अजून एक लव स्टोरी

Submitted by विद्या भुतकर on 8 November, 2013 - 10:51

ही मी लिहिलेली सर्वात मोठी गोष्ट. ब्लॉगवर एकेक करत भाग टाकले होते. मायबोलीवर इतक्या सगळ्या कथा वाचून आपली पण वाचायला द्यावी असे वाटले. इथल्या अनुभवी लोकान्कडून सुचना मिळतील तर त्या पुढील लिखाणाला उपयोगी पडतील नक्कीच.

----------------------------------भाग पहिला: राहुल--------------------------------

पाठीला बॅकपॅक लावून राहुल रिक्षातून खाली उतरला. आकाशी रंगाचा कडक इस्त्रीचा शर्ट, काळी पॅट, काळे शूज. गव्हाळ रंग, मध्यम बांधा, काळे नीट वाळवलेले केस, साधारण ५' ८'' उंची. सुरुवातीला पाहिले तर सामान्य वाटणारे व्यक्तिमत्व. पण अनेकवेळा पेपर मधे छापून आलेल्या फोटोत असेही उंची थोडीच कळते? नेहमीचा कोन्फिडन्स चेहऱ्यावर घेऊन तो कंपनीच्या गेटजवळ पोचला. त्याने तिथल्या सिक्युरिटीला आपले ऑफर लेटर अभिमानाने दाखवले आणि विझिटर पास घेऊन तो आता शिरला. पूर्वतयारी म्हणून कंपनीच्या सर्व कॅंपसचे फोटो त्याने कितीतरी वेळा पाहीले होते. तरीही आत गेल्यावर समोर दिसणारी हिरवीगार गवताची सुंदर शाल, छान आकार दिलेली खुरटी झाडी, त्यात मध्यभागी उंचच उंच कारंजे आणि या सर्वांच्या मध्ये विखुरलेल्या पाच मोठ्या इमारती हे सर्व दिसलं आणि आपले या कंपनीत सेलेक्शन झालेय याचा त्याला खूप अभिमान वाटला. तसे प्रत्येक उत्कृष्ठ गोष्टं त्याने स्वत:च्या कष्टाने, हक्काने मिळवली होती आतापर्यंत. मग ते त्याचे बोर्डात आल्याने मिळालेले उत्तम कॉलेज असो, मार्कांच्याच जोरावर झालेले त्याचे सिलेक्शन असो किंवा ट्रेनिंग नंतरही पुणेच हवं असे भरलेला त्याचा फॉर्म असो. त्याची शैक्षणिक कारकीर्द त्याला आतापर्यंत नुसतेच हवे ते नाही तर त्यासोबत एक स्टेटसही देत होती. त्यामुळे प्रत्यके ठिकाणी मिळणारी 'रेड कार्पेट' वागणूक जणू त्याला ओळखीचीच.

आज इतक्या मोठ्या कंपनीच्या एव्हढ्या मोठ्या कॅंपसमध्ये त्याला थोडे हरवल्यासारखे वाटले होते. पण तेही होईल कमी असे स्वत:ला समजावून तो रिसेप्शन पाशी गेला. तिथे त्याने त्याच्या मेनेजरचे नाव सांगितले, 'मनोज शर्मा'.

'कुठला मनोज शर्मा?' तिने विचारले, 'इथे चार आहेत'. त्याने मग त्याला मिळालेल्या प्रोजेक्टचे नावही सांगितले. रीसेप्शनीस्ट ने नंबर शोधून त्याला फोन करून खाली यायला सांगितले.

एक मनोज शर्मा खाली आला. त्याने राहुल ला हात मिळवून ओळख करून घेतली. त्याला सांगितले की मी इथल्या प्रोजेक्टचा लीड आहे. 'मी राहुल घोरपडे',थोडे जोराने बोलला राहुल. पण त्याच्या नावावरून मनोज शर्माला काही क्लिक झाले असे वाटले नाही. मग जास्त अपेक्षा न करता राहुल त्याच्यासोबत लिफ्टमधून आठव्या मजल्यावर गेला. तिथे ते दोघे थेट एका कॉन्फरन्स रुममध्ये गेले. तो गेला तेव्हा तिथे अजून ३ लोक खुर्च्यात बसले होते. एका खुर्चीत तो बसला. थोड्या वेळात एकेक करून मनोज शर्मा अजून ४ पोरांना घेऊन वर आला होता. एकूण त्याच्यासारखी ८ मुले, दोन वयस्कर (२८- ३२ वर्षे?) वाटणारे लोक आणि पुन्हा एकदा मनोज शर्मा अशी मिटिंग झाली.मनोज शर्मा ने त्याची ओळख करून दिली. तो कंपनीत गेले १० वर्षं काम करत होता आणि त्याच्या वयाच्या मानाने बराच मोठा हुद्दाही होता त्याचा. ग्रुप लीडचा. त्याने बाकी मुलांची आणि मोठ्या (?) लोकांची ओळख करून दिली. त्यांना सांगितले की कॉलेजमधलं आयुष्यं कसं सोपं होतं आणि इथे बाहेरच्या जगातले नवीन अनुभव त्यांना मिळतील. त्यातही वेगवेगळ्या गोष्टीवर काम करायला मिळेल त्यांना या मोठ्या कंपनीत. प्रोजेक्ट होता अमेरिकेतला, तो क्लाएंट किती महत्वाचा आहे हे सर्व झालंच. राहुलने पाठ केलेले SDLC (Software Development Life Cycle) चे सर्व धडे आठवले आणि त्यातले सर्व शब्द इथे जोडण्याचा प्रयत्न केला. त्याला खूप आनंद झाला होता. आपल्याला मनोज शर्मा जे बोलतोय हे कळतंय याचा.

आनंद होणारच ना. सरकारी इंजिनीयरींग कोलेज मध्ये त्याला मेकेनिकल ब्रांच मिळाली होती. तिथेही सर्व नेहमी सारखच मग. अभ्यास, नंबर , कॅंपस. पण जेव्हा कंपन्या यायला लागल्या तेव्हा त्याला कळलं की डिग्री कुठलीही असली तरी पैसा IT मध्येच आहे. मग एकदा निर्णय घेतल्यावर त्याने परत एकदा मनापासून अभ्यास केला वेगवेगळ्या कम्प्युटर मधल्या भाषांचा, कन्सेप्टचा. त्यामुळे आज तो सर्व अभ्यास उपयोगी पडणार असे त्याला वाटले. बाकी लोक जे लेक्चर म्हणून ऐकत होते, तो ते मन लावून ऐकत होता आणि मध्ये काहीतरी लिहूनही घेत होता. त्याने विचारलेल्या प्रश्नांची मनोज शर्माने नीट उत्तरं दिली होती. सर्व बोलून झाल्यावर मनोज शर्माने त्यांना सांगितले की आता या पुढचे सर्व तुमचे टीम लीड सांगतील. ऑल द बेस्ट म्हणून तो निघून गेला. दोन टीममध्ये कुठली बेस्ट असेल याच्या विचारात राहुल गुंगला होता.

पाणी प्यायला जाऊन येताना त्याने त्या मोठ्या दोघांना बोलताना ऐकले.

प., ' अरे मुझे एक डेव्हलपर तर लागेल ना. दोन मेकैनिकलच्या पोरांना घेऊन मी काय करू? आणि मनोज ने बोला है की टीममे एक तो डेव्हलपर होना ही चाहिये.'

दु. ' अरे पण माझ्याकडे काम पण जास्त आहे न. आणि तुला काय दोन लोक मिळतील टेस्टिंगला.'

राहुलला फार राग आला होता की आपल्या ब्रांच मुळे कुणाला तरी आपण नको आहोत. आयुष्यात पहिल्यांदाच त्याला असं वागवलं होतं कुणीतरी. 'मी काय कमी हुशार आहे का?'

शाळेत कमी मार्क आहेत म्हणून मागे बसायला लागणाऱ्या मुलांसारखे, डिग्रीला एखादे वर्षं राहिलेल्या मुलाला मिळावी तशी वागणूक आपल्याला मिळतेय असे वाटले राहुलला. त्याला याची सवय नव्हती. पण समोर जाऊन त्यांना काही बोलणं शक्य नव्हतं. त्याने ऐकलं होतं की सुरुवातीचे थोडे दिवस त्याला जसे काम मिळेल तसे करायला लागणार होते आणि मग तो थोडा सिनियर झाला की प्रोजेक्ट बदलून घेता येईल त्याला. तो थोडा अस्वस्थ होऊन जागेवर आला. त्यादिवशी ८ लोकांची समान गटांत वाटणी झाली.

त्याच्या प्रोजेक्टमध्ये तो टेस्टर म्हणून काम करणार हे फायनल झाले होते. नेहा म्हणून एक डेव्हलपर आणि अजून दोघांची सपोर्ट साठी नेमणूक झाली होती. सपोर्टसाठी ठेवलेल्या दोघांनाही तसा राग आलाच होता की आता त्याना वेगवेगळ्या शिफ्टमध्ये काम करावे लागणार होते. पण सपोर्टला असले की रात्रीच्या शिफ्टमध्ये पैसे मिळतात जास्त (शिफ्ट अलाउन्सचे) हा फायदा होताच. सिद्धार्थ, त्यांचा टीम लीड, त्यांना त्यांचे डेस्क दाखवायला घेऊन गेला. एका मोठ्या फ्लोअरवर वरून पहिले तर ग्रीड आहे असे वाटणारे क्यूब. त्यात मन लावून काम करणारे काही, लोक जातआहेत बाजूने म्हणून मन लावून काम करण्याचे नाटक करणारे काही,तर महत्वाचे बोलत आहोत असे भासवून नवीन आलेल्या लोकांमध्ये कुणी चांगली पोरगी आहे का बघणारे काही. ते चौघे मग सिद्धार्थच्या मागे गेले. आपल्याला कसा डेस्क मिळणार याची उत्सुकता होतीच. फ्लोअरच्या शेवटच्या रांगेत ओळीने चार डेस्क त्यांना मिळाले होते. आता कुणी म्हणेल मुद्दाम कोपर्यातले डेस्क दिले नवीन पोरांना. पण मला विचाराल तर कोपर्यातला डेस्क म्हणजे सुख !! आपल्या जागेवर स्वत:चे नाव आधीच लावलेलं पाहून चौघेही खुश झाले होते. सिद्धार्थ त्यांना सेटल व्हायला सांगून निघून गेला.

आता ते चौघे सेटल झाले. राहुलने आपल्या बॅकपॅकमधून नोटबुक, पेन काढून ड्रावरा मध्ये ठेवले. बॅकपॅक कोपऱ्यात टेकवला आणि फॉर्म भरलेत ना नीट हे चेक करून घेतले तोवर बाकीचे तिघे खायला जाण्यासाठी तयार झाले होते. सगळ्यांशी नीट ओळख करून घेतली त्याने. आणि तासभर जेवताना थोडंफार बोलणही झालं प्रत्येकाबद्दल. पण नेहमीसारखी मजा नव्हती त्यात. कॉलेजमध्ये वगैरे कसं नावं सांगितलं की बाकीचे लोक स्वत:हून विचारायचे त्याच्याबद्दल. इथे तो मान नव्हता त्याला. जेवणा नंतर आता काय काम करायचे असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. मग स्वत:च पुढाकार घेऊन राहुलने कुठल्या गोष्टीला एक्सेस लागतो, तो कसा मिळवायचा हे सर्व माहिती काढली. सर्वांना मदत करून ते फॉर्म त्याने देऊनही टाकले सिद्धार्थकडे. तेही काम झाल्यावर आता पुढे काय प्रश्न होताच. पुन्हा एकदा कामात व्यस्त असलेल्या सिद्धार्थ कडे गेला राहुल. 'सर, व्हॉट इज नेक्स्ट?'. 'सिद्धार्थने त्याला सांगितले,'यहा सर-वर कुछ नही चलेगा. सिड भी बुला सकते हो. थोडे डॉक्युमेंट है पढना है तो'.

त्याने मग थोडे पेपर दिले वाचायला. तो गेल्यावर शेजारचा लगेच म्हणालाच,'बंडा बडा काम करनेवाला लागता है.'

' आज पहेला दिन है ना. इसलिये. थोडे यहा रहेगा तो तुम्हारे जैसा हो जायेगा'. हसत हसत सिद्धार्थ म्हणाला.

जाता जाता हे ऐकून राहुल अजूनच नाराज झाला आपल्या सिन्सियारीटी बद्दल कुणी शंका घेतंय हे त्याला अजि बात आवडलं नाही. मिळालेले पेपर वाचण्यात ६ वाचलेही. सगळे निघाल्यावर राहुलही रूमवर जायला निघाला. त्याच्यासोबत त्रेनिम्गाला असलेल्या एका मुलासोबत त्याने एक फ्ल्याट भाध्याने घेतला होता. तासभर प्रवास करून तो रूमवर पोचला. रात्री जेवण करून घरी फोन लावला त्याने. पलीकडून आई विचारात होती,'कसा गेला रे दिवस?' त्याच्या बोलण्यात तो नेहमीचा उत्साह नव्हता. त्याच्या करियरचा पहिला दिवसा होता तो....

----------------------------भाग दुसरा: नेहा------------------------------------------
गाडीवर बसून नेहा निघाली त्यादिवशी सकाळी तेव्हा एकदम हवेतच होती. डिग्री झाली, नोकरी मिळाली, पण ट्रेनिंगमधे असताना तिला चेन्नईला पोस्टिंग मिळत होते. तिला घराबाहेर राहण्याची इच्छा होती आधीपासून, पण चेन्नई? आणि मग आई-बाबा पण म्हणाले,' राहू दे नोकरी मग. इथेच बघू दुसरी'. शेवटी ट्रेनिंग सुपरवायझरला कसेतरी पटवून पुणे मिळालंच तिला. आज प्रोजेक्टचा पहिला दिवस. ताईला असं सकाळी आवरून जाताना पाहिलं की नेहमी वाटायचं नेहाला की मी कधी जाणार अशी आवरून नोकरीला? आज सकाळी जरा लवकर उठून, छान आवरून निघाली मग ती. मस्त हलका गुलाबी रंगाचा कुर्ता, पायाभर घोलणारी पतियाला सलवार आणि गळ्यात गणपतीचं लॉकेट. खांद्यावर लांब रंगीबेरंगी झोळी. केस, डोक्यावर एक क्लिप लावून खांद्यावर मोकळे सोडलेले. अर्थात गाडीवर हे सर्व सांभाळायची कसरत होतीच, पण ती आता रोजच करावी लागणार. सिक्युरिटीमधून सर्व चेक करून ती आत आली. 'वॉव काय कॅंपस आहे. आज ताईला सांगायला खूप काही आहे माझ्याकडे पण' असा विचार करत नेहा एका बिल्डिंगमध्ये शिरली.

'मनोज शर्मा, अमुक अमुक प्रोजेक्टवर काम करतात ते.' तिने सांगितले. तिच्या पोस्टिंग नंतर कळले की पुण्यात तिच्या बाबांच्या ओळखीचे एक प्रोजेक्ट मेनेजर आहेत इथे, 'मनोज शर्मा' म्हणून. त्यांच्याशी एकदा भेट पण झाली तिची. तर तेच मनोज शर्मा खाली येऊन नेहाला घेऊन आताव्या मजल्यावर गेले. तिथल्या कॉन्फरन्स रुममध्ये ती एकटीच काय ते खुलून दिसतेय असं वाटलं तिला. तिचा हसतमुख चेहरा अजूनच खुलला जेव्हा तिला प्रोजेक्ट मध्ये डेव्हलपर म्हणून घेतलं गेलं. काय सही व्ह्यू होता तिच्या खिडकीतून. आठव्या मजल्यावर तेही. सहीच सर्व. आज आईने सांगूनही ती दाबा घेऊन आली नव्हती. 'शी, मी काही शाळेत आहे का डबा न्यायला? मस्त कंपनीच्या कॅंटीनमध्ये खाईन मी. ' नेहा आनंदाने म्हणाली.

दुपारी सर्व सोपस्कार पार पडल्यावर तिने सर्वांसोबत जेवण केले. मस्त पनीर ची भाजी घेतली होती तिने. संध्याकाळी सही नाश्ता पण मिळतो म्हणे इथे. यायलाच पाहिजे चार वाजता खाली. राहुलने आणलेले फॉर्म भरून तिचे दिवसभराचे काम झालेले होते. टीम मधल्या एका सिनियर मुलीशी ओळख करून घेतली तिने. गेले तीन वर्षं ती टीममध्ये होती या. नेहाला सही वाटलं तिला भेटल्यावर एकदम ताईसारखीच. कोणीतरी बोलायला पण भेटलं ते बरं, त्यांचे अनुभव आपल्या कामी येतील. संध्याकाळपर्यंत बाकी विशेष असं काही झालं नाही. त्या सिनियर सोबत नाश्ता तेव्हढा करून झाला. कंपनीतच महिला गृहउद्योगच्या बायका निवडलेल्या भाज्या घेऊन यायच्या. आईसाठी इथून भाज्या न्यायचं नेहाने नक्की केलं होतं.

