु चिरुन, ऑलिव्ह ऑइल, चिमुटभर साखर, मीठ, व्हाइट व्हिनेगर / लिंबाचा रस, हवं असल्यास पिझ्झा सिझनींग (मी डॉमिनोज सोबत मिळणार्‍या सिझनींगचं अर्धं पाकिट वापरलं)

क्रमवार पाककृती: 

एका फ्रायपॅनमध्ये थोडं ऑलिव्ह ऑइल घेवून त्यावर कांदा परता, कांदा किंचीतसा शिजल्यासारखा वाटला की त्यात आलं-लसूण घाला. थोडंसं (३०-४० सेकंद) परतून लगेच त्यात चिरलेला शेपु घाला. थोडं परतून त्यात चिकन घाला. चिकन परतत असतानाच त्यात मीठ, हवं असल्यास पिझ्झा सिझनींग घाला. कमी आचेवर परतत रहा. ४-५ मिनीटातच चिकन शिजेल. चिकनचा रंग बदलला (चिकन शिजलं) की त्यात अर्धा चमचा व्हिनेगर घाला. किंचीत परतून लगेच त्यात चिमुटभर साखर घाला. अर्धा-एक मिनीट परता.
शेपु चिकन तयार.

वाढणी/प्रमाण: 
दोन - अडीच जण
अधिक टिपा: 

व्हिनेगर ऐवजी लिंबु पण चालेल. माझ्याकडे आज घरात लिंबु नव्हतं म्हणून मी व्हिनेगर घातलं.
व्हिनेगर घातल्यावर जरा आंबट चव वाटली म्हणून मग त्यात साखर घातली चिमुटभर. Happy

काल मेथी चिकन करतो तसं शेपु चिकन करुया म्हणून वाटीभर निवडलेला शेपु बाजूला ठेवला होता. आज मायबोलीवर शेपु चिकन कुठे दिसतंय का बघितलं पण सापडलं नाही. ऐनवेळी करायला घेताना आधी नवर्‍याने आणि मग मी कच खाल्ली. Happy शेवटी मेथी चिकनसारखं न करता लेमन चिकनप्रमाणे थोड्या प्रमाणात स्टार्टर करून बघावे असा विचार करून घरात असलेलं सामान वापरून हे चिकन केलं.
बटर वापरून छान होईल असं वाटत होतं, पण घरात बटर नसल्याने ऑलिव्ह ऑइल वापरलं. आणि त्याची चव आली.
काहीच तिखट, मसाला न घातल्याने बरं लागेल की नाही अशी शंका आल्याने ऐनवेळी पिझ्झा सिझनींग अ‍ॅड केलं.

पोरगा चिकन खात नाही सहसा म्हणून त्याला एकच पीस वाढला होता. पण त्याने तो संपल्यावर आमच्या दोघांच्याही ताटातून मागून घेतलं. म्हणजे एकूण प्रयोग सफल झाला असं म्हणायला हरकत नाही.

माहितीचा स्रोत: 
प्रयोग
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा .. मस्त आहे रेसिपी, त्याहीपेक्षा शेपू आणि चिकन एकत्र करण्याची आयडिया .. Happy चिकन किंवा मग टोफू/पनीर/ बटाट्यासोबत ट्राय केले जाईल .. :हाआ:

फोटो नाही का?

मट्रेयलः
चिकनचे ८-१० लहान (बोनलेस) तुकडे
*
चखन्याला नुस्तं खायचं. पोळीबिळीसोबत नै.
*
आन म्हने:

वाढणी/प्रमाण:
दोन - अडीच जण
ह्यॅ!
न्हेमी चिकन न खानार्‍या ल्हान्यासार्की दोन आडीच लोकं का?
***
ओ तै, लै तोंपासू पाकृ. आम्हाला बोलवा नेक्ष्ट टाईम केलं की. अन कढईभर करा. ८-१० बोन्लेस तुकड्यांत आमचं काय व्हायचं नाय.

आज प्रयोग केला होता. खाल्ल्यावर कळालं सक्सेसफुल झाला प्रयोग हे. आता पुढच्या वेळी फोटो काढेन. Happy

चिकनऐवजी मश्रुम पण छान लागेल. पोरगा चिकनचा तुकडा खाताना हे मश्रुमसारखं लागतंय म्हणाला आधी.

इब्लिस उरलेल्या चिकनचा गावरान रस्सा केला होता, म्हणून अडिच जणांनी खाल्लं हे. पण हे नुसतंच खायचं असेल ड्रिंक सोबत वैगरे तर एवढं एका माणसाला पण कमी पडेल. Happy

पहिलाच प्रतिसाद बटाट्यांबद्दल नको म्हणून मी थांबले तर सशल तेच म्हणतेय Wink

पनीर/टोफु आणि शेपू एकत्र चांगलं लागणार नाही असं मला वाटतंय. बटाटे चालतील.