अबोला

Submitted by रसप on 6 November, 2013 - 23:21

'मराठी कविता समूहा'च्या 'कविता विश्व - दिवाळी अंक २०१३' मध्ये समाविष्ट कविता -

तू अशी सवय जी शक्य सोडणे नाही
मी शब्द अबोल्याचा माघारी घेतो
तू नसल्याची कल्पनाच करणे नाही
तू सांग स्वत:ला कोण यातना देतो ?

हा नाराजीचा सूर नकोसा वाटे
मी पंखाविन पक्ष्यासम तडफड करतो
श्वासांची सरिता क्षणाक्षणाला आटे
मी जगण्याचे हे नीरसपण अनुभवतो
............. मी शब्द अबोल्याचा माघारी घेतो

तव नयनसुमांवर दहिवर डबडबताना
मी दु:खाचे आकाश त्यातुनी बघतो
कटु शब्दांना मी माझ्या आठवताना
माझ्या प्रतिबिंबालाही परका ठरतो
............. मी शब्द अबोल्याचा माघारी घेतो

हातातुन माझ्या तुझा हात सुटल्यावर
हाताला माझ्या हलका दरवळ असतो
जाशील निघुन तू जाण्याचे ठरल्यावर
हे जाणुनदेखिल तुला मनाशी जपतो
............. तू सांग स्वत:ला कोण यातना देतो ?

....रसप....
३ ऑक्टोबर २०१३
http://www.ranjeetparadkar.com/2013/11/blog-post.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users

"मी शब्द अबोल्याचा माघारी घेतो " >>> व्वा ! छानच.

"कटु शब्दांना मी माझ्या आठवताना
माझ्या प्रतिबिंबालाही परका ठरतो" >>> या ओळी सर्वात विशेष वाटल्या.