दीपस्तंभ..!!!

Submitted by सह्याद्रीमित्र on 9 November, 2013 - 06:17

आयुष्यात काही क्षण असे असतात की ते अवचितपणे समोर येतात. अलगदपणे हाती गवसतात. त्यांना अनुभवण्याची संधी ते आपल्याला देतात आणि कायमचे आपल्या मनाच्या कोप-यात एक अढळ ध्रुवपद निर्माण करतात. आमच्या कोकणदिवा ट्रेकची गोष्टही अगदी अशीच आहे !! ५ जूनला पानशेतजवळच्या घोळ गावात आम्ही पोहोचलो तेव्हा रात्रीचे साडेआठ वाजत आले होते. घोळच्या सुरेश पोळेकरांनी ट्रेकर आहेत म्हटल्यावर जास्त विचारपूस करण्याचा घोळ न घालता आपणहून ओसरी मोकळी करून दिली. पोळेकरांच्या स्वच्छ सारवलेल्या अंगणात झोपण्याचा आमचा निर्णय अचानक भरून आलेल्या आभाळाने आपणहूनच फेटाळला आणि परिणामी आमची रवानगी घरात झाली. रात्रभर पावसाची रिमझिम सुरूच होती. पहाटे पाच वाजता अचानक घोळच्या "खाऊन माजलेल्या" एका कोंबड्याने नेमकं आमच्याच कानापाशी आपला सगळा जीव एकवटत कर्णकर्कश्श तुतारी वाजवली आणि सहा वाजता निवांत उठायचा आमचा प्लॅन त्या बांगेबरोबरच घाटावरच्या पावसाळी हवेत विरून गेला !! घोळ गावही एव्हाना जागं झालं होतं. आज ६ जून. शिवराज्याभिषेक दिन !! आम्ही हा दिवस आज कोकणदिव्यावरून अनुभवणार होतो. सुरेश पोळेकरांना उद्या कोकणदिव्याची वाट दाखवायला माणूस द्या असं रात्रीच सांगून ठेवल्याने त्यांनी त्यांच्या कोणा पोळेकर बंधुंनाच "आमच्यासंगट" येण्याची गळ घातली आणि आमचे वाटाडे "भाऊ" आणि त्यांचा पुतण्या विकास हे साडेसहालाच आमच्यापुढे येउन उभे राहिले. पोळेकर मामींनी वाफाळता चहा दिला आणि बरोबर असलेला नाश्ता करून आम्ही आता गारजाईवाडीच्या दिशेने निघालो.

घोळपासून दाट जंगलातून साधारणपणे तासाभराची सपाट वाटचाल केली की आपण गारजाईवाडीत येउन पोहोचतो. थंडगार पावसाळी हवेमध्ये तो तासाभराचा प्रवास कमालीचा सुखावून गेला. गारजाईवाडी हे घोळ - सांदोशी मार्गावरचं आणि २५-३० उंब-यांचं एक टुमदार गाव. आपण निसर्गचित्रात बघतो ना…अगदी तसंच !! गावकरीही निसर्गासारखेच सदाहरित. गावातले बरेचसे विद्यार्थी कोकणदिवा - कावळ्या घाटाच्या पायथ्याच्या म्हणजेच रायगड जिल्ह्यातल्या सांदोशी गावात शिकत आहेत. सुट्टीत ही सगळी पोरं कावळ्या घाटाचा बेलाग पहाड चढून गारजाईवाडीत आपापल्या घरी येतात. गारजाईवाडीत कोकणदिव्याची हाक आता स्पष्टपणे ऐकू येऊ लागली. कावळ्या घाटाच्या दिशेला आता आमचा प्रवास सुरु झाला.

गारजाईवाडीतून पुढे आलो तेव्हा समोर कोकणदिव्याचा अस्मानी पहाड नुकताच ढगांतून बाहेर येत होता

अतिशय सुंदर ठिकाणी वसल्याने आणि संपूर्णपणे जंगलाने वेढल्याने गारजाईवाडीत रानमेव्याची प्रचंड समृद्धी आहे. आम्ही तिथे पोहोचल्यावर आमच्यावर झालेली ही रानमेव्याची खैरात. कोकणदिवा उतरून परत आल्यावर तर गारजाईवाडीतल्या लोकांनी प्रत्येकी तीन फणस,चारपाच किलो कै-या आणि "घरी सांगा करवंदाचं लोणचं करायला म्हणून प्रत्येकी सुमारे तीन चार किलो करवंद बांधून दिली. पुण्याला परत येताना आमच्या खांद्याची हाडं केवळ याच वजनाने खिळखिळी झाली हे वेगळं सांगायला नकोच !!