गाडीवरून परत जाताना तिला कधी एकदा घरी पोहोचते असं झालं होतं. तसा उशीर झाला पोहचायला पण घरी जाऊन प्रत्येक गोष्टं आईला आणि ताईला सांगताना जेवण कसं झालं नेहाला कळलच नाही. रात्री झोपेतही तिला ऑफिसची इमारत दिसत होती.

----------------------------------भाग तिसरा- सिद्धार्थ---------------------------------
सहा महिनेच झाले होते सिद्धार्थला भारतात परत येऊन. गेले दोन वर्षे तो अमेरिकेत एका छोट्या गावात सध्याच्या क्लाएंट साठी काम करत होता. त्याची तर इच्छा नव्हतीच परत जायची. पण २७-२८ वर्षाचा झाला तरी अजून लग्नाचा पत्ता नाही आणि त्याच्या गावी तर मुलांची लग्नं २५ पर्यंत उरकून टाकत. शेवटी आईच्या रोजच्या रडण्याला आणि वडिलांच्या रागाला कंटाळून तो परत आला. दिल्ली, मुंबई वगैरे ठिकाणी असता तरी बरं झालं असतं पण प्रोजेक्ट पुण्यात असल्याने तो इथे पोचला होता. सुरुवातीला जरा नाखूष होता. पण आता सवय होत होती इथली. रिक्षावाले, तोंडाला रुमाल बांधून मोकाट गाड्यांवर फिरणाऱ्या मुली, मराठी हिंदीत बोलणाऱ्या शेजारच्या आंटी सर्वांची सवय करून घेत होता तो. परत येऊन वरची पोस्ट पाहिजे म्हणून टीम लीडची जागा मिळाली होती त्याला. अमेरिकेतून आणलेल्या त्याच्या भारी कपड्यांमध्ये भारी दिसायचा तो पण एकदम. त्याच्या अदबशीर बोलण्यात अमेरिकेतल्या प्रोफेशनल वागण्याची भर पडली होती. प्रत्येकाशी अहो-जाओ मध्येच बोलायचा तो. त्यामुळे पुण्यातल्या लोकांची मराठी-हिंदी त्याला फार उद्धट वाटायची.

तो आल्यापासून टीममध्ये अजून चार लोकांची भर पडली होती, राहुल,नेहा, अजित आणि रोहन. त्यांच्यासाठी काम काय काय द्यायचे, कुठले ट्रेनिंग दिले पाहिजे, कुठल्या स्किल्स चा उपयोग करून घेतला पाहिजे, हे सर्व ठरवत होता तो. नवीन पोरं असली की बरं असतं, त्यांना हवं तसं आपल्या साच्यात बसवता येतं. नाहीतर प्रत्येकाची मग वेगळी मागणी पुरवेस्तोवर टीम लीड म्हणून डोक्याला त्रासच होतो. अर्थात नवीन असली की पहिल्यापासून शिकवायला लागतं हे मात्र आहेच. असो. तर नवीन आलेल्या पोरांना ट्रेनिंग द्यायला लागूनही ४ महिने उलटून गेले. हुशार होती सगळीच. असणारच ना, कंपनीचं नावच तसं होतं. त्यांना पाहताना त्याला त्याचे सुरुवातीचे दिवस आठवले. दोन-चार तासांचे ट्रेनिंग सोडले तर निवांत राहायचं. दुपारी दीड दोन तास जेवण, संध्यकाळी नाश्ता, मोकळं हसणं, निरागस प्रश्न, महत्वाकाक्षा. आपल्या वेळच्या मित्र-मैत्रिणींची आठवण यायची त्याला. पण तेही असेच देशात, परदेशात विखुरलेले. आणि असले इथे तरी आता पहिल्यासारखी मजा नव्हती त्यात. प्रत्येकाला वाढलेली जबाबदारी, कुणाची लग्नं झालेली, कुणाची मुलं इ. त्यामुळे नियमित भेटणंही जमत नसे. ऑफिसमध्येच दुसऱ्या टीम लीड सोबत जेवायला बसायचा तेव्हाच थोडाफार वैयक्तिक बोलणं व्हायचं, बाकी मग काम झालं की घरी परत येऊन घरच्यांसोबत होणार वाद, आपली मतं ऐकवायला, मन मोकळं करायला त्याचं असं कुणी नव्हतंच इथे.

नवीन पोरं सिद्धार्थला पाहिले की मोठा कामाचा आव आणल्यासारख करायची आणि तो नसताना परत दंगा चालूच. जगाचं चक्र असंच चालतं बहुतेक. तुम्ही कुणातरी सिरीयस वाटणाऱ्या मोठ्या हुद्द्याची जागा घेता, मग तुमच्या जागेवर कुणीतरी तुम्ही करायच्या तशा टवाळक्या करणारा येतो. आणि त्या नवीन माणसाच्या दृष्टीने तुम्ही 'मोठे' झालेले असता अगोदरच. मग त्यांना कितीही गोष्टी सांगितल्या आपल्या वेळच्या तरी त्यात मजा नसते. हे ओळखून सिद्धार्थ पण त्यांना जास्त बोलत नसे. मात्र हळूहळू कामाला सुरुवात झालेली होती. छोट्या छोट्या गोष्टींची तो नोंद करून घेत होताच. कोण कसं काम करतंय, किती बारकाईने ट्रेनिंगचा उपयोग करून घेत आहे, कोण नीट नेटकं काम करत आहे, कोण शोर्ट कट मारत आहे. संध्याकाळच्या क्लाएंट सोबतच्या मिटिंग मध्ये त्यांना सहभागी करून घ्यायला लागला होता तो. साधारण सात वाजता सुरु होणारा कॉल आठ वाजेपर्यंत चालायचा.

राहुल, अजित आणि रोहन याचं ठीक होतं, रात्र झाली तरी ते निवांत एकत्र जेवण करून, गप्पा मारून साडेनौ दहा ला घरी जायचे. असेही रूमवर जाऊन काम तरी काय करणार? त्यापेक्षा कॅन्टीन मध्ये जेवणही होऊन जायचं. नेहाची मात्र कोंडी होत होती. रात्री इतक्या उशिरा घरी जायची सवय नाही, त्यात इतक्या लांब उशिरा जायचं गाडीवरून म्हणजे जरा भीतीच वाटायची. कॉलला जरा उशीर झाला की ती अस्वस्थ होऊन जायची. शिवाय आज-काल आपण बाकी लोकांसोबत रात्री नसतो त्यामुळे नंतर काही बोलणं झालं, काही प्लान ठरला, इ तर त्यातून ती वगळली जायची याचं तिला वाईटही वाटायचं. पण पर्याय नव्हता. एकदा-दोनदा तिला हेही खटकलं की आपण जास्त वेळ नसल्याने सिद्धार्थशी जास्त बोलणं व्हायचं नाही. आता टीम लीडला आपलं चांगलं काम दिसणार तरी कसं. पण नाईलाज होता, रात्री उशिरा निघायला तिला भीती वाटायचीच. त्यात आजकाल नवीन एका गोष्टीची भर पडली होती. तिचे आणि राहुलचे होणारे वाद. अर्थात त्याला वाद म्हणायचं का मतभेद हे माहित नाही. दोन लोक काम करताना होणारे मतभेद किती मनावर घ्यायचे आणि किती सोडून द्यायचे हे शिकायला तिला थोडा वेळ लागणारच होता.

नेहा आणि राहुल यांचं नातं म्हणजे डेव्हलपर आणि टेस्टरच. एकानं काम करावं आणि दुसऱ्यानं त्यातल्या चुका काढाव्यात. आणि राहुल आपल्या कामाचा पक्का, त्यामुळे जर कुठे काही चूक दिसली की ती लगेच नोट करून ठेवायचा. नेहाला वाटायचं किती कुचकट आहे हा? मला सांगायचं ना? मी केली असती दुरुस्त. पण राहुल ती नोट करून ठेवायचा, मग ती दुरुस्त झाली की किती वेळ लागला, काय काय परत करावं लागलं हे सर्व मांडून ठेवायचा. आता त्यात तो तरी काय करणार त्याच्या मेंदूचं प्रोग्रमिम्गच तसं होतं. दिलेलं काम मनापासून करायचं. त्यामुळे नेहाला मात्र कितीही नाही म्हटले तरी त्याचा राग यायचाच. अर्थात त्यामुळे तिचंही काम सुधारलं होतं बरंच. पुढच्या २-३ महिन्यात हा तणाव त्यांच्यात अजूनच वाढला.

आपण केलेलं एखादं काम कुठल्या हेतूने केलं हे समजून द्यायलाही प्रत्यक्षात समोर नसू तर कितीतरी गोंधळ होतात. एखाद्याला अनेक वर्षं ओळखत असू दे नाहीतर ६ महिने. तर अशाच एका दिवशी नेहाने एका प्रोग्राम मध्ये केलेले बदल नेहमीप्रमाणे नीट लिहून ठेवले होते. पण त्यावर अजून सिद्धार्थची अनुमती मिळाली नव्हती. घरी लवकर जायला लागणार म्हणून नेहाने मेल सुद्धा करून ठेवली. पण त्यादिवशी बाकी कामात गुंतलेल्या सिद्धार्थने त्याला पाठवलेली मेल त्याने पहिली नव्हती. नेहमीच्या कॉल मध्ये जेव्हा हवे असलेले बदल अजून मिळाले नाहीत म्हणून क्लाएंटने विचारल्यावर सिद्धार्थची चिडचिड झाली होती. मुली म्हणून किती सुट द्यायची? लवकर जायचे आहे ठीक, कॉलसाठी थांबायला जमत नाही, ठीक, पण निदान महत्वाचं काम तरी करावं ना? त्याचा संताप झाला होता. उद्या आल्यावर बोलायचंच असं ठरवून तो घरी निघून गेला.

दुसऱ्या दिवशी सकाळी नेहाला सिद्धार्थने केबिनमध्ये बोलावून ऐकवलं,'मिस नेहा, एखादं काम अवघड वाटत असेल तर तुम्ही मला स्पष्टं सांगा. मला दिसतंय की कामात चुका निघाल्या आहेत तुमच्या. तुमच्या हलगर्जीपणामुळे आपल्याला क्लाएंटकडून ऐकूनही घ्यावं लागलं आहे. ही पहिलीच वेळ आहे म्हणून मी सोडून देतोय पण आपल्याबद्दल आलेली प्रत्येक तक्रार नोंद केली जाते. आणि मला आपल्याकडून कुठलीही चूक नकोय.'.

'पण सर, मी तर मेल केली होती तुमहाला?', नेहा.

'मेल' म्हटल्यावर सिद्धार्थ थोडा दचकला. पण तरीही त्याला राग आलाच होता. तो पुढे बोलत राहिला,' मला दिवसाला कमीत कमी २००-३०० मेल येतात. आजही माझ्याकडे ६००० न वाचलेल्या मेल आहेत आणि मी कितीही जास्त काम केलं तरी त्या पूर्ण होणार नाहीत. एखादं काम महत्वाचं असेल तर तुम्ही प्रत्यक्षात येऊन बोललं पाहिजे. '

असं कुणीतरी कडक शब्दात बोलायची नेहाला सवय नव्हती. मुलींना न खरंतर रडायचं नसतं अशा वेळी. आणि तसा प्रयत्नही करत्तात त्या, पण तसा प्रयत्न करणं आणि सफल होणं या दोन टोकाच्या गोष्टी आहेत. आपण टिपिकल मुलगी आहे हे समोरच्याला दाखवण्याची कुणालाच इच्छा नसते. अशावेळी स्वत:चाच खूप राग येतो पण तो राग बाहेर येऊन पाणी पळून जायच्या आतच, ते डोळ्यांच्या कडांवर जमा होऊन जातं. आपल्या डोळ्यात येणारं पाणी दिसू नये म्हणून नेहा दुसरीकडेच बघत राहिली. पुढे सिद्धार्थ काय बोलतो आहे हे तिला ऐकूच येत नव्हतं.

'अशी चूक परत होणार नाही याची खबरदारी घेईन', असं बोलून नेहा बाहेर येऊन गेली. आणि 'खरंच हा सिद्धार्थ काय आणि तो राहुल काय कुणालाच बोलायची एकही संधी आता द्यायची नाही' अस्म मनाशी पक्कं केलं होतं नेहाने. कधी कधी वाटतं की मुलगी म्हणून प्रत्यके ठिकाणी आपण मुलांपेक्षा कमी नाही हे दाखवायची उगाचच ओढाताण करत राहतात मुली. मुलांना का बरं येत नाही असं डोळ्यात पाणी? ते नाही असं काही मनात ठाम करत, चुका करतातच की? मग का मुलगी म्हणून प्रत्येक ठिकाणी आपल्याला प्रुव्ह करायची धडपड करायची? आणि त्यासाठी मानसिक त्रास करून घ्यायचा? जणू आपल्या नको तेंव्हा आलेल्या आसवांची किंमत नंतर ठाम निर्णय घेऊन करत राहतो. पण तो क्षण गेलेलाच असतो ना? असो.

त्यादिवशी नेहा मग नवीन आलेलं काम उशिरापर्यंत करत बसली. रात्री नौ वाजले तरी ती निघाली नव्हती. जेवायला जाताना पोरांनी तिला बोलावलं. इतर वेळी कॅन्टीन मध्ये जायला तयार असणारी नेहा आज नाही म्हणाली. त्यांनाही माहीतच होतं की तिचं काय बिनसलं आहे ते. मग तिघे खाली गेल्यावर दोघांनी राहुलला झापलं,' तुला पण काय रे अगदी सगळे 'बग' लॉग करून ठेवायचे असतात. अगदी मोठ्ठं बक्षीस मिळणार आहे का दोन जास्त 'बग' काढलेस तर? की कुणी फासावर चढवणार आहे कमी काढलेस म्हणून? बरं, ते सगळे जगाला कशाला सांगायला हवेत, आधी नेहाशी बोल ना, मग ठरव काय करायचं ते. '

राहुल,'अरे पण प्रोसेस डॉक्यूमेंट प्रमाणेच करतो आहे सर्व.' आपल्या सरळसोट स्वभावाला धरून राहुल बोलला. लोकांची मनं सांभाळण्याशी कामाचा काय संबंध ते त्याला कळत नव्हतं.

जेवण करून सामान घ्यायला वर गेलेला राहुल, नेहाला 'बाय' करायला थांबला. आज तिच्या चेहऱ्यावर ते रोजचं हसू नव्हतं. सकाळपासून एसी मध्ये असलं की चेहेरा तसा फ्रेशच असतो, पण थकलेल्या डोळ्यांना लपवता येत नाही. तिच्याकडे पाहून राहुलला वाटलं' रोहन म्हणतोय ते बरोबर आहे. माझी टीम-मेटच आहे ती. एकमेकांना सांभळून,शिकवून पुढे गेलं पाहिजे आपण'. तो नेहाला म्हणाला,' कुठल्या बग वर काम करते आहेस? चल बघू'. तोही तिच्यासोबत बसून बघू लागला मग. नेहा आधी थोडी तटस्थच होती. थोड्या वेळाने त्याची मदत करायची इच्छा पाहून तीहीथोडी निवळली. साडे-दहापर्यंत बसून दोघांनी ते काम पूर्णं केलं. राहुल तिच्यासोबत गाडीवरून तिच्या घरापर्यंत गेला आणि मग तिथून रिक्षा पकडून आपल्या रूमवर. नेहाला सकाळपासून असलेला सर्व ताण निघून गेला होता. आणि राहुलला सुद्धा तिला मदत केल्याबद्दल समाधान वाटत होतं.

----------------------------भाग चौथा: चंदेरी झालर-----------------------------------

एका संध्याकाळी मोकळ्या मनाने केलेल्या मदतीमुळे नेहा आणि राहुल आता चांगले मित्र झाले होते. निखळ मैत्रीची मजा ना प्रेमात पण येत नाही. मग प्रेमात पडलेले लोकही सुरुवातीचे मैत्रीचे दिवस विसरू शकत नाहीत. बरं, मैत्री म्हणजे तरी काय? प्रेमात होते तशी, ती व्यक्ती समोर नसली की असणारी हुरहूर नसते. बरं काहीतरी सांगायचं आहे, बोलायचं आहे असंही असंतच असं नाही. पण भेटल्यावर, बोलल्यावर, जोर-जोरात हसल्यावर मन मोकळं होतं न, तेव्हाच कळतं अरे हेच ते, जे हरवलं होतं. तर संध्याकाळच्या गप्पा आता जास्तच रंगू लागल्या. काम करतानाही एक आनंदा मिळत होता. पैजा लावून चुका शोधून काढणे, आपण मांडलेला टेक्निकल मुद्दा कसा बरोबर आहे हे दाखवण्यासाठी उशिरापर्यंत रिसर्च करणे आणि ऑफिसमध्ये लोकांना टोपण नावं ठेवून त्यांच्या चेष्टा करणं हे सर्व क्रमप्राप्त होतं. मग हळूहळू विकेंडला सिनेमा, तर कधी टीम औटींग हेही सुरु झालं. असं असलं की काम मग काम राहात नाही. मित्रांना घरीही घेऊन गेली होती नेहा २-३ वेळा. त्यामुळे मग घरी त्यांचे रेफरंसहि लागत होते आता. घरचेही मग थोडे निवांत झाले होते की मुलीला उशीर झाला तरी काळजीने घरी सोडायला कुणीतरी असायचंच.

