हे शहाणपण कायमचं ठेऊ या!

Submitted by मयुरा on 7 November, 2013 - 03:06

हे शहाणपण कायमचं ठेऊ या!
दुष्काळाने माणूस ठरवलं तर बदलू शकतो हे सिद्ध केलं. दुष्काळाने दिलेलं शहाणपण कायम ठेवायला काय हरकत आहे? कोणत्याही बाबतीत प्रत्येकवेळी असेल तेव्हा दिवाळी आणि नसेल तेव्हा शिमगा करायलाच हवा का?

बरं झालं गेल्या वर्षी पाणीटंचाई निर्माण झाली. त्यामुळे प्रदुषणाचे, जंगल तोडीचे आपल्यावर काय परिणाम होऊ शकतात ते तरी आपल्याला समजलं. कारण अजुनही आपल्याला पर्यावरण प्रदुषण, ग्लोबल वॉर्मिंग या फार लांबच्या गोष्टी वाटतात. प्रदुषण आपण केलंय का? ग्लोबल वॉर्मिंगला आपण कारण आहोत का ? मग त्याची भीती आपण का बाळगायची? असले प्रश्‍नही आपल्याला पडतात. आपल्यातील अनेकांना हे देशाचे प्रश्‍न आहेत. ते देशानेच सोडवायचे आहेत. जे काय करायचं ते शासनाने करावं. आपला काय संबंध त्याच्याशी असं वाटतं.
पाणीटंचाईने-दुष्काळाने या सगळ्या प्रश्‍नांचं एका वाक्यात उत्तर दिलं आहे. प्रदुषणाने सामान्य माणसावर काय परिस्थिती ओढवू शकते याची चुणूक दाखवून दिली आहे.
माणूस इतका बिझी झालाय की, तो तहान लागल्याशिवाय विहीर खोदत नाही असं म्हटलं जातं. गेल्या वर्षी पाणीटंचाईने ही म्हण सिद्ध करुन दाखवली. पाणीटंचाईची चाहूल लागली आणि आम्ही एकदम शहाणे झालो. पाणी जपून वापरायला लागलो. पाणीबचत म्हणजेच टंचाईवर उपाय हे आम्हाला पटल. आम्ही ते अंमलातही आणलं. हे शहाणपण याच्या आधी यायला नको म्हणालं होतं? शहाणं होण्यापासून आम्हाला कोणी अडवलं होतं? पण म्हणतात ना, माणसावर बितल्याशिवाय त्याला शहाणपण येतं नाही.
दोस्तहो, आपण कितीही नाही म्हटलं तरी या समस्या निर्माण होण्यासाठी तुम्ही आम्हीही कारण ठरतो आहोत. तुमच्या आमच्या छोट्या छोट्या सवयी त्याला कारण ठरत आहेत.
एक साधं उदाहरण घेऊ. आपण सकाळी उठतो. दुध आणायला जातो. वस्तु आणायला हातात पिशवी न्यायची असते ही सवय इतिहासजमा होऊन बराच काळ उलटला. कापडी पिशवी नेणं हे तर पक्कं मागासलेपणाचं लक्षण, गावंढळपणाची ढळढळीत खुण, हे आपणच ठरवून टाकलंय. आपण रुबाबात दुकानात जातो. दुध घेतो. दुधवाला प्लास्टिकच्या पिशवीत( चुकलं चुकलं बॅगमध्ये) ते बांधून देतो. घरी आलं की त्या पिशवीत दुध काढून कचरा भरला जातो. तो सरळ घंटागाडीत किंवा चौकात फेकला जातो. असं किती प्लास्टिक जमा होतं असेल याचा कधी विचार केला आहे?
प्लास्टिकचं विघटन होत नाही. ते साचून रहातं. प्रदुषण करतं. गाईगुरांच्या पोटात जातं. जमिनीची उपज कमी करतं. गटारी जाम होण्यासाठी कारण ठरतं. हे सगळं माहिती असतं आपल्याला. पण काय करणार, आमचं मन ऐकत नाही ना. त्यामुळे आम्ही जमेल तेव्हा प्लास्टिकच्या बॅग वापरतो आणि सरळ त्या फेकून मोकळं होतो.
भरमसाठ सीडीज आणतो. त्या बेजबाबदारपणे हाताळतो. खराब झाल्या की फेकून देतो.
वीजेचीही उधळपट्टी होतेच. आम्हाला टीव्ही सारखा चालू लागतो. सगळं घर कायम दिवाळी साजरी करतं. कोणत्याही खोलीत जा लाईट सुरु असतात. पूर्वी पानांच्या पत्रावळ होत्या. आता आम्हाला थर्माकोलच्या लागतात.