उजवीकडे कुंभ्या घाटाच्या दिशेच्या डोंगररांगाही विलक्षण सुंदर दिसत होत्या

पण हळूहळू वातावरण स्वच्छ होतंय असं वाटत असतानाच कोकणदिव्यावर मात्र कृष्णमेघांचं सावट दाटून आलं.

कोकणदिव्याच्या पायथ्याचं दाट जंगल आणि त्याच्या माथ्यावरचा भगवाही स्पष्टपणे दिसला

कोकणदिव्याचा खरा पायथा जवळ येत असतानाच हे दगडात खोदलेलं मंदिर लागलं. भाऊंनी लगेच दंडवत घातला.

भाऊंचा पुतण्या विकास. वरकरणी Cute दिसणारं पण एक नंबरचं फटकळ अन आगाऊ कार्टं !!

कावळ्या घाटमाथ्याजवळ आल्यावर कोकणदिव्याचं रूप पालटलं. आता तर तो आणखीनच खडा आणि बेलाग भासू लागला.

कावळ्या घाट. (फोटो : जितेंद्र बंकापुरे)

कावळ्या घाट सरळ खाली कोकणात उतरत गेला आणि आम्ही डावीकडे कोकणदिव्याकडे वळालो. सुरुवातीपासूनच खड्या,मुरमाड,निसरड्या आणि कारवीने भरलेल्या सुमारे सत्तर अंशातल्या चढाने आमचे श्वास पहिल्या पाच मिनिटातच फुलवले. प्रत्येक पावलावर धाप लागू लागली. त्यात एक पाय वर ठेवला की दुसरा पाय घाली घसरायचा. चांगल्या पाउणेक तासाच्या अविस्मरणीय झटापटीनंतर आम्ही गडमाथ्यापाशी येण्यात यशस्वी झालो.

सर्वोच्च माथ्याच्या थोडसंच खाली या कातळकोरीव गुहेनं स्वागत केल. दहा - पंधरा जणांना सामावून घेऊ शकेल अशी ही गुहा असून यातला मुक्काम मात्र विलक्षण असेल एवढं नक्की !!

गुहेशेजारील पाण्याचं टाकं. याच्या अजून डावीकडे थोडया अवघड वाटेने गेल्यास पाण्याची आणखी टाकी आहेत.

गुहेपासून कुंभ्या घाटाच्या डोंगररांगा आता स्वच्छ दिसत होत्या

गुहेतून समोर दिसणारे गारजाईवाडी - पानशेत परिसरातले डोंगर

गुहा डावीकडे ठेवून वळसा मारल्यावर आपण सर्वोच्च माथ्याची दारं उघडी करणा-या छोटया कातळटप्प्यापाशी पोहोचतो. इथेही एक पाण्याचे टाके आहे. या कातळटप्प्याखाली लावलेले हे दगड जर आज नसतील तर हा सहा फुटांचा टप्पाही तुमचा घाम काढू शकतो !!!

रॉकपॅच पासून वर कोकणदिव्याचा आभाळाला भिडलेलं शिखर आता साद घालू लागलं.

रॉकपॅच चढून आम्ही कोकणदिव्याचा माथा गाठला आणि… जादूची कांडी फिरावी तसं दृश्य समोर साकार झालं !!! डावीकडे दिसणारा वारंगीचा "कणा" डोंगर तर उजवीकडे धुक्यातून हळूच डोकावणारं रायगडाचं भवानी टोक

हवा स्वच्छ असल्यास कोकणदिवा माथ्यावरून दिसणारा नजारा. समोर वारंगीचा कणा डोंगर,त्यामागे खानूचा डिगा आणि सर्वात मागे अस्पष्ट दिसणारा लिंगाणा !! (फोटो : जितेंद्र बंकापुरे)

समोर सांदोशीचा तावली डोंगरही उठून दिसत होता.

भान हरपून आम्ही कोकणदिव्याच्या माथ्यावरून ही सह्याद्रीची किमया पाहत होतो. हळूहळू समोरचे ढग बाजूला गेले आणि डोळ्याचं पारणं फेडणारं रायगडाचं अविस्मरणीय दर्शन झालं !!!

दिवसाच्या पहिल्या काही तासांनाच संपूर्ण दिवस सार्थकी लावण्याचं पुण्य प्राप्त झालं. ओसरू लागलेली थंडी,विरु लागलेले ढग आणि मंत्रमुग्ध होत असलेलं वातावरण !!! रायगडाचं प्रथम दर्शनंच इतकं आविष्कारी होतं की ते दृश्य डोळ्यात साठवत असतानाच मन भूतकाळात खेचलं गेलं !!