बघता बघता त्यांना कंपनीत एक वर्षं होऊन गेलं होतं. राहुलही आपल्या सुरुवातीच्या नाराजी बद्दल विसरून गेला होता. काम मन लावून केलं की फळ मिळणारच या विश्वासावर तो आपल्या सवयीप्रमाणे उत्तम रीतीने काम करतच होता. पण रोहन आणि अजितचे काम वाढले होते. त्यांना दुपारची आणि रात्रीची शिफ्ट आलटून पालटून करायला लागायची. त्यामुळे दिवसा काम करणाऱ्या नेहा आणि राहुलशी त्यांचं नेहमीसारखं बोलणं होईनासं झालं. त्यामुळे कधीतरी वेळ मिळेल तसा ते जेवायला, वीकेंडला भेटायचा प्रयत्न करायचे. पण मग वेळी-अवेळी असणाऱ्या शिफ्टमुले सर्व नैसर्गिक चक्र कसं बिघडून गेलं होतं. त्यामुळे लोक दुपारी जेवत असले की यांची सकाळ व्हायची, मग दुपारी नाश्ता सुरु असायचा तर रात्री ऑफिसच्या रिकाम्या फ्लोअरवर डेस्ककडे बघत जेवण. सगळंच विचित्र. या सगळ्याने व्हायचं काय की चिडचिड, मग ती कधी चुकून एक-मेकांवरही निघायची. बर सुटका हवी आहे म्हणावं तरी एकच तर वर्षं झालं होतं नोकरी लागून.

अशातच त्यांचे एक वर्षाचे अप्रेझल सुरु झाले. एकाच टीम मध्ये मित्र-मैत्रिणी म्हणजे कुणाला कमी रेटिंग आणि कुणाला जास्त, तर आनंद कशाचा आणि दु:ख कशाचं करणार. सिद्धार्थने सर्वांना एकेक करून बोलावून त्यांचे रेटिंग सांगितले होते. पहिलीच वेळ असल्याने सर्वांना कळत नव्हतं की काय रियाक्ट करायचं. रोहन आणि अजित खूपच वैतागले होते. एक तर शिफ्ट मध्ये काम करायचं आणि सपोर्ट मध्ये काही खास स्कील दाखवता येत नाही म्हणून कमी रेटिंग. राहुलला अपेक्षेप्रमाणे चांगले रेटिंग मिळाले होते. आणि नेहाला मध्यम. त्यामुळे ती खुश नसली तरी नाराजही नव्हती. एकूणच या रेटिंग प्रकरणामुळे ग्रुप मध्ये नाराजीचं वातावरण होतं. रोहनने सांगितलं मी तर दुसरीकडे नोकरी शोधणार आहे. त्यावर त्याला सर्वांनी समजावलं,' अरे, आताशी तर एक वर्षं झालंय. कुठे सोडून जातोस. आणि आपल्या क्लाएंटकडे दोनेक वर्षात अमेरिकेत जायचा योगही येईलच की. धीर धर थोडा. 'ऑन साईट' हे मोठं आकर्षण होतं या सर्व पोरांसाठी.

सिद्धार्थला असं पोरांचं मन मोडायला अजिबात चांगलं वाटत नव्हतं. पण त्याचं रेटिंग त्याच्या याच स्कीलवर होतं ना की कमी दुखावून एखाद्याला वाईट बातमी कशी सांगायची. एखाद्याबद्दल मुद्दाम चांगले आणि वाईट गुण शोधून काढायचे, मांडायचे तेही तटस्थपणे, अवघड कामच होतं ते. ते करत असताना पहिल्यांदाच सिद्धार्थची नेहाबद्दल छोट्या छोट्या गोष्टींची नोंद करायला सुरुवात झाली होती, तेही त्याच्या नकळत. ज्या दिवशी मिटिंग घेतली तिच्यासोबत तेव्हाही त्याच्या केबिनमध्ये हसतमुख चेहेर्याने येणारी नेहा त्याला दिसली आणि पहिल्यांदाच जाणवलं की अरे खरंच आपल्या टीमची रंगत हिच्या हसमुख व्यक्तिमत्वामुळेच होती. माणूस हसतमुख असला की ते रोज सर्वांना जाणवेलच असं नाही, पण त्याच्या एखाद्या दिवशी उदास चेहेऱ्याकडे बघून कळतं की नक्की काय हरवल आहे ते. तर त्याने तिला तिचे रेटिंग सांगितले आणि थोड्या नाराज चेहेऱ्याकडे पाहून तो म्हणाला,' हसा हो, तुम्हाला असं उदास होणं शोभत नाही.' ती निघून गेल्यावर आपण असे कसे बोललो याबद्दल क्षणभर तो स्वत;वरच आश्चर्य करत होता.

असेच एक दिवशी, नेहा उशिरा काम करत बसली होती. आज राहुलही गणपतीसाठी सुट्टी घेऊन घरी गेला होता. रात्री लिफ्टमध्ये तिला एकटीला पाहून सिद्धार्थला जरा आश्चर्यच वाटले होते.' अरे, मिस नेहा तुम्ही, इतक्या उशिरा? काही महत्वाचं काम होतं का?' 'नाही सर, गणपती आहेत न पुढे दोन दिवस उशिरा थांबायला जमणार नाही, म्हणून आजच करून घेत होते.'

तो बोलला,'जेवण झालं की नाही तुमचं? उगाच उपाशी राहून आजारी पडू नका हं.'

त्याला असं मजेने बोलताना दिसणं क्वचितच. ती थोडं हसली. 'चला मी सोडतो तुम्हाला'.

ती, 'नको सर मी जाते गाडीवरून माझ्या'.

तो,'असू दे हो, मी काही खाणार नाही तुम्हाला. बसा. इतक्या उशिरा नका जाऊ गाडीवरून. उद्या न्या गाडी परत.'

आज काय एकावर एक धक्के बसत होते तिला. पण असं तिला 'अहो-जाहो' म्हणलेलं ऐकून फार सही वाटायचं तिला. मग त्याच्या गाडीतून जाताना ती त्याला उत्साहाने सांगत होती, घरी कसा गणपती साजरा करतात, किती उत्साह असतो सर्वांना. बोलता बोलता तिने त्याला गणपतीला घरी यायचं निमंत्रण ही देऊन टाकलं होतं. त फक्त गाल्यातल्या गालात हसत तिचं ऐकून घेत होता.

'तुमचं जेवण झालं?' मध्येच तिनं विचारलं? तो काहींच बोलला नाही. तीच मग बोलली,'इथे कोपऱ्यावर मस्त

मैगी मिळते. खाणार?' तिच्या निरागस, उत्साहाला तो नाही म्हणू शकला नाही. त्या दोघांनी मग गरम गरम मैगी खाल्ली आणि तो तिला सोडून घरी निघून गेला. रोजच्या त्याच्या उदास रात्रीला आज एक चंदेरी झालर होती. तीही आपला टीम लीड इतका मस्त गप्पा मारून गेला म्हणून खूष होऊन घरी गेली होती.

----------------------भाग पाचवा: निले निले अंबर पर..----------------------------------

सातारा -पुणे रस्त्यावर पावसाळ्यात पहाटे जाताना, गाडी चालवताना कधी तरी इतकं धुकं असतं की डोळे ताणून बघितलं तरी १०-१५ फुटाच्या पलीकडे काही दिसू नये. ती धुक्याची दुलई जितकी दिसायला सुंदर तितकीच भीतीदायक. कुठल्या क्षणाला समोरून गाडी येईल आणि त्या सुंदर धुक्याला चिरून अंगावर येईल सांगता येणार नाही. त्या धुक्यातून जाणं म्हणजे दर थोड्या वेळाने कुणीतरी आपल्यासाठी एक दार अलगद उघडत आहे आणि पुढचा कप्पा दाखवत आहे असं वाटायचं राहुलला. आणि मागे वळून पाहीपर्यंत मागचा कप्पा बंद झालेला असायचा. आज बसमधून जाताना ते धुकं अनुभवत राहुल नेहाबद्दल विचार करत होंता. तिच्यासोबत असतानाही त्याला या धुक्यात असल्यासारखं वाटायचं त्याला. ज्या क्षणात आहोत तोच खरा, जरा पुढे जाऊन पहावं तर तिच्या मनाचा एखादा कप्पा उलगडलेला दिसायचा, आणि मागे वळून पाहावं तर आधीचा बंद. आजपर्यंत त्याची मुलींशी फारशी मैत्री अशी झालीच नव्हती. वेळ कुठे होता त्याला म्हणा. आपले ध्येय समोर ठेवूनच प्रत्येक काम करायचं तो.

नोकरी लागल्यापासून मात्र त्याच्या भवतीचं ते 'अभ्यासू' पणाचं कवच गळून पडलं होतं. त्यात नेहाचा मोठा हात होता. त्यामुळे हळूहळू त्याला आजपर्यंत न केलेल्या गोष्टी बिनधास्तपणे अनुभवायला मिळत होत्या. आजही घरून आणलेला लाडवाचा डबा त्याने उघडायलाच की आत नेहाने तिथे येऊन खायला सुरुवातही केली होती. आणि म्हणाली,'आपलं दोघांचं नाव मी आपल्या ब्रांचच्या कार्यक्रमासाठी नोंदवून आलेय बरं का. अँकरिंग केलंयस का कधी?'

राहुलला एकदम ठसकाच लागला. 'काय? अँकरिंग ?? मी भाषणं केली आहेत शाळेत. पण अँकरिंग? अगं मला विचारायचं तरी होतंस. '

नेहा,'तुला काय विचारायचं त्यात? इतकं चांगलं, स्पष्ट तर बोलतोस. बाकी स्क्रिप्ट वगैरे आपण करूच सोबत.'

राहुल अजूनही धक्क्यातून सावरला नव्हता तेव्हढ्यात नेहा म्हणाली,'बरं ते जाऊ दे रे. तुला गंमत सांगायची आहे. गेस, गणपतीला आमच्याकडे कोण आलं असेल?'

राहुल तिच्या मोठाल्या डोळ्यांमधील हावभाव टिपत म्हणाला,' गणपती?'

तिचे डोळे मग अजूनच मोठे झाले,'राहुल, फालतू जोक मारू नकोस. सिद्धार्थ सर आले होते.'

'सिद्धार्थ सर?' राहुलला जरा आश्चर्य वाटलेच.

'अरे हो ना, आदल्या दिवशी मी जरा लेट काम करत बसले होते. जाताना सर पण भेटले. मग त्यांनीच सोडलं मला. तेव्हा म्हटलं मी आपलं त्यांना की या घरी. तर खरंच आले अरे. मला काय माहित येतील म्हणून. ठीकच आहे म्हणा. त्यांचं इथे कुणी नाहीये पण म्हणे. राजस्थानात आहे कुठेतरी त्यांचं घर. सणाला आले, छान वाटलं म्हणाले. '

राहुलला एकावर एका धक्के बसत होते. पाच दिवस घरी जाऊन आला तेव्हढ्यात काय काय होत होते. पण तो परत मूळ मुद्द्यावर आला.'ते जाऊ दे गं. मला सांग स्क्रिप्ट काय बनवायचे. दोन तासांचा तरी इव्हेंट आहे ना? इथे दोन मिनिटं स्टेज वर बोलायची पंचाईत येते, दोन तास स्टेजवर काय करणार आहे? '

'अरे, आपण थोडीच २ तास बोलणार आहे? लोकांचा परफोर्मंस असेल त्याच्या मध्ये मध्ये फक्त दोन शब्द बोलायचे. जोक सांगायचे. तू रील्याक्स हो जरा, दुपारी बोलू.' असं बोलून नेहा जागेवर गेली.

राहुल मनातल्या मनात हसला. असले उद्योग नेहाच करू शकते. नाहीतर मी कधी अँकरिंग करणार?

त्यांची तयारी जोरदार सुरु झाली. राहुलला नेहाचा सहवास आता अजूनच हवाहवासा वाटू लागला होता. रोहन आणि अजित सोबत असले कधी तर, ते गेल्यावर दोन मिनिट का होईना तिच्याशी एकट्याने बोलावंस वाटू लागलं होतं. एक दिवस दुपारी जेवताना कॅन्टीन मध्ये त्यांना सिद्धार्थ एकटाच बसलेला दिसला. नेहा म्हणाली,' चल त्यांच्यासोबत बसू.' राहुलला मात्र तिच्यासोबत एकट्याला बसायचं होतं. पण सिद्धार्थला एकट्याला बघून त्याला नाही म्हणताही येईना. तिघे मग शनिवारच्या प्रोग्रॅम बद्दल बोलू लागले.

सिद्धार्थने त्यांना विचारले,'झाली की नाही तयारी?'

'चालू आहे सर.' नेहा.

'आपल्या टीमचं नाव खराब करू नका बरं का?', सिद्धार्थ चेष्टेने म्हणाला. तो पटापट आपलं जेवण करून मिटिंग साठी निघून गेला. तो गेल्यावर नेहा राहुलला म्हणाली, 'सही आहेत न सिद्धार्थ सर. त्यांची स्टाईल पण मस्त आहे एकदम. त्यांना अजून कुणी मुलगी कशी नाही मिळाली याचं आश्चर्यच आहे. मी तर एका पायावर तयार झाले असते.' इतका वेळ गप्प बसलेल्या राहुलने एकदम चमकून तिच्याकडे पहिले. ती सिद्धार्थच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत बोलत होती. राहुलला अजिबात आवडले नव्हते ती असं बोललेली.

शेवटी कार्यक्रमाचा शनिवार उजाडला. नेहा आणि राहुलने आदल्या दिवशीही तयारी केली होती जोरदार. संध्याकाळी पार्टीला तो लवकर येऊन सर्व सेट अप ठीक आहे की नाही चेक करत होता. तेव्हा त्याला काळी साडी नेसून आलेली नेहा दिसली. मुलांना ना, मुली साडी नेसल्यावर इतक्या सुंदर का वाटतात काय माहित. तिची ती साडी सांभाळण्याची धडपड पाहून त्याला हसू येत होतं. तिच्या काळ्या साडीवरची चंदेरी नक्षी कशी खुलून दिसत होती. तिचे सिल्व्हर कानातले तिच्या मोकळ्या केसांमधून मध्येच चमकत होते.

प्रत्येकाचा न एक 'वास' असतो म्हणजे ती व्यक्ती जवळ आली किंवा दूर गेल्यावरही जवळपास रेंगाळणारा. राहुल नेहाचा तो 'वास'ही परिचयाचा झाला होता. तिच्या टाल्कम पावडरचा तो जास्मिनचा सुगंध आला की त्याला अस्वस्थ व्हायचं. आता तसं पहिलं तर हजारो मुली तीच पावडर वापरतात, पण त्याच्या जाणीवा जागी करणारी फक्त नेहाच. आणि आज तर दोघे स्टेजवर एकत्र होते म्हटल्यावर त्याला अजूनच आनंद झाला होता. तोही आपल्या सफेद कुर्त्यामध्ये उठून दिसत होता. सावळा रंग म्हणून तो पूर्वी टाळायचा पांढरे कपडे घालायला, पण त्यादिवशी नेहाच त्याला घेऊन गेली होती तो कुर्ता घ्यायला. अर्थात आज कुर्त्याचा परिणाम होता की नेहाच्या सहवासाचा, पण त्याच्या चेहरा खुललेला होता.

सुरवात तर चांगली झाली होती कार्यक्रमाला. तासभर झाला असेल आणि एकाचं गाणं चालू असताना सिद्धार्थ तिथे आला. नेहा आणि राहुल गाण्याला टाळ्या वाजवून प्रोत्साहन देत होते. सिद्धार्थ नेहाच्या जवळ येऊन तिच्या कानात बोलला, 'मी जातोय याच्यानंतर.' नेहाला एक मिनिट समजलं नाही काय म्हणायचं आहे त्याला ते. त्याने मग हातात मागे धरलेली गिटार दाखवली. तिने मग हातवारे करून विचारलं,'कुठलं गाणं?'. त्याला गाणं हातवारे करून सांगता येणार नव्हतं. तो तिच्या कानाजवळ जाऊन बोलला,'निले निले अंबर पर..'. तिच्या इतक्या जवळ जाण्याची त्याची पहिलीच वेळ होती. तीही त्याच्या जवळीकीने अस्वस्थ झाली. पण आतून काहीतरी होत होतं. ती मानेनेच 'हो' म्हणाली. आधीचं गाणं संपल्यावर तिने त्याचं नाव जाहीर केलं. ग्रे टी-शर्ट , निळी जीन्स आणि हातातील गिटार.त्याच्याकडे मोहिनी घातल्यासारखी नेहा बघत राहिली होती. अजूनही त्याचे ओठ तिच्या कानाजवळ आहेत असा भास होत होता तिला. 'ऐसा कोई साथी हो..ऐसा कोई प्रेमी हो..' कार्यक्रम संपला तरी ती बराच वेळ गाणं गुणगुणत राहिली होती ती.