पाणी आम्ही अत्यंत निष्काळजीपणे वापरतो. पाणी शिळं झालं म्हणून फेकून देतो. दाढी करताना दात घासतांना बेसिनचा नळ चालू ठेवतो. नळीने कार धुतो. अंगणात बदाबदा सडा मारतो. धुणं धुतांना बादली उतू जाते. कित्येकांच्या घरात पाणी जाईपर्यंत नळ बंदच होत नाही. पाहुण्यांना पाणी देणं हा तर धर्मसंस्कार. तुम्ही दिल्यासारखं करता. पाहुणे तुमचा मान ठेवत ते प्यायल्यासारखं करत उगाचच एखादा घोट घेतात. उष्टं पाणी सरळ बाथरूमध्ये जातं.
सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत अशा कितीतरी छोट्या छोट्या सवयी प्रदुषणात भर टाकत असतात.
प्रदुषणावर उपाय शोधायचे काम जगभर सुरु आहे. काही जणांचे प्रयत्न इतके प्रचंड आहेत की ते वाचूनच आपल्याला दडपायला होतं. हे आपल्याला जमणार नाही याची खात्री वाटायला लागते.
आपली जगण्याची लढाईच इतकी मोठी आणि तीव्र आहे की आपण कुठे जाणार आणि लाखो झाडं लावणार? लोकांना पाणी वाचवायला शिकवणार? हेही चूक नाही. पण तरीही आपण बरंच काही करु शकतो. ते बघून आपोआपच दुसरा पण प्रयत्न करतो. इथे आपण आपल्याला जे शक्य आहे त्याचाच आपण विचार करणार आहोत.
आपण आपल्या सवयी जराशा पर्यावरणपुरक बदलणार आहोत. अवघड आहे पण अशक्य नाही. असं काही करायचं म्हटलं की एक प्रश्‍न हमखास विचारला जातो. आपण एकट्याने करुन काय होणार आहे? मला सांगा, समुद्रात कधीतरी एक थेंब पाणी जमा झाले असेल म्हणूनच समुद्र तयार झाला ना? तळे थेंबे थेंबेच साचते ना? नळाच्या पाण्याने एकदम हंडा भरतो का?
मग झालं तर.....
आपल्या पुढच्या पिढ्यांना किमान प्यायला पाणी मिळावं आणि शुद्ध हवा मिळावी असं वाटत असेल तर त्यासाठीचे प्रयत्न आपण देखील करायला हवेत नाही का?
चला करु या यादी अशा सवयींची ज्या बदलता येणं ठरवलं तर सहज शक्य आहे.
आजपासून घराबाहेर पडताना हातात पिशवी जरूर नेऊ. कापडी पिशवी पर्यावरण स्टेटसचा सिम्बॉल बनवू.
शक्य असेल तिथे प्लास्टिकच्या बॅगला नाही म्हणू.
ओला कचरा फेकण्यासाठी प्लास्टिक बॅगचा वापर टाळू. कचरा घंटागाडीतच टाकू.
चॉकलेटचे कागद, वेफर्सच्या पिशव्या खिशात घालून घरी आणू आणि डस्टबीनमध्ये फेकू. बाहेर कचरा करणार नाही.
पाणी कधीच शिळे होत नाही. त्यामुळे ते फेकून द्यायचे नाही. दाढी आणि ब्रश करताना मगचा वापर करू. नळी लाऊन सडा मारणार नाही. गाडी धुणार नाही. कपडे आणि भांडी धुण्यासाठी बादलीचा वापर करू.
जमेल तसे एक झाड लावू. ते ही नाही जमले तर जवळच्या झाडाला रोज एक बाटलीभर पाणी घालू. ते ही नाही जमलं तर झाडाची फांदी जरी तोडताना कोणी दिसलं तर त्याला हटकू.
थर्माकोलचा वापर टाळू.
घरातले आवश्यकता नसलेले दिवे बंद करु.
घराच्या गॅलरीत, खिडकीमध्ये चिमण्यांसाठी अन्न आणि पाणी ठेऊ.
आपल्या मुलांनाही याच सवयी लाऊ. हे झाले मला सुचलेले फंडे
तुम्हालाही बरेच फंडे सुचू शकतात.
हे सगळे फंडे वाचायला जेवढे सोपे वाटतात पण अंमलात आणायला तेवढेच त्रासदायक आहेत. कारण ते अंमलात आणायचे म्हटलं तर आपल्याला बदलावे लागणार. कोणताही बदल इतका सोपा नसतो. रेल्वे साधा मार्ग बदलते तर किती खडखड करते. इथे प्रश्‍न आमच्या सवयींचा आहे.
तरीही ठरवलं तर आम्ही स्वत:ला नक्की बदलू शकतो. दुष्काळाने दिलेले हे शहाणपण आपण कायम ठेवायला हवं. काय वाटतं तुम्हाला?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users