दिनांक ६ जून १६७४. भारताच्या दैदिप्यमान इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवलं गेलेलं मानाचं पान !! महाराष्ट्राच्या भाग्यविधात्याचा म्हणजेच छत्रपती शिवाजीमहाराजांच्या राज्याभिषेकाचा दिवस. महाराष्ट्राच्या हृदयस्थानी असलेला रायगड पाहुण्यारावळयांनी फुलून गेला होता. वेदमंत्रांचे पवित्र पडसाद सर्वत्र उमटत होते. हेच पवित्र शब्द आज त्या जाणत्या राजाला केवळ महाराष्ट्राचाच नाही तर मराठी मनाचा सम्राट म्हणूनही घोषित करणार होते. रायगिरीचे बेलाग कडे आज आपली ताकद सा-या जगाला दाखवून देणार होते. याच नंदादीपाचा एक किरण सारा अंध:कार व्यापून टाकणार होता. महाराष्ट्राचा स्वातंत्र्योत्सव आज साजरा होणार होता. आणि… तो क्षण आला. वेदघोषांच्या मंत्रमुग्ध स्वरात महाराज सिंहासानारूढ झाले. एकच हलकल्लोळ झाला. जयजयकारांनी यवनांच्याही कानठळ्या बसल्या. आनंदवनभुवनी सार्वभौमत्वाच्या या अभूतपूर्व सोहळ्याचे सुंदर पडसाद उमटले. सह्याद्री धन्य झाला…!!!!

आज साडेतीनशे वर्षांनंतरही हे दृश्य बदललेलं नाही. काळ बदलला पण महाराजांवरची निष्ठा नाही. माणसं बदलली पण शिवरायांवरची श्रद्धा नाही. या दोन्ही गोष्टी मात्र प्रतिपश्चंद्र वर्धिष्णू होत राहील. आजही रायगडावर त्याच उत्साहाने लाखोंच्या संख्येने शिवप्रेमी जमतात. आजही रायगड इंद्र्पुरीलाही लाजवेल असं देखणं रूप धारण करतो. तोच इतिहास आज पुन्हा जिवंत होतो आणि तेच क्षण आज रायगड अभिमानाने अनुभवतो !!!

अवघ्या महाराष्ट्राचा मानबिंदू असलेला शिवतीर्थ रायगड…कदाचित आजही तो महाराजांच्या हृदयाचे ठोके अनुभवत असेल !!!

तिकडे रायगडावर चाललेला राज्याभिषेकाचा अपूर्व सोहळा आणि इकडे रायगडासमोर अतिशय मोक्याच्या जागी उभ्या असलेल्या दीपस्तंभावर म्हणजेच कोकणदिव्याच्या माथ्यावर आभाळाला भिडलेल्या जरीपटक्याकडे एकटक नजर लावून बसलेला सह्याद्रीचा भूमिपुत्र !!! मनाच्या चौकटीत कायमची विराजमान झालेली एक सुंदर फ्रेम !!!

कोकणदिव्याच्या माथ्यावरून दिसणारं जगदीश्वर मंदिर

महाराजांना मानाचा मुजरा आणि जगदिश्वराला दंडवत घालून आम्ही कोकणदिवा उतरायला सुरुवात केली. उतारावर मुरमाड वाटेमुळे घसरगुंडी करून घेत पायथा गाठला तेव्हा आभाळ पूर्णपणे भरून आलं. ढगांचा कडकडाट झाला. आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली. कदाचित तिकडे रायगडावर महाराजांना जलाभिषेक करण्यासाठी विधात्यानेच ही योजना केली असावी !! उनाड मुलासारख्या मनमुरादपणे कोसळणा-या पावसात चिंब भिजत आम्ही परतीची वाट कापत होतो. प्रत्येक पावलागणीक आजच्या दिवसातला प्रत्येक क्षण आपणहूनच मनाच्या एका "स्पेशल" कप्प्यात चालला होता. पावसाचा खेळ कमी झाल्यावर जेव्हा गारजाईवाडीची ओली कौलं दिसू लागली तेव्हा अवचितपणे समोर आकाशात मनाचा ठाव घेणारं विलक्षण सुंदर इंद्रधनुष्य प्रकट झालं होतं !!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओंकार: उत्तम फोटोडॉक्युमेंटेशन!!!
हे वाचल्यावर भटक्यांना कोकणदिव्याच्या आडवाटेचं अन् रॉकपॅचचं दडपण आता वाटू नये..
रच्याकने, गेल्या काही लेखांपैकी सर्वात सुरेल वर्णन झालंय... Happy