सर्वांनी राहुल आणि नेहाचे कौतुक केले होते. त्यामुळे खूष होते दोघेही. सिद्धार्थने तिला स्वत: येऊन सांगितलं की,'चांगलं बोलता की तुम्ही. मिटिंग मध्ये असं बोललात तर क्लाएंट सुद्धा खूष होऊन जाईल.' नेहा लाजली होती. जेवण झाल्यावर राहुल, अजित रोहन आणि नेहा नाचण्यात गुंतले होते. आणि सिद्धार्थ तिला पाहण्यात. राहुल आज एकदम सातव्या आसमानात होता. त्याने पहिल्यांदाच थोडीशी दारूही घेतली होती. तिच्यासोबत नाचताना तो गुंगला होता. आज रात्री तिला सोडायला जाताना निवांत गप्पा मारायला अजून एकांत मिळणार याचा आनंद होताच.

अकरा वाजले आणि नेहा म्हणाली,'चला मी निघते आता. '

'निघते?',राहुलला कळले नाही काही.

'अरे, मघाशी सिद्धार्थ सरांनी मला विचारले की मी सोडतो तुला म्हणून', आणि माझी साडीही आहे ना आज, मग बाईक वरून कशाला? म्हणून मग मी 'हो' म्हणाले.'

राहुलचा पडलेला चेहरा बघून ती म्हणाली,'अरे असा नाराज काय होतोस? तू नेहमीच सोडतोस की मला. एक दिवस जातेय त्यांच्यासोबत'.

राहुलच्या आनंदावर विरजण पडले होते.

खरंतर गाडीतून जातानाही नेहा राहुलचा विचार करत होती बराच वेळ. तिला असं शांत बसलेलं बघून सिद्धार्थ थोडा अस्वस्थ झाला होता. 'काय झालं? गाणं चांगलं झालं नाही का माझं?' ती मग एकदम गांगरून बोलली,'नाही नाही. गाणं एकदम मस्त झालं. मला माहित नव्हतं तुम्ही इतकं चांगलं गाता आणि गिटार वाजवता.'

'मला तरी कुठे माहित होतं तुम्ही साडीमध्ये इतक्या सुंदर दिसत असाल म्हणून. बरेच आहे ऑफिसमध्ये रोज साडी नेसून येत नाही. '

नेहा लाजून हसली. तिचं घर आल्यावर, त्याने गाडीतून उतरून तिचं दार उघडलं. तिचा हात धरून उतरवलं. 'चला भेटू उद्या. चांगला झाला कार्यक्रम. गुड. ' असं म्हणून सिद्धार्थने तिला घराजवळ सोडलं. त्याला एक अवघडला 'बाय' करून नेहाने दार उघडलं. घरात पोचली तरी तिच्या तोंडात तेच गाणं होतं, ' 'ऐसा कोई साथी हो..ऐसा कोई प्रेमी हो..'

----------------------------------- भाग सहावा: शोध स्वत:चाच -----------------------

आता हे नेहमीचच झालं होतं, संध्याकाळी कॉल संपला की नेहा सिद्धार्थची वाट पाहत थांबत असे. सुरुवातीला खोटं कारण सांगून थांबायची आता कारणही सांगायचं बंद केलं होतं तिने. ती नसताना, ती दुसऱ्या कोणासोबत आहे म्हणून वाईट वाटतंय की आपली चांगली मैत्रीण सोबत नाही याचं दु:ख होतंय हे राहुलला काळात नव्हतं. पण एकूणच त्याला सर्व गोष्टींचा कंटाळा आला होता इथे. रोहन ही कंपनी सोडून गेला. अजितने रात्रीची शिफ्ट घेऊन दुपारी MBA ला अडमिशन घेतली होती. आपण मात्र इथेच आहोत अडकलेले. इथे येऊन आता त्यांना दोन वर्षं होऊन गेली होती. राहुल २ आठवड्यांची सुट्टी घेऊन घरी जाऊन आला. जरा घरी राहिल्यावर बरं वाटलं पण ऑफिसमध्ये आलं की पुन्हा तेच लोक, तेच काम, तीच ट्राफिकमधली संध्याकाळ आणि त्याच एकट्या रात्री.

आज कधी नव्हे ती नेहा सकाळी ऑफिसला आली होती. सिद्धार्थ सोबत राहायचे म्हणून तिने तिची शिफ्टही दुपारची घेतली होती. ती त्याच्याकडे येऊन म्हणाली, 'चल कॅन्टीन मध्ये जाऊ'.

राहुल तिचा उत्साह बघून काहीच बोलला नाही. ते दोघे कॅन्टीन मध्ये जाऊन चहाचे कप घेऊन बसले. तिने टेबलावर जरा पुढे वाकून त्याला हळूच आवाजात सांगितले,'माझे ऑन साईट जायचे फायनल होत आहे.'

राहुलला हे जरा अनपेक्षित होते. नेहा उत्साहात बोलली,'अरे, सिद्धार्थने सांगितले की साईटवर रिक्वायरमेंट आहे डेव्हलपर ची आणि माझ्या कामाने तिकडे सर्व इम्प्रेस पण झालेत. आता पुढच्या दोन महिन्यात विसा झाला तर मग दोन वर्षं तरी तिकडेच असेन. सिद्धार्थला ही मेनेजरच्या रिक्वायरमेंटसाठी बोलावताहेत. '

राहुलने काय बोलावं कळेना. तो तिला म्हणाला,' कॉंग्राट्स, कधी आहे विसा इंटरव्ह्यू? गुड, सहीच.'

कसं असतं ना? जवळचे मित्र जे 'अरे नवीन मोबाईला घेतला? सही, मला सांगितलं नाहीस? ' म्हणून रुसणारे, कधी रात्री बारा वाजता मेसेज का होईना करून, ताई चं लग्न ठरत आहे असं सांगणारे, आज इतके दूर? इतक्या उलाढाली झाल्या तरी ना आधी सांगण्याचा उत्साह, ना दुसऱ्याच चांगलं झालं याचा दिलखुलास आनंद. आणि सर्वात जवळच्या मित्रांसोबतच असं का होतं काय माहित? बहुदा आपण घेतलेले निर्णय त्याला चुकीचे/नापसंद वाटून, आपलं खरं मत ते स्पष्टपणे सांगतील याची भीती असते की त्याला ते असं वाटतंय हे माहित असतं म्हणून समोरचाही खऱ्या भावना जवळच ठेवून बोलतो. असो. लवकरच मग नेहाचा विसा झाला. आणि सिद्धार्थचा तर होताच. दोघेही मग खरेदी, तिकडे जायची तयारी यात अडकून गेले. ती जायच्या आदल्या दिवशी राहुलला स्वत:च बोलून जेवायला घेऊन गेली. 'अरे रोहन आणि अजित विचारत होते पार्टी कधी देत्येयस म्हणून ऑन साईटची', नेहा बोलली. त्याचदिवशी त्याने तिला एक अलार्म क्लॉक गिफ्ट दिले. तेव्हाच त्याने तिला 'बाय' करून टाकलं. तिला सोडायला मुंबईला काही तो गेला नाही.

तो त्याचा विकेंड सुना-सुना गेला एकदम. रोज भेटत नसले तरी ती या देशातच नाही ही कल्पनाच फार एकटी वाटणारी होती. सोमवारी जड मनानेच तो ऑफिसला गेला. तिथे तरी काय आहे आपलं असं त्याला वाटलं. खिडकीतून खाली दिसणारी वर्दळ बघत तो नुसता बसून राहिला. संध्याकाळी परत निघायच्या आत नेहाच, 'सुखरूप पोचले' असा मेल तेव्हढा आला होता. चला आता दोन वर्षं भेट नाही, असा विचार करून तो रूमवर निघून गेला. परत तीच ट्राफिक, गरम होऊन घामेजले करणारी बस, तेच बेचव जेवण. कधी कधी आयुष्य एकदम थिजून जातं, कितीही प्रयत्न करा पुढे ढकलायचा ते हलत नाही. पुढच्या दोन-तीन महिन्यात त्याला नेहाने मेल, फोटो पाठवले होते वेगवेगळ्या ठिकाणी ती फिरायला गेली तेव्हा. फोटो पाहिल्यावर त्याला तिची आठवण यायची पण कधी तिला उत्तर द्यायची हिम्मत त्याला झाली नाही.

आज काल लोक जरा मनाविरुद्ध झाले की त्यातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करत राहतात. मग ते प्रयत्न सफल नाही झाले की अजून अस्वस्थता. लग्नासाठी घराचे मागे लागतात, मग जा ऑन साईट. काम चांगले नाहीये, प्रोजेक्ट बदला, ते नाही झाले कंपनी बदला. आणि प्रत्येक ठिकाणी दुसऱ्या कुणाच्या मेहेरबानी वर हे सर्व अवलंबून म्हणून अजून त्रास. नेहाशी बोलायला लागायला नको म्हणून राहुलने प्रोजेक्ट बदलून घेण्यासाठी रिक्वेस्ट पाठवली होती मनोज शर्माकडे, पण शर्माने प्रोजेक्टमध्ये सध्या नवीन कुणी येईपर्यंत तुला निघता येणार नाही म्हणून स्पष्ट सांगितले होते. छोट्या छोट्या गोष्टींसाठी या मोठ्या लोकांच्या मागे लागावं लागतं, तेही लोक आपल्या असहाय पणाचा फायदा घेतात.

खरंतर नेहा हेच काही एक कारण नव्हतं हे असं डिप्रेस व्हायचं. त्यांचं तर प्रेम, प्रेम म्हणताही येणार नाही असं होतं. ना त्याला माहित होतं की हे प्रेमच होतं की आकर्षण. ना त्याने तिला सांगितलं त्याचं प्रेम आहे म्हणून ना तिने त्याला नकार दिला होता. त्याच्या आयुष्यात एक पोकळी मात्र निर्माण झाली होती. आजपर्यंत त्याच्यासमोर नेहमी एका ध्येय असायचं. ते प्राप्त करण्यासाठी मग धडपड करत राहणे आणि ते मिळाल्यावर पुढच्या ध्येयाकडे वळणे, हेच त्याने केलं होतं. गेल्या दोन वर्षांत कंपनीतल्या त्याच्या ग्रुपमुळे त्याला त्या नसलेल्या ध्येयाची कधी आठवणच झाली नव्हती. पण आता त्याची तीव्रता त्याला जाणवत होती. बरं, करायचं पुढे म्हणजे तरी काय? प्रोजेक्ट बदलणे, कंपनी बदलून दुसरीकडे जाणे, किंवा मग पुढच्या शिक्षणासाठी अभ्यास करणे? त्याने मग त्याला जे माहित होते तेच केले. अभ्यास करणे. MBA साठी त्याने मन लावून अभ्यास करायला सुरुवात केली.

एकदा का तो अभ्यासात शिरला तेव्हा त्याला मग स्वत:लाच पुन्हा एकदा गवसल्यासारखं वाटलं. रात्री जागून अभ्यास करणे, एखादी गोष्ट समजत का नाहीये वाटून ती समजेपर्यंत झपाटल्यासारखे उत्तर शोधत राहणे. हे सर्व चालू असताना त्याचा प्रोजेक्ट चालूच होता. पण आता बाकीच्या लोकांमुळे त्याला काही फरक पडत नव्हता. त्याला त्याचं ध्येय मिळालं होतं. आपले ध्येय आपणच ठरवले की मग मनोज शर्मा सारख्या लोकांनी त्याचं काम केलं नाही केलं यानेही त्याला काही फरक पडत नव्हता. मध्ये मध्ये नेहाशी बोलणं व्हायचं, ती नेहमी प्रमाणे मोकळ्या मनाने बोलायची. तिथे कसं असतं सर्व, तिने गाडी घेतली, रुममेट कशी आहे, जेवण बनवायला कशी शिकली, सर्व काही. एकदा तिने तिच्या पहिल्या 'स्नो फॉल च्या अनुभवाबद्दल त्याला सांगितलं. ते ऐकून त्याला क्षणभर वाटलेही की आपण सुद्धा राहावे का याच प्रोजेक्टमध्ये? आपल्यालाही मिळेल हे सर्व अनुभवायला. पण आता माघार घेऊन चालणार नव्हतं त्याचे ध्येय एकच होते, सर्वात चांगल्या इंस्टीटयूटमध्ये MBA ला अडमिशन मिळवणे.

त्याच्या प्रयत्नाचं फळ मिळालं. हैदराबादला त्याला अडमिशन मिळाली होती. पुण्यातून निघायच्या आधी त्याने नेहाच्या घरी भेट दिली होती एकदा. त्यांचेही चांगले संबंध जुळलेच होते की. ते का तोडायचे? तिथे गेल्यावर त्याला कळले की सिद्धार्थचे आणि नेहाचे लग्न ठरले आहे. आधी दोघांच्या घरून नकार होताच. पण तिच्या घरच्यांनी सिद्धार्थला पहिले होते. एक आदर्श जावई म्हटला तर त्याच्यात काहीच कमी नव्हते. दोघेही अजून दोन-तीन वर्षं तरी तिकडे राहतील. मग लग्न करून तिकडे राहिलेले बरे ना? तिच्या आईचं म्हणणंही बरोबरच होतं. त्यांचा निरोप घेऊन राहुल निघाला. त्याला फक्त एकाच गोष्टीचं वाईट वाटलं की हे नेहाने स्वत: का ना सांगितलं. असो. पुण्यातलं सर्व मागे टाकून नवीन सुरुवात करायचं ठरवलं होतं त्याने, पुन्हा एकदा.

-------------------------------भाग सातवा: त्याची बायको----------------------------
ऑन साईट, ऑन साईट जे काय लोक म्हणतात ती हौस पूर्ण झाली नेहाची एकदाची. तिच्या काही अपेक्षांना तडा गेला होता तर काही नवीन अनुभवही मिळाले होते. आजपर्यंत कधीच एकटी न राहिलेली नेहा आज परदेशात एकटी राहत होती. अर्थात सिद्धार्थ होताच तिच्या सोबतीला. तिच्या एकेक वेगवेगळ्या रूपांना बघून अजूनच प्रेमात पडला होता तो. तोही मग तिला शक्य होतील ते सर्व दाखवण्याच्या, शिकवण्याचा प्रयत्न करत होता. गाडी घेतली, गाडी चालवायला शिकवली, फॉल कलर्स दाखवले, नायगारा दाखवला. कधी ती हौसेने एखादा पदार्थ करून त्याला खाऊ घालायची तर कधी तो तिला आपली पाककला दाखवून चकित करून टाकायचा. वर्षं होतं आलं त्यांना इकडे आणि सिद्धार्थला घरी लग्नाला नाही म्हणणं अवघड जाऊ लागलं. बर आधीच ते इतके सनातनी, त्यात परक्या राज्यातील, परभाषी मुलगी करायला कसे तयार होतील ते, हा एक प्रश्नच होता. त्याला कधी वाटायचं त्यांना इकडे आणून दाखवावं की जग किती पुढे गेलं आहे. जिथे एखादा भारतीय भेटला, एखादी आपली गोष्ट खायला मिळाली, जिथे एखादं मंदिर दिसलं तर हात जोडावे, अशा देशात आणून दाखवावं त्यांना, असं राहून राहून वाटायचं सिद्धार्थला.

शेवटी त्याने पुढाकार घेऊन घरच्यांना सांगितलंच की मी नेहाशी लग्न करणार आहे. नेहाने पण घरी सांगून टाकलं. बरेच वाद-विवाद, भांडण, रडगाणं झालं. जेव्हा सिद्धार्थ म्हणाला की तुम्ही नाही म्हणालात तर मी इथेच लग्न करून इथेच राहीन, तेव्हा त्यांनी माघार घेतली. लग्न ठरलं. ३ आठवड्यांची सुट्टी घेऊन दोघे भारत्तात आले. एकमेकांच्या घरी जाऊन ओळखी करून घेतल्या. सर्व काही रीतीनुसार केलं आणि दोघेही लग्न करून अमेरिकेत परत आले. हनिमूनला मायामी ला जायचं ठरवलं होतं त्यांनी. पण आता सुट्ट्या संपून गेल्यामुळे तो रहितच झाला थोड्या दिवसांसाठी. अर्थात तिथे काय असाही दोघांना हवा तसा एकांत होता. दिवस कसे सोन्यासारखे वाटत होते. सिद्धार्थालाही एखाद्या मुलीवर असं उधळून प्रेम करायला कधी मिळालंच नव्हतं. एकमेकांच्या छोट्या छोट्या सर्व इच्छा पुरवणं, एकमेकांना न कळवता प्लान बनवून सरप्राईज देणं, भांडण झालं की जगबुडी झाल्यासारखा चेहरा करून दिवस काढणं, सर्वच कसं स्वप्नवत. कधी कधी रात्री भारतातून ऑफिस मधून येणाऱ्या फोनचा, साईट वरच्या तणावाचा त्रास व्हायचा, पण ते शुल्लक होतं.

दोन वर्षं कशी गेली कळलंच नाही दोघांना. एक-दोन महिन्यात त्यांचे परत जायचे ठरू लागले तेव्हा सिद्धार्थ अस्वस्थ झाला. त्याला अजून राहायचं होतं इथे. आताशी तर कुठे संसार जमतोय. आता अजून थोडे पैसे कमवायचे होते. भारतात एखादं घर घ्यायचं होतं. अजून २-४ तरी वर्षं राहायचं होतं त्याला. त्याने खूप प्रयत्न केले प्रोजेक्ट मध्येच राहायचे. पण वरच्या पोस्ट साठी एक तर जागा पण कमी असायच्या, आणि काम जास्त. शेवटी त्याने धीर करून कंपनी सोडायचा निर्णय घेतला. इथेच नोकरी शोधायची. इथेच राहायचं. महिन्याभरात त्याला नोकरी मिळालीही. पण ती त्याच गावात नव्हती. ते गाव विमानाने २ तासावर होतं. नेहाला राहायचं होतं इथे पण एकटीला असं वेगळं राहायचं नव्हतं. पण पर्याय नव्हता. दोन महिन्यात नोकरी सोडून सिद्धार्थ दुसऱ्या गावी गेला. सुरवातीला खूप अवघड गेलं त्यांना असं वेगळं राहणं. नंतर त्याचीही सवय होऊन गेली. गुरुवारी सिद्धार्थ परत यायचा, विकेंड दोघे बरोबर असायचे. रविवारी ती त्याच्यासाठी जास्त स्वयंपाक करून ठेवायची. आणि सोमवारी पहाटे तो निघून जायचा.

सवय काय सर्वच गोष्टींची होऊन जाते. पण ती करून घेताना आतून आपण कणकण बदलत राहतो हे आपल्याला कळत नाही. दिवसभर सोबत असणारे ते दोघे असे चार चार दिवस न भेटता राहू लागले. अशावेळी आपण काय म्हणून हा निर्णय घेतला होता याची आठवण काढून पहिली पाहिजे. कधी कधी नेहाला खूप एकटं वाटायचं. शेजारच्या एका मराठी बाईकडे जायची ती चक्कर मारायला. पण तेही औपचारिक. मनात आलं म्हणून कुणाचं दार वाजवावं अशी रीत नव्हती इथे. उन्हाळ्यात तरी ठीक, पण थंडीच्या त्या लांब, काळोख्या रात्री कधी संपतात असं होऊन जायचं. मधेच तिला घरच्यांची, राहुल,रोहन सर्वांची आठवण यायची. त्यांच्याशी फोनवर बोलणं व्हायचं पण तेही आपल्या कामात गुंतलेले असायचे. सिद्धार्थ असताना सुरक्षित वाटायचं, तो सोबत असेल तर किती बरं होईल वाटायचं.

अजून एखादं वर्षं असंच गेलं असेल आणि तिलाही मग प्रोजेक्ट संपला म्हणून परत जायला सांगितलं गेलं. आता इतके दिवस तिच्याकडे नोकरी तरी होती. एक रोजचं रुटीन होतं. तिकडे जायचं म्हटलं तर सिद्धार्थला नवीन नोकरी शोधायला लागणार. बरं, मिळेलही, पण त्याने तिकडे यायला तयार झालं पाहिजे ना? तो अजूनही तयार नव्हता परत जायला. नेहा विचार करून करून दमली. इथे राहायचं, इथे नोकरी करायची तरी रिसेशन आलेलं. किती प्रयत्न केले पण काही होईना. सिद्धार्थचा H१-B विसा होता. तिने त्याच्यावर 'dependent' म्हणून राहायचं तर तिला नोकरी करता येणार नव्हती. त्याच्या कंपनीने त्याचे ग्रीन कार्ड प्रोसेसिंग सुरूही केले होते. ते आले की तिलाही नोकरी करता आली असती. पण ग्रीन कार्ड कधी येनात आणि नोकरी कधी करायला मिळेल हे काही सांगता येत नव्हतं. तिला जड मनाने घरी राहायचा निर्णय घ्यावा लागला. अर्थात घरी राहण्यामध्ये एक गोष्टं तरी चांगली होणार होती. ते दोघेही परत एकदा एका घरात तरी राहणार होते. शेवटी तिने मनातून नोकरीचा विषय काढून टाकला आणि थोडे दिवस गृहिणी व्हायचं ठरवलं.

आज पर्यंत नेहाला नाही म्हटलं तरी प्रोजेक्ट मध्ये असणारे ओळखीचे लोक होते. बरेच भारतीय होते. त्यामुळे वेगळा असा ग्रुप काही नव्हताच. ऑफिसमधल्या लोकांसोबतच बोलणं, भेटणं, फिरणं व्हायचं. आता नवीन गावात तिला नवीन ओळखी करून घ्यायला लागणार होत्या, नवीन नाती जोडायला लागणारी होती, आपल्या सवयी थोड्या का होईना बदलाव्या लागणार होत्या. गृहिणी म्हटलं की तिने सकाळी उठून नवऱ्याला चहा बनवून दिला पाहिजेच का? सिद्धार्थचं असं काही म्हणणं नव्हतच. पण तरीही पहिले थोडे दिवस तिने ते सर्व केलंही. उठून चहा करून देणे, त्याची तयारी करायला मदत करणे, दुपारी जेवायला आला की जेवण तयार ठेवणे. रात्रीचा स्वयंपाक दुपारीच करून ठेवणे. हळूहळू त्याचाही कंटाळा आला तिला. रोज आवरून छान तयार होऊन ऑफिसला जाणारी नेहा, घरीच तर आहे म्हणून आळसात राहू लागली. त्याच्या कंपनीच्या लोकांशीही तिच्या आता ओळखी झाल्या होत्या. पण तेही सर्व फॉर्मल. त्यांना भेटताना तिला एकच गोष्ट खुपायची, ती म्हणजे तिची ओळख आता फक्त 'त्याची बायको' इतकीच राहिली होती. आणि पुढची किती वर्षं हीच 'ओळख' राहणार हे तिलाही माहित नव्हतं.

----------------------------भाग आठवा: पुन्हा एकदा ------------------------------

अभ्यासात, परीक्षेत , पुन्हा एकदा कॉलेज लाईफ अनुभवण्यात राहुलची २ वर्षं कशी संपली कळलंही नाही त्याला. नवीन जागी गेलं की आपणही नवीन होऊन जातो. आपल्यातले जूने आपण थोडे मागे सोडून नवीन 'स्वत:ला' शोधायला. इथे आलेले लोक वेगवेगळ्या प्रांतातून, देशातून आलेले. कुणी नोकरी सोडून शिकायला आलेले तर कुणी कॉलेज नंतर लगेच. पुण्यातला राहुल केव्हाच मागे राहिला होता. नव्या जोमाने नवीन रस्ता निवडला होता त्याने. यावेळीही त्याला चांगल्या कंपनीतून ऑफर मिळाल्या होत्या. आता तर त्याच्याकडे ४ वर्षाचा अनुभव होता, एक नवीन डिग्री होती. पण त्याने यावेळी ठरवलं होतं की केवळ ट्रेंड बघायचा नाही, आपल्याला कुठे काम करायचं आहे, कसं काम करायचं आहे, आपली आवड काय हे सर्व बघून कंपनी निवडली होती. एका मोठ्या कार कंपनीच्या इंजिनीयरिंग सेक्शन मध्ये रिसर्च प्रोजेक्ट मेनेजरची नोकरी मिळाली होती त्याला. पगार, गाडी, इ सर्व तर मिळणारच होते. पण त्याहीपेक्षा आवडतं काम करायला मिळणार याचा आनंद त्याला जास्त होता.

लवकरच तो बेंगलोरला शिफ्ट झाला. तिथल्या मेट्रो पब्लिकमध्ये मिसळून घ्यायला त्याला जरा वेळ लागला पण आता तो मोठा माणूस झाला होता. हे सर्व त्याला शिकायलाच लागणार होतं. नवीन प्रोजेक्टमध्ये ट्रेनी म्हणून आलेल्या मुलांना बघून त्याला आपले पुण्यातले दिवस आठवायचे. नेहाचीही आठवण यायची. गेल्या दोन-तीन वर्षांत तिचा काहीच पत्ता नव्हता. रोहन, अजित ला विचारले तर त्यांच्याशीही बोलणं नाही झालं तिचं म्हणे.आधी तिचा फोन यायचा अधून मधून. पण राहुल अभ्यासात इतका बिझी होऊन गेला होता की स्वत: त्याने तिला कधी फोन केला नव्हता. नोकरी सुरु झाल्यापासून मात्र त्याला तिची आठवण नियमित यायची. त्याने तिचा नंबर मिळवण्याचा प्रयत्न केला पण काही मिळाले नाही.कसं असतं ना जवळच्या मित्रांचं. आधी इतके फोन केलेले असतात की नंबर लिहून घ्यायची वेळच येत नाही. आणि वेळ येते तेव्हा ते आठवत नाहीत.

एका शनिवारी रात्री एक पिक्चर बघून मेट्रो मधून परत येताना एक जीन्स घातलेली, छोटे केस असलेली मुलगी त्याला दिसली. आधी नेहा वाटली, पण त्याने ती शक्यता धुडकावून लावली. 'छे छे, ती तर असेल अमेरिकेत तिच्या नवऱ्यासोबत'.बरं, जास्त वेळ मुलीकडे पाहिलेलं तरी चांगलं वाटतं का? पण तिच्यावरून त्याची नजर हटेना. शेवटी जरा जवळ जाऊन त्याने पहिलेच. नेहाच होती ती !!! तो उडालाच. इतकी बदललेली होती ती. तिच्यातलं पुणेरीपण गेलं होतं.

'नेहा?????' त्याने तिला आश्चर्याने विचारले.

नेहालाही मग इतका आनंद झाला त्याला पाहून. दोघांनी एकमेकांना आधी मिठी मारून घेतली. अगदी शेजारच्या लोकांना धक्का मारून, त्यांच्या वाकड्या तोंडाकडे दुर्लक्ष करून. राहुलने नकळत तिच्या गळ्याकडे पहिले. लोकांना ना, गळ्यात मंगळसूत्र बघायची फार घाई असते. आजकाल तर मुली घालतही नाहीत तरी लक्ष जातंच. त्याने सिद्धार्थ बद्दल विचारले, पण नेहाने त्यावर 'नन्तर बोलू' म्हणून टाळून दिलं.

त्याने तिला विचारलं, 'कुठे चालली आहेस? चल मेट्रोतून उतर माझ्यासोबत. स्टेशनवर गाडी आहे माझी, मी सोडतो तुला.' तिलाही इच्छा नव्हती त्याला नाही म्हणायची. मग दोघे बराच वेळ बोलत राहिले. मेट्रोतून उतरले, गाडीत बसल्यावर नेहा बोलली, 'सहीये रे, मोठ्ठा माणूस झालास तू !'.

राहुल तिला म्हणाला,'मी कुठला मोठा माणूस. तुम्ही तिकडे अमेरिकेत याहूनही मोठ्या आणि भारी गाड्या पहिल्या असतील. '

नेहाला ते काही आवडलं नाही. तो म्हणाला,'बरं इकडे कशी काय?'

तिने सांगितले, 'आपल्या जुन्या कंपनीतच आहे. आता सिनियर डेव्हलपर झाले आहे.'

राहुलला जरा आश्चर्य वाटले. तरी तो म्हणाला,'चांगले आहे की? तू अजून टिकून आहेस. मला वाटले तिकडे जाऊन बदलली असशील कंपनी'.

नेहाने मग आपल्या घराजवळ त्याला सोडायला सांगितले. त्याने तिला एका बिल्डींगच्या खाली सोडले. अर्थात ती त्याला ये म्हणाली नाही आणि त्यानेही तिला येऊ का म्हणून विचारले नाही. दोघांनी आपले फोन नंबर एकमेकांना दिले आणि 'बाय' म्हणून राहुल परत घरी यायला निघाला. बेंगलोरच्या रिकाम्या रस्त्यांवर थंडीतून रात्री गाडी चालवत राहुल घरी पोचला तेव्हा खूपच खुशीत होता. जुन्या मित्रांना भेटून त्याच्यासोबतच्या 'आपली' ही आठवण ताजी होते. आपण किती बावळट होतो ना, किंवा किती कामसू होतो ना, किंवा किती निरागस होतो अशा आठवणी येत राहतात. राहुलला तेव्हाची त्याची साधी रूम आठवली. नुसत्या दोन गादया आणि ब्यागा इतकेच काय ते सामान असायचे. ना कधी फर्निचर घेतले, ना टी व्ही, ना कुणा मुलीला रूमवर बोलावले. आज आपल्या फर्निश्ड घराकडे बघून राहुलला ते दिवस आठवले. त्याची ती रात्र मग आठवणीतच गेली.

त्यानंतर राहुलला दोन-तीन वेळा इच्छा झाली नेहाला फोन करायची. पण ती उचलेल की नाही, काय बोलेल, सिद्धार्थ काय म्हणेल, हे सर्व विचार करून त्याने फोन केलाच नाही. शुक्रवारी रात्री नेहाचाच फोन आला त्याला. 'काय रे, मला वाटले ५-६ वर्षांनी भेटलास म्हणजे निदान फोन तरी करशील. तेही नाही?'

राहुलला काय उत्तर द्यावे कळेना. नेहा पुढे बोलली,'बर ते जाऊ दे, तू मुव्हीला येणार आहेस का सांग.'

राहुल,'हो' म्हणाला. मग तिनेच त्याला कुठे भेटायचं, किती वाजता हे सर्व सांगितलं. 'टिपिकल नेहा', राहुल मनात बोलला. पण त्याला खूप बरं वाटत होतं मनातून की तिला परत भेटणार. अर्थात सिद्धार्थ तिथे असेल तर काय बोलायचं हे सर्व प्रश्न होतेच. पण ते सर्व दुय्यम होतं. कितीतरी दिवसांनी आपल्या माणसासोबत जाणार होता तो.

किती बदलली होती नेहा. तिच्या बोलण्यात बदल होता थोडा. केस, कपडे तर बदललेच होते. सुंदर तर ती आधीपासूनच वाटायची पण आता त्यातही एक परफेक्शन दिसलं त्याला. बाकी घाई घाईने बोलण्यात, आवडीने खाण्यात, त्याने जोक केला की रुसण्यात काहीच बदल झाला नव्हता. ती त्याला म्हणाली,'तू मात्र काहीच बदलला नाहीस हं.' तो थोडा बुजला. आपल्याला पक्कं ओळखणाऱ्या माणसासोबत असलं ना की किती बरं असतं. मनात येईल ते बोलता येतं, वाटेल तसं वागता येतं आणि समोरचा काय विचार करेल मी काही केल्यावर याचा अजिबात विचार करावा लागत नाही. तो कम्फर्ट त्याला आज जाणवत होता तिच्यासोबत. खूप वेळ गप्पा मारल्या दोघांनी. जेवण झाल्यावर आईसक्रीम खाऊन आता निघायला लागणार होतं. मध्ये मध्ये राहुल घड्याळ्या कडे बघत होता. 'नेहाने इतका वेळ बाहेर थांबलेलं चालणार आहे का?' हा प्रश्न त्याला पडला होता.

शेवटी नेहा त्याला बोललीच. ' चल आपण तुझ्या रूमवर जाऊन बोलू. तू असा स्वस्थ राहणार नाहीस.'

ते दोघे मग राहुलच्या घरी गेले. त्याचं घर पाहून नेहाही इम्प्रेस झाली. तो पहिल्यापासून नीट नेटका राहायाचाच. पण हे घर खूपच सुंदर होतं. किती टाप टीप, किती स्वच्छ, जिथल्या तिथे.तिने घराचं कौतुक केलं त्याच्या. मग तिने त्याला विचारलं तुझ्याकडे, 'आपले जुने फोटो आहेत का रे?' राहुलने त्यांच्या एका ट्रीप चा अल्बम आणला. तो बघून दोघेही हसत बसले बराच वेळ. दोघांनाही माहित होतं की प्रश्न तर आहेतच, पण सुरुवात कुणी करायची आणि कशी? शेवटी राहुल बोलला,'काय बोलायचं आहे म्हणत होतीस? माझ्यापासून काहीही लपवायची तुला गरज नाहीये. आणि हे तुलाही माहित आहे. त्यामुळे निष्काळजी होऊन बोल. '

नेहाही मग जरा सिरीयस झाली,'मला माहित आहे रे तू कसा आहेस ते. म्हणून तर तुला परत फोन केला मी. नाहीतर आपल्या जुन्या कुठल्याच लोकांशी बोलले नाहीये मी. कुणाशीच संपर्क नाही ठेवलाय मी. राहुल, दोन वर्षापूर्वी माझा डिव्होर्स झाला आहे.'

राहुल सुन्न होऊन तिच्यासमोर बसला होता.

----------------------------------भाग नववा: नवीन सुरुवात--------------------------

'खरं सांगू का राहुल, मला ना प्रत्येकाला स्पष्टीकरण द्यायचा आता कंटाळा आला होता. आणि त्यात मुलीचा डिव्होर्स म्हणजे नक्की काय झालं असेल असा प्रश्न पडतोच ओळखीच्या लोकांना. त्यांना वाटतं, अरे ती तर इतकी चांगली मुलगी, तिचं असं का झालं? मुलात काही दोष होता का? नपुंसक वगैरे. की दारुडा होता, की मारहाण करायचा बायकोला? तर यातलं माझ्यासोबत काहीही झालं नाहीये. आणि बिलीव्ह मी, मी काही इथे विक्टिम वगेरे नाहीये. आमचा डिव्होर्स मिचुवल होता. 'irreconcilable differences' असं कारण टाकलं आहे पेपरवर. झालं काय की सुरुवातीला मीही ठीकच होते अमेरिकेत राहायला. खूप धडपड करून सिडने दुसरी नोकरी मिळवली. मग थोडे दिवस वेगळ्या ठिकाणीही राहिलो. बरीच स्वतंत्र झाले होते मी तेव्हा. अनेक गोष्टी एकटीने करायला शिकले होते. सिड्ची आठवण यायची पण त्यालाही तिथे राहायचं होतं. थोड्या दिवसांनी मीही त्याच्याकडे गेले नोकरी सोडून. नवराच तो माझा, त्याच्यासाठी ग्रेट बलिदान दिलं वैगेरे काही नाही. पण कुणीतरी प्रयत्न करायलाच पाहिजे होते न एकत्र राहायचे. मी केले.

सुरुवातीला फार कमीपणा वाटायचा लोकांना सांगायचा की मी 'house wife' आहे म्हणायचा. पण नंतर त्याचीही सवय झाली. आळस अंगात भिनून गेला. स्वत:चं आवरायचं, छान दिसायचं, कशासाठी, कुणासाठी? घरीच तर राहायचं आहे असं वाटायचं. सिड ओढून न्यायचा त्याच्या पार्टीजना. पण तिथे ना मी नोकरी करणाऱ्या बायकांमध्ये सूट व्हायचे न गृहिणींमध्ये. आपण कुठे फिट होतो हे मला काही कळत नव्हतं. सुरुवातीला मग उत्साहाने एक-दोन सर्टिफिकेट साठी अभ्यास पण केला. पण तो तरी करून काय करणार? नंतर तेही बंद झालं. ग्रीन कार्ड कधी मिळणार, नोकरी कधी करणार? काहीच भरवसा नाही. बरं सिड साठी हे सर्व करतेय म्हणावं तर तोही कामात गर्क. त्याला फोन केल्यावर तो मिटिंग मध्ये आहे म्हटल्यावर मी तरी किती बोलणार. मला माहीतच होतं की ऑफिसमध्ये,मिटिंग मध्ये कसं असतं ते.

उन्हाळ्यात थोडे फार छंद तरी पुरवायचे, पण थंडींत कुठे जाणार? घरी राहायचं, खायचं, प्यायचं, टी व्ही तरी किती बघणार. लहानपणापासून अभ्यास तर केला होता फक्त त्यामुळे एखादी कला येते त्यात मन गुंतवावं असंही नाही. हळूहळू मला तिथे नकोसं वाटू लागलं. त्यात भर म्हणून सिड चा प्रोजेक्ट बदलला. त्याला दुसऱ्या गावी जावं लागायला लागलं. म्हणजे त्याच्यासाठी सर्व सोडून मी घरी राहिले आणि तो घरं सोडून बाहेर. चार दिवस हॉटेलवर राहायचा आणि तीन दिवस घरी. मग प्रवासाचा कंटाळा येतो म्हणून सुट्टीच्या दिवशीही घरीच. मी दिवसेंदिवस एकलकोंडी होत चालले होते. माझं डिप्रेशन वाढतच होतं. सिड आणि माझी परत जाण्यावरून भांडणं वाढली. नंतर तर मी भांडत सुध्दा नव्हते. माझा सर्वच गोष्टीतला रस निघून गेला. वाटलं आईकडे जाऊन यावं बरं वाटेल, म्हणून दोन महिने घरी आले. पण तरी ठीक वाटेना. आणि लोकांना काय सांगणार रे? मला तिकडे सर्व सुखसोयी मिळत आहेत आणि ते सुख टोचत आहे मला? इथे लोक किती हालाखीचे दिवस काढत कागत असतात आणि मला आत्महत्या करायचे विचार मनात येऊ लागले होते.

दोन महिने मी आईकडे राहिले तेव्हा आईने माझी ही स्थिती पहिली. आई म्हणाली मी येते तुझ्या सोबत. बोलू आपण सिद्धार्थशी होईल सर्व ठीक. आईसोबत मी परत गेले तेव्हा परत आम्ही प्रयत्न करून पहिला सिड ला समजवायचा. पण त्याचं म्हणणं हेच की त्याला नोकरी कराविच लागणार आहे तर इथे का नको? तिकडे जाऊन दिवस रात्र मेहनत करून हलाखीत का जगायचं? इथे पैसा,आराम सर्व आहे.मला एकटं वाटतंय तर बाळ होऊदे एखादं. पण मी इतकी डिप्रेस्ड होते की मला बाळ झालं तरी ते सांभाळण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे तेही शक्य नव्हतं. खूप विचार करून सिद्धार्थ आणि माझ्या आई-बाबांनीच निर्णय घेतला मला परत भारतात ठेवायचा. आईकडे राहिल्यावर सहा महिन्यात मला माणसांत आल्यासारखं वाटू लागलं होतं. थोडी थोडी मी लोकांमध्ये मिसळू लागले होते.

सुरुवातीचे कित्येक दिवस तर मला सिड ची आठवण पण यायची नाही. एकटेपणाने माझ्यावर पूर्णपणे कब्जा केला होता. हळूहळू मी आईला विचारू लागले की कुठे आहे तो? कधी येणार? मग मला कळले की तो परत येणार नाहीये, हां, मला न्यायला आला असता. पण इतकं सगळं झाल्यावर पुन्हा त्या घरात जायची माझी हिम्मतच नव्हती. २-४ वेळा फोनवर बोलले मी सिड शी. पण मग पुन्हा तीच भांडणं. शेवटी आम्ही निर्णय घेतला की वेगळं व्हायचं. तो थोडे दिवस इकडे येऊन सर्व कोर्टाची कामं पूर्ण करून गेला. मी अजूनही घरीच होते. बाबांनीच मग आपल्या प्रोजेक्टचे 'मनोज शर्मा होते ना त्यांना फोन लावला आणि माझा रिझ्युम पाठवून दिला. ते एकदा घरी येऊन माझ्याशी बोलताना मला आठवलं अरे आपण कित्येक दिवसात टेक्नॉलॉजी कशाशी खातात हेही पाहिलं नाहीये. त्यांनीच मला अभ्यास करायला प्रोत्साहन दिलं. आधीचा अनुभव होताच त्यामुळे नोकरीही मिळून गेली. पण मला पुण्याचं ऑफिस नको होतं म्हणून इथे आले. आणि बघ, तुझी गाठ पडली.

मला ना हे सर्व सांगायला काही वाटत नाही पण लोकांचे त्यावरून निघणारे तर्क कोण थांबवणार? डिप्रेस्ड म्हणजे वेडी का? की मुल होत नव्हतं? की अजून काही? म्हणजे आजच्या काळातली ही नवीन दुख:च आहेत. ती लोकांना समजतीलच असं नाही. त्यात डिव्होर्स हे अजूनही नाजूक प्रकरणच आहे आपल्याकडे. त्यामुळे मी जुन्या सर्वच लोकांशी संपर्क तोडले होते.आता इथे येऊन हि सहा महिने होऊन गेलेत. आई बाबा मध्ये मध्ये काळजीने येऊन जातात. पण मी आता ठीक आहे. पुन्हा एकदा आयुष्य जगावंस वाटत आहे. रोज सकाळी उठल्यावर आरश्यात स्वत:कडे बघावसं वाटत आहे. या सर्व अनुभवातून मला एक नक्की कळलंय, आपल्या इंडस्ट्रीत न लोकांना सर्वच हवं असतं, पैसा, प्रमोशन, चांगलं काम, मग घराचं सुख, पोरांना द्यायला वेळ. सर्वच. आणि मग ओढाताण सुरु होते. एकतर स्वत:ची, घरच्यांची नाहीतर मग कामाची. मी आता ठरवलंय जास्त सर्वच गोष्टींच्या मागे लागायचं नाही. काम करून आनंद मिळतोय न तो घ्यायचा, मित्र जोडायचे, एखादी कला शिकायची, आणि स्वत:ला अजिबात त्रास करून घ्यायचा नाही. लोकांशी बोलणं, न बोलणं, काम करणं, न करणं कुणाला इतकं प्रभावित का करत? '

हे सगळं होत असताना आपण काय करत होतो याचा विचार राहुल करत होता.नेहाच्या आयुष्यात इतकी उलथापालथ झाली आणि आपण यात कुठेच नव्हतो? एव्हढा कसला राग होता तिच्यावर? निदान तिच्याशी बोलत असतो तर हे सर्व कळलं तरी असतं. जमेल तशी मदत तरी केली असती. आपण आपल्याच दु:खात आणि आयुष्यात किती बुडून गेलो होतो. राहुलला खूप राग आला होता स्वत:चा. ती बोलत असताना ते सहन न होऊन डोळ्यातून घळाघळा आसवं बाहेर पडत होती. नेहा त्या सर्वातून बाहेर पडत होती पण ते सर्व तो आज अनुभवत होता. ऐकत होता. त्याला शेवटी राहवेना म्हणून त्याने तिला आपल्या छातीशी धरलं. जणू ती खरंच सोडून गेली असतं तर आपलं काय झालं असतं हा विचारच सहन होत नव्हता त्याला. एकदा निदान एकदा तिच्या घरी तरी विचारायला हवं होतं मी. इतका कसा स्वार्थी आहे मी? तिला काही झालं असतं तर...? कितीतरी वेळ तिला सोडून द्यायला तयार होत नव्हतं त्याचं मन.

बोलता बोलता पहाट झाली. जणू सगळं दु:खं रात्रीच्या अंधारात पुरून गेलं होतं आणि नवीन एक पहाट त्यांच्यासमोर नवा दिवस घेऊन येणार होती. नेहाने मग कॉफी बनवली दोघांसाठी आणि पुन्हा एकदा ते गप्पा मारत बसले. कित्येक वर्षांनी भेटले होते, मळभ सर्व दूर झालं होतं. तिने मग त्याला विचारले,'तू नाही केलंस लग्न अजून?' तो म्हणाला,'आई-बाबा मागे लागले आहेत आता. पण आताशी तर MBA झालं. अजून त्याचं लोनही फिटलं नाहीये. लगेच कुठे नवीन घेऊ? बाय द वे, कॉफी छान झालीय हं'.

नेहाने विचारलं, 'रोहनचं काय झालं रे? काहीही म्हण त्याला सर्वच गोष्टींची घाई होती. रेटिंग नाही मिळाले, लगेच कंपनी बदलली त्याने. कुठे असतो आज काल?'

राहुल,'आता चौथ्या कंपनीत आहे. त्याचंहि काहीतरी चालूच असतं. कुठे नोकरी बदल, कुठे घर बदल, कधी गाडी तर कधी मोबाईल. नवीन नंबर आला की स्वत:च कॉल करतो. मग मी जुना नंबर रिप्लेस करून टाकतो. अजिंत मात्र मोठा मेनेजर झालाय आता. माझ्या आधीच त्याचं MBA पूर्ण झालं होतं. मागच्या वर्षी लग्नही झालं. लग्नाला गेलो होतो त्याच्या. तुझी आठवण काढली होती तेव्हा.'

याचं काय, त्याचं काय करत त्यांना कधी झोप लागून गेली कळलच नाही. राहुलने नेहाला तिच्या घरी सोडलं. आणि अजूनही तिच्याच विचारात तो कामावर गेला. त्याला सारखं वाटत होतं की मी का नाही तिची चौकशी केली. मी का लक्ष दिले नाही तिच्या फोन न करण्यावर. त्याला खूपच अपराधी वाटत होतं. पुढचे चार दिवस मग तो सारखा नेहाला फोन करून विचारायचा काय 'करते आहेस? जेवलीस? घरी फोन केलास?' जणू हरवलेल्या काळाची भरपाई करू पाहत होता तो. नेहा त्याला एकदा म्हणालीही,'अरे राहुल, मी ठीक आहे आता. तुला हे आता कळतंय म्हणून जास्त काळजी वाटतेय तुला. मी ठीक आहे आता.नको करुस माझी काळजी.'

तिला भेटल्यावरही तिचे सर्व हावभाव तो बारकाईने टिपत राहायचा. कशी बदलली आहे ती, कशी मध्येच इंग्रजी शब्द बोलत राहते, जेवण किती छान बनवते. पूर्वीची नेहा मिळतेय ना हे शोधत राहायचा. नेहालाही बरं वाटत होतं त्याच्यासोबत. कधीतरी पुन्हा एकदा राहुलच्या मनात जुने विचार यायचे. विचारवं का नेहाला लग्नाबद्दल? काय म्हणेल ती? रागावेल का? माझ्याशी बोलायचं बंद करून टाकेल का? म्हणेल बहुतेक हो यावेळी. मागच्या वेळी 'नाही' म्हणायला विचारलं कुठे होतं आपण तिला. तेव्हा एकदा चूक केली तिला जाऊ देऊन पुन्हा नाही असं कुणाकडे जाऊन देणार पुन्हा त्रास होण्यासाठी. बरं, ती म्हणाली 'हो' तर आई-बाबा हो म्हणतील? तसे ते अगदीच जुन्या विचाराचे नाहीत. पण डिव्होर्स झाला हे सांगायचं? आणि नाही म्हणाले मग तर? त्यांच्या परवानगी शिवाय लग्न करायचं? असे एक न अनेक विचार यायचे त्याच्या मनात. नेहाने विचारलं कधी की असा काय बघतोस म्हणून तर नुसती मान झटकून सोडून द्यायचा.

बरोबरच होतं म्हणा त्याचंही. त्याला आधी गेल्या कित्येक वर्षांची मैत्री निभावायची होती. ते कर्ज तरी आधी उतरावयाच होतं डोक्यावरून मग पुन्हा एकदा प्रेमाला नवीन सुरुवात करायची होती.

------------------------------------भाग दहावा: हॅपि एंडिंग ???-----------------

मागचा भाग अर्धवटच संपवला. म्हटलं कशाला त्रास घ्यायचा डोक्याला? त्यांचं लग्न झालं नाही झालं का विचार करायचा पुढे? कारण 'बात निकलेगी तो दूर तलक जायेगी'. पण आपल्याला नेहमीच हॅपि एंडिंग हवा असतो. का? कशासाठी? आयुष्यात प्रत्येक क्षणाला जेव्हा निर्णय घेतो, तो हॅपि असेलच असं नाहीये ना? म्हणजे अगदी सकाळी थोडा वेळ जास्त झोपून टेक्सी करून जाऊ म्हणायलाही मन करवत नाही मग झक मारत उठून आवरून बसमधून कडमडत जातोच की. इतक्या छोट्या छोट्या गोष्टींपासून ते टक्कल असलेल्या मुलापेक्षा सावळा बरा म्हणून त्याच्याशी लग्न करायला 'हो' म्हणायची अडजस्टमेंट करतोच की. म्हणून निदान 'गोष्ट' तरी हॅपि एन्डिंगची पाहिजे अशी अपेक्षा असते का आपली? आणि कदाचित म्हणूनच मीही ती अर्धवट सोडून खरे खुरे प्रश्न टाळून दिले. कशाला उगाच ते समोर आणून अजून डिप्रेस व्हायचं आणि लोकांना करायचं म्हणून.

पण आता बोलतेच आहे तर सांगतेच सर्व. का करावं नेहाने लग्न राहुलशी? केवळ आई-बाबा दुसरं लग्न करच म्हणून मागे लागलेत आणि अनोळखी पेक्षा ओळखीचा बरा म्हणून? बरं राहुलने तरी का भांडाव तिच्यासाठी? प्रेम आहे म्हणून तो भांडेलही. पण ती असेल त्याच्या पाठीशी? एकदा घरच्यांशी लढून केलं तिने लग्न. आणि हे सगळं असं होऊन बसलं. अशा वेळी ती तरी कुठून आणणार बळ त्याच्या पाठीशी उभं राहायला? 'म्हणाला तो हो 'चल' करूच लग्न तर येईल त्याचा तो लढून जगाशी. आहेच की मग मी इथे, मी कुठे जातेय?' असाच तिचा अटीटयूड असेल, तर होईल त्याची हिम्मत लढायची? बरं लढलाच तो त्याच्या प्रेमाखातर, तर जिंकल्यावर त्याच्यावर जीव ओवाळेल का ती? की चला मला काय? करू आता लग्न म्हणून ती उभी राहील मांडवात?

समजा झालंच सर्व ठीक, राहिलीही ती उभी मांडवात. आपण मग तो हॅपि एंड समजायचा की नाही? मला तरी नाही वाटणार तो हॅपि. मग हॅपि ्हणजे तरी काय? त्या 'हॅपि' ची डेफिनिशन मला मिळाली नाही. म्हणून संपवूनच टाकली गोष्ट. पण विचार होतेच मनात. ते कुठे जातात? त्यांनाही हवाच आहे की 'हैप्पी द एंड'. मग अजून पुढे गेले विचार. आणि केलं लग्न. पुढे काय? नव्याचं नवपण मिळेल का त्याला अनुभवायला? हनिमून, पहिली दिवाळी, सासुरवाडी सगळं नवं, पुन्हा उभं करायचं, जोडायचं जमेल तिला? ते सगळं जाऊ दे, सुखाच्या त्या अत्तुच्य क्षणी, असेल का ती त्याच्याच सोबत? आणि असलीही आणि त्याच्याच मनात आली शंका तर? तो क्षण संपल्यावर झोपतील का ते मुटकूळं करून शरीरांचं? की पाठ फिरवून काय होऊन बसलं हे असा विचार करतील? हे आणि असेच विचार करून सोडून दिले मीही होपफुल एंड म्हणून.

अशीच होत असतील का दुसरी लग्नं आपल्याकडे? की असतात प्रेमातही बुडून गेलेले? काळ आणि प्रेम खरंच भरून काढत असतील का सर्व जखमा? की आधीच्या कमी कराव्यात म्हणून नवीन नाती जोडायला जात असतील आणि कुणी माझ्या 'पास्ट' बद्दल विचारलं तर काय उत्तर देऊ या विचाराने घाबरून बोलत असतील? का तेही प्रत्येकाच्या स्वभावावर असेल? मुळातच आनंदी असणारी व्यक्ती कदाचित राहूच नाही शकणार कायम दु:खी. मुळातच प्रेमळ व्यक्ती राहूच नाही शकणार प्रेम दिल्याशिवाय? कुणाचं तरी झाल्याशिवाय?

माझ्या या सर्व प्रश्नांना मागे टाकून राहुलने नेहाशी लग्न केलं होतं. राहूलच तो ! ध्येय समोर आहे म्हटल्यावर ते अचीव्ह केल्याशिवाय कसा राहील तो? तिला पटवून, घरच्यांना मनवून, तिच्या घरी बोलून, राहुलने सर्वांना लग्नाला तयार केलं होतं. आता हे असं लग्न म्हटल्यावर ते छोटं घरगुतीच झालं. लग्नानंतर दोघेही बेंगलोरला परत आले होते. त्याच्या घरी. त्यांच्या घरी. तिने मग सामान ठेऊन लगेच आपलं घर म्हणून वागायचं की नवी नवरी म्हणून अवघडून बसायचं? पण ती शेवटी नेहा होती, त्याची इतक्या वर्षांची जुनी मैत्रीण. आता लग्न समारंभ, पुढचे सगळे सोहळे तिने एक औपचारिकता म्हणून पार पाडलेले. पण इथे ते दोघेच तर होते. तिने सोफ्यावर झेप टाकून दिली. 'कंटाळा आला रे, नाही? शी इतक्या उन्हाळ्यात प्रवास म्हणजे नको वाटतं बघ. ' तोही मग पटकन जाऊन दोघांसाठी कॉफी बनवून घेऊन आला. दोघेही निवांत मग टी व्ही बघत बसले.

रात्र होत आली तसे ते दोघेही जरा नर्व्हस होते. पण ज्या क्षणाला ते जवळ आले तो कसा आला हेही त्यांना कळले नाही. कित्येक महिने उन्हांत तापलेल्या, रखरखीत जमिनीवर जसे पाण्याचे थेंब पडल्यावर ती प्रत्येक थेंब शोषत राहते बाहेर एकही थेंब राहू न देता, तसे दोघेही इतक्या दिवसांच्या वणव्यानंतर स्वर्शाचा प्रत्येक थेंब शोषून घेत होते. पण जुने रेफरंस नव्याने कसे वापरायचे कळत नाही. त्याच्या स्पर्शाला आपण उत्तर कसं द्यायचं हे आधीच ठरलेलं असतं ती सवयच झालेली असते, पण तो मुळातला स्पर्शच बदलल्यावर जु ने प्रत्युत्तर चालणार का? की नव्याने आपल्यालाच पुन्हा शोधत राहायचं? मग हळूहळू त्या नवीन प्रत्त्युत्तराचीही सवय होऊन जाते. तिलाही झालीच, त्याच्या आसपास असण्याची, त्याच्या हसण्याची, तिच्या केसांत दहाही बोटं घालून ते मागे घेऊन फक्त तिच्या चेहऱ्याकडे पाहण्याची, त्याच्या परफ्युमची, सगळ्याचीच.

मध्ये मध्ये नेहा तिच्या जुन्या गृहिणीच्या भूमिकेत घुसायची, राहुलला छान जेवण करून घालावं, त्याचं सर्व सामान त्याला हातात आणून द्यावं, त्याच्या ऑफिसमधल्या पार्टीजना जावं. पण राहुल त्यातून तिला बाहेर काढायचा. ती स्वयंपाक करायला लागली की बाहेर आणून बसवायचा, मी बघतो तू बैस म्हणायचा. तर कधी तिला जवळ ओढून एखादं कोडं सोडवत बसायचा. त्यांच्या जुन्या डेव्हलपर-टेस्टरच्या नात्यात जायचा आणि त्रास द्यायचा. नवा गडी नवं राज्य चालू झालं होतं. नेहाच्या आईलाही तिला बघून बरं वाटायचं. मुलीची स्थिरता तिच्या सुधारलेल्या तब्येतीत दिसते आईला. त्याच्या घरच्यांनीही तिला स्वीकारलं होतं सून म्हणून. सगळं कसं सुरळीत चाललं होतं पुढचे दोन-तीन वर्षं.....

-------------------------------भाग अकरावा : घर दोघांचं (तिघांचं ?) ------------------

घर दोघांचं म्हटलं की जितकं नीट नेटकं, टापटीप तितकंच बेशिस्त. पाच दिवस ऑफिस मध्ये असल्यावर ते पसरवणार तरी कोण? सर्व कसं जिथल्या तिथे. पण तेच शनिवार-रविवार मनात आलं तेव्हा उठायचं, जेवायचं आणि परत झोपायचं, कधी मनात आलं सिनेमाला जायचं. रात्री उतरवलेले कपडे परत घातले काय किंवा तिथेच पडले काय? काय फरक पडतो? बाथरूमचा दरवाजा बंद केला काय उघडा ठेवला काय? कोण विचारतंय? सगळाच निवांत कारभार. ऑफिसमध्ये काम आलं म्हणून रात्री उशिरा तिथेच थांबलं तरी कोणी विचारणार नव्हतं. अर्थात आपलं माणूस म्हणून काळजी असतेच, पण फोन करून खात्री करून घेतली की संपलं. त्याच्या आठवणीनं रडू आलंय असं तर होत नाही ना? कसं ना, लग्न कसल्याही प्रकारचं असू दे, अरेंज किंवा लव, पण संसार दोघांचा सारखाच. कंपॅटीबिलीटी असली म्हणजे झालं. आणि ती असणं म्हणजे तरी काय? तर प्रेडीक्टीबिलीटीच ना? समोरचा माणूस तुम्ही केलेल्या कुठल्याही गोष्टीवर जोपर्यंत तुमच्या वर्तुळातील अपेक्षेप्रमाणे उत्तर देतोय/ वागतोय म्हणजेच दोघांचं खूप छान जमतं म्हणायचं ना? समोरचा जेव्हा आपल्याला अनपेक्षित वागतो तेव्हा मात्र ते भांडायला कारण हौउन जातं. तर अशी कंपॅटीबिलीटी आणि प्रेडीक्टीबिलीटी असली की झालं, मग 'लव' काय आणि 'अरेंज' काय, ते मॅरेज सारखंच. बाकी सर्व फक्त, लोकांना 'आपण कसे भेटलो हे सांगायची गोष्ट' इतकाच काय तो त्याचा उपयोग.

गेले दोन तीन वर्षं असंच रुटीन चालू होतं नेहा आणि राहुलचं. ते मोडलं एका सकाळच्या प्रेग्नंसी टेस्ट ने. कितीही प्लान करा पण त्या क्षणाला रिझल्ट पाहिल्यावर एक ठोका चुकतोच. 'आता काय?' हा विचार येतोच. अगदी म्हटलं सिनेमातल्यासारख बायकोला उचलून धरायचं, पण तो चुकलेला ठोका अजून चुकलेलाच असतो. एक धाकधूक असतेच. पुढे काय? याची. त्यांनी मग डॉक्टर ची भेट घेतली, सर्व चेक करून घेतलं, मनात हजारो प्रश्न होते. त्यांची उत्तरं ते शोधतच होते इंटरनेटवर. दिवसभर मग ते घरीच राहिले, विचार करत, मध्येच काहीतरी बोलत, परत विचार करत. घरी फोनही केले. एक दिवसाची ती एक्साईटमेंट हळूहळू कमी होत जातेच. पण त्या दोघांना जोडणारा एक धागा जन्माला येणार असतो. तोच त्यांना अजून जवळ आणत राहतो. मग बायकोचे हट्ट, डोहाळे, त्याचं ते असं काळजीतून प्रेम दाखवणं सगळ्यालाच नवीन अर्थ येतो.

आपल्याला नेहमीच का आपल्या साथीदार सारखं बाळ हवं असतं? असं कुणी कधी म्हणत नाही मला अगदी माझ्यासारखं हुशार, देखणं बाळ हवं आहे? का आपल्यातले वाईट गुण फक्त आपल्यालाच माहित असतात आणि नवऱ्याचे चांगले गुण जास्त प्रिय असतात म्हणून? सर्व काही ठीक होतं. पण ऑफिसला जाणं, येणं, कधी जास्त वेळ लागला तर दमायला होणं, हे स्वाभाविकच होतं. तिला मदतीला राहुल होताच. मध्ये मध्ये आई-सासू भेटायला येऊन गेले होते, कधी तिची हौस पुरवायला जास्त दिवस राहूनही गेले होते. सर्व सुविधा इथेच आहेत तर तिने बेंगलोर मधेच राहायचं ठरवलं होतं. आणि कितीही नाही म्हटलं ना, तरी दोघंच असं राहिलं न की दोघे इतके एकमेकांवर अवलंबून जातो की दोघांनाही कळत नाही. त्यामुळे राहुलच्या सोबत राहणं हे कारणही होतंच.

नऊ महिने म्हणता म्हणता तो दिवसा उजाडलाही होता. मुलगा की मुलगी, त्याच्या सारखे की तिच्यासारखे, नाव काय ठेवायचं, ते आलं की कसं सांभाळायचं, कुठल्या गोष्टी शिकावयाच्या, कसं वळण लावायचं, कुणी दटावायच, कुणी लाड करायचे, सगळे सगळे प्रश्न विसरायला लावणारा दिवस. पहाटे हॉस्पिटल मध्ये दाखल झाले होते ते. सकाळी ८.१४ ला नेहाने एका गोंडस मुलीला जन्म दिला होता. दोघांचे आई-बाबाही होतेच मदतीला. पण त्या इतकुशा जीवाने सर्वांची धावपळ करून सोडली होती. बाळ-बाळंतीण घरी आले. त्याची आई परत जाऊन थोड्या दिवसांनी येणार होती. पहिले तीन महिने तिच्या आईनेच पाहिलं सर्व. एकदा आई झालं की असं असतं, मूल एक दिवसाचं असो नाहीतर २८ वर्षांचं, त्याचं सर्व करणं आलंच.

नेहालाही ऑफिसला ६ महिने तरी सुट्टी होती. बारसंही झालं, तिचं नाव त्यांनी 'राधा' ठेवलं होतं. राधाचं करण्यात दिवसा कधी संपून जायचा कळायचंच नाही. रात्री दमलेल्या नेहाकडे पाहून राहुलला तिच्यावर अजूनच प्रेम यायचं. प्रेयसी, बायको या सर्वांपेक्षा आपल्या 'मुलांची आई' वर जास्त प्रेम येत असावं पुरुषांना. त्यांचं कुणीतरी इतका जीव ओतून करत आहे हे पाहायलाच किती सुंदर आहे. तोही मग रात्री उठून राधा रडायला लागली की तिला बघायचा, तिला हातात घेऊन झोपवायचा. रात्री खुर्चीत दमून झोपलेल्या नवऱ्याला किंवा बायकोला, 'तू झोप मी बघतो तिला' असं म्हणण्यात जो प्रेमभाव आहे तो त्यांच्या दुसऱ्या कुठल्याच नात्यात नसावा. नेहाची आई घरी परत गेली आणि राहुलची आई मदतीला आली होती. नातवाचं सुख त्यांनाही अनुभवायचं होतं .

राधा आता सहा महिन्यांची झाली होती. रांगत, हसत,खेळत तिने सर्व घरात चैतन्यआणलं होतं. पण जसजसे नेहाचे नोकरीवर परत जाण्याचे दिवसा जवळ येऊ लागले तिला काळजीने झोप येईनाशी झाली. तिला वेळेवर दुध देणं , डायपर बदलणं, तिला झोपावंणं दुसऱ्या कुणाला कसं जमणार आहे हा विचारच तिला सहन होईनासा झाला. राहुलच्या आई अजून थोडे दिवस राहिल्याही असत्या. पण स्वत:चा संसार,नवरा, घर सोडून परप्रांतात किती दिवस राहणार होत्या त्या तरी? तिला हळूहळू राधाला वरचं दूध,भाज्या,डाळ-तांदूळाची पेज द्यायला लागणार होती. हे सर्व मायेने करून तिला कोण भरवणार होतं? कधी वाटायचं नोकरी सोडून घरी बसावं. पण मागे अशीच ती घरी राहिली आणि त्या एकटेपणाच्या आठवणी अजूनही अस्वस्थ करून टाकत तिला. आणि थोडे राहिली घरी तरी परत नोकरी मिळणंही सोपं नव्हतं. तिला आपल्यावरच्या या निर्णय घेण्याच्या ओझ्याने फार अस्वस्थ करून सोडलं होतं. पण तिने आणि राहुलने काहीच निर्णय घेतला नव्हता याबद्दल. किंवा त्यात निर्णय घेण्यासारखं काही नाहीच वाटलं बहुतेक राहुल ला.

शेवटी सहा महिन्यांच्या सुट्टीनंतर नेहा ऑफिसला जात होती. बऱ्याच दिवसांनी ती बाहेर पडणार होती. आता बाळाला घेऊन बाहेर जाणं तसंही कमीच व्हायचं. तिने दोन-चार ड्रेस घालून पहिले, सर्वच घट्ट झाले होते. 'शी,किती जाड झाले आहे मी',नेहा वैतागून बोलली. राधासाठी सर्व काही आवरून, हाताशी ठेवलं होतं तिने राहुलच्या आईसाठी. एक मदतीला मुलगीही ठेवून घेतली होती. कसातरी एक ड्रेस अंगात बसवून नेहा ऑफिसला निघाली. सकाळच्या ट्राफिकमध्ये दिडेक तास तरी गेला तिचा. बाप रे, किती लांब आहे हे ऑफिस ! गेल्या ३-४ वर्षांत पहिल्यांदाच तिला आपण रोज इतके दूर कसे जायचो हा प्रश्न पडला होता. ऑफिसमध्ये पोचल्यावर सर्वात आधी तिने घरी फोन लावला, 'सर्व ठीक आहे ना आई?' तिने विचारले. त्यांनीही सांगितले,'ठीक आहे गं ,आताच दुध पिलं तिने,खेलतीय ती.' नेहाला जरा बरं वाटलं. मग ती आपल्या ऑफिसच्या मित्र-मैत्रिणीना राधाचे फोटो दाखवण्यात गुंग झाली. चारेक तासांनी मध्येच तिला राधाची इतकी आठवण आली की डोळे आधी भरून आले की छाती हे सांगता येणार नाही. दूध येऊन तिला आता दुखायला लागलं होतं. 'कसे काढणार मी असे दिवस तिच्याशिवाय?' नेहाला विचार आला मनात. कसातरी अर्धा दिवस थांबून नेहा घरी परत गेली होती. राधाला पाहिल्यावर रडू थांबेनाच तिचे.

महिनाभर कसातरी संपून गेला. संध्याकाळी ५ ला निघाली नेहा तरी घरी सात वाजल्याशिवाय पोहचू शकायची नाही. मग २-३ तास कसेतरी मिळायचे राधा सोबत. राहुल तर फक्त रात्री झोपतानाच दिसायचा तिला. ती कधीतरी वैतागून जायची. मग राहुल तिला समजावयाचा,'होईल गं सगळं ठीक. नको काळजी करुस. आताशी लहान आहे ती. म्हणून काळजी वाटत आहे. अजून २-३ वर्षांत तीही मोठी होऊन जाईल. ती शाळेत गेल्यावर मग परत तू काय करणार घरी राहून? मी आहे ना मदतीला?' त्याचा फार आधार वाटायचा तिला.आता ऑफिसमध्ये कामही सुरु झालं नियमित तिचं. त्याची आईही समजून घेत होती तिला तसं. पण त्यादिवशी राधाची जरा जास्तच कुरकूर चालू होती. दिवस तसा पटकन जायचा निघून.पण संध्याकाळी दोघीच घरात म्हटलं की नको वाटायचं. राहुल येऊन गेला तरी अजून नेहाचा पत्ता नव्हता. तिने घरी फोन करून सांगितलं की उशीर होईल. पण रात्रीचे दहा? सकाळपासून मुलीला सोडून गेलेली ती. रात्री घरी आली तेव्हा सगळं आवरून झालेलं होतं. नेहाने अपराधी मनानेच पाय ठेवला घरात. त्याची आईही आज चिडलेली होती. आल्यावर नेहाच बोलली,'अरे, आज क्लाएंट चा कॉल होता. एक इश्श्यू आला होता. '

राहुल म्हणाला,'ठीक आहे गं. मी आलो होतो सहा पर्यंत. मस्त खेळलो आम्ही. खाली पार्कमध्ये जाऊन आलो. नुकतीच झोपलीय ती'.

झोपलेल्या राधाला पाहून नेहाला गहिवरून आलं होतं. 'सॉरी राधू. आई उद्या लवकर येईल हं'. तिच्या मऊशार गालांना हात लावत नेहा म्हणाली. कसंतरी जेवण केलं नेहाने.पण आज वातावरण तंग आहे हे तिला कळतच होतं. शेवटी हात धुवून सोफ्यावर ती बसत असतानाच त्याची आई बोलली,'केलीच पाहिजे का नोकरी? म्हणजे आम्ही तरी किती दिवस बघणार ना राधाला? आईचं प्रेमही पाहिजेच ना तिला?'

त्यांचं हे बोलणं थोडं अनपेक्षित होतं तिला.त्यामुळे पटकन काय बोलावं नेहाला कळेना. तिने राहुलकडे पाहिलं.

तो तिला म्हणाला,'नेहा तू झोप जा. दमली आहेस. आपण बोलू याबद्दल उद्या. उगाच आता जागू नकोस.'

राहुलच्या थोड्या चढलेल्या आवाजाने तिला 'नाही' म्हणायला जागा ठेवलीच नव्हती. ती उठून झोपायला निघून गेली. आणि राहुल आपल्या आईजवळ बोलायला बसला. नेहाला मात्र आज झोप लागणार नव्हती. आयुष्यात ज्या वळणावर ती आधी एकदा येऊन गेली होती. पुन्हा त्याच ठिकाणी ती उभी होती. घर की नोकरी. स्वत:साठी की लोकांसाठी तेही आपल्याच ? पुन्हा तेच प्रश्न सुरु झाले होते.

----------------------------भाग बारावा (शेवटचा) : प्रियकर माझा ------------------------

राहुल आईशेजारी सोफ्यावर बसून म्हणाला,'बोल काय झालं? आज एकदम अशी वैतागली का आहेस?'

त्याच्या आईच्या डोळ्यात पाणी यायला लागलं होतं,'काही नाही रे, एकतर दिवसभर ती पोरगी घरात असते. संध्याकाळ पर्यंत कंटाळून जाते. आणि आम्हाला काय नातवंड आहे त्यामुळे त्याचं करायला काही वाटत नाही. पण शेवटी आई ती आईच ना? आणि तू सांग किती दिवस असं चालणार हे? तिकडे तुझे बाबा, भाऊही बाहेर खाऊन कंटाळले आहेत. मलाही घरी गेलंच पाहिजे ना?'

राहुलने एकेक मुद्दा समजून घेतला,'चल आधी आपण तुझ्याबद्दल बोलू. तू सांग तुला काय करायचं आहे? तिकडे बाबांसाठी जायचं आहे का इथे राधासाठी राहायचं आहे हा विचार करूच नकोस. तुला काय हवं आहे ते सांग. हे बघ तू आमच्यासाठी इतकं केलं आहेस आजतागायत. तू आम्हाला इतकं चांगलं वळण लावलंस, शिकवलंस. पण तुला काय हवं म्हणून कधी विचारलंच नाही. आता आम्ही मार्गी लागल्यावर तुझा छान ग्रुप जमला. कधी बाहेर फिरायला जाणं झालं हे सर्वही उत्तमच. तुला इथे कंटाळा येणंही हि साहजिकच आहे. त्यामुळे तू सांग तुला काय करायचं आहे?'

आई,'मला राधाबरोबर रहायला आवडतं रे. पण तिकडची खूप आठवण येते. इथे जास्त नाही राहू शकत. पण मग राधाचं काय?'

राहुल,' हे बघ, बाकी कुणाचाही विचार करू नकोस. तुला जायचं आहे ना? मग ते तरी नक्की करू. कारण केवळ स्त्री म्हणून बाळाची जबाबदारी आईची,सासूची, असं मानूनच आम्ही तुला, तिच्या आईला इथे राहायला बोलावलं. पण तुमचंहि तिकडे जग आहे हे विसरलो. तर पुढच्या आठवड्यात तुझं तिकीट काढू. चालेल?'

आई,'अरे पण? राधा?'

राहुल,'अगं, बोलू ना पुढे.'

त्यांनी मानेनंच होकार दिला.

राहुल पुढे बोलू लागला.'नेहाबद्दल म्हणशील तर, तिने कधी नोकरी सोडावी हा विचार माझ्या मनातच आला नाही. कारण ती इतकी हुशार आहे. तिने घरी राहणे म्हणजे तिच्या कौशल्याचा अपमान करण्यासारखे आहे. आणि माझ्यासाठी तुम्ही मुली बघत होतात तेव्हा शिकलेली, नोकरी करणारी, अगदी माझ्या बरोबरीची, अनुरूप मुलगीच तुम्ही बघत होता ना? तेव्हा आपण विचार केला का? की या शिकलेल्या मुलीने बाळ झालं की मात्र घरी राहून आई होण्याचं कर्तव्य पार पाडायचं ? नाही ना? आपण सगळेच अपेक्षा करतो की कमावणारी मुलगी पाहिजे. मग वेळ आल्यावर तिनेच त्या नोकरीवर पाणी सोडावं अशी अपेक्षा का ठेवायची? मी काही स्त्रियांच्या हक्कासाठी लढणे किंवा त्यांना बरोबरीचा दर्जा द्यावा म्हणून लढाई पुकारत नाहीये. पण नेहा जशी आहे तशीच मला आवडते आणि म्हणून तिने बदलावं अशी मी अजिबात अपेक्षा करत नाही.आणि एव्हढच वाटतं तर मी नोकरी सोडतो,चालेल?'

त्याच्या आईने चमकून वर बघितलं.

'आता राहिला प्रश्न राधाचा. तिच्यावर आपण सर्वच किती प्रेम करतो हे वेगळं सांगायची गरज नाही. पण म्हणून तुम्हा लोकांना वेठीस धरले नाही पाहिजे. तुम्ही हौसेने करता,खेळता ते वेगळं. राधा ही जशी नेहाची जबाबदारी आहे, तशीच माझीही. आईचं प्रेम म्हणजे तरी काय गं? तुझ्याइतके बाबा आमच्या सोबत राहू शकले असते तर त्यांच्याही तितकेच जवळ राहिलो असतो जितके तुझ्या आहोत. मी राधाला काही कमी प्रेम देणार आहे का नेहापेक्षा? त्यामुळे फक्त तिनेच एकटीने घरी राहण्याचा निर्णय घेणं हे चुकीचं. हां, तिला आपल्या मुलीसोबतच राहायचं आहे, बाकी काहीच करायचं नाहीये असं म्हटलं तर तो तिचा निर्णय. पण म्हणून तिच्यावर तो निर्णय घेण्याचा भार सोडून, तिने आपल्याला हवा तसा निर्णय घ्यावा अशी अपेक्षा मी करणार नाही. राधाला दिवसभर कसे सांभाळायचे याचा विचार केलाच पाहिजे आणि त्यासाठी अनेक पर्यायही आहेत. त्यातला एक कुठलातरी एकदम योग्य आहे असे मी अजिबात म्हणणार नाही. प्रत्येकाला चांगली-वाईट बाजू आहेच. पण त्यातला कुठला ऑप्शन ठरवायचा हे आम्हाला दोघांना बसून नक्की केलं पाहिजे. आणि आम्ही ते करूच. त्यामुळे तू तिची अजिबात चिंता नको करूस. सगळं ठीक होईल.' राहुलच्या त्या समंजस बोलण्याने त्याच्या आईला गहिवरून आलं.

तो पुढे म्हणाला,'चल झोप बरं आता. राधा रात्री उठली की मलाच बघायला लागतं. तुम्ही दोघी बायका घोरत असता नुसत्या.' त्याच्या आईने खोट्या रागाने त्याला एक फटका मारला आणि झोपायला निघून गेली.

नेहा मात्र त्यांचं बोलणं कानात प्राण आणून ऐकत होती. राहुल रुममध्ये येत आहे म्हटल्यावर तिने तोंडावर पांघरून ओढून घेतलं. सगळेच प्रश्न असे पांघरून घेऊन सुटले असते तर किती बरं झालं असतं. राहुलही लगेच झोपून गेला.

त्याच्या चेहेऱ्याकडे बघत नेहा कितीतरी वेळ तशीच पडून राहिली. त्याच्या पहिल्या भेटीपासून ते पुनर्भेट, त्यांचं लग्न, सगळं आठवत होतं तिला. पण त्याला बघून आज जितकं भरून आलं तितकं कधीच वाटलं नव्हतं. आपल्या 'अहं' ला सांभाळूनच ती त्याच्यावर प्रेम करत होती जणू. आज मात्र त्याच्याकडे बघताना तिला इतकं प्रेम उफाळून आलं होतं की त्याच्यासाठी, तो म्हणेल ते करायला तयार झाली होती ती. बाईचं नेहमी हे असंच होतं. किती स्वत:ला सांभाळून द्यायचं ठरवा, वेळ आली की स्वत:ला विसरायला होतंच. त्याच्या आनंदासाठी, त्यांच्या मुलीसाठी वाट्टेल ते करायला ती आज तयार झाली होती. होताच तो तसा, तिचा साथीदार, तिचा प्रियकर. हो, आजपर्यंत फक्त तिचा मित्र असणारा तो आज तिचा प्रियकर झाला होता. आज जणू पहिल्यांदाच बघत होती ती त्याच्याकडे, नव्या अर्थाने. किती पाहिलं तरी मन भारत नाहीये असं वाटत होतं. शेवटी त्याचा हात अंगावर ओढून ती बघत राहिली. तो उठला की त्याला सांगायचंच की, 'मला नाही करायची नोकरी. घरी राहीन मी थोडे दिवस राधासोबत'. एकदा ठाम निश्चय झाल्यावर तिला कधीतरी झोप लागून गेली.

प्रत्येक सकाळ नवीन काहीतरी घेऊन येत असते. एक नवा हेतू जगण्याचा, एक नवी आशा, एक नवा दृष्टीकोण बघण्याचा. राहुलची आईही आज शांत होती मनातून. तिला काय करायचं आहे हे तिला कळल होतं. तसंच नेहालाही. नेहाने उठल्यावर सांगितलच राहुलला. 'अरे मी विचार करतेय, मी सांगते आज ऑफिसमध्ये नाही जमणार यायला अजून १-२ वर्षं तरी. दोन महिने नोटीस पिरीयड आहे म्हणा. पण आई थांबत असतील तर मी तेव्हढे दिवस जाऊन येईन. मग आहेच मी घरी. मलाही जरा ब्रेक तेव्हढाच. आणि माझी काळजी करू नकोस. मला काहीही होणार नाही घरी राहिल्यावर. राधा तर आहेच. पण तू माझ्या बरोबर असशील तर मला कधीच कशाचा त्रास होणार नाही याची खात्री आहे मला. ' तिने असं प्रेमाने छातीवर डोकं ठेवल्यावर छान वाटलं राहुलला. आणि तिचा त्याच्यावरचा विश्वास बघून तर अजूनच. पण तरीही नेहाने घरी राहायला 'हो' म्हटलं तरी तो तयार नव्हता त्यासाठी.

'नेहा, मी काय इतका वाईट सांभाळतो का गं राधाला? मला वाटलं नव्हतं तू माझ्या स्कीलवर अशी शंका घेशील म्हणून. उलट मीच तुझ्यापेक्षा लवकर झोपवतो तिला. ' तो चेष्टेने म्हणाला.

पण नेहा त्या मूड मध्ये नव्हती. तिचा चेहेरा बघून राहुल पुढे बोलला,'हे बघ, उगाच काहीतरी घाईत निर्णय घ्यायचा नाहीये. आपण आहोत ना दोघेही सोबत? मग सगळा भार तूच का घ्यायचा? मलाही जरा करू दे की माझ्या लेकीचं. आपणच 'आई' आणि 'बाप' म्हणून दोन वेगळे लोक, वेगळे रूप बनवतो. हे इंग्रजीत म्हणतात तसं दोघेही 'पेरेंट' म्हणून राहू. हो की नाही? यापुढेही कितीतरी प्रसंग येतील. प्रत्येकवेळी सोडणार आहेस का नोकरी? माझ्यासाठी? राधासाठी? नोकरी करणे न करणे हा ऑप्शन का असतो दर वेळी? ती आपल्या आयुष्याचा एक भागच आहे हे नक्की करायचं आणि बाकीचे निर्णय त्या दृष्टीने घ्यायचे. हो की नाही?

आणि राधाला कुठे ठेवायचं हा विचार का करायचा? थोडे दिवस आपणच करू काहीतरी. मी सकाळी जात जाईन आणि तू दुपारी जा ऑफिसला. मधले दोनेक तास ठेवता येईल तिला डे-केयरला. तिलाही तेव्हढाच बदल. आपलीच थोडी चुकामूक होईल, पण कुणीतरी एकाने घरी राहण्यापेक्षा हे बरं ना? असेही तुला रात्रीच कॉल असतात. जमले तर थोडे दिवस घरून काम करता येतं का ते बघू. हे बघ, उपाय शोधायचे म्हणले की मिळतातच. ते दोघांनी मिळून अमलात आणले तरच त्यात मजा ना. '

नेहाला आज असंही त्याच्यासमोर काही दुसरं दिसत नव्हतं. आणि हे असं तिला इतकं सांभाळून घेऊन बोलल्यावर तिला एक शब्दही पुढे बोलायला झालं नाही. ती त्याच्या छातीवर डोकं ठेवून राधाकडे समाधानाने बघत राहिली फक्त. आता यापुढे कुठल्याही वळणावर ती एकटी नसणार याची खात्री तिला झाली होती.

समाप्त.

विद्या.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहीली आहे. वाचतांना आधीच अंदाज येतो पुढे काय होईल याचा पण वाचायला मजा आली.
यातला प्रेमाचा भाग वाचून मायबोलीकर संघमित्राच्या कथा आठवल्या. ती पण s/w कंपनीत घडणार्‍या कथा लिहीते.

धन्यवाद. Happy
अनघा: पुन्हा वाचलीस? Happy सहीच. म्हणजे आपले लेखन दुसर्या वेळेसही वाचू शकते कोणी याचा खूपच आनन्द होतोय. Happy

रुनी पॉटरः "ती पण s/w कंपनीत घडणार्‍या कथा लिहीते." वाचल्या पहिजेत.
ही कथा मी विशेषकरून s/w कंपनीतील वातावरणात लिहिली होती.
पण बाकी कथांबद्दल मला पण कळत असते हे लिहिताना पण जे आजूबाजूला दिसते त्यावर लिहिण्याचा भर असल्याने असे होते. आणि माझी कल्पनाशक्तीहि कमी पडते हे जाणवते. असो.

विद्या.

नेहमीप्रमाणे छान.
शेवटच्या दोन-तीन भागात मात्र राहुल जितक्या आदर्श पद्धतीनं वागला, ते थोडं अवास्तव आणि खऱ्या आयुष्यात अतिशोयक्ती वाटलं.
असेही काही 'ग्रेट' पुरुष असतील च म्हणा, किंवा प्रेत्येक पुरुषाला इतकं ग्रेट व्हावंच लागत असावं ! आजून तरी तिथपर्यंत पोचायचो आहे Happy